अभेद्य राजगड आणि वाघरु

Submitted by hemantvavale on 10 October, 2017 - 03:22

“राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु?काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते“, महेमद हाशीम खालीखान.

मुरुंबदेवाचा डोंगर
पुर्वी मुरुंबदेवाचा डोंगर ह्या नावाने ओळख असलेल्या एका तीन पंख असलेल्या ह्या डोंगरास शिवाजी महाराजांनी, वाढीव बांधकाम करुन, स्वराज्याची राजधानीचा गड म्हणुन “राजगड” असे नाव ठेवणे म्हणजे शिवाजी राजांच्या पारखी नजरेचा एक नमुनाच आहे.

मी राजगड अनेक वर्षांनी चढत होतो. आता वाहतुकीच्या अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत. मी पहील्यांदा राजगडावर आलो होतो तेव्हा आम्हाला वाहतुकीसाठी एकच पर्याय होता, व तो म्हणजे राज्य परीवहन मंडळाची लाल गाडी, होय एस.टी. एस. टी. च्या मदतीने आम्ही पुर्वी अनेक पदभ्रमणाच्या मोहीमा केल्या. व त्यात एक गम्मत असायची, की जी सध्याच्या वाहतुकीच्या अनेक सुविधांमध्ये मिळत नाही. ती गम्मत अशी की, आम्ही कोणत्याही गडाच्या एका दिशेने गडावर चढायचो व गड पाहुन, त्यावरील वास्तु अवशेषांचा अभ्यास करुन, गडाच्या दुस-या बाजुने खाली उतरुन एखाद्या दुस-या गडाकडे किंवा गावाकडे निघायचो.

यावेळी देखील आम्ही असाच अनुभव पुन्हा घ्यायचे ठरवले. आम्ही एक खासगी वाहतुक सेवा पुरवणा-या , वेल्ह्यातील स्थानिक व्यक्तिची गाडी भाडेतत्वावर घेतली. गुंजवणी गावात, आम्ही गाडीतुन उतरलो व आमचे गंतव्य ठरवले , ते म्हणजे आळु दरवाज्याने राजगड-तोरणा धारेने चालत जाऊन लागणारी , महादेव कोळ्यांची एक वस्ती जोरकर वाडी.
आमची गाडी आम्हाला जोरकरवाडीमध्ये न्यायला येणार होती.

