हाय कर्णावती, आज १ जुलै. आज तुझा वाढधिवस. तुला तुझ्या २५ व्या वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा .
जून २००५ मध्ये काही कारणानिमित्त २-३ दिवसांकरिता अचानक अहमदाबादला जावे लागणार होते. त्यावेळी नेहमीप्रमाणे आणि स्व-नियमाप्रमाणे सर्वांत आधी रेल्वेच्या पर्यायाकडेच वळालो. आरक्षणाची चाचपणी सुरू केली. पण पुण्याहून सुटणाऱ्या सगळ्या गाड्या कधीच वेटींगवर गेल्या होत्या. मात्र परतीचे आरक्षण पुण्यापर्यंत आरामात मिळत होते. एक तर तो माझा सगळ्यात आवडता रुट असल्यामुळे रेल्वेशिवाय दुसरा वाहनपर्याय सुचणे शक्यच नव्हते. मग एक विचार केला की, मुंबईहून अहमदाबादला पर्याय जास्त आहेत. त्यामुळे तिथून तिकिटे मिळण्याचे चांसेस जास्त आहेत. आता लगेचच कामाला लागलो. इंटरनेटवर पाहिले तर, बऱ्याच गाड्या अजूनही प्रवाशांना आवाहन करत असल्याचे दिसले. जरी त्या गाड्या रोजच फूल्ल धावत असल्या तरी त्या गाड्यांच्या नादाला अजून तरी कोणी लागले नव्हते. आमच्या प्रवासाच्या दिवसालाही अजून ३ आठवडे असल्याने त्यांचे आरक्षण शिल्लक दिसत होते. पुण्याहून मुंबईत जाऊन गाडी पकडायची असल्याने दुपारची गाडी शोधली. २९३३ (सध्याची १२९३३) डाऊन कर्णावती एक्सप्रेस तशी सोईची होती. त्यामुळे पटकन तिचे आरक्षणही करून टाकले.
आता प्रवास सुरू होईपर्यंत सतत कर्णावतीच्या प्रवासाचे विचार मनात येऊ लागले होते. सगळ्यात आवडता रुट, आवडता विभाग आणि पहिल्यांदाच आवडत्या रुटवरून दिवसाचा प्रवास होणार होता. त्यामुळे नुसत्या विचारानेच बेचैन व्हायला होत होते आणि प्रवास संपेपर्यंत मनाला स्वस्थता मिळणारच नव्हतीच.
अखेर प्रवासाचा दिवस आला. मुंबई सेंट्रलला जायचे असल्याने मध्ये गाड्यांची अदलाबदल करण्यापेक्षा सकाळी बसने थेट सेंट्रललाच पोहचू या विचाराने राज्य परिवहनाच्या वाट्याला अगदी नाईलाजानेच गेलो. कर्णावतीविषयी थोडीफार माहिती होतीच, पण प्रत्यक्षात तिला कधी पाहिले नव्हते. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली होती. बसमधून उतरल्यावर नेहमीप्रमाणेच - कधी एकदाचा स्टेशनच्या आत जातोय - असे झाले होते. दुपारचे सव्वाबारा वाजले होते. मी जरा धावतच वडिलांसोबत स्टेशनच्या आत पोहचलो, तेव्हा उद्घोषणा सुरू झाली होती - गाडी नं. २९३४ कर्णावती एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर येत आहे. मग स्टेशनच्या कँटीनमध्ये थोडे काही तरी खाऊन आलो, तर कर्णावती राणीच्या थाटात वलसाडच्या अजस्त्र डब्ल्यूसीएएम-२ या कार्यअश्वासह (वर्क हॉर्स) फलाटावर अवतरली होती. पुढे डेड एंट असल्यामुळे आता त्या कार्यअश्वाला या राणीसाहेब आपल्या मुख्यालयी (अहमदाबाद) परत जाण्यासाठी निघेपर्यंत तेथेच वाट पाहत थांबावे लागणार होते.
