काळण्याची भाकर, आंबाडीची भाजी
अगं, ती तर लई ग्वाड लागती.
अवं, नुसतीच काळण्याची भाकर अन नुसतीच आंबाडीची भाजी
वर तेलाची धारच नाही, मला दादला नको गं बाई, नवरा नको गं बाई..
शाहीर साबळे यांच्या आवाजातले, नाथांचे हे भारुड, मी लहानपणी रेडीओवर अनेकदा ऐकत असे, त्यावेळी
आईकडे मी, आंबाडीची भाजी कर, म्हणून हट्ट करत असे. आईला हि भाजी अर्थातच माहीत होती, पण ती
त्यावेळी मुंबईत मिळत नसे. मग मलकापूरला गेलो, कि आजीला सांगू, असे सांगत ती माझी समजूत काढत
असे.
मलकापूरला जाणे व्हायचे ते मे महिन्यात आणि त्यावेळी, उन्हाळ्यात तिथे फारच कमी भाज्या मिळत.
मी अगदी लहानपणीच, कट्टर शाकाहारी बनलो होतो, मला काय करुन घालायचे, असे आजीला वाटायचे.
मुंबईचा म्हणून ती माझ्यासाठी, पुरणपोळी, घारगे असे गोडाधोडाचे पदार्थ करायची. पण मला तर शिळी
भाकरी, शिळी आमटी, भाताची करप असे काहीतरी हवे असायचे. आजीला वाटायचे, हे कसे द्यायचे, याला.
मग मी रुसायचो.
पण एका मे महिन्यात, तिला आंबाडीची भाजी मिळाली. तिच्या हातची भाजी आणि भाकरी, मला
इतकी आवडली, कि मी त्या भाजीचा चाहताच झालो.
पुढे मुंबईतही हि पालेभाजी मिळू लागली. गावाला मिळाली होती, ती हिरव्या देठाची, तर मुंबईत मिळते, ती
लाल देठाची. लाल देठाची भाजी, जास्त आंबट असते, तिची पाने उकडून ते पाणी, फेकावे लागते.
हिरव्या देठाची, थेट फोडणीला दिली तरी चालते.
आई करते त्यावेळी या भाजीत, काळे वाटाणे, तुरीची डाळ, शेंगदाणे, भाताच्या कण्या असे बरेच काही घालते.
तिला तर अप्रतिम चव येते आणि शिळी भाजी तर आणखीनच रुचकर लागते. पुढे मी स्वतः करायला लागलो,
त्यावेळी या पद्धतीने तसेच, बेसन, दाण्याचे कूट घालूनही करु लागलो.
डॉ. डहाणूकरांनी पण या भाजीची आणखी एक साधीशी कृती लिहिली होती ( पांचाळ पद्धतीची ) ती पण
करुन बघितली होती.
बाकीच्या पालेभाज्यांपेक्षा हि खुपच वेगळ्या चवीची तर असतेच, पण हिची उस्तवार पण फार नसते.
पाने मोठी असल्याने, खुडायला पण सोपे जाते. ही भाजी चिरायची पण नसते.
( ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. भेंडी, कापूस, जास्वंद या वर्गातली हि भाजी आहे. पाने साधारण
भेंडीच्या पानासारखी, पण आकाराने लहान असतात. चवीला हि भाजी, आंबट असते. पण खुपच चवदार लागते.)
भारतात होतो, त्यावेळी भाजी मिळायचा प्रश्नच नव्हता. मस्कतला गेलो, त्यावेळी तिथे, ऑथॉरिटी फॉर
मार्केटींग अॅग्रीकल्चरल प्रोड्यूस, या संस्थेच्या दुकानात हि भाजी बघितली. ताबडतोब ती घेतलीच. पण
हे अप्रूप इथेच संपले नाही.
एका रमदान ( रमझान ) महिन्यात, रोजा सोडताना, माझा सुदानी मित्र एक लाल रंगाचे सरबत पित असे. त्याने एकदा मला ते प्यायला दिले. रंग आणि चव थेट, आपल्या अमृतकोकमाची. मी त्याला विचारले, कसले
करतोस, तर त्याने मला लालसर रंगाची काही सुकलेली पाने दाखवली आणि त्याचे नाव करकाटे, असे सांगितले.
