खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट.
‘व्हिडीओ फिल्म मॅगझिन’ ही कल्पना तेव्हा नवीन होती. अशा पहिल्या वहिल्या मॅगझिनच्या (‘लहरें’) एका ‘अंकात’ फिल्म इंडस्ट्रीतल्या एका सुप्रसिद्ध जोडगोळीतला सुप्रसिद्ध एक कुणी मुलाखत देत होता...
त्या एकाच्या नेहमी बरोबर असणारा दुसरा मात्र ह्या मुलाखतीच्या वेळेस हजर नव्हता. ह्याचे कारण आता सर्वांनाच माहीत झाले होते. त्या दोघांची जोडी फुटली होती. एक प्रदीर्घ आणि अत्यंत यशस्वी अशी भागीदारी संपुष्टात आली होती.
तो ‘एक’ म्हणजे सलीम खान होता. ‘सलीम-जावेद’ मधला सलीम!
मैत्री आणि लेखनातील भागीदारी संपुष्टात आल्याला काही काळ लोटला असला तरी कडू चव अजूनही त्याच्या जीभेवर रेंगाळत होती. त्यामुळे शब्दही टोकाला विष लावलेल्या बाणांसारखे निघत होते.
मुलाखतकाराचा थेट प्रश्न आला ‘आता तुम्ही वेगळे झालात.. जावेदना यश मिळत आहे तसे तुम्हाला मिळत नाहीये अशी इंडस्ट्रीत चर्चा आहे.. काय म्हणणं आहे तुमचं?’
(खरं म्हणजे कुणी चर्चा करो वा ना करो, वास्तव तेच होतं. गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होती.)
सलीम निर्ढावलेपणाने व आत्मविश्वासाने उत्तर दिले:
“एक संस्कृत श्लोक आहे…”
(सलीमने तो श्लोक सांगितला. इथे त्याच्याबद्दल दोन क्षण मला आदर आणि कणव वाटून गेली. बिच्चारा! आता सलमानचा बाप असणे हा त्याचा घोर अपराध आहेच पण माणूस अगदीच ‘ऑप्शन’ ला टाकण्यासारखा नाही तर!)..
सलीम पुढे सांगता झाला:
“…ह्या श्लोकाचा अर्थ असा की रथापासून चाक वेगळं होतं तेव्हा काही काळ ते रथाच्या पुढे वेगात जातं.. यथावकाश, त्या चाकाची गती मंदावते पण रथ मात्र पुढे जात राहतो… थोडक्यात, जावेदला हे तात्कालिक यश मिळालं असेलही.. पुढे काय होतं ते पाहूयात’”
पुढे जे सलीमला अपेक्षित होतं तसं झालंच नाही. सलीमचा रथ केव्हाच भंगारात निघाला (‘कब्जा’, ‘तूफान’ वगैरे दिव्य चित्रपट लिहील्यावर काय होणार?). जावेदचं स्वयंभू ‘चाक’ मात्र दिवसेंदिवस गतिमानच होत राहिलं. हा इतिहास आहे!
जावेद हा दोघांमधे सरस आणि अस्सल टॅलेंटचा घडा होता/आहे असं माझं मतं आहे!
सलीम मुख्यत: जावेदच्या चमकदार कल्पनांचे टेनिस चेंडू परतवत असावा, जेणेकरुन खेळ सुरु राहील व जावेदसारखा खेळीया उत्तेजित होऊन अजून प्रतिभाशाली स्ट्रोक्स मारेल! सीन लिहिण्यात दोघांचा हातखंडा असावा. ‘कॅरेक्टर’ उभे करण्यात सलीमचा वाटा असावा. पण ‘तडाखेबाज संवाद लिहीणे’ हे जावेदचे बलस्थान होते/आहे हे निर्विवाद!
‘शोले’ च्या वेळचा एक किस्सा आहे. (वाचा: ‘शोले : द मेकिंग ऑफ अ क्लासिक’). ‘शोले’ मधे धर्मेंद टाकीवर ‘टाईट’ होऊन चढतो तो सीन सलीम-जावेद मधे चर्चा होऊन नीट बांधला गेला होता, पण प्रत्यक्षात लिहायचा मात्र राहून गेला होता. वेळ जात होता. आज-उद्या करता करता तो सीन लिहायचे राहून जात होते. पाणी डोक्यापर्यंत आले होते.. मग एक दिवस तो सीन जावेदने बंगळूर एअरपोर्टवर पोहोचेपर्यंत घाईघाईत गाडीत लिहायला घेतला. एअरपोर्टला गेल्यावर थोडा वेळ होता तेव्हा असिस्टंटला चेक-इन करायला पिटाळून गाडीच्या बॉनेटवर जावेदचे तो सीन घाईघाईत लिहीणे, खरे तर अक्षरश: खरडणे, चालूच होते. तो आख्खा सीन लिहून झाला आणि मगच उड्डाणाला केवळ काही मिनिटे राहिली असताना जावेद विमानात बसला.
इतर अगणित संवादांबरोबरच त्या सीनचे संवाद हासुद्धा शोलेचा एक ‘हायलाईट’ आहे! (‘मगर ये अंग्रेज लोक जाते कहा है’ , ‘इन जेल, बुढिया चक्की पिसिंग ऍंड पिसिंग ऍंड…’ ‘मौसीसे कौन शादी करेगा सालों’’).
निर्मात्यांशी धीटपणे बोलणी करणे (आणि त्यांच्या म्हणजे लेखक जोडगोळीच्या खणखणीत असलेल्या नाण्याला तसेच खणखणीत मानधन वाजवून घेणे) ह्यातही सलीमचा महत्वाचा वाटा असावा.
