शिमगो ... कोकणातलो

Submitted by मनीमोहोर on 20 March, 2017 - 04:58

गणपती आणि शिमगा ... होळी नाही, या दोन सणांशी कोकणातल्या लोकांचे अगदी जिवा भावाचे आणि अतूट नाते आहे . हे दोन सण म्हणजे कोकणी माणसाच्या मनातला अगदी हळवा कोपरा आहे. या दोन सणांना जगाच्या पाठीवर पोटासाठी कुठे ही फिरणारा कोकणी माणूस आपल्या कोकणातल्या मूळ घरी येण्यासाठी जीवाचं रान करतो आणि जर नाही शक्य झालं कोकणात येणं तर मनाने तरी या दोन सणांना तो कोकणातच असतो. इथे होळीच्या सणाला शिमगा असं म्हणतात

देवगड तालुक्यातल्या आमच्या या छोट्याशा गावची प्रथा म्हणजे अख्ख्या गावची म्हणून एकच असते होळी . ती आमच्या ग्राम देवतेच्या देवळा पुढल्या प्रांगणात पेटविली जाते . होळी साठी जे झाड तोडायचं ते फळणार नसावं आणि मालकाची परवानगी घेतल्या शिवाय कोणतंही झाड तोडायचं नाही ही आमच्या गावची परंपरा , जी पर्यावरणाचं रक्षण करणारी अशीच आहे . दुसरी एक गोष्ट म्हणजे होळीला कोणी ही बोंबाबोंब नाही करत आमच्या गावात. त्यामुळे आमच्या गावातल्या लहान मुलांना होळीची बोंबाबोंब माहीतच नाहीये .

होळी झाली की दुसऱ्या दिवसापासून शिमग्याच्या सणाला सुरवात होते . शिमगा हा एकच सण असा आहे कोकणात कि जेव्हा देव अब्दागिरी आणि तरंगांच्या रूपाने गावातील मानकऱ्यांच्या हस्ते गावातल्या अगदी प्रत्येक घरी जातात . यांच्या बरोबर खेळे ही असतात . . देव साधारण कधी कोणत्या घरी येतील याचे एक वेळापत्रक ठरलेले असते .

साक्षात देवच घरी येणार म्हणून आमच्या घरी ही दोन दिवस आधी पासून याची तयारी सुरु होते . आमचं खळं आम्ही पाण्याने धुऊन स्वच्छ करतो . अगदी आमची घाटी हि झाडून पुसून स्वच्छ केली जाते . अब्दागिरीला घालण्यासाठी आम्ही मोठा हार आणि झेंडूच्या फुलांची माळ ही आदल्या दिवशीच तयार करतो. प्रसाद म्हणून सुक्या खोबऱ्याची खिरापत ही आदल्या दिवशीच तयार केली जाते. . तसेच गुळाचा ही प्रसाद असतोच . खेळे करणाऱ्यांना श्रम परिहार म्हणून दरवर्षी लिंबू सरबत , अमृतकोकम, पन्ह असं काहीतरी ही बनवतो . मानकऱ्यांना द्यायचे मानाचे नारळ ही तयार ठेवले जातात .
त्या दिवशी सकाळ पासूनच धामधूम सुरु असते . घरातील वृद्धात वृद्ध व्यक्ती ही देव घरी येणार म्हणून नवीन कपडे घालून स्वागताला तयार असते . खळ्यात पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढली जाते . पूजेचे सगळे साहित्य खळ्यात नीट मांडले जाते . पूजा करणारी व्यक्ती ही टोपी वगैरे घालुन जय्यत तयारीत असते .

वाजत गाजत आगमन

IMG_20170320_144534.jpg

अखेर ढोल ताशांच्या गजरात तरंग आणि अब्दागिरी रुपात देवांचे खळ्यात आगमन होते . घरातले सगळेच जणं चार पावलं स्वागताला पुढे जातात . मोठ्या मांनाने देव आमच्या खळ्यात विराजमान होतात .

तरंग आणि अब्दागिरी
IMG_20170320_145130.jpg

त्यांची यथासांग पूजा केली जाते. घरातले सगळे मेम्बर भक्तिभावाने नमस्कार करतात . यावर कोकणातल्या लोकांची इतकी श्रद्धा आहे की कधी कधी नवस ही बोलले जातात इथे . इकडे पूजा होत असतानाच खेळे आपल्या नाचाला प्रारंभ करतात .

