नोनी
या मार्केटिंगवाल्यांचे मला खुप नवल वाटते. कुठल्या वस्तुचे ते मार्केटिंग करु शकतील सांगता येत नाही.
आम्ही लहानपणी मालवणच्या वेळेवर म्हणजे समुद्रकिनार्यावर पेवायला म्हणजे पोहायला जात असु, त्या वेळी हि टपोरी फ़ळे किनार्यावर पडलेली असत. अर्थात हि झाडे पण भरपुर होती किनार्यावर.
त्यावेळी पांढरट पिवळी पिकलेली फळे तोंडात टाकायचा खुप मोह व्हायचा. चुलतभावंडे, आणि काका, न्हय ता काय !, म्हणुन मला वेड्यात काढायची, तरीपण एकदा हळुच खाऊन बघितले होते. कडवटच चव होती.
रात्री आम्ही सगळे परत किनार्यावर जात असु. त्यावेळी किनार्यावर लाईट्स नव्हते. अंधार्या रात्री समुद्राच्या लाटा चमकत असत आणि त्याचवेळी हि फळेही अंधारात उठुन दिसत असत. त्यावेळी हमखास या फळांवर वटवाघळे झेपावताना दिसत असत.
आणि मग अलिकडे या फळाची जोरदार जाहिरात बघितली. प्रत्येक केमिष्टच्या दुकानाच्या दर्शनी भागात नोनि ज्युसची मोठी बाटली दिसत असे. सब दुखोकि एक दवा, अशी जोरदार जाहिरात होत असे याची.
त्याचवेळी या फ़ळाला नोनी म्हणतात, असेहि कळले. मालवणला याला काहि म्हणत असत का ते आठवत नाही.
Morinda citrifolia असे याचे शास्त्रीय नाव. ग्रेट मोरिंडा, इंडियन मलबेरी, बीच मलबेरी अशीही नावे आहेत याला. नोनी हे नाव मात्र आलेय ताहिती बेटावरुन. यालाच ताहितीयन नोनी, असेही नाव आहे.
साधारण दोन तीन मीटर वाढते हे झाड. मोठी चमकदार पाने असतात. पांढरी साधी फुले येतात. आणि साधारण दिड वर्षाचे झाड झाले कि वर्षभर फळे लागायला सुरवात होते.
हे झाड तसे कणखर आहे, रेताड, खार्या, मुरबाड अश्या कुठल्याही जमिनीत वाढु शकते. ही फ़ळे आधी हिरवी मग पिवळी आनी मग पांढरी होत जातात. पिकताना एक कडवट वास येतो. त्यावरुन त्याला वॉमिट फ़्रुट असेही नाव आहे. आतमधे बर्याच बिया असतात.
या फ़ळाला स्टारवेशन फ़्रुट किंवा फ़ॅमिन फ़्रुट असेही म्हणतात, जरी याची चव कडवट असली तरी अनेक भागात हे फ़ळ कच्चे वा भाजुन खाल्ले जाते. बिया पण भाजुन खातात. यात बर्यापैकी कर्बोदके आणि चोथा असतो. अ आणि क जीवनसत्वे, लोह, चुना, पोटॅशियम, नायसिन असे बरेच घटक असतात.
पण या फ़ळाच्या जादुभर्या उपयोगांचा बराच गवगवा झाला आहे. यात कोलेस्ट्रॉल, कमी करणारे घटक, तसेच कॅन्सर आणि चक्क एच आय व्ही ला प्रतिकार करणारे घटक असल्याचा दावा केला जातो, पण या फ़ळाचे हे गुणधर्म, अजुनही पुर्णपणे सिद्ध झालेले नाहीत.
संशोधन चालु आहे पण मार्केटिंगवाल्यानी मध्यंतरी त्याचा जोरदार प्रचार सुरु केला होता. या क्षेत्रात अधुनमधुन अश्या गोष्टी होतच असतात. करमणुक होते, सध्यातरी इतकेच.
