आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपला अनेकांशी सबंध येतो. त्यापैकी काहीजण मराठी भाषिक असतात. बोलण्यासाठी समभाषिक माणूस मिळाल्यास आपल्याला आनंद होतो व त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याला हुरूप येतो. एखाद्याची नव्याने ओळख झाल्यास आपण प्रथम त्याचे नाव व गाव विचारतो. त्यानंतरचा स्वाभाविक प्रश्न असतो, ‘’आपण काय करता?’’ त्यातून आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या नोकरी अथवा व्यवसायासंबंधी जाणून घ्यायचे असते. माझा अनुभव असा आहे की वरील प्रश्नाचे उत्तर हे बहुतांश वेळा सरळ मराठीतून मिळत नाही. आपले नोकरीतील पद अथवा स्वतःच्या व्यवसायाचे स्वरूप सांगताना माणसे हटकून इंग्लीशचा भरपूर वापर करतात. ’आपण काय करता?’ या प्रश्नाचे उत्तर खूप कमी वेळा पूर्णपणे मराठीतून मिळते ही वस्तुस्थिती आहे.
हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आता मी बरीच उदाहरणे देतो. बघा, तुम्हाला पटताहेत का. एखाद्याच्या नोकरी /व्यवसायाचे स्वरूप आणि त्याने वरील प्रश्नाला दिलेले उत्तर अशा पद्धतीने लिहीत आहे. प्रत्येक वेळेस अवतरण चिन्हाचा वापर टाळत आहे.
१. शासकीय कर्मचारी : मी इरिगेशन डीपारमेंटला अकाऊंटसमध्ये आहे.
२. शासकीय अधिकारी: मी पी डबल्यू डी मध्ये चीफ सुपरवायझर आहे.
३. नोकरदार अभियंता : मी ‘अबक’ऑटो मध्ये वर्क्स मॅनेजर आहे.( एकूणच आपल्या देशातील बहुतेक अभियांत्रिकी उद्योगांची नावे ही इंग्लिश वा युरोपीय भाषेत असतात हा एक वेगळा मुद्दा).
४. व्यावसायिक अभियंता: माझे एम आय डी सी मध्ये एस एस आय युनिट आहे.
५. वैद्यक व्यावसायिक : माझे क्लिनिक / हॉस्पिटल /डिस्पेनसरी आहे.
६. वकील: मी सेशन्स कोर्टात अडव्होकेट आहे.
७. लष्करी सेवा: मी आर्मीत / नेव्हीत /एअर फोर्स मध्ये आहे.
८. अत्यावश्यक सेवा : मी फायर ब्रिगेडमध्ये आहे.
९. जाहिरात व्यावसायिक: आमची अॅड एजन्सी आहे.( हे तर १००% वेळा ).
...वरील यादी हवी तेवढी वाढवता येईल. पण आता पुरे. सांगायचा मुद्दा काय तर वरील आणि इतर काही नोकरी/ व्यवसायाचे स्वरूप प्रयत्न केल्यास नक्की मराठीत सांगता येईल. पण,तसे न करता ते जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये सांगणे हा सवयीचा अन प्रतिष्ठेचा भाग झाला आहे.
आता प्रत्यक्ष नोकरी वा व्यवसाय नसलेल्या काही क्षेत्रान्ची उदाहरणे देतो :
१. शहरी गृहिणी : मी हाउसवाईफ / होममेकर आहे.
२. लोकप्रतिनिधी : मी वार्ड नंबर ३५ चा कॉर्पोरेटर आहे.
३. समाजसेवक : मी सोशल वर्क करतो/करते, मी एका एन जी ओ साठी काम करतो/ करते.
आता वरील उदाहरणांमध्ये तर इंग्लिशचा आधार घ्यायची काहीही गरज नव्हती, हे कबूल? पण नाही, तो घेतल्याशिवाय आपल्या पदाला / कामाला भारदस्तपणा येत नाही !
‘’आपण काय करता?’’ या प्रश्नाला मराठीत उत्तर देणारे काही मोजके(च) अपवाद आहेत. बघूयात अशी उदाहरणे :
१. शेतकरी: मी शेती करतो.
