माझा 'ऑगस्ट क्रांती'चा प्रवास (भाग-२)

Submitted by पराग१२२६३ on 21 September, 2016 - 11:20

मथुरा सोडून दहा मिनिटे झाली होती. नव्या प्रवाशांना अटेंडंटने नॅपकीनही देऊन झाले होते. मथुऱ्याच्या आधी ऑनबोर्ड हाऊसकिपिंगवाले गाडीची साफसफाई करून गेले होते. त्यांचा प्रमुख आमच्या कंपार्टमेंटमध्ये येऊन एकाकडून फिडबॅक फॉर्म भरून घेऊन गेला होता. त्याचवेळी तिकडे वातानुकूल रसोई यानामध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झालेली होती. मथुऱ्याच्या आधी सगळ्यांचे चहा-कॉफीच्या कीटसोबत आलेले मसाला शेंगदाणे, व्हेज सँडविच, कचोरी, मातीचूर लाडू आणि फ्रूटी असे सर्व काही खाऊन-पिऊन झालेले होते. जेवणाची वेळ होण्यासाठी अजून थोडा वेळ होता. १९.१० वाजता आकाशवाणीच्या बातम्या संपल्यावर जेवणाची वेळ होईपर्यंत प्रवाशांना ब्रेड स्टिक्स, बटर, सूप दिले गेले. बाहेर अंधार असला तरी मी सुप पित असताना बाहेर लक्ष होतेच. तेवढ्यात १९.१८ वाजता सालाबाद स्टेशनवर आमच्यासाठी एक मालगाडी डिटेन केल्याचे दिसले. तिला ओव्हरटेक करून आम्ही पुढे निघालो. पाचच मिनिटात बयाणा जंक्शनवर वांद्र्याहून आलेली मुझफ्फरपूरला जाणारी अवध एक्सप्रेस फलाटावर थांबलेली होती. तिच्या पाठोपाठ कोट्याहून पाटण्याला निघालेली गाडीही येत होती, ती क्रॉस झाली.

इकडे गाडीत ब्रेडस्टीक, बटर, सूप या सगळ्याचा आस्वाद घेत प्रवाशांच्या आपापसांत गप्पा रंगल्या होत्याच. काही जण मोबाईलवर रमलेले होते. कोणाचे जेवण येईपर्यंत पेंगणे सुरू होते. दरम्यान, १९.२९ वाजता दुमरिया क्रॉस केले आणि दोन मिनिटांतच गाडीचा वेग कमी होत गेला आणि गाडी थांबली. मनात विचार आला की, आमच्यापुढे असलेली कोणती तरी गाडी स्टेशनमध्ये शिरत असेल म्हणून थांबली असेल. पण ती शक्यता शून्य असल्याचेही मनात आले. कारण राजधानीच्या पुढे इतक्या कमी अंतरावर दुसरी गाडी असणे शक्य नाही. मी शेवटून दुसऱ्या डब्यात असल्यामुळे खिडकीतून पुढचा अंदाज येत नव्हता. १९.३३ ते १९.३५ असा अघोषित थांबा घेत ऑगस्ट क्रांती निघाली. गाडी पुढे गेल्यावर दिसले की, पुढे लेव्हल क्रॉसिंग होते. म्हणजेच ते गेट उघडे असल्यामुळे ऑगस्ट क्रांतीला सिग्नल ऑन मिळाला होता आणि गाडी थांबली होती. इथे थोडा वेळ गेला होताच. त्यामुळे पुन्हा मेक अप करण्यात थोडा वेळ जात होता. गंगापूर सिटी क्रॉस करण्यासाठी सहा मिनिटे उशीर झाला होता. गंगापूर सिटीमध्ये बीटीपीएन वाघिण्यांची (टँकर) मालगाडी आमच्यासाठी डिटेन केलेली होती. २०.१० ला गंगापूर सिटी क्रॉस केले आणि इकडे गाडीत जेवण आले.

