राष्ट्रपती भवन संग्रहालयाला माझी भेट

Submitted by पराग१२२६३ on 26 July, 2016 - 06:32

सुंदर संकल्पना आणि मांडणी असलेल्या राष्ट्रपती भवन संग्रहालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे २५ जुलै २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. श्री. प्रणब मुखर्जी यांच्या राष्ट्रपतिपदाचा ४ वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण झाला आहे. त्या निमित्ताने राष्ट्रपती भवन संग्रहालयाचा विस्तारित टप्पा खुला करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी मी माझा वाढदिवस राष्ट्रपती भवनाला भेट देऊन साजरा करायचा निर्णय घेतला होता. मग सगळे नियोजन करून वाढदिवशीच राष्ट्रपती भवन आणि तेथील संग्रहालय आवर्जून पाहिले होते. खास तेवढ्यासाठीच तर दिल्लीला गेलो होतो. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन, राजपथ, इंडिया गेट या सर्वच परिसराशी एक वेगळेच नाते मनात तयार झाले आहे. त्यातूनच वाढदिवस त्या परिसरातच घालवावा अशा विचार सहज मनात आला होता. त्यावेळी मी पाहिलेले राष्ट्रपती भवन संग्रहालय आताच्या नव्या टप्प्याच्या मानाने छोटे पण टुमदार होते. आता त्यात आणखी आकर्षणांची भर पडली आहे आणि ते चक्क तीन मजली झाले आहे. पूर्वी राष्ट्रपती भवनाच्या मुख्य इमारतीत जतन करून ठेवलेल्या वस्तूही आता येथे हलविण्यात आलेल्या आहेत. या संग्रहालयात आधुनिक तंत्रज्ञानाचाही प्रभावीपणे वापर केलेला आहे. राष्ट्रपती महोदयांनीही देशातील जनतेला या संग्रहालयाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

l2016072586415.jpg

राष्ट्रपती भवन गेल्या काही वर्षांपासून विशेषतः डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळापासून अधिकाधिक लोकाभिमुख होत आहे. त्यामुळे या परिसरातील विविध भागांना सामान्य नागरिकांना भेट देणे शक्य झाले आहे. मग ते राष्ट्रपती भवन आतमधून पाहण्याची संधी असेल, चेंज ऑफ गार्ड असेल, किंवा मुघल गार्डन. सामान्य नागरिकांची आणि परदेशी पर्यटकांचीही रेलचेल येथे वाढली आहे. सध्याच्या राष्ट्रपतींच्या कार्यकाळात ही वास्तू खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होऊ लागली आहे. अनेक वर्षे गूढ वलय निर्माण झालेल्या या वास्तूमध्ये कित्येक ऐतिहासिक, अमूल्य वस्तू वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या होत्या. त्या सर्व खजिन्याला सामान्य लोकांसाठी खुले केले जात आहे. त्यामुळे भारताची प्राचीन संस्कृती असेल, वसाहतवादाचा कालखंड असेल किंवा स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय, सामाजिक घटना या सर्वांच्या छटा येथे दिसून येतात. राष्ट्रपती श्री. मुखर्जी यांच्या मते, राष्ट्रपती भवन हे देशाची संपत्ती असल्याने ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यातील एक म्हणजे हे संग्रहालय.

राष्ट्रपती भवनाच्या गेट क्र. ३० मधून या संग्रहालयात प्रवेश मिळतो. त्या गेटच्या आत असलेल्या सुरक्षा कक्षात मी पोहचलो आणि मी मला नाव नोंदणीनंतर ई-मेलवर आलेल्या प्रवेशपत्राची प्रत माझ्या ओळखीचा पुराव्यासह तेथे सादर केली. राष्ट्रपती भवन असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कड---कच होती. दुपारची वेळ असल्यामुळे संग्रहालयामध्ये फारशी दर्शकांची हालचाल नव्हती. तिथे माझ्या ओळखीची आणि प्रवेशाच्या नोंदणीची खातरजमा झाल्यावर मला आणखी एक ओळखपत्र मी नोंदणीच्यावेळी भरलेल्या माहितीसह दिले गेले. त्याचवेळी सुरक्षारक्षकाने माझ्याजवळ असलेले मोबाईल, कॅमेरा आणि अन्य सामान तेथेच जमा करण्यास सांगितले आणि टिपिकल स्टाईलमध्ये म्हणाला वहां बैठिये, थोडी देर लगेगी. मग इकडून संग्रहालयाच्या स्वागतकक्षाकडे मी आल्याचा संदेश गेला होता. त्यामुळे पाचच मिनिटामध्ये तिकडून एक तरूण आला आणि मला तिथून बॅटरीवर चालणाऱ्या गाडीने संग्रहालयाकडे घेऊन गेला. त्यावेळी तिथे काही काम चालले होते. बहुधा संग्रहालयाच्या विस्ताराचेच असेल असे आता वाटते. वाटेत जाताना ऐतिहासिक चर्च आणि अन्य इमारती, आखीव-रेखीव रस्ते दिसत होतेच. मस्त वाटत होतं राष्ट्रपती भवनाच्या आवारात इतक्या आरामात फिरताना तेही अशा खास गाडीतून.

