मराठी भाषेला आजवर अनेक गोड पहाटस्वप्ने पडून ती खरी झाली आहेत. मुकुंदराज, चक्रधरस्वामी ह्यांसारख्या धुरंधरांनी लावलेल्या ह्या वेलीवर सुरवातीला ज्ञानोबाचा मोगरा जो फुलला, तेव्हापासून ह्या भाषेचा फुलोरा कायम डवरलेलाच आहे. 'माझा मराठाचि बोलु कौतिकें | अमृतातेंहि पैजा जिंकें |' म्हणणार्या ज्ञानाची शरदाच्या चांदण्यासारखी शीतल प्रतिभागंगा आजवर अनेक वळणे आणि रूपे घेत वाहत आली आहे. पारिजात, बकुळ, गुलाब, जाई, कमळ, जास्वंद अशा अनेक फुलांबरोबरच ह्या वेलीवर गेल्या शतकामध्ये एक पिवळाधमक, सुवासिक, पण अजिबात नाजूक नसलेला विरक्त सोनचाफा फुलला, व आपल्या गंधाने आसमंत व्यापून दशांगुळे उरला. नव्या युगाची पहाट मराठीच्या दालनात घेऊन येणारा हा मराठीचा शिलेदार म्हणजे बाळ सीताराम मर्ढेकर! एकाच वेळी आत्यंतिक प्रतिभेतून निर्माण होणारे समाधान आणि दुसरीकडे 'कुठल्याही चौकटीत बसवण्याचा प्रयत्न तर करून दाखवा!' असे आव्हान देण्याची ह्या कवीमध्ये क्षमता आहे. त्यामुळे फक्त वेगळी कविताच नव्हे, तर एक नवीनच साहित्यसंस्कृती निर्माण करण्यात त्यांनी महत्वाचा हातभार लावला.
वास्तविक पाहता मर्ढेकर आणि मी - आमची फार ओळख व्हायचे काही कारण नव्हते. नववी की दहावीच्या कुमार की बाल की कुठल्या तरी भारतीच्या पुस्तकात त्यांची 'पितात सारे गोड हिवाळा' आम्हाला लावली होती खरी. पण शाळेच्या पुस्तकांत 'लावलेल्या' कविता ह्या फक्त परीक्षेमध्ये 'वाट लावण्यासाठी' असतात, असे मानण्याचा तो काळ. त्यात मर्ढेकर कोण, ना. घ. देशपांडे तरी कोण, करंदीकर तरी कोण! त्यातून कुठेतरी अर्धवट एक-दोन लेख वाचून त्याकाळच्या वादांबद्दल थोडेफार कळल्याने, शाळेतल्या मारकुट्या मुलाकडे जशी मुले भीत भीत बघत बघत जातात, तसे काहीसे मी मर्ढेकरांकडे दबकूनच पाहत त्यांना वळसा घालून पुढे गेलो होतो.
'न्हालेल्या जणुं गर्भवतीच्या
सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरिचें उजळित येई
माघामधलीं प्रभात सुंदर'
म्हणणारे मर्ढेकर कुठले मला तेव्हा कळायला! न्हालेली गर्भवती वगैरे प्रतिमा कळायचे ते काही माझे वय नव्हते. वास्तविक 'डोकीं अलगद घरें उचलती | काळोखाच्या उशीवरुनी' सारख्या कितीतरी नितांतसुंदर प्रतिमा ह्यात आहेत.
ह्यात बदल घडवून आणला तो पुलंसारख्या साहित्यिकाने. वास्तविक 'पिपांत मेले ओल्या उंदीर'चे त्यांचे विडंबन मी वाचलेले होते. पण त्यात कोठेही मर्ढेकरांबद्दल नाराजी नाही, हे लक्षात आले होते. पुलंच्या कितीतरी लेखांत मर्ढेकरांच्या ओळी उद्धृत केलेल्या असल्याने मर्ढेकरांबद्दलची भीती जरा चेपली गेली. अशातच कधीतरी 'मर्ढेकरांची कविता' हाती घेतली गेली. 'बघूया तरी काय प्रकार आहे हा!' म्हणत कुठले तरी पान उघडले, आणि पाहतो तर -
'भंगुं दे काठिन्य माझें
आम्ल जाऊं दे मनीचें
येउं दे वाणींत माझ्या
सूर तूझ्या आवडीचे.'
