बोट - लोभाविरुद्ध लढण्यास सद्हेतू नसे पुरेसा

Submitted by स्वीट टॉकर on 17 November, 2016 - 03:47

ही घटना बोटीवर घडलेली आहे. मात्र ती कुठेही घडू शकली असती आणि त्याचे परिणाम तितकेच तीव्र होऊ शकले असते.

मी बोटीवर थर्ड इंजिनियर होतो. एका मालवाहू बोटीवरच्या लोकांची संख्या हल्ली पंचवीसच्या आसपास असते. तेव्हां ती पंचेचाळीस असायची. इंजिनरूममध्ये काम करणार्या खलाशांचा एक म्होरक्या असायचा. त्याला ‘इंजिन सारंग’ म्हणत. आमचा इंजिन सारंग कोकणातला होता. वय साधारण पंचावन्न वर्षं.

तेव्हां इ मेल वगैरे नव्हते. पत्रानीच बातम्या कळायच्या. एका पत्रात त्याला त्याच्या आईचं देहावसान झाल्याची बातमी कळली.

घरापासून दूर राहाणार्या कित्येक लोकांमध्ये एक गैरसमज असतो. घरी एखादी वाईट घटना घडली, मुख्यत्वे तब्येतीबाबतीत, तर त्यांना असं वाटतं ‘मी जर तिथे असतो तर मी काहीतरी करून हे टाळलं असतं.’ खरं तर घरच्यांनी आणि डॉक्टरांनीदेखील सर्वतोपरी प्रयत्न केलेलेच असतात. तरीही.

आमचा सारंगदेखील अशा प्रकारची विधानं करायचा. आम्ही त्याची समजूत घालायचा प्रयत्न करायचो. मात्र नकारार्थी विचारांवर औषध प्रत्येकानी स्वतःचं स्वतःच शोधायचं असतं. दुसरा ते देवू शकंत नाही. आमच्या बोलण्यानी फारसा फरक पडला नाही.

बोटीवर खलाशांकडून काम करून घेणं हे सेकंड इंजिनियरचं काम. बातमी कळल्यावर त्यानी सारंगला दोन दिवस विश्रांती दिली. काम संपवून बोट बंदरातून बाहेर पडली आणि पुढच्या बंदराकडे मार्गक्रमणा करू लागली. साधारण दहा दिवस गेले.

आम्ही अट्लांटिक महासागरात होतो. एके दिवशी सकाळी सारंग कामावर आला नाही. चौकशी केल्यावर कळलं की तो ब्रेकफास्टला देखील आलेला नव्हता. त्याची कॅबिन रिकामी होती. बोटीच्या बाजूला असलेल्या कठड्याला Gunwale म्हणतात. (पूर्वी तिथे तोफा लावलेल्या असंत म्हणून असेल बहुतेक. उच्चार ‘गनल’.) बोटीवर शोधाशोध केल्यावर गनलजवळ त्याच्या रबरी सपाता मिळाल्या. रात्रीत कधीतरी त्यानी पाण्यात उडी मारली होती!

आम्ही लगेच बोट आल्यापावली उलटी वळवली. बोट कॅनडाच्या जवळ असल्यामुळे कॅनेडियन कोस्ट गार्डला सूचना केली. त्यांनी देखील बोटी धाडल्या. आसपास असलेल्या सर्व बोटींना ही सूचना देण्यात आली. तो जिथे असण्याची शक्यता होती तिथे कसून शोध सार्यांनी घेतला. पण काही मागमूस लागला नाही. एक दिवसाच्या निष्फळ शोधानंतर मार्गस्थ झालो.

पाणी प्रचंड थंड! त्याच्या कॅबिनमध्ये त्याचं लाइफ जॅकेट आणि TPA (Thermal Protective Aid) चा सूट होता. त्या दोन साधनांशिवाय पाण्यात काही मिनिटांपेक्षा जास्त काळ जिवंत राहाणं अशक्यच होतं.

