हॉलिवूडचा जो जीता वही सिकंदर

Submitted by धनि on 18 May, 2017 - 23:42

सध्या आमच्या गावात बायसिकल फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. दररोज वेगवेगळे चित्रपट, डॉक्युमेंट्रीज, किंवा शॉर्ट फिल्म्स दाखवत आहेत. पण प्रत्येक गोष्ट ही सायकलशी संबंधित. त्यातून मिळणारे पैसे 'बाईक क्लब' या संस्थेला देणार आहेत की जी शाळेतल्या लहान मुलांना सायकल चालवायला शिकवते आणि त्यांना एक एक सायकलही देते. तर काल तिथे 'ब्रेकिंग अवे' असा चित्रपट असणार होता. आता अ‍ॅकॅडमी पुरस्कार मिळालेला चित्रपट आणि सायकलींगवर असणारा म्हटल्यावर सोनेपे सुहागा म्हणत आम्ही हजेरी लावली. चित्रपटाबद्दल तसे म्हटले तर फार काही माहिती नव्हती. पण कुठेतरी आपला 'जो जीता' या चित्रपटावर आधारीत होता असे वाचलेले होते त्यामुळे अजूनच उत्सुकता होती.

चित्रपटाच्या सुरूवातीला सायकल प्रेमी संस्थांतील काही लोकांनी प्रास्ताविक केले आणि चित्रपट सुरू झाला. ४ तरूण दोस्त. नुकतेच हायस्कूल संपवून जगात पदार्पण केलेले. सध्यातरी उनाड दिवस मजेत घालवत आहेत. दगड खाणीत भरलेल्या नितळ पाण्यात दररोज पोहायला जात आहेत. त्यांच्या बोलण्यातून त्या गावात असलेल्या युनिव्हर्सिटी बद्दल थोडा राग जाणवतो. ते घरी परतत असताना आपल्याला नायकाची ओळख होते. नायक सायकल चालवतो आहे. आणि सगळ्यांना इटालियन मध्ये अभिवादन करतोय. तो घरी पोहोचल्यावर कळते की त्याला इटालियन सायकल रेसर्सचे आकर्षण आहे आणि तो त्यांना भेटण्याकरता इतका इटालियनचा सराव करतोय. त्याचे आणि त्याच्या आई - वडिलांचे प्रसंग अगदी खटकेबाज झालेले आहेत. त्याकाळातील अमेरिकेतील एक लहान कुटुंब, त्यांच्या समजुती, त्यांचे जीवन अगदी मस्त उभे राहते.

पुढे नायक एका कॉलेज कन्येवर छाप पाडण्याकरता आपण इटालियन आहोत, आपले घरचे पिढीजात मासेमार आहेत, आमचे एक मोठे कुटुंब आहे असे खोटेच सांगतो. आणि इथूनच आमची 'जो जीता' ची बत्त्ती पेटली. पुढे त्या कॉलेज मधले विद्यार्थी आपले सायकलींगचे ट्रेनिंग करत असतात आणि नायक बाजूला उभा असतो. त्यांच्याकडे बघत असतो. आणि इकडे मागे आम्ही हळू आवाजात कुजबुजलो "वीर बहादूर लडके कौन, राजपूत राजपूत". नायकाचे वडील त्याला आपल्या दुकानात कामाला सुरूवात करायला सांगतात. काम काय तर दुकानातल्या सगळ्या जुन्या गाड्या धुवून पुसून साफ करायच्या. तो त्यातूनही एक नविन कल्पना लढवून आपली सायकलींगची प्रॅक्टिस सुरू ठेवतो. थोड्या दिवसांनी तो ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो ती वेळ येते. इटालियन सायकलस्वारांबरोबर रेस मध्ये तो भाग घेतो आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण त्यात त्याचा भ्रमनिरास होतो. तो कसा होतो हे खर्‍या चित्रपटातच पहायला हवे.

पुढे या चार दोस्तांचे कॉलेज तरूणांशी भांडण होते, आणि त्यामुळे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष त्यांच्या प्रसिद्ध लिटील ५०० रेस मध्ये यावेळेस मूळ गावातली टीम पण सहभागी करण्याचा निर्णय घेतात. या चार दोस्तांची टीम त्यात सहभागी होते आणि लिटील ५०० सायकल रेस मध्ये चित्रपट शेवटापर्यंत जातो. त्या रेस मध्ये काय काय होते हे खरंच पहाण्यासारखे आहे. शेवटाला अर्थात आपला नायक जिंकतो. त्या शेवटच्या लॅपमधे चित्रपटगृहातील सगळ्या प्रेक्षकांनी नायकाला असे प्रोत्साहीत केले, आरडाओरडा केला की जणू काही खरी रेसच बघतो आहोत. सगळे प्रेक्षक चित्रपट बघण्यात ज्याप्रमाणे गुंतले होते यातच त्या दिग्दर्शकाचे आणि पटकथेचे कौशल्य दिसते.

