एका धावकाचे (म्हणजे माझेच :P ) ‘मैत्री’ खातर आवाहन

Submitted by हर्पेन on 22 May, 2017 - 11:39

एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन

मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.

माझ्या धावण्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या प्रवासाला मायबोली साक्षी आहे. तसेच माझ्या मेळघाटातल्या अनुभव लिखाणाबरोबर ‘मैत्री’ ला मदत करा अशा केलेल्या आवाहनाला देखील अनेक मायबोलीकर कायमच प्रतिसाद देत आले आहेत. काही मायबोलीकरांनी तर मेळघाटात प्रत्यक्ष जावून स्वयंसेवक म्हणूनही काम केले.

आता ह्या दोन्हीचा इथे / परस्परांशी काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. तर तो संबंध असा.

मी आता यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लदाख येथे होणाऱ्या खारदुंग ला चेलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची आहे.

अधिक माहीती http://ladakhmarathon.com/races/khardung-la-challenge/

तसे पाहता मी आजवर चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा अशा शर्यती पार पाडल्या आहेत. पण तरीही ही अल्ट्रा माझ्याकरता खरोखरच मोठे आव्हान आहे.

मी माझ्या परीने सगळ्याप्रकारची तयारी चालू केल्ये. रजा मिळवून झाल्ये, जाण्यायेण्याची तिकीटे काढून झालेली आहेत. वेळापत्रकानुसार धावणे सुरु केले आहे. ( मागच्या आठवड्या पर्यंत सरासरी ६० ते ७० किमी धावणे करत होतो ह्या आठवड्यातले ध्येय एकूण १०० किमी आहे)

इतक्यातच 'मैत्री' संस्थेला त्यांचे मेळघाटातील उपक्रम चालू ठेवण्याकरता निधी कमी पडतोय अशी बातमी कळली. त्यामुळे मी ही स्पर्धा मैत्री संस्थेच्या कार्याला समर्पित करायचे ठरवले आहे आणि माझी अशी आकांक्षा / संकल्प आहे की या तीन-चार महिन्यात ‘मैत्री’ च्या मेळघाटातील कामाकरता किमान १००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे.

मैत्री संस्थेचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असले ल्या नागरिकांचे एका चांगल्या कामाकरता एकत्र येणे आणि तब्बल वीस वर्षे ते काम चालू ठेवणे. फक्त अडीच माणसे सोडली तर बाकी सर्व जण मैत्रीकरता काम विनामुल्य / स्वयंसेवा म्हणून करतात. ओव्हरहेड जवळ जवळ नाहीच. मेळघाटातल्या लोकांना औषधे सोडली तर वैयक्तिक वापराच्या कुठल्याही वस्तू फुकट वाटत नाहीत. सामुहिक वापराकरता सोलर वर चालणारा पंप आणि पाण्याची टाकी बसवून दिली पण त्याची देखभाल स्थानिक रहिवाश्यांकडून वर्गणी काढून केली जाते. स्थानिक लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. शाळा चालाव्यात म्हणून शैक्षणिक साहित्य दिले जाते. सध्या चालू असलेल्या योजनांचा ही सगळा भर कौशल्ये विकास (skill buildng/ development), व्यवसाय निर्मिती व उद्योजकता, सरकारी योजनांविषयी माहिती व पाठपुरावा, सेंद्रिय व पारंपारिक शेतीमधून उत्पादकता वाढवणे अशा कार्यक्रमांवर आहे.
अधिक माहीती करता - http://www.maitripune.net/Home.html

मी स्वतः काही वेळा काही दिवसांकरता मेळघाटात स्वयंसेवक म्हणून जाऊन आलो आहे.

तर अशा 'मैत्री' खातर ज्यांना जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे, यथाशक्ती यथामती जी काही रक्कम देउ करायची असेल ती मैत्रीच्या खात्यावर परस्पर जमा करावी अशी मी विनंती करतो.