ही आत्महत्याच आहे असं जरी आपल्याला माहीत असलं तरी त्यात काहीतरी काळंबेरं आहे अशी शक्यता गृहित धरूनच पंचनामा करावा लागतो. डेकवर रबरी सपाता व्यवस्थित लावलेल्या होत्या. कॅबिनमध्ये कसलीही झटापट झाल्याच्या खुणा नव्हत्या. दोन कॅबिन्सच्या मध्ये पातळ लाकडी पॅनेल असतं. त्याच्या दोन्ही बाजूला राहाणार्या कोणालाही रात्री काहीही धडपड ऐकायला आलेली नव्हती. आम्ही कॅबिनला सील लावलं. पुढे बंदरावर पोहोचल्यावर कॅनेडियन पोलिसांनी पंचनामा केला आणि अपेक्षेप्रमाणे ‘आत्महत्याच आहे’ असा निर्वाळा दिला.

बोटीवर अपघाती किंवा नैसर्गिक रीत्या मृत्यू आला तर आमच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे बर्यापैकी नुकसानभरपाई कुटुंबाला मिळते. शिवाय प्रत्येकाचा स्वतःचा विमा असतो तो वेगळाच. मात्र आत्महत्या असली तर सगळीच गणितं बदलतात. बहुदा त्याच्या पश्चात त्याच्या विधवेला फारसं काही मिळणार नाही अशी शक्यता दिसल्यामुळे बोटीवरील सगळ्यांनी दोन दिवसांचा पगार गोळा करून तिला पाठवण्याची व्यवस्था केली. सेकंड इंजिनियर व्यक्तिशः आणखी काही मदत करू शकत होता. तो कसा? खलाशांचा ओव्हरटाइम त्याच्या हातात असतो. त्याने त्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आत्महत्येच्या आधल्या दिवशीपर्यंत भरपूर ओव्हरटाईम लिहिला. त्या ओव्हरटाइमचे पैसे देखील तिला मिळाले.

कालांतराने आपापली कॉन्ट्रॅक्ट्स संपवून आम्ही सगळे पांगलो. आणि हा दुर्दैवी एपिसोड संपला.

संपला असं आम्हाला वाटलं.

साधारण एक वर्षानी सेकंड इंजिनियर सुट्टीवर असताना त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं गेलं. त्याच्यावर मनुष्यवधाचा आरोप ठेवला गेलेला होता! सारंगचा मृत्यू सेकंड इंजिनियरच्या वागण्यामुळे झाला असा आरोप!

तो हबकलाच! मनुष्यवध? सारंगच्या आईच्या निधनाशी कोणाचाही सुतराम संबंध नाही. शक्य तितकी मदत आम्ही त्याच्या बायकोला केली. सारंगच्या मृत्यूमध्ये दुसर्या कोणाचाही हात नाही. तरी मनुष्यवध?

पुरावा काय? तर सारंगच्या अंतिम महिन्याच्या प्रत्येक दिवशी सोळा-अठरा तास काम करायला लागल्याची नोंद त्याच्या ओव्हरटाइम शीटमध्ये होती. खाली सेकंड इंजिनियरची सही! त्याच दिवसात त्याला त्याच्या आईच्या मृत्यूची बातमी मिळाली होती. तरी देखील त्याची अजिबात तमा न करता त्यानी सारंगला कामाला जुंपलं असणार. इतकंच नव्हे, तर त्याच दिवसात जर बाकीच्या सर्व खलाशांचा ओव्हरटाइम पाहिला तर तो अगदीच जुजबी! म्हणजे फारसं निकडीचं काम नसताना सुद्धा सेकंड इंजिनियरनी वाकडी वाट करून फक्त सारंगला कामाला लावलं असणार आणि बाकीच्या सगळ्यांना आराम दिला असणार. साहजिकच सारंगला ते सहन झालं नसणार!

सेकंड इंजिनियरला अटक झाली!

