चॅलेंज - भाग ४

Submitted by आनन्दिनी on 16 August, 2017 - 22:25

चॅलेंज भाग ४

“आता तू वाचतेस का, मीरा?” दिगंतने मीराला विचारलं. नेमकं त्याच वेळी कॅफेचं दार कोणीतरी उघडलं आणि वार्याची एक झुळूक आत आली. त्या झुळकेने शौनकच्या डायरीचं पान उडालं, ते नेमकं दिगंतने पाहिलं.
“अरे तू अजून लिहिलयंस, मग हे का नाही वाचलंस?”
“जाऊदे रे, झालंय माझं” शौनकने ते लिहिलेलं पान हाताने झाकून म्हटलं.
“अरे असं कसं, पूर्ण सत्य नको का?” दिगंत पिच्छा सोडणार्यातला नव्हता. मीरा आणि अवनीलासुद्धा आता काय लिहिलं आहे, आणि झाकलं आहे याची उत्सुकता होती. किती विचित्र आहे ना मनुष्य स्वभाव. काही समोर ठेवा, वाचायला सांगा, कोणी ढुंकून बघणार नाही. पण तेच झाकून ठेवा, लपवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला ते काय आहे ते बघायला उत्साह असेल. शेवटी वैतागून शौनकने “घे तूच वाच” म्हणून डायरी दिगंतकडे ढकलली. दिगंत मोठ्याने वाचू लागला.

दोन आठवड्यांपूर्वी ती बाई नवर्याबरोबर क्लिनिकला आली. पस्तिशीची, साधारण सुखवस्तू कुटुंबातली. ते मूळचे नागपूरचे होते. नवर्याच्या नोकरीनिमित्त गेली दहा वर्ष मुंबईत. तिला पित्ताशयाचा त्रास होता. लक्षणांवरून खडे झाले असावेत असं वाटत होतं. मीच तिला तपासलं. आणखी काही टेस्ट्स करून लिहून दिल्या. एका आठवड्याने जेव्हा ते आले तेव्हा शाळेला सुट्टी होती म्हणून त्यांची मुलंसुद्धा सोबत आली होती. सात आठ वर्षांची असावीत दोघंही. रिपोर्टमधे अपेक्षेप्रमाणेच पित्ताशयात खडे आहेत असं दिसत होतं. पिताशय काढून टाकणं हाच खात्रीलायक उपाय असतो. एक नॉर्मल ऑपरेशन असतं. आम्ही अगदी नेहमी करतो. मी त्यांना ऑपरेशन करून घ्यावं लागेल असं सांगितलं.

“उद्या संध्याकाळी अॅडमिट झालात तर परवा, बुधवारी सकाळी करून टाकू. गुरुवारी घरी जाता येईल.” मी सांगितलं. पण नेमका बुधवारी तिच्या मुलाचा स्कॉलरशिपचा क्लास होता, गुरुवारी मुलीची पेरंट मीटिंग होती. शेवटी बुधवार ऐवजी शुक्रवारच्या लिस्टला तिला घ्यायचं ठरलं.
गुरुवारी संध्याकाळी ती अॅडमिट झाली. शुक्रवारी दुपारी शेवटची केस, तिचं ऑपरेशन सुरु झालं. डॉ. धिंग्रा ऑपरेटिंग सर्जन होते. मी असिस्ट करत होतो. डॉ. धिंग्रा हे एक नामवंत सर्जन आहेत. त्यांनी हे ऑपरेशन आधी पन्नासेक वेळा केलेलं मीच पाहिलं आहे. सगळं सुरळीत चालू होतं आणि अगदी अचानक, ऑपरेशन टेबलवर ती बाई शॉकमधे गेली. शॉक म्हणजे शरीराच्या सिस्टीम्स अचानक बंद पडणं. हृदय काम करायचं थांबलं. पल्स ड्रॉप झाला. रक्तातलं इलेक्ट्रोलाईट्सचं प्रमाण बिघडलं. केसची पार्श्वभूमी पाहता असं होण्याचं काहीच कारण नव्हतं. डॉ. धिंग्रानी ताबडतोब पेशंटला रिसासिटेट करायला घेतलं. अनास्थेटिस्टने त्यांच्या बाजूने सारे प्रयत्न केले. पण सगळं व्यर्थ! कोणाचीही काहीही चूक नव्हती. सगळं बिनचूक असताना, काहीही कारणाशिवाय एक आयुष्य माझ्या डोळ्यासमोर संपून गेलं होतं ! मुलाचा क्लास बुडू नये, मुलीची पेरंट मीटिंग बुडू नये म्हणून हॉस्पिटललाही न जाणारी ती, अचानक सगळा खेळ उधळून निघून गेली होती. ऑपरेशन टेबलवर कधीतरी अचानक पेशंट असा शॉकमधे जाऊ शकतो हे मी पुस्तकात वाचलं होतं पण ते अनुभवताना त्याचं इतकं दुःख होईल हे पुस्तकात लिहिलं नव्हतं! डॉ. धिंग्राही नक्कीच अपसेट झाले होते. मला पेशंटला क्लोज करायला सांगून ते निघून गेले. ते बहुतेक डॉक्टर्स रूम मधे जाऊन एकटेच बसले असावेत. कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतं. मी त्या बॉडीचं अॅबडोमेन (पोट) पुन्हा शिवलं. अंगावरचा हिरवा सर्जिकल गाऊन काढून बिनमधे टाकला आणि ऑपरेशन थीएटरचं दार उघडून बाहेर आलो.

