दर शुक्रवारी- मराठी चित्रपट

Submitted by सुजा on 2 July, 2016 - 03:58

नागराजचा सिनेमा रिलीज झाला आणि मायबोलीवरचे सगळे सैराट झालेत. नागराजच्या सिनेमाला एवढी प्रसिद्धी मिळाली /तो अगदी धो धो चालला त्यात नागराजच्या दिग्दर्शनाच जितकं कौशल्य आहे ते आणि तितकंच त्या सिनेमाची जी काही प्रसिद्धी झाली ( झी मराठी ने केलेली) त्याच बरोबर अजय- अतुलने जे काही सैराट संगीत दिलंय /जी काही सैराट गाणी दिलेली आहेत त्याचा पण जबरदस्त वाटा आहे. गाण्याचे बोल पण अजय -अतुल यांचेच आहेत आणि सिनेमॅटोग्राफर रेडडी यांना कसं विसरून चालेल ?

सैराटचा इतका बोलबाला झाल्यावर "यु ट्यूब" वर या चित्रपटासंबंधी ज्या काही क्लिप्स बघितल्या./ चित्रपटाचा जो काही ट्रेलर बघितला त्यावरून लक्षात येतंय की चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी पण तितकीच जब्राट झाली होती . त्याच बरोबर असं ही लक्षात येतंय नागराजच्या सिनेमाच्या वाट्याला जे काही कौतुक आलं त्यातलं १% कौतुक तर सोडाच पण जे काही मराठी सिनेमा दर शुक्रवारी रिलीज होतात त्यांची साधी दखल सुद्धा घेतली गेलेली नाही . मग प्रश्न असा पडतो इतके ते सिनेमे वाईट होते का ? किव्वा वाईट होते का चांगले होते हे समजण्यासाठी ते कधी रिलीज झाले तेही आपल्याला समजलं नाही का ?.

सध्याच्या काळात " चला हवा येऊ द्या " या कार्यक्रमामध्ये जरी मराठी सिनेमांना ( आणि आत्ता हिंदी सुद्धा ) प्रसिद्धी मिळत असली तरी सुद्धा काही काही सिनेमे असेही असतात जे चांगले असूनही व्यवस्थित प्रसिद्धी न झाल्याने कधी येतात ( रिलीज होतात ) आणि कधी जातात ते समजत देखील नाही . मराठी वाचक वर्ग /प्रेक्षक वर्ग या नात्याने आपण प्रत्येक शुक्रवारी रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमासंबंधी या धाग्यावर बोलूयात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"गणवेश" आणि "दमलेल्या बाबांची कहाणी" हे दोन्ही सिनेमे २४ जून २०१६ मध्ये रिलीज झाले Happy
"हाफ तिकीट"हा सिनेमा १५ जुलै २०१६ ला रिलीज होतोय Happy

..

अनासपुरेचा 'कापुस कोंड्याची गोष्ट' आत्ताच आला होता ना? 'चाला हवा..' मधेच त्याच प्रमोशन झालं होतं.
तो ही लगेच आला पण टीव्ही वर.

मराठी चित्रपट भरपूर निघताहेत, वेगळे विषयही हाताळले जाताहेत. पण दर्जा ????

आजकाल बाजारात सिडीज मिळत नाहीत म्हणून यू ट्यूबवर काही बघितले.

कुटुंब... काही कलाकारांचा उत्तम अभिनय ( नावाजलेले कलाकार आहेत ) पण चित्रपटाचा २५ % टक्के भाग डान्स रिअ‍ॅलिटी शो ने खाल्लाय. आणि त्यातले नाच म्हणजे आजकाल सर्कस टाईप असतात तसेच.

मुक्काम पोस्ट धानोरी.. वेगळी कथा, पण अभिनय अति अति सुमार. ( जून्या काळातला मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, ( वर्षा, उषा चव्हाण, निळू फुले ) अभिनयाच्या बाबतीत कितीतरी सरस होता )

गोवा ३५० माईल्स... टिपीकल हॉरर मालिकांच्या दर्ज्याचा !