मी रातांब्याच्या झाडाचे, फळांचे वर्णन त्याला सांगितले. कोकणात, अमृत कोकम कसे करतात, ( अर्ध्या वाट्या करुन, त्यात साखर भरून वगैरे ) ते सांगितले. पण त्याच्या मताप्रमाणे, ते झाड वेगळे. असे काही खास
करकाटे साठी करावे लागत नाही. ही पाने, पाण्यात घातली, कि लगेच पाण्यात तो रंग आणि चव उतरते.
त्याने मला त्याचे, प्रात्यक्षिकही दाखवले.
उपास सोडताना ते पितात, कारण त्याने पित्त शमते, असे तो म्हणाला. म्हणजे उपयोग, चव, रंग याबाबतीत
समानता होती. पण झाड वेगळे, यावर तो ठाम होता. मला त्याने काही पाने पण दिली.
ओमानला, मग मस्कत फेस्टिवल होऊ लागले. त्या काळात तिथे, ओमानमधल्या खेडेगावातील देखावे
तयार केले जात. अशा एका उत्सवात, मला तिथल्या एका बाजारात, एक माणूस, सुंदर लालसर रंगाची,
मोदकासारख्या आकाराची फळे विकत बसलेला दिसला.
कुठलेही फळ बघितले कि मला ते खायचा अनावर मोह होतो. मी त्याला विचारले, कि या फळाचे नाव काय आणि कसे खायचे ? तर तो म्हणाला, याचे नाव करकाटे आणि या फळाचा गर नव्हे तर साल खायची.
आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. माझ्या मित्राने दिली होती, ती पाने नव्हती, तर या फळाच्या साली
होत्या.
मी जास्तच उत्सुकता दाखवल्यावर त्याने मला त्या फळाचे रोपटे दाखवले. आपल्याकडच्या आंबाडीच्या
भाजीपेक्षा बरेच मोठे होते ते पण पाने तशीच होती. मी एक पान खाऊन बघितले, तर चव आंबाडीचीच.
( आंबाडीची भाजी निवडताना, मी अजूनही कोवळी पाने तशीच कच्ची खातो, त्यामूळे चव माहित होतीच.)
आता मला, हा सगळा उलगडा झाला. आंबाडीच्याच फळांना, ते लोक करकाटे म्हणतात.
पण आपल्याकडच्या बाजारात मात्र कधीही हि फळे, मला दिसली नाहीत. मुंबईत नाही आणि गावातल्या
बाजारातही नाहीत.
पण लक्ष्मीबाई धुरंधर आणि कमलाबाई ओगले, दोघींच्याही पुस्तकात ( हजार पाककृती आणि रुचिरा ) आंबाडीच्या बोंडाचे सरबत आहे. त्या दोघींनी याचे अभिनव उपयोग पण लिहिलेले आहेत. म्हणजे
आपल्याकडे, पूर्वापार हे सरबत केले जातेय.
पुढे बाजारात, अमृतकोकम बाटलीत मिळू लागले. मला कोकणात पारंपारीक रितीने केलेले अमृत कोकम आणि
आंबाडीच्या बोंडाच्या पाकळीचे सरबत, या दोघांच्या चवीतला किंचीत फरक माहीत असल्याने, मला तरी
असे वाटते, कि बाजारी अमृत कोकम, आंबाडीच्या बोंडापासूनच करत असावेत.
डॉ. मीना प्रभूंच्या "इजिप्तायन" मधे, इजिप्तमधल्या या "चहा"चे वर्णन आहे. तो चहा म्हणजे करकाटेच असणार, याबद्दल मला खात्री होती. गोव्याला, एका स्लाईड शो ला त्या भेटल्यावर, मी त्यांना मुद्दाम हे सांगितले होते.
पुढे मस्कतमधे, मदर्स रेसिपीचे, गोंगुरा पिकल मिळू लागले. आंध्र पद्धतीचे, आंबाडीच्या भाजीचे हे लोणचे,
माझ्यासाठी अतिजहाल तिखट होते. मग मस्कतमधे मुबलक मिळणारा खजूर ( जेवढ्यास तेवढा ) त्यात मिसळून मी, माझ्यापुरचे अप्रतिम चवीचे, रसायन करत असे.
दूबईला एका सुपरमार्केटमधे, मला वाळवलेले करकाटे दिसले. ते साधारण २ किलोभर मी घेतले, आणि माझ्या
किचनमधे ते नेहमी असे. आता मला कधीही, ताजे "अमृत कोकम" करता येते.