समोरच तिची वाट पाहणारे ते तिघे मला दिसले. नवरा आणि दोन मुलं. तिचा नवरा मुलीला पुस्तकातून काहीतरी वाचून दाखवत होता. मुलगा मोबाईलवर खेळत होता. हे असं काही होईल याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. मला बघताच तो चटकन उठून माझ्याकडे आला. “झालं ऑपरेशन डॉक्टर? कधी बाहेर आणणार?” त्याने अधीर होऊन मला विचारलं. माझे शब्द थिजले होते. मी हॉस्पिटलमधे मृत्यू बघितले आहेत. पण हे असं अचानक बेसावध क्षणी मृत्यूने गाठलं की आपण हरलो असं वाटतं. त्याच्या प्रश्नाला मी काय उत्तर देणार होतो! हॉस्पिटलच्या प्रोटोकॉल प्रमाणे ऑपरेशन करणारा मेन सर्जन अश्या वाईट बातम्या पेशंट्सच्या नातेवाईकांना देतो. “डॉ. धिंग्रा तुमच्याशी येऊन बोलतील. तुम्ही मदतीसाठी कोणा नातेवाईकांना बोलावून घ्या” असं सांगून मी निघालो.

शौनकचा अनुभव संपला होता. ते सगळं पुन्हा आठवून त्याचा चेहरा दुःखाने पिळवटला होता. काही क्षण सगळे शांतच राहिले. शेवटी “सगळं किती uncertain आहे ना” असं म्हणून अवनीने शांततेचा भंग केला. दिगंत आणि मीराने मान हलवून तिच्या म्हणण्याला मूक अनुमोदन दिलं.

“मीरा तुला सांगायचाय का तुझा अनुभव?” दिगंतने मीराला विचारलं.

“मी वाचते पण माझी गोष्ट तुमच्या सारखी intense नाही. माझं आयुष्य एकदम साधं सरळ आहे. मी कधी थापाही मारत नव्हते त्यामुळे मला काही विशेष फरक पडला नाही. मीराने आधीच सांगून टाकलं.

“वाच तू. आपण आपले अनुभव शेअर करतोय. ही काही स्पर्धा नाहीये. आपल्या दैनंदिन आयुष्यात, लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत सत्याचं स्थान काय आहे हेच बघायचंय आपल्याला” दिगंतने तिला समजावलं.

अबोली फुलांची वही उघडून मीरा बोलू लागली.

“आज ताई आणि आमचं छोटूसं बाळ ताईच्या सासरी परत गेले. दोन आठवडे तिथे आणि मग अमेरिकेला ताईच्या घरी. गेले काही महिने ताईच्या आणि बाळाच्या घरी असण्याची इतकी सवय झालीये. आता घर खायला उठेल. आज दुपारीच प्रशांतजीजू अमेरिकेहून आले. संध्याकाळी ते घरी येणार म्हणून ताई किती खूष होती. नटून थटून तयार झाली होती. इतक्यात बाळ रडू लागलं म्हणून तिने त्याला पदराखाली घेतलं. नटून तयार झालेल्या तिने मला विचारलं, “कशी दिसतेय मी?”. “कळायच्याही आत मी उत्तर दिलं “खूप खूप गोड!” बाळंतपणाआधी ताई चवळीच्या शेंगेसारखी होती. आता तिचं वजन थोडं वाढलंय. बाळंतपणामुळे ती थकली आहे, चेहरा उतरला आहे, बाळामुळे जागरणं करून तिचे डोळे थकले आहेत. पण ती जेव्हा बाळाला जवळ घेते, त्याला आंजारते, गोंजारते, त्याचे लाड करते, तेव्हा ती पिकासोच्या चित्रासारखी मला वाटते. Flawless, परिपूर्ण! सौंदर्याची नेमकी व्याख्या काय? जे डोळ्याला आनंद देतं ते की जे मनाला आनंद देतं ते?

आम्हांला दोघींनाही तयार झाल्यावर एकमेकींना “कशी दिसतेय मी?” म्हणून विचारायची सवय आहे. समोर आरसा असताना, त्यात आपल्याला दिसत असतानाही समोरच्याला विचारण्याचा हा वेडेपणा कसला! आपल्याला माहीत असलेली गोष्टसुद्धा समोरच्याच्या तोंडून ऐकणं किती सुखाचं असतं ना!”

