दर शुक्रवारी- मराठी चित्रपट

Submitted by सुजा on 2 July, 2016 - 03:58

नागराजचा सिनेमा रिलीज झाला आणि मायबोलीवरचे सगळे सैराट झालेत. नागराजच्या सिनेमाला एवढी प्रसिद्धी मिळाली /तो अगदी धो धो चालला त्यात नागराजच्या दिग्दर्शनाच जितकं कौशल्य आहे ते आणि तितकंच त्या सिनेमाची जी काही प्रसिद्धी झाली ( झी मराठी ने केलेली) त्याच बरोबर अजय- अतुलने जे काही सैराट संगीत दिलंय /जी काही सैराट गाणी दिलेली आहेत त्याचा पण जबरदस्त वाटा आहे. गाण्याचे बोल पण अजय -अतुल यांचेच आहेत आणि सिनेमॅटोग्राफर रेडडी यांना कसं विसरून चालेल ?

सैराटचा इतका बोलबाला झाल्यावर "यु ट्यूब" वर या चित्रपटासंबंधी ज्या काही क्लिप्स बघितल्या./ चित्रपटाचा जो काही ट्रेलर बघितला त्यावरून लक्षात येतंय की चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी पण तितकीच जब्राट झाली होती . त्याच बरोबर असं ही लक्षात येतंय नागराजच्या सिनेमाच्या वाट्याला जे काही कौतुक आलं त्यातलं १% कौतुक तर सोडाच पण जे काही मराठी सिनेमा दर शुक्रवारी रिलीज होतात त्यांची साधी दखल सुद्धा घेतली गेलेली नाही . मग प्रश्न असा पडतो इतके ते सिनेमे वाईट होते का ? किव्वा वाईट होते का चांगले होते हे समजण्यासाठी ते कधी रिलीज झाले तेही आपल्याला समजलं नाही का ?.

सध्याच्या काळात " चला हवा येऊ द्या " या कार्यक्रमामध्ये जरी मराठी सिनेमांना ( आणि आत्ता हिंदी सुद्धा ) प्रसिद्धी मिळत असली तरी सुद्धा काही काही सिनेमे असेही असतात जे चांगले असूनही व्यवस्थित प्रसिद्धी न झाल्याने कधी येतात ( रिलीज होतात ) आणि कधी जातात ते समजत देखील नाही . मराठी वाचक वर्ग /प्रेक्षक वर्ग या नात्याने आपण प्रत्येक शुक्रवारी रिलीज होणाऱ्या मराठी सिनेमासंबंधी या धाग्यावर बोलूयात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

( अमोल परचुरे यांची फिल्म प्रमोशन संबंधीची पोस्ट )

EVENT – कोणत्याही मराठी सिनेमाची (अगदी ‘झी’च्या सुद्धा) मुंबईमधील पत्रकार परिषद..

– स्टारकास्ट बरी असल्यामुळे आणि मुख्य कलाकार पत्रकार परिषदेला येणार अशी PR ने खात्री दिल्यामुळे पत्रकार मोठ्या संख्येनं हजर

– दिलेली वेळ संध्याकाळी ७ ची… कार्यक्रम सुरु होण्याची वेळ रात्री ९ ची…

– उशीर होत असला तरी कुणाचेच काही म्हणणं नाही. (पत्रकारांचं तर नाहीच नाही!)

– वातावरणात खोटेपणा, लाळघोटेपणा, अरेरावी, उन्मत्तपणा मिक्स झालेला…

अशा माहौलमध्ये पत्रकार परिषद सुरु होते.पत्रकार सावरून बसतात. कॅमेरे सज्ज होतात, (स्टेजवर जे सुरु आहे, ते सगळे शूट करू नको, अशी सूचना रिपोर्टर्सनी कॅमेरामनना आधीच दिलेली असते).

