शिमगो ... कोकणातलो

Submitted by मनीमोहोर on 20 March, 2017 - 04:58

गणपती आणि शिमगा ... होळी नाही, या दोन सणांशी कोकणातल्या लोकांचे अगदी जिवा भावाचे आणि अतूट नाते आहे . हे दोन सण म्हणजे कोकणी माणसाच्या मनातला अगदी हळवा कोपरा आहे. या दोन सणांना जगाच्या पाठीवर पोटासाठी कुठे ही फिरणारा कोकणी माणूस आपल्या कोकणातल्या मूळ घरी येण्यासाठी जीवाचं रान करतो आणि जर नाही शक्य झालं कोकणात येणं तर मनाने तरी या दोन सणांना तो कोकणातच असतो. इथे होळीच्या सणाला शिमगा असं म्हणतात

देवगड तालुक्यातल्या आमच्या या छोट्याशा गावची प्रथा म्हणजे अख्ख्या गावची म्हणून एकच असते होळी . ती आमच्या ग्राम देवतेच्या देवळा पुढल्या प्रांगणात पेटविली जाते . होळी साठी जे झाड तोडायचं ते फळणार नसावं आणि मालकाची परवानगी घेतल्या शिवाय कोणतंही झाड तोडायचं नाही ही आमच्या गावची परंपरा , जी पर्यावरणाचं रक्षण करणारी अशीच आहे . दुसरी एक गोष्ट म्हणजे होळीला कोणी ही बोंबाबोंब नाही करत आमच्या गावात. त्यामुळे आमच्या गावातल्या लहान मुलांना होळीची बोंबाबोंब माहीतच नाहीये .

होळी झाली की दुसऱ्या दिवसापासून शिमग्याच्या सणाला सुरवात होते . शिमगा हा एकच सण असा आहे कोकणात कि जेव्हा देव अब्दागिरी आणि तरंगांच्या रूपाने गावातील मानकऱ्यांच्या हस्ते गावातल्या अगदी प्रत्येक घरी जातात . यांच्या बरोबर खेळे ही असतात . . देव साधारण कधी कोणत्या घरी येतील याचे एक वेळापत्रक ठरलेले असते .

साक्षात देवच घरी येणार म्हणून आमच्या घरी ही दोन दिवस आधी पासून याची तयारी सुरु होते . आमचं खळं आम्ही पाण्याने धुऊन स्वच्छ करतो . अगदी आमची घाटी हि झाडून पुसून स्वच्छ केली जाते . अब्दागिरीला घालण्यासाठी आम्ही मोठा हार आणि झेंडूच्या फुलांची माळ ही आदल्या दिवशीच तयार करतो. प्रसाद म्हणून सुक्या खोबऱ्याची खिरापत ही आदल्या दिवशीच तयार केली जाते. . तसेच गुळाचा ही प्रसाद असतोच . खेळे करणाऱ्यांना श्रम परिहार म्हणून दरवर्षी लिंबू सरबत , अमृतकोकम, पन्ह असं काहीतरी ही बनवतो . मानकऱ्यांना द्यायचे मानाचे नारळ ही तयार ठेवले जातात .
त्या दिवशी सकाळ पासूनच धामधूम सुरु असते . घरातील वृद्धात वृद्ध व्यक्ती ही देव घरी येणार म्हणून नवीन कपडे घालून स्वागताला तयार असते . खळ्यात पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढली जाते . पूजेचे सगळे साहित्य खळ्यात नीट मांडले जाते . पूजा करणारी व्यक्ती ही टोपी वगैरे घालुन जय्यत तयारीत असते .

वाजत गाजत आगमन

IMG_20170320_144534.jpg

अखेर ढोल ताशांच्या गजरात तरंग आणि अब्दागिरी रुपात देवांचे खळ्यात आगमन होते . घरातले सगळेच जणं चार पावलं स्वागताला पुढे जातात . मोठ्या मांनाने देव आमच्या खळ्यात विराजमान होतात .

तरंग आणि अब्दागिरी
IMG_20170320_145130.jpg

त्यांची यथासांग पूजा केली जाते. घरातले सगळे मेम्बर भक्तिभावाने नमस्कार करतात . यावर कोकणातल्या लोकांची इतकी श्रद्धा आहे की कधी कधी नवस ही बोलले जातात इथे . इकडे पूजा होत असतानाच खेळे आपल्या नाचाला प्रारंभ करतात .