लिटील ५०० ही इंडियाना युनिव्हर्सिटीत दरवर्षी होणारी सायकल स्पर्धा. अशा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा चित्रपट लिहीला. आणि खरोखर त्या युनिव्हर्सिटी कॅम्पस वर, त्या गावात चित्रीत केला. त्यामुळे या चित्रपटाला एक सच्चेपणाची जोड मिळते. सगळ्याच लोकांचे अभिनय अतिशय उत्तम झालेले आहेत. आमच्या चित्रपटाच्या खेळाला एक विशेष अतिथीही उपस्थित होते. त्या चित्रपटात - रेस मध्ये एक्स्ट्राचे काम केलेले एक काका आलेले होते. त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनात तीनदा लिटील ५०० रेस मध्ये भाग घेतला होती. त्यांनी चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या, आणि त्यांचे फोटोही दाखवले.

हा एकदम सुंदर, खुर्चीला खिळवून ठेवणारा चित्रपट नक्की बघा ज्यात शेवटी आमीरचे वडील म्हणतात तसे म्हणावे वाटते "जो जीता वही सिकंदर"!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तरी ब्रेकिंग अवे आणि जो जीता मध्ये खुप साम्य आढळले , अगदी इतके की आम्ही डायलॉग म्हणत होतो किंवा पात्रांची नावं घेत होतो. तुम्ही हा बघा आणि मग सांगा काय वाटतंय ते. (तसा जो जीताचा विकी पण पाहिला मी जस्ट आणि त्यातही ब्रेकिंग अवेच दिसते आहे : https://en.wikipedia.org/wiki/Jo_Jeeta_Wohi_Sikandar Wink )

आणि महत्त्वाचे साम्य म्हणजे दोन्ही चित्रपट सायकल रेसिंगवर आधारीत आहेत !

मस्त माहिती. चित्रपट नुसता पाहण्यापेक्षा अशा इव्हेण्ट्स मधे त्याच्या आठवणी वगैरे सांगणार्‍यांबरोबर पाहण्यात आणखीनच मजा आहे.

अरे हो फा, त्या ठिकाणी एक रॅफल पण होता ज्यात जिंकणार्‍याला लिटील ५०० साठी असणार्‍या सारखी स्पेशल सायकल मिळाली.

जो जीता ब्रेकिंग अवे वरच बेतला आहे.

आणखी एक असाच 'स्पोर्टिंग अंडरडॉग्स' थीम असलेला 'cool runnings' पण मस्त आहे. हा बॉबस्लेडिंग क्रीडाप्रकारावर बेस्ड, पण ड्रामापेक्षा जास्तकरून विनोदी आहे.

Cool runnings मस्त आहे एकदम, वाळवंटात असलेले बॉब स्लेजिंग मध्ये भाग घेतात.

जो जिता चे इंग्लिश व्हर्जन बघायला पाहिजे

मस्त, बघायला हवा Happy जो जीता .. तर ऑल टाईम फेव्हरीट चित्रपट आहे... प्रत्येक वेळी पाहतांना रेसच्या शेवटच्या क्षणी, स्लो मोशनमध्ये आमीर जिंकतांना; वाजणारं ड्रम्स चं संगीत मजा आणतं एकदम Proud

सुमारे सहा महिन्यांपूर्वी हॉटस्टारवर पाहिला ब्रेकिंग अवे (आणि नंतर परत एकदा जो जीता...)
पण कुठेतरी मन्सूर खानच्या इमेजला तडा गेला. ब्रेकिंग अवे असा सिनेमा आहे हेच मला जो जीता बनवण्यापूर्वी अन लोकांनी त्यातली साम्यस्थळं दाखवण्यापूर्वी माहिती नव्हतं हे त्याचं विधान धादांत खोटं आहे. (मान्य केलं असतं तर काहीही फरक पडणार नव्हता). छोट्या छोट्या सीन्समधली कलाकारांची जेस्चर्सही उचलली आहेत. कॅसेट प्लेअरवर गाणं वाजवून मुलीला इंप्रेस करायचा सीन तर त्यानी पुढच्या जोश मधे ही वापरला होता.

मस्त लिहिलंय. बघायला हवा हा पिक्चर. जो जीता खूप आवडतो. जो जीताला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झालेल्या MAMI फिल्म फेस्टिवलमधल्या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ पाहिला होता. मस्त आहे. मन्सूर खान, आमिर खान, दीपक तिजोरी, आयेशा जुल्का, पूजा बेदी, मामिक वगैरे सगळे आहेत..कुलभूषण खरबंदा तेवढे येऊ शकले नव्हते.

https://youtu.be/ROlOyNMsm0U