कलाकार, दिग्दर्शक खूप मनापासून, भरभरून (म्हणजे तेच ते नेहमीचंच) बोलत असतात. मग प्रश्नोत्तरांना सुरुवात होते. प्रिंट ने जास्त प्रश्न विचारून वेळ ‘वाया’ घालवू नये, असं इलेक्ट्रॉनिक मिडियाला वाटत असतं, त्यामुळे ३-४ प्रश्नात पत्रकार परिषद संपते, आणि मग सुरु होतो खरा खेळ…

इलेक्ट्रॉनिक मिडियाची सगळी ‘पोरं आणि पोरी’ कॅमेरामनसकट स्टेजकडे धाव घेतात. सिनेमात जी महत्त्वाची जोडी आहे, त्यांचा TICTAC म्हणजे इंटरव्ह्यू घेण्यासाठी सगळी धडपड सुरु असते. त्यानंतर साधारण असे TICTAC होतात.

रिपोर्टर – (तोंडभर खोटं हसू) हाsssssय
स्टार्स – (ऑलरेडी खोटं हसून तोंड दुखतंय म्हणून) हॅल्लो

रिपोर्टर – मग काय सांगशील तुझ्या या नवीन सिनेमाबद्दल (पहिलाच प्रश्न एकदम ग्रेट)
स्टार्स – वेल, एक वेगळा प्रयत्न आहे, माझा रोल म्हणशील तर वेगळं काहीतरी करायला मिळालं याचा आनंद आहे. (हेच उत्तर गेल्या ३ tictac मध्ये होतं!)

रिपोर्टर – शूटिंगमध्ये जाम मजा आली असेल ना? (यांना एकदा घेऊन जायला पाहिजे लोकेशनवर)
स्टार्स – हो हो, खूपच धमाल केली… आमचं युनिट म्हणजे एक कुटुंबच झालं होतं. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी आम्ही सगळेच इमोशनल झालो होतो…(मग एखादा शूट दरम्यानचा किस्सा सांगितलं जातो)

रिपोर्टर – USP काय आहे सिनेमाचा? (USP चा फुल्ल फॉर्म माहीत असेल याची खात्री नाही)
स्टार्स – Content हाच USP आहे, आपल्या मराठी सिनेमात Content नेहमीच महत्त्वाचा असतो, आणि तसंच असायलं हवं (तिकडे दुसऱ्या कोपऱ्यात दिग्दर्शक तिसऱ्या चॅनेलला हेच सांगत असतो.)

मग रिपोर्टरकडून ‘काय सांगशील’ छापाचे आणखी काही प्रश्न, त्यावर तीच तीच उत्तरं..
आणि मग गायक-संगीतकार यांच्याकडे रिपोर्टरचा मोर्चा…
मग सगळे एक कडं करून उभे राहतात.
कॅमेरा वेडा-वाकडा हलवायला सांगितला जातो…

रिपोर्टर – (खूप खुश झाल्याचा अभिनय) हॅल्लो म्युझिकल पीप्स!!
गायक-संगीतकार – नमस्कार… नमस्कार (ते थोडे अवघडलेले)

रिपोर्टर – गाणी रेकॉर्ड करताना काय काय धमाल केलीत? (गाण्याचं रेकॉर्डिंग म्हणजे काय वाटलं या रिपोर्टरला?)
गायक-संगीतकार : खूपच धमाल आली. मुळात आजच्या युथला डोळ्यासमोर ठेवून गाण्यांचा विचार केला होता, आणि आज तू पाहिलंच असशील, की पहिल्यांदा गाणी ऐकवल्यावर सगळ्यांनीच कसा ठेका धरला ते…….

रिपोर्टरकडून मग आणखी असलेच एक-दोन प्रश्न आणि मग गाणं गायचा आग्रह…
अर्थातच आग्रहाला मान देत गायक-संगीतकार गाणं गाऊन दाखवतात, मुलाखत संपते, रिपोर्टर पॅकअप करून निघून जातो.

नंतर हे सगळं मटेरियल एकत्र होऊन अर्ध्या तासाचा शो न्यूज चॅनेलवर बघायला मिळतो.

