फाडफाड इंग्लिश

Submitted by मोहना on 20 June, 2017 - 21:58

साल: कितीतरी वर्षांपूर्वी. स्थळ: अमेरिका, पात्र: मराठी माध्यमात शिकलेली नवविवाहिता, नाट्य: घडवू ते!

कोकाट्यांच्या ’फाडफाड इंग्लिश बोला’ मधून मी बाहेर पडले ते थेट अमेरिकेत उतरले. नवर्‍याच्या कमाईवर जिंदगी घालवणं म्हणजे इज्जतीचा फालुदा म्हणून त्याच्याच पैशांनी स्वावलंबी होण्यासाठी कॉलेजात नाव दाखल केलं. कॉलेजला निघताना नवर्‍याने खात्री केली,
"पंधरा दिवस रोज टी. व्ही. बघत होतीस ना?"
"हो, काय बोलतात ते समजतंय आता." नुकतंच लग्न झाल्यावर त्या काळात मुली लाजत असत म्हणून मी लाजत लाजत उत्तरले.
"पण बोलून पाहिलंस का त्यांच्यासारखं?"
"तोंड खूप वाकडं केलं की येतात उच्चार त्यांच्यासारखे. मी सांभाळेन. काळजी करु नकोस." त्याच्या डोळ्यातली माझ्या इंग्रजीबद्दलची काळजी मी माझ्या मधाळ स्वराने अलगद दूर केली.
"लक्षात ठेव, आधी चायनीज, जापनीज, मेक्सिकन....शेवटी अमेरिकन." एकेक देश ’बोलून’ जिंकायचा होता. त्याने क्रमवारी लावली. मी पण तसंच करायचं ठरवलं. दिवस नवीन लग्नाचे, नवर्‍याचं सारं काही ऐकायचे होते.

"तुझं नाव काय?" मी उत्साहाने चायनीज बाई पकडली.
"हॅ" ती म्हणाली. अशी काय ही? मी नाव विचारलं तर हॅ म्हणून उडवून लावायचं? नम्रता म्हणून नाही भारतीयांसारखी!
"तुझं?" तिने विचारलं. माझी ट्युबलाईट पेटली. हीचं नाव "हॅ" आहे तर.
मग हॅ आणि मॅ बोलायला लागल्या. तिने तिचं नाव ’हॅ’ सांगितलं म्हणून मी माझं ’मॅ’. प्रसंगावधान! असं करावं लागतं तरच जिंकता येतं. इथे येताना ऐकलं होतं की संजयचं ’सॅम’, देवदत्तचं ’डेव’ करतात. म्हटलं, ’हॅ’ साठी मी ’मॅ’. मग मी तिच्याकडे उगाचच उल्हासनगरचा माल डोळ्यासमोर नाचत असूनही चायनाबद्दल चौकशी केली तर व्हिएतनामी असल्यामुळे त्या बद्दलच बोलायला आवडेल असं हॅ म्हणाली. बराचवेळ आम्ही दोघीही मंडईत भेटल्यासारख्या तावातावाने बोलत होतो. कळत कुणाचंच कुणाला नव्हतं. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.

त्यावेळेस जी आमची मैत्री झाली ती कॉलेजमध्ये परीक्षेच्या वेळेस निम्मा, निम्मा अभ्यास करण्यापर्यंत पोचली. १०० प्रश्न दिलेले असायचे. त्यातलेच येणार. ती ५० मी ५० अशी वाटणी करुन टाकायचो. तितकीच उत्तरं पाठ करायची. उगाच डोक्याला ताप नाही. बाजूला बसून मी माझे ५० झाले की कागद तिच्याकडे सरकवायचे ती तिचा माझ्याकडे. नुसते गोल तर काळे करायचे. शाळेत कधी न केलेले (किती खोटं ते) प्रताप करायला मजा येत होती. या काळात माझ्या लक्षात आलं की इंग्रजीचा आत्मविश्वास वाढवायचा तर कोकाटे वगैरे क्लासेसना जायची आवश्यकताच नाही. दुसर्‍या देशातल्या माणसांशी बोलायला सुरुवात करायची. बोलायचं, बोलायचं, बोलायचं. त्या व्यक्तीला कळलेलं काहीच नसतं. त्या व्यक्तीचं आपल्यालाही काही कळलेलं नसतं. पण ’बोलणं’ कुणी सोडलेलं नसतं. असंच तर शिकतो ना आपण!