मी आणि वडील आमच्या एससी-१ (सध्याच्या पद्धतीनुसार डी-१) मध्ये गेलो. आत जाऊन पाहतो तर गाडी जरा अस्वच्छच झाली होती. त्यातच सीट्सची रचनाही वेगळी म्हणजे बससारखी समोरच्याकडे पाठ करून - अशी होती. त्यामुळे आमचे आसनक्रमांक शेजारचे असले आणि खिडक्याही असल्या तरी त्यांची दिशा विरुद्ध झाली होती. म्हणजे एरवी आम्ही एकमेकांच्या समोर आलो असतो, ते आता दोन विरुद्ध दिशांच्या खिडक्यांकडे गेलो होतो. पण या दोन्ही सीट्स मला आवडते तशा इंजिनाकडे तोंड करून नव्हत्या. पण त्यातल्यात्यात गाडी जाण्याची दिशा लक्षात घेऊन मी वडिलांना पलीकडच्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितले. आमचा डबा साधारण शेवटी म्हणजे १९ मध्ये १२ वा होता. म्हणजे आमच्या कर्णावतीची रचना अशी होती इंजिन, एसएलआर, जनरल, एससी-११ ते एससी-१, सी-४ ते सी-१, जनरल आणि एसएलआर. मग सवयीप्रमाणे खाली उतरून कर्णावतीचे अवलोकन करून यावे म्हटले आणि खाली उतरून पुढे इंजिनाच्या दिशेने निघालो तर तिकडे नव्या कार्यअश्वाची कर्णावतीशी जोडणी पूर्ण झाल्याचे लांबूनच लक्षात आले. नुकत्याच भारतीय रेल्वेच्या सेवेत दाखल झालेल्या नव्या पद्धतीच्या आणि रंगसंगतीच्या एलएचबी डब्यांच्या राजधानी एक्सप्रेसला साजेसी रंगसंगती आमच्या कार्यअश्वाला करण्यात आली होती. याचाच अर्थ एरवी राजधानीचे सारथ्य करणारा हा कार्यअश्वच त्या दिवशी आमच्या कर्णावतीच्या सेवेत आला होता.
आता मुंबई सेंट्रलवर कर्णावतीची निघण्यापूर्वीची तयारी सुरू झाली होती. लोको पायलट (मेल) आणि त्याच्या असिस्टंट लोको पायलटनी कार्यअश्वाशी संबंधित आपापल्या तपासण्या पूर्ण करून हा कार्यअश्व फीट आहे याची तपासणी करून खात्री करून घेण्यास सुरुवात केली होतीच. आमच्या डब्याच्या जवळच असलेल्या गार्डच्या कंपार्टमेंटचा (शेवटचा एसएलआर डब्यातील गार्ड कंपार्टमेंट) नव्या गार्डने ताबा घेतला होता. तेवढ्याच एक बॉक्स बॉय ट्रॉलीवरून दोन वजनदार काळ्या ट्रंका घेऊन निघालेला दिसला. त्याने आधी गार्ड बॉक्स गार्ड कंपार्टमेंटमध्ये चढवला आणि पुढे निघाला. कारण जाऊन लोको पायलटकडे त्याचा बॉक्स सूपूर्द केला. डाऊन कर्णावतीच ५० मिनिटांमध्ये अप कर्णावती म्हणून निघणार असल्याने तिला पिट लाईनवर नेण्याएवढा वेळ नव्हता. म्हणून कॅरेज अँड वॅगनवाल्यांनीही फलाटावरच प्रत्येक डब्यांचे ब्रेक आणि चाके तपासायला सुरुवात केली होती. यात जर एखादा डबा सिक असल्याचे लक्षात आले, तर तो बदलावा लागणार होता. कर्णावती अहमदाबाद विभागाची गाडी असल्यामुळे इथे तिचा असा सेकंडरी मेंटेन्सच होणार होता.
त्यावेळी कर्णावतीला वेगळे रसोई भण्डार यान (पँट्री) जोडले जात नव्हते. पण रेल्वेची केटरींगची सोय त्यात उपलब्ध होती. म्हणूनच गाडीत बसण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होती, त्यातच केटरींग स्टाफची गाडीत आवश्यक साहित्य चढविण्याचीही गडबड चालली होती. त्यातून प्रवासी आणि त्या स्टाफमध्ये शाब्दीक झटापटही होत होतीच. प्रत्येक डब्याच्या एका दरवाज्याजवळची जागा या केटरींगच्या साहित्याने व्यापलेली होती.
सगळे सोपस्कार पूर्ण होत असतानाच गाडीची वेळही झाली होती. मुंबई सेंट्रलच्या स्टेशन मास्तरने पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील सेक्शन कंट्रोलरकडून कर्णावतीला सोडण्याची परवानगी घेतली आणि सिग्नल ऑफ (पिवळा) करून जाण्याची परवानगी दिली. विरारपर्यंतचा मार्ग स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेचा असल्यामुळे पुढच्या स्टेशन मास्तरकडून लाईन क्लिअर घेण्याची आवश्यकता भासणार नव्हती. गार्डनेही राईट सिग्नल (हिरवा बावटा) दाखवताच आमच्या कार्यअश्वाने त्याच्या स्टाईलमध्ये टिपिकल पद्धतीने केलेली अतिशय लयबद्ध गर्जना कमी तीव्रतेने का असेना ऐकू आली.