नंतर आफ्रिकेत, इतर स्थानिक पालेभाज्या मी खात असे. पण आंबाडीची भाजी मात्र दिसली नाही. नैरोबीचे
भाजी मार्केट तर शेकडो प्रकारच्या, भाज्यांनी ओसंडून वहात असते. भारतीयच नव्हे तर युरोपियन आणि चायनीज भाज्यांचीही, तिथे रेलचेल असते. पण आपली, आंबाडीची भाजी मात्र कधी दिसली नाही.
नायजेरियात, भाज्यांची इंग्लिश नावे अगदी चपखल आहेत. उदा. वॉटर लिफ ( आपली मायाळू ) बिटर लिफ ( साधारण मेथीच्या चवीची भाजी ) सेंट लिफ ( ओव्याच्या वासाची भाजी ) पंपकिन लिफ ( भोपळ्यासारख्या एका वेलीची पाने. या वेलीची पाने आणि भल्या मोठ्या फळातल्या बिया खातात, फळातला गर खाण्याजोगा नसतो.) पण तरी आंबाडीची भाजी दिसत नसे.
लेगॉसच्या भाजीबाजारातून घरी जाताना, आजूबाजूच्या भाजी विक्रेत्यांवर माझी बारीक नजर असे. एकदा
मला ( बहुतेक रमझानच्याच दरम्यान) एका विक्रेत्याकडे, ढिगाने करकाटे दिसले. ज्या अर्थी ते ढिगाने होते,
त्या अर्थी, ते स्थानिक उत्पादन होते. आणि करकाटे होते म्हणजे भाजी पण असणार, अशी मला आशा वाटली.
असेच एकदा वेगाने जात असताना, मला एका भाजीवाल्याकडे ती दिसलीच. मी ड्रायव्हरला गाडी मागे घ्यायला लावली. तिथे तिचे नाव आहे, याग्वा. ( परत चौकशी करता येईल म्हणून, नाव विचारून घेतले.)
योगायोगाने, अन्नपूर्णाच्या लेखिका, मंगला बर्वे यांचे जावईबापू, माझ्या घरी होते. आम्ही
दोघांनी, मनसोक्त भाजी खाल्ली ती.
ही कहाणी इथेच संपत नाही.
गेल्या रविवारी, अंगोला मधल्या स्थानिक बाजारातही ती दिसली. लाल पानाची नव्हती, तर हिरव्या पानाची.
मक्याचे पिठही असतेच, इकडे. नाव मात्र कळले नाही, कारण माझा प्रश्नच, भाजीवालीला कळला नाही.
म्हणजे मला विचारता आला नाही.
खुप खुप वर्षांनी, आजीने केला होता तसा बेत केला. मिरच्या, लसूण यांच्या फोडणीवर परतलेली आंबाडीची भाजी आणि मक्याची भाकरी... अर्थात आजीच्या हातची चव कुठून आणू ?
( आंबाडीची हिरवी फळे, जी खास करुन श्रावणात मिळतात, त्यांचा आणि या भाजीचा संबंध नाही. त्याचे मोठे झाड असते. कोकणात, खास करुन गोव्यात, त्याचे रायते, गोकुळाष्टमीला करतात. तसेच, एका अतिथोर लेखिकेच्या, अतिअप्रतिम अशा " आस्था आणि गोवारीची भाजी " या कथेशीदेखील, माझ्या या लघुकथेचा, संबंध नाही. )
खरं म्हणजे माझी आई अंबाडीची
खरं म्हणजे माझी आई अंबाडीची भाजी करायची आणि मी ती कधीच खायचे नाही. पण तुम्ही जे काही लिहिता ते वाचून ते सगळे करावेसे व खावेसे ही वाटते.
एकदा नक्की करून पाहणार!
मलाही आवडते आंबाडीची
मलाही आवडते आंबाडीची भाजी.
छान माहिती.
थोडे तांदूळ कुटून घालायचे या
थोडे तांदूळ कुटून घालायचे या भाजीत, यम्मी लागते आणि छान मिळून येते. गोळा भाजी स्लर्प!
तेलुगू लोक अंबाडी (गोंगूराचा)
तेलुगू लोक अंबाडी (गोंगूराचा) आधी साग करतात आणि भाताला फोडणी देऊन त्यात हा साग घालतात. अंबाडी घालून केलेला असा भात खूपच चवदार लागतो.
