’डेड एंड’
"पुढे डेड एंड आहे बाई. रस्ता नाही."
माझ्या प्रश्नाला असं नेमकं आणि थोडक्यात मोघम उत्तर देउन तो इसम चालता झाला. तरिही त्याला पाठमोरं जाताना गाडीच्या ’रिअर मिरर’ मध्ये बघत मी काही क्षण तिथंच रेंगाळण्याला खरंतर काहिच अर्थ नव्हता. ’डेड एंड’ हा शब्द मनाशी बराच काळ घोकत राहण्यालाही काही अर्थ नव्हता. खरंतर... कशालाच काही अर्थ राहिलेला नसताना माझ्या अश्या अर्थहीन क्षुल्लक कृतींची मीच आवर्जून दखल घेण्यालाही काहीच अर्थ नव्हता. तरिही... मस्त वाटू लागलं एकदम. एकदम प्रसन्न... छान. खूप खूप आनंद सगळीकडे. हिरवागार... निळाशार... आनंदीआनंद!!!
मग स्वत:च स्वत:ला मोकळं सोडून दिल्यासारखी मी त्या डांबरी रस्त्यावरून तरंगत तरंगत गाडी चालवत पुढे सरकत राहिले. जसजशी पुढे सरकत होते... ते दोन शब्द मनाला गमतीशीर अलवार घेरत होते...! ’डेड एंड’! हा रस्ता कुठेतरी जाऊन संपणार आहे! ’संपणार’ आहे!! नक्की!! वॉव!!
ही जाणिव... ती कल्पना... त्या क्षणी इतकी सुंदर अनुपम वाटली मला... कसं सांगू? अगदी मानव्यतेच्या सगळ्या शक्यतांच्या पलिकडचं काहितरी. अमानवीय... अमानुष! असा आनंद... आजवर कधीही अनुभवला नाही असा. संतांना नाही का साक्षात्कार वगैरे झाल्यावर होतो... तसा. तेवढाच. आनंदाचे डोही आनंद तरंग....!
मग मी गाडी त्या निमुळत्या होत जाणार्या रस्त्याच्या कडेला घेतली आणि थांबवली. नजरेसमोर पायघड्यांसारखा पसरलेला तो काळा कुळकुळीत एकाकी रस्ता काही काळ नुस्तीच न्याहाळत राहिले. मनात नक्की काय काय उलथापालथी घडत होत्या.... त्या उत्पाताकडे त्याक्षणी बघावंसंही वाटेना. काहितरी नेहमीचंच तुकड्या-तुकड्यातलं थिल्लर काही उगवत मावळत असणार आत. मी चक्क दुर्लक्ष केलं. करू शकले. अगदी सहज. गंमत आहे की नाही?
मग हातातली बॉटल ओठांना लावून ती उबट झालेली वाईन मी २-३ घोट अलगद प्यायले. घशा-काळजाला जळजळीत चटका देत ती वाईन पोटात शिरेपर्यंत उगाचच कित्येक मैलांचा आणि युगांचा प्रवास घडल्यासारखं वाटलं. मात्र अखेर... ’डेड एंड’! येस्स.
आठवतंय मला. डोळे किंचित जडावल्यासारखे झाले होते. पापण्यांवर त्यांच्या क्षमतेपेक्षा जरा जास्तच ओझं पडल्यासारखे.
ओझं.... वाईनमुळे आलेल्या धुंदीचं? आत आत दडपलेल्या स्मृतींचं? भूतकाळाचं? आठवणींचं? स्वप्नांचं? त्या क्षणाच्या त्या अवर्णनीय आनंदाचं? साक्षात्कारानं दिपून गेलेल्या माझ्याच अंतर्मनाचं...? जे दिसत नाही त्याचं... की जे दिसतं आहे त्याचं?
मग मी बॉटल गाडीतच ठेऊन गाडीतून बाहेर पडले. गाडी लॉक केली की नाही ते आठवत नाही. दार लावून सरळ चालू लागले. आनंदाच्या डोहातल्या आनंदतरंगांवर तरंगत तरंगत....
डोळे जडावलेले असले तरी मी संपूर्ण शुद्धित होते. नक्की आठवतंय मला. चालायला सुरुवात करतानाच खांद्यावर भिरभिरत पडलेलं पिवळ्या गुलमोहराचं पिवळंजर्द फुल सुद्धा स्पष्ट आठवतंय. इतकी प्रसन्न हसले मी त्या निरागस फुलाला पाहून! माझ्याच शरिराला दोन तीन ठिकाणी घसट करून ते जमिनीशी पोहोचताना पाहिलं त्याला मी अगदी निरखून. एकाच जागी स्तब्ध थांबून. पुन्हा जणू काही मैल प्रवास त्या नाजूकश्या फुलाचा..... मी लहान असल्यापासून ही फुलं अशीच आमच्या अंगणाशेजारच्या झाडाच्या उंचच उंच शेंड्यावरून पार पायथ्याशी मातीशी पोहोचतात. पिवळाजर्द गालिचा आमच्या पडवीत. मग तिथून मातीच्या आतून मुरत, झिरपत, सरपटत, रांगत ती फुलं पुन्हा चढायची झाडाच्या उंच उंच फांद्यांवर, शेंड्यांवर. आणि पुन्हा एखाद्या वार्याच्या झुळुकीवर अलवार बसून भिरभिर तरंगत यायची खाली जमिनीवर. मग पुन्हा असाच प्रवास अविरत... शतकानुशतके! आता हे फूल... माझ्या खांद्याला, दंडाला खेटून रस्त्यावर पडलेलं... याची या अफाट विश्वचक्राला ही नक्की कितवी प्रदक्षिणा असेल? असं कधीपासून चालू आहे? कुठपर्यंत चालेल? Where is the end of it?
मग?
मग मी निघाले तडक चालत. चालायचा वेग काही आठवत नाही. मात्र मी थांबले नाही हे नक्की. पावलांनी सुंदर ठेका धरलेला. तालात सुरात... मी गाणंच झाले होते जणू. त्या ठेक्याच्या नादात धुंदावून मी त्याच्या दिशेनं वहात राहिले. मला भेटायचे होते त्याला.... ’डेड एंड’! ती ओढ... ती हाक... अंताची!
