आज तू चक्क तीन वर्षांची झालीस! वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत! तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास! दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस! गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे! अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस! जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस! तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात! माणसं चांगले लक्षात राहतात!
गेल्या वर्षभरातल्या अनेक आठवणी आहेत! अजूनही तू आरशासारखी नितळ आहेस. अजूनही तू आमचे तसेच लाड करतेस! समोर येणा-या सर्व गोष्टी तू आनंदाने स्वीकारतेस. ह्या वर्षी तर तुझी शाळा सुरू झाली! त्याविषयी मनात खूप भिती होती. तुला शाळा आवडेल का नाही, बसमध्ये बसून तिथे जायला जमेल का, तू तिथे एडजस्ट करशील का? पण तू सगळं काही- अगदी सगळं काही आनंदात करतेस. शाळेच्या पहिल्या दिवसापासून तू हिंमत केलीस. तीन वर्षांची व्हायच्या आधीच बसने शाळेत जायला लागलीस. समोर येणा-या प्रत्येक गोष्टी तू सारख्याच आनंदाने स्वीकारतेस- मग ते आई बाबांचं दिवसभर समोर नसणं असेल; मधून मधून दूर जाणं असेल; शाळेमधलं वातावरण असेल; आजूबाजूचं वातावरण असेल. पाण्यामध्ये जसा गुणधर्म असतं- ज्या पात्रात टाकू त्या पात्राचा आकार ते धारण करतं, तशी तू आहेस.
तुझी सोबत म्हणजे अखंड सोबत आहे- सर्व बाबतीमध्ये.
“तू बिन बताए मुझे ले चल कहीं जहाँ
तू मुस्कुराए मेरी मन्जिल है वही"
इतकं तुझं आमच्यावर प्रेम आहे, आमच्यावर विश्वास आहे. ह्याप्रमाणेच आम्ही जे करू; जे तुला देऊ; जे वातावरण देऊ; जी परिस्थिती तुला देऊ; त्यामध्ये तू अतिशय आनंदी असतेस. ह्या अर्थाने मूल हे पालकांचं प्रतिबिंब असतं. पालक जे काही देतात; त्या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब उमटत राहतं. म्हणून खरं तर मुलाने नितळ- निरागस राहण्यासाठी पालकांनीही शुद्ध राहणं तितकंच गरजेचं असतं. कारण मुलाचं खूप मोठं वातावरण कुटुंबातच असतं. इथेच जे काही मूल ऐकतं ते सर्व आत्मसात करतं. त्यामुळे नितळ राहणं- शुद्ध राहणं ही खरी पालकांची जवाबदारी आहे. हे खरं आदर्श पालकत्व आहे. आदर्श ह्या शब्दाचा मूळ अर्थ आरसा असाच आहे. आरसा म्हणजे स्वत:चा कोणताही हस्तक्षेप न करणारं नितळ पाण्यासारखं शुद्ध माध्यम. जर पालक असे प्रामाणिक असतील; स्वत: नितळ असतील; तरच ते मुलाला तसं वातावरण देऊ शकतात.
अदू, तुझी ही काही नावं- साखर, लाडू, बर्फी, साखर, स्वरा, टिंकूडी, बबडी! आणि तुझे ते लाडीक बोल! तुझ्या लाडीक बोलांमध्ये आता शाळेतल्या गाण्यांची भर पडली आहे! शाळेचं पुस्तक उघडून तू गाणं म्हणायला सुरू करतेस आणि बरोबर तेच पान काढतेस! कसं काय जमतं तुला हे! तुला इंग्लिश अक्षरंही आता खूप चांगली ओळखू येतात. अनेक गाणीही पाठ आहेत. आणि तुझं लांबलचक बोलणं आणि मोठ्या माणसाप्रमाणे समजावून सांगणं! आणि अंगातली अखंड ऊर्जा आणि मस्ती! आजचा दिवसही तू पूर्ण एंजॉय केलास! 'मला केक आणा ना, चला केक आणू ना' म्हणत मागे लागलीस! नंतर अखंड मस्ती केलीस. दिवसभर तुझी एनर्जी टिकून होती. तुला आता अनेक गोष्टींमधलं बरंच काही कळतं! मग ते प्राणी असतील, खेळणी असतील, खेळ असतील, गाणी असतील, आमच्या आवडी- निवडी असतील.