तर ’हॅ’ आणि मी ज्या वर्गात बसायचो तो आमचा शिक्षक पहिल्याच दिवशी म्हणाला,
"नाऊ गो टु सवस." हा इथिओपीयन माणूस कुठे जायला सांगतोय ते कळेचना. मी सवसला न जाता त्याच्याकडे बघत राहिले. तो सगळ्यांकडे बघत होता. बरेचजण त्याच्याकडे बघत आहेत हे लक्षात आल्यावर सवयीने त्याने ’सर्वर’ असं फळ्यावर लिहून टाकलं. मला त्याचं इंग्रजी तिथेच कळलं. मग वर्ग संपल्यावर मी खूष होऊन त्याच्याशी बोलत राहिले. तो माझ्याशी. आपलं आपण बोलायचं. कळावं अशी काही सक्ती नव्हतीच कुणाचीच कुणावर. सराव महत्वाचा!

एव्हाना, चायनीज, इथिओपीयन माणसं ’सर’ केली होती. मी खूष होते. मी खूष होते म्हणून नवरा खूष होता. तो म्हणाला,
"छान जम बसतोय. आता मेक्सिकन झाला की गोरा माणूस. मग संपलं. जगात कुठेही गेलीस तरी मराठी माध्यम म्हणून अडणार नाही तुझं." मेक्सिकन कुठे भेटणार ह्या काळजीत होते तेवढ्यात अगदी योग आलाच जमून. शोधायला लागलंच नाही फार. म्हणजे झालं काय, घरात काहीतरी दुरुस्ती करायची होती. ती करायला आला तो. आला तोच बादली घेऊन. म्हटलं, असेल याची वेगळी पद्धत. मी त्याला काय दुरुस्त करायचं ते दाखवलं. तो मराठी बोलल्यासारखं इंग्रजी बोलायला लागला. मला वाटलं हे मराठीच आहे म्हणून मी मराठीच बोलायला लागले त्याच्याशी. त्याला ते इंग्लिश वाटलं. एकमेकांना काहीतरी नक्कीच समजलं. तो खाली बसला आणि बराचवेळ काहीतरी पुसत राहिला. मी ते बघत. वाटलं, आधी हे पुसून मग खणणार आहे की काय? पुसलं, पुसलं आणि म्हणाला ग्रासियास. काहीतरी गोंधळ होता. मग मी त्याच्याशी खर्‍या इंग्रजीत चार वाक्य बोलले ती कळायला त्याला अर्धा तास लागला. मग आम्हाला दोघांनाही कळलं की तो शेजारच्या घरात जाण्याऐवजी माझ्या घरात आलाय. चुकून!

पण नवर्‍याने दिलेला अभ्यास मी प्रेमाने चुकतमाकत का होईना जवळजवळ पूर्ण केला होता. चायनीज, जापनीज ऐवजी इथिओपीयन आणि मेक्सिकन. आता जायचं होतं गोर्‍या लोकांशी बोलायला.... इतका आत्मविश्वास वाढला होता ना की नवर्‍याला म्हटलं,
"आण रे एखादा गोरा. फाडतेच माझं इंग्रजी. जय कोकाटे क्लास." नवरापण मी सांगितलेल्या माझ्या इंग्रजीच्या कहाण्यांवर जाम खूष होता. तो म्हणाला,
"अगं रस्त्यात दिसतात की. गाठ कुणीही. ही माणसं आपल्यासारखी माणूसघाणी नसतात. छान हसून बोलतात. जा आत्ताच बोलून ये." रविवार होता. नवर्‍याला ताणून द्यायची असेल म्हणून त्याने मला घालवलं होतं. हे आता कळतंय. लग्न जुनं झाल्यावर. तेव्हा वाटलं होतं, किती प्रेम गं बाई ते. मी त्याच्या सुचनेनुसार लगेच गेले रस्त्यावर. जो पहिला पुरुष दिसला त्याला पकडलं. बोलायला! माझं नेहमीचं तंत्र वापरलं, बोलत राहायचं, बोलत राहायचं.... त्याने शांतपणे ऐकून घेतलं. मला वाटलं आता तो बोलेल, बोलेल, बोलेल....पण तो म्हणाला,
"से इट अगेन..." आता इतकं सारं अगेन कसं से करायचं? मी थॅक्यू, थॅक्यू करुन धावत सुटले.