खेळे
IMG_20170320_145535.jpg

हे खेळे म्हणजे आमच्याच गावातील काही तरुण मंडळी असतात, जे ढोल ताशाच्या गजरात गरब्या सारखा नाच करतात . ह्यांची वेशभूषा वर फोटोत दिसते आहे तशी असते. शिमग्याच्या आधीपासूनच भरपूर सराव केल्या मुळे खेळे सुंदर नाच करतात . भान हरपून मंडळी त्यांचा परफॉर्मन्स पाहत असतात . ह्यात आमच्याकडे रोज कामाला येणारे ही काही जण असतात पण पूर्ण निराळ्या मेकप आणि वेशभूषे मुळे नीट निरखून बघितल्या शिवाय ते आम्हाला ही ओळखु येत नाहीत . पंधरा वीस मिनिट खेळे चालतात. शेवटी मानकरी यजमानाच्या सुख समृद्धी साठी कोकणातलं फेमस गाऱ्हाणं घालून आशीर्वाद देतात .

खेळयाना मग गूळ पाणी दिले जाते . प्रसाद दिला जातो . श्रमपरिहारासाठी सरबत, चहा, लाडू असं काहीतरी ही दिलं जात . खेळे ही एक लोक कलाच आहे आणि पैशाच्या पाठबळा शिवाय कोणतीही कला टिकणे शक्य नाही या विचाराने खेळ्याना भरघोस मानधन दिले जाते . नंतर हे तरंग आणि अब्दागिर वाजत गाजत दुसऱ्या घरी जातात तेव्हा सुद्धा यजमान मंडळी निरोपा दाखल चार पावलं त्यांच्या बरोबर चालतात .

खरं तर खेळे घरी असतात जेमतेम अर्धा पाऊण तास पण तरी ही ते गेल्या नंतर खळं मोकळं मोकळं आणि उदास भासायला लागत पण त्याचं बरोबर देव आपल्या घरी येऊन गेले आपण यथा शक्ती त्याचं स्वागत केलं हे मोठं समाधान ही असतंच .

असा हा खेळयांचा खेळ गावातल्या प्रत्येक घरी जातो . हा कार्यक्रम चांगला आठवडाभर तरी चालतो . पंचमीला घरा घरातली छोटी मुलं रंग लावून रंगपंचमी साजरी करतात . ह्यात मोठ्यांचा सहभाग बिलकुल नसतो . खेळे घरोघरी जाऊन आले की तरंग आणि अब्दागिरी परत देवळात स्थानापन्न होतात त्यापुढे मानाचा नारळ ठेवला जातो आणि शिमगोत्सवाची सांगता होते .

तसं बघायला गेलं तर खेळे ही एक लोककलाच आहे पण त्याला धर्माची ही जोड दिल्यामुळे काळाच्या ओघात ही कोकणातून नष्ट होणार नाही असा विश्वास वाटतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>कुणीतरी पालखी नाचवल्याचे, व उंचच उंच होळीचे व्हि.डी.ओ. किमान फोटो तरी दाखवा ग/रे!<<

होळीचा नाहि, पण हा पालखीचा विडियो गोड मानुन घ्या...

>>देवाचा अवमान समाजला जातो.<<

उनाड पप्पु, हे ऐकलेलं आहे. देवळातहि पाय खाली (लोंबकळत) सोडुन बसु नये असं ऐकलेलं आहे; लिंबुशेटना त्या मागचं कारण माहित असेल...

इतक्या सुंदर प्रतिसादांसाठी सगळ्यांचे आभार .

अंजू , किती वाईट ना साकव कोसळणे हे ! लाकडी साकव तसे मजबूत कमीच असतात.

राज व्हिडीओ बघितला . फार सुंदर आहे .

छान लेख!
आमच्या गावी खेळे येतात तर आईच्या गावी पालखी येते. प्रत्येक गावातल्या रीती वेगवेगळ्या असतात, त्यानुसार पालखी/खेळे यायचा दिवस, त्यांचा पेहराव वेगवेगळे असतात.
पालखी नाचवताना पण वेगवेगळ्या पद्धतीने नाचवतात. हे बघायला खुप मजा येते.