अशा TICTAC मध्ये काय काय बोलायचं, याचं कोणतंही प्लॅनिंग निर्माते-दिग्दर्शक-PR-कलाकार यांच्यामध्ये झालेलं नसतं. याला सुद्धा हे रिपोर्टरच जबाबदार आहेत असं म्हणायला हवं. आपले रिपोर्टर ‘मित्र’ काय प्रश्न विचारणार याचा अंदाज असल्यामुळे प्लॅनिंग किंवा तयारीची गरजच वाटत नसणार. हिंदी सिनेमाच्या अशा इव्हेंट आधी रिपोर्टरकडून काय काय प्रश्न येऊ शकतात, त्यांचा कसा सामना करायचा याचा किमान विचार केला जातो.

कोणत्याही मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी न्यूज चॅनेलवर दाखवला जाणारा इंटरव्हयू खूप महत्त्वाचा असतो. एक तर २२ मिनिटांची वेळ मिळते आणि तोच इंटरव्ह्यू नंतर सोशल मीडियावरून पसरवता येतो. आता गोची हीच आहे की या २२ मिनिटांमधून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होईल असं फार काही निघत नाही. अमुक एक चॅनेलवर माझ्या सिनेमाबद्दल मुलाखत दाखवली, यावरच बरेच निर्माते खुश असतात, त्यामुळे PR सुद्धा ‘दर्जा’ वगैरे गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. जरी हे प्रमोशन फुकट (?) होत असलं, तरी त्याच्या दर्जाबद्दल सर्वांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सादर होणाऱ्या चित्रपटविषयक कार्यक्रमांमध्ये अजिबात नावीन्य राहिलेलं नाही. अभ्यास करून प्रश्न विचारणारे, बातमी शोधणारे रिपोर्टर/अँकर खूपच कमी उरलेत, सध्या उरलेत केवळ कव्हरेज करणारे रिपोर्टर…त्यामुळे एकाच प्रकारच्या बातम्या सगळीकडे दिसत राहतात. त्याच त्याच रिपोर्टर्सनी विचारलेल्या त्याच त्याच प्रश्नांना उत्तरं द्यायला ‘स्टार्स’नाही कंटाळा येत नाही हे विशेष…यामधला धोका हा आहे की टीआरपी मिळत नाही या कारणावरून हे कार्यक्रम बंद होऊ शकतात. बरं, जे चांगले रिपोर्टर आहेत त्यांनाच मुलाखत दिली तर पत्रकार संघटना वगैरे नाराज होण्याची भीती असते.

हे सगळं का झालं?

आपल्याकडे चांगली पत्रकारिता खूप कमी ठिकाणी शिकवली जाते आणि तिथेही मनोरंजन क्षेत्राकडे फार गांभीर्याने बघितलं जात नाही. फिल्म पत्रकारिता म्हणजे काय हेच मुळात शिकवलं जात नाही, त्यामुळे जसं मनाला येईल तसा कारभार सुरू राहतो. हिंदी मीडियामध्येही साधारण हीच परिस्थिती असली तरी तिकडे डेस्कवर बसलेली सिनियर माणसं CONCEPT आणि CONTENT वर काम करत असतात, त्यामुळे मुलाखत/कार्यक्रम वाईट होणार नाही याची थोडीफार काळजी घेतली जाते, आणि तरीही मुलाखत वाईट झालीच तर त्यावर संस्कार करून मगच ती ON-AIR होते.

आणि इथे मराठीत ‘चाललंय ते चालूदे काय फरक पडतोय’ असाच सध्या सूर आहे.

हातात बूम घेऊन फिरणारी ‘धडाडीची’ तरुणाई अज्ञानात सुखी आहे, या बूम वर कोरलेल्या ब्रॅण्डकडे बघून गप्प असलेली स्टार मंडळी सुद्धा ‘सुंदर शो’ वगैरे म्हणत कौतुक करायला सरावली आहे, आणि ‘प्रेस कॉन्फरन्स’ मध्ये भरपूर कॅमेरे बघून निर्मात्याच्या चेहऱ्यावर तर अत्यानंद आहे.

कट टू फ्लॅशबॅक

साल २००१ – मी तेव्हा अल्फा बातम्यांमध्ये डेस्कवर कामाला होतो. रविवारचा दिवस होता, झी न्यूजकडे एंटरटेनमेंट रिपोर्टर नव्हता आणि नाना पाटेकरनी बाईटसाठी वेळ दिली होती. (तेव्हा TICTAC हा प्रकार नव्हता). हिंदी रिपोर्टर नाही, म्हणून मला नानांकडे जायला सांगण्यात आलं . नाना ला पहिल्यांदा भेटणार म्हणून मी थोडा हवेतच होतो. नानांच्या घरी पोचलो, कॅमेरा रेडी झाला, नाना येऊन बसले… त्यांचा ‘वध’ नावाचा सिनेमा येणार होता.