आमचे गाडीत जेवण सुरू असतानाच ऑगस्ट क्रांती वाटेत गाड्यांना क्रॉस किंवा ओव्हरटेक करत पुढच्या व्यावसायिक थांब्याच्या दिशेने निघाली होती. २०.५० पर्यंत सर्वांचे जेवण झाल्यावर आईस क्रीम आले. पण ते घेण्यासाठी फारसे कोणी जागे नव्हते. जेवण झाल्याबरोबर बरेच प्रवाशांनी झोपून टाकले होते. इथे परत माझ्या सीट/बर्थवर नजर होतीच. मथुऱ्याला गाडीत चढलेल्या आणि माझ्या नव्या जागेच्या शेजारची बसलेल्या आणि लगेचच झोपून टाकलेल्या 'त्या' बाईंच्या बरोबरच्या दुसऱ्या बाईंनी माझ्याकडे बर्थची मागणी केली. पण मी ती विनम्रपणे नाकारली. काही वेळापूर्वीच त्या दोघींच्या बरोबर असलेल्या त्यांच्या मुलांनी मला विचारण्याची सूचना त्यांना केली होती. हे सर्व सुरू होते तोपर्यंत ऑगस्ट क्रांती तिच्या प्रवासातील दुसऱ्या व्यावसायिक थांब्यावर स्थिरावली होती. इथे गाडी १२ मिनिटे लेट झाली होती. ऑगस्ट क्रांती २ नंबरवर थांबली असतानाच पलीकडे ३ नंबरवर जोधपूर-भोपाळ पॅसेंजर उभी होती. पण ही गाडी राजधानी असल्यामुळे तिला भोपाळ पॅसेंजरच्या आधी मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. आता ऑगस्ट क्रांती पुढे निघाली. कोटा येण्याचा काही मिनिटे आधी केटरींगवाला बडीशोपेचा डबा घेऊन सगळ्यांकडून टीप मागण्यासाठी फेरी मारून गेला होता. पण बऱ्याच जण त्याआधीच झोपल्यामुळे त्याला फारशी टीप मिळालीच नाही.

ऑगस्ट क्रांती मजल-दरमजल करत निघाली असतानाच २१.५५ ला कोटा जंक्शन आले होते. त्याच्या ३-४ मिनिटे आधी चंबळ नदी ओलांडली होती. कोट्यात ऑगस्ट क्रांतीचे लोको पायलट आणि गार्ड बदलले गेले. नव्या गार्ड आणि लोको पायलट्सनीही आधीच्या गार्ड आणि लोको पायलट्सप्रमाणेच आपापल्या लॉब्यांमध्ये सर्व सोपस्कार पूर्ण केले होतेच. आता रात्री झोपायची वेळ झाल्यामुळे इकडे गाडीत आरएसीवाल्यांचा बर्थसाठी तिकीट तपासनीसाच्या मागे सरेमिरा सुरू झाला होता. टी. सी. त्यांना सांगत होता - अजिबात जागा शिल्लक नाही आहे. त्यावर एक प्रवाशी टी.सी.ला म्हणला - मला नियम शिकवू नका. मी १५ वर्ष या गाडीने कशाही प्रकाराने बर्थ मिळवत प्रवास करत आलेलो आहे. अजून गाडी कोट्यातच होती. नियोजित वेळेपेक्षा उशी झालेला असतानाही नियोजित ५ मिनिटांऐवजी ११ मिनिटांचा थांबा इथे घेतला. दरम्यान पलीकडे अजमेरहून आलेली जबलपूरला जाणारी १२१८२ दयोदय एक्सप्रेस कोट्यात दाखल झाली होती. त्यानंतर २२.०६ ला आमची ऑगस्ट क्रांती कोट्यातून निघाली.

कोट्यापासून ऑगस्ट क्रांतीमध्ये पोलिसांची गस्त सुरू झालेली होतीच. साधारण १५ मिनिटांनंतर लागोपाठ दोन एक्सप्रेस डून लाईनवरून आम्हाला क्रॉस करत कोट्याच्या दिशेने निघून गेल्या. त्यातली दुसरी गाडी १२४१५ इंदूर-दिल्ली सराई रोहिल्ला एक्सप्रेस होती हे नक्की. एक-एक ब्लॉक स्टेशन ओलांडत ऑगस्ट क्रांती पुढे-पुढे जात होती. तोच २३.४५ वाजता चौमहाला स्टेशनमध्ये अप मेन लाईनवरच आमची गाडी ५ मिनिटे थांबली होती. त्याचदरम्यान मुंबई सेंट्रलहून फिरोजपूरला जाणारी जनता एक्सप्रेस ऑगस्ट क्रांतीला क्रॉस झाली. पलीकडच्या खिडकीतून तिकडे फलाटावर मफलर आणि स्वेटरमध्ये लपेटलेला पॉईंटस्मन हिरवा दिवा घेऊन फिरोजपूर जनताला पुढे जायची परवानगी देत उभा होता.

मथुऱ्यानंतर माझा बर्थ दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आला होता आणि आमच्यामागे सामान एवं जनरेटर यान असल्यामुळे मला माझ्या बर्थवरून गार्डच्या हालचालीही स्पष्टपणे दिसत होत्या. वॉकीटॉकीवरून तो बोलत होता. लोका पालयटकडे चौकशी करत असेल, गाडी का थांबवली आहे त्याची. तिथून जरा हळुहळूच चालू लागलेली ऑगस्ट क्रांती परत पाच मिनिटांत पुढच्या ब्लॉक स्टेशनमध्ये (तवाली) तब्बल १५ मिनिटे उभी राहिली. तिथून गाडी हलल्याबरोबर ००.०८ वाजता १२९२५ वांद्रे (ट) अमृतसर/कालका पश्चिम एक्सप्रेस शेजारून वेगाने क्रॉस झाली. जरा वेग घेऊ लागलेली ऑगस्ट क्रांती पुन्हा ००.२० वाजता विक्रमगड अलोट क्रॉस करताना जरा दमानंच पळत होती. पुढे झोन आमि डिव्हिजनही बदलणार होतेच. त्यामुळे नव्या झोन आणि डिव्हीजनमधील घडामोडींचा ऑगस्ट क्रांतीच्या वेगावर परिणाम झाला होता. रोहल खुर्द ओलांडले आणि काही वेळातच आम्ही पश्मिम रेल्वेच्या रतलाम विभागात प्रवेश केला. अखेर ००.४२ वाजता म्हणजे नियोजित वेळेच्या २० मिनिटे उशीरा ऑगस्ट क्रांती नागद्यामध्ये दाखल झाली. आमची गाडी येथे फलाटावर स्थिरावते, तोच डब्ल्यूएजी-९ या कार्यअश्वाबरोबर रतलामकडून आलेली बीसीएन वाघिण्यांची मालगाडीही नागद्यात आली.

