चांभारगड - शेवत्या घाट - उपांड्या घाट
दोन वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. शेवटचा ट्रेक करूनही ६ महीने लोटले होते. मनाला आणी शरीलाला जणू घाण्याच्या बैलाप्रमाणे एकाच चक्रात फिरायची सवय झाली होती. ह्या चक्रातून बाहेर पडून नेहेमी सह्याद्रीकडे जायची ती सवयही सुटल्या गत झाली होती. काहीतरी करणे गरजेचे होते. सप्टेंबर उजाडला आणी अश्यातच ट्रेकींग कायप्पा ग्रूपवर कुणी तरी विचारले की जायचे का कुठेतरी? पावसाळा पुर्ण जोमात होताच, मनाने उचल खाल्ली की बास झाले शहरी घाण्यातले रगडणे आता बुस्टर म्हणून कुठेतरी जायलाच हवे होते. पण कुठे? टू डू लिस्ट तशी कायमच भरलेली असते पण त्यातही एक नाव सारखे वरती येत होते ते म्हणजे शेवत्या घाटाचे. मग ठरले पावसाळा असला तरी चालेल पण ह्यावेळेस शेवत्या घाट करायचाच.
--------------------------------------------------------------------------------------------------
घाटवाटा करायला लागल्यापासून ह्या घाटवाटेने मनात घर केले होते. एकतर माझ्या आवडत्या रायगडाच्या परीसरातली ही घाटवाट आणी दुसरे म्हणजे ह्याचे लोकेशन. राजगड ही अनेक वर्षांची राजधानी जेव्हा रायगडावर हलली तेव्हा ह्या परीसरातल्या घाटवाटांना प्रचंड ऐतीहासीक, व्यापारी आणि भौगोलीक महत्व आले. खासकरून शेवत्या घाटाला. रायगडाच्या पुर्वेला काळनदीच्या खोर्यात आणि लिंगाणा किल्ल्याच्या पहार्यात अनेक घाटवाटा आहेत. त्यातल्या सिंगापुर आणि शेवते प्रमुख. फडताड, आग्या, बोराट्या, निसणी, जखीण अश्या एकाहून एक नावाप्रमाणेच भक्कम असणार्या घाटवाटांमध्ये एक आहे शेवते घाटाची वाट. आजूबाजूच्या डोळे फिरवीणार्या दर्यांच्यामधून ही वाट कुठलाही कातळ चढायला न लावता आणी दरी न उतरायला लावता अल्लद घाटामाथ्यावर आणून सोडते. प्लॅन ठरला, निरोप गेले आणी हा हा म्हणता आम्ही १० समानधर्मी ट्रेकला जायला तयार झालो. आता आमच्या दहातले दोघे रात्रीची ऑफिस शिफ्ट संपवून येणार होते त्यामुळे होणार्या उशीराला कॉम्पेनसेट म्हणून आम्ही प्लॅन मध्ये अजून एक ठिकाण टाकले ते म्हणजे चांभारगड. गड तसा सोपा होता. (पण ???) आणि बाकीचे दोघे शनीवारी सकाळी महाडला येईपर्यंत आमचा होण्यासारखा होता.
--------------------------------------------------------------------------------------------------
दिवस पहीला:
ठरल्या प्लॅनप्रमाणे आम्ही ८ जण शुक्रवारी रात्री पनवेलला जमलो आणी पहीला झटका मिळाला. महाडकडे जाणार्या एकूणएक गाड्या फुल्ल होत्या. मग काय ह्या गाडीत विचार, त्या गाडीत विचार असे करत साधारण तासाभराने एका गाडीत मधल्या पॅसेजमध्ये कसे बसे घुसायला मिळाले. पण अस्सल ट्रेकर असल्याने पनवेलहून निघून पळस्पे फाटा येईपर्यंतच आम्ही मॅट्स काढून पसरलो :). महाडला उतरलो तर पाऊस पडत होताच पण भयानक वारा आणी थंडीपण वाजत होती. तिथल्या डासांच्या हल्ल्यामध्ये झोपण्याचा निष्फळ प्रयत्न केला आणी सोडून दिला.
थोडेसे उजाडल्यानंतर प्लॅन प्रमाणे आम्ही चांभारगडाकडे निघालो. चांभारगड हा महाड शहराला अगदी लागूनच आहे. एस्टी स्टँडच्या बाहेर हमरस्त्याला आले की समोर चांभारखिंडीकडे जाणारा रोड आहे. त्याने १५-२० मिनीटात चांभारखिंड गावात दाखल व्हायचे. ह्या गावाच्या पाठीमागेच लागून किल्ला आहे. सकाळचे मस्त वातावरण, आल्हाददायक गारवा आणी पावसाचा शिडकाव अश्या मस्त वातावरणात आम्ही गावात आलो आणी झटकाच मिळाला. आमच्या प्लॅननुसार खाली गावात आमच्या बॅग्स ठेऊन आम्ही किल्ला करून येणार होतो पण कसचे काय? एकाही घरात बॅग्स ठेऊन घ्यायला कोणीही तयार होईना. हे नवीनच होते. असा अनुभव सहसा येत नाही. जवळपास १०-१५ घरामध्ये चौकशी केली पण नकारच. शेवटी एका म्हातारीला आमची दया आली असावी, तिने होकार दिला आणी आम्ही लगेच संधी साधून तिच्याकडे बॅग्स ठेवल्या आणी छोट्या सॅक्स घेऊन किल्ल्याकडे निघालो.