मी पहिलाच प्रश्न विचारला की ‘वध सिनेमाबद्दल काय सांगाल?’,

प्रश्न ऐकून नानांनी माझ्याकडे तुच्छतेने बघितलं आणि म्हणाले ‘सस्पेन्स फिल्म आहे’…

माझा दुसरा प्रश्न ‘तुमच्या रोलबद्दल सांगा ना’

नाना (आणखी सटकून) – डॉक्टरचा रोल आहे

मी (माझं सुरूच!) – हो, पण रोलबद्दल आणखी काय सांगाल

नाना (चेहरा लाल) – अरे, डॉक्टरबद्दल काय सांगणार आणखी?

यानंतर काय झालं असेल हे सांगायची गरज नाहीच… ५ मिनिटं आणखी कसाबसा किल्ला लढवून मी घराबाहेर पडलो होतो.

त्या एका अनुभवाने मला खूप काही शिकवलं.

आता सगळंच बदललं… नानासुद्धा हसत हसत ‘TICTAC’ सहन करायला शिकलेत…

सगळंच हास्यास्पद होत चाललंय का? खरंच, कुणालाच काही फरक पडत नाहीये का?

<<मी होतो त्यात थोडासा (म्हणुनच चालला नसेल कदाचित)>> आनंदमैत्री म्हणजे काय ? Happy

मोरपंखिस एकदम मान्य. काहीतरी वेगळं होत ( प्रेमकथे सारखीच प्रेमकथा पण त्यातल्या त्यात वेगळे पणा .म्हणजे नायिकेला ड्याशिंग दाखवलाय. म्हणून कदाचित जास्त आवडली असेल. )पण इतरांची मेहनत पण सिनेमाच्या यशात गिनतीत धरायला पाहिजेच ना. आणि सगळ्यात महत्वाचं प्रमोशन . फँड्री च प्रमोशन ही झी टॉकीजचाच होत आणि सैराट चे तर एक निर्मातेही निखिल साने आहेत. प्रमोशन नीच अर्धी बाजी मारली Happy

http://dreamerspr.com
या ठिकाणच्या ब्लॉगपोस्टस जशाच्या तश्या इथे कॉपी करून टाकण्याचे प्रयोजन कळले नाही.

असो. बरेच काही म्हणता येण्यासारखे आहे पण इथल्या अनेकांच्या इतकी मी मराठी चित्रपटसृष्टीची तज्ञ नाही त्यामुळे वाचनमात्र.

नी Proud

चार कोटीचा बिझिनेस करूनही मा.भगवान यांच्यावरचा चित्रपट सुलतानसाठी उतरवला गेला इति आकाशवाणी एफेम बातम्या.

नीधप जी तुमच्या प्रतिक्रियेच प्रयोजन कळलं नाही . शेवटी हा धागा पुढे नेण्याकरिता मराठी सिनेमे कधी रिलीज होतात /मार्केटिंग करता काय काय प्रयत्न केले जातात आणि एकंदरच मराठी सिनेमाच्या अनुशंघाने येणारी माहितीच लिहिणार ना? का दुसरी कुठली लिहू शकते ? ती मनानी तर लिहू शकत नाही ना . वाचूनच लिहिणार ना ? बरं ज्यांच्या ब्लॉग पोस्ट वरच लेखन मी टाकलेल आहे त्यांच रीतसर नाव लिहिलेलं आहे. ते लिखाण मी लिहिलंय असं भासवलेलं नाहीये की माझ्या नावावर खपवत पण नाहीये .

