तर हा काळ आहे साधारण २००५ मधील, जेव्हा अस्मादिक आयआयटी खरगपूरमध्ये उच्चशिक्षणासाठी दाखल झाले होते. मार्च महिन्यातला पहिला/दुसरा मंगळवार होता. होमसिकनेसमुळे घरापासून लांब रहाण्याचा एक दिवस संपला, याचा आनंद मी दर दुपारी जेवण करून वसतीगृहाच्या खोलीत टांगलेल्या कालनिर्णयच्या त्या दिवसाच्या चौकोनावर लाल फुली मारून साजरा करायचो. याबद्दल माझा रूममेट मला “रेड क्रॉस XXX” या नावाने चिडवायचा देखील. सावरकर अंदमानात असताना भिंतीवर रेघा मारून दिवसाची सुरूवात करत असे कुठेतरी वाचले होते. मी फक्त फुल्या मारून दिवस संपवायचो. तशीच फुली मारताना लक्षात आले अरे आजतर "महाशिवरात्री". दुपारच्या जेवणानंतर डोळ्यावर आलेली झोप खाडकन उतरली. पूर्वी घरी असताना एकही उपवास न चुकवल्यामुळे उगीचच मोठे पाप केल्याची भावना मनात डोकावली. नशीब अर्धा दिवस झाल्यावर तरी लक्षात आले तेव्हां या मोडलेल्या सकाळच्या अर्ध्या दिवसाच्या उपवासाचे पापक्षालन कसे करता येईल याचा विचार करायला लागलो. रूममेट व आजूबाजूच्या मराठी मित्रांनाही ही गोष्ट सांगितली. पहिल्यांदा, मी ही गोष्ट सकाळी का नाही सांगितली म्हणून मला भरपूर बोलणी खावी लागली. एवढ्या जणांचा उपवास मोडला त्यामुळे माझ्या पापात अजूनच भर पडली. मंदिरात जाऊन (तिथे येणार्या इतर देवींकडे आज दुर्लक्ष करून) फक्त देवाचे मनोभावे दर्शन घेणे याच बरोबर पापक्षालनासाठी वेगळे काय करता येईल याचा खल मित्रांबरोबर सुरू झाला. कोणी ११ वेळा शिवलीलामृत वाच, २१ वेळा जप कर, शंकराच्या पिंडीला ५१ प्रदक्षिणा घाल इ. नवनवीन कल्पनांचा सडा पाडू लागला. संपूर्ण चातुर्मासाचे पुस्तक, जपाची माळ नसल्यामुळे व पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाहीत तेव्हा या कल्पना बाद झाल्या. माझीच चूक तेव्हां शेवटी मीच यातून मार्ग काढावा अशी जबाबदारी माझ्यावर टाकून आणि पापपुण्याचा विचार बाजूला सारून बाकी सगळे निद्रादेवीच्या अधीन झाले. आपण आज पुढे काय करायचे हे ठरविण्यासाठी त्रास घेण्यापेक्षा या दिवशी जर घरी असतो तर काय केले असते अश्या रिव्हर्स इंजिनीयरिंगला (उच्चशिक्षणाचा परिणाम..) सुरूवात केली. आठवतात तेव्हांपासूनचे सगळे उपवास डोळ्यासमोर तरळले. देवळात जायचे, सकाळ संध्याकाळ देवाचे म्हणायचे, टिव्हीवरील एखादा धार्मिक चित्रपट पहायचा आणि उपवास म्हणून, इतर दिवशी घरात बनतात त्यापेक्षाही तिप्पट वेगवेगळ्या पध्दतीच्या पदार्थांचा फडशा पाडणे यापेक्षा वेगळे काहीच आठवेना. घरातल्या प्रत्येकाच्या फर्माईशीप्रमाणे वेगवेगळे पदार्थ बनविण्यासाठी सकाळपासून उपाशीपोटी कष्टणार्या आईची तीव्रतेने आठवण झाली. आजपण घरात तिने सगळ्यांच्या आवडीचे वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवले असतील आणि मला आवडणारी साबुदाण्याची खिचडी बनवताना माझ्या आठवणीने तिच्या डोळ्याच्या कडां ओल्या झाल्या असतील. इतक्या दूर देखील मला त्यामधील मायेचा ओलावा जाणवला. आज उपवास करून जर आपण साबुदाण्याची खिचडी बनवली तर नक्कीच तिला आनंद होईल आणि तो आनंद उपवास करून मिळणार्या पुण्यापेक्षाही लाखपटींनी मोलाचा असेल या विचाराने मन झपाटले.