आपण चित्रपटात बघतो की दुष्ट आरोपीचा वकील एक कागद घेवून येतो, ‘जमानत’ बरोबरच आणखी काही उर्दु शब्द फेकतो आणि दुसर्याच क्षणी जामीन मिळते. वस्तुस्थिती मात्र खूपच वेगळी आहे (असं मला सेकंड इंजिनियर कडून कळलं). त्यात मुरलेल्यांना पट्कन् जामीन मिळवता येत असेल. पण आपल्यासारख्यांना नाही. खूप खर्च आणि प्रयत्नांनी त्याला जामीन मिळाला.

त्याने लगेच त्यावेळीस बोटीवर असलेले चीफ इंजिनियर, कॅप्टन, आणि खरं काय झालं ते जाणणारे आम्ही सगळे - या सर्वांना भेटून खरं काय काय झालं याची स्टेटमेंट्स घेतली. काहींनी द्यायचं नाकारलं! कठिण समय येता, कोण कामास येतो!

सारंगच्या घरच्या लोकांनी सेकंड इंजिनियरला “आम्ही तिचं मन वळवून ही केस मागे घ्यायला लावतो” असं सांगून वारंवार त्याच्याकडून चिकार पैसे उकळले. पण केस काही मागे घेतली जाईना. त्याचा पासपोर्टही जप्त झाल्यामुळे नोकरी करणं शक्य नव्हतं. आमदनी शून्य, खर्च मात्र पाण्यासारखा!

जो दुसर्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला॥ या उक्तीनुसार सेकंड इंजिनियरने स्वतःच काहीतरी करायचं ठरवलं. दावा सारंगच्या बायकोनी लावलेला होता. त्यामुळे तो तिला खरं सांगून मन वळवायला तिच्या गावी गेला.

तिथे पोहोचल्यावर त्याला एक धक्काच बसला. सारंगची बायको संपूर्णपणे अशिक्षित होती. तिच्या जवळपासच्या लोकांनी तिला ‘खूप पैसे मिळतील’ असं सांगून वेगवेगळ्या कागदांवर अंगठे घेतले होते. तिला सेकंड इंजिनियरवर केस करण्याची इच्छा अजिबात नव्हती ाणि केसबद्दल काहीही माहिती नव्हती !

आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे आता सारंगच्या विधवेला एकत्रित कुटुंबातले बाकीचे लोक घरातून हाकलून देण्याच्या प्रयत्न करू लागले होते. तिचे हाल होत होते. वर ‘तक्रार परत घे’ म्हणून सेकंड इंजिनियर तिला विनंती करू लागल्यावर ती ओक्साबोक्शी रडायलाच लागली. सेकंड इंजिनियरनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हां कोणीतरी फोटो घेतला आणि तो न्यायालयात दाखल केला!

Trying to pressurize the litigant! झालं! त्याचा जामीन रद्द झाला आणि त्याची रवानगी परत तुरुंगात! त्याला कुठेच उजेड दिसेना! तो गेला डिप्रेशनमध्ये!

त्याला सहानुभूति दाखविण्यापलिकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. महिने उलटत गेले. त्याची गालफडं बसली, डोळे खोल गेले, वजन भसाभस उतरलं. भयानक काळवंडला. त्यातल्या त्यात दोन जमेच्या बाजू म्हणजे त्याचं लग्न झालेलं नव्हतं आणि त्याच्या वडिलांची साम्पत्तिक स्थिती चांगली होती.

पाण्यासारखा पैसा खर्च झाला. केस नऊ वर्षांनी संपली. सुदैवानी त्याची सुटका झाली! मात्र या नऊ वर्षात तो किती वर्षांनी वयस्क झाला याचा हिशोबच नाही.

आयजीच्या जिवावर बायजी उदार होऊ शकत नाही. ही शिकवण मिळायला त्याला भयंकर किंमत मोजायला लागली होती.

