चॅलेंज - भाग ५ अन्तिम

Submitted by आनन्दिनी on 16 August, 2017 - 22:30

चॅलेंज भाग ५ (अंतिम)

एक विचित्र शांतता टेबलवर पसरली होती. इतक्यात नेमका मीराचा फोन वाजला. “हो हो, मी येतेच थोड्या वेळात” म्हणून तिने फोन ठेवला. सगळ्यांच्या चेहर्यावरची प्रश्नचिन्ह पाहून तिने म्हटलं, “रसिक, बुकस्टोअरवाला”
“तो कशाला तुला फोन करतो?” शौनकने तत्काळ प्रश्न केला.
“बुकस्टोअरवाला कशाला फोन करेल! पुस्तकांबद्दलच करेल ना!” दिगंतने परस्पर शौनकला उत्तर दिलं.
“नाहीतर काय! मी पुस्तकं मागवली होती. ती आली आहेत. ते थोड्या वेळाने दुकान बंद करतील. म्हणून लवकर येऊन घेऊन जायला सांगत होता. तुझं ते हार्पर लीचं पुस्तक सुद्धा मागवलं होतं, तेसुद्धा आलंय” मीराने शौनकला म्हटलं आणि पुढे “कशाला फोन करतो म्हणे!” म्हणून वैतागून मान हलवली. मग तिने मनगटावरच्या घड्याळात पाहिलं, ती अवनीला म्हणाली, “अवनी, तू तुझा अनुभव सांगायला सुरुवात करतेस, मला थोड्या वेळात निघावं लागेल.”
अवनीने वाचायला सुरुवात केली.

परवा रोहनशी सॉलिड वाजलं. आता हा मला सांगतो, उद्या काही प्लान नको करू. आपण घरच्यांबरोबर डिनरला जाऊ. मी तर माझ्या ग्रूपबरोबर टोटोस (क्लब) चा प्लान आधीच केला होता. मग वादावादी. दोघांचंही म्हणणं ‘तू मला आधी का नाही सांगितलस’ रोहनच्या आईवडलांची अॅनिव्हर्सरी आहे हे तो पूर्ण विसरला होता. मी नेहमीप्रमाणे आम्ही जाणारच असं धरून चालले होते. तर रोहनने मला विचारलं, “खरं सांग, तू तरी दर शनिवारी हे पब्स, पार्टीज एन्जॉय करतेस का?” एरवी मी ‘हो’च म्हटलं असतं. पण हे चॅलेंज आडवं आलं. मी म्हटलं, “Not exactly, कधी कधी कंटाळा येतो.” त्यावर तो लगेच म्हणाला, “आता मला कंटाळा आलाय”. मी म्हणाले, “मला कंटाळा आला तरी मी जाते” तर खदाखदा हसायला लागला आणि म्हणाला, “You are stupid ! पंचविशी आली तरी तू अजून टीनएजर सारखीच वागतेयस. तुला मोठं व्हायचच नाहीये. पण तू कितीही तशीच वागलीस तरीही तू मोठी होतेच आहेस.” असलं झोंबलं त्याचं बोलणं, खरं असलं तरीही ! शेवटी काल रात्री रोहनच्या फॅमिलीबरोबर डिनरला गेले. थोडं टेन्शन होतं. But they were cool. नशिबाने त्यांनी काही ऑकवर्ड प्रश्न विचारले नाहीत. नाहीतर भावी आयुष्याचा विचार करून चॅलेंज मोडलं असतं.