२. मोलकरीण: मी धुण्या-भांड्याची कामे करते.
३. घरगडी : मी शेटजींच्या बंगल्यावर कामाला आहे.
४. मराठी शाळेतील ‘मराठी’ चा शिक्षक: मी मराठी भाषा शिकवतो.
५. पुरोहित : मी भटजी आहे, मी पौरोहित्य करतो. या बाबतीत मात्र मराठीतच सांगायला प्रतिष्ठा आहे !!
यावरून लक्षात येईल की आपल्याला भेटणाऱ्या मराठी माणसांपैकी जास्त जण हे त्यांच्या उद्योगाची माहिती ही इंग्लिशमध्येच देतात. माझ्या मते याची काही कारणे ही अशी आहेत:
१. इंग्रजांनी आपल्यावर १५० वर्षे राज्य केले आणि त्यांनी येथे आधुनिक प्रशासन आणले.
२. ते आपल्यावर राज्य करू लागल्यापासून ते आजतागायत आपली पराभूत मनोवृत्ती कायम आहे. त्यामुळे आपली माहिती वगैरे इंग्लिशमधून सांगण्यात आपल्याला एक प्रकारची प्रतिष्ठा वाटते. अगदी आपल्या नाव-आडनाव इ. ची आद्याक्षरे ही इंग्लिशमधूनच रूढ केली जातात.
३. सरकारी नोकरीत मराठीतून कारभार, पदांचे मराठीकरण असे अनेक प्रयत्न झालेले आहेत पण,ते ‘शासकीय मराठी’ खरेच क्लिष्ट असल्याने जनसामान्यांमध्ये रूळले नाही.
४. त्यामुळे, सर्वसामान्य लोकांना आपण काय करतो हे इंग्लिशमध्ये सांगितले तर पटकन कळते. जर एखाद्याने दुसऱ्याला ‘’मी कनिष्ठ लिपिक आहे’’ असे सांगितले तर ऐकणारा त्याच्याकडे बधिरपणे बघेल किंवा, आधी सांगणाऱ्यालाच आपण टिंगलीचा विषय होऊ असे वाटेल.
मित्रांनो, इंग्लिशवर टीका करणे हा या लेखाचा हेतू नाही. आपल्या आयुष्यातले एक वास्तव मला जाणवले ते मी तुमच्यापुढे मांडले इतकेच. जरा विचार करून बघा. आपण आपली भाषिक संस्कृती जपण्यासाठी कितीतरी गोष्टी करत असतो. मराठी लेखन-वाचन, नाटक-चित्रपट, वादविवाद, परिसंवाद, व्याख्यानमाला, चर्चासत्रे, संकेतस्थळावरील वावर अशा कितीतरी माध्यमांतून आपण आपली मायबोली जपत असतो आणि त्याचा आनंदही घेत असतो. पण, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट, म्हणजेच आपला पोटापाण्याचा उद्योग, हा मात्र आपल्या बहुतेकांच्या बाबतीत कुठल्या ना कुठल्या प्रकारे इंग्लिशशी निगडीत आहे वा त्या भाषेवर अवलंबून आहे. हे एक कटू सत्य असून ते आपण स्वीकारलेले आहे,हे खरे. अर्थात आपण कार्यालयीन काम जरी इन्ग्लिश्मध्ये करत असलो तरी त्या कमाचे स्वरूप दुसर्याला २ वाक्यात मराठीत सांगायला अडचण नसावी.
या पार्श्वभूमीवर मला ‘मायबोली’वरील बऱ्याच सदस्यांचे कौतुक करावे वाटते. अशांनी आपल्या सदस्यत्वाच्या माहितीत आपल्या कामधंद्याची माहिती जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक मराठीत दिली आहे ( उदा. ‘निर्वात तंत्रज्ञान उद्योजक’,’सनदी लेखापाल’ इ.)
तसेच हे संकेतस्थळ तयार करतानाही जास्तीत जास्त मराठीचा वापर केलेला आहे आणि त्यासाठी प्रशासकांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, हेही अभिनंदनीय आहे. त्यामुळे, मराठी संस्थळ चालवणे हा जर एक ‘उद्योग’ मानला तर त्याची माहिती दुसऱ्याला नक्कीच मराठीत सांगता येईल !