काय असेल ते असो, पण सलीम-जावेद ह्या जोडगोळीने इतिहास घडवला.. यशस्वी व अतिलोकप्रिय चित्रपटांची रांग लावली. कथा/पटकथा ह्याबरोबरच ‘सलीम-जावेदचे संवाद’ हा परवलीचा शब्द झाला होता. लोकप्रियतेच्या परिसीमेची आणि चित्रपटांच्या जंगी यशाची ती गुरुकिल्ली होती!
हिंदी चित्रपट संवादांविषयी लिहीताना ‘सलीम-जावेद’ विषयी न लिहीणे म्हणजे त्यांच्याच ‘दीवार’ ची कथा ‘विजय’च्या पात्राशिवाय सांगण्यासारखे आहे.
इथे मी ‘कितने आदमी थे’, ‘तेरा क्या होगा कालिया?’ किंवा ‘मेरे पास मॉं है’ अशा अनेक सुपरिचित संवांदांविषयी विस्ताराने लिहीत नाहीये कारण बाकीचे कैक संवाद दुर्लक्षिले जातात जे ह्या जोडगोळीच्या विलक्षण प्रतिभेचे भक्कम पुरावे आहेत.
***
एक वेगळाच ‘ह्युमर’ हेही सलीम-जावेदच्या संवादाचे चटकन लक्षात न येणारे / राहणारे वैशिष्ट्य!
‘मजबूर’ मधे फिश टॅंक घ्यायला आलेला अमिताभ दुकानदाराला विचारतो की ‘सगळे मासे सारखेच दिसताहेत.. ह्यांच्यात नर मादी कसे ओळखायचे?’ तेव्हा तो दुकानदार म्हणतो:
“आसान है साहब. जो तैर रही है वह मादा है और जो तैर रहा है वह नर है!”
‘सीता और गीता’ पाहताना ह्याचा प्रत्यय ठायी ठायी येतो.. एरवी चित्रपट पहाताना निसटून जाऊ शकतील अशी ही रत्न, हिरे, माणकं नीट वाचा!
“साला अपना बॅडलकही खराब है”
"नीचे आजा, बेटी!"
"उपर आजा, मोटी!"
दारु पिऊन हेमा मालिनीपाशी मन मोकळं केल्यावर धर्मेंद्र सुधारायचे ठरवतो आणि दुस-या दिवशी सकाळी आयुष्यात प्रथमच देवळात येतो. धर्मेंद्र देवाला उद्देशून म्हणतो:
“उस्ताद!”
( ‘दीवार’ च्या ‘आज खुश तो होंगे तुम’ असं देवाशी डायरेक्ट संवाद साधण्याची गंगोत्री इथे होती का?)
“उस्ताद! मै थोडा लाईनसे आऊटलाईन हो गया था…. उस्ताद, मै अब दारुको हात नही लगाऊंगा.. दारु पिउंगा भी नही!”
अशक्य !!!
‘काला पत्थर’ मधे संवादांची आतषबाजी आहे. त्यावेळेस सलीम-जावेद आणि अमिताभ मधे काहीसा बेबनाव असल्याचे सांगितले जाते. अमिताभ आणि शत्रुघ्न मधे तर तणावपूर्ण संबंध होते (जे पडद्यावरही त्या चित्रपटात दिसून येते किंवा चित्रपटातील संघर्षांच्या प्रसंगाना अजून धार आली आहे असे वाटते तरी). काही असे, पण त्यामुळे अमिताभला जरी काही खास संवाद असले तरी प्रचंड झुकते माप शत्रुघ्न सिन्हाला मिळाले आहे. ज्याला ‘ऑथर बॅक्ड’ रोल म्हणतात तसा मिळाला आणि संवादांची आतषबाजी करायला भरपूर दारुगोळा सलीम-जावेद कडून मुद्दाम दिला गेला. मग शॉटगन सिन्हानेही अप्रतिम अदाकारी करून त्याचे चीज केले. (बहुदा 'काला पत्थर' आणि 'नरम गरम' ह्याच चित्रपटांत मला शत्रुघ्न फार फार आवडला आहे. बाकी ठीकठाकच!)
ह्या चित्रपटात एका ‘टिपिकल हिंदी फिल्म स्टाईल’ प्रसंगात जंगलातून एकट्या जाणा-या नीतू सिंग वर काही गुंड अतिप्रसंग करायचा प्रयत्न करतात. आणि योग्य वेळी शत्रुघ्न येऊन त्यांना पिटून पळवून लावतो. आता ह्या तशा त्या काळच्या दर सिनेमाआड दिसणा-या प्रसंगात सलीम-जावेद काय कमाल करतात पहा
(एक तर नीतू सिंग ही जेल मधून पळून आलेल्या शत्रुघ्नचीच खबर पोलीसांना देऊन इनाम मिळवण्याच्या मीषाने जंगलातून एकटी कुणाला कळू न देता चालली आहे हा उत्तम पटकथेचा नमुना).
तर ह्या प्रसंगात एंट्रीचे आणि शेवटचे वाक्य शत्रुघ्नचे पूर्ण कॅरेक्टरच उभे करते…
मोक्याच्या क्षणी एंट्री घेतल्यावर तो गुंडांना म्हणतो:
“तन्ना, इस लडकीको तो मै बचा लूंगा.. मगर इस घने जंगलमें तुम लोगोंको मुझसे कौन बचाएगा?”
पळून जाणा-या गुंडाना पाहून, काय होऊ शकले असते ह्या विचारात सटपटलेली नीतू सिंग त्वेषाने त्यांचा धिक्कार करत, त्यांच्या दिशेने दगडं फेकत म्हणते “आओ हरामजादो, अब क्यों भाग रहे हो, अब आओ..”
ह्यावर शत्रुघ्न शांतपणे म्हणतो:
“उनके जानेका इतनाही गम है बालिके, तो वापस बुला ले?”
धिस इज सलीम जावेद!