जसे गावाच्या पाठच्या टेकडीवर आलो, सगळा किल्ला धुक्यात हरवला. ही एक वेगळीच पंचाईत झाली. आमच्या पैकी कोणीही इथे अगोदर आले नव्हते, आणी काही माहीतीही नव्हती. मग काय, वरच्या पठारावर किल्ल्याला जायच्या वाटेची शोधाशोध सुरु झाली. एक या दिशेला तर दुसरा त्या दिशेला अशी पांगापांग झाल्यावर ३० मिनीटे किल्ल्याच्या वाटेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आणी सोडून दिला. वाट तशी सोपीच असणार असे वाटत होते पण १० फुटांवरचेपण काही दिसत नव्हते त्यामुळे आम्ही किल्याच्या नेमक्या कुठल्या भागात आहोत हेही कळत नव्हते. शेवटी विचार करून एका अंधूक दिसणार्या पाऊल वाटेवरून वर चढलो. अगदी किल्ल्याच्या तटापर्यंत गेलो तर खरे पण तिथेच फसलो कारण प्रचंड गवत होते. आमच्यातला अभिजीत जेव्हा त्याच गवतातून रस्ता शोधायला गेलेला ५ फुट वर जाऊन जेव्हा १० फूट खाली घसरला तेव्हा मग आम्ही नाद सोडला. कारण कंबरभर वाढलेल्या दाट गवतातून असे अंदाचपंचे वाट शोढण्यात काहीच हशील नव्हते. मग जसे अंदाचपंचे वर गेलो तसेच खाली गावात आलो कारण खाली गावात उतरे पर्यंत धुके काही हटले नव्हते उलट वाढलेच होते. गावात त्या म्हातार्या आजींना धन्यवाद देवून पटापट महाडला आलो. कारण आमच्या तले जे दोघे सकाळी निघून महाडला आम्हाला जॉईन होणार होते त्यांचा मेसेज आला होता की पावसाने महामार्गावर वाहतूक मंदगतीने चालू आहे त्यामुळे त्यांना उशीर होत आहे.
चांभारगड चांभारखिंड गावातून
पहील्या पठारावरून महाड शहर
वरच्या पठारावरून चांभारगड
धुक्यात हरवलेला चांभारगड
त्यांना बिरवाडीला फाट्यावर भेटायला सांगून आम्ही महाडहून पुढे बिरवाडीला फाट्याला गेलो. तिथे आमचा नाष्टा झाला तरी हे दोघे आले नव्हते. १०.३० झाले, वेळ तर निघून जात होता. यापुढे आम्हाला बिरवाडी गावात जाऊन टमटम बघून पुढे शेवते गाव गाठून ट्रेक सुरु करायचा होता. आमचा नाष्टा संपायला हे दोघे आले. त्यांना नाश्त्याचे नावही काढू न देता तडक आम्ही बिरवाडी गावात गेलो (बिचारे रात्रीचे ऑफीस करून आलेले, न खाता पिता तसेच ट्रेक बॅग घेऊन आमच्या बरोबर निघाले पण. धन्य त्यांची..).
बिरवाडी गावात जाऊन आम्ही टमटमचा शोध सुरु केला तर कोणीही वरच्या शेवते गावापर्यंत यायला तयार होईना. सगळेजण खालच्या दहीवड गावापर्यंत सोडू म्हणत होते. पण आमच्या जड बॅग्स, हातातील वेळ, गाठायचा पल्ला बघता आम्हाला वरती शेवते गावापर्यंतच घेऊन जाणारा कोणीतरी हवा होता. शेवटी हो-नाही करता करता एकजण तयार झाला, त्याच्याशी व्यवहार ठरला आणी आम्ही शेवत्याकडे निघालो. नशीबाने सकाळचे जबरी धुके आणी हलका पाऊस सोडला तर निसर्गाची मस्त साथ होती. बिरवाडी सोडताच निसर्गाचे रुपडे पालटले. खळाळत्या नद्या, हिरवेकंच डोंगर, खड्डेवाला का असेना पण काळा मस्त डांबरी रस्ता, ढगांमध्ये लपलेले डोंगरमाथे... अहाहा... अगदी आयडीयल वातावरण होते. टमटमधून मस्त गप्पा मारत वळणावळणाचा चढाव चढून कधी शेवत्यात पोचलो ते कळलेच नाही.
बिरवाडीकडून शेवते गावाकडे
दहीवडहून शेवते गावाकडे जाताना १
दहीवडहून शेवते गावाकडे जाताना २
दहीवडहून शेवते गावाकडे जाताना ३
शेवते गावात पोचल्यावर खाली उतरून बघतो तर मन अगदी प्रसन्न झाले. शेवते गाव किंवा शेवतेमाची ही सह्यपदरात ऐन सह्यधारेला खेटून वसलेली आहे. खेटून म्हणजे इतकी की गावाच्या मागे लगेच डोंगरसोंड सुरु होते. गावात उतरून समोरच्या आदिवासी घरात चौकशी केली की वरघाटाची वाट चालू आहे का? होकारार्थी उत्तर आल्यावर अगदी बरे वाटले. पण सोबत येणार का याला या प्रश्णाला नकार आला आणी सहाजीकच आहे म्हणा.. हातातली शेतीची ऐनभरातील कामे टाकून कोण आमच्या सारख्या उंडग्यांबरोबर येईल
(इथे शेवते गावाचे आणी अश्याच पदरातल्या गावांचे कौतूक केले पाहीजे. ह्या भागातल्या सह्यधारेच्या कुशीत हेडमाची, लिंगाणामाची, आडराई, शेवत्यामाची, नाणेमाची, कर्णवाडी, पडवळकोंड, चेरावडी अश्या ज्ञात आणि अज्ञात वाड्या नी माच्या आहेत. ह्या सगळ्या वस्त्या सह्याद्रीच्या पदरात वसल्या आहेत आणी त्यामुळेच सह्याद्रीच त्यांचा पालनकर्ता, पोषणकर्ता आणी रक्षक (काही वेळा भक्षकपण, पण ते मानवी करणीमुळे आणि तो वेगळा विषय आहे.. जाऊदे.. त्याबाबत पुन्हा केव्हातरी). तर ह्या सगळ्या वस्त्या पावसाळ्यात सह्य उतारावर शेती करतात, उन्हाळ्यात थेंब थेंब साचणार्या पाण्यावर राहतात आणी विनाशाळा, विनावैद्यकीय मदतीच्या जगतात पण. एका बाजूला यांचे कौतूक वाटते तर दुसर्या बाजूला यांच्या विषयी वाईट कारण भौगोलीक सिमा आणी पिढ्यानपिढ्यांचे संस्कार यांना मुख्य प्रवाहापासून बाजूला ठेवते. शेवते अश्यातलेच एक गाव. आता वरपर्यंत रस्ता झालाय खरा पण मुळचे सह्याद्रीतलेच गाव, सह्याद्रीवर अवलंबून राहून त्यावरच गुजराण करणारे)
आम्हीही मग फार काही आग्रह न करता गावातल्या एकाला सुरुवातीची वाट विचारून घेतली आणी शेवते घाट चढायला लागलो. निघताना गावातल्या माणसाने तिन बहूमोलाचे सल्ले दिले. एक म्हणजे शेवते गाव सोडले की पार गुगुळशी पर्यंत एकही मानवी वस्ती नाही. दुसरे म्हणजे शेवते गावानंतरचा पहीला टप्पा चढल्या नंतर उजवीकडची अंधुक वाट धरायची (जर सरळच्या ठळक वाटेने गेले तर रस्ता चुकून ऐन सह्याद्रीच्या पोटातल्या आदीवासी पाड्यावर जायला होते. हो.. आदीवासी पाडाच. हा अगदी सह्याद्रीच्या अंतर्भागात, जंगलात आहे आणी नांदताही आहे). आणी तिसरा म्हणजे शेवते घाट चढून गेले की लगेच उजवीकडे वळायचे. जर सरळ गेलात तर गंडलातच म्हणून समजा. ही सरळ वाट आपल्याला झुंजवून, घुमवून, दमवून, घनदाट जंगलातून फिरवून भोर्डी, किंवा वरोतीला आणून सोडते . ह्या तिसर्या सल्ल्याच्या आम्हाला फार फार उपयोग झाला.