आई अंबाडीची पाने शिजवून घेते. पाने गरम असतानाच भाकरीच्या पिठात कुस्करते. उकळलेले तेच पाणी भाकरीचे पिठ मळवायला घेते. मीठ थोडे जास्त टाकले. सुंदर भाकरी होतात. रंगही एकदम मस्त येतो भाकरींना.
मिनोतीची कृती वेगळी होती. ती बाजरं कांडून ती भरड ह्या भाजीत घालते.
बी, आईची भाजीची कृती पण दे...
बी, आईची भाजीची कृती पण दे... आणि तूमच्याकडे ती भाजी बहुतेक मलेशियामधून येत असेल, कदाचित ते लोकही खात असतील.
छान लिहिलंय. आवडलं अंबाडीची
छान लिहिलंय. आवडलं
अंबाडीची भाजी अतिप्रिय आहे. तांदळाच्या कण्यांना पर्याय म्हणून चक्क भातच घोटून घालायचा आणि भरपूर लसूणफोडणी वरुन. अहाहा ! अमेरिकेत मिळायची अधूनमधून. (त्यातल्यात्यात) ताजी भाजी इंडियन स्टोअरमध्ये येतानाचा मुहूर्त कधीच गाठता यायचा नाही त्यामुळे मान टाकलेल्या जुड्याच मिळायच्या. पण निदान खायला तरी मिळायची. युकेत आमच्या आसपास अजूनतरी दिसली नाहीये.
दिनेशदा, हो बहुतेक
दिनेशदा, हो बहुतेक मलेशियातूनच येत असावी. इथे पण पेरली जात असावी. इथे शेवग्याचा पाला, शेवग्याच्या शेंगा, अंबाडीची भाजी, छोटी बुटकी कारली, केळफुले, कच्ची केळी, लाल माठ ह्या भाज्या विपुल प्रमाणात कुठल्याही दिवशी ताज्या मिळतात त्या इथे राहणार्या दाक्षिणात्यांमुळे.
दिनेशदा, ही खास गरीबांची भाजी
दिनेशदा, ही खास गरीबांची भाजी होती.
हिची लागवड कोणी मुद्दामहून करत नसे. म्हणजे एकतर शेताच्या बांधावर ही आपोआप उगवत असे किंवा भाजीच्या मळ्याच्या बाजुला ही थोडीफार लावत. कारण जून आंबाडीच्या खोडाचे बंध छान बनतात. मुख्य भाजीच्या उदा मेथी पालक इ.जुड्या बांधायला उपयुक्त. एखादे गरीब कुळ अडिअडचणीच्या वेळेस कोवळा पाला नेऊन भाजी करत असे.
आता व्यावसायिक तत्त्वावर हिची लागवड होते.
तरिही आमच्या इथे सोमवार, अमावस्या, पौर्णिमा आणि कुठल्याही सणाच्या दिवशी ही भाजी केलेली चालत नाही.
तसं तर आमच्यात सणाच्या दिवशी भाकर्या केलेल्याही चालत नाहित.
पण आम्ही सणासुदीलाच घरी जातो त्यामुळे साबाना अंबाडिची भाजी नी ज्वारीची भाकरी करायला लावतो. त्या बिचार्या मग भाकर्या थापटल्याचा आवाज शेजारी जाऊ नये म्हणून दारं खिडक्या बंद करुन भाकर्या थापटतात. भिकेचे डोहाळे लागलेली मुलं म्हणत प्रेमाने शिव्या देत देत भाजी भाकरी खाऊ घालतात.
इकडे अंबाडीच्या आम्बट भाजी आणि भाकरी बरोबर ताक प्यायची पद्धत आहे.
अगो, मेडीटेरियन
अगो, मेडीटेरियन सुपरमार्केट्मधे निदान करकाटे, तरी नक्कीच मिळेल.
बी.. कौतूक आहे कि नाही दाक्षिणात्यांचे ? आपल्या खाण्याबाबत फार आग्रही असतात ते.
साती, हो आंबाडीचा वाख चांगला मजबूत असतो.
या कारणामूळेच, मला वाटतं मुंबईत पूर्वी मिळायची नाही ही भाजी. आता तर मुंबईतच लागवड होते.
भाकर्यांच्या संदर्भात, शाहू महाराज पण हळवे होते. त्यांना त्या अतिप्रिय पण राजवाड्यात भाकर्या करायच्या नाहीत, असा नियम !