बारतोंडी
मागे बोरीवलीच्या नॅशनल पार्क मध्ये नेचर ट्रेलसाठी गेले तेव्हा ह्याचे नांव बारतोंडी म्हणून सांगितले होते. एका वर्तमानपत्रात लेखही आलेला औषधी गुणधर्मांवर. अगदी सब दुखोंकी एक दवा अशा थाटात. दिलेल्या फोन नंबरवर फोन करुन चौकशी केली तर रू. १,००० ला १ लिटर ची बाटली अशी किंमत कळली. आणि गुण येण्यासाठी दिवसाला कमीत कमी १०० मीली तरी घ्यायला पाहिजे असे कळले. ते ऐकल्यावर डायबेटीस, ब्लड्प्रेशर दुर ठेवण्यासाठी जिम जॉईन करणे जास्त स्वस्त पडेल याची खात्री पटली.
माझ्या घराशेजारीच याचे झुडुप आहे (असेल दोन एक मीटर पण अवतार झुडुपासारखाच वाटतो). फळे खाऊन बघु काय? फुले मात्र आवडली मला. अगदी आपल्या कुंदासारखी वाटतात.
सध्या जंगलात करवंदांच्या झाडांना बहर आलाय. ती फुले पण अशीच ओळखी-ओळखीची वाटतात. दोन आठवड्यापुर्वी मुळशीहुन लोणावळ्याला जाताना वाट चुकलो आणि जंगलाच्या न बनलेल्या रस्त्यावरुन जावे लागले. त्या नसलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला रानजाई आणि करवंदाची झाडे बहरली होती. दोन्ही फुले अगदी सारखीच वाटत होती.
साधना.
नवे फळ
दिनेशदा, देशाकडे अशी फळे कधी दिसतात का? माळशेज घाटातून, जंगलातून बर्याचदा गेलोय परंतु लक्षात नाही आली कधी. तसा मी अद्याप या क्षेत्रापासुन लांबच होतो. परंतु आता आवड वाढते आहे हळुहळु. छान माहिती प्रकाशचित्रासह.
दिनेशदा
दिनेशदा छान माहिती दिलीत.:) गम्मत म्हण्जे सध्या मालवणात नोनीचे मार्केटींग एकदम जोरात चालू आहे. माझे काकाही मालवणला या व्यवसायात आहे. मेढ्यात याची खूप झाडे आहेत ना. ज्यांच्या परड्यात ही झाडे आहेत त्यांना सुगीचे दिवस आलेयत:))))
आमच्या ओळ्खीच्या एका बाईंनी याच्या निदान १० बाट्ल्या तरी घेतल्या तरी त्यांचा मधुमेह, रक्तदाब जैसे थे आहे.
म्हणजे हे नोनीवाले जितका प्रचार करतात तेव्ह्ढा काही गुण येत नाही.
नोनि ज्युस
साधना,
फळे खुप कडवट लागतात. आणि तसा त्याचा काहि फायदा नाही. करवंदाच्या फुलाचे देठ लालसर असतात आणि ती फुले पुर्ण उमलत नाहीत. त्याना वास जरा कमी असतो. करवंदाची फुले मी कधीच तोडत नाही, कारण एकहि करवंद कमी होऊ नये असे वाटते.
किशोर, हि झाडे देशावर तुरळक आहेत, पण समुद्रकिनार्यावर भरपुर.
निलु, एकेकाचे दिवस असतात ना. उद्या राजकोटातल्या समुद्राच्या पाण्याला पण तीर्थाची महती येईल. माझ्या लहानपणी तर त्या पडक्या चर्चकडे जायला भितीच वाटायची. आता गुगलवर बघितले तर तिथे मोठे बांधकाम झाल्याचे दिसतेय.
बारतोंडी
दिनेश, काही महिन्यांपुर्वी मी याच्या फुलांचा फोटो इथे टाकला होता. वेताळ टेकडी परिसरात आहेत बरीच ही झाडं.
मुख्य म्हणजे सध्या इतर सर्व झाडं निष्पर्ण असताना याना मात्र पान फुल असतात. फुलांना मंद सुगंध आहे.
तेच ते
तेच झाड ते सुधीर बहुतेक. असे शोध अधुनमधुन लागतच असतात. मध्यंतरी स्टिव्हीया नावाच्या एका झाडाबद्दल वाचले होते. याचे पाने साखरेच्या अनेक पटीने गोड असतात आणि कॅलरीज शून्य. आहे कि नाही, जादुचे झाड ?