देणगी: “मैत्री” या नावाने चेक / रोख देणगी म्हणून देता येईल.
“मैत्री”साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

जे कोणी जी काही रक्कम जमा करेल त्यांनी इथे तसे कळवावे. जर कोणाला स्वत:चा नामोल्लेख नको असेल तर त्यांनी मला तसे संपर्कातून (९८८११५२८८४) कळवल्यास त्यांनी दिलेली रक्कम अनामिक देणगीदाराकडून म्हणून नमूद करण्यात येईल. रक्कम परस्परच जमा करायची आहे मात्र केली की इथे जरूर कळवा. तसेच मी 'खारदुंग ला' करता करत असलेल्या तयारीबद्दलही वेळोवेळी इकडे कळवत राहीनच पण असे (मनोरंजन मुल्य नसलेले) धागे लगेच मागे जातात म्हणून वेळोवेळी मला शुभेच्छा देत राहून ह्या धाग्याला वर आणत रहा. कृपया धन्यवाद Happy

आठवडा पहिला - देणगीदार ६ - जमा झालेली रक्कम रुपये ३२००१/-
आठवडा दुसरा - देणगीदार ७ - जमा झालेली रक्कम रुपये ११६१२/-
आठवडा तिसरा - देणगीदार ४ - जमा झालेली रक्कम रुपये ५०००/-
आठवडा चौथा - देणगीदार ६ जमा झालेली रक्कम रुपये १०००१/-
आठवडा पाचवा - देणगीदार ४ जमा झालेली रक्कम रुपये १००००/-
आठवडा सहावा - 'जैसे थे' परिस्थिती
आठवडा सातवा - देणगीदार १६ जमा झालेली रक्कम रुपये २२५००/- एकूण (४३/७२) (९२११४/- /७२०००/-)
आठवडा आठवा चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज प्लॅन नुसार धावायचे होते पण काही कारणास्तव धावू शकलो नाही.

तसेच मागच्या आठवड्यात कोणीही पैसे जमा केले नाहीत.

काय झाल रे, तब्येत ठीक आहे ना?

बा द वे- तु पुण्यातुन किती तारखेला निघणार आहेस, त्या आधी फेरी झाली तर तुला पळण्यास कुंपणी द्यायला (पहिले २-३ किमीच) येईन मी

धन्यवाद आदित्य, तब्येत व्यवस्थित आहे.
मी लेहला २९ - ३० ऑगस्टला जाणार आहे. त्याआधी तुझे येणे होणार असेल तर आपण नक्की एकत्र धावूया.

मंजूताई धन्यवाद.

आज १० किमी धावलो. तळजाई टेकडी वर गेलो होतो. मजा आली. वातावरण मस्त होते.

VB धन्यवाद Happy

आज नाही धावलो. आजचा दिवस आरामाचा.
हा आठवडाच मुळी रिकव्हरीचा आहे.
मागच्या सलग तीन शनिवार रविवारच्या चार आणि तीन तास धावण्यानंतर उद्या अडीच तास आणि परवा दोन तास धावायचे आहे.
मग परत पुढच्या विकांता पासून तासांमधे वाढ होईल.

आज ३१किमी चार तास लावून पार केले.
खडी मशीन चौकातून सासवडकडे जाणार्‍या रस्त्यापासून बोपदेवघाट मार्गाने कानिफनाथ वरपर्यंत जाऊन आलो.
वातावरण खूप मस्त होतं.

आज दोन तासात २० किमी धावलो. नेहेमीचाच मार्ग होता.

धन्यवाद अन्जू. अजून एक फोटो आहे शेतातून येताना काढलेला, टाकायला जमले नाहीये. पण शेतात ओळीने पेरणी केलेल्या बियांमधून उगवलेली अगदी बारीक रोपे किंवा अंकूरच म्हणूया एकदम नवजात. इतकी भारी पॉसिटिव्ह एनर्जी होती तिथे. मनाचे खेळ असतील एखादवेळी पण खूपच अद्भूत जादूई वातावरण Happy

खडी मशीन चौकातून सासवडकडे जाणार्या
बोपदेवघाट मार्गाने कानिफनाथ वरपर्यंत >>>>> कमाल !!!!
फोटो पण मस्त आहेत
लगे रहो च्या चालीवर
हर्पेनभाउ आप धावते रहो, हम तुम्हारे (वाचनमात्र) साथ हय

आज धावलो नाही. अर्धा तास स्ट्रेचिंग सदृष्य योगासने केली.
ह्या आठवड्यात बरेच देणगीदार मिळाले. लवकरच इथे कळवतो.