हे म्हणणारा कवी विक्षिप्त? अश्लील?! हे तर पसायदानासारखे मागणे वाटते आहे! छे छे! काहीतरी चुकते आहे. पुढे बघू ...
'भावनेला येउं दे गा
शास्त्र-काट्याची कसोटी.'
हे वाचले, आणि हा वेडा कुठेतरी आपल्याच पंथाचा आहे, ह्याची खात्री पटली. बौद्धिकदृष्ट्या अत्यंत जागृत असलेला हा कवी फक्त भावनांचा बाजार मांडत नव्हता. शेवटी वाचकाचे मागणे काही खूप नसते. कुठेतरी कुणीतरी 'आपणासारखा' दिसावा एवढे एक झाले तरी म्होप झाले! आणि मग झरझर झरझर अजून कविता वाचून काढल्या, आणि मर्ढेकरांच्या प्रतिभेची साक्ष पटली. आणि मग मर्ढेकर माझ्या प्रवासातले कायम सोबती झाले!
मर्ढेकरांना उद्देशून मी 'सुवासिक', 'गंधाने आसमंत व्यापून टाकला' असे शब्दप्रयोग केल्याने अनेक जणांनी नाके मुरडली असतील. त्यात त्यांची काही चूक नाही. मर्ढेकरांच्या शब्दांवर न्यायालयात खटले भरले होते त्या काळात. शब्दांना जेरबंद करण्याचे हे काही इतिहासातले पहिलेच उदाहरण नाही. मुक्तछंदातल्या कवितेलाही अशीच नाके मुरडली गेली होती. काही लोकांचा कुठल्याही नवीन गोष्टीला विरोधच असतो. ती नवीन गोष्ट जुनी झाली, की तिच्यानंतर येणार्या अतिनवीन परंपरेलाही ते विरोध करतात. पण प्रतिभा ही अशा बेडीत अडकून राहत नसते. प्रतिभेच्या पाझराने मोठमोठाले खडक फुटतात, तर हे नर्मदाकाठचे गोटे म्हणजे कोण लागून गेले! विंदा करंदीकर, इंदिरा संत, अशांसारख्या कवींनी मर्ढेकरांचे ऋण मान्य केलेले आहे. परंपरागत संकेत आणि प्रतिमा त्यांनी झुगारून दिल्या, आणि कोणत्याही विरोधाला न जुमानता ते स्वतःच्या अनुभवातून आलेल्या आविष्काराशी ठाम राहिले. 'अमुचिया कविकुळा बोलु लागैल' म्हणणार्या कवी नरेंद्राचीच ही जातकुळी. वास्तविक मर्ढेकरांसारख्याच्या कवितेला निखळ कविता म्हणूनच पाहिले पाहिजे, प्रतिभाशक्तीचा आविष्कार म्हणून पाहिले पाहिजे. त्यांच्या कवितांमध्ये मानवी जीवनातील अर्थशून्यतेचा आविष्कार असेल, तरी त्यांमध्ये नुसतेच गलिच्छ प्रदर्शन नसून त्यांत जगण्यातल्या खोल विसंगतींबद्दलच्या दु:खाबद्दल नवीन आणि जुन्याचा यथायोग्य संकर करून सांगितलेले आहे, हे बघितले पाहिजे. त्यांच्या कवितांमध्ये खरे तर निर्मल मूल्यांविषयीची श्रद्धाच भरलेली आहे, हे बघितले पाहिजे.
