डाळ राईस पकोडे .. (पिंट्या इज बॅक)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 June, 2016 - 12:03

पिंट्या इज बॅक .. अ‍ॅण्ड धिस टाईम विथ डाळ खिचडी !

पिंट्याच्या आईचा माझ्यावर आधीपासूनच विश्वास होता. आता पिंट्याचाही बसलाय हे म्यागीच्या यशाने सिद्ध केलेय. यश म्हणाल तर पिंट्या महिन्याभराच्या आतच पुन्हा माझ्या हातचे खायला आला यातच ते आले.

तर गेले काही दिवस पिंट्या आजारी होता. माझी म्यागी खाऊन नाही हा, तर मुंबईतल्या अकाली पाऊसपाण्याचा परीणाम. आता काय म्हणावं, ही आजकालची पोरं. जरा पावसाला सुरुवात झाली की यांना लवेरीया तरी होतो किंवा मलेरीया तरी होतो. पोरगं तापाने फणफणलंच. चार दिवस तोंडाला चव नव्हती. कसाबसा पेजपाण्यावर जगला. पण पाचव्या दिवशी एका फिकट चवीची दालखिचडी घेऊन माझ्या दारी हजर झाला आणि म्हणाला, रुनम्या.. होऊ दे खर्च, डाळभात आहे घरचं. मग काय, उतरलो मी स्वैयमपाकघरात, माझे सारे चवदार मसाले घेऊन, पिंट्याच्या दालखिचडीची रंगत वाढवायला.

यावेळी मात्र मी एव्हरेस्टला दूर सारत आमच्या गावचा मालवणी मसाला काढला. सर्वात पहिले तो दालखिचडीवर शिंपडून घेतला. शिंपडताना त्याचा वास मळलेल्या तंबाखूवर थाप मारल्यासारखा वातावरणात दरवळला आणि पिंट्याला तिथेच तरतरी आली. त्याच तिरमिरीत त्यांने कांदा चिरून घेतला. परीणामी तरतरीची जागा आता आनंदाश्रूंनी घेतली. मी काढलेला बेसनाचा डब्बा पाहून तर ते घळघळा वाहू लागले. पिंट्याला पुढच्या परीणामांची कल्पना येऊ लागली होती आणि दुसर्‍याच क्षणाला एक स्वच्छ धुतलेली कढई माझ्यासाठी गॅसवर तयार होती.

सर्वप्रथम मी त्या पेशंट दालखिचडीला तेल-मसाला-मिरचीचा हलकासा तडका दिला. काहीतरी करपेल, जळेल अशी भिती सतत मनी असल्याने मी असे प्रकार हलकेच करतो.
मग त्यात बेसनाचे पीठ कांद्यासोबत टाकून पार ढवळून घेतले आणि त्या मिश्रणाची चव घेतली.
ईथपर्यंत माझ्यासाठी सारा जुगारच होता. पण या मिश्रणाची चव मस्त लागताच हे जमलेय म्हणत आजच्या पाकृचा पहिलावहिला फोटो काढला.

DK 1.jpg

पुढे जो पदार्थ तयार होणार होता त्याला मायबोलीवर लोकाश्रय मिळावा म्हणून जास्तीचे दोन मसाले वा शेवफरसाण, अंडी, कोथिंबीर न टाकता यालाच फायनल केले आणि पहिले नैवेद्याचे पाच तळून घेतले.

DK 2.jpg

पहिली डेअरींग पिंट्याने केली. दुसरा मी खाल्ला. उरलेल्या तिघांचा फोटो काढला.

DK 3.jpg

अह्हाहा अह्हाहा .. काय चव होती .. वरतून खमंग क्रिस्पी आणि आतून किंचित लुसलुशीत .. फोटोचा फ्लॅश विरतो ना विरतो तोच पिंट्याने आणखी एक उचलला. उरलेल्या दोघांवर मी झडप घातली.
पण तुमच्या पोटात दुखायचे काही कारण नाही. हे पहा तुमच्यासाठी आणखी तळायला घेतले आहेत.

DK 4.jpg

जमले तर ईथेच गरमागरम खावा. नाहीतर पाककृती पॅक करून घरी घेऊन जावा ..

पण त्या आधी हे जरूर वाचा ..

१) हे दालखिचडीचे भजे तुम्ही लंचटाईमला स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा हे तुम्हाला न्याहारीच्या वेळी पोटभरीच्या जेवणाचा आनंद देऊ शकते.

२) दालखिचडी आदल्या रात्रीची उरलेलीही वापरू शकता. शेजार्‍यांची न संपलेलीही आणू शकता.

३) दालखिचडी कशी बनवावी याची रेसिपी माहीत नसल्यास ते संजीव कपूर वगैरे लोकं असतात ना, त्यांच्या पुस्तकातून उचलली तरी चालेल मला.