गाडी सुटत असल्याने मी आता माझ्या जागेवर जून बसलो होतोच. गाडीत ऐनवेळच्या प्रवाशांमुळे गर्दी बरीच वाढली होती. माझ्या बाजूला मुंबईच्या दिशेने जाणारी अप लाईन असल्यामुळे मी खूश होतोच. कर्णावतीने आपला प्रवास सुरू केला आणि मला २९५१-५२ (सध्याची १२९५१-५२) मुंबई राजधानीचे दर्शन झाले. हिच ती गाडी जिच्यातून प्रवास करण्याची इच्छा पुढील बरी--------च वर्षे अपूर्ण राहिली होती. बाहेर पिट लाईनवर प्रायमरी मेंटेनेस करवून घेत असलेल्या राजधानीच्या दर्शनानेच मी सुखावून गेलो होतो. अजूनही कर्णावतीने पुरेसा वेग घेतलेला नव्हता. म्हणून राजधानी बऱ्यापैकी न्याहाळता आली. या नव्या रुपात (एलएचबी डबे) राजधानी अधिकच देखणी आणि तिथे उभ्या असलेल्या अन्य गाड्यांमध्ये अगदी उठून दिसत होती.
पुढे वांद्रे ओलांडत असतानाच २९८० जयपूर वांद्रे (ट) एक्सप्रेस तिच्या मुक्कामी पोहचत असल्याची दिसली. मग बोरिवलीचा नियोजित थांबा घेत असतानाच कडून अहमदाबादकडून आलेली पॅसेंजर दुसऱ्या फलाटावर येऊन थांबली. पॅसेंजर गाड्यांनाही आरक्षित आणि उच्च दर्जाचे डबे हमखास दिसतात तोच हा मार्ग. या पॅसेंजरलाही ३ शयनयान डबे होते. (पण त्याचे भाडे अन्य मेल/एक्सप्रेसपेक्षा कमी असते.) दरम्यान मुंबईच्या लोकल्सचीही धावपळ सुरू होतीच. पण दुपारी दीड-दोन वाजलेले असल्यामुळे मुंबई लोकलची टिपिकल गर्दी दिसत नव्हती. कर्णावती बोरिवलीहून पुढे निघाली, त्याचवेळी बोरिवलीत चढलेल्या प्रवाशांचे आपली जागा कोणती, ही आमची सीट आहे, मग समोरच्याचे उत्तर की, तुम्ही आमची सीट घेता का वगैरेवगैरे संवाद घडू लागले होते. तोवर केटरिंगवाल्यांच्याही फेऱ्या सुरू झाल्या होत्या.
आता कर्णावती चांगला वेग धरू लागली होती. तोच अमृतसर/कालकाहून आलेली २९२६ पश्चिम एक्सप्रेस २४ डब्यांसह माझ्या शेजारून धडधडत पण त्याच ओळखीच्या कधीही कंटाळा न आणणाऱ्या चाकांच्या-रुळांच्या लयबद्ध संगीताच्या तालात वांद्र्याकडे निघून गेली. हिच ती आणखी एक गाडी जी एकदाच प्रत्यक्षात पाहिली होती, पण तेव्हापासून तिच्यातून प्रवास करण्याची इच्छा पूर्ण होण्यास बरी----च वर्षे लागली.
१४.४० वाजता वसई रोड क्रॉस करत असताना पलीकडच्या लाईनवर बराच वेळ डिटेन केलेल्या ४५+१ (म्हणजे ४५ मूळच्या वाघिण्या आणि १ गार्ड कॅब) बीएलसी वाघिण्यांच्या मालगाडीला पुढच्या स्टेशनच्या दिशेने जाण्यासाठी लाईन क्लिअर मिळाली होती. थोड्याच वेळात विरार क्रॉस केले आणि चारपदरी मार्ग संपला आणि डी.सी. ट्रॅक्शनही. त्यामुळे वेगातच तिथला न्यूट्रल सेक्शन (डी.सी.-ए.सी. इलेक्ट्रीक करंडमधला करंट विरहित सेक्शन) क्रॉस केला होता. हे करत असताना तेथे लोको पायलटने गाडीचा वेग कायम ठेवतानाच पेंटोग्राफ खाली घेणे आणि तो न्यूट्रल सेक्शन पार करणे आवश्यक असते. आता या मार्गाचे पूर्ण ए.सी. करंटमध्ये रुपांतर झालेले आहे. पण इलेक्ट्रीक मार्गावर अशा न्यूट्रल सेक्शनची आवश्यकता कायमच असते. पुढे मार्गातही असे अनेक न्यूट्रल सेक्शन्स येणार होतेच. त्याचबरोबर स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेचे क्षेत्रही आता संपलेले होते. त्यामुळे पुढच्या स्टेशनकडे गाडी सोडण्याआधी या स्टेशन मास्तरला लाईन क्लिअर घेणे आवश्यक असणार होते.