सध्या तरी माझ्यासाठी हे एकच माध्यम आहे, मराठी चित्रपट बघण्यासाठी.

आकाशवाणी एफेम गोल्ड मुंबईच्या संध्याकाळच्या ७:४५ च्या दैनिक बातमीपत्रात शुक्रवारी , त्या आठवडयात रिलीझ झालेल्या चित्रपटांची नोंद घेतात. दमलेल्या बाबाची कहाणीबद्दल त्यात अति झालं आणि हसू आलं अशी कमेंट होती
सैराट पेड पब्लिसिटीनंतर रिपीट ऑडियन्स आणि माउथ पब्लिसिटीवर चाललाय. चालतच राहिलाय.
पडेल मराठी चित्रपटांची नोंद या धाग्याच्या निमित्ताने होईल.

प्रशांत दामलेनी चला हवा येऊद्या मध्ये एका सिनेमाची (कुत्र्यावर आधारित) घोषणा केली होती, तो कोणता सिनेमा होता?

<<प्रशांत दामलेनी चला हवा येऊद्या मध्ये एका सिनेमाची (कुत्र्यावर आधारित) घोषणा केली होती, तो कोणता सिनेमा होता?>>सिनेमाचं नाव "भो भो "

चांगला धागा आहे.
मराठी चित्रपटाची हवा झाली तर त्याला प्राधान्य देत मी तो आधी थिएटरला बघतो.
मग तो अगदीच भारी हवा असेही गरजेचे नाही. कारण हिंदीतही वर्षाला मोजकेच भारी सिनेमे बनतात, अन्यथा कित्येक साधारण हिंदी सिनेमे आपण थिएटरात बघून पैसे घालवतोच ना.

"बर्नी" रिलीज झाला १७/५/२०१६ . त्यात समीर आठले ( अलका कुबल चा नवरा ) यांची सिनेमॅटोग्राफी होती आणि लिरिक्स श्रीरंग गोडबोलेंचे होते. "यु ट्यूब" वर ट्रेलर बघत होते तेव्हा गेल्यावर्षी " शटर " नावाचा सिनेमा रिलीज झाला. त्यात सोनाली कुलकर्णी / सचिन खेडेकर होते . ट्रेलर वरून चित्रपटाची कथा इंटरेस्टिंग वाटली पण तो कधी आला ते समजलंच नाही:(

२२ जुलै २०१६ ला "जरा हटके"रिलीज होतोय .इरॉस इंटरनॅशल आणि रवी जाधव ची फिल्म आहे Happy
गेल्या वर्षी ४ डिसेम्बर ला रिलीज झालेला " सिंड्रेला " खूपच छान होता .पण चालला नाही. सिनेमा लो बजेट होता .पण कथा छान होती पण थियेटर खाली होत Sad

नाशिकच्या मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये "विजय असो" म्हणून एक सिनेमा काही वर्षांपूर्वी लागला होता, आम्ही तिकीट काउंटर वर गेलो असता, कोणीच प्रेक्षक नसल्याने खेळ रद्द करणार असल्याचे सांगण्यात आले. आम्ही कृपया असं करू नका, आपल्या मराठी सिनेमांना आपण नाही प्रोत्साहन द्यायचं, तर दुसरं कोणी? अशी विनंती केल्यावर त्यांनी आमचं ऐकलं आणि सिनेमा प्रक्षेपित केला. आमच्या पाठोपाठ एकूण 8 प्रेक्षकांनी सिनेमाला हजेरी लावली. आता कथा अजिबात आठवत नाहीये. पण कोणीही न फिरकण्या इतका वाईट तो सिनेमा बिलकूल नव्हता, उलट सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावासा वाटला होता आणि चांगले कलाकार त्यात होते, सिनेमॅटोग्राफी सुद्धा चांगली असल्याचे पक्के आठवते आहे. आपले लोक आपलेच इतके चांगले सिनेमे दुर्लक्षित करुन शेजारी लागलेला कुठलासा सामान्य बॉलिवुडपट गर्दी करून पाहत आहेत, याची हळहळ वाटली.
सुजा, तुझ्या धाग्यामुळे माझी ही विस्मरणात गेलेली सल आठवणीत आली परत! छान धागा... Happy