याच्या आधीचे बोटीचे लेख
http://www.maayboli.com/node/56300
http://www.maayboli.com/node/56385
http://www.maayboli.com/node/56993
http://www.maayboli.com/node/58138
http://www.maayboli.com/node/58903
http://www.maayboli.com/node/59049
http://www.maayboli.com/node/59440

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धडा शिकवणारी गोष्ट....
बाईचे नातलग किती "पोहोचलेले" असतील , (व असेच सर्वदूर असतातही, फक्त तुमच्या वाट्याला आलेले नसतात) याचीही कल्पना येते

बापरे... नियम तोडून कोणाचं भलं करायला जाऊ नये हेच खरं.

+१

किंबहुना असे म्हणता येईल की कोणाचं भलं करायला देखील नियम तोडू नयेत.

बापरे... नियम तोडून कोणाचं भलं करायला जाऊ नये हेच खरं.>>> खरयं!

पण बर्‍याचवेळा बोटीसारख्या कामात महिनोंमहिने घरापासून दूर कित्येक दिवस एकत्र राहिलेल्यांचे सुखदु:ख एकच त्यामुळे सर्वजण जणू एकच कुटुंब झालेले असतात आणि एकमेकांसाठी तिथे ते काहिही करायला तयार होतात... त्याचे पर्यावसान अश्या प्रकारात जेंव्हा होते अत्यंत क्लेश कारक!

याच असल्या अपपवृत्तींमुळे पुढे समाजाचे किती नुकसान होते हे या दळभद्री लोकांना कळत नाही. (ते नातेवाईक). ही गोष्ट कळलेले कुणीही आता कितीही गरजू असला तरी नियमावर बोट ठेऊनच काम करतील, आणि कितीही गरजू असला तरी डोळ्यावर कातडे ओढून घेतील. कुणी सांगितलीये ना फुकट फौजदारी.

ही घटना बोटीवर घडलेली आहे. मात्र ती कुठेही घडू शकली असती आणि त्याचे परिणाम तितकेच तीव्र होऊ शकले असते.

अगदी खरंय, म्हणूनच लोक अपघातात फारसे मदत करायला उत्सुक नसतात. आपण बघ्यांची गर्दी म्हणून हिणवतो पण आपल्या परोपरकाची फेड आपल्याला इतका मनस्ताप देऊ शकते हा विचारच फार त्रासदायक होतो.
मला आठवत असलेली आणि आजही त्रास देत असलेला प्रसंग आठवला या निमित्ताने. कॉलेजमध्ये असताना आमच्याच वर्गात असलेल्या एका मुलीला रस्ता क्रॉस करताना एका मोटरसायकलवाल्याने उडवले. आम्ही सगळे तिथेच कटट्यावर चहा मारत बसलेलो. धावत गेलो, तिला रिक्षात घातले आणि हॉस्पीटलला अॅडमिट केले. तिची परिस्थिती बेताची असावी (कपड्यांवरून वाटत होते). घरी फोन करून कळवले तिच्या पण तातडीने दाखल करून घेणे आवश्यक होते कारण डोक्यालाही मार लागला होता आणि जवळपास बेशुद्धीच्या अवस्थेत होती. मीच नसती खाज असल्यासारखी वडीलांना फोन करून बोलावले आणि त्यांना म्हणले आता आपण दाखल करण्यापुरते पैसे भरूया.
त्यांना वाटले माझी चांगली दोस्ती असेल आणि दोस्तच मदतीच्या वेळी कामाला येतो म्हणून पैसे भरले अॅडव्हान्स. लगोलग तिला सर्जरी करयाला नेले, ट्रीटमेंट देऊन रुममध्ये आणले तोवर घरचे येऊन दाखल झाले.

मला वाटले की घरचे किमान कुणी आणले विचारणा करतील, आभार मानतील. छे, उलट म्हणे, कुणी त्या मोटरसायकलवाल्याचा नंबर कसा घेतला नाही. असले कसले चु लोक तुम्ही वगैरे वगैरे. ही मुक्ताफळे तिच्या वडीलांची. आणि आईने तर कहर केला. म्हणे तिच्या पर्समध्ये दोन-तीन हजार रुपये होते ते दिसत नाहीयेत आणि संशयाने आमच्याचकडे बघायला लागली.