पदभ्रमणास सुरुवात – Rajgad Torna Trek
आम्ही किला चढायला सुरुवात केली. सुवेळामाचीच्या खाली उतरलेल्या दांडाच्या खालच्या उतारावर घनदाट वाढलेले जंगल लक्ष वेधुन घेत होते. मी तोरणा नेहमीच पाहतो, व तोरण्याच्या बाबतीत “जंगलाचा अभाव” ही खंत राजगडावर मला दिसली नाही. व मी काहीस सुखावलो. जस जसे आम्ही पदमावती माचीच्या दिशेने , चढत होतो, तसतसे , डावीकडे सुवेळामाची चे नेढे, मोठे झाल्यासारखे भासत होते. मधुनच ढग येऊन नेढं व सगळी सुवेळा माची ढगात नाहीशी होत होती. आम्ही किल्ला तर चढत होतो पण किल्ला, म्हणजे पदमावती माची , बालेकिल्ला काही दिसत नव्हते. कारण राजगडाने देखील फेटा बांधलेला होता. मधुनच दिसणारी सुवेळा माचीच काय ती आम्ही राजगडावरच चढत आहोत याची जाणीव करुन द्यायची. अन्यथा हा प्रवास, म्हणजे, स्वर्गारोहणापेक्षा वेगळे काही नव्हते आम्हासाठी. चोर दरवाज्याच्या खालच्या दांडाने आम्ही चढत होतो.
उभी चढण थोड्या वेळासाठी, आडवी होते. त्या पठाराच्या उजवीकडच्या दांडावर मला एक राबता असलेला वाडा दिसला. हा वाडा म्हणजे शनिवार वाड्यासारखा, किंवा कोणत्याही सरदाराचा वाडा नव्हता. हा रावता वाडा म्हणजे मावळी धनगर ज्ञातीच्या , लोकांच्या गाई गुरांस बाधण्याचा गोठा होय. अशा जंगलात असलेल्या गोठ्यास आज ही स्थानिक लोक वाडा असेच म्हणतात. वाडा उजवीकडे हळु हळु खाली जात होता. व आकाराने लहान होत होता. तस तसा मला गोनिदांचा सोपान दरडीगा (दरडीगे वाडीचा धनगर) आठवु लागला. गोनिदांनी रगवलेला बाबुदा, हानुवती , यसुदी, वयनी, दरडीगा धनगर आणि बाबुदाचे अनामिक प्रेम म्हणजे वाघरु. एकेक पात्र डोळ्यासमोरुन जात होते. व जणु सोपान दरडीगाच त्याच्या त्या वाड्यात गायी-गुर कोंबताना मला भासु लागला. किल्ला जीवंत होतोय अस काहीस जाणवु लागल. गोनिदांची सगळी पात्र किल्ल्यावर राबती आहेत की अस वाटु लागल. ओर दरवाजच्या खालच्या कड्याला असलेल्या पाण्याच्या टाक्याच्या कडेला बसुन , घामाघुम झालेला बाबुदा मला दिसला. व थकलेल्या मला, हाताने इशारा करुन , टाक्याकडे बोलावतो आहे असे भासु लागले.
आम्ही देखील तिथेच वाहत्या पाण्याने आमची तहान भागवली व पुढया उभ्या चढाईला सुरुवात केली. वनविभाग व पुरातत्व खात्याने सध्या त्या उभ्या निसरड्या पाय वाटेला आधारासाठी खांब आणि भक्कम रेलींग केले आहे. हे आधार नसतील तर काय बिशाद कुणाही ऐ-या गै-याची चोरवाटेने किल्ल्यात प्रवेश करायची? आणि अशीच अवस्था किल्यावर येणा-या सगळ्याच पायवाटांची आहे. म्हणुनच महमद हाशीम खलीखानाला ह्या किल्ल्याला चहुंगाने वेढा देणे अशक्यप्राय वाटले यात नवल ते काय?

आता आम्ही चोरदरवाज्यातुन वाकुन गडावर पाऊल ठेवले. समोर लालतोंडी माकड आमच्या स्वागताला तयारच होती. अनेकदा काही हौशे गवशे नौशे, गडावर येताना भरपुर खाद्यपदार्थ आणतात, व खाली उतरताना ते शिल्लक राहीलेले असतील तर, किंवा अतिउत्साहापोटी ह्या माकडांना ते खाद्य पदार्थ खाण्यासाठी टाकतात. जंगली माकडांना, ह्या शहरी माकडांनी टाकलेला तो माकडमेवा खुप आवडतो, व अशा अनेक शहरी माकडांमुळे, ही लाअलतोंडी माकडांनी मात्र, आलेल्या प्रत्येक पर्यटकाने त्यांना बिस्कीटे वगेरे खायला दिल्याशिवाय पुढे जायचे नाही, असा अलिखित नियमच बनवुन टाकला आहे. व ते प्रत्येक पर्यटकाकडे आशाळभुत नजरेने पाहत राहतात. त्यातच पर्यटकांमध्ये कुणी एकटा दुकटा व्यक्ति ,बाई बापडी, पोर सोर दिसली तर आशाळभुत नजर लोप पाऊन , हिसकावुन घेण्यासाठी माकडांचा कळप माणसावर तुटुन पडतो व हातातील पिशवी घेउनच पसार होतो.(थोडक्यात काय तर माणसे किल्यावर जाऊन माकडचाळे करतात, तर माकडे किल्यावार माणुसचाळे करीतात )