अरे हो! आणि ही गोष्ट मी पुणे गटग च्या वेळी बोलले होते, मला वाटतं बहुतेक मायबोलीकर माधव यांच्याशी, आणि त्यांनी ह्या सिनेमावर वरील आठवणीसहित माबोवर लेख लिही, असे सुचवले होते मला.. हे ही आत्ता आठवले.

भो भो पहायचा राहुन गेला होता... शेवटी तिसर्‍या आठवड्यात ठाण्यात विवियाना मॉलात असल्याचे शोधून तिथे जाउन पाहिला

कुत्र्यावर चिकाटीने प्रेम केल्याचे धर्मराजाला फळ मिळाले. Proud

तिकिटाला लॉटरीचे लकी कुपन लागले. एक बाउल सेट , गोवा फ्यामिली ट्रिप फ्री सात दिवस .... गोल्ड खरॅदी डिस्काउंट कुपनही मिळाले

परीक्षा संपलॅ की जाणार.
..

मला पण असे कितीतरी अनुभव आहेत.
मल्टिप्लेक्स मध्ये जर एखाद्या सिनेमा १० लोक्स नसतील तर तो शो रद्द होत... आणि मराठी सिनेमांच्या बाबतीत हे सर्रास होतो. मला आठवणारा एक खास प्रसंग सांगावासा वाट्तोय २०१० ला झेंडा रीलीज झाला होता.. ठाकरे प्रेमी म्हणुन मी आवर्जुन हा सिनेमा पाहायला गेले. आम्ही ४ जण होतो दुपारचा शो होत. एक वयस्कर जोडप होतो. टिकिट विकत घेतले. एकुण फक्त ६ जण होते. अर्धा तास झाला तरी शो सुरु झाला नाही. आणि नंतर आमचे पैसे रीफंड करण्यात आले. आम्ही विनंती केली तर त्यानी एक कागद समोर नाचवला की हा आमचा नियम आहे/ ज्यची नोटिस कुठेही नव्हती.. आम्ही अजुन ४ एकस्ट्रा टिकिट विकत घेण्याची सवलत दिली.. पण वेळ निघुन गेली आहे असे तुर्तास कारण देवुन आमचा हिरमोड केला. त्यानंतर त्या मल्टिप्लेक्स ला राम राम ठोकला... मराठी लोक्स जाणार कुठे...???

सिनेमा कितीही चांगला असुदे नाहीतर वाईटही. तुम्ही त्याची जाहिरात कशी करताय यावर सिनेमाचा पाहिलं यश अवलंबून असत आणि एकदा का प्रेक्षक मिळाला की मग माऊथ पब्लिसिटीला सुरवात होते. प्रेक्षकच मिळाला नाही तरी माऊथ पब्लिसिटी होणार कशी ? उत्तम जाहिरातीचा सैराट च्या आधीच चित्रपट म्हणजे जयंत लाडे यांचा " पेइंग घोस्ट " या सिनेमाची हवाच अशी काय केली गेली की बस ते बस . त्या बरोबरीने कट्यार ची आणि नटसम्राटची पण हवा आणि माऊथ पब्लिसिटी Happy

जितेंद्र जोशी यांची पोस्ट
महत्वाची सुचना – खरं बोलल्याचा ज्यांना राग येतो त्यांनी कृपया हे वाचू नये.

ज्याचा पाय जितका खोल,

त्याला तितकी लागेल ओल.

चला निर्मात्याला विकूया..!