शेवत्यातून निघालो की लगेच सरळ आपण शेवते घाटालाच लागतो. हा घाट म्हणजे वरच्या घाटमाथ्यापासून खाली शेवते गावापर्यंत उतरलेली एक लांब सोंडच आहे. आजूबाजूच्या अक्राळ विक्राळ कडे आणी डोळे फिरवणार्या दर्या बघीतल्या की शेवते घाटाचे महत्त्व समजते. ह्याच दर्या आणी कड्यांमधून सुस्त पसरलेल्या अजगरा सारखी शेवते घाटाची सोंड आहे. आम्हीही पाठीवरच्या जड बॅगांमुळे सुस्तावलेल्या अजगराप्रमाणेच सावकाश चढणीला लागलो :)सोबतीला आता जंगल, थंड आणी आल्हाददायक वातावरण आणी पाऊस सुरु झाला होता. अर्धा-पाऊण तासानी गाववाल्याने सांगीतलेला वाटेचा फाटा आला. आम्ही त्याच्या विश्वासावर उजवीकडच्या अंधूक पायवाटेने वरच्या टप्प्यावर चढणीला लागलो. पुढे जेव्हा ही वाट ठळक झाली तेव्हा आमचा निर्णय बरोबर असल्याची खात्री झाली.
आता पाऊस संततधारही नव्हता पण थांबलाही नव्हता तेव्हा एका गतीने वरती चढत होतो. गावा नंतरच्या पहील्या टप्प्याच्या चढानंतर वाट जी उजवीकडे वळून वरच्या टप्प्यात येते तेव्हा सगळ्या शेवते घाटाचा, समोरच्या अवाढव्य सह्याद्रीचा कॅनवास समोर येतो. आम्ही मस्तपणे एका लयीत पण मधे थांबे घेत वरमाथ्याला जवळ करत होतो. जसा जसा माथा जवळ येत होता तश्या सभोवतलच्या दर्या खोल खोल जात होत्या. शेवते गावात असताना उजवीकडे उंच दिसणारा गाढवकडा आता आम्हाला समांतर उंचीवर होता आणि आम्ही त्याच्याही अजून उंच जाणार होतो.
तळातले वाघोली गावाचे खोरे आणी पाठीमागे अस्पष्ट असा रायगड
समांतर उंचीवर असणार्या नाणेमाची गावाला शेवते गावातून जाणारा रोड. एस्टी नाही पण छोट्या जीप जाऊ शकतात.
पहीला टप्पा चढून आल्यावर खाली दिसणारे शेवते गाव
फोटोत सर्वात शेवटी दिसणारा गाढवकडा डोंगर
साधारण अडीच-तिन तासाच्या दमवणार्या चढाई नंतर आम्ही शेवते घाटाचा माथा गाठला. आणी समोरचे दृश्य बघून भारावून गेलो. माथा नावालाच नुसता सपाट. सभोवताली घनदाट अरण्य, डावीकडे आणी समोर लांब जंगलाचा पट्टा, उजवीकडे माथ्याच्याहून उंच उठलेली एक डोंगररांग, पाठीमागे खोल दरी, थोडासा उजवीकडे आणी बराचसा पाठीमागे असा गाढवलोट डोंगर.. अफलातून नजारा..
पहील्या टप्प्यानंतर सरळ रस्त्यावरून जाऊन येणारी आदीवासी वस्ती या फोटोतल्या धबधब्याच्या पोटात आहे.