'मागण्याला अंत नाही,
आणि देणारा मुरारी'
ह्यांसारखे अभंग गाणारा कवी महाराष्ट्राच्या परंपरेत बसणाराच आहे. सृष्टीचे चमत्कार डोळसपणे बघणारा आहे. जर त्याने सृष्टीतल्या विफलतेचे वर्णन केले असेल, तर तो परखडपणे सत्यकथन करणार्या वंशातला आहे म्हणूनच केले आहे. सृष्टीतली विफलता ही त्याने निर्माण केलेली नाही, तर तो तिच्याविषयी पोटतिडकीने सांगतो आहे, हे समजून घेतले पाहिजे.
'संत शब्दांचे नायक | संत अर्थांचे धुरंधर;
एक शब्दांचा किंकर | डप्फर मी ||'
म्हणणारे, संतांचा गौरव करणारे व त्यांच्याशी असलेली नाळ जणू तुटल्याचे दु:ख मानणारे मर्ढेकर किती लोकांना माहीत आहेत? हा संशोधनाचा विषय ठरेल.
मर्ढेकरांनी 'विफल' म्हणता येतील, अशा अनेक कविता लिहिल्या. 'शिशिरागम' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यामध्ये तुलनेने ही भावना कमी होती. निसर्गाचे वर्णन होते. 'सूर कशाचे वातावरणी?' ह्या प्रास्ताविकासारख्या लिहिलेल्या कवितेतून कवी स्वतःची उदासी विसरू पाहत होता. अनुभवाला भास समजून सोडून देण्याची कवीकल्पना करत होता. निराश प्रतिमा आल्या, तरी त्यांना सोडून देऊन वाट चालू पाहत होता. 'शिशिरऋतुच्या पुनरागमें' वाचताना पानगळीमुळे घर नष्ट झालेल्या पक्ष्यांबद्दलची कळकळ आणि त्यांना बागेतली 'बकुलावली' आधार देईल ही आशा हा कवीच्या मनातील भावभावनांचा खेळ आपल्याला समजतो.
'सौंदर्याचें जगतावरती पसरे बघ चांदणें
राहिलें काय अता मागणे!'
म्हणणार्या ह्या वाटसरूबद्दल वेगळीच आपुलकी मनी येते. सौंदर्याच्या प्रकट प्रत्ययाने मर्ढेकरांचे मन भरून येते, व ते त्यांच्या कलाविष्कारात स्पष्ट दिसते.
'मिटलेल्या कोमल कलिका | पानांमधि लपवी लतिका;
एकेकीस शोधुनि काढी | चुंबुनि ती फुलवी वेडी.'
मधली नाजुक जाई मनाला हळूच स्पर्शून, खुदकन हसून जाते. ह्या सर्वांमध्ये मर्ढेकरांवर बालकवींचा प्रभाव वाटतो. क्वचित कुठेतरी माधव ज्यूलिअनही दिसून जातात, आणि गोविंदाग्रजही.
मग 'काही कविता' पुस्तकात वेगळेच मर्ढेकर का दिसतात? ह्या प्रश्नाचा उहापोह करण्यात मराठी समीक्षकांची हयात गेली असेल. मी बापडा त्याविषयी काय म्हणणार? मर्ढेकरांनी
'प्रेमाचें लव्हाळें
सौंदर्य नव्हाळें,
शोधूं?
