तळ सागराचा!!!

Submitted by प्रशांत तिवारी on 8 November, 2017 - 04:14

189562_196713233693044_100000631052806_588266_2172484_n.jpg
अथांग हा तुझा देह न पुरे या लोचनी
नजर होते सैरभर पहातो श्वास रोखुनी
तळाची परिसीमा भिडते हृदयाच्या अंतरी
भासते नववधू प्रिये समान तू या भूवरी

मंथनाच्या डोहात जग हे सामावलेले
निळाशार स्पर्शात शरीर आसुसलेले
उत्कटतेच्या परमबिंदूत मन शहारलेले
जसे दिवस नि रात्र भेटीस आतुरलेले

लाटांच्या सान्निध्यात मीच माझा न राहातो
हिंदोळ्यात आठवणींच्या तुझीच साथ पाहतो
हुंदके कमी की काय म्हणून तळी स्वतःस निरखतो
अश्रूसमान तुझ्या पाण्यात मधासारखा विरघळतो

आहेत चंद्र नि चांदण्या नेहमीच तुझ्या सोबती
मंद तुझ्या या लाटातुनी संगीत ही निपजती
उडती तुषार मिटलेल्या या डोळ्यावरती
भासे क्षणिक स्वर्ग सारे त्या पटलावरती

वरदान तुझ्या ओटी लाभलेे निसर्गाचे
वचन भेटे तुला कधीही न आटण्याचे
स्वप्नवत धैर्य दे मनी कधीही न हरण्याचे
असेच राहू दे नाते माझे नि सागराचे

https://www.facebook.com/prashant.s.tiwari

https://www.youtube.com/channel/UCsvB3X7OV2p7PMjpTEtch3g

Group content visibility: 
Public - accessible to all site users

chhan! Happy