चोरदरवाज्यातुन किल्ल्यावर चढले की समोरच पदमावती तलाव दिसतो. तलाव चांगला औरस अौरस आहे, तलावाच्या भिंती अजुनही शाबुत आहेत. तलावाच्या समोरच , म्हणजे चोरदरवाज्यातुन किल्ल्यावर प्रवेशते झाले की लगेचच, उजवीकडे चिलखती बुरुजाच्या सताठ देवळ्या दिसतात. ह्या देवळ्यांमध्ये उभे राहुन, गुंजवणीच्या दाम्डावर टेहळणी करता येते. तसेच चुकुन एखादा शत्रु खालची खडी चढण, चढुन येणाचा प्रयत्न करतोय असे दिसले की ह्याच देवळ्यांमधुन भाले, धोंडे, तीर आदींचा वर्षाव त्यांच्या वर केला जाई. शाइस्ता खान राजांस मारण्या किंवा धरण्यासाठी, विडा उचलुन आला. तेव्हा पुनवडी बेचिराख करण्याचे स्वपच जणु उराशी बाळगुन आला होता. मावळ पट्टा, वतनदा-या, गावे, खेडी पाडी, किल्ले, देवळे वाटेत जे जे लागेल ते सर्व उध्वस्त करीत खान रयतेचे हालहाल करीत होता . त्यानंतर अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी देखील म्लेच्छ टोळ्या हिरडस मावळ व गुंजण मावळात हाहाकर करण्यासाठी धुडगुस घालीत . धर्मांध राक्षसांनी बाया बापड्या भ्रष्टविल्या, गावेच्या गावे मारली गेली, काही देशमुखांना जबरी मुसलमान केले गेले, काहींना वतने सोडुन पळवुन लावले तर काहींची चामडी सोलण्यात आली. शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये अनेक किल्ले स्वराज्यात सामील झाले व पुन्हा गनिमाने हस्तगत केले . राहीला तो फक्त राजगड. तीच अवस्था पुढे मिर्झा राजे जयसिंगाच्या आक्रमणावेळी झाली. राजगड काही कधी पडला नाही. राजगड अभेद्य राहीला त्याचे कारणच आहे राजगडाच्या तीन माच्या व त्यावरील चिलखती तटबंदी व चिलखती बुरुज. दुहेरी तटबंदी , दोनही तटांच्या मधुन दोन अडीच मीटरची वाट, भुयारी परकोट, दिंडे, दगडी सोपान, हे सगळे अचंबीत करणारे आहे. प्रत्येक माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. एवढे सगळे असताना हा किल्ला पडेलच कसा? शिवाजी महाराजांची पारखी नजर, संभ्याव्य धोके ताडण्याची क्षमता व त्यासाठी किल्ला बांधणी मध्ये केलेला विश्वविक्रम हे वर्तमानात आपणास थक्क केल्यावाचुन राहात नाही.

आम्ही पद्मावती मंदीरात पोटपुजा केली. हे तसे पाहीले तर प्राचीन मंदीर. शेकडी उन्हाळे पावसाळे अंगावर झेललेले. त्यामुळे मुळ मंदीर कधीच पडले. आम्ही २० वर्षापुर्वी आलो होतो तेव्हा दगडमातीच्या भींती व त्यावर गंजलेले लोखंडी पत्रे अशी अवस्था होती या मंदीराची. त्यातही वारा आला की ह्या पत्र्यांचा एखाद दुसरा कोपरा वा-यासोबत हेलकावे खात कचकच आवाज करायचा. २००२ साली पुरातत्व खात्याने, किल्ला संवर्धानाचे काम हाती घेतले, त्यात सर्वप्रथम ह्या मंदीराचे काम करण्यात आले. पद्मावती देवीची गाभा-यातील मुर्ती आणि तशीच आणखी एक मुर्ती गाभा-याच्या बाहेर, उजवीकडे आहे. दोन्ही कदाचित एकाच देवतेच्या मुर्ती असाव्यात, व त्यांचा कालखंड जास्तीतजस्त शंभरेक वर्षापुर्वीपेक्षा जास्त नसावा असा अंदाज त्या मुर्तींच्या घडवण्याच्या पध्दतीवरुन जाणवतो. आमची पोटपुजा सुरु होईस्तोवर आमचे काही सहकारी अद्याप मंदीरात यायचे होते. व ते सगळे अमराठी होते. मी सोडुन फक्त दोघेजणच मराठी भाषिक होते. संधीचा फायदा घेत, थोड्या वेळासाठी का होईना मी पद्मावती मंदीरात, वाघरु मधील एका प्रसंगाचे , कादंबरी वाचन केले. मंदीरात अन्य मराठी भाषिक पर्यटक, ट्रेकर्स, तसेच वेल्ह्यातील जोशी काका, व नुकतेच काशी विश्वेश्वरास जाऊन आलेले पाली गावातील शिंदे काका की होते. माझे कादंबरी वाचनाचा छोटेखाणी कार्यक्र्म झाल्यावर, हे लोक स्वतःहुन कादंबरी वाचन आवडले असे सांगण्यास आले. तोवर आमचे सहकारी देखील येऊन बसले होते, आम्ही आमच्या खाण्यावर ताव मारला. शिंदेकाकां नी काशी विश्वेश्वराहुन आणलेला प्रसाद ही खाउन आम्ही आमच्या पुढच्या टप्प्याकडे निघालो.