एवढं म्हणून मीराने शौनककडे एक चोरटा कटाक्ष टाकला, दिगंत आणि अवनीच्याही नजरेतून ते सुटलं नाही. मीरा पुढे वाचू लागली.
“काल शाळेच्या स्टाफ रूम मधे बसले होते. मिसेस गुप्ते आठवीचा गणिताचा तास घेऊन आल्या होत्या. त्या वर्गात एक मुलगा गणितात कच्चा आहे. त्या सारख्या अश्या मठ्ठ मुलांना शिकवून काय उपयोग असं म्हणत होत्या. मी थोडा वेळ ऐकून घेतलं. शेवटी त्यांनी मलाच विचारलं, “अश्या मठ्ठ मुलांना शिकवण्यात आपला वेळ घालवायचा म्हणजे आपला वेळ वायाच की नाही?” आधीच मला त्यांच्या सारखं त्या मुलाला मठ्ठ म्हणण्याचा राग येत होता. त्यात आपलं चॅलेंज. मग मी त्यांना म्हटलं, “मिसेस गुप्ते मला तुमचं म्हणणं बरोबर नाही वाटत. एखाद्याला गणितात गती नसेल म्हणून त्याला सरसकट मठ्ठ असं लेबल लावणं मला चुकीचं वाटतं. आणि अश्यांना शिकवण्यातच तर शिक्षकांचा कस लागतो ना. बाकीचे तर काय, एरवीही शिकणारच आहेत.” मिसेस गुप्तेंचं तोंड इतकं उतरलं. मग मलाच वाईट वाटलं. मी त्याना म्हणाले की तुम्हांलासुद्धा इतक्या वेळात इतका पोर्शन करून घ्यावा लागतो हे समजतं मला. तुम्ही प्रिन्सिपल मॅडमशी याबद्दल बोलत का नाही? त्या आणि इतर अश्या मुलांसाठी काही वेगळी पद्धत किंवा वेगळा काही वेळ काढणं शक्य आहे का ते एकदा प्रिन्सिपल मॅडमशबरोबर बोलून पहा. एव्हाना बाकी शिक्षकही आमच्या संभाषणात सहभागी झाले होते. काहींनी नाकं मुरडली पण काहींना मात्र पटलेलं दिसलं.”

“मीरा, Don’t mind पण हे उदाहरण सत्य असत्य पेक्षा assertiveness, आपलं म्हणणं ठामपणे मांडण्याबद्दल आहे, नाही का?” शौनकने शंका काढली.
“असेलही” गोंधळलेल्या मीराने उत्तर दिलं.
“नाही शौनक, आपलं मत समोरच्याच्या विरुद्ध असताना, हो ला हो न करता, आपलं मत मांडणं हेसुद्धा ‘आपल्या’ सत्याशी प्रामाणिक रहाणंच आहे” दिगंतने मीराची बाजू उचलून धरली.
“Totally!! And on that note, शौनक, आपल्या मनात वेगळं फीलिंग असताना, गरज पडल्यावरसुद्धा त्याचा उच्चार न करणं म्हणजे असत्य वागणं आहे.” अवनीने शौनकला सुनावलं.
“ओके, ओके. point taken. सॉरी मीरा. सगळे तुझीच बाजू घेणारे आहेत इथे! वाच तू पुढे”

ताई गेल्यापासून आई बाबांनी पुन्हा माझ्यावर लक्ष फोकस केलं आहे. घरात माझ्या लग्नावरून पुन्हा वाद चालू झालेयत. मालती मावशीने तिच्या नात्यातला कुणीतरी अमेरिकेचा मुलगा पाहिलाय. ताईच्या घराच्या जवळच रहातो तो. त्याचा नंबरही तिने आईला दिलाय. आई माझ्या मागे लागलीये त्याच्याशी बोलायला. माझ्या मोबाईलवर दोन तीनदा त्याचा फोन येऊन गेला. मी उचललाच नाही. मावशीने ते आईला सांगितलं असावं. मी नाहीच म्हणत्येय म्हणून शेवटी चिडून आईने मला विचारलं, “तुला काय प्रेमबीम झालंय का कोणाशी? सगळ्यांनाच नाही म्हणत्येस ती!” मी काय सांगणार! मौनम् सर्वार्थ साधनम्. पुढचे तीन तास मी दाराला कडी लावून माझ्या खोलीतच बसून राहिले.”

आता तरी शौनक काही बोलेल या अपेक्षेने अवनी आणि दिगंतने त्याच्याकडे पाहिलं. नजरा नजर टाळण्यासाठी शौनक खाली मान घालून राहिला होता. एक विचित्र शांतता टेबलवर पसरली होती. इतक्यात नेमका मीराचा फोन वाजला.

क्रमशः
डॉ. माधुरी ठाकुर
https://drmadhurithakur.blogspot.co.uk/

Group content visibility: 
Use group defaults

Back to top