आपण महाराष्ट्रात राहणारे, म्हणजे साधारण नागपूर कडचा भाग सोडला आणि कोकण सोडले तर, शिवाय कर्नाटकाचा काही भाग देखील, हा परंपरेने भाकरी खाणारा. आपल्याकडे गहू फार नंतर आला. त्यातही आधी तो माळव्यात आला. तरी पण मानाचे स्थान पटकावून बसलाय.
आवडले.
आवडले.
आपल्याकडे गहू फार नंतर
आपल्याकडे गहू फार नंतर आला.
>>
सत्य आहे.
ज्वारी अन बाजरी हे आपलं मुख्य धान्य होतं. अत्ता अत्तापर्यंत खेडोपाडी पोळी हा फक्त सणासुदीस करण्याचा प्रकार होता. आजकाल उलट झालंय. गहू उत्तम घेतला तर २० रुपये किलो, अन ज्वारी बरी मिळाली तर ३०-३२ रुपये झाली आहे. अन पालेभाजी तो क्या कहने!२५ रुपये पाव मिळाली तर खुश रहावं अशी परिस्थिती आहे..
चिकन परवडतं. आजचा भाव ९० रुपये किलो होता..
<<इब्लिस - गहू उत्तम घेतला तर
<<इब्लिस - गहू उत्तम घेतला तर २० रुपये किलो, अन ज्वारी बरी मिळाली तर ३०-३२ रुपये झाली आहे >> +१
सुरेख लेख दिनेशदा
सुरेख लेख दिनेशदा (नेहमीप्रमाणेच)
मी हि भाजी अजुन नाही खाल्ली. पण भरपूर वाचलं आहे
बघु कधी योग येतोय तो
सुर्रेख लेख आहे दिनेशदा! काल
सुर्रेख लेख आहे दिनेशदा!
काल अंबाडीची भाजी घेतली. आज काहीतरी वेगळा प्रकार करावा म्हणुन माबोवर शोधतांना हे ललित सापडलं.
रच्याकने, आई सांगते गावाकडे भागवत पुराणाचा ७ दिवसांचा उपास सोडतांना सगळ्या बायका हीच भाजी आणतात आणि मंदिरातच बसुन उपवास सोडतात.
मलाही अंबाडीची भाजी प्रचंड
मलाही अंबाडीची भाजी प्रचंड आवडते.... दिनेशदा ______/\______ महान आहात! तोंपासु
वा! छान लिखाण! कालच केली होती
वा! छान लिखाण!
कालच केली होती अंबाडीची भाजी.
अगो म्हणते त्यातच थोडी भर. ............कुकरात चक्क थोडे तांदुळ, थोडी तूर डाळ , अगदी २ च. हरभरा डाळ, १०/१५ शेंगदाणे + भरपूर अंबाडीची पानं असं शिजवा.
बाहेर काढून घोटा. वरून तेलात लसूण तळून हिंग घालून फोडणी ओता. मी थोडा गूळही घालते.
भाकरीबरोबर फस्त करा.
बाप्रे कसला माहितीपूर्ण लेख
बाप्रे कसला माहितीपूर्ण लेख अन किती वैविध्यपूर्ण प्रतिसादांची अॅडिशन.
------------/\--------------
आंबाडीचं अमृत कोकम हे भोपळ्याच्या टॉमेटो सॉस सारखं विनोदी वाटलं
व्वा! मस्त लेख. मी अजून कसा
व्वा! मस्त लेख. मी अजून कसा वाचला नव्हता?
लहान्पणी खाली असणार पण आता आठवत नाही. आणि आता खूप वर्षात खाल्ली नाही.
बघु कधी योग येतोय तो स्मित>>>>>>>>..येईल हो येईल . लवकरच येईल.
रेसिपी लिआयची पद्धत कसली
रेसिपी लिआयची पद्धत कसली भारी. अंबाडीनी कनेक्टच झालो आपण दुसर्या देशांशी.
अंबाडीची भाजी माझी आई पण मस्त करते. म्हणजे सगळे ingredients माहित नाहित (मिरच्या, लसूण आणी तांदूळ नक्की असतात. का. वा. नाही) पण चव सही एकदम. आणि ज्वारीच्या भाकरीबरोबरच.
फारच सुंदर लिहिलय दिनेशदा!
फारच सुंदर लिहिलय दिनेशदा! अंबाडी मी कधी विशेष आवडीने खाल्ली नाही पण आता खावीशी वाटत्ये!