मस्त ! नेहमीप्रमाणेच ! आणि कोकणातलाच असल्याने आणखी जवळचा लेख. मला कोकणाबद्दल आमच्या घरून जितके वर्णन ऐकून माहीत नसते तितके तुमच्या लेखातून समजते.
गणपती आणि शिमगा (होळी) हे दोन्ही सण मात्र खरेच अगदी जवळचे.. तसेच मुंबईकर असल्याने गोकुळाष्टमी (दहीहंडी) आणि नवरात्र देखील.. दिवाळी नाताळ वगैरे सुट्टी बोनस असते म्हणूनच काय ते कौतुक..

कोकण, कोकणातली माणसं, कोकणातले सण, प्रथा, परंपरा सगळं छान च आहे
पुन्हा एकदा इथे शेअर केल्याबद्दल आभार

आमच्याइकडे पण पालखी येते. त्यासोबत तरंग नि अब्दागिरी, निशाणं असतात.

ढोलताशे वाजवणारी छोटीमोठी मंडळी. Happy
20170316_170802_opt-1.jpg

रत्नागिरीचं ग्रामदैवत कालभैरवाची पालखी..
IMG_20170316_171754_opt.jpg

रत्नागिरीत कालभैरवाला प्रेमाने सगळे "भैरी" म्हणतात. ही पालखी घर घेत नाही तर रस्त्यावरूनच जाते. ज्यांना हुलपे (नारळ, तांदूळ, पेढे, हार) द्यायचे असतील त्यांनी ते रस्त्यावरच उभं राहून देवाला वाहायचं.

गजानन धन्यवाद प्रतिसादा साठी .

निधी, फोटो आणि प्रतिसाद दोन्ही आवडले .

मस्त ! नेहमीप्रमाणेच ! आणि कोकणातलाच असल्याने आणखी जवळचा लेख. मला कोकणाबद्दल आमच्या घरून जितके वर्णन ऐकून माहीत नसते तितके तुमच्या लेखातून समजते. >> ऋ, धन्स

असुफ , तूम्ही नेहमी देता प्रतिसाद माझ्या कोकणावरच्या लेखाला . खूप खूप आभार .

जिप्सी, सुलक्षणा धन्यवाद .

हेम , मी ते लिहिलं आणि मला ही तुम्ही लिहीलय तसंच वाटलं . म्हटल राहू दे नाही कोणाच्या लक्षात येणार . पण मानलं तुम्हाला , तुमच्या बरोब्बर आलं लक्षात .

मायबोली ने हा लेख आपल्या होम पेज वर ठेवला आहे . सर्व कोकणवासीयांचा अभिमान ! धन्यवाद मायबोली .

अजून एक खास प्रथा म्हणण्यापेक्षा खेळ रंगतो आमच्या गावी.... शिमग्याची सुरुवात होळी पासून होते. जिथे कुठे होळी तोडली असेल तिथून ती होळीच्या मांडापर्यंत वाजत गाजत आणली जाते. होळी उचलताना सर्व गावकरी आपला हातभार लावतात. जसजसा मांड जवळ येतो तसे होळी उचललेले सर्वजण सावध होतात.... आणि योग्य अशी मोकळी जागा दिसली कि सुरु होतो खेळ ताकदीचा... आपोआप २ भागात विभाजन होते आणि शेंड्याकडील लोक होळीला बुंध्याकडे रेटायला किंवा बुंध्याकडील लोक शेंड्याच्या दिशेने अशी उलट रेटारेटी सुरु होते.... जी बाजू मागे ढकलली गेली ती मग जास्त जोर लावते... असा खेळ सुरूच राहतो... शेवटी मग गावातील जुने-जाणते मध्यस्ती करतात... पुढील कामाला उशीर होतोय अशा सबबी सांगून खेळ संपवतात.... IMG-20170304-WA0014.jpg

उनाड पप्पू , रस्सी खेच ला खुप मजा येत असेल ना ! फोटो पण मस्तच आलाय .
सायु, पुढच्या वर्षी ये इकडे शिमग्याला .

धन्यवाद मनीमोहोर... रस्सी खेच नाही तर अगदी त्याच्या उलट (ढकल) असते हे.... पण हो.. काही ही असले तरी खूप खूप मजा येते... खरे तर या खेळात कोणतीच बाजू हार पत्करायला तयारच नसते...

पन्नास प्रतिसाद . आभार सर्वांचे . प्रतीसादांमधून ही किती नवीन माहिती मिळाली आहे .