--आसपास
मुडद्यांची रास;
यंत्रांतून आग;
गोळ्यांचे पराग;'
ह्यांसारख्या ओळींतून भाषा आणि प्रतिमा ह्यांबद्दलचे रूढ संकेत उधळून लावले, आणि युद्धासारख्या भयंकर गोष्टीतले नैराश्य दाखवले. आता निराधार पाखरांचा विचार जाऊन निराधार माणसांचा विचार कवीने सुरू केला होता, आणि ते स्पष्ट शब्दांत कोणत्याही गोडगोड वेष्टनात न घालता सांगण्याचे धैर्य दाखवले होते. ह्याच सुमारास भा. रा. तांबे, तसेच रविकिरण मंडळाचे माधव ज्यूलिअन अशांसारखे जुने कवी अस्तंगत झाले होते. ह्याच काळात किंवा थोडे आधी कुसुमाग्रज, बोरकर, ह्यांसारखे कवी लिहिते झालेले होते. कवी अनिलांनी 'प्रेम आणि जीवन' सारखी सुंदर कविता मुक्तछंदात लिहून वेगळीच बहार आणली होती. एकंदरीत मराठी कविता एका नव्या मन्वंतराकडे वेगवेगळ्या प्रकारे जात होतीच. ह्या प्रवर्तनाचे सर्वात आघाडीचे शिलेदार मर्ढेकर ठरले. वाचकांच्या संवेदनशीलतेला ह्या 'काही कवितांनी' जबरदस्त हादरा दिला, व उच्छृंखल झरा जसा अकस्मात ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर झेप घेऊन एका वेगळ्याच दिशेला निघून जातो, तसे मराठी कवितेचे झाले. 'शिशिरागम'मध्ये एकटा पण थोडा आजूबाजूच्या गोष्टींत रमणारा कवी इथे वास्तवाच्या भानाचा एकदम चटका लागल्याने अनिकेत 'ट्रॅम्प' होऊन जातो. पण हा चार्ली चॅप्लिनसारखा विनोदी नाही, तर विमनस्क आहे. त्याच्या कवितेला चाकोरीबद्ध जगण्याच्या साखळ्यांचे भान आले आहे.
'सकाळी उठोनी | चहा-कॉफी घ्यावी,
तशीच गाठावी | वीज-गाडी ||
दातीं तृण घ्यावें | 'हुजूर' म्हणून;
दुपारीं भोजन | हेंची सार्थ ||'
अशा ओळींतून, किंवा
'देवाजीने करुणा केली,
सकाळ नित्याची ही आली'
अशा विडंबनांतून धास्तावलेल्या गरीब मध्यमवर्गीय माणसांचे चपखल रूप मर्ढेकरांनी पकडले आहे. 'पिपांत मेले ओल्या उंदीर'विषयी तर किती लिहावे? अनेक प्रकारे ह्या कवितेचे निरनिराळ्या अंगांनी विच्छेदन केले गेले. मर्ढेकर ज्या सुरात
'जगायची पण सक्ती आहे
मरायची पण सक्ती आहे'
सांगतात, ते ऐकून आपल्या तोंडात बसलेल्या 'गच्च लगामाची' जाणीव होते. मर्ढेकरांच्या मनात चाललेल्या अनेक जुगलबंद्या, तेथे असलेली अनेक द्वंद्वे ह्या कवितांतून दिसतात. त्यांच्या मनात वाजत असलेल्या सतारीवर एकाच वेळी किती वेगवेगळ्या तारा थरथरत होत्या, हे दिसते. महाकवीच्या अशा उत्कट अवस्थांची पूर्ण जाणीव असल्याशिवाय वाचकाने त्याच्या वाटेला जाऊ नये. अन्यथा आपणच त्यावर 'दुर्बोध', 'बीभत्स', 'काहीही' असे ठराविक शिक्के मारून मोकळे होतो. त्यांच्या ह्या कवितेत उंदरांचे पिपात निरुपद्रवी जगणे, आणि तसाच त्यांचा कोणाच्याही ध्यानीमनी नसलेला शेवट, हे माणसाच्या जगण्यावर परिणामकारक भाष्य आहे. अशी अनेक भाष्ये, अनेक सूत्रे ह्या कवितांमध्ये आहेत. आरती प्रभुंसारख्या कवीवर ह्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
'आज पाहिलें मरण | गेला भांबावून प्राण;
माझ्या ज्ञानाचे कुंपण | स्मशानांत ||'
अशासारख्या ओळींतून ज्ञानाच्या मर्यादांची जाणीव होते. किंबहुना हेच त्यांच्या वैफल्यास थोडेफार कारणीभूतही असावे. ज्ञात आणि अज्ञात ह्यांचा हा संघर्ष भलताच चमत्कारिक आहे. अर्धवट ज्ञानातून आनंद मिळत नाही, आणि अज्ञान सारखे डाचत राहते, असा हा वेगळाच पेचप्रसंग पडत राहतो.