मरुंदे म्हणलं, आणि त्यांना मी अॅडव्हान्स भरल्याचे सांगितले तर उलट माझ्यावरच डाफरले की कुणी सांगिलते होते इतक्या महागड्या ठिकाणी आणायला. आम्ही येईपर्यंत का थांबला नाही.

मी अक्षरश हतबुद्ध झालो, की मुलीच्या जीवाची काहीही पर्वा नव्हती नुसते पैशाचे पडले होते. वेळेवर आणले नसते तर पोरगी गेली असती. नंतर ती बरी होऊन घरी गेली, कॉलेजला परत काय आलीच नाही म्हणून चौकशी करायला आणि मिळाले तर पैसे घ्यायला घरी गेलो तर इतकी वाईट वागणूक मिळाली की बस्.

तेव्हापासून कानाला खडा की कुणाला मदत करायला जायचे नाही.

OMG!!

साधारण एक वर्षानी सेकंड इंजिनियर सुट्टीवर असताना त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं गेलं. त्याच्यावर मनुष्यवधाचा आरोप ठेवला गेलेला होता! >> हे वाचताक्षणीच काय झाले असेल याचा अंदाज येऊन प्रथम फुटकन हसू आले. पण खरेच बिच्चारा!! Sad

नियम तोडून कोणाचं भलं करायला जाऊ नये हेच खरं. >> +१

एक मार्ग (पश्चातबुद्धि म्हणून तसा पूर्णतः निरुपयोगी) --- तसेही सगळ्यांनी दोन दिवसाचा पगार दिला म्हणजे सगळे मदत करायला उत्सुक होते, तर सगळ्यांनाच OT लावून त्यांचे सगळ्यांचे OTचे पैसे देता आले असते. ऑफकोर्स त्यातून मग काय इमेर्जेन्सीसाठी सगळ्यांना OT करावा लागला त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले असते कदाचित...

बायदवे, सारंगच्या घरच्यांना हा OT प्रकार कसा कळाला? कदाचित बोटीच्या व्यवस्थापनातील कुणी कळवले असावे...

सर्वजण,

हा उद्विग्न करणारा प्रकार आहे यात शंकाच नाही.

आशुचॅम्प -अपगघात झालेला (मुलीऐवजी) त्यांचा मुलगा असता तर तुम्हाला वेगळा अनुभव आला असता ही आपल्या देशाची शोकांतिका आहे.

व्ही टी२२० - नक्की ठाऊक नाही पण खलाशांच्या युनियननी हे केलं असावं असा संशय सेकंड इंजिनियरला आला.

बापरे... नियम तोडून कोणाचं भलं करायला जाऊ नये हेच खरं.>>> अगदी खरं.. आपण जातो भलं करायला आणि अंगाशी भलतेच येते.

बाकी त्या सेकंड इंजिनियर करता वाईट वाटले Sad बिचाऱ्याने प्रामाणिकपणे मदत केली आणि हे फळ मिळालं ..

आशुचाम्पचा अनुभव देखील पटला. हे असलं लोक करत असतील का जातील बाकीचे मदत करायला ?.

बाप रे, भयानक अनुभव..

पण कोर्टाच्या कामकाजात होणार्‍या दिरंगाईचा गैरफायदा घेणे .. हे मात्र सार्वत्रिक आहे !

खरंच! सेकंड इंजिनियरला आलेला अनुभव फारच दुर्दैवी होता. असं ध्यानीमनी नसताना अचानक एखाद्यावर खोटा आळ येऊन तुरुंगवासाची वेळ येणे खरोखरच क्लेशकारक आहे. ती नऊ वर्ष त्यांनी कसे काढली असतील ह्याचा विचारही करवत नाही.