सैराट धो धो चालला आणि अनेक प्रतिक्रीया-अफवांना ऊत आला, तसंच आता काही निर्मात्यांना ऊत येणार आहे. मराठीत साधारणत: वर्षाकाठी एखादा सिनेमा सुपरहीट ठरतो. तीन-चार सिनेमे बरा धंदा करतात तर सात-आठ सिनेमे जेमतेम तग धरतात. तरीही वर्षाला जवळजवळ दिडदोनशे सिनेमे बनतात. मग हे ‘एवढे’ सिनेमे बनतात कसे? ते बनवणारे कोण? मराठी तारे-तारकांपैकी सगळे या सिनेमात नसतात (शक्यच नाही) मग यात कामं कोण करतात? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सिनेमे Produce कोण करतात?

सध्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. एखादा जमिनीचा तुकडा ‘फुंकून’ त्यातून मिळालेल्या काही कोटींपैंकी एखाद-दोन कोटी टाकून सिनेमा बनवू इच्छिणाऱ्या निर्मात्यांची संख्या काही कमी नाही.

एखादी नटी आवडते म्हणून,
आपल्या गावात “सायबांनी पिक्चर काढलाच शेवटी” हे आपल्याला मिरवायचं असतं म्हणून,
स्वत:च्या कुटुंबातील-खानदानातील त्यातल्या त्यात बऱ्या दिसणाऱ्या ‘डॅशिंग’ मुलाला Break द्यायचा असतो म्हणून,
सैराट, नटसम्राट, बालकपालक, लयभारी, कट्यार, दुनियादारी, टाईमपास यासारखंच यश आपल्यालाही मिळेल असं गाजर एखाद्या ‘होतकरू’ दिग्दर्शकानं दाखवलेलं असतं म्हणून,
आपल्याला सुचलेल्या ‘ष्टोरी’ वर पिक्चर काढायचाय म्हणून,
बायको म्हनली पिक्चर बनवा म्हणून,
किंवा अगदीच फक्त खाज म्हणून हे निर्माते स्वत:चा पैसा पोत्यात भरून सिनेमा काढायला निघतात,
या सर्व निर्मात्यांकडे सिनेसृष्टी बदलायला निघालेला एक ‘मोठ्ठा’ डायरेक्टर असतोच. आता मोठ्ठा डायरेक्टर म्हणजे त्याचे कुठल्यातरी स्टार बरोबर किंवा वेगळ्या यशस्वी डायरेक्टर बरोबर काढलेले फिल्मच्या सेटवरील फोटो तरी असतात किंवा तो हाफ चड्डी, वर टि-शर्ट आणि डोक्यावर कॅमेरामन घालतात तशी हॅट घालतो म्हणून या अशा निर्मात्यांना डायरेक्टर म्हणून कुणीही चालतं. मग तो चालणारा डायरेक्टर आहे किंवा एक चालणारा सिनेमा बनवू शकतो याची खात्री पटवून देणारा असला म्हणजे झालं. एखादा कलाकार किंवा लेखक पिक्चरमध्ये घेण्याआधी त्यांनी काय काय काम केलयं हे आवर्जुन पाहीलं जातं परंतु डायरेक्टरने आधी काय काय केलयं हे पाहण्याची या नवनिर्मात्यांना आवश्यकताही भासत नाही. कारण त्या दोघांना एकमेकांवर प्रचंड विश्वास असतो. बर आपल्याला चहा जरी बनवता येत नसला तरी picture बनवता येतोच असा आत्मविश्वास (फाजील) अनेक जणांना असतो.