'आणखी काही कविता' ह्या संग्रहातूनही हे चित्र स्पष्ट होते.
'जिथे मारते कांदेवाडी
टांग जराशी ठाकुरद्वारा'
असे सुरू होणारे म्हातार्या वेश्येच्या दिनचर्येचे वर्णन असो, की
'कुणिं मारावें, कुणी मरावें,
कुणी जगावें खाउनि दगड;'
अशी शाश्वत आणि अशाश्वताची टक्कर असो, कवीच्या मनात संघर्ष आहे. मध्यमवर्गीय माणसाची झालेली अवस्था 'सह नौ टरक्तु! सहवीर्यं डरवावहै' सारख्या विडंबनातून चर्रकन काचून जाते. आजही हे उद्गार किती जवळचे वाटतात! 'सर्वे जन्तु रुटिना: सर्वे जन्तु निराशया:' हे कवी पदरचे सांगत नाही, तर यांत्रयुगात मानवी मनाला येणारी निराशा दाखवतो आहे. पण त्याचबरोबर
'ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असूं दे;'
म्हणत देवाकडे दु:ख मागतोही आहे. हा सर्व विरोधाभास स्वतः अनुभवायला हवा. ही अनुभूती प्रत्यक्ष घ्यायला हवी. भले सारा अर्थ न कळेना! एखाद्या कलाकृतीचा अर्थ समजणे, आणि त्या कलाकृतीची कलेच्या क्षेत्रातली किंमत समजणे, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला हा अनुभव पिकासोची चित्रकला बघताना आला होता. कळत तर काहीच नाही, पण काहीतरी चांगले आहे, हे कळते आहे, असा अनुभव मर्ढेकरांच्या बाबतीत पहिल्यांदा वाचताना येऊ शकतो.
मर्ढेकरांच्या बाबतीत अश्लीलतेचा आरोप अनेकांनी केला. तो धुरळा आता बर्यापैकी खाली बसलेला आहे. त्याबाबतीत मी जास्त काही लिहीत नाही. त्यांना बेधडक भाषा वापरून वाचकांना खडबडून जागे करायचे होते असे वाटते. 'हाडांचे सापळे' झालेले पुरूष, आणि 'किरटी हाडबंडले' झालेल्या बायका, ह्यांच्यातल्या अर्थहीन, यंत्रवत् समागम त्यांना भयावह वाटत होता.
'सोडवेना सोडवीतां
गेल्या रात्रींचा हा पाश
जागा आहें तरी आता
मेल्या इच्छा सावकाश.'
अशा ओळींवर त्या काळात लोक भडकले, वादविवाद घडले. अनेक मान्यवरांनी त्यात भाग घेतला. 'लिंग', 'स्तन'सारखे शब्द मर्ढेकरांच्या कवितेत आल्याने खळबळ माजली. मराठी कवितेला हे नवीन परिमाण मर्ढेकरांनी बहाल केले. तिची नवी अभिव्यक्ती मर्ढेकरांनी घडवली. अभिव्यक्तीच्या कल्पनांत भारतात अजूनही इतका गोंधळ जाणवतो, की हे काम त्या काळात मर्ढेकरांनी केले, हा मोठाच क्रांतिकारी बदल आहे.