आमच्याही कंपनीत एक वरिष्ठ नावाजलेले हॉकी खेळाडू होते. त्यांनी कंपनीला पुष्कळ मेडलस् मिळवून दिली होती. त्यांनाही बरेच मानसन्मान मिळाले होते. एकदा त्यांनी अजाणतेपणी स्पोर्ट्सलिव्ह वेळेवर भरल्या नाहीत. टाईम डिपार्टमेंटने त्यांचे काम चोख केले. आणि जास्त बिनपगारी सुट्ट्या झाल्या म्हणून त्यांच्यावर चार्जशीट भरण्यात आली. अक्षरशः त्यांची नोकरी जायची वेळ आली होती. कित्येक महिने केस चालू असेपर्यंत त्यांना ह्या साहेबांकडून त्या साहेबांकडे वणवण भटकताना पहावत नव्हते. दाढी वाढलेली आणि कपड्या लत्त्याची दुर्दशा झाली होती. नंतर त्यांची चूक जाणून घेऊन त्यांची चार्जशीट मागे घेण्यात आली. हा अनुभव ते पचवू शकले नाहीत. आणि त्यांनी कायमचे हॉकी खेळणे सोडले.

अरे देवा! सारंगने आत्महत्या केली तेव्हा बायकोचा विचार कसा नाही केला? आणी आत्महत्या झाली तर विधवेला फारसे पैसे मिळणार नाहीत हे ठाउक होते का त्याला देव जाणे. कुणाचा अविचार आणि शिक्षा कुणाला. असो, अंती हिशोबा चांगलाच होतो. सेकंड ईंजिनिअरचे पुण्य त्याच्या कामी येवो.

बापरे. सगळंच भयानक . एवढी मदत करूनही काय त्या सेकंड इंजिनियर ची दुर्दशा <<नियम तोडून कोणाचं भलं करायला जाऊ नये हेच खरं.>>ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझच खर .
माझ्या हि बाबतीत असं घडलेलं आहे. तेव्हा पासून कानाला खडा .कोणालाही वाकडी वाट करून मदत करायची नाही .
काही वेळा आपल्याला भारी पुळका येतो पण शेवटी त्या सगळ्याचा आपल्यालाच त्रास होतो
आशुचॅप अख्या पोस्ट ला + १११

खुप क्लेशकारक घटना आहे. त्या सेकंड इंजिनियरच्या पुर्ण करियरची वाट लागली. या अश्या घटना घडतात त्यामुळेच कोणी मदत करायला पुढे येत नाही हे आज पटलं.

आसुचँपच्या संपुर्ण पोस्टला.+१

बेकार आहे हे.करायल काय गेला आणि झालं काय, अश्या प्रकारचं. पण यातून हाही धडा मिळतो की इम्पल्सिव्ह चांगलं काम पण लगेच मनात आलं म्हणून करु नये.
या इंजिनीयर ला बॅक अप करणारा आणि खरी परिस्थिती समजावणारा कोणी वरिष्ठ नव्हता का?पैसे देताना बायकोला हे मेन्शन केले असते तर हे सर्व पुढचे टळले असते का?

दुर्दैवी प्रकार. पण काही शंका/प्रश्न मनात येतात:

१. माझ्या आकलनानुसार त्या काळात ओटी, हजेरी इत्यादी नोंदी पेनाने कागदावर करत असत. कोर्टाच्या तांत्रिक टीम ने इन्व्हेस्टिगेशन केले असते तर ओटीच्या नोंदी एकाच पेनाने एकाच वेळी केल्यात हे कळणे अवघड नव्हते.

२. केवळ ओटी करायला लावला म्हणून मनुष्यवधाचा गुन्हा? कि आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा? कोणताही असला तरीही कोर्टात (केवळ ओटीच्या नोंदी व तो फोटो यांच्या आधारे?) हि केस इतकी वर्षे टिकलीच कशी याचे आश्चर्य वाटते.

३. >> खरं काय झालं ते जाणणारे आम्ही सगळे - या सर्वांना भेटून खरं काय काय झालं याची स्टेटमेंट्स घेतली. काहींनी द्यायचं नाकारलं! कठिण समय येता, कोण कामास येतो!
इथे तुम्ही काय भूमिका घेतलीत? ज्यांना खरे काय झाले आहे ते सगळे (तुम्ही पण त्यातले एक) एकत्र आले असते व त्यांनी कोर्टात तशी साक्ष दिली असती तर सेकंड इंजिनियरला मनुष्यवध ऐवजी फारफार तर खोटे ओटी लावल्याची शिक्षा झाली असती.