आता अशा निर्मात्यांना त्यांच्या पिक्चरसाठी खरंतर मोठे स्टार्स हवे असताता. पण एकदा स्टार झालेला स्टार किंवा नट आता होतकरू नसल्यामुळे तो त्यांना भिक घालत नाही. काहीजण स्पष्ट नकार देतात, काही डेट्सचं कारण पुढे करतात, काही मुद्दाम रक्कम वाढवून सांगतात तर काही भेटच टाळतात. मग असे निर्माते खालच्या फळीकडे येतात. आता खालची फळी म्हणजे ‘गरजवंत’ किंवा ‘Available’ कलाकार यात जुने, नविन, होतकरू, माथेफीरू, “च्यायला आज मी खरंतर कुठे पाहीजे होतो” वगैरे categoryतली बरीच माणसे असतात. यांना त्या सिनेमाच्या कथेशी आणि चित्रीकरणाशी बऱ्याचदा घेणंदेणंही नसतं. त्यांना मिळणारं ‘मानधन’ (खरंतर ‘मानधन’ हा शब्द मानानं मिळणारं धन किंवा धनासहित मिळणारा मान म्हणून प्रचलित झालेला असावा परंतु तो अर्थ आता त्या शब्दाला चिकटून राहिलेला दिसत नाही) असो तर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होते आणि मग तीच ती ठरलेली, अनेक सिनेमात पाहिलेली Locations आणि त्याच त्याच Situations वर घासून गुळगुळीत झालेले संवाद म्हणत हे कलाकार त्यातला त्यात बऱ्या हॉटेल मध्ये राहत; स्वत:चे घरी न होणारे लाड पुरवत Shooting-Shooting खेळतात. एरवी घरात तुटलेल्या कानाच्या कपातून चहा पिणारे आपल्या Boyला (एक पोऱ्या जो यांना चहा पाणी देतो) स्वत:चा फोटो असलेला कप घेऊन त्यात Green Tea मागवतात. यात अनेक गमतीजमती घडतात. बहुतेकदा या अशा पिक्चर्सचं शुटींग निर्मात्याच्या किंवा डायरेक्टरच्या गावी असतं. मग सेटवर चित्रीकरण पहायला उसळलेल्या गर्दीत गावकरी, आमदार, नगरसेवक, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मामे, आत्या, काके, काक्या सर्वजण येतात. मग एकमेकांबरोबर फोटो काढणे, अमुक अमुक सिनेमातलं तमुक काम आवडलं, जरा त्या पिक्चर मधला डायलॉग म्हणुन दाखवा वगैरे गोष्टी होतात. आता या पैकी अनेक सिनेमे बनतात, काही मध्येच बंद होतात तर काही बनूनही प्रदर्शित म्हणजेच रिलीज होत नाही. बहुतेकदा अशा सिनेमांमध्ये काम करणारे अनेक कलाकार निर्ढावलेले असतात. अनेक वेळेला काही कलाकार तर हा सिनेमा प्रदर्शित होणारच नाही याविषयी अगदी ठाम असतात आणि तसं ते बाकी काम करणाऱ्या कलाकारांना प्रसंगी पटवूनही देतात.

दिवंगत जेष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांनी मला एका सिनेमा दरम्यानची त्यांची आठवण सांगितली ती म्हणजे निळु भाऊ फुले आणि कुलदीप पवार एका सिनेमाच्या चित्रीकरणासाठी कोल्हापूरात जात होते. तीन-चार महीन्यांतून एकदा तो निर्माता आणि दिग्दर्शक त्यांच्या चार तारखा घेऊन शुटींग करत असे. दोन वर्ष हे चालू होतं. एक दिवस कुलदीप पवार यांच्या लक्षात आलं की दोन वर्षात ते सतत तेच ते सीन्स चित्रीत करत होते. फक्त आजुबाजूचे कलाकार बदलत असत त्यांनी याबाबत शंका व्यक्त केली असता निळु भाऊंनी त्या सतत बदलणाऱ्या सहकलाकारांकडे त्यांना मिळणाऱ्या मानधनाविषयी चौकशी केली तेव्हा ते कलाकार म्हणाले “अहो आम्हाला पैसे नाही मिळत, आम्हीच पैशे देतो तुमच्यासोबत काम करायला मिळतंय म्हणून” तात्पर्य काय तर अशी भंपक आणि लबाड माणसे दिग्दर्शक निर्मात्यांच्या कपड्यात तेव्हाही होती आणि आजही आहेत.