वरील विवेचन हे भारतात असताना दोन मराठी माणसे एकमेकांशी बोलत आहेत या संदर्भात केलेले आहे. आता इथे ‘मराठी’च्या जागी इतर कुठलीही प्रादेशिक मातृभाषा घातली तरी हे विवेचन तिथेही लागू पडेल असे वाटते.
असो. यानिमित्ताने बरीच वर्षे मनात खदखदत असलेला विषय तुमच्यापुढे मांडला आहे. तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक.
******************************************************
मी वापरीनहो, पण मातृभाषेबाबत
मी वापरीनहो, पण मातृभाषेबाबत "अडाणी" राहिलेल्यांना ते कसे समजावे?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>
एक्झॅक्टली सर, हेच तर मला म्हणायचे आहे.
जसे आता तुम्ही मला समजावे म्हणून आपला मातृभाषेतच बोलायचा हट्ट सोडला तेच अपेक्षित आहे.
आता ईथे गंमत बघा, तुम्हीही मराठी आहात. मी सुद्धा मराठी आहे. पण आपण थेट गृहीत धरलेत की मराठी प्रतिशब्द वापरला असता तर मला तो समजलाच नसता
मी सीएमसी मधे असताना माझ्या
मी सीएमसी मधे असताना माझ्या विजिटींग कार्ड वर लिहिलं होतं "अभियंता - प्रणाली समाकलन"
तर मला सांगा मी तिथे काय काम करत होतो?
बाळ ऋ सुरु झाला
बाळ ऋ सुरु झाला
आता सूट मोकाट, बरेच धागे तुंबले असतील
मी आधुनिक वैद्यकशास्त्रातील
मी आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषध वैद्यक शास्त्र वैद्य आहे. यालाच अंतर्गत औषधशास्त्र असेही म्हणतात.
(जल्ला काय कल्ला काय? ' मी फिजीशीयन आहे . यालाच इंटर्नल मेडिसीन असेही म्हणतात.)
जल्ला अजून काय नाय कल्ला-
१२ वर्षावरिल रूग्णांचे शस्त्रक्रीयारहित आणि प्रसूती सोडून जे जे काही उपचार असतात ते आमच्याकडे करून मिळतात.
तसं पण एवढं सांगूनही लोकांना कळत नाही.
सरळ मराठीत 'डॉक्टर आहे' म्हटलं तरी 'डिलिवर्या करता का?' हा प्रश्न हमखास विचारतात लोक.
मी विद्युत अभियंता असून खाजगी
मी विद्युत अभियंता असून खाजगी आस्थापनेत कारभार प्रमुख ह्या पदावर नोकरी करतो.
टग्या, सिस्टम इंटीग्रेशन?
टग्या, सिस्टम इंटीग्रेशन?
धोंडी, ऑपरेशन्स हेड?
धोंडी, ऑपरेशन्स हेड?
बरोबर भास्कराचार्य :)
बरोबर भास्कराचार्य![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाचा बरोबर :)
भाचा बरोबर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@धोंडी पाटील :
@धोंडी पाटील :
मी विद्युत अभियंता असून खाजगी आस्थापनेत कारभार प्रमुख ह्या पदावर नोकरी करतो.>>
मस्त! अगदी व्यवस्थित समजले. अभिनंदन.
ए मी काय करतो ते कल्ला नाय
ए मी काय करतो ते कल्ला नाय कोनाला?
मला कोणी CT , कॅथलॅब,
मला कोणी CT , कॅथलॅब, सोनोग्राफी संयंत्र आणि MRI चे मराठी करण सांगेल काय? माझा हुद्दा आणि कामाची रूपरेषा मराठीत सांगेन म्हणतो.
झालंच तर ventilator, पेशन्ट मोनिटरिंग सिस्टम आणि हेल्थकेअर IT यांचे पण सांगा, पुढे मागे काम बदलले तर लागेल.