पुढे वीसच मिनिटांनी वैतरणाजवळ आलो असताना शेजारून गुजरात एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने निघून गेली. त्यावेळी त्या गाडीला वलसाडची निळ्या रंगसंगतीची जुनी डब्ल्यूसीएएम-१ इंजिने गती देत असत. डी.सी.-ए.सी. प्रकारच्या विद्युत पुरवठा यंत्रणांमुळेच मुंबई-बडोदा मार्गावर त्यावेळी डब्ल्यूसीएएम प्रकारचे कार्यअश्व आवश्यक होते. गुजरात एक्सप्रेसने पालघरचा थांबा घेऊन बराच वेळ झाला होता आणि आता बोरिवलीशिवाय तिला मध्ये कुठे थांबायचे नव्हते. म्हणून ती वेग घेऊ इच्छीत होती, पण तिचा वेग टेंपररी स्पीड रिस्ट्रीक्शनद्वारे इथे नियंत्रित करण्यात आला होता. कारण वैतरणावरचा पूल बराच जुना झाला होता. त्यामुळे सर्वच गाड्यांना तो पूल कमी वेगाने ओलांडावा लागत होता. गुजरातने तो पूल ओलांडला होता, त्यामुळे तिच्यावरचे वेगाचे निर्बंध दूर झाले होते, पण आता कर्णावतीची वेळ होती. मार्गाच्या शेजारी लावलेल्या पिवळ्या बोर्डावर लिहिलेल्या आकड्याएवढा वेग आता कर्णावतीचा कमी करण्यात आला होता. हा पूल ओलांडल्यावर कर्णावती पुन्हा वेग धरू लागली होती. त्यानंतर पालघर, उमरोळी, बोईसर, डहाणू रोड अशी वेगवेगळी स्थानके चाकांच्या मस्त लयबद्ध खडखडात क्रॉस करत उंबरगाव रोडला पोहचलो आणि गुजरातमधले हे पहिले स्टेशन क्रॉस केले.
दरम्यान, इकडे गाडीत केटरींग सर्व्हीसवाल्यांची ये-जा सुरू झाली होती. चहा-कॉफी, पाण्याच्या बाटल्या आणि नाश्ता येऊ लागला होता. १९ जूनची तळपती दुपार असल्यामुळे पाण्याच्या बाटल्यांची मागणी इतर गोष्टींपेक्षा जास्त होती. थोड्याच वेळाने काचेच्या बाटल्यांमधून थंडगार मसाला दुधाचा रतीब सुरू झाला. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे अर्थातच त्यांचीही मागणी जास्तच. बोरिवलीला माझ्या शेजारच्या दोन सीट्सवर तीन जण येऊन बसले. आई, तिचे पाच-सहा वर्षांचे मूल आणि त्या मुलाची मावशी. तेव्हाच म्हटलं होतं - झालं आलं का परत एकदा लहान मूल जवळ. माझ्या या वाक्यातील भिती सत्यात उतरवत आता त्या मुलानं माझ्याजवळ वळवळ करायला सुरुवात केली होती. त्याची आई त्याला सारखी स्वतःकडे ओढून घेत होती. पण थोड्याथोड्या वेळाने ते मूल माझ्याकडे येतच राहिले.