आता शत्रुघ्न आणि अमिताभच्या तोंडचे संवाद लिहील्यावर बाकी सीन्सचे संवाद लिहायला प्राणवायू कितीसा उरणार? पण नाही.. शशी कपूरलाही बॅटींग करायला दिली आहे! फिल्मी स्टाईल ‘ग्लॅमरस’ फ्रिलांस पत्रकार वगैरे असणा-या परवीन बाबीला, कोळशाच्या खाणीत इंजिनिअर म्हणून काम करणारा शशी कपूर ‘कोयला’ ह्या विषयावर शास्त्रीय (!) माहिती कशी देतो पहा:
“कोयला दो किस्म का होता है। पहले किस्म का कोयला काला होता है। दुसरे किस्मका कोयलाभी काला होता है । इसलिए दोनो किस्म के कोयले एक जैसे होते है । कोयलेकी दलाली मे हात अक्सर काले हो जाते है । कोयलेके कई इस्तमाल होते है । कोयलेसे बच्चे चेहरेपे मुंछे बनाते है । जवान लोग दिवारोंपर मिठी मिठी प्यारी प्यारी बातें लिखते है।..”
‘शान’ मधे पैसे उधार देणारा सेठिया ‘जॉनी वॉकर’ ह्याचे इरसाल संवाद ही ऐकण्याची आणि पहाण्याची गोष्ट:
त्याच्या समोर पैशांची बंडले टाकल्यावर:
जॉनी: “कितने है भाई?”
शशी कपूर: “पुरे तीस हजार”
जॉनी: “तीसही होंगे.. मगर तुम कहते हो तो गीन लेता हूं।” (?)
आता त्याला कुणी काहीच म्हटलेले नसते पैसे मोजून घेण्याविषयी!
पण मोजून झाल्यावर तो वर आणिक म्हणतो:
“पुरे तीस है. देखा, बेकार गिनवाया. मै तो पहलेही कह रहा था।” (!)
‘शोले’ मधे तर सरळ साधा संवादच नसेल असे वाटते.
‘यूंके आप यहा कैसे?’ ह्या बसंतीच्या साध्या प्रश्नावर धर्मेंद्र च्या साध्याश्याच “यूंके, यूंही!” ह्या उत्तराची लज्जत काही औरच.. धर्मेंद्रच्या म्हणजे वीरूच्या पूर्ण कॅरेक्टरचे सार ह्या साध्या संवादात आहे असे वाटून जाते. (हा संवाद आम्हा काही ‘शोले’ प्रेमी मित्रमंडळींत ‘तकिया कलाम’ म्हणून वापरला जायचा/जातो..)
‘शोले’ मधले हे अजून एक परिचीत रत्न:
“कारखाना बिडी का है.. जब तक चाहा काम किया, नही तो आरामसे बिडी पी ली”
***
‘पंचम’ म्हणजे आर. डी. बर्मन मधे अनेकानेक अलौकीक गुण होते. त्यातला एक विशेष म्हणजे अपारंपारिक वाद्य (किंवा जी ‘वाद्य’ ह्या व्याख्येत बसणार नाहीत अशा वस्तू) वापरून नेमका हवा तो ध्वनी निर्माण करायचा आणि त्या गाण्याला / पार्श्वसंगीताला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवायचे.
ह्या गुणाशी / प्रयोगशीलतेशी साधर्म्य सांगणाराच गुणविशेष म्हणजे ‘अत्यंत चपखल शब्दांचा वापर करणं’ हे (सलीम)जावेदच्या संवादाचे अजून एक वैशिष्ट्य! इतकी सुयोग्य शब्दयोजना की पहिल्यांदा ऐकताना नेमका शब्दार्थ माहीत नसूनही त्या शब्दाच्या नेमक्या ध्वनीमुळे भावार्थ लगेच लक्षात येऊन ‘भा.पो.’ होते!
ही उदाहरणे पहा:
जय आणि वीरु चा धिक्कार करताना गब्बर म्हणतो:
“निकल गयी सब हेकडी इनकी, सब हेकडी? आ थू!!”
किंवा सूड्बुद्धीने धुमसणारा गब्बर ठाकूर ला पकडून आणल्यावर म्हणतो:
“मेरा बस चलता तो वही सालेका टेटवा दबा देता”
किंवा
अट्टल चोराच्याच तोंडी शोभेल असा:
“बाकी आज रातको तिजोरी में झाडू मारके फूट चलेंगे”
अमिताभचा 'ऍंग्री यंग मॅन' हे जावेदमधल्या संतप्त तरुणाचे मूर्त रुप होते असे राहून राहून वाटते. त्या धारदार शब्दांच्या आवाजाला हवेत बोट लावले तर कापून रक्त निघेल अशी परिस्थिती.
‘जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ’,
‘जब तक बैठने के लिए ना कहा जाए, शराफत से खडे रहो… “
ही सुपरिचित उदाहरणे.
***
कळत नकळत काही तत्वज्ञान किंवा साध्या भाषेत ‘चार शहाणपणाच्या गोष्टी’ म्हणता येईल असेही त्यांच्या संवादात डोकावतात.
जंजीर मधे एक संवाद आहे:
“जो हाथ अंगारे को छुपाता है, अंगारा उसी हाथ को जला देता है”
हा संवाद पाकिस्तानच्या सध्याच्या (किंवा अमेरिकेच्याही) बाबतीत किती लागू होतो! ज्या पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादाचा निखारा जपला गेला, जोपासला गेला आता तेच दहशतवादी शिरजोर झाले आहेत, त्यांचा कट्टर अजेंडा आता ते सरकारवर लादत आहेत, पाकिस्तानात ठिकठिकाणी बॉंबस्फोट घडवून सरकारची झोप उडवत आहेत. त्या ‘निखा-या’चा अजेंडा खुलेआम, सारे जग बघत असताना तरी स्वीकारणे ‘हाताला’ शक्य नाही. लादेन आणि अमेरिकेच्या बाबतीतही हेच झाले… तर ते असो.