मेरे रंग में रंगनेवाली परी हो या हो परियों की रानी!
पालक म्हणून तुला योग्य ते रंग देणं, योग्य ते वातावरण देणं फार महत्त्वाचं आहे. पण अनेकदा होतं असं की, आमच्या वागण्यात- घरातल्या वातावरणात ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी तू बघतेस, बघून बघून त्याचं अनुकरण करतेस आणि मग तेव्हा आम्ही तुला रागवतो. पण तुझी त्यात चूक नसते. कारण तू म्हणजे तर शुद्ध प्रतिबिंब आहे; प्रतिध्वनी आहेस. जर आम्हांला तुला रागवावसं वाटत असेल तर त्याचा अर्थ हाच आहे की, आमच्यामध्येच कुठेतरी त्याचं कारण आहे.
पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की, पालकांनी कठोर होऊ नये. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये सर्व प्रकारचे रंग आणि सर्व छटा असतात. जीवन हे सर्व विपरित टोकांनी मिळूनच बनलेलं आहे. ते एकसुरी कधीच नसतं. आणि एकसुरी असेल तर नीरस होतं. फक्त उजेड किंवा फक्त अंधार ही जीवनाची परिभाषाच नाहीय. तिथे रात्र येणारच. कारण रात्र ही दिवसाचीच other side of the coin आहे. जीवनामध्येही सर्व गोष्टी अशाच दोन्ही बाजू असलेल्या असतात. पण आपल्याला एका वेळेस नाण्याची एकच बाजू दिसते व त्यामुळे असा भास होतो की, दुसरी बाजूच नाहीय. पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते आणि दोन बाजू असल्यामुळेच जीवन संतुलित आणि वैविध्यपूर्ण असतं. त्यामुळे एका बाजूला पालकांनी प्रेम, आपुलकी, सॉफ्ट कॉर्नर द्यावा, पण त्याबरोबर कठोरही व्हावंच. कारण फक्त जर सॉफ्ट कॉर्नर दिला तर ते एकांगी होईल. आणि बाहेरचं जीवन तर सर्वांगीण आहे. तिथे कठोरतासुद्धा आहे; अनेक नकारात्मक बाबीही आहेत. त्यामुळे जर मुलाला जीवनाच्या सर्व पैलूंचा परिचय करून द्यायचा असेल, त्याची तयारी करून द्यायची असेल, तर कठोरही व्हायला पाहिजे. तरच ते पालकत्व संतुलित होईल.
म्हणून काही तज्ज्ञ लोक सांगतात की, मुलांना सर्व काही रेडीमेड- सर्व काही सुसज्ज करून देऊ नका. काही गोष्टी त्यांना अडचणीच्या होतील, अशा ठेवा. काही ठिकाणी तरी त्यांना संघर्ष करावा लागेल, असं काही ठेवा. त्यामुळे अशा मुलांमध्ये तशी जिद्द निर्माण होते, त्यांची मनाची तयारी होते. तसे ते घडतात. त्या अर्थाने वरवर बघता ज्या गोष्टी विपरित आहेत; नकारात्मक आहेत; त्याही मुलांच्या जडण घडणीसाठी महत्त्वाच्या आहेत. कारण उद्याचं जीवन तर असंच आहे- विविधरंगी आणि सर्व भावनांचं कॅनव्हास असलेलं इंद्रधनुष्य. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रत्येक गोष्टीची चुणूक मिळणं त्या अर्थाने उपयोगीच आहे.