अप्रतिम लेख. भाज्यांकडे
अप्रतिम लेख. भाज्यांकडे तुमच्या दृष्टीकोनातून बघायला हवे. अंबाडीची भाजी खूप आवडत नाही पण आई गजानन महाराजाच्या पोथीचे पारायण झाले कि भाकरी, झुणका आणि अंबाडीची भाजी तांदूळ-कण्या आणि लसणीची फोडणी देऊन करायची त्याची आठवण झाली. त्या दिवशी प्रसाद म्हणून ती भाजी आवडायची. आई जवळच राहते आता आईला करायला सांगेन म्हणजे आयती मिळेल.
बी यांनी पण छान माहिती दिली.
अरे व्वा... करकादे आता आणायला
अरे व्वा...
करकादे आता आणायला हव....
मार्स मध्ये मिलेल का हो दिनेशदा...?
अंबाडीची पानं घालुन ज्वारीचा
अंबाडीची पानं घालुन ज्वारीचा घाटाही करतात. ज्वारी भिजवुन त्याची सालं काढुन घ्यायची. मग ह्या ज्वारीच्या कण्या लसणीची अन हिरव्या मिर्चीची फोडणी घलुन शिजवायच्या. शिजत आल्या की त्यात अंबाडीची पानं घालायची. पळीवाढी कन्सिस्टन्सी आली अणि कण्या नीट शिजल्या की गर्म गरम खायच्या. ह्याच्या बरोबर मिर्चीचा ठेचा म्हणजी एकदम तोंपासु.
रमणी, आमच्याकडे ज्वारी नाही
रमणी, आमच्याकडे ज्वारी नाही मिळायची पण अगदी कोवळा मका मिळतो. तो वापरून हा प्रकार नक्की करेन.
कुठल्या भागातला आहे हा प्रकार ? सोलापूर कडचा का ?
आहाहा!!! किती गोड झालाय
आहाहा!!! किती गोड झालाय लेख!!!!!!!!!!!!!!
आता भारतात ही भाजी नव्या चवीची लागणार नक्कीच!!!!! मस्त!!!
मी तर सरळ केन्याला जाऊन खाणार बाबा!!!
दिनेश. किती सुरेख लिहिलय
दिनेश.
किती सुरेख लिहिलय तुम्ही!
मझी बेळगावची मैत्रिण ह्या ज्वारीच्या कण्या घालून ही भाजी करायची.
मला इथे अंगोलात पण ही भाजी
मला इथे अंगोलात पण ही भाजी मिळते ते यात लिहिले होतेच. गेल्या आठवड्यात मिळाली त्यातली काही रोपे
लाल पानांची होती ( मी आधी कधी बघितली नव्हती ) पण चायनीज चॅनेल वर त्याचे नाव क्रॅनबेरी हिबिस्कस असे
सांगितले. तो हाच प्रकार का आणखी वेगळा ते कळत नव्हते. ते झाड मात्र चांगले ५/६ फूट वाढलेले दिसत होते.
तिथे त्यावर संशोधन चालू आहे.
मी यावेळेस थोडी वेगळ्या
मी यावेळेस थोडी वेगळ्या प्रकारे केली. म्हणजे आमच्या पद्धतीनेच काळे वाटाणे, शेंगदाणे, तुरीची डाळ वगैरे घालून.
पण मी तुरीची डाळ आणि कण्या भिजत घालायला विसरलो. मग मी डाळ आणि तांदूळ यांचा कोरडाच भरडा काढला.
तो तेलात खमंग परतला. मग फोडणी देऊन त्यात हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे यांचे वाटण घातले. त्यात
कच्चेच शेंगदाणे परतले. काळे वाटाणे शिजवून घातले. डाळीचा भरडा घातला आणि मग शिजवून घेतलेली भाजी
पाण्यासकट ओतली... याला मस्त चव आली.
मस्तच दिदा..
मस्तच दिदा..
आंबाडीच्या फळांना बोंड म्हणतो आम्ही... त्याची चटणी फार मस्त लागते..
आमच्याकडे ती बोंड उकलून त्यांना कडक उन्हात वाळवतात अन मग भाजी करताना, फोडणीच्या वरणात वगैरे आंबटपणा येण्याकरता ते टाकतात..
Lekh awadla. Wachniy zala
Lekh awadla. Wachniy zala ahe.
Pages