**
असेच दुसरे संवाद पहा:
जंजीर:
“बारा जंगली कुत्ते मिल के शेर को मार डालते है”
शोले:
“इसलिए के लोहा लोहेको काटता है”
‘गब्बर’ चेही स्वत:चे (अजब) तत्वज्ञान आणि लॉजिक आहे:
“गब्बर के तापसे तुम्हे एकही आदमी बचा सकता है… खुद गब्बर! इसके बदलेमें मेरे आदमी थोडासा अनाज लेते है तो क्या कोई जुल्म करते है?”
***
वाक्यांना असलेला नैसर्गिक रिदम हेही सलीम-जावेद च्या संवादांचे वैशिष्ट्य. त्यात ते संवाद म्हणणारा नट (किंवा नटी) जर प्रतिभावंत असेल, जर त्या कॅरेक्टरची नस नेमकी त्याला सापडली असेल तर मग तो सीन आणि चित्रपट उजळून निघायचा!
उगाच नाही जावेद अख्तर म्हणालाय की ‘आम्ही लिहीलेला एकही संवाद असा नाही जो अमिताभ ने जरा वेगळ्या पद्धतीने म्हणायला पाहिजे होता असे कधी वाटले.. नेहमीच परफेक्ट अशीच त्याची संवादफेक आणि ‘पॉझेज’ असत..’.
अमजद खान ने ‘गब्बर’ चे म्हटलेले संवाद हे ‘रिदम’ पकडण्याचे उत्कृष्ट उदाहरण! आवाजाचे आरोह अवरोह, पॉझेस ह्यांनी आधीच उत्कृष्ट असलेले संवाद वेगळ्याच उंचीवर गेले आहेत..
साध्या संवादांना ‘ट्विस्ट’ ने खुमारी आणणे हे सलीम-जावेद चे अजून एक वैशिष्ट्य.
‘शान’ मधे प्रामाणिक व शूर पोलिस ऑफिसर सुनिल दत्त ‘शाकाल’ च्या त्याच्या काळ्या धंद्यात सामील व्हायच्या ‘ऑफर’ ला नकार देतो. “ह्या पापाच्या चिखलात उगवलेली संपत्ती मला नको आहे असं मी म्हटलं तर?” ह्या त्याच्या सवालावर प्रतिक्रिया देण्याआधी ‘शाकाल’ एक क्षण थबकतो आणि त्याला गर्भीत इशारा देताना म्हणतो:
“मर्जी आपकी! वैसे दुनिया में कोई भी ऐसा नही है जिसने मेरी बातसे इन्कार किया हो… इसलिये की जिसनेभी मेरी बातसे इन्कार किया, वह अब इस दुनियामें नही है।“
***
जावेद स्वतंत्रपणे संवादलेखन करताना तेव्हढाच खुलतो आणि फुलतो.
‘अर्जुन’ मधे अर्जुन च्या तोंडी शब्द घालतो:
“सपने देखनेसे नही टुटने से डरता हूं”
“छोडीये साहब. अपनी किस्मत तो बदल नही सका.. मुल्क की किस्मत क्या बदलूंगा”
‘शिवकुमार चौगुले’ ह्या नेत्याचा ‘एजंट’ बाबूराम ‘अर्जुन’ला म्हणतो:
‘हिरे को खुद अपनी कीमत का अंदाजा नही होता.. हिरे की कीमत या तो जोहरी जानता है या फिर बादशाह.. और शिवकुमार साहब जोहरी भी है और बादशाहभी!”
एक गुंड किंवा स्थानिक ‘दादा’ एका सामान्य मध्यमवर्गीय माणसाला दम देताना कसा बोलेल? ए. के. हंगल च्या घरात नजर फिरवून रंगासेठ (गोगा कपूर) म्हणतो:
“साला मेरा भेजा फिर गया तो ये सब टिनटप्पर उठाके सडकपे आग लगा दूंगा”
(कवीमनाचा लेखक असे लिहू शकतो ही त्याच्या ‘रेंज’ला / अष्टपैलूत्वाला दाद देण्याची गोष्ट आहे… तरल काव्य लिहीणारा गुलजार ‘गोली मार भेजेमें’ लिहीतो तेव्हा ती कौतुकादराची गोष्ट असायला हवी तसंच!)
‘मशाल’ मधे एक सुंदर सीन आणि संवाद आहे. सत्याची कास धरणा-या लढाऊ पत्रकार असलेल्या दिलीपकुमार मुळे ‘आवारागर्दी’ करणारा भुरटा अनिल कपूर सुधारतो, शिकतो… पण परिस्थितीमुळे दिलीपकुमार मात्र वाममार्गाला लागतो.. आदर्शवाद घेऊन परत आलेल्या अनिल कपूरशी बोलताना, ह्या नेमक्या उलट झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना दिलीपकुमार म्हणतो:
“फुटबॉल खेलते ना तुम? हाफ टाईम के बाद ‘गोल’ बदल जाते है ना”
***
चला, आता सलीम-जावेदच्या एका अत्यंत आवडत्या सीन व संवादाचा उल्लेख करुन थांबतो. अत्यंत घिसापिटा, सामान्य वाटणारा प्रसंग सीन चुरचुरीत संवादांची आणि टायमिंगची जोड मिळाली तर ‘क्लिशे’ न होता कसा खुलतो पहा:
‘जंजीर’ मधे स्मग्लर ‘तेजा’ स्विमिंग पूल पाशी बसलेला आहे. त्याची ‘मोना डार्लिंग’ आपल्याच नादात पोहते आहे. ‘तेजा’ला त्याचा सहकारी ‘कबीर’ येऊन सांगतो की त्यांचा एक स्मग्लिंगचा ट्रक पकडला गेला आहे:
कबीर: हमारा एक ट्रक पुलिस ने पकड लिया साहब
तेजा: हं .. इतनी जरासी बात के लिए, तुम मेरे पास चले आए?