माहीत नाही किती जणांना ही गोष्ट लक्ष्यात आली आहे, पण झी टॉकीज तर्फे निर्मित केलेले चित्रपट आतापर्यंत तुफान चालले आहेत. नटरंग, दे धक्का, बालक पालक, तुकाराम [जितु जोशिवला] आणि नुकताच आलेला सैराट. फारच कमी अपवाद होते ज्यानी चांगला बिजनेस केला नाही. झी ची मार्केटिंग स्ट्रॅटजी मस्त आहे आणि चित्रपट येतोय असे समजते.

या व्यतिरिक्त असेही प्रेक्षक आहेत जे दिग्दर्शक किंवा आवडत्या अभिनेत्याला बघून जातात. उदाहरणार्थ सतीश राजवाडे चे चित्रपट नेहमीच लाइट असतात आणि बघायला मज्जा येते आणि त्या उलट गजेन्द्र अहीरेचे काहीतरी वेगळे देऊन जातात. भावे आणि सुकथनकर पैशांसाठी चित्रपट काढतात असे कधीच वाटत नाही पण पाहणेबल चित्रपट असतात.

<<माहीत नाही किती जणांना ही गोष्ट लक्ष्यात आली आहे, पण झी टॉकीज तर्फे निर्मित केलेले चित्रपट आतापर्यंत तुफान चालले आहेत. नटरंग, दे धक्का, बालक पालक, तुकाराम [जितु जोशिवला] आणि नुकताच आलेला सैराट. फारच कमी अपवाद होते ज्यानी चांगला बिजनेस केला नाही. झी ची मार्केटिंग स्ट्रॅटजी मस्त आहे आणि चित्रपट येतोय असे समजते.>> किरु एकदम बरोबर. झी ची मार्केटिंग स्ट्रॅटजी जबरदस्त आहे. त्याचा फायदा सगळ्यांनाच मिळतो. याचा अर्थ असा नाही होत की बाकीच्या चित्रपटांमध्ये काहीच दम नव्हता किव्वा त्याचे दिग्दर्शक ब्रिलियंट नव्हते.शेवटी प्रत्येक सिनेमा हा माणसाप्रमाणेच नशीब घेऊन जन्माला येतो Happy

किरु,

जाहिराती कुठल्या माध्यमातून केल्या हे पण महत्वाचे आहे. मायबोली वरून ज्या चित्रपटांच्या जाहिराती झाल्या, त्या मर्यादीत लोकांपर्यंतच पोहोचल्या. त्यातले काही चित्रपट चांगले असूनही फारसे चालले नाहीत. ( उदा. हायवे एक सेल्फी आरपार )

फक्त मार्केटिंग मुळे सिनेम चालतो !! हे काही तेवढ नाही पटल..
तस तर सगळे मार्केटिंग करतील/करतातच (म्हणजे ते काही मोठ गुपीत नाही) ...

मला वाटत..मुळात प्रोडक्ट उत्तम हव तरच मार्केटिंगला किम्मत...
मार्केटिंग मुळे रीपीट ओडियन्स नाही मीळत...

अलिकडच्या काळात बहुतेक सिनेमे यशस्वि झालेत.. त्या मध्ये माउथ पब्लिसीटि व पब्लिकने उचलुनधरने
याचा पण खुप मोठा वाटा आहे...

नुकताच आलेला सैराट >> त्याच मार्केटिंग हे बाकी सिनेमा सारखच होत...
पण बर्‍याचजणाना या सिनेमाच जे जास्त मार्केटिंग झाल हा जो गैरसमज आहे तो अशासाठी की..
हा सिनेमा रिलीज झाल्या नन्तर जवळपास एक/दोन आठवड्यात झडुन सगळ्या चॅनल्सनी सैराट टिमला बोलावल.... Twitter/fb वर तुफान चर्चिल गेल .. त्यावर सगळ्या मोठ्या नॅशनल/इन्टरनॅशनल न्यज पेपर मध्ये लिहल गेल...ते सगळ अ‍ॅप्रिसीएशन या प्रकारात मोडत ...त्यालाच ...बरेचजण मार्केटिंग असा गैरसमज करत आहेत..एवढच.