दोन-तीन मिनिटांनी संग्रहालयाच्या मुख्य इमारतीजवळ आल्यावर त्या तरुणाबरोबर आत स्वागतकक्षाजवळ पोहोचलो. तिथे परत एकदा त्याच तरुणाने नोंदणी, ओळखीचा पुरावा, सह्या हे सर्व सोपस्कार पूर्ण करून घेतले आणि मला थोडा वेळ थांबायला सांगितले. तिथे विक्रीसाठी असलेल्या भेटवस्तू न्याहाळत असताना शाळकरी मुलांचा संग्रहालय बघायला आलेला घोळका बाहेर पडला. लहान मुलेही हे संग्रहालय पाहायला आलेली पाहून बरं वाटलं.

एक पाच मिनिटांनी दोघी गाईड मला आणखी थोडा वेळ वाट बघू शकाल का असे विचारून गेल्या. त्या सांगत होत्या की, अजून १२० जणांची नोंदणी झालेली आहे. मग त्यातील काही जण आल्यावर त्यांच्याबरोबरच एका ग्रुपमधूनच तुम्हालाही संग्रहालयात नेता येईल. ठीक आहे म्हणून तिथे थांबलो. साधारण १५ मिनिटांनी एक गाईड येऊन म्हणाली, आता वाट पाहण्यात काही अर्थ नाही. तुम्ही तरी किती वेळ थांबणार. म्हणून मग माझी एकट्याचीच संग्रहालयवारी झाली. त्यामुळे संग्रहालयात फिरताना गाईड, मी आणि युनिफॉर्ममधला स्टेनगनधारी सुरक्षा रक्षक असे आम्ही तिघेच होतो. त्यामुळे संग्रहालयाच्या परिसरात शिरल्यापासून आपण कोणीतरी आहोत असे उगाचच वाटत होते. त्यातच वाढदिवशी राष्ट्रपती भवनासारख्या परिसरात आपल्याला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळतीय का असाही भास उगाचच होत होता.

आत प्रवेश करताच एका घोड्याची आणि त्याच्या एका माणसाची प्रतिकृती. पूर्वी गव्हर्नर-जनरलच्या आणि स्वातंत्र्यानंतर काही वर्षे भारताच्या राष्ट्रपतींच्या अंगरक्षक दलातील घोड्यांचा तबेला म्हणून ही इमारत उभारण्यात आली होती. मात्र कालांतराने त्याचा वापर बंद झाल्यावर पडून असलेल्या या इमारतीमध्ये सध्याचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्या इमारतीची डागडुजी करून तेथे संग्रहालय सुरू करण्याचा विचार मांडला होता. त्यामुळे त्या आठवणीचे हे प्रतिकृतीतून केलेले स्मरण.

या संग्रहालयात विविध देशांकडून भारताच्या राष्ट्रपतींना मिळालेल्या भेटवस्तू तसेच ब्रिटीश राजवटीच्या काळात तत्कालीन गव्हर्नर-जनरलच्या संग्रहातील वस्तू येथे मांडलेल्या आहेत.

संग्रहालयात आजपर्यंत प्रत्येक राष्ट्रपतींच्या काळातील चंदेरी तुतारी आणि उंची रेशमी धाग्यात बनविलेला फलक (सिल्व्हर ट्रंपेट अँड बॅनर) तेथे पाहायला मिळतो. ही चंदेरी तुतारी आणि तिला लावलेला बॅनर प्रत्येक राष्ट्रपतींच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींकडून आपल्या अंगरक्षकांना दिला जातो, जो त्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपेपर्यंत सतत अंगरक्षकांबरोबर असतो. प्रत्येक राष्ट्रपतींच्या संपूर्ण नावातील आद्याक्षरे त्या बॅनरवर एब्रॉयडरीद्वारे उंची सोनेरी रेशमी धाग्यात लिहिलेली असतात.

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या दालनात अंगरक्षकांचे आजपर्यंतचे विविध गणवेश आणि छायाचित्रे मांडण्यात आलेली आहेत. आजच्या राष्ट्रपतींच्या अंगरक्षक रेजिमेंटची स्थापना १७७३ मध्ये बंगालचा तत्कालीन गव्हर्नर-जनरल वॉरन हेस्टींग्ज याचे अंगरक्षक म्हणून करण्यात आली होती. या रेजिमेंटच्या तेव्हापासूनच्या इतिहासाची माहिती इथे मिळते.