४) तांबाट्याचा सॉस याबरोबर चांगला लागतो हे ओळखायला पैसे पडू नयेत. तसेच सोबत चहा असल्यास तो या डिशची रंगत वाढवतो हे देखील सांगायला लागू नये.
तरी पिंट्याच्या मते दह्याच्या कोशींबीर मध्ये बुडवत खायलाही हे मस्त लागतील किंवा घोट घोट ताकाबरोबरही छान जातील. (जे घरात नसतं तेच नेमकं या पिंट्याला हवं असतं..., असं पिंट्याची आई उगाच नाही म्हणत)

असो, तर पाककलेत अडाणी असलेल्या मुलांनीही, मनात आणले तर अंड्याचा वापर न करताही, ते एखादा भन्नाट चवदार पदार्थ तयार करू शकतात हा आत्मविश्वास मला आजच्या या रेसिपीने दिला. आता तो दिवस दूर नाही जेव्हा मी अलाँगविथ पिंट्या ‘कोंबडीवडे विथ सोलकढी’ सारख्या एखाद्या पारंपारीक पदार्थाला हात घालेन आणि त्यातही काहीतरी वेगळे करून जाईन.. बोलो आमीन Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला भारीच रे ऋ, पटकन उचलुन खावासा वाटला डा.रा. पकोडा.

रात्रीची दालखिचडी उरल्यावर तिचे काय करायचे हे समजत नव्हते मला कारण ती सरसरीत असल्यामुळे पुन्हा सकाळी खाताना चव उतरल्यासारखी वाटते मला नेहमी. आता हा प्रकार करुन बघेन, चांगला लागला तर सकाळचा नाश्ता म्हणुन पण खपुन जाईल. चांगला लागेल असेच वाटतयं आणि तसेही भजी, पकोडे आदी माझे फेव्हरीटच Happy

ऋ बाळं मोठं झालं रेसिप्या बी कराया लागलं.

सही रेसिपी आणि लिहितोस तर काय मस्तच. भल्या भल्याना लाजवेल अस इनोव्हेशन . मस्त.

कोण मंग्याची आई?>> काहेप मधली. नाष्त्याला फोभा वा फोपो करायची म्हणून शेजार्‍यांकडे तुमच्याकडे शिळा भात वा शिळी पोळी उरलेली असेल तर द्या म्हणून मागायला जाते. Happy

पिंट्या ज्युनियर कॉलेजचा आहे. लहान भावासारखा आहे. पण अगदीच मला दादा म्हणावे ईतकही लहान नाही. क्रिकेट, शाहरूख, नाच आणि खादाडी या आमच्या सामाईक आवडी आम्हाला जोडून आहेत. पिंट्याच्या चौकशीबद्दल धन्यवाद. इथले प्रतिसाद पाहता त्याला व्हॉटस्सपवर लिंक टाकायला हरकत नाही. याची आणि म्यागी दोहोंची Happy

अ‍ॅक्चुअली मी पिंट्यावर सुद्धा एक व्यक्तीचित्रणात्मक लेख लिहू शकतो ..

निधी ओके .. आठवले.. पाहिलेय एक दोनदा त्या बाईला काहीबाही मागताना.. घरात येताजाता जसे नजरेस पडेल तसे मालिका बघणे होते ना, म्हणून मंग्याची आई वगैरे एवढे डिटेल माहीत नाहीत. ,, पण असे सिरीअलमध्ये मागताना दाखवणे भारी आहे Proud

अर्रे छान साऊंड करतीये ही रेसिपी.. Happy दिस्ताहेत ही छान सोनेरी.. Happy
तुझी लिहिण्याची कुरकुरीत ईश्टाईल पण मस्तंये!!!

वेल, काय नाय समजले? सिंपल तर आहे. दालखिचडीत कांदा आणि बेसन मिसळून भजे करायचे. असे एका ओळीत लिहिले असते तरी चालले असते, पण मग मला त्यात लिहिण्याचा आनंद उचलता आला नसता. आणि याऊपर जास्त डिटेलवार आणि येथील लोकांना टिप वगैरे द्याव्यात एवढा काही मी एक्स्पर्ट नाहीये Happy

हेच नव्हते समजले..विचार कर्तेय की बेसन कशाला आणि दाल राईस कुठे गेला... तुझ्या लिहिण्याच्या स्टाईलमध्ये माझ्याकडून वाचताना मिस झालं असेल

मस्त लिहिलयेस Happy ही रेसीपी माझ्यासाठी जुनीच आहे. समोरच्या काकू करतात नेहमी Happy

अ‍ॅक्चुअली मी पिंट्यावर सुद्धा एक व्यक्तीचित्रणात्मक लेख लिहू शकतो ..
>>>
लिही की मग! नेकी और पुछ पुछ?

रीया आई ग्ग .. मेलो या अनपेक्षित आग्रहाने Proud
पण आता उद्यापासून आठवडाभर तांत्रिक कारणाने मोबाईलच उपलब्ध राहील आणि फार तर चुटुरपुटुर लिहिले जाईल.. तरी त्यानंतर जमल्यास नक्की

वेल ओके Happy

आजचा मेनूवर विषय निघाला म्हणून या धाग्याची सॉरी माझ्या या पराक्रमाची लिंक द्यायची होती.
पण लिंक देणे जमत नाही म्हणून धागाच वर काढतो Happy

Pages