गाडीत या हालचाली सुरू असतानाच बीसीएन वाघिण्यांची एक मालगाडी शेजारून धडधडत वसई रोडकडे निघून गेली होती. त्यापाठोपाठ पाचच मिनिटांत १७ डब्यांची एक एक्सप्रेस गाडी आणि त्यानंतर सौराष्ट्र एक्सप्रेसही अप लाईनवरून वसई रोडकडे गेली. या मार्गावरील गाड्यांच्या या हालचालींकडे मुंबईच्या सेक्शन कंट्रालरचे कंट्रोल रुममधून बारीक लक्ष होते. कर्णावती संजनजवळ येण्याआधी काही वेळ त्या दिशेने गेलेली बीएलसी वाघिण्यांची कंटेनरवाहक मालगाडी लूपवर डीटेन करण्याचा आणि कर्णावतीला मार्ग उपलब्ध करून देण्याचा आदेश मुंबईहून सेक्शन कंट्रोलरने संजनच्या स्टेशन मास्तरला दिला होता. यामुळेच कर्णावतीच्या मार्गातील एक अडथळा दूर झाला होता. कर्णावती पूर्ण वेगाने संजन क्रॉस करत असताना त्या डीटेन केलेल्या मालगाडीच्या लोको पायलट (गुड्स) आणि गार्ड (गुड्स) यांनी आम्हाला प्रोसिडचा संदेश देण्यासाठी हात बाहेर काढून हिरवे बावटे दाखवले होतेच. त्याचवेळी माझ्या बाजूच्या अप लाईनच्या फलाटावरही एक पॉईंन्टमनही टिपिकल स्टाईलमध्ये हातात हिरवा बावटा घेऊन उभा होता. अगदी चपळतेने झाले होते ते ओव्हरटेकींग. पाठोपाठ जम्मुतावीहून वांद्र्याकडे निघालेली २४ डब्यांची २४७२ स्वराज एक्सप्रेसही क्रॉस झाली होती. मुंबईच्या बाहेर आल्यावर अशा विरुद्ध दिशेने निघालेल्या सर्व गाड्यांच्या क्रॉसिंगच्यावेळी त्या गाडीचे लोको पायलट आणि गार्ड आणि आमच्या कर्णावतीचे लोको पायलट आणि गार्ड यांच्यात पहिल्यापासूनच सिग्नल्सची (हिरवे बावटे) अशी देवाणघेवाण सुरू होती.
या घडामोडी सुरू असताना गाडीत एक प्रसंग घडला. मला इकडे खळ्ळ्ळ असा जोरात आवाज आला. मला वाटलं कोणीतरी बाहेरून दगड मारला असेल. आवाजाच्या दिशेने उठून पाहिले तर सारे काही आलबेल होते. काय झालं आहे ते लक्षात आलं नाही. इथून पुढे असा आवाज थोड्याथोड्या वेळाने येतच राहिला. दरम्यान, माझेही मसाला दूध पिऊन झाले होते. त्यामुळे ती बाटली मी माझ्या सीटजवळ ठेऊन दिली होती. कारण दूध घेताना केटरिंगवाल्याने लगेच पैसे नेले नव्हते. त्यामुळे तो पैसे आणि बाटली घ्यायला येईलच असा विचार करून मी माझ्या कामात पुन्हा व्यग्र झालो.
भिलड जंक्शन क्रॉस करत असताना उधना जंक्शनहून आलेली आणि वसई रोडकडे जाणारी बीसीएन वाघिण्यांची मालगाडी अप लाईनवरून धडाडत गेली. पाठोपाठ तीनच मिनिटांनी कंटेनर घेऊन आलेली आणखी एक मालगाडी आणि त्यानंतर काही वेळातच फिरोजपूरहून आलेली जनता एक्सप्रेसही मुंबईकडे निघून गेली.
संजननंतर अर्ध्या तासातच वापी गेले आणि काही वेळाने वलसाडचा थांबा आला. या दोन्ही ठिकाणी काही प्रवाशांची चढ-उतारही झाली होती. वलसाडला थांबलेलो असतानाच पलीकडच्या फलाटावर वलसाड-वांद्रे (ट) पॅसेंजर आपला प्रवास सुरू करण्याची परवानगी मिळण्याची वाट बघत उभी होती. वलसाडचा एक मिनिटाचा थांबा आटपून कर्णावती पुढच्या प्रवासाला निघाली. दरम्यानच्या काळात अनेक मेल/एक्सप्रेस आणि मालगाड्यांची अप लाईनवरून वर्दळ वाढली होती. आता संध्याकाळचे पावणेसहा वाजत आले होते. आता सुरतला पाच मिनिटांचा थांबा घेत कर्णावतीने आपला प्रवास पुन्हा सुरू केला होता. आता इथून पुढे कर्णावतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी बडोद्याच्या सेक्शन कंट्रोलरकडे आली होती. आता मलाही वेध लागले होते एका सुपरफास्ट क्रॉसिंगचे. २०१० अहमदाबाद-मुंबई सेंट्रल शताब्दी एक्सप्रेस आता कधीही क्रॉस होणार होती. सुरत सोडल्यावर दहाच मिनिटांत शताब्दी तापीच्या पुलावरच शताब्दीचे क्रॉसिंग झाले. काय रोमांचक क्रॉसिंग होते ते. त्याकाळी कर्णावतीप्रमाणेच शताब्दीचेही सारथ्य नियमितपणे वलसाडच्या डब्ल्यूसीएएम-२पी या कार्यअश्वाकडेच असे.