खेळे
IMG_20170320_145535.jpg

हे खेळे म्हणजे आमच्याच गावातील काही तरुण मंडळी असतात, जे ढोल ताशाच्या गजरात गरब्या सारखा नाच करतात . ह्यांची वेशभूषा वर फोटोत दिसते आहे तशी असते. शिमग्याच्या आधीपासूनच भरपूर सराव केल्या मुळे खेळे सुंदर नाच करतात . भान हरपून मंडळी त्यांचा परफॉर्मन्स पाहत असतात . ह्यात आमच्याकडे रोज कामाला येणारे ही काही जण असतात पण पूर्ण निराळ्या मेकप आणि वेशभूषे मुळे नीट निरखून बघितल्या शिवाय ते आम्हाला ही ओळखु येत नाहीत . पंधरा वीस मिनिट खेळे चालतात. शेवटी मानकरी यजमानाच्या सुख समृद्धी साठी कोकणातलं फेमस गाऱ्हाणं घालून आशीर्वाद देतात .

खेळयाना मग गूळ पाणी दिले जाते . प्रसाद दिला जातो . श्रमपरिहारासाठी सरबत, चहा, लाडू असं काहीतरी ही दिलं जात . खेळे ही एक लोक कलाच आहे आणि पैशाच्या पाठबळा शिवाय कोणतीही कला टिकणे शक्य नाही या विचाराने खेळ्याना भरघोस मानधन दिले जाते . नंतर हे तरंग आणि अब्दागिर वाजत गाजत दुसऱ्या घरी जातात तेव्हा सुद्धा यजमान मंडळी निरोपा दाखल चार पावलं त्यांच्या बरोबर चालतात .

खरं तर खेळे घरी असतात जेमतेम अर्धा पाऊण तास पण तरी ही ते गेल्या नंतर खळं मोकळं मोकळं आणि उदास भासायला लागत पण त्याचं बरोबर देव आपल्या घरी येऊन गेले आपण यथा शक्ती त्याचं स्वागत केलं हे मोठं समाधान ही असतंच .

असा हा खेळयांचा खेळ गावातल्या प्रत्येक घरी जातो . हा कार्यक्रम चांगला आठवडाभर तरी चालतो . पंचमीला घरा घरातली छोटी मुलं रंग लावून रंगपंचमी साजरी करतात . ह्यात मोठ्यांचा सहभाग बिलकुल नसतो . खेळे घरोघरी जाऊन आले की तरंग आणि अब्दागिरी परत देवळात स्थानापन्न होतात त्यापुढे मानाचा नारळ ठेवला जातो आणि शिमगोत्सवाची सांगता होते .

तसं बघायला गेलं तर खेळे ही एक लोककलाच आहे पण त्याला धर्माची ही जोड दिल्यामुळे काळाच्या ओघात ही कोकणातून नष्ट होणार नाही असा विश्वास वाटतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्णन..
मी प्रत्यक्ष कधी बघितलं नाही पण काही नाटकात आणि इतर कार्यक्रमांत बघितलं आहे.

मी याच वर्षी त्या सुमारास कोकणातच होतो चिपळूण गुहागर भागात आणि शिमग्याची सुरेख झलक अनुभवायला मिळाली.
मी होळीच्या दुसर्‍या दिवशी निघून येणार म्हटल्यावर ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर जे भाव दिसत होते त्यावरून शिमग्याची महती कळलीच... Proud

आता एक वर्ष मुद्दाम त्या सुमारास रजा टाकून को़कणात घालवायचे आहेत.

ममो. मी वाचलं नाही. आधी फोटो पाहिले ते नाहीत म्हणून फार वाईट वाटलं. किती वर्षात ह्या सगळ्याला मुकलेय मी Sad
मी फार आतुरतेने शिमग्याचे, होळीचे फोटो आणि वि.डि.ओंची वाट पहात होते. असतील तर जरूर जरूर इथे डकव, किंवा मला पाठव.
आता लेख वाचते.

धन्यवाद सगळ्यांना .
नवीन मायबोलीवरचा हा पहिलाच लेख आहे . त्यामुळे फोटो अपलोड ला जरा जड जातंय . तशातच सध्या कोकणातच आहे त्यामुळे नेट ही बेभवरवशाच . एकदा अपलोड सगळं फेल गेलं. आता तीन फोटो अपलोड करून सेव्ह केलंय . थोड्या वेळाने आणखी दाखवते फोटो .