ते जे काही अनुवाद देतील त्या
ते जे काही अनुवाद देतील त्या संयंत्रांचे विपणन करण्याचे kqm करतो,
आरे काय मूर्खपणा आहे,
सरळ मार्केटिंग म्हणा ना... मराठी लोकांना ते जास्त नेमकेपणाने कळेल.
इकडे लोकांना सेल्स आणि
इकडे लोकांना सेल्स आणि मार्केटिंग वेगवेगळी department आहेत हे कळायची मारामार.
Pre सेल्स प्रॉडक्ट सपोर्ट, पोस्ट सेल्स अँप्लिकेशन सपोर्ट अजून वेगळे.
मुळात इतके विश्लेषण विचारतेच
मुळात इतके विश्लेषण विचारतेच कोण? मार्केंटींग असेल, वा सेल्स असेल वा अकाऊण्ट्स असेल, करता ती "कारकुनीच ना?" मग सांगा की सरळ सरळ, अमक्या ढमक्या कंपनीत कनिष्ठ वा वरिष्ठ कारकून आहे म्हणून....
मार्केंटींग असेल, वा सेल्स
मार्केंटींग असेल, वा सेल्स असेल वा अकाऊण्ट्स असेल, करता ती "कारकुनीच ना?">>>>>>>>>> का ही ही
ते काकेपान्दा यांचं 'जाळे
ते काकेपान्दा यांचं 'जाळे विशेषज्ञ' आणि 'गवाक्ष उपयोजन' सांगेल का कोणी???
जाळे - वेब
जाळे - वेब
गवाक्ष - विंडो
बाकीचं तुम्ही सांगा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उपयोजन application?
उपयोजन application?
विशेषज्ञ - एक्स्पर्ट?
विशेषज्ञ - एक्स्पर्ट?
वेब एक्स्पर्ट
ओके, मी नेटवर्क स्पेशॅलिस्ट
ओके, मी नेटवर्क स्पेशॅलिस्ट आहे
विन्डोज डिप्लॉयमेन्ट पण बघतो.
आता याचे अजून समर्पक मराठीकरण कसे करता येईन?
काकेपान्दा जी आता कळलं हो..
काकेपान्दा जी आता कळलं हो...ते गवाक्ष डोक्यावरून गेलं होत...
सस्मितजी धन्यवाद ! ! !
लेखातील मुद्दा लक्षात आला.
लेखातील मुद्दा लक्षात आला. माझे म्हणणे असे की बोली मराठीत बोलणे वेगळे आणि शुद्ध मराठीत लिहिणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बोली मराठी म्हणजे रोजच्या वापरात परकिय शब्द सहजपणे मिसळले असतील तर ते तसेच वापरणे. उदाहरणार्थ टेबल ( मेज ), पेन ( झरणी ) इ.इ.
एक किस्सा आठवला. एक 'साहेब ' ( शुद्ध मराठीत 'महाशय ' ) आपल्या 'कार ' ( शुद्ध मराठीत ' स्वयंचालिकेत ') मध्ये बसून फिरावयास निघाले. रस्त्यात कारचे टायर पंक्चर झाले. रस्त्याच्या कडेला कार थांबवली. ' ड्रायव्हर ' ( शुद्ध मराठीत 'चालक ') पंक्चर काढीत होता. साहेब बाजुलाच उभे होते. जवळून एक सामान्य शेतकरी जात असतांना , त्याने सहज ' सायबाला ' विचारले. " काय झाले आहे ? " . साहेब म्हणजे मराठीचा अर्क कोळून प्यालेले. ते म्हणाले, " माझ्या स्वयंचालिकेच्या अग्र चक्रातील आतील हवेने बहिर्गमन केले आहे . त्याची दुरुस्ती सुरु आहे." शेतकर्यास काही समजले नाही. त्याने ड्रायव्हरला विचारले ,' ओ भाऊ, काय झाले आहे ? ' त्यावर ड्रायव्हरने उत्तर दिले, ' काही नाही, टायर पंक्चर झाले आहे ' यावर शेतकरी म्हणाला, ' मग तुझ्या सायबाला हीच गोष्ट नीट मराठीत सांगता येत नाही कां ? "
एकुण समोरच्याला ज्या भाषेत आपले म्हणणे समजेल ती खरी भाषा.
jayantshimpiji>>>>+1
jayantshimpiji>>>>+1
किस्सा पन भारि...