नागद्यातून अगदी मिनिटभरातच गाडी निघाली. त्यानंतर ३२ मिनिटांमध्ये १.१५ वाजता ऑगस्ट क्रांतीने रतलाम गाठले. आता इथं २२ मिनिटं गाडी लेट होती. नियमाप्रमाणे १२९५१ मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस अप ऑगस्ट क्रांतीला रतलामच्या थोडे आधी क्रॉस करते. पण आज ऑगस्ट क्रांती २२ मिनिटे लेट असल्यामुळे तिने मुंबई राजधानीला २५ किलोमीटर आधी बिल्डीजवळ क्रॉस केले होते. रतलामला ऑगस्ट क्रांतीला अगदी दोनच मिनिटांचा अधिकृत थांबा आहे. त्यामुळे तेवढ्या वेळात कोट्यापासून आमच्या गाडीची जबाबदारी सांभाळणाऱ्या लोको पायलट्स आणि गार्डची जागा नव्या लोको पालट्स आणि गार्डने घेतली होती. रतलामहून निघाल्यावर मध्ये अनेक गाड्या क्रॉस होत होत्या, काहींना आम्हाला मार्ग मोकळा करून देण्यासाठी रोखून ठेवलेले होते. त्यातच मध्यरात्री १.४० वाजता बामनियाजवळ आमच्या ऑगस्ट क्रांतीने डाऊन ऑगस्ट क्रांतीला क्रॉस केलेले पलीकडच्या खिडकीतून दिसले. थोड्या-थोड्या वेळाने असा पद्धतीने मालगाड्या, मेल/एक्सप्रेस गाड्या म्हाला क्रॉस होत होत्या. एक गाडी होती २४ डब्यांची १२४८४ अमृतसर कोचुवेल्ली एक्सप्रेस. ऑगस्ट क्रांतीही लेट होती आणि ती गाडी तिच्या पुढे होती. त्यामुळे रतलामच्या सेक्शन कंट्रोलरने कोचुवेल्ली एक्सप्रेसला लूपवर घेऊन ऑगस्ट क्रांतीला मार्ग मोकळा करून देण्याचे निर्देश पिपलोड जंक्शनच्या स्टेशन मास्तरला दिले होते. त्यामुळे ३.१४ वाजता ऑगस्ट क्रांती निर्धोकपणे पिपलोड जंक्शन क्रॉस करून पुढे जाऊ शकली होती.
----

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा पण भाग आवडला.
>>>नियमाप्रमाणे १२९५१ मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस अप ऑगस्ट क्रांतीला रतलामच्या थोडे आधी क्रॉस करते. पण आज ऑगस्ट क्रांती २२ मिनिटे लेट असल्यामुळे तिने मुंबई राजधानीला २५ किलोमीटर आधी बिल्डीजवळ क्रॉस केले होते.

इथे जरा गोंधळायला झाले म्हटलं दोन्ही अप गाड्या कश्या काय क्रॉस करतील .. मग स्ट्राईक झाले की अप हे विशेषण ऑगस्ट-क्रांती करता आहे Happy

>>> दिल्लीला जाणारी अप.
सशल माझं काही तरी कनफ्युजन होतंय बहुतेक

पराग१२२६३,

http://indiarailinfo.com/faq/post/what-are-up-and-down-trains-can-one-id...

मुंबई राजधानी करता हे अप आणि डाउन व्याख्या काय आहेत?

मॅक्स, तुझं बरोबर आहे. मुंबई कडे येणारी अप.

विषय राजधानी एक्स्प्रेस चा आहे तर मला वाटलं दिल्लेकडे जाणार्‍या अप.

मॅक्स यांच्या शंकेने मलाही गोंधळवले. पण प्रत्यक्षात मी लिहिवेले बरोबरच आहे. त्या वाक्यातला 'अप' हा शब्द माझ्या अॅागस्ट क्रांतीसाठी वापरलेला आहे. या दोन्ही राजधान्या मुंबईकडे येताना 'अप' आणि दिल्लीकडे जाताना 'डाऊन' असतात.