छान लिहिलंय.
छान असतो कोंकणातला शिमगा !
होळी/शिमगा हे गलिच्छ, शिव्या घालायचे सण आहेत हे मलाही हल्लीच कळलं.

मस्त लेख! कोकण म्हटल की शिमगा आणी गणपतीचा उल्लेख आल्याशिवाय राह्त नाही, कोकणातल्या गणपती उत्सवाबद्दल कुठे फोटो , कुठे माहीती अस थोड तरी वाचायला मिळाल होत पण शिमग्याची माहिती पहिल्यादाच वाचली, जमल तर खेळ्याच्या नाचाचा व्हिडियो अप्लोड करता आला तर बघायला आवडेल. ( अर्थात कलाकारची परवानगी असेल तरच ) .

माझी पत्नी सुद्धा देवगड तालुक्यातलीच आहे, तीनेसुद्धा या खेळयांचं वर्णन करुन सांगितलं होतं पण आपल्या फोटोमुळे पूर्ण कल्पना आली. पण प्रत्यक्ष पाहणं आणि त्यातली मजा वेगळीच...

छान माहिती आणि फोटोज .
तरंग आणि अब्दागिरीचे वेगवेगळे फोटो दिले तर समजेल नक्की काय आहे ते. आणि ते खेळे स्कर्ट घालतात की साडी नेसतात ? फोटोत स्कर्ट साडीसारखा प्रकार दिसतोय.

17265115_2272685579624204_7128372406593231297_n.jpg

ह्ये आमच्या गांवचे खेळे; तुमचो गांव खयचो?..

धन्यवाद सर्वाना .
हार्पेन खरच एखाद्या वर्षी नक्की बघा हे खेळे .
जागू, शोभा बघा फोटो . केलेत आता अपलोड .
विक्रममाधव, प्रत्यक्ष बघताना खूप मजा येते .
श्री, साडीपासून बनवलेला स्कर्ट आणि वर शर्ट असा पोशाख असतो खेळयांचा . डोक्यावर फेट्यासारख काहीतरी, त्यावर गजरा, गळ्यात माळा कानात डुल आणि हातात दोन दांडिया म्हणजे काठ्या अशी वेशभूषा असते खेळयांची . कोकणातले लोकं मुळात बारीक त्यात भरपूर सराव केलेला त्यामुळे खेळयांच्या हालचाली खूपच ग्रेसफुल असतात . बघायला खरंच खूप छान वाटत .
पहिल्या फोटोत पुढे जे गोल दिसत आहे ते अब्दागिर आणि मागे तीन काठ्या दिसतायत ते तरंग .
राज नाडण हे आमचं गाव . तुमचं गाव कंच म्हनायच ?

माझ्या आईच्या माहेरच्या मूळ गावी पालखी नाचवणं हा प्रकार असे. महादेवाची पालखी वाजतगाजत घरी येणार.. मग तिची यथासांग पूजा, इतर विधी, गार्‍हाणं घालणं हे सगळं असेच, पण ठराविक तालात ढोल-ताशा वाजवला जाई आणि घरातलेच २ कर्ते पुरूष दोन्हीकडून पालखी धरून ती तालात नाचवत. शिमग्यासाठी म्हणून सगळेच आलेले असत. त्यामुळे काका-पुतणे-तरणी पोरे-कुणी हौशी असे, पण यजमान घरातले पुरूष असत.
माझे काका आजोबा तसे बारीक अंगकाठीचे आणि काटक होते, पण तरी एके वर्षी वयपरत्वे आता त्यांना पालखी नाचवणं झेपेल का अशी शंका होती. पण पालखी दाराशी आली आणि त्यांचा चेहरा उजळला. कुठून त्यांना जोर आला महादेवास माहिती, पण त्यांनी खूप उत्साहाने पालखी नाचवली होती.