शेवते घाटाचा रूट
शेवते घाटाचा रूट
घाटाचा रूट आणी एकदम वरती टोकाला दिसणारा घाटामाथा
पण आता वाजले होते दोन. पोटात सकाळच्या घाईघाईच्या नाष्ट्याच्या शिवाय काही नव्हते (सकाळी जे दोघे मित्र आले त्या बिचार्यांचा तर नाष्टाही हुकला होता) आणी गुगुळशी झापाच्याशिवाय कुठेही थांबता येणे शक्य नव्हते. अश्यात भर म्हणून पाऊस परत जोरात सुरु झाला. माथ्यावर १५ मि. टेकून तसाच पुढे निघालो. जरा दोन मिनीटे पुढे गेलो तर खाली गावतल्याने सांगीतलेला रस्त्याचा फाटा आला. एक ठळक वाट समोर आणी दुसरी जरा कमी वापरातली उजवीकडे. आम्ही गाववाल्यांवर विश्वास ठेऊन उजवीकडे वळलो (सरळ गेलो असतो तर वाटेची नाही तर आमची काय वाट लागली असती ते वर लिहीलेच मी ), वाट थोडी पठारावरून परत उजवीकडे वळली आणी उताराला लागली. थोडे अंतर जंगलातून गेल्यावर परत वर चढून पठारावर आली. भुकेने पोटात वणवा लागला असला तरी आम्ही ही चाल एंजॉय करत होतो इतके भन्नाट वातावरण होते, ढगांचा पडदा सगळे वातावरण व्यापून राहीला होता, उजवीकडची दरी धुके आणि ढगांनी काठोकाठ भरली होती तरीही ते ढग उरलेच होते त्यामुळे दरीतले खालचे दिसणे बंद झाले होते. आता पायाखालच्या वाटेशिवाय दुसरी कुठलीच वाट नसल्याने आम्ही तसेच पुढे चाललो होतो. ह्या दुसर्या पठारावरून जेव्हा वाट परत शार्प उजवीकडे वळून उताराला लागली तेव्हा आमच्या मनात पहील्यांदा शंका आली. बरं आमच्याकडे ह्या वाटेची तशी माहीती नसल्याने तसेच पुढे जात राहीलो. ह्या दुसर्या उतारा नंतर परत वाट जंगलात घुसली आणी अधीकच उजवीकडे वळायला लागली. आम्हाला तर शंका आली की आम्ही उजवी कडे वळण घेत घेत जवळ जवळ यु-टर्न मारत आहोत कारण आम्ही आता शेवते गावाकडे तोंडकरून दरीच्या दिशेने चालत होतो . जेव्हा वाट परत जंगलातून बाहेर आली आणी थोडीशी वर चढून पठारावर आली तेव्हाच आमच्या सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा धुके आणी ढगांचा पडदा हटला नी आम्हाला मोठा धक्काच बसला. समोरच्या उतारापलीकडे चक्क आम्हाला गाढवकड्याचा डोंगर दिसत होता आणी तोही अगदी जवळ. म्हणजे जर तसेच चालत राहीलो असतो तर अर्धा तासात गाढककड्यावर गेलो असतो. हा आम्हाला धक्काच होता आणी असले काही अपेक्षीतही नव्हते :).
आता परीस्थीती अशी होती की पाऊस चालू होता, धुके नी ढग होते, आम्ही नखशिखांत भिजलो होतो, पोटात अन्न नव्हते, आणी गुगुळशीची दिशा कुठे आहे ह्याचा काही पत्ता नव्हता . त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती की वातावरणामुळे पहाटेपासून एवढा ट्रेक होऊनही आम्ही कमी दमलो होतो. तिथेच एका झाडाखाली १० मिनीटाचा ब्रेक घेताना विचार केला की आता इथून पर्याय काय? एक, परत शेवत्यात उतरायचे आणी ट्रेक संपवायचा (हा ऑप्शन लगेच रद्द केला ), दुसरा म्हणजे आलो तेवढे परत चालून घाटमाथ्यावरच्या फाट्यापर्यंत जायचे आणी तिथून उजवीकडे वळून भोर्डी, वरोतीला जायचा प्रयत्न करायचा आणी तिसरा म्हणजे असेच चालत राहून गुगुळशीचा झाप शोधायचा. दुसर्या ऑप्शनची भयानकता बघता आणी आम्हाला गावातल्या माणसाने सांगीतलेले दिशा ज्ञान बघता, आम्ही गावातल्यावर विश्वास ठेवून तिसरा पर्याय निवडला. तसेच चालत राहीलो. पार अगदी गाढवकडा डोंगर जिथे सह्याद्रीला जॉईन झालाय तिथपर्यंत गेलो आणी अचानक वाट डावीकडे वळली आणी आमची खात्री झाली की हिच वाट पुढे गुगुळशी जाणार :). मला खात्री आहे की जर डावीकडे न वळता सरळ गेलो असतो तर गाढवकड्यावर गाढवे नक्कीच पोचली असती :).
जरा चालून पुढे आलो तो समोरच्या डोंगरावर चार-पाच झापे दिसायला लागली आणी परत पोटात गोळा आला. जर ती गुगुळशीची झापे असतील तर आमचे जेवण अजून एक तास पुढे गेले कारण पावसामुळे घराशिवाय कुठेही जेवणाचा ब्रेक घ्यायची सोय नव्हती. उपाय नव्हता. करणार काय? तसेच चालत राहीलो. १० मिनीटात शेते लागली आणी परत आनंदीत झालो की शेते आली की वाडी पण येणार आणी वाडी आली की जेवणाचा ब्रेक घेता येईल. आणी तसेच झाले. ५ मिनिटात एक झाप लागले. जवळ जाऊन मोठ्याने ओरडून कोणी आहेका याची चौकशी केली. उत्तर नाही. मग झोपडीच्या चारी बाजूने एक फेरा मारला परत ओरडलो तरी कोणी नाही. खूप हाका मारून पण जेव्हा उत्तर आले नाही तेव्हा अंदाज केला की झोपडीतले माणसे शेतीला किंवा गुरांमागे गेली असावीत. थोडे आजूबाजुला बघीतले तर कोणाचीही चाहूल लागेना मग विचार केला की तसेही झोपडीला कुडाचेच दार आहे आणी आपण काय फक्त जेवणाला इथे थांबणार आणी लगेच पुढे केळदच्या दिशेने जाणार, मग झोपडीत आत जायला काहीच हरकत नाही. तेवढ्यात आमच्यातल्या एकाला समोरच्या टेकडीच्या वरच्या बाजूला एक मुलगा गुरांमागे जाताना दिसला. आम्ही जोराने हाका मारून त्याचे लक्ष्य वेधल्यावर तो जो काय स्पीडने खाली धावत आलाय त्याला तोड नाही :).