मग काय, संध्याकाळी देवदर्शन आणि रात्री फराळाला साबुदाण्याची खिचडी व फलाहार करून उपवास करायचा हे पक्के केले.
पहिल्यांदा वाटले आईला नीट विचारून मगच या खिचडी करायच्या फंदात पडावे. पण ठरवले, सगळे करून झाल्यानंतरच घरच्यांना फोनवर सांगून चकीत करावे व त्यांच्या आनंदात भर घालावी. (मोडलेल्या अर्ध्या दिवसाच्या उपवासाची बातमी सोडून) फोडणी करून, भिजवलेला साबुदाणा,तिखट मीठ घालून परतला की झाली खिचडी, अजून काय विशेष असत त्यात? साबुदाणा, मिरच्या, साखर, मीठ, बटाटे, तेल, मोहरी या गोष्टी पटकन आठवल्या त्यांची मराठीत यादी केली आणि उत्साहातच सायकलवरून बाजारात गेलो. पहिल्याच दुकानात शिरून कागदावर लिहीलेली यादी त्याच्यापुढे नाचवली आणि फटाफट सामान देण्याची आज्ञाच दिली. उत्साहाने सळसळणार्या माझ्याकडे व त्याच्या द्रुष्टीने अगम्य अश्या भाषेतील कागदावरील ते गिचमिडे अक्षर पाहून दुकानदाराला कसलाच बोध होईना. नंतर त्याच्यातील व माझ्यातील प्रेमळ संवाद थोडक्यात पुढीलप्रमाणे-
दुकानदार-> दादा, खौमा कारो. आमी ऐ भाषाटा जानीना. (दादा, माफ करा पण मला ही भाषा येत नाही.)
मी-> (मला काहीच न कळल्याने) उत्साहात त्याच्याकडून कागद घेवून वाचू लागलो, १ किलो साबुदाणा, अर्धा किलो साखर, पावकिलो तेल, १०० ग्रँम मोहरी, १ छटाक मीठ सोपं तर आहे.
त्याच्याकडे मान वर करून पाहिल्यानंतर त्याच्या हातातील सामान बांधायला घेतलेला बंगाली पेपर पाहून डोक्यात ट्यूब पेटली. मी त्या बंगाल्याला मराठीतील यादी दिली होती आणि अपेक्षा करत होतो की त्याने ती वाचून लगोलग मला सामान द्यावे. त्याला शुध्द हिंदी येत नव्हते आणि आमी बांगला जानीना च्या पलिकडे माझे बंगाली अजून सरकले नव्हते. मग खाणाखूणांच्या भाषेत तर कधी मोडक्यातोडक्या बांग्लहिंदीत संवाद सुरू झाला.
मी-> अरे दादा वो सफेद छोटा छोटा खानेका चीज (साबूदाण्यासाठी) तर तेल मे डाले तो तडतड उडता है (मोहरीसाठी) अश्या बर्याच प्रेमळ संवादानंतरही काही बात बनत नव्हती.