कबीर: पिछले बारा सालमे ऐसा कभी नही हुआ
तेजा: हं.. हमारा कोई आदमी पकडा गया?
कबीर: नही. ड्रायवर ट्रक छोडके भाग गया.
तेजा: स्मार्ट बॉय ! ..ये कहा हुआ?
कबीर: अमुक रोड के चेक नाके पे..
तेजा: और उस एरिया का पुलिस अफसर?
कबीर: कोई नया है..
तेजा: हं… एक काम करो, परसों की पार्टीके लिए उसे भी इन्विटेशन भेज दो।
कबीर: जी..
कबीर निघून जातो. आणि मोना पूल मधून बाहेर येऊन तेजाच्या गळ्यात पडून लाडिकपणे विचारते:
मोना: “क्या बात है माय तेजा डार्लिंग?”
तेजा: “कुछ नही, कबीर कह रहा था एक इन्स्पेक्टर को पैसोंकी जरुरत है” (!)
- राफा
हल्ली अशी तुफान संवादबाजी
हल्ली अशी तुफान संवादबाजी फारशी पहायला मिळत नाही >> सलीम जावेद सारखी नाही पण कॉमेडी असेल तर नीरज व्होराचे खतरा असतात, सिनेमा कितीही टुकार असूदे.
मस्त लेख! एका दमात वाचून
मस्त लेख! एका दमात वाचून काढला आणि पुढे फा बॅटिंग ला येणार हे माहित होतं म्हणून लगेच त्याही पोस्टी वाचल्या! मस्त एकदम.
मजा आली! गुरवार सत्कारणी लावलात राफा.
असे एक एक डायलॉग आणि प्रसंग कायमचे लक्षात राहतात आणि वेळोवेळी त्यांची आठवण येऊन पुन्हा तेवढाच आनंद मिळत राहतो.
काला पत्थर बद्द्ल जोरदार अनुमोदन फा. तुझं आणि माझं त्यातल्या बच्चन आणि त्याला चाकू घेऊन मारायला येतात त्या प्रसंगामधल्या सगळ्या डायलॉग्स बद्दल चर्चा झालेली आहे. I was totally mesmerized by that Amitabh!
राफा, जबराट लिहिलंय...
राफा, जबराट लिहिलंय... वाचताना ती कॅरेक्टर दिसत राहत होती.
फा येणार याची खात्री होतीच.
मजा आली
राफा, जबरी झालाय लेख!
राफा, जबरी झालाय लेख!
फा च्या अॅडीशन्स पण मस्त. काला पत्थर फार आवडता (आणी तोंडपाठ) पिक्चर आहे.
वर फेरफटकाने धूम २ बद्दल लिहीलंय. धूम मधलं 'धूम मचाले धूम' काला पत्थर मधल्या 'धूम मची धूम' वरुन इन्स्पायर्ड आहे
मूळ लेख व सर्व प्रतिसाद एकदम
मूळ लेख व सर्व प्रतिसाद एकदम आवडले.
मला वाटतं, त्या काळात त्या गोष्टी जमून आल्या. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, त्याचं प्रतिनिधीत्व करणारा घुसमटणारा, सिस्टीम विरूद्ध बंड पुकारणारा अँग्री यंग मॅन वगैरे अत्यंत सुसंगत होतं आणी त्याला ह्या सर्व कलाकारांनी पुरेपूर न्याय दिला.
+१००
खरे तर १९७० च्या दशकातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर एंग्री यंंग मॅन चे ( अपरिहार्य?) आगमन हे एखाद्या पी एच डी च्या विषय आहे.
सर्वांचे प्रतिक्रियांबद्दल
सर्वांचे प्रतिक्रियांबद्दल आणि आवडते संवाद लिहील्याबद्दल मनःपूर्वक आभार!
भन्नाट! पुढचे २-३ दिवस डोक्याला ताप आहे आता! अनेक संवाद आठवून लिहावे लागणार! >>>>> फारएण्ड . आवडता विषय असेल की आसुसून लिहावे वाटते ना.. विशेष आभार !
मस्त लेख.प्रतिसाद पण तितकेच
मस्त लेख.प्रतिसाद पण तितकेच तोडीस तोड असणार आहेत, ते अजून वाचायचेत.
हे सर्व संवाद त्या त्या हिरोच्या आवाजात मनात परत ऐकले.
यु के, यु ही मला पण जबरदस्त आवडतो.
शोले चे सगळे डायलॉग अमर आहेत.
आमच्याकडे डायलॉग ची एल पी आहे.
जबरी! शोले च्या डायलॉगची
जबरी! शोले च्या डायलॉगची कॅसेट एकणे हा एक उन्हाळी सुट्ट्याचा फॅमिली मनोरजनाचा भाग असायचा , आमच्याकडे नविन नविन टेप आला (म्हणजे बनवला ) तेव्हा शनिवारी दुपारी जेवणानतर जस मुव्हि बघाव तस आख्खी फॅमिली डॉयलॉग एकत असायची.
लेख खुप आवडला.
लेख खुप आवडला.
शोले व्यतिरिक्त इतर कोणता चित्रपट इतका लक्ष देऊन पाहिला नव्हता. छान लिहिलय फारएन्ड यांचे प्रतिसाद पण भारी
स्वाती, तो राखीच्या
स्वाती, तो राखीच्या टेबलवरच्या पुस्तकाचा सीन समहाउ लक्षात नाही. पुन्हा पाहीन तेव्हा चेक करतो
राफाने उल्लेख केलेला शशी कपूरचा कोळशाची माहिती देणारा सीन अफाट आहे. हिंदी पिक्चर मधल्या माझ्या ऑल टाइम फेवरिट विनोदी सीन्स पैकी आहे तो. त्यात कबीराचे वचन ही येउन जाते बहुधा त्या शास्त्रीय माहितीत. लकडी जल कोयला भयी का असे काहीतरी. पूर्ण लक्षात नाही. कोयलेकी दलाली मे हाथ अक्सर काले हो जाते है म्हणून दलाली न करता तो विकायला हवा असेही काहीतरी तो तिला सांगतो असे प्रचलित हिंदी "कहावते" वापरायची खुबी शोले व काला पत्थर दोन्ही मधे सलीम जावेद यांच्या लेखणीत दिसते.