झोपडीजवळ आल्यावर त्याने आमची आणी आम्ही त्याची चौकशी केली. तो ह्याच झोपडीत रहात होता आणी आमच्यासाठी सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे हाच गुगुळशीचा झाप होता :). व्वा व्वा अजुन काय हवे होते :). तरी अजून एक धक्का बसायचाच होता. आमचे बोलणे चालू असताना झोपडीतून एक छोटी मुलगी बाहेर आली. आम्ही चकीतच झालो म्हटले ही कुठून एकदम प्रकट झाली. तिने सांगीतले की तिने आमच्या हाका ऐकल्या होत्या पण आई-बाबांनी सांगीतल्यामुळे कोणाही अनोळखी हाकेला बाहेर यायला तिला मनाई होती. मग तिच्या परवानगीनेच आम्ही घरात जेवणासाठी आत गेलो. घर आतून स्वच्छ सारवलेले आणी कोरडे होते. वरच्या पडवीत त्या दोघांनी आमच्या साठी चटई टाकली आणी पाण्याचा तांब्या आणून दिला.
(ह्या दोघांविषयी थोडे सांगीतलेच पाहीजे. इतकी वर्षे सह्याद्रीत भटकताना कित्येक अंतर्गत, दुर्गम, अतीदुर्गम खेडी बघीतलीत पण ह्या गुगुळशीच्या झापाने मनात घर केले ते ह्या दोघांमुळे. अतीशय मायेने करणारी ही दोन मुले, ह्यांची नावेही "राम आणि सिता" अशी होती जरी ती बहीण भाऊ असले तरी :). राम १३ वर्षाचा आणी सिता १०, शाळेत कधीच गेली नाहीत पण शाळेतल्या पुस्तकात छापलेला माणूसकीचा धडा ही दोघे जगत होती, तेही निरसल अश्या वृत्तीने. त्यांनी सांगीतले की त्यांचे आईबाबा खालच्या पदरतल्या नाणेमाची गावात शेतीच्या कामाला चार दिवसांपुर्वीच रोजंदारीवर गेले आहेत आणी अजून २-३ दिवसानी येणार आहेत. म्हणजे जवळ जवळ एक आठवडा ही छोटी लहान मुले असल्या भयाकारी पावसात, जंगलात, अंधारात एकटी राहणार होती. धन्य त्या मुलांची. त्यांचे जगणॅ आणि त्यांच्या गप्पा ऐकून एवढे भारावलो की जेवण असे कमीच गेले).
जेवण झाले आणी आम्ही रामला विचारले की अजून केळद किती लांब आहे. त्याच्या म्हणन्यानुसार अजून २ तासांची चाल होती. वाजले होते ३.३० म्हणजे आम्ही लगेच घाई केली तर दिवस मावळतीला आम्ही केळद ह्या आमच्या पहील्या दिवसाच्या राहण्याच्या ठीकाणावर पोवचू शकणार होतो. आम्ही रामला रस्ता दाखवायला राजी केले. घरातून जेवण करून परत शुज चढवून घराबाहेर पडतो तो पावसाने तुफान सुरु केले. म्हटले आता पडायचा तेवढा पड आमच्या बरोबर राम असताना आम्हाला काही काळजी नाही:). रामाने बहीणीला म्हशींच्या मागे पाठवले आणी तो आम्हा गाढवांना रस्ता दाखवायला आला :). जरा १० मिनिटे चालतो तो त्याने बाँब टाकला, म्हणायला लागला की मी फक्त ओढ्यापर्यंतच येईन. म्हटले म्हणजे काय तर म्हणे ह्या धुवांधार पावसात ओढ्याला भयानक पाणी आणी ओढ असते मी पाय घालणार नाही आनी तुम्हीही बिगिबिगी चला कारण एकदा पाणी आले की अडकलात, ते काय आम्हाला परवडणार नव्हते.
दहा मिनीटे उतरल्यावर तो भयानक ओढा आला. ओढा कसला मोठी नदीच होती. सगळ्या बाजूने पाणी गोळा करून खळाळत्या गढूळ वाटेने कड्यावरून धबधब्याच्या रुपात ओतायचे हेच काम. आमच्या नशीबाने फक्त कंबरभर एवढेच पाणी होते पण प्रवाह जोरदार होता. थोडा उशीर केला असता तर पार करणे अशक्य होते. अलीकडच्या तिरावरूनच रामाचा निरोप घेऊन पुढे निघालो. त्याच्या सांगण्यानुसार जेव्हढे ओढ्याच्या लेव्हलला उतरलो तेव्हढे वरती चढलो की परत दोन-तीन घरे लागतात आणी त्याच घरावरून सरळ पठाववरून वाट केळदला जाते. तसेच झाले, ओढा पार करून वरती आलो तर घरे लागली. या घरात माणसे होती, त्यांच्या आश्चर्यचकीत नजरा झेलीतच तसेच "राम" नाम घेत पुढे निघालो. पावसाचा जोर कायमच होता तरी वाट चुकण्याचा तसा संभव नव्हता कारण ह्या खोर्यातली रामचे घर, मगाशी लागलेली दोन घरे, अगदी सुरुवातीला दिसलेली दोंगरावरची घरे ही सर्व केळदलाच एस्टी आणि वाणसामानाला येतात. साधारण एक पठारावरून तास चाल झाल्यावर रामच्या सांगण्याप्रमाणे पठारच्या शेवटी टोकावरून केळदच्या मंदीराचा कळस दिसतो आणी ती खूण बघत समोरच्या सोंडेवरून खाली सरळ केळद गावात रस्ता उतरतो. पण आमच्या दुर्दैवाने एवढ्या दोन वाक्यात केळद प्रकरण आटोपणारे नव्हते. साधारण पाऊणतास चाललो आणी परत एकदा प्रचंड पाऊस सुरु झाला व व्हीजीबीलीटी अत्यंत कमी झाली. कसे ते माहीत नाही पण पठाराच्या टोकावर सरळ न जाता आम्ही उजवी दिशा पकडून जात राहीलो. दिडतास झाला तरी पठार संपायचे नाव घेईना पण पायखालची वाट चांगली असल्याने आम्ही चालत राहीलो. शेवटी एकदाचे ते पठार संपले, उतार सुरु झाला. पावसाने रस्ता निसरडा केला होता आणी सहसा कोणीच ह्या रस्त्याने येत नसल्याने वापरतीलही नव्हता. २० मिनीटे उतरून शेवटी एकदाच्या गाडी रस्त्याच्या खूणा आल्या व एक कच्ची सडक लागली. रस्त्यावर आलो तर परत एक धक्का. ज्या सरळ रस्त्याने आम्ही डायरे़क्ट केळद गावात पोचलो असतो तिथे रस्त्या चुकल्याने भरकटून पार कड्याकडे लक्ष्मी धबधबाच नव्हे तर त्याच्याही पार वाघेराच्या धबधब्या समोर आलो होतो. आमच्या नशीबाने अजून उजेड होता त्यामुळे आम्हाला वाघेरा धबधब्याचा अफलातून नजारा बघायला मिळाला. रस्ता चुकल्याचे फळ असे मस्त मिळाले. उजवीकडे वाघेरा धबधबा, समोर गाढवकड्याचा डोंगर, डावीकडे पसरलेले कोकण्...अफाट...अफलातून….