तर मंडळी, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की मागच्या आठवड्यात एकूण सोळाजणांनी मिळून मैत्रीच्या खात्यावर रुपये २२,५००/- जमा केले आहेत. ५०००/- च्या दोन देणग्या, २०००/- ची एक देणगी, १०००च्या आठ देणग्या आणि पाचशे रुपयांच्या पाच अशा प्रकारे ही रक्कम जमा झालेली आहे.

एकूण देणगीदारांची संख्या आता ४३ वर पोचली आहे.
एकूण देणगी रक्कम ९२,११४/- रुपये झालेली आहे.

धन्यवाद नंद्या, madya

दररोज पुर्ण वेळ सोबत असतेच असे नाही. असलेली सोबत माझ्या इतके अंतर धावणारी, माझ्या गतीने धावणारी असतेच असे नाही किंबहुना नसतेच मग अशावेळी एकट्याने धावायचा कंटाळा येतो. मग अरे बापरे इतके धावायचे आहे असे वाटून नाही म्हटले तरी जरा ताण येतोच पण मग इथल्या प्रतिक्रिया, सदिच्छा आठवल्या की हुरुप येतो, हलकं वाटतं. शेवटी Its a step at a time असं सांगतो स्वतःला आणि धावणं चालू ठेवतो.

बाकी एकटे असलो की होणारा मनाचा मनाशी संवाद / झगडा आपणच एक त्रयस्थ म्हणून बघणे फार मनोरंजक असते

बाकी एकटे असलो की होणारा मनाचा मनाशी संवाद / झगडा आपणच एक त्रयस्थ म्हणून बघणे फार मनोरंजक असते >>> हे भारी मस्त.

मस्त चालू आहे सराव! मला पडलेला प्रश्न -
Elevation वर पळण्याचा सराव कसा करणार? त्यासाठी काही प्लॅन आहे का?

जिज्ञासा, एलेव्हेशन म्हणजे हाय अल्टीट्युड म्हणत असशील तर त्या करता इथला सराव कायमच अपुराच त्यावर उपाय म्हणजे अक्लेमटायसेशन करता किमान १०-१५ दिवस अगोदर लेह लडाख मधे डेरेदाखल होणे.

पण एलेव्हेशन म्हणजे उंची म्हणत असशील तर पुण्याच्या आसपास सिंहगड, लव्हासा ई. रूट्स कामाला येतात. मुंबईत रहाणार्‍या एका डॉक्टरांच्या ब्लॉग मधे त्यांनी ३० -४० मजली इमारतीच्या पायर्‍या चढउतार करायचा सराव केल्याचा उल्लेख आहे.

झालंच तर हाय अल्टीट्युड म्हणजे विरळ हवा / कमी ऑक्सीजन ची सवय व्हावी ह्याकरता मास्क मिळतात. मी एकदा त्याबद्दल विचारही केला होता पण त्यांच्या वापरामुळे उपयोग होतो की नाही यावर नेट वर बरीच मतमतांतरे आहेत. माझ्या ओळखीतल्या कोणीही ते प्रत्य्क्ष वापरलेले नाही. तसेच तो मास्क भारताबाहेरून मागवावा लागतो त्याची किंमत आणि यायला लागणारा वेळ पाहता मी तो विचार रद्द केला.

हर्षद खूप खूप शुभेच्छा !!!! तुझ्या पोस्ट वाचून व्यायाम करायला सकाळी उठायला हुरूप येतो Happy

मुंबईत रहाणार्‍या एका डॉक्टरांच्या ब्लॉग मधे त्यांनी ३० -४० मजली इमारतीच्या पायर्‍या चढउतार करायचा सराव केल्याचा उल्लेख आहे.
>
हे इथे अमेरिकेतील रनिंग ग्रुप्समध्ये बरेच कॉमन आहे. आठवड्यातल्या एखाद्या दिवशी स्टेडियमच्या पायर्‍यांवर असा सराव करतात. मी ऐकून आहे की हा जिन्यांवर पळण्याचा सराव सर्वात जास्त दमवतो.

Pages