राजगडावरचा राजवाडा कसा असेल? किमान चार एकर सपाट पठारावर पसलेला राजवाडा, मागे भले मोठे अंगण, परसबाग, त्याच्या ही मागे, शौचालये. राजवाड्याला सुध्दा स्वतःची तटबंदी होती. व तिचे अवशेष आजही दिसत आहेत. ही तटबंदी चे बांधकाम सगळे मातीच्या भाजलेल्या विटांमध्ये केलेले आहे. ते शाबुत आहे. (ह्या राजवाड्याचे थ्री मॉडेलींग कुणीतरी करायला हवे.)

अंबरखान्यापाशी पोहोचल्यावर मला पुन्हा हानुवती (बाबुदाचा जावई) आठवला. अंबरखान्याचे पुढे ढालकाठी कडे , हानुवतीचे एक लाडके झाड रुखाचे झाड होते. व त्याच रुखाच्या झाडावर मचाण बांधुन पुण्याहुन कलेक्टरनी पाठवलेल्या रावसाहेबाने वाघराची शिकार करायचा अयशस्वी प्रयत्न केला होता. हानुवती खुप वाईट वाटले होते.
ते झाडे काही दिसले नाही. पण ढालकाठीच्या दिशेने एका मोकळ्या मैदाना, ते झाड , ती मचाण, आणि मचाणी वर बंदुक ताणुन , नेम धरुन बसलेला तो राव साहेब ब खालती , गवत, फांद्या यांचा झोल करुन अवघडुन बसलेला हानुवती व मारती दरडीगा, असे चित्र मी मनातमनात रंगवीत रंगवीतच संजीवनी माचीच्या दिशेने निघालो.

सुरुवातीस वाट चुकलो, आम्ही संजीवनी ऐवजी पाली दरवाज्याशी जाऊन पोहोचलो. तेवढ्यात मागुन वेल्ह्यातले जोशी आणि पालीलते शिंदे येताना दिसले. त्यांनी मग सांगितले की निशाणा वरुन बालेकिल्ल्याकडे जा, व पुढे बालेकिल्ला डाव्या हातस ठेवुन उजवीकडे चालायला लागा. बालेकिल्ल्याच्या वर जाऊन किल्ला मी पुर्वी पाहीला आहेच. पण बालेकिल्ला च्या पायथ्यातुन, अक्षरक्षः पायथ्यातुन ही वाट संजीवनी माचीकडे जाते. डावीकडे बालेकिल्ल्याचा तो ठोकळा व त्यावरुन वाअहणारे जलप्रपात, त्या ओल्या झालेल्या कातळाला नटवणारी विविध शेवाळ सदृश्य वनस्पती, हे सगळे विलोभनीय होते. बालेकिल्ला थोडा मागे पडल्यावर मग प्रवास सुरु होतो, ढगांतुन चालण्याचा. आम्ही निघालो पुढे संजीवनी माचीच्या दिशेने.