गुगुळशी गावातून निघाल्यावर, समोरच्या डोंगरांच्या मागे केळद आहे.
वाटेत लागलेले दाट धुके
केळद वाटेवरचा पठारावरचा रस्ता
केळद वेशीवर आल्यावर चुकून वाघेराच्या दिशेला गेल्यावर दिसलेला अफलातून वाघेराचा धबधबा. डाव्या साईडला दिसतोय तो परत गाढवकड्याचाच डोंगर पण विरुद्ध बाजूने. याच्या पलीकडे शेवते गाव आहे.
मग थोडावेळ वाघेराच्या इथे आणि थोडा वेळ लक्ष्मी धबधब्याच्या इथे घालवून आम्ही परत केळदचा दिशेने मार्गस्थ झालो. वाटेत जरी अंधार पडला तरी टॉर्चच्या सहाय्याने लक्ष्मणच्या घरी पोचलो तेव्हा आठ वाजले होते. त्याच्याकडच्या गरमागरम भाकरी पिठल्याची चव चाखता चाखता त्याच्या घरच्यांना आजच्या दिवसाची चाल सांगीतली तेव्हा तेही चकीतच झाले. खरेच होते ते. पहाटे चांभारगड, मग शेवत्या, गुगुळशी मग केळद.. जबरीच चाल झाली :). मग त्याच्याशी गप्पा मारताना त्याने सांगीतले की आमच्या ओरिजीनल प्लॅनप्रमाणे आम्हाला आंबेनळीने शिवथरघळीत उतरता येणार नाही कारण १५ दिवसांपुर्वीच आंबेनळीत दरडी कोसळल्या होत्या आणी रस्ता अवघड झाला होता. मग काय तसा नाखूषीनेच उपांड्याने उतरायला तयार झालो (कारण उपांड्याघाट माझा या आधी झाला होता, पण ग्रुप मध्ये कोणाचा नव्हता त्यामुळे उपांड्यावर शिक्का मारला :)).
दिवसाचा शेवट जरी ठरवल्याप्रमाणे केळद मध्ये झाला असला तरी अगदी ओठाशी येऊन चव न चाखता यावे त्याप्रमाणे हुकलेला चांभारगड, अप्रतीम शेवत्याघाट, घाटमाथ्यावरची जबरी एकांत चाल, गुगुळशीचे झाप, राम-सीता बहीणभाऊ, गुगुळशीचा ओढा, चुकलेली वाट, जबरी आणी अतीप्रचंड वाघेरा धबधबा असे बरेच अनुभव दिवस सार्थकी आणि समृद्ध करून गेले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
दिवस दुसरा:
केळदच्या नवीन झालेल्या मंदीरातल्या लाद्या प्रचंड गार पडल्यामुळे रात्री झोप काय अशी झाली नाहीच त्यामुळे सकाळी लवकरच जाग आली. प्रातर्विधी उरकून जेव्हा लक्ष्मणकडे नाष्टा करायला गेलो तेव्हा त्याच्याशी परत चर्चा केली की आंबेनळी घाटाने उतरण्याची काय शक्यता आहे, तो किंवा गावातले कोणी आमच्या बरोबर येईल काय? आंबेनळीने उतरण्याचा आमचा हट्ट दोन गोष्टीसाठी कायम होता कारण एक तर ही घाटवाट आमची करायची राहायली होती आणी दुसरे आणी तितकेच महत्त्वाचे कारण म्हणजे आंबेनळीतून उतरून आम्ही पडावळकोंडहून शिवतर घळीच्या अगदी जवळ आंबेशिवतर गावात पोचणार होतो. लक्ष्मणने लगेच आमचा प्लॅन धुडकावून लावला. म्हणाला की एवढ्या महामुर पावसात आम्हीच तिकडे जात नाही, तुम्ही तर जायचा विचारपण करू नका. सरळ उपांड्याने किंवा मढेने उतरा आणी शिवतरला जावा. आता त्यानेच एवढा निक्षून विरोध केल्यावर आमचे काहीच चालले नाही आणी आम्ही नाखूषीनेच का होईना उपांड्याने उतरायचा निर्णय घेतला. (हो...मढे पे़क्षा उपांड्या बरा कारण तो डायरे़क्ट कर्णवाडीला उतरतो. तेवढाच वेळ वाचेल हाच एक उद्देश बाकी दुसरा उद्देश नाही. तसेही आमच्या ग्रुपला कुठलाही चालला असता कारण त्यांचे दोन्ही झाले नव्हते. )
आता उपांड्याने उतरायचे ठरवल्यावर काय मंडळी भलतीच सुस्तावली :). एकतर हा एकदम झकास घाट, त्यात, कुठेही धोका नाही, तासा-दीडतासाच्या चालीत आपण कर्णवाडीत पोचतो. मग काय एकदम रमत गमत, पावसाचा आनंद घेत आम्ही उपांड्याने उतरायला सुरु केले आणी अगदी आरामात दिडएक तासात कर्णवाडीला पोचलो. तेथे मात्र न थांबता सरळ परत खाली रानवडीला उतरायला सुरु केले. कारण कर्णवाडी वरच्या पदरात आहे (मी वरती म्हटल्या प्रमाणे, शेवता गावाच्या प्रमाणेच कर्णवाडी वरच्या सह्य पदरात आहे) आणी तिथून अगदी खालच्या लेव्हलला उतरायचे म्हणजे अजून तासाभराची चाल आहे. आम्ही तासा-सव्वा तासात रानवडी गावात आलो आणी तिथून शिवतर नदीवरचा साकव ओलांडून महाड-शिवतर गाडी रस्त्यावर आलो.