___________
"आजचं सेशन फारच छान झालं मिस्टर अंशूमन."
डॉक्टर सामंतांच्या चेहर्यावरचं समाधानी हासू पाहून अंशूमन जरासा खुलला.
"म्हणजे... काही सांगितलं का तिनं?"
"सांगितलं नाही... बोलली. फरक असतो त्यात."
"तेच ते..." अंशूमन किंचित चुळबुळला. "काय बोलली ती?"
"तेच हो. आपल्याला माहीत असलेलंच. रस्त्याच्या कडेला गाडी लावून ती चालत गेली वगैरे..."
"म्हणजे?" अंशूमनच्या कपाळावर आठ्या उमटल्या. "अजून काहीच नाही सांगितलं तिनं? ती त्या खाडीत कशासाठी उतरली? मुळात ती तिथे पोचलीच कशी? का? सकाळी कॉलेजला जायला निघालेली ती तिथे इतक्या दूर अनोळखी ठिकाणी कशासाठी गेली? एकटीच? मोबाईल बंद का ठेवलेला तिनं? आणि वाईन?"
"हे बघा मिस्टर अंशूमन..." डॉक्टर सामंत अंशूमनला मधेच थांबवत शांतपणे म्हणाले... "मी एक डॉक्टर आहे. मानसोपचारतज्ञ. मी कुणी investigating officer नाही. मी तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मदत करतोय. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडून काढून घेणं हे माझं काम नाही. तुमची उत्तरं तुम्हालाच शोधावी लागतील. किंवा ती मिळतील पण धीर धरावा लागेल."
अंशूमन काहिसा ओशाळला. सामंतांचं म्हणणं खरं होतं... पण गेले काही दिवस तो दिवसरात्र ज्या प्रश्नांमध्ये पार अडकून गुंतून गेला होता... त्याला त्या प्रश्नांतून सुटका हवी होती. लवकरात लवकर. आजवरच्या त्याच्या सरळसोट सुटसुटीत आयुष्यात त्यानं कधी अशी विचित्र अस्वस्थता अनुभवलेली नव्हती. इतका खोलवर विचार, तर्क वगैरे करत बसण्याची सवयच नव्हती त्याला. हे प्रश्नजंजाळ आणि त्या जंजाळाभोवतीची कलकलाट करत साचून राहिलेली बेचैनी त्याला असह्य होत होती. अन्विताचा रागही येत होता आणि काळजीही वाटत होती. आणि त्याही पलिकडे बरंच काही....
डोक्यावरच्या विरळ होत चाललेल्या करड्या-पांढर्या केसांमधून त्यानं त्याचे दोन्ही हात नांगरासारखे रुतवत मान खाली घातली.
"डॉक्टर... अन्विता पूर्ण बरी कधी होईल?"
मान वर करत अंशूमनने थेट प्रश्न टाकला. त्याच्या लालसर, प्रश्नांकित डोळ्यांत बघत डॉक्टर सामंत शांत हसले.
"तुम्हाला ज्या अवस्थेत ती असायला हवी आहे त्या अवस्थेत ती येईल लवकरच. एवढंच सांगतो." सामंत गूढ हसले. कदाचित स्वत:शीच. "बाकी त्या ’तुम्हाला अपेक्षित’ असलेल्या अवस्थेत माणसं ’बरी असतात’ यावर माझा विश्वास उरलेला नाही आता. असा विश्वास मानसोपचारतज्ञ म्हणून इतकी वर्षे जगलेल्या कुणाचाही उरणं शक्य नाही."
अंशूमनच्या डोळ्यांतील अचाट वाढत जाणारा गोंधळ पाहून डॉक्टर सामंतांनी चट्कन् स्वत:ला सावरले आणि ते पुढे रेलून मोठ्या उत्साहाने बोलू लागले.
"मिस्टर अंशूमन... आज चार दिवस झाले रोज बोलायचा प्रयत्न करतोय मी अन्विताशी. आज पहिल्यांदा ती स्वत:हून बोलली आहे! स्वत:हून! मनमोकळं. Can u understand its importance? ती मोकळं होतेय. तिच्या मनातलं डबकं वाहतं होतंय. त्याच्यातली सगळी घाण गाळ जाईल आता वाहून... आणि स्वच्छ पारदर्शी मन घेउन ती भेटेल तुम्हाला लवकरच. तोवर थोडा धीर धरा. तिला थोडा वेळ द्या. Be patient. तिला कृपया तेच तेच प्रश्न विचारून बिथरवू नका."
"मी 'तुम्हाला' विचारतोय डॉक्टर." अंशूमन काहिसा चिडलाच. "तिला मी काहीच विचारत नाहिये. एवढं कळतं मला. ती आजारी आहे."
डॉक्टर सामंत खुर्चीत मागे रेलता रेलता मोकळं हसले.
"Good. तेच सांगतोय तुम्हाला. Be patient."
थोडावेळ शांततेत गेल्यावर अंशूमनने सामंतांना किंचित कातर आवाजात प्रश्न विचारला...
"डॉक्टर... पुन्हा असं काही करणार नाही ना ती? मुळात असं काही करावं असं का वाटलं तिला? मी कुठं कमी पडलो? सगळं छान चाललं होतं आमचं. आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. जवाबदार्यासुद्धा आता बर्यापैकी आटोक्यात आहेत. माझा व्यवसाय उत्तम चाललेला आहे. काही वर्षांपूर्वी असं नव्हतं. आमचं लग्न झालं तेंव्हा आमची परिस्थिती बेताची... खरंतर हलाखीचीच होती. तशात मी नोकरी सोडून स्वत:चा उद्योग सुरू केला. माझा जम बसेपर्यंत फार हाल झाले. तशात मी घरात मोठा आणि आमचं एकत्र कुटुंब. माझे आई-बाबा, लहान भाऊ आणि बहीण आमच्या सोबतच रहायचे. तश्या त्या अवघड काळातही अन्विताने हाय खाल्ली नाही. मी सोबत नसायचो तिच्या. मी माझ्या उद्योगधंद्यात सदैव गुंतलेला असायचो. माझी घरची आघाडी तिनं एकहाती सांभाळली. तशात ऋजुताचा जन्म झाला. तिलाही वेळ देऊ शकत नव्हतो मी. थकत असेल, निराशही होत असेल अन्विता तेंव्हा. पण असला आत्महत्येचा वगैरे वेडा विचार तिनं मनातही आणला नसेल तेंव्हा याची खात्री आहे. आणि आता सगळं ठिक-ठाक रांगेला लागलं असताना... तिनं असा विचार का करावा डॉक्टर?"
