प्रेरणादायी ठरलेली वाईट सवय

Submitted by मोक्षू on 10 August, 2017 - 04:39

मी लग्न करून घरी आले तेव्हा आमच्या कुटुंबात मी धरून सातजण होते.खरंतर मला घरकामाची फारशी सवय नव्हती.पण काम तर सगळेच करावे लागायचे.दिवसभर किचनमधे काम करून करून रात्रीसुद्धा झोपेत माझ्या डोक्यात तेच विचार असायचे.
मला रात्री झोपेत बोलायची वाईट सवय होती.म्हणजे आताही आहे पण बर्याच अंशी कमी झाली आहे.तर या सवयीमुळे लग्न झाल्यवर नवर्याला मी खूप त्रास दिलाय.दिवसभर मी स्वयंपाकघरात रहायचे आणि रात्री त्याला पोळी देऊ का?भाजी वाढू का ? असे विचारायची.सकाळी उठल्यावर मात्र तो मला जाम चिडवायचा.एक दिवस मी त्याला रात्री २ वा.फिरायला चल म्हणाले होते असं तो सांगतो.
मी वर्षभर नवर्याचं चिडवणं सहन केलं आणि लग्नाच्या वाढदिवशी एक कविता बनवून त्याला ऐकवली.तेव्हा मात्र तो जाम खूष झाला.कविता विनोदी आहे तेव्हा म्हटलं मायबोलीवरच्या लिखाणाचा श्रीगणेशा त्या कवितेनेच करावा.
दिवस कसे भूर्रकन उडून गेले
लग्नाला चक्क एक वर्ष झाले
लग्नापूर्वी होती वेगळीच हूरहूर
लग्नानंतर सुरू झाली नवरा-बायकोची कुरबूर
एकाने रूसायचे दुसर्याने मनवायचे
ह्रदयात मात्र प्रेमाचे पाट वाहायचे
बायकोचे प्रेम रात्री तीन वाजता जागायचे
नवर्याला प्रेमाने पोळी देऊ पहायचे
नवरा निघाला भलताच हौशी
बायकोला म्हणाला,"दे पोळी एकदाची"
तेव्हापासून बायको सावध झाली
रात्रीच्या स्वयंपाकाला सुट्टीच दिली
नवरा तिला म्हणाला,"चल जाऊ फिरायला"
बाईसाहेबांना झोपेत फिरायचा चान्सच मिळाला
रात्री २ वाजता चटकन बसली गाडीत
"कुठे जायचं आपण ?"म्हणाली ऐटीत
नवरा होता बडबडा बायको बिचारी साधी
तो बोलायचा नेहमीच, ती बोलायची रात्री कधीमधी
झोपेत बोलण्यावरून नवरा बायकोला चिडवायचा फार
त्याच्या चिडवण्यामुळेच तर घेतलाय या कवितेने आकार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित,एक मजेदार गोष्ट म्हणजे या कवितेतला शब्दन् शब्द खरा आहे.माझ्या नवर्याने अगदी हेच शब्द वापरले अन् मी खाडकन जागी झाले....हा हा हा.....

छान आहे. सवय आणि कविता. दोन्ही...

आमच्या बिल्डींगमधील एका मुलाला ही झोपेत बोलायची सवय होती. एकदा आम्ही बिल्डींगचे पोरे पिकनिकला गेलो होतो. आणि तो झोपेत बोलायला लागला..... दर्शू जेवायला वाढ, दर्शू लोणचे घे, दर्शू पाण्याची बाटली दे, .... आणि ही दर्शू त्याच्या शेजारी राहणारी पोरगी होती Lol

दुसरया दिवशी पुर्ण चाळभर... दर्शू जेवायला दे फेमस ! दर्शूचा बाप त्याला हाणणारच होता, पण शेजारधर्म म्हणून सोडला. पण दर्शूने पुन्हा त्यांच्या घराचा ऊंबरठा ओलांडला नाही.