केळद गावाबाहेरची नदी. हीलाच ओलांडून उपांड्याला जायला वाट सुरु होते.
उपांड्या घाटाकडे जाताना
उपांड्या घाटाकडे जाताना
घाट उतरल्या नंतर कर्णवाडीकडे जाताना
उपांड्या घाट
पावसाळ्याचे मस्त वातावरण, रविवार आणी त्याच्यात शिवतरसारखे स्थान म्हटल्यावर जत्रा, गर्दी ही आलीच. ती त्याप्रमाणे होतीच. कारण रानवडीच्या फाट्यावरून ८ किमीवरच्या शिवतरला जायला कोणीही रिक्षावाला तयार होईना. तासाभरच्या कंटाळवाण्या वेटींग नंतर एक टेंपो मिळाला, त्याने शिवतरला आलो, घळीचे दर्शन घेतले, तिथे नेहेमीप्रमाणे जाधवांकडे जेवलो आणी परतीच्या प्रवासाला लागलो.
परतीच्या प्रवासात काही विशेष घडण्यासारखे नव्हतेच. तेच नेहेमीचेच, शिवतर ते महाड प्रवासाला दीड-दोन तास लागणे, महाडला सर्व गाड्या भरून जाणे, मग कुठल्यातरी एस्टीत उभ्याने पेण-पनवेल पर्यंत प्रवास करणे, पनवेल ते घरापर्यंतचा प्रवास परत तेवढ्याच गर्दीत करणे.. तेच तेच.. नेहेमीप्रमाणेच... आम्हाला त्याची आता सवय झालीय...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
परतीच्या प्रवासात मधेच कुठेतरी बसायला जागा मिळाली असताना विचार करत होतो की अश्या पावसात मी असा लांबलचक ट्रेक काय म्हणून प्लॅन केला. आंबेनळी जरी हुकला असला (हुकला तो हुकलाच आहे. अजून पर्यंत काही झालेला नाहीये.. बघू आता कधी होतो तो ) तरी अश्या आभाळ फाटल्यागत पडणार्या पावसात मी काय म्हणून इतका भटकलो. ह्या प्रश्णार्थक विचाराबरोबरच पाठीमागून एक विचार पुढे आला की मी एक निमित्तमात्र होतो, शनीवार रवीवार जरी मी भटकलो तरी पाऊस काय वार बघून पडत नाही. तो त्याच्याच नियमाने पडतो, निसर्गाचे चक्र चालूच असते, मी फक्त दोन दिवस त्याचा साक्षीदार होतो. कदाचीत खूप दिवस ट्रेक केला नव्हता म्हणून त्या निसर्गाला वाटले असेल की याला बाहेरूनच नव्हे तर आतूनपण भिजवायची गरज आहे आणी त्याने ते काम चोख केले :). ह्या दोन दिवसात हिरव्या रंगाशिवाय दुसरा रंग आम्ही बघीतला नाही. असंख्य धबधबे बघीतले, छोटे, मोठे, अतीभव्य. आकाशतल्या देवाले दिलेले दान आनंदाने सागराला परत द्यायला निघालेल्या नद्या बघीतल्या. पुस्तकात शिकवून मिळणार नाही असा पाहुणचार बघीतला. मला वाटते निसर्गाचाच एक भाग म्हणून राहाणारी ही माणसे निसर्गाचीच नियमावली पाळतात. जर निसर्गच कोणाचा अनादर करत नाही तर ही माणसे कुठून करतील? नद्या, ओढे, नाले हे सुरुवातीला स्वच्छ पाण्याचेच असतात, जसे जसे ते शहराकडे जातात तसे तसे त्यांचे पाणी प्रदुषीत आणी गढूळ होते. माणसांचेही काहीचे तसेच असावे....असेच काहीसे विचार करत घरी पोचलो ते स्वतःला रेफ्रेश करून आणी पुढच्या ट्रेक प्लॅनचे विचार घेऊनच.. हो ना.. शहरातल्या माणूस नावाच्या मशीनला अश्या पिरीऑडीक रिसेटची गरज असतेच...:)
पुन्हा भेटू पुढच्या ट्रेकला..
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील सर्व फोटो माझ्या मोबाईल कॅमेरातून काढले आहेत. लेख लांब वाटणाची शक्यता आहे कारण क्रमशः टाकण्या ऐवजी एकाच भागात वृत्तांत संपवायचा प्रयत्न केलाय. ह्या ट्रेक वृत्तांतात सलगतेचा अभाव असण्याची शक्यता आहे कारण जसा वेळ मिळेल तसा तसा खंडीत स्वरूपाचा लिहीलाय.
मस्त आलेत फोटो आणी वर्णन पण
मस्त आलेत फोटो आणी वर्णन पण छान आहे.
http://www.maayboli.com/node/44179 मी याला माझ्या आवडत्या दहात सामिल केलय.:स्मित:
भर उन्हाळ्यात कसं असेल?
भर उन्हाळ्यात कसं असेल?
क्या बात है!!!! सविस्तर लिखाण
क्या बात है!!!!
सविस्तर लिखाण आणि फोटो खुप आवडले.
असंच लिहित रहा.
शेवटचा परिच्छेद मनातलं
शेवटचा परिच्छेद मनातलं सांगणारा आहे. हिरवी यात्रा, हिरवे लेखन, हिरवे फोटो, हिरवा स्वच्छंदी...
.
.
शेवटी कांय तर मनोज एकदाचा लिहिता झाला.
खुपच छान.
खुपच छान.