तेव्हां शेवटी त्याच्या परवानगीने दुकानाच्या आत जाऊन वस्तू निवडल्या. बाकी सामान, फळ घेऊन रूमवर परत येताना मी साबूदाणा कसा आणि कशात भिजवायचा याचा विचार करत होतो. ना आमच्या रूममध्ये पातेले ना भांड, मग हा साबूदाणा भिजवायचा कशात? अंघोळ कम दाढीसाठी वापरायच्या दोन प्लँस्टिकच्या “मग” खेरीज या साबूदाण्याला सामावून घेणार काहीच दिसेना. ते दोनही “मग” नीट ३-४ वेळा स्वच्छ धुवून दोन्हींमध्ये अर्ध्या भागात मावेल इतका साबूदाणा घेऊन ते पाण्याने काठोकाठ भरले. झाला की साबुदाणा भिजवून, एक महत्वाची पायरी पार पडली. त्या साबूदाण्याला पाण्यात तसेच डुंबत ठेऊन मी कढई व स्टोव्हच्या शोधात बाहेर पडलो. वसतीगृहात खानावळ व बाहेर मुबलक हॉटेल्स त्यामुळे कधी कोणी रूमवर काही करायचा प्रयत्न करायचे नाहीत. (आळशी सगळे...मनातल्या मनात) तरी नशिबाने एकाकडे अगदी छोटासा असा बर्नर व खानावळीतून मूळ रंग न ओळखता येण्याइतपत काळे, पिवळे पडलेले व कित्येक ठिकाणी पोचे गेलेले जुने खोलगट भांडे मॅनेजरची दादापुता करून मिळवले. आता फक्त सगळा उशीर साबूदाण्याकडून होत होता! संध्याकाळचे ६-३० का ७ वाजत आले होते. संध्याकाळी देवासमोर उदबत्ती लावली आणि त्या शंभुमहादेवाला साद घातली, की देवा हा काय जो जुगाड केला आहे त्याला यश दे रे बाबा!! आतापर्यंत आमच्या उपवासाची बातमी आणि न झालेल्या खिचडीचा सुवास सगळ्या मजल्यांवर दरवळला होता. काही जण दरवाजात उभे राहून मजा बघत होते तर काही जण या जन्मी बल्लवाचार्य असल्याच्या आविर्भावात त्यांच्या खिचडीची पाककृती आमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत होते. यांच्या सल्ल्यापेक्षा गरम गरम खिचडी कधी घशाखाली जाते आहे असे झाले होते. पोटात भुकेचा नुसता डोंब उठला होता. पहिल्यांदा खिचडीत घालायला म्हणून बटाटे उकडून घ्यायचे ठरले. रूममेटने रूममधील खुर्च्या भांड्याला सपोर्ट करायला एकामेकींकडे पाठ करून उभ्या केल्या व बर्नर पेटवला. बटाटे भांड्यातील पाण्यात घालून उकडायला ठेवले. बर्नर, बाजूला त्या खुर्च्या आणि त्यावर बॅलन्स साधत ठेवलेले ते भांडे पाहून, अकबर-बिरबलच्या खिचडीची गोष्ट आठवली आणि पोटात गोळा आला. किती वेळ झाला तरी बटाटे उकडायचे नावच घेईनात. तेवढ्यात कोणीतरी ज्ञान पाजळले, अरे त्यावर ताटली झाका लवकर उकडतील. झाले, ताटलीसाठी धावाधाव झाली. भौतिकशास्त्रातील त्याच्या अगाध ज्ञानाची वाहावाह झाली. ताटली झाकल्यावर पुढच्या १०-१५ मिनीटात बटाटे उकडून तयार झाले. मिरच्या निवडून व त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, मोहरी निवडून घेतली. त्याच पातेल्यात खिचडी करायची होती तेव्हां हात भाजत असतानाही बटाटे सोलून त्याचे चमच्याने तुकडे करून ठेवले. फोडणीची अशी सगळी बेसिक तयारी करून झाल्यावर त्या “मग”मध्ये गोर्या युवती सारख्या यथेच्छ डुबंत पडलेल्या साबूदाण्याची आठवण आली. इकडे हळूहळू रूममधील गर्दी वाढली होती. वातावरण वरून जरी खेळीमेळीचे दिसत असले तरी आतून प्रत्येकाच्या हृदयात भारत पाकिस्तानच्या मॅचसारखे टेंशन होते. दुपार पासून कोणाच्याही पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता. सगळे