राजगडाची भव्यता
राजगड किती मोठा आहे? याचे अनुमान वाचुन कळने थोडे अवघडच आहे. तरीही एक दाखला देतो. संजीवनी माचीचाच.ह्या माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूज लागतात. या तिन्ही बुरुजांवर शिवाजीच्या काळात प्रचंड मोठा तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरूज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळू दरवाजानेसुद्धा येता येते. आळू दरवाज्यापासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.

तर अशा ह्या संजीवनी माचीवर कधी डावेकडुन ढग येत तर उजवीकडुन येत. क्षणात तोरण्याच्या दिशेचा दांड दिसायचा तर क्षणात नाहीसा व्हायचा. जागोजाग रानडुकराने रान खोदलेले दिसत होते.आमचे गंतव्य अद्याप दुर होते. आम्हाला अजुन संजीवनी माचीच्या निम्म्यात पोहोचुन आळु दरवाज्याने खाली उतरुन माचीच्या तळातुन तोरण्याकडे निघायचे होते. आमच्या सोबत चालणारे तसे नवखे होते, त्यामुळे चालीचा वेग म्हणाव तेवढा नव्हता.
सर्वांना किल्ला, किल्ल्यावरुन दिसणा-या डोंगररांगा, उतार, द-या खुप आवडले. खुप साजरे वाटले. ते साजरे वाटणे तिथवरच होते जोपर्यंत हे सगळे दुर होते. आळु दरवाज्याने खाली उतरल्यावर, तिरप्या होत गेलेल्या वाटेने उतरणे तसे अवघड नाही. पण तुम्ही जर नवखे असाल व तुमच्या सोबत कुणी जाणकार नसेल तर अशा वाटेने चालणे म्हणजे एक भयंकर अग्नीदिव्यच आहे. ह्या दिव्व्यातुन सुखरुप बाहेर पडलात तर मग “दुरुन डोंगर साजरे” या म्हणीच्या अर्थाचा उलगडा होतो.

जेव्हा आम्ही संजीवनीच्या मुख्य बुरुजाच्या तळापासुन तोरण्याच्या दिशेला निघालो तेव्हा, अचानक मला यसुदीच्या गायी-गुर वळण्याच्या आरोळ्या ऐकु आल्या. मी मागे वळुन पाहील. बुरुजावर कुणीच नव्हत. पण आरोळ्या तश्याच चालु होत्या. एकेक पाऊल पुढे जात होतो तशी संजीवनीमाचीचा बुरुज लहान लहान होताना दिसत होत. तश्या त्या आरोळ्यासुध्दा ऐकु येईनाशा झाल्या.

आमच्या सोबत दोन काटक फिरस्ते(तेच ते माझे कांदबरी वाचनाचे दोनच श्रोते) देखील होते. अजित आणि मनदीप. त्यांनी सगळी संजीवनी माची पायाखाली घातली. दुहेरी तटबंदीमधुन चालुन देखील आले. व माझ्या सुचनेप्रमाणे खुलसीच्या खिंडीकडे पुढे निघाले देखील. बाकीच्या सदस्यांना “दुरुन डोंगर साजरे” या म्हणीचा अर्थ समजावत समजावत आम्ही खिंडीत मजल दरमजल करीत पोहोचलो.

हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे
सदर भटकंतीचे आम्ही टिपलेले अफलातुन , अतिसुंदर फोटोज पाहण्यासाठी इथे टिचकी मारा.
http://nisargshala.in/undefeated-rajgad-torna-camping-near-pune/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.

राजगडावर गोनिदांच्या कोणत्यातरी पुस्तकाचे वाचन करण्याचा आमचा अनेक दिवसांचा संकल्प कोणीतरी पुर्ण केल्याचे वाचून 'संतोष जाहला'

मायबोलीवर आपले स्वागत असो.

छान लिहिलंय. >>> +१

लिंक देण्यापेक्षा फोटो ईथेही टाकले तर बरे होईल