अतिशय आवडला लेख - एवढ्या
अतिशय आवडला लेख -
एवढ्या भयाकारी पावसात कशी काय अशी भटकंती करता तुम्ही लोक्स ??
राम आणि सीता यांचे प्रचंड कौतुक वाटले...
शेवटचा परिच्छेद केवळ सुंदर ....
_____/\______
जबरदस्त ट्रेक वृत्तांत.
जबरदस्त ट्रेक वृत्तांत. __/\__
चांभारगड, अप्रतीम शेवत्याघाट,
चांभारगड, अप्रतीम शेवत्याघाट, घाटमाथ्यावरची जबरी एकांत चाल, गुगुळशीचे झाप, राम-सीता बहीणभाऊ, गुगुळशीचा ओढा, चुकलेली वाट, जबरी आणी अतीप्रचंड वाघेरा धबधबा असे बरेच अनुभव दिवस सार्थकी आणि समृद्ध करून गेले. एकदम खरे.
पहिल्या दिवशी खुपच मजल मारलीय, अर्थातच दोन दिवसाच्या ट्रेक मध्ये हे करावेच लागते. धुके गार वारा रिमझिम पाऊस सुरूवातीला खुप छान वाटते. पण त्यातही धुक्याचे प्रमाण वाढून वाट चुकून वेळेचे गणित सांभाळणे हि तर तारेवरची कसरत असते. ते क्षण ती वेळ सर्वच एका वेगळ्या पण हव्याहव्याश्या तणावाने भारवलेले असतात. त्या वेळी कदाचित सुदैवाने, थोड्याफार अभ्यासाअंती आलेल्या अनुभवाने आपण वेळ मारून नेतो, पण नंतर मात्र विचार केल्यावर वेगळेच दडपण येते. पण हिच तर खरी गंमत आहे सह्याद्रीतल्या ट्रेकींगची.....
असो पण ट्रेक जबरदस्त झाला, असेच लिहीत रहा.
सुंदर लेख आणि फोटो एकदम
सुंदर लेख आणि फोटो एकदम अफलातून. मस्त हिरवेगार वातावरण पाहून मन एकदम प्रसन्न झाले. लेखातील शेवटचा परिच्छेद खुप आवडला.
भारीच घाटवाटा केल्यात की.
भारीच घाटवाटा केल्यात की.
क्या बात है!!!! सविस्तर लिखाण
क्या बात है!!!!
सविस्तर लिखाण आणि फोटो खुप आवडले. स्मित
असंच लिहित रहा. स्मित<<<+१११
सुरेख ! मस्त झालाय हा
सुरेख !
मस्त झालाय हा वृत्तांत, "सीता" चे वर्णन आणि ती राहत असलेल्या परिसरावरून गोनीदांच्या "रानभूल" मधील "मनी" आठवली.
क्या बात.... _/\_
उपवास सुटला एकदाचा! येऊ द्या
उपवास सुटला एकदाचा! येऊ द्या ईतरही भटकंतीनामे.
भन्नाट भटकंती , मस्त लेख ,
भन्नाट भटकंती , मस्त लेख , शेवटचा परिच्छेद झकासच.
वाचून तुडुंब खूश! हॅट्स ऑफ
वाचून तुडुंब खूश!
हॅट्स ऑफ मनोज!
वा... तुझ्या सोबत केलेला
वा... तुझ्या सोबत केलेला गोप्या घाट आठवला आणि पुन्हा एकदा त्या पावसाळी आठवणींनी चिंब झालो.
सह्याद्रीतील घाटवाटां प्रमाणेच तुझी लेखन शैली लयबद्ध आहे. वाचणारा पार गुंतून जातो. मस्तच
मन्या दि ग्रेट.. घाटवाटा
मन्या दि ग्रेट.. घाटवाटा मास्तर कडून असा लेख म्हणजे मेजवानी आम्हाला... सगळ सगळं मस्त लिहीलं आहे..त्या राम सीतेच नमूद केले ते बरे..त्यांच्या जीवनशैलीच करावं तितकं कौतुक तितकं कमी..
धन्यवाद किबोर्ड हातात घेतल्याबद्दल..
मनोज... अप्रतिम लिहिले आहेस.
मनोज... अप्रतिम लिहिले आहेस. पायाला खाज सुटली रे वाचुन. फोटु पण भन्नाट!! आणि शेवटचा परिच्छेद ' छप्पर तोडके' लिहिला आहेस!!
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद _/\_
मनोज... अप्रतिमच......
मनोज... अप्रतिमच......
मनोज ... काय जबरा
मनोज ... काय जबरा लिव्हलयस...
तुझ्याबरोबर आमचीसुद्धा सह्यभ्रमंती झाली.
लिहित रहा रे तु... तुझ्या अनुभवाचा खजिना भरपुर हाय...आम्हाला लुटु दे जरा...
मनोज, मुळात तुझ्या पोतडीतून
मनोज,
मुळात तुझ्या पोतडीतून एका घाटवाटांचा वृत्तांत बाहेर पडला, याचा आनंद आहे.
चांभारगडची वाट थोडी फसवी आहे. खिंडीच्या पलिकडून माथा २५ फुटांवर ठेवून डावीकडे पुसट ट्रॅव्हर्स मारत, अस्पष्ट वाट आहे.
शेवत्या म्हणायला ओळखीचा, पण माथ्यापाशी अगदी आडवाटेचा आहे. सुंदर अनुभव अनुभवलाय आणि लिहिलाय!!!
खूप धन्यवाद!!!
अजून लेख येत राहू देत प्लीज...
सुंदर लेख आणि फोटो. कसले
सुंदर लेख आणि फोटो. कसले ग्रेट आहात. राम आणि सीता यांच्याबद्दल वाचून वाईट वाटल. बिचारी मुल
<<पुस्तकात शिकवून मिळणार नाही असा पाहुणचार बघीतला. मला वाटते निसर्गाचाच एक भाग म्हणून राहाणारी ही माणसे निसर्गाचीच नियमावली पाळतात. जर निसर्गच कोणाचा अनादर करत नाही तर ही माणसे कुठून करतील? >> +११११