खिचडीसाठी आणि मी कौतुक करून घेण्यासाठी आतूर होतो. सगळे आता जमिनीवर, टेबलवर पेपरचे तुकडे पसरून तयार बसले होते. मी विजयी मुद्रेने सगळ्यांकडे पहात, मोहरीची फोडणी टाकून लगेच त्यात मिरच्या, साबूदाणा व बटाट्याच्या काचर्या घातल्या. वरून चवीला साखर, मीठ व लिंबू देखील पिळून घातले. एका चमच्याने हे सगळे मिश्रण कालवायला/ढवळायला सुरूवात केली. पण हाय रे देवा, अनपेक्षीतपणे एखाद्या गोर्या मुलीने एखाद्या विरूध्द रंगाच्या मुलाच्या प्रेमात पडावे तसा तो साबुदाणा त्या काळ्या भांड्याच्या इतक्या प्रेमात पडला की, काही केल्या त्या दोघांना मला बाजूलाच करता येईना. त्यातच बराच वेळ ढवळून सुध्दा आईच्या खिचडीच्या रंगासारखा रंग का येत नाहीये हा “कूट” प्रश्न मला मगाच पासून सतावत होता. शेवटी बर्याच वेळ त्या भांड्याशी भांडाभांडी करून झाल्यावर, आता बास म्हणून बर्नर बंद केला. भांड्यातील एकंदरीत रागरंग पाहून, पानिपतावर जसा न लढताच काही जणांनी काढता पाय घेतला होता तसाच हळूहळू रूममधील एकेकजण काढता पाय घेऊ लागला. शेवटी मोजून मी, माझा रूमपार्टनर व अजून एक जण असे तिघेच उरलो होतो. तो सुध्दा त्या बर्नरचा मालक होता म्हणून थांबला होता. आम्ही तिघांनी मग त्या भांड्यातून ती खिचडी कम तो साबुदाण्याचा लगदा आणि खरवड अक्षरशः ओरबाडून काढली व कसाबसा पोटाची भूक भागविण्यासाठी पाण्याबरोबर अक्षरशः गिळला. रूममध्ये इतक्या वेळ बसलेल्यांनी विकत आणलेली केळी व सफरचंदावर आधीच हात साफ करून घेतला होता त्यामुळे रिकामी पिशवी व सालांशिवाय काहीच शिल्लक नव्हते. देवासमोर मोठ्या भक्तिभावाने लावलेली उदबत्ती आणि आमच्या पोटात भुकेची आग अजून जळत होती. मोठ्या आशेने घातलेला घाट पार फसला होता आणि निराश व्हायला झाले. कोणीही एकमेकांशी न बोलता साफसफाई करून पुस्तक घेऊन वाचायला बसलो पण लक्षच लागत नव्हते. मराठीतील, “तेथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नव्हे” ही म्हण आठवली.
रात्री घरी फोन करून सगळा प्रकार घरच्यांच्या कानावर घातला तसेच उपवास मोडल्याचेही सांगितले. राग येण्याच्या ऐवजी साबुदाणा भिजवणे, मोहरीच्या फोडणीने व रंगवून सांगण्याच्या कौशल्याने सगळ्यांची हसूनहसून करमणूक झाली. मनावरचा ताण बराच कमी झाला. येताना मित्र भेटला तो सांगू लागला की दुसर्या वसतीगृहातील काही मुलांनी महाशिवरात्रीनिमीत्त खरगपूर रेल्वे स्टेशनवरील अनाथ मुलांना खायचे सामान व कपडे वाटले. त्या मुलांना बर्याच वेळा घडणार्या उपवासातील १-२ दिवस का होईना कमी करायचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला होता. खूप अभिमान वाटला त्या मुलांचा आणि जाणवले अरे मिळालेल्या शिक्षणाचा हाच खरा उत्तम उपयोग! मी पुढे त्या मुलांना जोडला गेलो व अनेक चांगल्या उपक्रमात खारीचा वाटा उचलला. (पण ते सगळे नंतर कधीतरी पुढच्या एखाद्या लेखात.) नकळत एक उपवास मोडला होता पण जगण्याची वेगळीच दृष्टी व मार्ग दाखवून गेला होता. त्यादिवशी लक्षात आले, जेव्हा आपल्या अंतरंगात अशी विचार परिवर्तनाची ‘खिचडी’ शिजू लागेल तेव्हा आपण उपवासाच्या दिवशी नक्कीच साबुदाण्याच्या खिचडीची सुट्टी करू शकू!