मध्यंतरी एका दिग्दर्शकाने सिनेमा करताना निर्मात्यांनी कोणती दक्षता घ्यावी या विषयातंर्गत काही नवशिक्या निर्मात्यांचं शिबीर घेऊन पुढे त्यातलेच काही निर्माते लाटले आणि आणखी दोन सिनेमे करून त्यांना टोप्या घातल्या. तर एका दिग्दर्शकाने गावोगावी होतकरू, इच्छूक कलाकारांचं अभिनय शिबीर घेऊन त्यांना सिनेमात फुकट काम करण्याची संधी दिली परंतु एकालाही मानधन मात्र दिलं नाही. अर्थातच त्या दिग्दर्शकांचही पुढे काही झाल्याचं दिसलं नाही.

तर अशाप्रकारचे अनेक दिग्दर्शक आहेत जे कामापेक्षा या अशा लबाडखोरीत गुंतलेले आहेत. स्वत:चं मानधन घेऊन इतर गोष्टींमधून पैसे खाऊन ते पचवून निर्माता देशोधडीस कसा लागेल याची उत्तम काळजी ते घेत असतात. बरं! अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ अशा लोकांबरोबर आनंदाने जरी नसले तरी काम मात्र करतात. याचं कारण म्हणजे आपापल्या ‘वाढवून ठेवलेल्या गरजा’ (मी सुध्दा असे काही सिनेमे केले आहेत).

बऱ्याच दिग्दर्शकांना कथेची समज असते परंतु तांत्रिक गोष्टींमधलं ओ की ठो समजत नसतं मग अशा वेळेला कॅमेरामन धाऊन येतो आणि स्वत: ती जबाबदारी ‘खांद्यावर’ घेतो कारण त्याचं नाव लागणार असतं श्रेयनामावलीत. हा रामरगाडा असाच चालू राहतो आणि सिनेमा तयार होतो. परंतु आता मोठा प्रश्न असतो तो म्हणजे Promotion आणि Releaseचा! एकतर अशा सिनेमात काम करून तो सिनेमा जरातरी ‘बरा’ झाला असेल तर काही कलाकार त्याचं प्रमोशन करतात अन्यथा ते अशा सिनेमांकडे संपूर्णपणे पाठ फिरवतात. काही कलाकार प्रमोशनचे वेगळे पैसे घेतात हे मी ऐकून होतो. बरं त्यात त्या सिनेमाच्या सुपरहीट होण्याविषयी स्वत: दिग्दर्शक आणि निर्माते इतके ठाम असातात की त्यांच्या मनात हाऊसफुलचा बोर्ड कधीच लागलेला असतो. शिवाय वर्षाकाठी इतके सिनेमे येतात म्हणून एका आठवड्यात कधीकधी पाच-सात सिनेमे प्रदर्शित होऊन ते एकमेकांना खाऊन टाकतात. यात जर एखादा मोठा सिनेमा असेल तर चित्रपटगृहात त्याला महत्त्वाचं स्थान मिळतं. खरंतर सिनेमा बनवणं आणि तो प्रदर्शित करणं या दोन अत्यंत वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या माहितीत असे अनेक चांगले सिनेमे आहेत जे प्रमोशन आणि प्रदर्शनासाठी लागणाऱ्या पुरेशा आर्थिक रकमे अभावी प्रदर्शित झाले नाहीत किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नाहीत.