१५ जुलै २०१६ ला प्रदर्शित होणारे चित्रपट -
१) किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी
२ )अस्तु - सुमित्रा भावे
३ ) तालीम

२२ जुलैला रवी जाधव ची फिल्म येतेय " प्रेम करावं जरा हटके" आणि "हाफ तिकीट " Happy

एखादा माणूस स्वतःच्या सेन्स मध्ये असेल .मी कोण आहे माझं अस्तित्व काय आहे हे जो पर्यंत त्याला कळतंय/ त्याला स्वतःला आठवतंय तो पर्यंतच तो माणूस आपला का? एकदा का माणूस त्याच हे स्नेसेशन च गमावून बसला (त्याच्या स्वतःच्याच आठवणी पुसल्या गेल्या . त्याच्या मेंदूला आठवतच नाहीये तो कोण आहे ते ) की तो मरतो का आपल्याला( दुसऱ्याला ) ? आपल्यासाठी त्या व्यक्तीच अस्तित्व शून्य होऊन जात का ? आपल्यासाठी तो ( माणूस )जणू काही भूतकाळ होऊन जातो का ?

"अस्तु" हा असा चित्रपट आहे जो आपल्याला हे आणि असे बरेच विचार करायला भाग पाडतो . "अस्तु" ही अशा नात्यांची कथा आहे जी बरच काही आपल्याला शिकवून जाते निदान विचार करायला भाग पडते . बाप आणि लेकींच्या नात्याची कथा /नवरा-बायकोच्या नात्यांची कथा/ माणसा माणसाच्या स्वभावामुळे कोणी आपला नसतानाही त्याला आपलं मानणाऱ्या माणुसकीची कथा . आपली रक्ताची मांणस पण आपल्याला परकं करण्याची कथा आणि आपली रक्ताचीच माणस आपल्याकरता जीवाचं रान करणाऱ्याची पण हीच कथा.

ही कथा आपल्याला चित्रपटाच्या मुख्य कथा नायकामधे गुंतवून ठेवतेच पण त्याच्या अनुशंघाने माणसामाणसातल्या नातेसंबंधांची पण जाणीव करून देते. वाईट याचंच वाटत इतकी अप्रतिम मांडणीची फिल्म आणि इंटेलिजंट दिग्दर्शकांची ही फिल्म केवळ आर्थिक कारणामुळे रिलीज होण्याकरता अडकून पडावी ? अर्थात ही री-रिलीज आहे या आधी मर्यादित स्क्रीन वर हा सिनेमा रिलीज झाला होता पण शेवटी कितीही नाही म्हटलं तरी पैशाशी घोड अडतच अडत . जिथे फिल्म रिलीज करायलाच पैशाचा प्रश्न येतो तिथे मार्केटिंग ची तर बातच सोडा

मी आधी म्हटल्याप्रमाणे ठळक पणे हेच अधोरेखित होत. प्रत्येक सिनेमा ( माणसाप्रमाणेच ) आपापलं नशीब घेऊन जन्माला येतो हेच खरं. एखादा सिनेमा चालत नाही किंवा सिनेमाला प्रेक्षक मिळत नाहीत ( खरं तर तो पैशाअभावी विस्तृत प्रेक्षकांपर्यंत पोचलेलाच नसतो ) याचा अर्थ असा नाही होत की प्रोडक्ट उत्तम नसत किव्वा चित्रपटाचा दिग्दर्शक इंटेलिजंट नसतो . प्रत्येकाने बघायलाच पाहिजे अशी फिल्म म्हणजे " अस्तु "
कालच बघितला . अतिशय सुरेख परीक्षणासाठी साजिरा यांचं १२ ऑगस्ट २०१४ च परीक्षण आणि भास्कराचार्यांचं परीक्षण वाचावे प्लिज च Happy

सहज डोक्यात एक विचार आला, प्रेक्षकांनी मागणी करुन, आगाऊ पैसे भरुन एखाद्या थिएटरला सांगितले कि अमुक दिवशी, हा चित्रपट दाखवा, तर तो तसा दाखवता येईल का ? याकरता एखादे थिएटर किंवा संस्था काहि करु शकेल का ?