मर्ढेकरांचा आशयच इतका संपन्न आहे, की त्यांच्या भाषाशैलीकडे बघायला लोकांना ताकद उरत नाही. बोरकरांसारख्या कवीकडे जे भाषेचे लेणे दिसते, ते मर्ढेकरांकडे दिसत नाही, हे मात्र मान्य केले पाहिजे. शब्दांच्या आविष्कारात, शैलीबाजपणात मर्ढेकर थोडे कमी पडतात की काय, असे वाटत राहते. परंतु मर्ढेकरांनी रुपक, उपमा, उत्प्रेक्षा ह्या अलंकारांचा प्रभावी वापर करून ही त्रुटी फार जाणवू दिली नाही. मर्ढेकरांची रुपके आणि प्रतिमा ह्यांना स्वतःचे एक अस्तित्व येते. त्या कळीचे फुलात रूपांतर व्हावे तशा स्वतःहूनच फुलायला लागतात. त्यांच्या प्रतिमा वाचकाशी भावनांचे नाते जोडून समानता दाखवतात. 'गोळ्यांचे पराग' ह्या वर आलेल्या उपहास करणार्या प्रतिमेमधून मर्ढेकर किती चटकन वैफल्य सांगतात! हे सर्वच खुल्या डोळ्यांनी, झापडे न लावता बघायला हवे.
मर्ढेकरांवर असंख्य पुस्तके, लेख लिहिले गेले आहेत. चर्चासत्रे, परिसंवाद ... काही विचारू नका. ह्या लेखात मी कितीसे सांगणार? त्यांच्या सौंदर्यशास्त्रविषयक लिखाणाला मी स्पर्शही करू शकलेलो नाही. माझा तेवढा काही अभ्यासही नाही. त्यांच्या कवितांबद्दल जे वाटलं, ते लिहीलं, एवढंच. दोन-चार आवडलेल्या ओळी वगैरे. मराठी भाषा दिनानिमित्त एका महाकवीबद्दल मराठी भाषेला दिलेला हा छोटासा नजराणा. शेवटी मर्ढेकरांबद्दल ते त्यांच्या देवाला किंवा आदिशक्तीला उद्देशून जे म्हणतात तेच लागू पडते.
'किती पायी लागूं तुझ्या
किती आठवूं गा तूंतें;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनीं येतें.'
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
मलाही इथल्या अनेकांप्रमाणे मर्ढेकर पुलंच्या लिखाणातूनच माहीत आहेत. पण आता नक्कीच अधिक वाचायला आवडेल असं वाटतंय.
(ते बोरकर- मर्ढेकर- बाकीबाब कन्फ्यूजन वाचून 'थायलंड म्हणजेच सयाम' आठवलं!)
छान. स्पर्धेसाठी शुभेच्छा!
छान. स्पर्धेसाठी शुभेच्छा!
छान लिहीलय. एखाद्या चवीचे
छान लिहीलय. एखाद्या कवीचे समग्र काव्य वाचण्याइतका व्यासंग नाही पण एखादे काहीतरी भावते. मर्ढेकरांबद्दलही तसेच. तुमच्या व्यासंगाबद्दल सलाम.
सुरेख!
सुरेख!
वरदा चा प्रतिसाद आणि त्यावर भास्कराचार्यांचं स्पष्टिकरण तर खूपच आवडलं
छान लेख आणि चर्चा.
छान लेख आणि चर्चा.
मर्ढेकरांची शैली (शब/रचना मोडणे जसे गणपत वाणी बिडी बापडा/ पिता पिताना मरून गेला) ही मर्ढेकरांचे एक महत्वाचे योगदान नाहिये का? का या प्रकारची शैली आधीही प्रचलित होती?
सुंदर लेख! मनापासून धन्यवाद!
सुंदर लेख! मनापासून धन्यवाद!
बोरकर मी विशेष मागे लागून मनसोक्त वाचलेत आणि ऐकलेत. मर्ढेकर मात्र जितके सहज वाचनात आले तितकेच वाचलेत. तुमचा लेख वाचून आता मर्ढेकर नक्की वाचले/अनुभवलेच पाहिजेत असे वाटते आहे!!