तसंच 'आयना का बायना घेतल्याशिवाय जायना...' म्हणत संकासूर यायचे दाराशी. आमच्याकडे न चुकता एक काका संकासुराचं सोंग काढून येत आणि मी न चुकता (ते 'तेच' इतर वेळी ओळखीचे असलेले काका आहेत हे माहिती असूनही!) जोरात भोकाड पसरत असे! Proud

राज ... तुमच्या गावच्या खेळ्यांचा फोटो बघून (फोटोमध्ये उजवीकडे एक गृहस्थ पाय खाली सोडून बसले आहेत) मला आमच्या गावाची एक रूढी आठवली. आमच्याकडे शिमग्यात जिथे जिथे पालखी असेल/खेळ चालू असेल तिथे कोणीही असे पाय सोडून बसायचे नसते. देवाचा अवमान समाजला जातो. त्यामुळे मग एकतर खाली जमिनीवर बसायचे किंवा खुर्ची किंवा कठड्यावर बसलेच तर पाय वर घेऊन मांडी घातल्या सारखे बसायचे. पण काही नवीन लोक किंवा ज्यांना या गोष्टीचा विसर पडतो ते असे पाय खाली घेऊन बसले आणि ते इतर ज्या कोणाच्या लक्षात येईल त्याने नकळत जाऊन त्याचे पाय धरायचे आणि "होळीयो ... होळीयो ... बो..बो..".. अशी बोंब मारायची. आणि पाय सोडून बसलेल्या व्यक्तीकडून एक नारळ घ्यायचा आणि तो तिथेच फोडून खायचा.... अशी प्रथा आहे...

आभार सर्वांचे पुनः एकदा .

प्रज्ञा आणि उनाड पप्पू प्रतिसाद खूप आवडला .

अशा वेगळ्या काही प्रथा असतील तर नक्की लिहा इथे म्हणजे माहिती संकलित होईल इथे .

मस्त वाटतंय वाचायला हे. फोटोंमुळे अगदी डोळ्यापुढे उभा राहिला तो माहौल!
कोकणातले साधेपणानं पण उत्साहानं साजरे केलेले स्ण बघायला बरं वाटतं. उत्सवाची सोज्वळता टिकून आहे असं वाटतं. समाधान वाटतं.
मी एका गोकुळाष्टमीला होते रत्नाग्रीत. डोल्बीशिवायची दहीहंडी बघायला इतकं मस्त वाटलं!

माझ्या आईच्या माहेरच्या मूळ गावी पालखी नाचवणं हा प्रकार असे.>>>>>>>>>>आमच्या लहानपणी आम्ही कोकणात होतो. तिथेही पालखी नाचवण्याची प्रथा होती. मानाच्या घरी पालखी यायची. वेगवेगळ्या ग्रामदेवतांच्या पालख्या यायच्या. मग त्या दिवशी शाळा अर्धा दिवस, किंवा पूर्ण सुट्टी असायची. त्या वेळी वाजवले जाणारे ढोल, घंटा याचा नाद अजून माझ्या कानात घुमतोय.
होळीच्या आधी काही दिवस खेळे घरी यायचे त्याचा पेहराव, काही टॉवेल लावलेले, किंवा हाफ़ पँट असा असायचा. मधोमध ढोलकी वाजवणारे बसत, व त्यांच्या भोवती हे खेळे नाचत.

दुसया गावी वेगळी प्रथा होती त्यात एक मुलगा स्री पात्र करायचा व बाकीचे कुणी वेगळी वेगळी सोंग घेऊन नाच करायचे.

कुणीतरी पालखी नाचवल्याचे, व उंचच उंच होळीचे व्हि.डी.ओ. किमान फोटो तरी दाखवा ग/रे!

गणपती आणि होळी/शिमगा ह्या सणांना मी मनाने कोकणातच पोहोचलेली असते.

त्या स्त्री पात्रांना गोमू म्हणतात बहुतेक. नवरा सांगत होता मध्ये आमच्याकडे गोमू नाचायला येते. मी काही या दिवसात गेले नाहीये सासरी माहेरी कुठेच.

माहेरी पण पालखी येते. यंदा आमच्या माहेरच्या गावात (कळंबुशी, ता. संगमेश्वर) होळीचं झाड आणताना खूप गर्दीमुळे साकव कोसळल्याची घटना घडली, सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण बरेच जण जखमी झाले आणि गालबोट लागलं. सर्व channelवर दाखवत होते.

यंदा आमच्या माहेरच्या गावात (कळंबुशी, ता. संगमेश्वर) होळीचं झाड आणताना खूप गर्दीमुळे साकव कोसळल्याची घटना घडली, सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण बरेच जण जखमी झाले आणि गालबोट लागलं>>>>>>>>.मी त्याचदिवशी रेडिओवर ही बातमी संध्याकाळी ऐकली. नदीला पाणी नव्हतं म्हणून बरं झालं, तरी साकवावरून पडल्यामुळे बरंच लागलं असेल. Sad

Pages