त्यानंतर तर गाड्यांची खूपच वर्दळ वाढली होती. अक्षरशः तीन ते पाच मिनिटांच्या अंतराने एक गाडी सुरत/वसई रोड/मुंबईच्या दिशेने जाऊ लागाली होती. संजनप्रमाणे अन्य ठिकाणीही मालगाड्या किंवा सामान्य मेल/एक्सप्रेस गाड्या कर्णावतीला मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी डीटेन केलेल्या दिसत होत्याच. त्यातच गोठणगाममध्ये डीटेन केलेल्या ५८+१ बॉक्स-एन वाघिण्यांच्या एका मालगाडीचा समावेश होता. आतापर्यंत क्रॉस झालेली ही सर्वांत मोठी (वाघिण्यांच्या संख्येने) मालगाडी होती. संध्याकाळी ६.४० ला भरूच जंक्शन सोडत होतो, तेव्हा अंकलेश्वरकडून आलेली बीटीपीएन वाघिण्यांची टँकर मालगाडी तिथे डीटेन करून आम्हाला मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. त्याचवेळी पेट्रोलचा ओळखीचा वासही डब्यामध्ये येऊन गेला.
दरम्यान, माझ्या शेजारच्या त्या लहान मुलाची झोप झाली होती. त्याच्या आईने माझ्याकडे बडोदा यायला किती वेळ आहे, अशी विचारणा केली आणि नंतर माझ्याशी अधूनमधून गप्पाही सुरू केल्या. जरी मी पहिल्यांदाच या गाडीने आणि या मार्गावरून दिवसाच्या गाडीने प्रवास करत असलो तरी त्या प्रश्नांची उत्तरं देणं मला अवघड वाटलं नाही.
बाहेर अंधार होऊ लागला होता, म्हणून मधल्यामधल्या स्टेशन्सवर दिवे लागणी झाली होती. त्याचबरोबर आता गाडीतून सिग्नल एक्सचेंज करताना हिरव्या बावट्याचा उपयोग नाही म्हणून लोको पायलट आणि गार्डने मोठे टॉर्च मुंबईला चढवलेल्या बॉक्सेसमधून बाहेर काढले होते. अखेर १९.४० वाजता बडोदा आले आणि माझ्या शेजारचे ते तिघे उतरले. इथं गाडी बऱ्यापैकी रिकामी झाली होती. पाचच मिनिटांनी बडोद्यातून निघालो आणि दहाच मिनिटांत अहमदाबादहून पुरीला निघालेली एक्सप्रेस क्रॉस झाली. आता गाडी शेजारून वेगाने जाताना खिडक्यांधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशामुळे एक पांढरा पट्टाच दिसत होता. गेरातपूरच्या थोडे आधीपासून आता अहमदाबादच्या सेक्शन कंट्रोलरच्या समोरच्या पॅनलवर कर्णावतीचे दिवे चमकू लागले होते. तेव्हापासून त्याच्याकडे कर्णावतीचे नियंत्रण आले होते.
त्याआधी मगाचचा केटरिंगवाला मसाला दुधाच्या बाटल्या गोळा करायला आणि पैसे घ्यायला आला. माझ्याजवळची बाटली आणि पैसे त्याला मी दिले. पण तो जरा गोंधलेला होता. काहीच वेळाने त्याच्या बोलण्यावरून लक्षात आले की, त्याला भरलेल्या बाटल्यांपेक्षा रिकाम्या बाटल्यांची संख्या कमी दिसत होती. काहीतरी गणित चुकल्याचे त्याच्या लक्षात आले होते. पण रिकाम्या बाटल्या काही केल्या सापडत नव्हत्या. थोड्या वेळाने माझे वडील माझ्याच्या मोकळ्या सीटवर येऊन बसले आणि ते सांगू लागले. मगाचपासून बऱ्याच जणांनी या काचेच्या बाटल्या बाहेर टाकून दिल्या आहेत. मी त्यांना म्हटलं, हां म्हणजे मगाचपासून खळ्ळ्ळ-खट्याक आवाज येत होता, तो त्याचा होता तर. वडील म्हणाले, हो. ते पुढे सांगू लागले. ते म्हणाले की, मगाशी एकाला त्यांनी विचारले होते की, अशा बाटल्या बाहेर का फेकत आहेत ही लोकं. तो म्हणाला होता की, या फेकायच्याच असतात.
आता मलाही कोडं उलगडत होतं. मस्त थंडगार मसाला दूध प्यायचे, पण पैसे द्यायला लागू नयेत म्हणून हे काही जण अशा प्रकारे बाटल्या फेकून देत होते. म्हणजे केटरिंगवाला पैसे मागायला आला की, आम्ही दूध घेतलेलेच नाही असे म्हणायला ते मोकळे!