मी झाराच्या टॉपमधला माझा फोटो फेसबुकवर टाकला होता. खूप लाइक्स आले पण चैताली आणि पारुलने लाईक नाही केला. गेल्या आठवड्यात त्यांचे फोटोज मी लाईक नव्हते केले. Thanks to Digant’s challenge! म्हणूनच असणार. हे चॅलेंज असंच चालू राहिलं तर माझे अर्धेअधिक फ्रेंड्स तुटतील. रोहनला असं सांगितलं तर म्हणतो, “तुझे सगळे वरवरचे fake फ्रेंड्स तुटतील. ही चांगलीच गोष्ट आहे”

गेल्या सोमवारी पुन्हा उशीर झाला. ऑफिसमधला आमचा पारशी बावा तर थांबलेलाच असतो मला कारण विचारायला. या वेळी मी सरळ सांगून टाकलं, “शनिवारी जागरणं झालं, रविवारी उशिरा उठले, पुन्हा रात्री झोप लागत नव्हती आणि आज सकाळी जाग येत नव्हती” त्यावर खो खो हसून म्हणतो, “आज फर्स्ट टाईम तूनी खरं सांगितला, रोज ट्राफिक आनी पंक्चरच्या स्टोरीज बनवते. खरं सांगेल तर मी तुजी हेल्प करेल ना बाबा. प्रॉब्लेमचा रूट कॉज शोधेल तरच प्रॉब्लेम सुटेल ना.” जो उठतो तो माझ्या Saturday nights वरच घसरतोय! दिगंत तुझ्या या चॅलेंजपायी अर्धा तास लेक्चर खाल्लं मी !

काल एका नवीन क्लाएंट बरोबर आमची मीटिंग होती. एक छोटी फर्म आहे. त्यांना आमच्याकडून सॉफ्टवेअर डीव्हेलप करून हवंय. बॉसने मला बोलणी करायला जायला सांगितलं होतं. हल्ली बॉस मला अधिकाधिक जबाबदार्या देत आहे. ही चांगली, प्रमोशनची लक्षणं आहेत. मी गेले. जे टाईमस्केल त्यांनी सुचवलं होतं, ते पाळणं प्रॅक्टीकली शक्यच नव्हतं. बहुतेक वेळा असंच होतं. आधी सगळी बोलणी ही संदिग्ध अशी असतात. नंतर फायनल मीटिंगच्या वेळी जेव्हा टाईमस्केल वगैरे गोष्टी नक्की केल्या जातात तेव्हा आम्हांला contract खिशात टाकायची इतकी घाई झालेली असते की क्लाएंट म्हणतील त्या सगळ्याला हो म्हटलं जातं. मग शेवटी प्रोजेक्ट लाईव व्हायची वेळ आली की सगळ्यांची वाट लागते. सगळ्यांवर ताण येतो. हा विचार करून मी या मीटिंगमधे सांगितलं की “या बजेटमध्ये माझी सहा जणांची टीम या प्रोजेक्टवर काम करणार आहे. सहा जणांना हे काम तीन महिन्यांत पूर्ण करणं शक्यच नाही. तुम्हाला शब्द देऊन मग मागे फिरायला मला आवडणार नाही. त्यापेक्षा जे खरोखरी शक्य आहे तेच कबूल करणं मला आवडेल. एक तर टाईमस्केल तीनऐवजी चार महिने करावं किंवा बजेट वाढवावं म्हणजे जास्त लोकांना हाताशी घेऊन काम तीन महिन्यांत करता येईल.” क्लाएंटना विचित्र वाटलं असावं. ते दोन दिवसांत कळवतो म्हणून निघून गेले. नंतर बॉस माझ्यावर अस्सा उखडला. ‘असं कशाला सांगायचं, हो म्हणून टाकायचं ना...’ त्यावर मी म्हणाले “पण ते पूर्ण करणं आपल्याला शक्य झालंच नसतं.” “अरे लेकिन बोलने में क्या जाता है?” सत्याचं पालन करणं भारीच अवघड आहे. प्रमोशन तर गेलंच हे मला कळून चुकलं.