अदू, इथे एक गोष्ट आठवते. तुला आत्ताच सांगून ठेवतो. प्राचीन काळी एका घरातला एक छोटा मुलगा शिक्षणासाठी बाहेर जाणार होता. त्याचं वय फक्त सात वर्षं होतं. त्याला त्याच्या वडीलांनी सांगितलं की, "आजवर आपल्या घरातून जे कोणी शिकायला बाहेर गेले आहेत, ते कधीच शिक्षण पूर्ण केल्याशिवाय घरी आले नाहीत. आणि आपल्या घरातली ही प्रथा आहे की, जेव्हा केव्हा लहान मुलगा शिकायला बाहेर जातो, तेव्हा तो कधीच मागे वळून बघत नाही. कारण मागे वळून बघणं आम्हांला मान्य नाही. जेव्हा आपण कोणाला निरोप देतो व तो शिकायला जातो, तेव्हा तो मागे वळून बघत नाही. मी जेव्हा बाहेर शिकायला जाणार होतो, तेव्हा मला माझ्या बाबांनी सांगितलं होतं की, बाहेर जाताना डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे. कारण जर डोळ्यात पाणी आलं असेल, तर ते आपल्या परंपरेला साजेसं होणार नाही व मग तुला ह्या कुटुंबाच्या परंपरेतही राहता येणार नाही. कारण आपल्या कुटुंबात रडणा-याला थारा दिला जात नाही. उद्या तू जाणार आहेस, तेव्हा मीसुद्धा तुला तेच सांगतो. उद्या पहाटे चार वाजता तुला निरोप दिला जाईल. एक जण तुला घोड्यावर बसवून सोडायला जाईल. एक किलोमीटर अंतरावर रस्ता वळतो, तिथून तुला घर दिसू शकतं, पण मागे वळून बघायचं नाहीस. आम्ही छतावर उभे असू व बघू की, तू मागे वळून तर बघत नाहीस. कारण जो मागे वळून बघतो; जो खंबीर नसतो, त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे मागे वळून बघायचं नाही म्हणजे नाही.” मुलाला वडीलांनी हे सांगितल्यावर तो फार घाबरला. पण त्याच्या आईने त्याला समजावलं की, मुला घाबरू नकोस. नेहमी असंच होत आलंय. जे मागे वळून बघतात ते कुटुंबात राहात नाही. तेव्हा मागे वळून बघू नकोस.
तो मुलगा रात्रभर झोपूच शकला नाही. कारण उद्या पहाटे असं जायचं हा विचार झोपच लागू देत नव्हता! जायचं तर आहेच आणि मागे वळूनही बघायचं नाही, डोळ्यात पाण्याचा थेंब आणायचा नाही. सात वर्षाच्या मुलाकडून अशी अपेक्षा! आपण तशा ठिकाणी असतो तर आपल्याला वाटलं असतं की ते पालक तर किती कठोर आहेत, किती दुष्ट आहेत! तिथे आपण असतो तर लाड केले असते, चॉकलेट दिलं असतं. आपणही रडलो असतो, त्यालाही रडू आलं असतं आणि आपणही प्रेमात बुडालो असतो.
पण एका बाजूने बघितलं तर हे प्रेम नाही. हे तर खरं म्हणजे त्या मुलाच्या संकल्प शक्तीला कमकुवत करणं आहे. आज एका बाजूला सगळ्यांना वाटतं की, मुलांना जास्तीत जास्त सुरक्षित वातावरण द्यावं, जास्तीत जास्त सॉफ्ट कॉर्नर द्यावेत. पण मग अशाने मुलांमध्ये दृढता कशी येणार? त्यांच्या व्यक्तीमत्वाचा पाया भक्कम कसा होणार?
पण तो मुलगा निघाला- निबीड अंधारात पहाटे चारला. त्याचे आई- वडील त्याला दारावर सोडायलाही आले नाहीत. इतके ते कठोर आणि दुष्ट होते का? त्या मुलाला घोड्यावर बसवून एक नोकर त्याच्यासोबत निघाला. पहाटेचा निबीड अंधार, सुनसान परिसर आणि थंड हवा. तो नोकर त्याला म्हणाला, मुला आता मागे वळून बघू नकोस. आता तू मोठा झालास. तुझ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जो मागे वळून बघेल, त्याच्याकडून काय अपेक्षा करता येणार? तुझे वडील गच्चीतून तुझ्याकडे बघत आहेत. तू जर मागे वळून बघितलं नाहीस, तर त्यांना खूप आनंद होईल की, इतकं अंतर पार करतानाही तुला मागे वळून बघावसं वाटलं नाही.