"मला सांगा मिस्टर अंशूमन.." डॉक्टर सामंत गंभिर होत अंशूमनकडे बघत विचारू लागले, "...अन्विता प्राध्यापक आहे ना?"
"हो. अन्विता इतिहासाची प्राध्यापक आहे. युनिव्हर्सिटीतल्या इतिहास विभागाची प्रमुख! हे काम ती गेली कित्येक वर्षे तिची आवड म्हणून करते. मध्यंतरी ऋजुताच्या जन्माच्या वेळी आणि घरातल्या परिस्थितीमुळे पाचेक वर्षे तिला तिचं काम सोडावं लागलं होते. नंतर सगळं सुरळीत झाल्यावर तिनं पुन्हा कामाला सुरुवात करायची असं ठरवलं आणि मीही सपोर्ट केला तिला. मला तिच्या क्षेत्रातलं काहीही कळत नसलं तरी ती मात्र प्रचंड खुष होती तिच्या क्षेत्रात काम करताना हे नक्की! आता तर पीएचडी करायचं मनावर घेतलं होतं तिनं. आणि मीही कधी तिला कशाहीसाठी नाही म्हटलं नाही आजवर. फक्त ऋजुताकडे... आमच्या मुलीकडे दुर्लक्ष होऊ नये एवढंच तिला सांगत आलो. ऋजुता आमची एकुलती एक हुशार छान मुलगी. सात वर्षांची आहे आता. सुदैवाने सुट्टीत समर कॅम्पला गेली होती हे सगळं घडलं तेंव्हा. तिथून तसंच तिला आजोळी पाठवलं आहे आता. घरात मी सोडून कुणालाच या सगळ्या घटनांचा पत्ता नाही डॉक्टर. घरात म्हातारी आई आहे माझी. तिला ऋजूताचं काहीतरी बिनसलंय एवढंच कळतंय. किती दिवस लपून राहणार हे? विचार करून करून डोकं फुटेल असं वाटतं."
"तुमच्यात काही विषयांवरून मतभेद... खटके उडत होते? आय मीन... सगळ्याच जोडप्यांमध्ये असतातच असे विषय."
"हं." अंशूमनने काही क्षण मान खाली घातली आनि पुन्हा वर बघत तो बोलू लागला.
"ऋजूतानंतर दूसरं मूल होऊ न देण्याचा निर्णय सर्वस्वी अन्विताचा होता. आणि मला तो मान्य नव्हता. काही प्रमाणात..."
खालमानेनं काही क्षण थांबून अंशूमननं दिर्घ श्वास घेतला. "आता व्यवस्थित सेटल्ड आहोत आम्ही. दुसर्या बाळाचा विचार करायला हरकत नाही असं वाटत होतं मला. शिवाय आईची इच्छाही होतीच. यावरून खटके उडायचे आमचे अधून मधून. तिला तिच्या क्षेत्रात संशोधन करायचं होतं. त्यात हा नव्या बाळंतपणाचा आणि आईपणाचा व्यत्यय तिला नको होता. पण ते खटके काही फार गंभिर नव्हते डॉक्टर. मी तिच्यावर कसलाही दबाव वगैरे आणणार नव्हतोच."
मग मान वर करून डॉक्टर सामंतांच्या नजरेत त्यानं थेट स्वत:ची नजर मिसळली. त्याचे डोळे तांबडे आणि ओलसर. आणि प्रश्नही तेवढाच हळवा आणि थेट!
"तिला जीव द्यावासा वाटावं असं काय झालं होतं डॉक्टर?"
हा प्रश्न ऐकून सामंत मनापासून हसले. "तुम्ही चुकताय मिस्टर अंशूमन..." कोड्यात पडलेल्या अंशूमनच्या मजेशीर चेहर्याकडे खट्याळ मुलासारखं पहात सामंत त्यांचं ठेवणीतलं मिशितलं हसू ओठांवर आणत बोलले, "...अन्विता जीव-बीव देत नव्हती. तसं काही करणं तिच्या गावी सुद्धा नव्हतं. उदास तर ती मुळीच नव्हती. उलट खूष होती ती. प्रचंड खूष!"
"हं??"
चाळीशीतल्या, मोठ्या कपाळाच्या, खोल डोळ्यांच्या त्या समोर बसलेल्या शरातल्या नामांकित प्रथितयश वगैरे वगैरे असलेल्या बांधकाम व्यावसायिकाकडे बघताना सामंतांना आज मात्र अगदी अजाण, निरागस, केविलवाण्या कोकराकडे बघत असल्यासारखं वाटलं. मन! अखेर मन! एवढ्या थोर भल्या जाणत्या श्रीमंत माणसाचं क्षणात असं माकड होतं! मनाचा महिमा अगाध आहे! सामंत हसले.
"मिस्टर अंशूमन... एक छान गोष्ट सांगतो तुम्हाला. कुठेतरी ऐकलेली आणि आवडलेली. अन्विताच्या निमित्ताने आठवली. तुम्हाला समजेल अशी सांगतो." समोरच्या खोल प्रश्नांकित डोळ्यांत बघत सामंत उत्साहाने बोलू लागले. "एक लहान मुलगी असते बरंका. ती रहात असलेल्या घराच्या खिडकीतून रोज सकाळी तिला समोरच्या टेकडीवर एक छानदार गाव दिसायचं. त्या गावात अनेक घरं. पण त्यातलं एक टुमदार घर तिला फार फार आवडायचं. इतर अनेक घरांसारखंच तेही एक घर... पण त्यात एक तिच्या निरागस मनाला भुरळ घालणारी गंमत होती. ती गंमत म्हणजे त्या घराच्या लखलखित सोनेरी खिडक्या! जणू सोन्याच्याच!"