दिनेश. माहिती नाही. असं घडू शकेल ? त्यावेळी हा सिनेमा मर्यादित स्क्रीन वर रिलीज झाला होता. आत्ता सुद्धा खूप काही थिएटर्स मिळालेली आहेत असा भाग नाहीच. पण त्या वेळे पेक्षा जास्त थिएटर्स मध्ये रिलीज झालाय एवढच Happy

चिनुक्स यांच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे " क्राऊड-फंडिंग'च्या माध्यमातून निधी गोळा करून हा चित्रपट आता १५ जुलैला, महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे

सुजा तुमच म्हणन बरोबर असेल हि...
पण फक्त कथा उत्तम असुन कसे चालेल.. आज पर्यन्त खुपच उत्तम अशा आर्ट फिल्म्स येउन गेल्या...
ती फिल्म वा कथा या जास्ती जास्त लोकाना रिलेट झाली तरच ते पाहतील ना..

करमणूक ही सुध्दा तेवढीच महत्वाची आहे.. आणि दिला जाणारा मेसेज पण...
जो सिनेमा हा सुवर्णमध्य साधतो ( योगायोगा ने म्हणा किन्वा परपजफुली) तो यशाच्या आणखी जवळ जातो..

शेवटी प्रोडुसरसाठी रीटर्न ऑन इन्वेस्टमेन्ट पण महत्वाच आहे ना..!!

प्रेक्षक मिळणार याची खात्री असेल तर थिएटर मालक असा शो करु शकतील. अशी खात्री नसेल म्हणूनच तर ते थिएटरला लावत नसतील.

समजा असे एखादे थिएटर आधीच काहि प्रेक्षकांनी बूक केले तर त्यांची हरकत नसावी. माझ्या कल्पनेप्रमाणे
आताच्या काळात बहुतेक चित्रपटांच्या डीजीटल प्रिंट असतात.

इथे आफ्रिकेत, जे टी व्ही नेटवर्क आहे, तिथे सध्या थिएटर मधे चालू असलेले चित्रपट, पैसे भरुन आपल्या
सोयीच्या वेळेत ( अर्थात घरी, टीव्ही वर ) बघायची सोय आहे.

<प्रेक्षक मिळणार याची खात्री असेल तर थिएटर मालक असा शो करु शकतील. अशी खात्री नसेल म्हणूनच तर ते थिएटरला लावत नसतील. >

चित्रपटगृहात चित्रपट लावण्यासाठी निर्मात्याला पैसे खर्च करावे लागतात. चित्रपटातून उत्पन्न होत असेल, तर मग खेळांची संख्या वाढते.

या वरच्या पोस्टरमध्ये मराठीचा मुडदा पाडलाय.

लोकसत्तात पानभरून मराठी चित्रपटांच्या जाहिराती असतात. अर्ध्याहून अधिक चित्रपटांच्या निर्मात्यांची नावे अमराठी असतात. जाहिरातीत अभिनेत्यांची नावे बहुतेक वेळा नसतातच.

नात्याला काही नाव नसावे .नात्याला काही बंध नसावे .तू हि रे माझा मितवा .. आई वडिलांच्या जोडल्या जाणाऱ्या नात्यामुळे तुमच्याही नात्याला काही वेगळं नाव प्राप्त होत का ? " जरा हटके " पाहून आलेय .चांगला आहे. त्याच दिग्दर्शकाचा आधी "कॉफी आणि बरच काही "बघितला होता. सिनेमा चांगला आहे बघाच Happy

आत्ताच " व्हेंटिलेटर" बघितला. गेल्या सोमवारच्या "हवा येऊ द्या "मध्ये समजलं की "प्रियांका चोप्रा ची निर्मिती आहे . अतिशय सुरेख सिनेमा . सगळ्यांची काम खूपच छान . उत्कृष्ट टीमवर्क . बघायलाच पाहिजे असा Happy

पुढच्या वर्षी प्रदर्शीत होणार्‍या सर्व मराठी चित्रपट व नाटकांची शीर्षके मराठीतच असतील अशी आशा आपण करुयात का ?

कुमार१ | 7 November, 2016 - 06:01 नवीन
पुढच्या वर्षी प्रदर्शीत होणार्‍या सर्व मराठी चित्रपट व नाटकांची शीर्षके मराठीतच असतील अशी आशा आपण करुयात का ?

--> का?????

Pages