प्रदर्शनापर्यंत येऊन पोहोचलेला सिनेमा कुठे जातो हे बऱ्याचदा लोकांना कळतही नाही. निर्माता स्वत: चार दोन दारे ठोठवतो परंतु काही न घडल्याने निराश होऊन बसतो आणि त्या सिनेमाशी आणि निर्मात्याच्या पैशाशी इमान न बाळगणारा दिग्दर्शक मात्र त्या सिनेमातल्या कलाकारांसोबतच्या फोटोच्या जोरावर पुढच्या निर्मात्याला टोपी घालायला सज्ज असतो. बरं त्यात तुलाही पैसे मिळावे, मलाही एक सिनेमा स्वत:च्या नावावर जमा करता आला म्हणून किंवा आणखी काही वैयक्तिक नातेसंबंध (बहुधा मैत्री) या कारणामुळे कलाकारही मूग गिळून गप्प बसतात आणि दिग्दर्शकही! कारण इथे एकमेकांवर आणि एकमेकांच्या कामावर टीका करण्यापेक्षा ‘तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा’ म्हणत सर्वजण गप्प राहतात आणि अनेक निर्माते ज्यांना चित्रपटसृष्टीत जम बसवायचा असतो त्यांना त्यांनी सिनेमावर लावलेल्या काही कोटींच्या मोबदल्यात काही लाख रूपये, प्रसंगी हजार रूपये घेऊन नुकसान सोसत आणि स्वत:लाच दोष देत एकीकडे निराश व्हावं लागतं. तर दुसरीकडे अशा प्रकारचे सिनेमे करणारा दिग्दर्शक स्वत:च्या भाड्याच्या घरातून मालकीच्या घरात स्थिरावतो. बरं तो तिथे थांबत नाही तर आणखी मोठं घर हवं म्हणून आणखी तसे सिनेमे करतो. मग पुण्यात घर म्हणून आणखी…. मग फार्महाऊस साठी आणखी…. मग गाडी, मोठ्ठी गाडी साठी आणखी… न संपणाऱ्या या आंधळ्या प्रवासाला निघतो. जरा काही वेगळं म्हणेल, आता तरी चांगला सिनेमा बनवेल, चुकांमधून शिकेल असं वाटतं पण त्याची गढूळ झालेली दृष्टी त्याला तसं करूच देत नाही आणि हळुहळु त्याला दिसेनासं होतं.

मला तर या अशा लोकांच्या या गाडया घोड्यांमागे, मुर्दाड संपत्ती मागे अनेक निर्मात्यांचे तळतळाट आणि त्या निर्मात्यांची बायका मुले दिसतात. कारण आजही मला जुन्या पिढीतील कुठल्या दिग्दर्शक किंवा कलाकाराकडे कुठली मोठ्ठी गाडी होती, तो कुठे आणि कसा रहायचा यापेक्षा त्यांनी काम काय केलं हेच दिसतं. अन्यथा हा माझा मार्ग एकला, पिंजरा, साधी माणसं असे चित्रपट आणि भालजी, राजा परांजपे, राम कदम, सुधीर फडके, गदिमा, दादा कोंडके, व्हि. शांताराम ही नावं कुणाच्या स्मरणातही राहिली नसती. अर्थात नव्या पिढीतही हा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे, आपापल्या वकुबाप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे करताना अनेक माणसे दिसताहेत. फक्त आता काळ आणि इंडस्ट्री बदलली आहे. मराठीसृष्टीत ‘कथा’ हाच जरी प्राण असला तरी त्याचं Execution म्हणजे हाताळणी वेगवेगळी आणि आणखी समर्पक व्हायला हवी.

आता या सर्वात दोष कुणाचा? खरंतर खूप जणांचा आपल्या गरजेपोटी वाईट सिनेमे करणाऱ्यांचा (माझ्यासकट), त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त पैशासाठी काम करणाऱ्यांचा. तरिही मी शेवटी असं म्हणेन की काही वर्षांपूर्वी एक शर्ट शिवायला दिडदोनशे रूपये पडत. आज तयार शर्ट घ्यायला किमान पाचशे रूपये पडतात आणि तो घेतानाही आपण दोन दुकाने फिरून चौकशी करून आपल्या Choice ने विकत घेतो. जर पाचशे रूपयांची खरेदी करताना आपण दोन दुकाने हिंडतो तर दोन कोटी एका सिनेमावर लावताना किती दुकाने पाहायला हवीत? असो 14 विद्या आणि 64 कलांचा समुच्चय असणारी सिनेमा नावाची विद्या सोपी नाही. यात शिकायला मरेपर्यंत आणि शेवटचा सिनेमा बनवेपर्यंत वाव आहे. हे ज्याला कळेल तो मेल्यानंतरही ताम्रपटावर आपलं नाव अजरामर करून जाईल. कारण अनेक तुकडे एकत्र करून एकएक टाका काळजीनं, मायेनं, मनापासून आणि कलाकारीनं शिवून सलग एक गोधडी शिवलेली आजी ह्यात नसली तरी ती गोधडी आजही पांघरताना प्रत्येक नातवाच्या, पतवंडांच्या शरीराला तिच्या मायेची ऊब जाणवत राहते. सिनेमाचं अगदी तसंच आहे.