अंशूमनच्या डोळ्यांतलं कुतुहल पहायला सामंत थोडे थांबले. सवय... मन वाचण्याची.
"ती छोटी मुलगी रोजच पहायची ते सोनेरी खिडक्या असलेलं घर. तिला ते आवडू लागलं. ते घर हवंसं वाटू लागलं. ते सोनेरी खिडक्यांचं घर अहोरात्र तिच्या मस्तकात तिच्यासोबत जिथं तिथं सतत वावरायचं. तिच्याही नकळत ती मनाने त्या घरात जाऊन राहू लागली. त्या घराच्या सोन्याच्या खिडक्या... जवळून कित्ती सुंदर दिसत असतील नै? तिला ते घर जवळून पहावंसं वाटू लागलं. मग तिनं त्या घराबद्दल तिच्या आईला, बाबांना, ताई-दादाला, आजी-आजोबांना विचारलं. पण सोन्याच्या खिडक्या असलेलं घर? छे!!! कसं शक्य आहे? काहीतरी बालकल्पना...! सगळ्यांनी बिचारीला उडवून लावलं.
"एक दिवस मात्र न राहवून त्या सोनेरी खिडक्यांच्या घराचा छडा लावण्यासाठी ती छोटी मुलगी तिच्या एका मैत्रिणीसोबत संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी स्वत:च टेकडीवर पोचली. तिथल्या त्या लहानश्या गावात ते घर तिनं शोध शोध शोधलं. पण नेमकं ते सोनेरी खिडक्यांचं घर काही केल्या तिला सापडेना. सगळ्याच घरांच्या खिडक्या साध्याच होत्या... मग आपल्याला दिसलेलं ते घर? ती निराश झाली. रडकुंडीला आली.
पण तेवढ्यात तिची मैत्रिण चित्कारली.... "ए... ते बघ तिथे... तू म्हणत होतीस ते सोनेरी खिडक्यांचं घर..."
उत्साहाने ती मुलगी वळून बघते तिची मैत्रिण दाखवत असलेल्या दिशेकडे! आणि... तिला दूर पायथ्याशी दिसतं एक सोनेरी खिडक्या असलेलं टुमदार घर. अरेच्च्या... ते तर त्या मुलीचंच घर होतं! पायथ्याशी...! लखलखत्या सोनेरी खिडक्यांचं घर. माझं घर आहे ते... इतकं सुंदर... इतकं छानदार... सोनेरी खिडक्यांचं! आणि तिला आनंद होतो. प्रचंड आनंद."
इथं थांबून सामंतांनी अंशूमनकडे पाहिलं. तो लहान मुलाच्या निरागसतेने त्यांच्याकडे बघत होता. गोष्ट संपली होती... पण तात्पर्य ऐकायला जणू रेंगाळली होती त्याची उत्सुकता. सामंत हसले.
"लक्षात येतंय का मिस्टर अंशूमन? आनंद याचा नाही की सोनेरी खिडक्यांचं घर सापडलं. आनंद याचाही नाही कि तिचंही घर सुंदर आहे, सोनेरी खिडक्यांचं आहे! हा आनंद सत्य समजल्याचा. भ्रम फिटल्याचा. उत्तर सापडल्याचा. शोध संपल्याचा! अहो घराच्या खिडक्या सोनेरी नव्हत्याच कधी! सकाळचा उगवतीचा सूर्यप्रकाश जसा त्या टेकडीवरच्या घराच्या खिडक्यांना सोनसळी करत होता तसाच मावळतीला तो त्या मुलीच्या घराच्या काचाही तेजोमय करित होता."
डोळे तस्सेच निरागस ठेउन अंशूमन उत्तरला... "गोष्ट खरंच खूप छान आहे डॉक्टर... पण अन्विताशी या सगळ्याचा, त्या खिडक्यांचा काय संबंध? अजून जरा सोप्यानं मला समजेल असं सांगता का प्लीज? अन्विता सुद्धा असं काहितरी अगम्य बोलायची मधूनच. मला काहीही कळलं नाही की वैतागायची."
"हं!" सामंतांनी सुस्कारा सोडला.
"सांगेन मिस्टर अंशूमन. मला अजून थोडं स्पष्ट कळू देत. अन्विताशी अजून थोड्या गप्पा होऊ देत. मग तुम्हालाही सगळं तुम्हाला समजेल असं सांगेन. तुर्तास एवढंच लक्षात ठेवा की अन्विता कुठल्याही नैराश्याची शिकार नाही. फक्त काही प्रश्न आहेत जे तिला स्वस्थ बसू देत नाहीयेत. तिला उत्तरांची ओढ लागलीये. तिला कशाचेही depression वगैरे नाही. तेंव्हा तुम्हीही तिच्याशी प्रसन्न वागा. मोकळेपणानं न बिचकता नेहमीसारखं वागा... बोला. Be patient हे विसरू नका. आणि आता तिला घेउन घरी निघा. फार वेळ घेतलात आज माझा. उद्या ५ वाजता तिला घेउन या."
__________________________
"Be patient म्हणे! च्यायला अजून थोडा काळ असाच गेला तर मला स्वत:ला ट्रीटमेट घ्यावी लागेल या सामंताची."
गाडी चालवता चालवता अंशूमन स्वत:शीच पुटपुटत होता. शेजारी बसलेली अन्विता कारच्या बंद काचेतून शांतपणे बाहेर बघत बसली होती. खांद्यावरून छातीवर रुळणारे तिचे किंचित कुरळे बेशिस्त केस. अधून मधून करडे पांढरे झालेले. कानात सोन्याचा एकच नाजूक मणी. फिकट ओठ आणि डोळ्यात शून्य! गेल्या काही दिवसांत अंशूमनच्या चांगल्याच परिचयाचं झालेलं ते शून्य!