घरी आले. नवरा झोपला होता. त्याला गदागदा हलवलं. म्हटलं,
"अरे, तो गोरा काय बोलला ते समजलं मला! जिंकली, सगळी माणसं जिंकली!" नवर्‍याने त्याचा आनंद व्यक्त करायला प्रेमाने जवळ घेतलं आणि रविवार दुपारची वामकुक्षी पुरी करायला तो पुन्हा घोरायला लागला!

Group content visibility: 
Use group defaults

प्रचंड हसवलस. Rofl सकाळ प्रसन्न झाली.
बराचवेळ आम्ही दोघीही मंडईत भेटल्यासारख्या तावातावाने बोलत होतो. कळत कुणाचंच कुणाला नव्हतं. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.>>>>> Rofl

मी नाव विचारलं तर हॅ म्हणून उडवून लावायचं?>>
से इट अगेन...>>> Biggrin

वा:! मस्त लिहिलंय. आवडलं. अगदी वेगळ्याच पद्धतीचा लेख वाचायला मिळाला. दिल खुश हो गया. आणि पंचेस तर जागोजागी पेरलेत. झकास!!! Lol

भारी लिहिलय..... Happy
(अ‍ॅक्य्चुअली काय बोललात शब्द/वाक्य, त्यांची पेरणीही झाली असतील तर अजुन बहार आली असती)
एकंदरित हे परदेशात जाऊन रहाण फारच अवघड ,
भारतातल्या भारतात अनुभव घ्यायचा असेल तर कोणत्याही साऊथच्या राज्यात जा..... ! Lol
अट एकच, तुम्हाला मराठीव्यतिरिक्त हिंदी/इंग्रजी येतच नाहीये, मग बघा... कसे बोलतच रहाता हातवारे करीत ते...!

Lol
"से इट अगेन..." आता इतकं सारं अगेन कसं से करायचं? मी थॅक्यू, थॅक्यू करुन धावत सुटले. >>> या वाक्याला जाम हसले मी.......

मग मी त्याच्याशी खर्‍या इंग्रजीत चार वाक्य बोलले ती कळायला त्याला अर्धा तास लागला. मग आम्हाला दोघांनाही कळलं की तो शेजारच्या घरात जाण्याऐवजी माझ्या घरात आलाय. चुकून!<<<अशक्य लिहलंय.
मस्त मजा आली वाचताना .

खूपच छान लिहीलस. विनोदी लिखाण मस्त जमलय.
परवा एक व्हिडीओ पाहिला, परदेशात एक मुलगा सगळ्यांशी मराठीत बोलत होता. कुणालाच तो काय बोलतोय कळत नव्हतं. त्याची आठवण झाली. Happy

आईइग्ग कसलं धमाल लिहिलंय...मंडई, तावातावाने, उल्हासनगरचा माल सगळंच अशक्य आहे. Rofl चायनीज, स्पॅनिश चे उच्चार समजून घ्यायला खरंच मजा येते. जेव्हा कळतं तेव्हा आनंद गगनात मावत नाही. ब्रिटीश लोकांचे उच्चार पण अगम्यच वाटतात.
लेख मस्तच. मजा आली.

छान!

परवा एक व्हिडीओ पाहिला, परदेशात एक मुलगा सगळ्यांशी मराठीत बोलत होता. कुणालाच तो काय बोलतोय कळत नव्हतं. त्याची आठवण झाली --- हा व्हिडीओ भारी आहे. एक मुलगा लंडन मध्ये फक्त मराठी बोलत होता.

Pages