@ इनामदार, +१ सहमत.

@ स्वीट टॉकर, सेकंड इंजिनियरने सारंगच्या विधवेला जी काही (कंपनीच्या जीवावर) मदत केली त्यात त्याचा काहीही वैयक्तिक स्वार्थ नव्हता, हे सर्वजण जाणतातच. पण दुर्दैवाने त्याच्यावर मनुष्यवधाचे बालंट आले. सर्वांनाच सेकंड इंजिनियरबद्दल सहानुभूती निश्चितच वाटतेय. बऱ्याच कंपनीतील साहेब आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची मदत नेहमीच करीत असतात. आणि अयोग्य असली तरी हि समाजमान्य रीतच आहे. तरी पण तुम्ही लेखाला 'आयजीच्या जिवावर बायजी उदार' असे शीर्षक देऊन आपण त्या सेकंड इंजिनियरला हिनवताय असा समज होतोय. कृपया शीर्षकासंबंधी आपण पुनर्विचार करावा अशी आपणांस नम्र विनंती आहे. चुकभुल द्यावी, घ्यावी.

तरी पण तुम्ही लेखाला 'आयजीच्या जिवावर बायजी उदार' असे शीर्षक देऊन आपण त्या सेकंड इंजिनियरला हिनवताय असा समज होतोय>>>>> पटले नाही.
ते शीर्षक सारंगच्या बायकोच्या नावाखाली सेकंड इंजिनियरकडून पैसे उकळन्यारा माणसाकरता आहे.

@इनामदार,

१. बरोबर आहे. तेव्हां पेनानेच काम करायचे. सगळ्या नोंदी एकाच पेनाने झाल्या असणारच. तेव्हां कित्येक जण महिन्याच्या शेवटी ओटी फॉर्म भरायचे. इंजिन रुममध्ये रफ रेकॉर्ड असायचं. ते काळ्या हातानी अस्वच्छ होतं. त्यामुळे कंपनीकडे पाठवायला स्वच्छ फॉर्म महिन्या अखेर कित्येक इंजिनिअर्स भरायचे. त्यानी तो निरपराध असणं काही सिद्ध होणार नाही.

२. मनुष्यवधाचा गुन्हा आत्महत्येला कारणीभूत ठरल्यामुळे. केस नऊ वर्षं का चालली हे सांगणं अवघड आहे. मात्र कोर्टातल्या दिरंगाईच्या हकीकती सर्वश्रुत आहेत.

३.एकत्र येणं हे आज व्हॉट्स अ‍ॅप आणि फेस बुकच्या जमान्यात सोपं वाटतं. बोटीवरचे लोक भारताच्या कानाकोपर्यात राहाणारे. बोटीवरून उतरल्यानंतर एका वर्षानी ही समस्या उभी राहिली. बहुतांशी लोक वेगवेगळ्या बोटींवर रुजू झालेले. बोटींशी पत्रव्यवहार करायला महिने लागायचे. एकत्र येऊन साक्ष वगैरे प्रॅक्टिकल नव्हतं. त्याच्या वकिलानी चीफ इंजिनियर आणि कॅप्टनला साक्षीदार म्हणून बोलावलं होतं. चीफ इंजिनियरनी साक्ष दिली पण कॅप्टननी दिली नाही. कारण मला नीटसं माहीत नाही. पण यूनियनचा काहीतरी प्रॉब्लेम होता.

@सचिन काळे आणि @जाई.
त्याला हिणवतोय असा फील येतोय हे माझ्या लक्षात आलं नाही. शीर्षक बदलतो. धन्यवाद.

@ स्वीट टॉकर, माझ्यासारख्या नवलेखकाला आपण समजून घेताहात, ह्यातच आपला मोठेपणा दिसून येतोय. सहकार्याबद्दल आपले शतश: आभार!