She is not depressed! सामंत म्हणतो म्हणजे तसंच असणार. पण मग ही त्या दिवसापासून कायम अशी सुन्न का? बोलत का नाही?
अंशूमन खिडकीतून बाहेर नजर रोवून बसलेल्या अन्विताकडे अधून मधून बघत मुकाट गाडी हाकत राहिला. फक्त आठ दिवसांत एवढं काही घडून गेलंय यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. जे घडलं त्याहूनही वाईट घडू शकलं असतं खरंतर! अंशूमनच्या अंगावर शहारे उमटले.
त्या दिवशीही स्वभावानुसार वैतागुन दुसरी कुठल्याही गाडीची व्यवस्था करून तो मिटींगला निघून गेला असता तर? अन्विता फोन उचलत नव्हती दिवसभर. एरवी हे लक्षातही आलं नसतं कारण दिवसभरात क्वचित कधी फोन करायचा तो अन्विताला. बहुतेकदा नाहीच. पण त्या दिवशी नेमकी त्याची गाडी बिघडली आणि दुसर्या गाडीसाठी त्यानं अन्विताला फोन केला. अन्विता गायब असल्याचं लक्षात आलं. अंशूमनला कुणी कशी बुद्धी दिली कोण जाणे ’अन्विता कुठे गेली’ याचा छडा लावण्याची? तेही इतक्या तातडीनं? सिक्स्थ सेन्स?
आणि ती सापडली कुठे? तिच्या कॉलेजपासून ६० कि.मि. दूर... एका खाडीत कमरेपर्यंत पाण्यात सुन्न उभी होती. चपला खाडीच्या काठावर एका खडकावर सोडलेल्या. तिथंच तिची शबनम. शबनमच्या शेजारी एक नोटपॅड आणि त्याच्यात पेन. भर दुपारची वेळ त्यामुळे कुणीच नव्हतं तिथे. डोक्यावर भणभणत्या उन्हाशिवाय काहीही नव्हतं. अगदी चिमुटभर सुद्धा वारा नव्हता. सगळं सुस्तावलेलं. शांत. स्तब्ध. अन्विता तशीच खाडीत पुढे पुढे गेली असती तर कुणाला समजलंही नसतं...
सगळा घटनाक्रम किमान साहाशेव्यांदा मनाशी आठवून अंशूमन पुन्हा एकदा दचकला. शेजारी बसलेल्या अन्विताकडे बघून त्यानं डोळे क्षणभर शांत मिटले.
"अन्विता...."
तिची नजर खिडकीतून जराही आत वळली नाही.
"AC बंद करून खिडकी उघडुयात का? तुला असा भणाणता वारा आवडतो ना?" अंशूमन बोलून गेला. सगळं ठिक होतं तेंव्हा या कारच्या खिडक्या बंद ठेवायच्या की उघड्या यावरून कायम वाद व्हायचे दोघांत. अंशूमनला AC शिवाय चालायचं नाही. शिवाय उघडी खिडकी म्हणजे धूळ... भसाभस वारा...
AC बंद करायला सरसावलेला त्याचा हात अन्विताने रोखला. क्षणभर झालेल्या तिच्या त्या थंडगार स्पर्शानं अंशूमन शहारला. तिच्या डोळ्यांत मात्र तेच ओळखिचं झालेलं शून्य...
अंशूमन आतल्या आत धुमसत राहिला. अन्विताची शून्य नजर पुन्हा खिडकीतून बाहेर. आणि एक लांबलचक न संपणारा प्रवास!
______________
डॉक्टर सामंत सकाळी सकाळी त्यांच्या बंगल्याच्या व्हरांड्यात त्यांच्या लाडक्या खुर्चीत किंचित वाकून बसले होते. समोरच्या काचेच्या टेबलवर स्वत:चंच प्रतिबिंब पहात... बराच वेळ. स्वत:च्याच डोळ्यांत जणू काही उत्तरं शोधत.
त्याच टेबलावर अंशूमनने दिलेलं अन्विताचं नोटपॅड पडलेलं होतं. ते सामंतांनी अनेको वेळा चाळलेलं. त्यातल्या पहिल्या शेवटच्या बर्याचश्या पानांवर काही अर्थहीन आकृत्या... काही पेन्सिलने तर काही पेनाने रेखाटलेल्या. काही पृथ्वीचे गोल... काही हात... झाडे पाने... काही डोळे! मधल्या काही पानांत काही संस्कृत श्लोक -
चतुर्युगसहस्त्रं तु ब्रम्हणो दिनमुच्यते
स कल्पो यत्र मनवश्चतुर्दश विशाम्पतेII
तदन्ते प्रलयस्तावान्ब्राह्मी रात्रीरुद्राह्रुता
त्रयो लोका इमे तत्र कल्पन्ते प्रलयाय हिII
एष् नैमित्तिक: प्रोक्त: प्रलयो यत्र विश्वसृक्
शेतेsनन्तासनो विश्वमात्म्सात्कृत्य चात्मभू:II
द्विपरार्धे त्वतिक्रान्ते ब्रम्हण: परिमेष्ठीन:
तदा प्रकृतय: सप्त कल्पन्ते प्रलयाय वैII
शेवटच्या पानावर मोठ्ठ्या अक्षरांत ’LONDON' असं लिहिलेलं होतं.
पेन ठेवलेल्या पानावरचा मजकूर सामंतांनी किमान हजारो वेळा वाचला होता. -
हे प्रलया! अखेर तूही भासच ठरलास!
या प्रचंड अनंत ब्रह्मांडात एक निव्वळ ठिपका असलेल्या या इवलुश्या पृथ्वीलाही अंताकडे नेण्याइतकी ताकद तुझ्यात नाही!
पाहिलीस ही पृथ्वी...? बदलांच्या अनंत छोट्या-मोठ्या वावटळींत हेलकावत भेलकांडत अनेको लक्षावधी वर्षांनंतर आज ही अशी दिसते आहे...! अशी भासते आहे!