त्या मुलाची काय अवस्था झाली असेल! सात वर्षांचा कोवळा मुलगा. पण कसाबसा मागे वळूनही न बघता तिथून पुढे आला. आणि इथेच त्याच्या संकल्प शक्तीचा जन्म झाला- एक छोटा टप्पा मी ओलांडू शकतो, असा आत्मविश्वास आला! जेव्हा तो शाळेत पोहचला- भिक्षुंच्या आश्रमात पोहचला तेव्हा तिथे ते भिक्षु त्याला दरवाजावर भेटले. त्यांनी म्हंटलं, की प्रवेश घेण्याचे अनेक नियम आहेत. कोणाही ऐरा- गै-याला इथे प्रवेश घेता येत नाही. तुला प्रवेश हवा असेल तर इथे दारासमोरच डोळे बंद करून बस. आणि मी परत येऊन तुझ्याशी बोलेपर्यंत डोळेही उघडायचे नाहीत. उठण्याचा तर विचारही करू नकोस. जर मी येण्याच्या आधी तू डोळे जरी उघडलेस, हालचाल केली तर तुला परत घोड्यावर बसवून पाठवू. तुझ्या घरचा नोकर बाहेर त्यासाठीच अजून थांबला आहे. आणि हे लक्षात ठेव, तुझ्या कुटुंबातून आजपर्यंत कोणीच असे परत गेलेले नाहीत. तेव्हा प्रवेश हवा असेल तर डोळे मिटून मी येईपर्यंत बसून राहा. हीच तुझी एंटरन्स टेस्ट आहे.
सात वर्षांचा तो मुलगा बसून राहिला. कोणीही त्याची विचारपूस केली नाही. कोणी त्याला म्हंटलं नाही की, मुला तुझे घरचे काळजीत असतील, चल ये, इकडे बस. त्याचं सामान, घोडा व घरातला नोकर बाहेरच थांबले. मुलगा डोळे मिटून बसून राहिला. ते शिक्षकही इतके क्रूर आणि कठोर होते का? पण खरं तर त्याचे आई- वडील आणि ते शिक्षकही अतिशय दयाळूच होते.
तो मुलगा बसून राहिला. गुरूकुलात इतर विद्यार्थी येत होते. कोणी त्याला धक्का मारला, कोणी दगड मारला. कोणी त्याची चेष्टा केली. पण त्याला डोळे बंदच ठेवायचे आहेत. काहीही होवो. कारण डोळे उघडले, तर परत जावं लागेल. आणि मग कोणत्या चेह-याने तो घरच्यांसमोर जाईल जिथे आजवर असं कधीच झालं नाही? हळु हळु ऊन कडक झालं. त्याच्याभोवती माशा आल्या. त्याला भूक लागली. तहान लागली. पण काहीच न करता तो डोळे मिटून बसून राहिला. डोळेही उघडायचे नाहीत आणि उठायचंही नाही. दुपार झाली. एक एक मिनिट अतिशय मोठा गेला असणार. त्याच्या मनात सतत प्रश्नांचं वादळ उठलं असणार- काय झालं, अजून कोणीच कसं आलं नाही? माझ्याशी कोणीच का बरं बोलत नाही? पण त्याने डोळे उघडले नाहीत. एक सेकंद चोरूनही उघडून बघितलं नाही.
संध्याकाळ झाली. सूर्य मावळायची वेळ आली. तहान- भूकेने तो कासावीस झालाय. तेव्हा कुठे गुरू आणि दहा- बारा भिक्षु येतात. त्याला उचलून घेतात आणि सांगतात की तू एंटरन्स टेस्ट पास झालास! तुझ्याकडे संकल्प आहे! आता तू निश्चितपणे कोणी बनू शकतोस. ये आत! जेव्हा शिक्षण पूर्ण होऊन तो घडला; तेव्हा त्याने त्याच्या कठोर वाटणा-या पालकांना व गुरूंना धन्यवाद दिले व म्हंटले की, त्यांची करूणा खरोखर अद्भुत होती!
बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है!!!
ही गोष्ट खूप खरी आहे. आपण 'एंटर न्यू ड्रॅगन' सारखा चित्रपट बघतो किंवा ज्युडोसारखी कला बघतो. अशी कला घडण्यामागे साधनाही इतकीच मोठी असते. आणि साधनेची सुरुवातच अशा संकल्पापासून होते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. एका बाजूने पालकांनी मृदु असण्याची जशी गरज आहे, तसंच दुस-या बाजूने कठोरही असलंच पाहिजे. तरच मुलाचं व्यक्तिमत्व संतुलित आणि परिपक्व होईल. आणि पालकांकडून जे सर्व काही सेक्युअर, प्रोटेक्टेड वातावरण मुलांना दिलं जातं, ते किती दिवस टिकणार? उद्या जेव्हा जीवनाचा वारू चौखुर उधळेल, तेव्हा रखरखत्या वाळवंटापासून तप्त आगीची धग असं सगळं काही येणारच आहे जीवनात. तेव्हा तर असं protected upbringing हीच मोठी अडचण ठरेल. आज व्यावहारिक जगातही आपण हेच बघतो की, श्रीमंत किंवा अतिश्रीमंत कुटुंबांची मुलं व्यवहारात फारसं विशेष काहीच 'साध्य' करत नाहीत. पण स्ट्रगल करून आलेले; अयशस्वी होऊन पुढे आलेले आणि संघर्ष केलेले लोकच अनेक 'विशेष' गोष्टी करून दाखवतात.
आणि जी गोष्ट secure environment ची आहे, तीच गोष्ट आखीव नियमांची आहे. बाहेरून लादलेले नियम वरवर राहतात. पुढे जेव्हा परिस्थिती खूप बदलते, तेव्हा नियम हे साखळदंड ठरतात. समजा एखाद्याला सांगितलं की, तू चहा करताना बरोबर अर्धा चमचा चहा पत्ती, एक चमचा साखर, अर्धा ग्लास पाणी असंच वापरत जा. तर उद्या काय होईल? कधी त्याला मोकळ्या मैदानात चहा करायची वेळ येईल. तेव्हा चमचे तर नसतील. पण चहाची पानं असतील. तिथे हे ठरलेले नियम अडचणच ठरतील. म्हणून नियमांपेक्षाही त्यातून मिळणा-या बोधावर भर पाहिजे. की अर्धा चमचा चहा पत्ती म्हणजे इतकी पत्ती. नियम असावेत, पण ते शहाणपणा व समज देणारे असावेत... असो.
अदू, तुझ्यासोबत जगताना खूप मोठा फरक हा जाणवतो की, आता तुझा consciousness आमच्यासोबत आहे. म्हणजे प्रत्येक वेळी एखादी गोष्ट तू कशा नजरेने बघतेस, हे जाणवत राहातं. हे जर तू बघितलं असतंस, तर तुला काय वाटलं असतं, हेही जाणवतं. एका अर्थाने तू आम्हांला मृदु केलं आहेस. आता पूर्वीसारखा एखादा हिंसाचार असलेला चित्रपट सहज बघता येत नाही. त्यावेळी तुझा consciousness सोबत असतो. कोणाशी इतकं हार्ड होऊन वागता येत नाही! आणि त्याबरोबरच छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंदही डिकोड होतो! तुझं spontaneous जगणं आणि हसणं खूप contagious आहे! खुर्चीत बसल्यावर पाय हलवताना तू लगेचच पायावर उभी राहतेस आणि आनंदाने म्हणायला लागतेस, सी सॉ अप अँड डाऊन! तो तुझा आनंद, त्या आनंदाचा अविष्कार! किंवा एकदा खोलीत फुगे आणले होते तेव्हा तू ते बघून चेकाळलीस आणि गाणंच सुरू केलंस! तुला इतका आनंद होतो की तो तुझ्या मनात मावत नाही, म्हणून तू नाचायला लागतेस! आणि तुझ्यामुळेच मी तुला कडेवर घेऊन केलेला सैराट डान्स!! आणि नाचूनही तुझा आनंद मावत नाही म्हणून तुझं आनंदाने ओरडणं!! किंवा कधी कधी तू शांत होऊन जवळ येऊन बिलगतेस! तुझ्या सोबतीचे असे असंख्य पैलू! गणपतीच्या वेळेस ऐकून तू म्हणतेस ते सोनू माझ्यावर भरोसा नाय का गाणं! किंवा मध्येच हसून लव यू ज़िंदगी गाणं म्हणतेस! किती किती सांगू! तुझ्याकडून जो आपलेपणा मिळतो, तू जी माया करतेस, जे लाड करतेस, त्यामुळे फक्त आणि फक्त नतमस्तक व्हायला होतं……
माझे लेख इथे एकत्र आहेत; http://niranjan-vichar.blogspot.in/
खूपच सुंदर लिहिलंय...