पु.ल. - या माणसाचे मात्र उपकार किती आणि कसे मानावेत. पुलंच सगळं साहित्य बाजूलाच राहुद्यात. पण त्यांच्या जाणकार रसिकतेमुळे कितीतरी अस्सल लेखक, कवी, गायक, वादक... मराठी माणसांपर्यंत पोचले! एक नाही, अनेक पिढ्यांवर पुलंचे हे ऋण आहे.
सुंदर लेख! मनापासून धन्यवाद!
सुंदर लेख! मनापासून धन्यवाद!
मर्ढेकर आणि पुलं दोघेही
मर्ढेकर आणि पुलं दोघेही मध्यमवर्गीयांचे कवी-लेखक होते.
फार छान लिहिले आहे. एकदम दिल से. पुन्हा कविता वाचायची इच्छा झाली.
चार्य, चांगला लेख लिहिला आहे.
चार्य, चांगला लेख लिहिला आहे. मजा आली वाचायला, विचार करायला.
(पहिला पॅरेग्राफ >> असामी +१)
वरदाने आधीच म्हणले आहे तसे बोरकर आणि मर्ढेकर यांचा कवी म्हणून आणि माणूस म्हणूनही पिंडच वेगळा आहे. त्यामुळे कविता - अॅज अ फॉर्म ऑफ एक्स्प्रेशन यांची तुलना करावी का? असा प्रश्न मलाही पडला.
टण्या, मर्ढेकरांच्या आधी मराठी कविता ही बर्यापैकी छंदात, वृत्तात आणि ठराविक विषयातही अडकलेली होती. मर्ढेकरांनी 'नवकविता' लिहिली, किंवा त्या फॉर्म मधे त्यांना एक्स्प्रेस व्हावसं वाटलं, त्यावर इंग्रजी लिटरेचर आणि त्यांच्या इंग्लड मधील वास्तव्याचा प्रभाव नक्कीच असावा असे वाटते.
अप्रतिम लेख. खूप मनस्वीपणे
अप्रतिम लेख. खूप मनस्वीपणे लिहायचे ते, म्हणून बहुतेक असं वादग्रस्तही लिहून गेले असतील. पण काही काही कविता, अतिशय सुंदर आहेत. तुम्ही उधृत केलीत ''मिटलेल्या कोमल कलिका | पानांमधि लपवी लतिका;
एकेकीस शोधुनि काढी | चुंबुनि ती फुलवी वेडी' ती ही खूप छान आहे.
भाचा, खुप छान लिहिलंय.
भाचा, खुप छान लिहिलंय.
सुरेख लिहिलाय लेख. दोन तीनदा
सुरेख लिहिलाय लेख. दोन तीनदा वाचला.
मर्ढेकरांच्या सगळ्या कविता माहिती नाहीत. शाळेत असताना काही वेळा ऑप्शनला टाकलेले कवी.
त्यांच्याबद्दल कायम मनात एक दबदबाही राहिलाय.
पण तुमच्या लेखामुळे मर्ढेकर अॅप्रोचेबल वाटतायत.
धन्यवाद सगळ्यांचे. मध्यंतरी
धन्यवाद सगळ्यांचे. मध्यंतरी दीर्घकाळ प्रवासात असल्याने ह्या लेखाचा विसर पडला होता. हा लेख वाचून त्यांच्या कविता वाचाव्याशा वाटतायत, असं अनेकांनी लिहिलंय. तसे झाल्यास ह्या लेखाचे सार्थक होईल.
'भंगुं दे काठिन्य माझें
'भंगुं दे काठिन्य माझें
आम्ल जाऊं दे मनीचें
येउं दे वाणींत माझ्या
सूर तूझ्या आवडीचे.'
मी ही कविता अलीकडेच वाचली आणि मलाही मर्ढेकर वाचायला हवेत असे वाटू लागले . छान धांडोळा घेतलाय त्यांच्या कवितेचा ! जाता जाता इतर कवींचे केलेले अवलोकन छान ! अप्रतिम भाषाशैली !
धन्यवाद दत्तात्रय.
धन्यवाद दत्तात्रय.
Pages