शोले मधे तर 'कहावतें' ची रेलचेल आहे आणि त्याही अत्यंत चपखल ठिकाणी वापरलेल्या. त्यातले ठाकूर ला पकडून आणल्यावर चे "आज आया है ऊंट पहाड के नीचे" हे मराठी सोशल नेटवर्क्स वर अत्यंत चुकीच्या संदर्भाने नेहमी वापरले जाणारे उदाहारण. उण्ट स्वतःला उंच समजत असतो. पण जेव्हा तो डोंगराजवळ येतो तेव्हा त्याला त्याचे खुजेपण कळते. तसे येथे तो ठाकूर ला सांगत असतो. पण लोक बहुधा एखाद्याचे लपवलेले गुपित बाहेर आले अशा अर्थाने हे वापरताना दिसतात
दुसरे उदाहरण म्हणजे तो हेमाचा राफाने लिहीलेला सीन. तिला मौसी ने आंबे आणायला पाठवलेले असते. मधे सचिन, हनगल व त्या पोस्टमन शी ही बसते गप्पा मारत. मग बीडी च्या कारखान्यातील नोकरीबद्दल ते वाक्य म्हणते - की तिथले काम म्हणजे काम करून उरलेल्या वेळा बिडी फुकत बसला तरी चालेल, आणि त्यावर कहावत वापरते "आम के आम, गुठलियोंके भी दाम" - आणि त्यावर तिला आठवते की तिला आंबे तोडून आणायचे आहेत.
"काला अक्षर भैंस बराबर" - ज्याला लिहीलेले वाचता येत नाही त्याबद्दल हिंदीत ही म्हण कॉमन आहे - काळे अक्षर आणि काळी म्हैस यात फरक नाही अशा अर्थाने. ते गब्बर चे दोन लोक मारून त्यांच्याबरोबर चिठ्ठी पाठवली जाते ती वाचायच्या वेळेस एकजण हे म्हणतो.
लोहा लोहे को काटता है वरती आलेलेच आहे.
याव्यतिरिक्त जया भादुरीचे पुन्हा लग्न लावायची चर्चा करताना इफ्तेकार ला संजीव कुमार म्हणतो "समाज और बिरादरी इन्सान को अकेलेपन से बचाने के लिये है, उसे अकेला रखने के लिए नही" - साध्या संवादांमधून काही चांगले विचार ते सहज मांडून जातात.
काला पत्थर मधला बच्चनला
काला पत्थर मधला बच्चनला परफेक्ट ऑथर बॅ़क्ड संवाद देणारा प्रसंग म्हणजे तो बेशुद्ध पडल्याअवर राखीच्या दवाखान्यात इलाजाकरता त्याला आणतात. तेथे तो शुद्धीवर आल्यावर इलाजाला नकार देतो. त्याच्यावर रागावून राखी एकदम इंग्रजीत "..why don't you understand?" म्हंटल्यावर इतका वेळ एक अशिक्षित कामगार वाटलेल्या अमिताभ मधला जुना मर्चंट नेव्ही कॅप्टन एका क्षणा करता अचानक जागा होतो आणि तो तिलाच "why don't YOU understand, doctor! my pain is my destiny..." वगैरे म्हणतो. तेथे राखीच्या ही लक्षात येते की हा माणूस वरकरणी दिसतो तो नाही. बास! तेथून पुढे पुन्हा शेवटपर्यंत अमिताभ त्या कॅप्टनला गुंडाळून ठेवतो. फार जबरी इम्पॅक्ट वाला सीन आहे तो. त्याचे शिक्षितपण हे इंग्रजी वाक्यातून सांगणे हे आता कदाचित 'चीजी' वाटेल पण १९७० च्या दशकातील पॅटर्न प्रमाणे फार प्रभावी वाटले होते.
अमिताभ आणि शत्रुघ्नची खुन्नस विविध सीन्स मधून धुमसत ठेवली आहे. ते सीन्सही मस्त आहेत. शत्रुघ्नचे काड्या घालणे आणि अमिताभचा त्याला डिग्निफाइड रिस्पॉन्स हे दोन्ही पाहायला मस्त वाटते. अशी खुन्नस आजकाल फार क्वचित पाहायला मिळते.
प्रेम चोप्राचा एक संवादही जबरी आहे. त्यातले नंबर्स नक्की लक्षात नाहीत, पण ४०० का ५०० मजूर मरतील म्हणून एक काम थांबवण्यात येते, व त्यात त्याचे १५ लाखांचे नुकसान होते. तेव्हा चिडून तो विचारतो, "क्या तुम जानते नहीं कि १५ लाख ५०० से कई ज्यादा होते है?"
काला पत्थरचा आणखी एक अँगल म्हणजे त्यात असलेला मजदूर-कम्युनिजम-नयी सुबह वगैरे चा धागा. सलीम जावेद यांचे मजदूरांच्या बाजूने असलेले (जरा एकतर्फी, "मालिक" या व्यक्तीला कम्युनिस्टांच्या आवडत्या रीतीने एकदम पूर्णपणे व्हिलन करून टाकलेले) संवाद, आणि साहिर लुधियानवीची त्याच धर्तीची गाणी ही इतकी एकजीव झाली आहेत, की संवाद व गाणी एकाच व्यक्तीने लिहील्यासारखी वाटतात.