श्री, साडीपासून बनवलेला स्कर्ट आणि वर शर्ट असा पोशाख असतो खेळयांचा . डोक्यावर फेट्यासारख काहीतरी, त्यावर गजरा, गळ्यात माळा कानात डुल आणि हातात दोन दांडिया म्हणजे काठ्या अशी वेशभूषा असते खेळयांची . कोकणातले लोकं मुळात बारीक त्यात भरपूर सराव केलेला त्यामुळे खेळयांच्या हालचाली खूपच ग्रेसफुल असतात . बघायला खरंच खूप छान वाटत . >> :-O हे तर क्रॉसड्रेसिंग आहे. काय कारण असेल बरे याच्यामागे? आयमीन या अशा परंपरा निर्माण होणे, टिकणे, त्यात कोणालाच काही गैर न वाटणे; पण इतरवेळी जर कोणी क्रॉसड्रेसिंग केलं तर त्याला हिणवणे, वाळीत टाकणे... माणसाच्या या विरोधी वागण्यामागे काय कारणं असतील ब्वॉ?

मनीमोहोर , तुमच्या लेखामुळे त्यातील प्रचितींमुळे कोकणातील सणवार ,चालीरिती जवळून पाहिल्याचे सुख मिळते ...

Lekh khup sunder. Awadla.

"आमचं खळं आम्ही पाण्याने धुऊन स्वच्छ करतो . अगदी आमची घाटी हि झाडून पुसून स्वच्छ केली जाते . "....Khale ani ghati mhanje Kay?

"आमचं खळं आम्ही पाण्याने धुऊन स्वच्छ करतो . अगदी आमची घाटी हि झाडून पुसून स्वच्छ केली जाते . "....Khale ani ghati mhanje Kay?>> खळं म्हणजे अंगण आणि घाटी म्हणजे मुख्य रस्त्यावरुन घरापर्यंत उतरत येण्याचा पायर्‍या पायर्‍यांचा रस्ता.

पहिल्या प्रचिमध्ये मागच्या बाजुला काही लोक खाली उतरत आहेत, ते ज्या वाटेवरुन खाली उतरत आहेत, त्याला घाटी म्हणतात. कोकणात बरीचशी वस्ती डोंगर उतारावर असते त्यामुळे काही घरांत उतरायला तर काही घरांना चढायला घाटी असते.

धन्यवाद सगळ्यांना . अँमी, मुद्दा विचार करण्या सारखा आहे गमभन, मेग विशेष आभार .
हा आमच्या घाटीचा फोटो . डोंगर चढण्या साठी अशा पायऱ्या केलेल्या असतात कोकणात त्यांना घाटी म्हणतात . ही आमची घाटी बांधीव आणि सुबक आहे पण कच्च्या पायऱ्यांची हि असते घाटी . ही घाटी शंभर हुन अधिक वर्षांपूर्वी माझ्या अजेसासऱ्यांनी स्वतः च्या हाताने बांधलेली आहे . पण अजून ही किती सुबक आणि दणकट आहे , एक दगड हललेला नाहीये अजून .
DSCN1469.jpg

माय बोलीवरच माझा "खेड्यामधले घर कौलारू" नावाचा धागा आहे तो पण बघा प्लिज म्हणजे जास्त आयडीया येईल. ही त्याची लिंक
http://www.maayboli.com/node/48586

मस्त! सचित्र समजवलंत. कोकणातले अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे लाल दगड एकावर एक रचुन तयार केलेल्या भिंती. त्याला गडगा म्हणतात. या घाटीच्या दोन्ही बाजूंनी गडगे घातलेले आहेत.

गमभन, धन्यवाद . विषयांतर आहे तरी ही सांगतेच .
गडगे हा खरं तर स्वतंत्र विषय आहे . विविध आकाराचे दगड नुसते एकमेकांवर रचून आणि मध्ये मातीच बायडिंग घालून हे गडगे घातले जातात कुंपण म्हणून . आमचं गाव हे गडग्यां साठी प्रसिद्ध आहे . आमच्या गावातले गडगे मजबूत,रुंद आणि सरळ असतात . वरची लेव्हल इतकी चांगली असते की शेम्बड पोर हि त्यावरून धावत जाऊ शकतं
हा गडग्याचा फोटो

IMG_20170410_174623.jpg

Mala Konkan itke awdte, (mi koknat janmale, Wadhle nahi tari!)
ki, tumha sarva Konkan wasiyancha heva wayat asto.
How konkani people can live outside konkan, I can't imagine.

Pages