अफाट कालखंडाचा मधला पडदा सारून पाहिलंस तर या अखंड पृथ्वीत फक्त एखाद्या रूपयौवनेनं रात्री निद्राधीन होण्याआधी सगळा शृंगार उतरवून साध्या वस्त्रांत किंचित थकलेल्या अवस्थेत थोडे पहूडावे एवढाच फरक जाणवेल तुला! तुला वाटते खरेच...? हिला कधीही न संपणार्या कालातीत चिरनिद्रेच्या स्वाधीन होण्याचा क्षण इतका समीप आला असेल? रात्रीच्या अखेरीस ही यौवना पुन्हा जागी होईल! तेंव्हा कदाचित हिचे सौंदर्य आणखीन अस्ताव्यस्त दिसेल... पण नष्ट काय होईल? हिला नुस्ते कुरूप करण्याचेही सामर्थ्य तुझ्याठायी आजपासून अनेको अनेको वर्षांपर्यंत उद्भवणार नाही!
हे प्रलया... तुझ्या विनाशाच्या भासायमान खेळात मानवाला साधन करून तुला जो डाव साधायचा आहे... त्यात नष्ट होईल तो तूही नव्हेस आणि ही पृथ्वी तर नव्हेच नव्हे! नष्ट होईल तो मानव... जो तुझा दलाल होऊन त्याच्याही नकळत या खेळात तुझे प्यादे बनला! आणि ज्याच्या नष्ट होण्याने या ब्रम्हांडालाच काय... पण या चिमुकल्या नाजुक पृथ्वीलाही एक मुंगी डसल्या इतकीही वेदना होणार नाही!
कल्पं, युगं, सहस्त्रकं... काळ कित्ती मोठा... अथांग, अफाट, अनंत वगैरे आणि माणूस खरंच कित्ती छोटा! इतक्या मोठ्या कालखंडातल्या अविरत कळत नकळत केल्या गेलेल्या याच्या पिढ्यान्-पिढ्यांच्या अविरत प्रयत्नांनंतरही या सृष्टीचे खरच किती अंश नष्ट झाले? आणि या माणूस नावाच्या ’बुद्धिमान’ प्राण्याच्या नक्की किती पिढ्या नष्ट झाल्या? आहे हिशोब? होमो सेपियन... होमो सेपियन सेपियन... विचारा सगळ्यांना पकडून. कुणाचे, कशाचे, किती आणि काय बिघडवू शकला माणूस? क्या उखाडा है इसने किसीका आजतक?
कशाच्या जोरावर स्वत:च्या बुद्धिमत्तेचा इतका माज करतो आपण? पृथ्वीच्या विनाशाला माणसाची हाव कारणीभूत ठरेल असं म्हणतो! हा: हा: हा: हा:... हे म्हणजे माशीच्या शिंकण्यामुळे वादळ आले आणि त्यात चंद्रसूर्य वाहून गेले असं म्हणण्यासारखं! याहून मोठा विनोद नाही!
एक गोष्ट स्पष्ट आहे. या अविरत खेळाचा ’डेड एंड’ कुठेही नाही! आणि असलाच तरी.... तो ’माणूस’ नावाच्या प्रवासाला आहे!
_________________________________
"तुझा प्रबंध कुठवर आला अन्विता? काम चालू आहे की नाही?"
अन्विताने चमकून सामंतांकडे पाहिलं.
"अगं तुझ्या गाईड सरांशी बोललो मी. मिस्टर पारगांवकर. जिनियस माणूस आहे. प्रचंड विद्वान! तुझ्याविषयी फार कौतूक आहे त्यांना. खूप भरभरून बोलले ते तुझ्याबद्दल. तू अचानक गायब झालेली आवडलेलं नाही त्यांना. मी सांगितलं तू आजारी आहेस म्हणून. येशील लवकरच असंही सांगितलं. जाशील ना?"
अन्विताच्या डोळ्यांत प्रचंड चलबिचल आणि अस्वस्थता उमटली. सामंत तिच्या डोळ्यांतले बदल टिपत बोलतच राहीले.
"विषय फारच गहन आणि अचाट निवडलायस गं संशोधनासाठी! ’सृष्टीचे सृजन, सर्जन, उत्थान आणि विध्वंसाशी निगडीत माणसाच्या उत्क्रांतीचा इतिहास आणि विश्वप्रलयाप्रति माणसाची सार्वकालीन भुमिका’ बापरे! अन्विता.. मला विषयाचे नाव पाठ करतानाच दम लागला बघ!"
अन्विताच्या डोळ्यांत आता जिवंत उत्सुकता उतरली. कुठल्याही क्षणी हे डोळे आता भरभरून बोलू लागतील! सामंत बोलत राहिले.
"आणि हो.... पारगांवकरांनी मला तुला ’University of London' कडून आलेल्या पत्राविषयीही सांगितलं. तिथल्या ’Institute of Historical Research, Bloomsberry, London' कडून तुला संशोधनासाठी बोलावणं आलंय. They are going to provide you research assistance. They may also take you as a professor there.... Well this it a tremendous achievement अन्विता!"
अन्विताने थेट डॉक्टर सामंतांकडे पाहिलं. तिच्या नजरेत काहिसा अविश्वास होता.
"एवढी मोठी बातमी तू अंशूमनला सांगितली नाहीस?"
अन्विताने अस्वस्थ नजर पुन्हा खाली घातली.
"Well.... I told him the good news."
"काही उपयोग नाही डॉक्टर. कुठेही जाणार नाही मी. काय करू या achievement चे?" अन्विता अखेर बोलली. आवाज खोल गेलेला आणि डोळे पाण्यानं भरलेले असणार हे आवाजातूनच जाणवत होतं.
"ok forget it..." सामंत विषय बदलल्याप्रमाणे पुन्हा बोलू लागले.
"पण तुझा संशोधनाचा विषय फारच इंटरेस्टिंग आहे अन्विता. I must admit. मलाही इतिहास खूप आवडायचा शाळा कॉलेजात असताना. मला सांग ना तुझ्या संशोधनाबद्दल. सगळंच काही नाही कळणार मला... पण या विषयावर तुझ्याकडून ऐकायला नक्की आवडेल. बोल ना...."