आपला विश्वासू

जितेंद्र जोशी

हायला, जामोप्या भलतेच लकी निघाले.:फिदी: असो, एंजॉय करा. संधी परत येत नसते.

सुजा, धागा आणी माहिती उत्तम आहे. जितेंद्र जोशीची इथे टाकलेली ही पोस्ट एकदम सणसणीत.

रद्दी काढताना मेड इन महाराष्ट्रची पानभर जाहिरात दिसली. अरुण नलावडे आणि भाऊ कदम. (?) संगीत मराठीवर याचं एक गाणंही दिसलं.

मी आजच टीवी वर बघितलं मंगेश देसाई आणि विद्या बालनचा एक अलबेला नावाचा सिनेमा कुठे तरी बंद ठेवलाय. खूप वाईट दिवस आले आहेत मराठी चित्रपटांना!!

हो डॉली मी पण आजच ऐकलं. एक अलबेला हा मंगेश देसाई आणि विद्या बालनचा 'भगवान दादा' यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे.
तो बंद ठेवलाय इतकंच नव्हे तर तो बंद करून बहुधा तिथे लोकाग्रहास्तव सैराट लावला असंही ऐकलं.

सुजा, अगदी खरे आहे हे. मी वर ज्या चित्रपटांचा उल्लेख केलाय ते तसेच वाटतात मला.

अलबेला चा रिव्यू चांगला होता कि ( म्हणजे बरा ) गीता बाली म्हणून विद्या ला बघणे म्हणजे पर्वणीच होती.

पिंडदानाला प्रेक्षक शिवला नाही >>>>>>>>> हा हा , हे भारी होतं,
मी होतो त्यात थोडासा (म्हणुनच चालला नसेल कदाचित)

सुजा >> तुमचे मुद्दे हे काही प्रमाणात योग्य वाटत असले तरी "सैराट" ला मिळालेली प्रसिद्धी ही तिची कथा मान्डणितील आहे...स्टोरी टेलिन्ग खुपच छान झालय...

मला तरी अस वाटत की कोणता ही सिनेमा वा कथा पाहताना/ वाचताना सुरवातीच्या १०/१५ मिनीटा मध्ये कथा आपल्या मनाचा ताबा घेणारी हवी... जस ते S.T. Coleridge म्हाणतात तस "willing suspension of disbelief" असच काहीतरी व्हायला हव (जे "सैराट" च्या बाबतीत होत)...

सिनेमा वा कथा त्यातील पात्र ही खरी वाटायला हवीत, आपण आजुबाजुच विसरुन त्या कथे मध्ये मिसळायला हव. बहुतेक सिनेमे पाहताना अस जाणवत की ते सगळेच छान अ‍ॅक्टिन्ग करतात पण ते कुठे तरी मनाला भीडत नाही... तेच ते वापरुन वापरुन जुने झालेले सन्वाद, वापरुन गुळगुळीत झालेल्या सिचुवेशन्स...attention to details...सुमार कथानक...आणि स्टिरीओ टाइप्स..इ.. इ...त्याच प्रमाणे..बर्‍याच सिनेमाच्या कथा या ठरावीक २ ते ३ शहरा मधील वा त्याच्या बॅकड्रॅप वर असतात जे इतर ठीकाण चे लोक रीलेट नाही करु शकत...!!

ज्या ज्या सिनेमानी हे झुगारुन वेगळ मान्डलय त्याला प्रेक्षकानी डोक्यावर घेतलय...!!!

Pages