पंचेस भारी जमलेत.
पंचेस भारी जमलेत.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शेवटचा परिच्छेद पण आवडला. शुभेच्छा !!!
मस्त
मस्त
लेख आवडला.
लेख आवडला.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटचा परीच्छेद हाच ह्या मोडलेल्या उपासाचे फलित.
अंघोळ कम दाढीसाठी वापरायच्या
अंघोळ कम दाढीसाठी वापरायच्या दोन प्लँस्टिकच्या “मग” खेरीज या साबूदाण्याला सामावून घेणार काहीच दिसेना. ते दोनही “मग” नीट ३-४ वेळा स्वच्छ धुवून दोन्हींमध्ये अर्ध्या भागात मावेल इतका साबूदाणा घेऊन ते पाण्याने काठोकाठ भरले>>>>
अंघोळीच्या/दाढीच्या मगात उपवासाचा साबुदाणा भिजवून खाल्लात![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एक नंबर.....
आंघोळीच्या मगात साबुदाणा>>>>
आंघोळीच्या मगात साबुदाणा>>>>>शी कहर आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतरंगीजी तुमच्या पुढील मार्गदर्शिकेत हे नक्की लिहा की अशा वस्तु चुकुनहि किचन च्या जवळपास आणु नयेत
आंघोळीच्या मगात साबुदाणा>>>>
आंघोळीच्या मगात साबुदाणा>>>>>शी कहर आहे>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अहो. दोन तीनदा धुतला ना मग. मग?
नंतर मग धुवून अंघोळ केली की
नंतर मग धुवून अंघोळ केली की झाले...
नंतर मग धुवून अंघोळ केली की
नंतर मग धुवून अंघोळ केली की झाले...>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भारी जमलीये खिचडी.
नकळत एक उपवास मोडला होता पण
नकळत एक उपवास मोडला होता पण जगण्याची वेगळीच दृष्टी व मार्ग दाखवून गेला होता. >> !!!
छान लिहिलंय
छान लिहिलंय
आगा बबौ! साबुदाण्याला
आगा बबौ! साबुदाण्याला मोहोरीची फोडणी! अन दाढीच्या मगात भिजवला![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
भारी लिहिले आहे
भारी लिहिले आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शेवटचा उपदेशही मस्त..
एक भोळाभाबडा प्रश्न - दुसरया दिवशी आंघोळ दाढी करण्याआधी तो साबुदाण्याचा मग डेटॉलने व्यवस्थित धुवून घेतलात ना, की तसाच घाणेरडा वापरलात?
भांडही नसतांना काहीतरी कुक
भांडही नसतांना काहीतरी कुक करायचा विचार केलात. ग्रेट आहात ..
एकदा "शाही" बिर्याणी बनवण्याचा प्लॅन केलेला पण लागणारी मोठी भांडी नव्हती. एकच मोठ पातेलं होत. त्यात शिजवलेला भात लेअर करण्यासाठी काढुन ठेवायला भांड नव्हतं म्हणुन आम्ही गारबेज बॅग मधे काढुन ठेवला होता.