अन्वितानं आता उत्साहानं मान वर केली. मनातलं सगळं साठवलेलं सांगायला दोन डोळे अपूरे असल्याप्रमाणे अन्विता ओठांनी बोलू लागली. भरभरून बोलू लागली. सामंतांनी मधूनच खुणेने काचेपलिकडे बसलेल्या अंशूमनला आत येऊन बसायला सांगितलं.
"मला काय वाटतं माहितीये का डॉक्टर... इतिहास हा काही घडून गेलेला कालखंड नसतो! तो घडत असलेला प्रत्येक क्षण असतो. खरंतर इतिहास म्हणजे भूतकाळ नव्हेच. इतिहास हाच खरा वर्तमानकाळ! कारण आत्ता मी जो क्षण जगते, तो पुढच्या क्षणी इतिहास बनतो. किंवा कदाचित इतिहास म्हणजे भूतकाळातल्या काही सोयीस्कर रित्या निवडलेल्या घटनांना वर्तमानातल्या अनेको रंगांच्या चाळण्यांतून भविष्याच्या भ्रामक संकल्पनांच्या दृढीकरणाच्या हेतूने तत्कालिन समाजाने चिकटवलेले अनेकोअनेक सोयिस्कर संदर्भ! अश्या संदर्भांच्या शेकडो थरांखाली खरा इतिहास दबून राहतो जो काही काळानंतर कुणालाच माहीत नसतो. यात कालखंड जितका मोठा... हे वरून चिकटवले गेलेले संदर्भ तितकेच जास्त. कानगोष्टीच्या खेळासारखे मूळ घटनांचे चित्र आणि स्वरूपही त्यांचे इतिहासीकरण होत असताना बदलत जाते. त्याला कित्येक चमत्कार चिकटतात. साध्या मानवीय प्रकृती आणि विकृती माणसाच्या पिढ्या-पिढ्यांतून पुढे सरकताना देवा दानवांचे रूप धारण करतात. वास्तवाच्या दंतकथा बनतात तर कधी दंतकथा वास्तव असल्यासारख्या सांगितल्या जातात.
माणसाचा उत्क्रांतीचा इतिहास तसं पाहिलं तर बराच मोठा. अनेको शतकांच्या, सहस्त्रकांच्या तुकड्यांत विभागला गेलेला. तितकाच गूढ आणि अचाट. सुरू झाला म्हणजे संपेलच की! पण हा एवढा कित्येक सहस्त्रकांचा कालावधी संपूर्ण सृष्टीच्या मानाने नगण्यच! माणूस म्हणजे इथं अगदी कालपरवा्च दाखल झालेला कुणी पाहूणा. याच्यासारखे कितीतरी पाहूणे येउन इथं येऊन, राहून आपल्या वाटेनं निघून गेले असतील.... कुणास ठावूक! आपापल्या वाटची उत्क्रांती भोगुन आणि अनुभूती घेऊन आपल्यातलेही काही जण प्रवास संपवून नष्ट झाले असतील... असं नाही वाटत तुम्हाला डॉक्टर?"
आपल्या दिशेला अनपेक्षित रित्या रोखला गेलेला प्रश्न ऐकून सामंत किंचित दचकले. पण त्यांना हे अपेक्षित असावं. ते थोड्याफार तयारीनिशीच आले होते. त्यांनी अन्विताकडे पाहिलं आणि मग अंशूमनकडे. अंशूमन अन्विताकडे भारावून बघत होता. काहितरी भव्य, प्रचंड दिसल्यासारखे भाव होते त्याच्या चेहर्यावर.
त्यानंतर सामंतांनी अन्विताशी बराच वेळ संवाद साधला. त्यातला बराच जास्त काळ त्यांनी अन्वितालाच बोलतं ठेवलं. अंशूमन फक्त भारावून सारं ऐकत होता. जणू त्याच्या अस्तित्वाचे भान तिथे कुणालाच नव्हतं. कदाचित... त्याला स्वत:लाही नाही!
विषयाचे काहीही ज्ञान नसताना, कुठलेही संदर्भ ठावूक नसताना, यापूर्वी कधीही काहिही रस नसताना अंशूमन नकळत त्या चर्चेत गुंतून गेला.
"मला अजूनही अनेक उत्तरे शोधायची आहेत डॉक्टर. ती काही एकाच ठिकाणी एकत्रित नाहीत. मला अनेक प्रदेश, अनेक वाटा पालथ्या घालायच्यात. संदर्भांचे नव्या-नव्याने वरून चिकटवले गेलेले थरच्या थर उचकटून माणसाच्या उत्क्रांतीचा खराखुरा इतिहास जाणून घ्यायचा आहे... मला इतिहास ऐकू येतो डॉक्टर. मला साद घालतो तो. माझ्या भविष्यातून."
या वाक्यासरशी अन्विता अचानक थांबली. पहिल्यांदाच तिनं वळून अंशूमनकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत विलक्षण आर्जव आणि काठोकाठ भरलेलं पाणी. अंशूमन तिच्या एका नजरेनं शहारून गेला.
"मला जायचे आहे माझ्या ध्यासाच्या मागावर. प्रलयाचे मूळ आणि त्याचा प्रवास अभ्यासायचा आहे. अशाश्वताचा अंत बघायचा आहे. मला माणसाच्या समग्र इतिहासाचा ’डेड एंड’ जाणून घ्यायचाय अंशूमन. इथं तुझ्या... आपल्या संसारात, ऋजुतात पुर्णत: गुंतलेला माझा जीव मला बांधून ठेवतो. माझी घुसमट करतो. मला मोकळं कर. करू शकशील?"
अन्विताच्या डोळ्यांत पाण्याचे थेंब गोळा झाले होते. अंशूमन स्तब्ध! निरुत्तर.