आज बॉसने मला केबिनमध्ये बोलावलं तेव्हा मला धडकीच भरली की आता फायर करतो की काय. पण झालं उलटंच. क्लाएंटचा फोन आला होता. त्यांनी प्रोजेक्ट आम्हांला द्यायचा निर्णय घेतला होता. तोही आमच्या चार महिन्यांच्या टाईमस्केलसकट. मला आनंदाने नाचावसं वाटलं. बॉस त्यापुढे म्हणाला की त्यांनी स्पेशली सांगितलय, तुमच्या कंपनीच्या त्या फीमेल टीमलीडरचा प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा या दोन्ही गोष्टी आम्हांला अतिशय आवडल्या. अशी उत्तम principles (तत्वं) असलेल्या लोकांबरोबर काम करायला आम्हांला आवडेल. मी मनातल्या मनात त्याच क्षणी दिगंतचे आभार मानले. नेहमी हे असंच होणार नाही याची जाणीव मला आहे. पण सत्याची किंमत असलेले काही लोक तरी या जगात आहेत हे पाहून मला खूप बरं वाटलं.
अवनीचं वाचून झालं. “ओ हो हो.... म्हणजे प्रमोशन नक्की आहे तर !” दिगंतने हसून अवनीला विचारलं. “बहुतेक तरी आहे. बघूया” अवनीने उत्तर दिलं. ती पुढे म्हणाली, “यात लिहिलं नाहीये, कारण लिहायला वेळच नव्हता. पण मी हे चॅलेंज हरलेय.”

“हरलीयेस, का?” दिगंत आणि शौनक दोघांनीही एकदमच विचारलं. मीराचा चेहरा पडला होता.
“तुझ्यामुळे शौनक, तुझ्यामुळे” अवनीने उसळून म्हटलं.
“माझ्यामुळे?” शौनक पुरता चक्रावला होता. “माझा संबंध काय? आपण गेल्या महिन्यानंतर आज भेटतोय!”
“तूच! आत्ता मी घरातून निघतंच होते एवढ्यात मोबाईल वाजला. मीराच्या घरचा नंबर होता. मीराचाच असेल असं वाटून मी उचलला. पण फोन काकूंचा, मीराच्या आईचा होता. त्या मला सांगू लागल्या की कशी मीरा सगळ्या स्थळाना नाही म्हणतेय. आता हा एवढा चांगला अमेरिकेचा मुलगा सांगून आलाय. सगळं चांगलं आहे. दोघी बहिणी एकाच शहरात रहातील. पण ही भेटणं तर दूरच त्याच्याशी बोलतही नाहीये. आणि मग त्यांनी मला विचारलं, ‘तू तिची मैत्रीण आहेस, तुला सगळं माहीतच असणार. तिचं कोणाशी काही चाललंय का? अशी का वागतेय ती?’”
“मग तू काय म्हणालीस?” शौनकने विचारलं.
मीराचा चेहरा इतका पडला होता की ती आता कधीही रडेल असं वाटत होतं.

“काय सांगायला पाहिजे होतं मी?” अवनीने चिडून शौनाकलाच उलट विचारलं. “काही चालू नाहीये असंच सांगितलं. जरी मला डोळ्यासमोर दिसतंय, की तिला तू आवडतोस. तूही तिला सिग्नल देत असतोस, घ्यायला येऊ, सोडायला येऊ, हक्क गाजवत असतोस, पुस्तक आण, फोन कर, तो अमका तुला फोन कशाला करतो हेसुद्धा विचारतोस पण स्वतः मात्र कमिट करत नाहीस. दिसत नाही का तुला, ती तू विचारण्याची वाट पाहतेय ते!”
शौनकने ओशाळून मीराकडे पाहिलं. तिचे डोळे डबडबले होते.