खूपच सुंदर लिहिलंय...
खूप मॅच्युअर्ड पालक आहात ....
भिक्षूची गोष्ट अंतर्मुख करायला भाग पाडणारी...
____/\____
खूप मस्त लिहिलयं
खूप मस्त लिहिलयं
आज व्यावहारिक जगातही आपण हेच बघतो की, श्रीमंत किंवा अतिश्रीमंत कुटुंबांची मुलं व्यवहारात फारसं विशेष काहीच 'साध्य' करत नाहीत. पण स्ट्रगल करून आलेले; अयशस्वी होऊन पुढे आलेले आणि संघर्ष केलेले लोकच अनेक 'विशेष' गोष्टी करून दाखवतात.>>>>+++११
खूप छान लेख. माझी फिलॉसोफी
खूप छान लेख. माझी फिलॉसोफी थोडी बहूत अशीच. आहे शिक्षनासाठी आणि स्वतःच्या जीवनात स्वतःचे अनुभव घेण्यासाठी मुलांना पालकांच्या गोड मिठीतून बाहेर पाठवावेच लागते. जीवनातील सुख दु:खे त्यानी आपण हून अनुभ वली पाहिजेत आपल्याला त्यांना किती ही प्रोटेक्ट करावे वाटले तरी तो मोह दूर ठेवला पाहिजे.
आवडल. छान
आवडल. छान
कऊ म्हणजे सर्व श्रीमंतांची
कऊ म्हणजे सर्व श्रीमंतांची मुले वाया जातातस?
रतन टाटा , कुमार मंगलम बिर्ला , आनंद महिंद्र , राहुल बजाज , तान्या गोदरेज , कोटक हे वाया गेले का ?
बर्याचदा घाटी लोकांना इतरांशी मिक्स होणर जमत नाही . सिगारेट ओढणारा आणि दारू पिणारा मुलगा म्हणजे वाया गेलेला असे वाटते . दारू वरून सांगायचे तर अर्ध्याहून जास्त आय आय टी / आय आय एम वाया गेलेले होते असे म्हणायला पाहिजे .
UDu do you support nepotism?
UDu do you support nepotism? Just listen to ansnya birlas song . Where as companies like apple google facebook are started by strugglers with life experience.
अमा माझे हे उत्तर फक्त "सर्व
अमा माझे हे उत्तर फक्त "सर्व श्रीमंतांची मुले वाया जातात " या सरसकटीकरणाला होते.
वाचनाबद्दल व
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!!!
@उडता डुक्कर, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! मी लेखामध्ये एक परस्पेक्टिव्ह मांडला होता, त्या संदर्भात इतरही परस्पेक्टिव्ह आहेतच, असणारच. कोणत्याही गोष्टीला अनेक बाजू असतात त्याप्रमाणे!
आवडला, मस्त .
आवडला, मस्त .
आम्ही पण याच बोटीत आहोत .