१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित एक दालनही येथे उभारण्यात आलेले आहे. त्यावेळी वापरण्यात आलेली शस्त्रास्त्रे येथे पाहायला मिळतात.

l2016072586419.jpg
महात्मा गांधी यांच्याशी संबंधित तत्कालीन व्हाईसरीगल लॉजमधील (सध्याचे राष्ट्रपती भवन) प्रसंगांची छायाचित्रे संग्रहालयात मांडलेली आहेत. त्यात गांधी-आयर्विन करार (जो या व्हाईसरीगल लॉजमधील पहिला महत्त्वाचा प्रसंग होता) त्याची छायाचित्रे, गांधी आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या भेटीची छायाचित्रे येथे पाहायला मिळतात. इथेही महात्मा गांधींशी संबंधित एक छोटी चित्रफीत पाहण्यासाठी टच स्क्रीनची व्यवस्था आहे.
l2016072586414.jpg

राष्ट्रपती भवनाचे आरेखन आणि उभारणी करणाऱ्या सर एडविन लटेन्स यांचे फर्निचर येथे पाहायला मिळते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रपती भवनाची केलेली सर्व मूळ रेखांकने येथे पाहायला मिळतात. तसेच राष्ट्रपती भवन उभारून पूर्ण झाल्यावर कसे असेल, त्याची त्या काळात रेखाटण्यात आलेली कल्पनाचित्रेही येथे पाहायला मिळतात.

या संग्रहालयात जाण्याआधी राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत आतून पाहून आलो होतो आणि त्याआधी तेथील चेंज ऑफ गार्डस कार्यक्रमही पाहिला होता. म्हणजेच वाढदिवसाचा संपूर्ण दिवस राष्ट्रपती भवनातच होतो. या सगळ्यामुळं तो दिवस एक वेगळाच अनुभव ठरला. आता या नव्या स्वरुपातील प्रशस्त संग्रहालयाला पुन्हा एकदा भेट द्यावी, असा विचार मनात घोळू लागला आहेच. कारण ज्याला रस आहे, त्याला पाहण्यासारखं इथं आणखी बरंच काही आहे.
---०००---

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख! वाढदिवसादिवशीच उत्तम आणी संस्मरणीय भेट तुम्हाला मिळाली. माहिती भरपूर आहे पण फोटु कमी का आहेत? मुघल गार्डनचे फोटो पहायला आवडले असते.

फोटो कमी दिलेत कारण आत फोटो काढण्याची परवानगी नाही. इथे दिलेले फोटो प्रसिद्धीसाठी दिलेल्या स्रोतावरील आहेत.

surekhach... Happy

छान माहिती, वाढदिवस साजरा करण्याची कल्पनाही आवडली.
इथे ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

बायदिवे....
>>> म्हणजेच वाढदिवसाचा संपूर्ण दिवस राष्ट्रपती भवनातच होतो. <<<<
मग राष्ट्रपतिभवनात "जेवायचीखायची" काही सोय झाली की नाही? Wink

छान माहिती.. दिल्लीला खुप वेळा जाऊन, या ठिकाणी जाणे झालेच नाही..

सहज विचारतो, प्रतिभा पाटील यांच्याकडच्या वस्तू परत मिळाल्या का ? त्या बद्दल नंतर काहीच वाचले नाही.

<<मग राष्ट्रपतिभवनात "जेवायचीखायची" काही सोय झाली की नाही? >>
या परिसरात असल्यामुळ तिकडं लक्षच गेलं नाही.

हो, प्रतिभा पाटील यांनी आपल्यासोबत नेलेल्या वस्तू विद्यमान राष्ट्रपतींच्या विनंतीनंतर परत राष्ट्रपती भवनाला मिळाल्या आहेत आणि त्याही या संग्रहालयात मांडण्यात आल्या आहेत.

आपला वाढदिवस अशा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची कल्पना आली आणि तुम्ही ती प्रत्यक्ष आचरणात आणलीत याचं मला फारच म्हणजे फारच कौतुक वाटंत आहे. ब्राव्हो!

काही कामानिमित्त खुद्द राष्ट्रपतीभवनात जाणे झाले होते, तिथे त्याकाळी काम करणाऱ्या भारतीय सूचना सेवा उर्फ इंडियन इन्फॉर्मेशन सर्विस मधल्या एका मित्राने राष्ट्रपती भवन दाखवले होते, बाहेरून दिसणाऱ्या त्याच्या त्या सुप्रसिद्ध घुमटाखाली उभा होतो तेव्हा तो मित्र (हिंदीत) म्हणाला होता

"मेरे दोस्त, तू अभी इस वखत जिसके नीचे खडा है वह पुरे विश्वमें सबसे बडे लोकतंत्र की आन बान शान है, राष्ट्रपतीभवन मे तुम्हारा स्वागत है"

मित्राचा कमावलेला अन ट्रेंड आवाज, त्या प्रचंड घुमटाखाली येणारा त्याचा पडसाद अन ते शब्द आठवले की आजही अंगावर सरसरून काटा येतो माझ्या

छान माहिती. बघायला हवे हे.

"मेरे दोस्त, तू अभी इस वखत जिसके नीचे खडा है वह पुरे विश्वमें सबसे बडे लोकतंत्र की आन बान शान है, राष्ट्रपतीभवन मे तुम्हारा स्वागत है" >>> जबरी आहे हे, सोन्याबापू!

>>मेरे दोस्त, तू अभी इस वखत जिसके नीचे खडा है वह पुरे विश्वमें सबसे बडे लोकतंत्र की आन बान शान है, राष्ट्रपतीभवन मे तुम्हारा स्वागत है" <<

लोकतंत्र कि आन, बान और शान संसद भवन है, राष्ट्रपती भवन नहि... Happy