भरत यांचे लिहिणे पटले.
भरत यांचे लिहिणे पटले.
सगळेच आयुष्य आजकाल परकीयांनी घडवले तसे चालू आहे. आधी इंग्रज, आता अमेरिकन. फेसबूक, व्हाट्स अॅप, आय फोन, काँप्युटर, सगळे काही परकीयांकडून घेतलेले.
आयुर्वेदाला विसरलो - त्यात नव्हते इंग्रजी शब्द. खूप काही काही शास्त्रे होती संस्कृतमध्ये, ती टाकून दिली, नि परकीयांची शास्त्रे शिकलो. त्यात मराठी शब्द आपले उगाच घुसडायचे!
नोकरीच्या ठिकाणी तर पार श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या काळापासून परकीय भाषांतील शब्द निरनिराळ्या अधिकार्यांना वा त्यांच्या जागांना होते. आता इंग्रजी, एव्हढाच फरक.
मराठीत असे काही का होत नाही की लोकांना मराठी शब्दच वापरावेसे वाटतील?
बरेच काही काही चांगले निदान वाङ्मयात तरी होते - ज्ञानेश्वरी, संतांचे अभंग, अगदी चालू काळात सुद्धा केलेले लिखाण, काव्य. कुणि बोलत नाहीत त्याबद्दल. लगेच त्याचे भाषांतर करण्याची घाई.
आता जी रस्त्यावर चालते ती भाषा - तिला मराठी म्हणूच नका. संस्कृतसारखी एक जुनी भाषा - ज्यांना त्या भाषेची गोडी वाटते त्यांनी अभ्यास करावा, लिहावी, वाचावी.
पण सर्वसाधारण लोकांना कळायला चालू भाषाच पाहिजे.
@जयंत : किस्सा मस्त आहे.
@जयंत : किस्सा मस्त आहे.
@ नन्द्या : मराठीत असे काही का होत नाही की लोकांना मराठी शब्दच वापरावेसे वाटतील? >>> फार छान मुद्दा. हाच तर खरा चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे.
मला एक कळत नाही, विंडोला
मला एक कळत नाही, विंडोला गवाक्ष बोलायचा हट्ट का? खिडकी हा सुद्धा मराठी शब्द आहे ना. अश्याने तुम्ही लोकं मराठी किचकट करून ठेवता आणि मग बोलता कोणी वापरत नाही.
सावरकरांनी भाषाशुद्धीची जी
सावरकरांनी भाषाशुद्धीची जी चळवळ चालवली होती, त्यात त्यांनी बर्याचश्या त्या काळी प्रचलित असलेल्या ईंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द निर्माण केले होते जी आज ही प्रचलित आहेत (महापौर, दिग्दर्शक, संकलक, पटकथालेखक, दूरदर्शन, वेतन, वेशभूषा, नेपथ्य, दिनांक, संपादक, विधीमंडळ ई.). मला वाटतं, हे शब्द प्रचलित होण्यामागे त्यांचा सुटसुटीतपणा, भाषांतरापेक्षा सुद्धा केलेलं भावांतर हे महत्वाचे घटक होते. तसे मराठी प्रतिशब्द असले तर वापरणं, समजून घेणं आणी व्यवहारात सहज सामावून घेणं शक्य होईल. अन्यथा त्या मराठी प्रतिशब्दांची कुचेष्टा किंवा मर्यादीत वापर होईल.
बाकी भाषा ही प्रवाही असते आणी
बाकी भाषा ही प्रवाही असते आणी कालानुरूप बदलत जाते. ज्ञानेश्वरांची मराठी आणी शेक्सपियर ची ईंग्रजी समजावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.
गवाक्ष म्हणजे खरं तर
गवाक्ष म्हणजे खरं तर व्हेंटिलेटर. खिडकीला गवाक्ष म्हणता येणारच नाही मुळात.
Pages