काला पत्थर मधे शत्रूला
काला पत्थर मधे शत्रूला त्याच्या कॅरेक्टरप्रमाणे चटपटीत संवाद आहेत. याउल्ट अमिताभ च्या कॅरेक्टरला या चित्रपटात "संवाद" हा प्रमुख भागच नाही. तो घुमा, धुमसणारा असाच सतत दाखवला आहे. त्यामुळे त्याची इथे सगळी ताकद त्याच्या नजरेत आहेत. त्यामुळे विविध सीन्स मधे तो शत्रूला तरीही भारी पडतो. डिग्निफाइड वाटतो एकदम.>>>>>+११११
राफाने जबरी लिहीलय त्यामुळे एकेक संवाद मनावर गडद होत जातात. विशेष म्हणजे जंजिर मधल्या संवादामुळे अजितचा आवाजच कानात रेंगाळायला लागलाय असे वाटले. फारेंड ने तर धमालच केली. अमिताभ आहे म्हणल्यावर फा येणार हे आधीच लक्षात आले.
राफा फार दिवसानी आलास. सतत येत रहा, उन्हाळ्यात वार्याची हलकी झुळुक कायम प्रसन्न वाटते.
आता मागच्या आठवड्यात शोले
आता मागच्या आठवड्यात शोले लागला होता. माझा नवरा आणी लेक दोघांनी इतर काही मला पाहु दिले नाही. शोले मुळे लेक अमिताभची जबरा फॅन झालीय. आई बाबांना तो आवडतो मग मी मागे कशाला या विचाराने तिने आता मला डॉन पण कुठे मिळतोय का ते बघायला सांगीतलेय.
तिने आता मला डॉन पण कुठे
तिने आता मला डॉन पण कुठे मिळतोय का ते बघायला सांगीतलेय. >> उसको बोल दो...डॉन को पकडना मुश्कील ही नही, नामुमकीन है
लेख अतिउत्तम
विनीता
विनीता
आजकालची पोरं काय मागतील याचा
आजकालची पोरं काय मागतील याचा नेम नाय !!
माफी विषयनन्तर... राफा तुम्ही
माफी विषयनन्तर... राफा तुम्ही नदाल फ्यान का?
छान लेख राफा. जिओ.
छान लेख राफा. जिओ.
एकदम धमाल! सलीम जावेद टीम
एकदम धमाल! सलीम जावेद टीम होते तेंव्हाच बेस्ट होते. संवाद तर बलस्थान होतेच पण संपूर्ण चित्रपटात छोटे छोटे संघर्षबिंदू पेरायचे ते महान होते. काला पत्थर मध्येच प्रेम चोप्रा मजूर शशी कपूरला किती मानतात ते जोखतो असा प्रसंग आहे, कोणतेही चमकदार संवाद नसतानाही हा प्रसंग लक्षात राहतो.
सुंदर लेख! राफा इज बॅक.
सुंदर लेख! राफा इज बॅक.
प्रतिसाद सुध्दा मस्त. सर्व संवाद आठवले.
रच्याकने, कादर खानचा विषय वर आला आहे म्हणून कादर खानचे काही छपरी भाषेतले संवाद जे साधारण एक वाक्यी असतात. त्यासाठी तो देशी बार मध्ये जायचा आणि आजूबाजूला लोक काय बोलताहेत ते ऐकायचा असे ऐकले आहे.
सर्व प्रतिसाद मस्त.
सर्व प्रतिसाद मस्त.
फारएण्डा, आणखी फटकेबाजी येऊ दे.
प्रतिसादांमधे दिलेले संवाद
प्रतिसादांमधे दिलेले संवाद आणि सिन्स माझ्याही आवडीचे आहेत. पुन्हा एकदा, write only मोड बद्दल (आणि मधेच भिरभिरत येऊन इथे वार्षिक एक पोस्ट केल्याबद्दल) क्षमस्व! उत्तर दिले नाही दिले तरी, प्रत्येक प्रतिसाद मी नीट वाचतो / तसा प्रयत्न तरी करतो ह्याची कृपया खात्री असू द्यात
सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार !
ता.क. : अजून एक लेख झरकन लिहायचा झटका आला आहे . आधी लिहिलेल्याचेच थोडे संकलन करुन (हा अटकपूर्व जामीन आहे ).
राफा - लिही अजून. डॉन वर लेख
राफा - लिही अजून. डॉन वर लेख लिहीला होतास तसे बर्याच दिवसांत वाचले नाही
ज्यांनी कधी वाचला नसेल त्यांच्याकरता, राफा चा डॉन वरचा लेख माबोवरचा माझा ऑटाफे पैकी आहे.
डॉन वरचा लेख पण मस्त आहे.
डॉन वरचा लेख पण मस्त आहे. फारएण्डा, धन्यवाद!
धन्यवाद फारएण्ड!!!
धन्यवाद फारएण्ड!!!
शोलेबद्दलची एक गोष्ट जी पटकन
शोलेबद्दलची एक गोष्ट जी पटकन लक्षात येत नाही. ह्यातील पात्रांच्या जोड्या बनवतात येतात ज्यातील एक दुसर्याचे विरुद्ध टोक म्हणता येईल. ठाकूर हा (दोन्ही हात नसताना) अत्यंत स्वच्छ, नीट नेटका, भांग असा पाडलेला की एक केस इकडचा तिकडे नाही, अत्यंत सभ्य, सुसंस्कृत भाषा, उलट गब्बर सिंग ते मिलिटरीचे कपडे घातलेला, दाढी अर्धवट वाढलेली, विस्कटलेले केस, काळपट दात, तंबाखू खाणारा, तोंडात अर्वाच्य भाषा. जय हा एक निर्व्यसनी, सरळ वागणारा, हार्मोनिका वाजवणारा, "त्या" नाण्याचा वापर करुन योग्य तो पर्याय निवडायला भाग पाडणारा, उलट वीरू दारू पिणारा, बायकांशी लफडी करणारा, धांगडधिंगा, लबाडी करणारा. (साधारण सारखीच पार्श्वभूमी असताना हे दोघे इतके वेगळे कसे हा प्रश्न अनुत्तरित!) बसंती आणि राधा ह्याही अशाच विरुध्द. एक बडबडी, रंगीबेरंगी कपडे, दागिने वगैरेनी नटलेली, नाच गाणी करणारी तर दुसरी कायम पांढर्या कपड्यात, दु:खी, फारच कमी बोलणारी. हे मुद्दाम ठरवून केले गेले नाही. पण तसे झाले आणि म्हणून (कदाचित) लोकांना जास्त आवडले असेल.