पुढे नाडियाड आणि आणंदचे थांबे घेत कर्णावती अहमदाबादच्या दिशेने निघाली आणि वेळेच्या आधी दहा मिनिटे तिथे पोहचलीही. अहमदाबादला उतरल्यावर या प्रवासामुळे खूपच उत्साहवर्धक वाटू लागले आणि पुन्हा एकदा या गाडीने नक्की प्रवास करू असा निश्चयही तिथेच करून टाकला. वडिलांनीही कर्णावती मस्त गाडी असल्याची प्रतिक्रिया दिली. सगळे ओव्हरटेकींग ते बसले होते त्या बाजूने होत होते. त्यामुळे त्यांनाही कर्णावतीची दौड पाहून प्रसन्न वाटत होते. आता आमचा कार्यअश्वही दमला होता. त्यामुळे शंटींग स्टाफने त्याला कर्णावतीपासून वेगळे केले होते. अदमदाबादच्या ट्रीप शेडमध्ये तपासण्या आणि विश्रांतीसाठी हा कार्यअश्व पुढे निघून गेला. थोड्याच वेळाने शंटर इंजन आले आणि कर्णावतीला जोडले गेले. काही वेळात कर्णावतीची फलाटावरची तपासणी, आरपीएफ जवानाकडून डब्यांची नोंदणी पूर्ण झाल्यावर ती गाडी पिटलाईनकडे जाणार होती. कारण तिला उद्या पहाटे मुंबईच्या दिशेने पुन्हा नव्या दमाने प्रवास सुरू करायचा होता. मग फिट राहायला नको का?
स्टेशनवरच्या कँटीनमध्येच काही तरी खाऊन बाहेर पडू असा आमच्याकडून निर्णय घेतला गेल्याने मला स्टेशनवर आणखी थोडा वेळ थांबायला मिळाले. पहिल्यांदाच या स्टेशनवर आलो होतो, मग लगेच बाहेर पडणे मला कसे काय शक्य होईल?
आता येत्या १९ जूनला माझ्या त्या प्रवासाला ११ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर कर्णावतीलाही १ जुलैला आपली सेवा सुरू करून २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने पुन्हा एकदा या गाडीचा प्रवास करण्याचा विचार आहेच. त्यातच आता कर्णावतीही नव्या रुपात म्हणजेच एलएचबी डब्यासह आणि नव्या कार्यअश्वासह धावू लागली आहे.
---०००---
नेहेमी प्रमाणे रोचक !
नेहेमी प्रमाणे रोचक !
मस्तच रे ............
मस्तच रे ............
भारीच लिहिता तुम्ही! आवडलं.
भारीच लिहिता तुम्ही! आवडलं. पुलेशु!
११ वर्षांपूर्वीच्या प्रवासाचे
११ वर्षांपूर्वीच्या प्रवासाचे इतक्या बारकाईने वर्णन कसेकाय केलेत.
कमालच आहे.
भारी लिहिलय . तुमच्याकडे
भारी लिहिलय . तुमच्याकडे रेल्वे प्रवासकडे पहायची वेगळीच दृष्टी आहे
लिहित रहा
मस्त
मस्त
छान वर्णन...
छान वर्णन...
मस्त!! इकडे भारतीय रेल्वे वर
मस्त!! इकडे भारतीय रेल्वे वर एक बीबी सुरू झाला होता तिकडे लिंक द्यायला हवी ह्याची. एकदम नोस्टाल्जिक वाटलं वाचून. एकदम पुर्वी निळ्या रंगाचे डबे असायचे का ह्याचे आणि खिडक्यांच्या लेव्हल ला आडवा पांढरा पट्टा? आमच्याकडे बडोद्याहून बरीच ये जा असायची तेव्हा तिकडे जाताना रात्री बऱोडा एक्स्प्रेस आणि परत येताना सकाळी कर्णावती ह्या प्रिफर्ड गाड्या होत्या. मी बहुतेक "थ्रू ट्रेन्स" मधून पहिला एकटीने प्रवास बडोदा-मुंबई (बोरिवली) कर्णावतीने च केला होता.
बरेचसे टेक्निकल डिटेल्स धड कळले नाहीत आणि मराठी शब्दांवर अडकायला झालं पण
>> अहमदाबादच्या सेक्शन कंट्रोलरच्या समोरच्या पॅनलवर कर्णावतीचे दिवे चमकू लागले होते
हे इस्पेशली कळलं नाही. हे सेक्शन कंट्रोलरच्या पेनल वरचं तुम्हाला कसं काय दिसलं?