@ पियू , ऋतु_निक , एस ,
@ पियू , ऋतु_निक , एस , सस्मित ,सायो ,सायुरी ,मीरा & अदिति :- आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. घडलेल्या कडक उपवासाने हा अनुभव चांगलाच लक्षात राहिला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ अतरंगी , योकु , आदू,
@ अतरंगी , योकु , आदू, ऋन्मेऽऽष:- जे वसतिगृहात राहिले आहेत त्यांना उपलब्ध साधनांचा वापर पुरेपूर कसा करायचा हे पक्के माहिती असते. १००% Utilization is confirmed!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भोळेभाबडे उत्तर:- दोन्ही वेळच्या वापरा अगोदर व्यवस्थित धुवून वापरला "मग", मग तर झाले ना?
किति ते कष्ट!!
किति ते कष्ट!!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुण्यात असतात तर जनसेवा भोजनालयात जाणे इतक्या एका सोप्या स्टेप ने काम झाले असते
बाकी मगमध्ये साबुदाणा वगैरे:
हॉस्टेल स्टे मध्ये इतराना ग्रोस वाटणार्या सर्व गोष्टि (पापडाला इस्त्री ने भाजणे, चहा चे भांडे ३ वेळा चहा करुन झाल्यावरच घासणे, यावेळी शक्यतो आपण गावी गेलेले असलो पाहिजे, चादर २ दिवस पाण्यात भिजवून त्यातल्या कापडाची साबणाबरोबर रासायनिक क्रिया होऊन घाण वास येणे) वगैरे गोष्टी डोळे आणि मन बंद करुन माफ करुन टाकाय्च्या असतात.
भारी आहे. शेवटचा पॅरा उत्तम!!
भारी आहे. शेवटचा पॅरा उत्तम!!
एकुण पाककृती वाचुन एक 'कुट' प्रश्न मलाही पडला की खिचडीत मोहरी घालुन उपास कसा होणार होता?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
काहींना (बर्याच मुलांन-त्यात
काहींना (बर्याच मुलांन-त्यात होस्टेलवाल्या तर बहुतेक सगळ्यांनाच
) मोहरी-जिर्यातल्या फरक कळत नसावा.
म्हणुन मी मोहरी म्हणजे त्यांना जिरं म्हणायचं असेल असा अर्थ घेतला.
जिरं फोडणीत चालतं आमच्यात.
मस्त लेख, वाट लागली हसुन
मस्त लेख, वाट लागली हसुन
.
.
.
एकदा "शाही" बिर्याणी बनवण्याचा प्लॅन केलेला पण लागणारी मोठी भांडी नव्हती. एकच मोठ पातेलं होत. त्यात शिजवलेला भात लेअर करण्यासाठी काढुन ठेवायला भांड नव्हतं म्हणुन आम्ही गारबेज बॅग मधे काढुन ठेवला होता. Lol त्याची आठवण झाली. >>>> ईईईई गारबेज बॅगमधला भात खाल्लात __/\__
भारी लिहिलं आहे... उपवास न
भारी लिहिलं आहे... उपवास न खिचडी कायम लक्षात राहणारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त जमलाय लेख ओबामा . . . .
मस्त जमलाय लेख ओबामा . . . . .!!!
@ कांदापोहे :- Lol Lol Lol
@ कांदापोहे :- Lol Lol Lol Lol
@ कांदापोहे , VB, भावना
@ कांदापोहे , VB, भावना गोवेकर , dhanashri :- आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. घडलेल्या कडक उपवासाने हा अनुभव चांगलाच लक्षात राहिला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदा काम्पिंग ला चहा टॉयलेट
एकदा काम्पिंग ला चहा टॉयलेट पेपर ने गाळला होता आम्ही... त्याची आठवण झाली..
चहा टॉयलेट पेपर ने गाळला होता
चहा टॉयलेट पेपर ने गाळला होता >> अरारा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गाळणे विसरणे हे कॉमन दिसतेय कँपिंग ला. आम्हीही विसरलो होतो एकदा, पण तिथे जनरली जे एक लहानसे जनरल स्टोअर असते तिथे फिशिंग साठी म्हणून लहान नेट्स मिळतात. ती पर्फेक्ट वर्क झाली