टेबलवर पुढे सरकून त्याने समोर बसलेल्या तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, “मीरा मला तुझ्याबद्दल काय वाटतं हे तुलासुद्धा कळतंच ना? बोलूनच सगळं सांगायला हवं का? घरून इतकं प्रेशर येतंय तर मला सांगायचस ना. पुढच्या वर्षी माझी शेवटची परीक्षा आहे म्हणून मी त्या आधी काही बोलत नव्हतो. पण तुला घरून एवढं दडपण येत असेल तर घरी येऊन भेटलंच पाहिजे. माझ्या आईबाबांना सुद्धा सांगतो मी. Don’t worry! माझ्या मीराला अशी कशी सोडेन मी!” त्याच्या वाक्यावाक्यागणिक मीराचा चेहरा बदलत गेला. मळभ दूर होऊन लक्ख सूर्यप्रकाश यावा तसं तिला वाटलं. तिने फक्त हो म्हणून मान हलवली. लाजून तिने शौनकच्या हातातला आपला हात सोडवून घेतला आणि स्वतःच्या डोळ्यांच्या ओल्या कडा टिपल्या. मग तिने बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या अवनीला “थँक्यू” म्हणून घट्ट मिठी मारली. अवनीनेही हसून तिला जवळ घेतलं. दिगंतने शौनकच्या खांद्यावर थाप मारून त्याला “वेल डन ! देर आए दुरुस्त आए!” म्हणून अभिनंदन केलं. आपला चेहरा ठीकठाक करायला मीरा वॉशरूमकडे गेली. हे तिघे टेबलपाशी बसले होते.

“तुझ्या या चक्करमधे मी चॅलेंज हरले.” अवनी हसत हसत शौनकला म्हणाली.
“तू चॅलेंजचं सांगतेयस,” दिगंतकडे वळून शौनक म्हणाला, “या शहाण्याच्या चॅलेंजमधे माझी तर आयुष्यभराची विकेट गेली.” रागावल्याचा आव आणून तो पुढे म्हणाला, “एंगेजमेंट आणि लग्नाच्या नादात मी जर परीक्षेत फेल झालो तर तू जबाबदार आहेस दिगंत, लक्षात ठेव”
दिगंत चिडवायची संधी थोडीच सोडणार. तो उलट म्हणाला, “अस्सं? जाऊदे. तू शांत चित्ताने तुझ्या परीक्षा दे. मी मीराशी लग्न करतो.”
“ए Ѕ Ѕ Ѕ” म्हणत शौनकने दिगंतवर बुक्का उगारला. “वहिनी आहे तुझी ती” दोघेही मोठमोठ्याने हसू लागले. अवनीने सुद्धा हलकसं स्मित केलं. मीरा परत येऊन खुर्चीत बसणार इतक्यात बुक स्टोअरमधून पुन्हा फोन आला. “सॉरी, मला निघायला हवं.” तिने उठत या तिघांना म्हटलं. शौनकसुद्धा उभा राहिला आणि म्हणाला, “खरं तर मी त्या बाजूला जात नाहीये. पण चल तुला सोडून पुढे जातो” घाईतच मीरा आणि शौनक निघाले.

“लवबर्डस उडाले. मीरा पुढच्या वेळचं चॅलेंज सांगायला विसरलीच की!” ते गेले त्या दिशेला बघंत दिगंत उद्गारला. तो आणि अवनीसुद्धा कॅफेच्या बाहेर आले. दिगंत आता निघणार इतक्यात अवनीने त्याला थांबवलं. ती म्हणाली, “दिगंत, आपण गमतीत, मस्करीतसुद्धा जे म्हणतो ना त्यात नेहमी एक टक्का सत्य असतंच. तू जे मी मीराबरोबर लग्न करतो म्हणालास त्यातही कुठेतरी थोडसं तसं आहे ना? नेहमी तिची काळजी घेतोस, तिची बाजू घेतोस, मैत्रीच्या पुढे, तुझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे ना?”
दिगंत काहीच न बोलता शांत राहिला.
“दिगंत....?” अवनीने पुन्हा विचारलं.
दिगंतने उत्तर दिलं, “सत्याचं चॅलेंज आता संपलय अवनी” आणि तो एकटाच त्याच्या दिशेने निघाला.

समाप्त

डॉ. माधुरी ठाकुर
https://drmadhurithakur.blogspot.co.uk/

Group content visibility: 
Use group defaults

Pages