शोलेतले अगदी किरकोळ कामे करणारे लोकही लक्षात रहातात. सांबा (की सांभा) आणि कालिया आहेतच. पण जेलमधले लोक, अंग्रेज जाते कहा है वगैरे संवाद म्हणणारे, सूरमा भोपाली आणि त्याच्या वखारीतील गिर्हाईके आणि टाईमपास करणारे लोकही आठवतात. ठाकूरचे कुटुंब जे एका दृष्यापुरतेच दिसते तेही संवाद लक्षात रहातात.
जाता जाता: लहानपणी शोलेमधले ये दोस्ती हे गाणे हे सिनेमातील हायलाईट वाटत असे पण आता तो तांदळातील खड्याप्रमाणे नकोसे वाटते. गाणे चांगले आहे पण दोघांतली दोस्ती कशी पक्की आहे हे लोकांच्या मनावर ठसवण्याकरता केला गेलेला एक अत्यंत बालिश प्रयत्न वाटतो.
अचानक पाहुणे घरी यावेत, आहे
अचानक पाहुणे घरी यावेत, आहे त्या साधनानिशी पिठले भात करावा, तो एकदम मस्त व्हावा, नंतर अगदी ठरवून तीच रेसिपी व पदार्थ वापरून केला तरी चव जमू नये असे काहिसे शोले बाबत झाले असे वाटते. भट्टी जमून आली. शेन म्हणतात तो जोड्यांचा अँगल ही इंटरेस्टिंग आहे.
अर्र राफा , तुमचाही शाखा
अर्र राफा , तुमचाही शाखा बद्द्ल इतका राग असेल अस वाटल नव्हत .
अमिताभ शाहरूख पेक्षा भारी आहेच , शाहरूखचे रिसोर्सेस लिमिटेड आहेतच . पण तुलना कशाला ? सचिन सचिन आहे , अफ्रिदी , अफ्रिदी
अन काढायचे तर अमिताभ मधेही अनेक दोष काढता येतील , पण मग लगेच इथे सगळे चवताळून येतील. मी मोठा होताना सूर्यवंशम , लाल बादशाह , कोहराम , खुदा गवाह , म्रुत्युदाताचा अमिताभ पाहिला , तो मला किती आवडला असेल ते तुम्हाला कळल असेलच . नंतर जेव्हा जंजीर , दीवार , डॉन , त्रिशूल वगैरे पाहिले (माझ्या जन्माआधीचे) तेव्हा खरा अमिताभ थोडाफार कळला.
जाऊ दे , इथे फार विषयांतर नको , पण तिथला लेख उगाच पर्सनल झाल्यासारखा वाटला अन तिथे कस लिहायच कळल नाही असो .
अचानक पाहुणे घरी यावेत, आहे
अचानक पाहुणे घरी यावेत, आहे त्या साधनानिशी पिठले भात करावा, तो एकदम मस्त व्हावा, नंतर अगदी ठरवून तीच रेसिपी व पदार्थ वापरून केला तरी चव जमू नये असे काहिसे शोले बाबत झाले असे वाटते. भट्टी जमून आली.
>> +१ . शान मधेही सगळा मसाला आहे , अगदी काही काही ठिकाणी ओढून ताणून आणला आहे ,पर कुछ जम्या नही
अन काढायचे तर अमिताभ मधेही
अन काढायचे तर अमिताभ मधेही अनेक दोष काढता येतील >> केदार, तुमचे मत अगदी योग्य आहे कारण हे विधान कुणालाही लागू होते. अमिताभ काही सर्वगुणसंपन्न होता किंवा झाला आहे असे मुळीच नाही. तसे काही मी म्हटलेले नाहीच. परंतु डॉन ला सुयोग्य अशी पर्सनॅलिटी आणि जमलेली भट्टी प्रचंड आवडली होती. त्या वेळी मी अमिताभच्या अभिनय गुणांचा जितका आदर करायचो तितका आता करत नाही. डॉनचा फॅन असल्याने लेख पर्स्नल झाल्यासारखा वाटला तर नवल नाही. यंग बच्चन आणि ठराविक मोजक्याच चित्रपटांचा मी अजूनही अत्यंत फॅन आहेच. पण काळानुसार काही मतांमधे अपरिहार्यपणे बदल झालाच आहे.
तरीही जर रिमेक करायचा झाला तर त्यात काही value addition होणार असेल ( कादंबरी किंवा घटनेचा नवीन वेगळा अर्थ लावता येणार असेल, अद्ययावत तंत्रज्ञान वापरता आल्यामुळे सादरीकरणात व दर्जात खूपच फरक पडणार असेल इत्यादी) तरच करण्यात काही अर्थ आहे असे वाटते. भ्रष्ट कॉपी कशाला काढायची ? (पैसे कमवायला हे सोपे उत्तर ) काळानुसार पटकथेत बदल करा ना. तुम्हाला खैके ही हवे जरी विसंगत वाटले तरी तर मग ते पोळी भाजून घेण्यासारखे वाटते. डिट्टो तोच चित्रपट काढला तर तुलना होणे अपरिहार्य आहे. व्हॉट से?
रच्याकने, westworld हा सिनेमा मला कित्येक वर्षे रिमेक करण्यासाठी सुयोग्य वाटायचा / वाटतो.. (टिव्ही सिरियल निघाली अलिकडे पण मला कोण जाणे पहावी वाटली नाही.. चित्रपट आला असता तर मजा आली असती!)
Pages