रंग बिलोरी

Submitted by अनन्त्_यात्री on 17 July, 2017 - 04:54

गावाकडच्या मावळतीचे
…….रंग बिलोरी
प्रसन्न पिवळे, गडद गुलाबी
निवांत निळसर, कबरे करडे
पाहून निवती माझे डोळे
…....निब्बर शहरी

प्रसन्न पिवळ्या संध्याकाळी
खेळ अंगणी रंगुनी जावा
दावण तोडुन, आचळ सोडुन
....अचपळ गोऱ्हा
.....पिऊन वारा....
उधळत जावा

गडद गुलाबी संध्याकाळी
शुक्र जरासा तेजाळावा
उडता उडता पुन्हा थव्याची
......... मोडुन नक्षी...
.........चुकार पक्षी......
उतरून यावा

निवांत निळसर संध्याकाळी
फड गप्पांचा मस्त जमावा
सळसळ रोखून वृद्ध वडाने
........टाळीसाठी........
.......पारंबीला.......
झोका द्यावा

कबऱ्या करड्या संध्याकाळी
धूसर ढग ओथंबुन यावा
पायतळीच्या वाटेवरचा
.......भिरभिरणारा.......
........एक काजवा.......
लखलख व्हावा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली रचना
मायबोलीवर स्वागत असो. Happy

वा वा!

Mast!

अहाहा. किती सुंदर !
त्या पहिल्या कडव्याचा फॉर्मॅट आणि यमक मुद्दाम वेगळे का आहे? तेही छान आहे पण बाकीच्या कडव्यांशी जुळत नाहीये.

सन्तोष किल्लेदार, प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
पहिल्या कडव्याचा फॉर्मॅट आणि यमक मुद्दाम वेगळे रचले आहे.

Pages