त्याने डॉक्टर सामंतांकडे पाहिले. त्या दोघांची या बाबतीत आधीच चर्चा झालेली होती. पण या अश्या समोर थेट ठाकलेल्या प्रश्नाला सामोरं जाताना यावेळेस काही निरागस प्रश्न सामंतांच्या चेहर्यावर होते. आणि ते पाहून एक शांत हसू... अंशूमनच्या ओठांवर.
______________________________
"ऋजुता, बाळा... नीट राहशील ना सोन्या? मोठी झालीयेस ना? बाबांना त्रास नाही हं द्यायचा. आजीचं ऐकायचं. स्वत:चं स्वत: आवरायचं, शाळेत जायचं, अभ्यास करायचा. मी येईन तेंव्हा सगळा रिपोर्ट घेईन बाबांकडून. शहाण्यासारखं राहशील ना बाळा?"
काहीही न बोलता सात वर्षांच्या चिमुकल्या ऋजुतानं मान होकार दिल्यासारखी अनेकदा झुलवली. बोलणं टाळून घशाशी आलेला मोठ्ठा हुंदका तिनं शिताफिनं दाबला होता. बाबानं सांगितलं होतं... रडायचं नाही. हसून बाय्-बाय् करायचं आईला. नाहितर आईचं खूप महत्वाचं काम आहे ते होणार नाही.
पण त्या कोवळ्या लेकराच्या काळजातला कोंडलेला तो हुंदका अन्वितानं ऐकलाच होता. तिचा एवढा अकाली समंजसपणा तिला क्षणभर अस्वस्थ करून गेला. आपण नक्की काय टाकून जातोय मागे? घशाशी आलेला आवंढा गिळत तिनं ऋजुताला घट्ट मिठी मारली. डोळे भरून वाहू लागणार तेवढ्यात अंशूमन तिच्या समोर आला आणि त्यानं नजरेनंच थोपवलं तिला. खरंच की.... एवढंसं तिचं लेकरू किती समंजसपणा दाखवत होतं. अन्विताला काय अधिकार होता आता कच खाण्याचा?
ट्रेन सुटण्याची वेळ झाली. अन्विताने निघता निघता एकदा ऋजुताच्या कपाळाचे चुंबन घेतलं आणि मग ती अंशुमनसमोर उभी राहिली. त्याचा हात हातात घेताना तिला त्याच्याही घशातला अदृश्य हुंदका अस्फूटसा ऐकू आला. तिनं त्याच्या डोळ्यांत थेट पाहणं टाळलं.
"अंशूमन... तुला माहीत आहे की अजूनही मला तू ’जाऊ नकोस’ म्हणालास तर मी जाणार नाही. तुला माझा निर्णय मनापासून आवडलेला नसेल तर...."
अंशूमनने तिच्या ओठांवर हात ठेवला.
"तू निर्णय घेतलायस अन्विता. मला अभिमान आहे तुझा. तुझी ऐपत आणि आवाका वेगळा आहे. चार भिंतीतली नाहीस तू. आजवर केले ते यापूढे करायचे नाही मला. तुला समजून घ्यायचे ठरवलेय. जमेल तेवढे."
अन्विताने न राहवून अंशूमनच्या डोळ्यांत पाहिलेच आणि तिच्या डोळ्यांतून काही अधीर थेंब ओघळून गालांवर आले.
"माझं पिल्लू मला क्षमा करेल ना अंशूमन?"
"क्षमा?" अंशूमन अन्विताकडे बघत मोकळं हसला. "तिलाही तुझा माझ्याइतकाच किंवा माझ्याहीपेक्षा जास्त अभिमान वाटेल ही माझी जवाबदारी अन्विता."
गाडी सुटण्याची शेवटची सूचना झाली तशी अन्विता गाडीत चढली. निरोप घेतले गेले. एकमेकांना द्यायच्या घ्यायच्या सूचनांचे पाढे पुन्हा पुन्हा गिरवले गेले. दबलेले आवंढे पुन्हा एकदा गिळले गेले... आणि गाडी सुटली.
कुणाचीतरी स्वप्ने मार्गस्थ झाली. कुणाची ध्येय स्वतंत्र झाली. कुणाच्या तरी प्रश्नांना उत्तरे सापडली. एका निरागस हुंदक्याला बाबाच्या कुशीत मोकळी वाट मिळाली.... आणि....
आणि एका विलक्षण अव्यक्त पुरातन घुसमटीला अखेर लाभला एक ’डेड एंड’!
_________________________________________________________
समाप्त.
---------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धि - 'माहेर' मासिक जानेवारी २०१६.
धन्यवाद.
धन्यवाद.
फारच भयानक लिहिलयस, दोन वेळा
फारच भयानक लिहिलयस, दोन वेळा वाचल. खूप छान.
<<<कुणाचीतरी स्वप्ने मार्गस्थ
<<<कुणाचीतरी स्वप्ने मार्गस्थ झाली. कुणाची ध्येय स्वतंत्र झाली. कुणाच्या तरी प्रश्नांना उत्तरे सापडली. एका निरागस हुंदक्याला बाबाच्या कुशीत मोकळी वाट मिळाली.... आणि....
आणि एका विलक्षण अव्यक्त पुरातन घुसमटीला अखेर लाभला एक ’डेड एंड’!>>> केवळ आणि केवळ अप्रतिम!!!!
माहेर मध्ये वाचली होती.
माहेर मध्ये वाचली होती. पुन्हा वाचतानाही आवडली.
धन्यवाद!
धन्यवाद!
खुप सुंदर कथा..
खुप सुंदर कथा..
हा पुर्वार्ध झाला. या कथेचा उत्तरार्ध वाचायला आवडेल आपल्याच लेखणीतून...
खुपचं सुंदर लिहिले आहे...पती
खुपचं सुंदर लिहिले आहे...पती पत्नीनी एकमेकांची धैय समजून घेतली आणि सपोर्ट केला की दोघांचीही स्वप्न पूर्ण होतात
खुपचं छान लिहिले आहे...पती
खुपचं छान लिहिले आहे...पती पत्नीनी एकमेकांची धैय समजून घेतली तर दोघांचीही स्वप्न पूर्ण होतील.
Pages