अतिशय उत्तम अन साद्यांत वर्णन
अतिशय उत्तम अन साद्यांत वर्णन आहे!!
हे सेक्शन कंट्रोलरच्या पेनल
हे सेक्शन कंट्रोलरच्या पेनल वरचं तुम्हाला कसं काय दिसलं?
>>
अहो ते इम्याजिनेशन आहे. आर्टिस्टिक लिबर्टी मंतेत त्येला. ( कुठून कुठून येतात बुवा लोक पण !) ::दिवा:
सशल, तुम्ही कर्णावतीच्या
सशल, तुम्ही कर्णावतीच्या डब्यांची पूर्वीची रंगसंगती बरोबर सांगितलेली आहे. आमचा डबा मात्र निळ्या-आकाशी रंगसंगतीचा होता.
तुम्ही अहमदाबादच्या सेक्शन कंट्रोलरच्या समोरच्या पॅनलबद्दल विचारले आहे. ते मला प्रत्यक्ष गाडीतून दिसले नसले तरी रेल्वेच्या प्रत्येक मार्गावर ती सोय असतेच म्हणून मी तसे लिहिले. त्याचा अर्थ असा की आता कर्णावतीच्या नियंत्रणाची जबाबदारी अहमदाबादच्या कंट्रोल रुममधील सेक्शन कंट्रोलर करणार होता.
दुधाच्या रीकाम्या बाटल्या
दुधाच्या रीकाम्या बाटल्या फेकुन देण्यामागची मानसिकता
कर्णावती आमची जाता-येता
कर्णावती आमची जाता-येता आवडती गाडी पण असे डिटेल्स कधी कळले नाहीत. वाचायला फारच आवडले.
हॆद्राबादवरुन डायरेक्ट
हॆद्राबादवरुन डायरेक्ट गुजरातला जाणाऱ्या गाड्या तश्या कमीच आहेत आणि त्यांचे रिझरवेशन मिळणे कठीण असल्याने अनेक लोक हॆद्राबाद ते दादर मुंबई एक्सप्रेसने येतात आणि मग दादरवरुन मु. सेंट्रलला जाऊन कर्णावती पकडतात.
माझ्या हॆद्राबाद-मुंबई प्रवासात असे अनेक सहप्रवासी असायचे.
कधी हॆद्राबाद-मुंबई एक्सप्रेसला उशीर झाला की मग कर्णावती चुकेल की काय अशी धाकधूक असायची त्यांची.
तुम्ही असे एकाएका ट्रेनविषयी लिहितात ना तेव्हा त्या त्या ट्रनशी जुळेलेल्या आठवणी जाग्या होत जातात.
खुपच छान
खुपच छान
हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस
हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस दादरला पोहचण्याच्या आणि कर्णावतीच्या सुटण्यात बऱ्यापैकी मार्जिन आहे. पण मुंबईच्या गर्दातून वाट काढत मुंबई सेंट्रल गाठायचे असल्यामुळे १७०३२ ला उशीर होऊ लागला की धाकधूक वाढणे स्वाभाविकच. त्यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सामान बरोबर असल्यास धाकधुकीचे विचारायलाच नको.
पराग१२००१, नेहमीप्रमाणेच
पराग१२००१, नेहमीप्रमाणेच उत्तम डिटेलींग. इतक्या पूर्वीचे कसं काय लक्षात राहतं बरं? हाप्रश्न आहेच!
पूर्वी पुण्याहून घोलवडला खूप वेळा जात असू. डायरेक्ट गाडी बहुतेक नव्हती किंवा ती डहाणूला अपरात्री थांबत असे. म्हणून आम्ही मुंबई सेंट्रलला जाऊन अहमदाबाद पॅसेंजरनी जात असु. मामा किंवा मामेभाऊ न्यायला आले तर मात्र वेगवेगळ्या गाड्या ट्राय करता येत असत. ( नावं जाम आठवत नाहीयेत. ) तुमचा लेख वाचून त्या सगळ्या प्रवासाची आठवण झाली. त्या वेळचा एक किस्सा पण आहे. लिहीन जराशानं.
पराग१२००१, नेहमीप्रमाणेच
पराग१२००१, नेहमीप्रमाणेच उत्तम डिटेलींग. इतक्या पूर्वीचे कसं काय लक्षात राहतं बरं? हाप्रश्न आहेच! +1
११ वर्षांपूर्वीच्या
११ वर्षांपूर्वीच्या प्रवासातले तपशील आठवण्याचे साधन म्हणजे माझी कायम खिशात असणारी डायरी. प्रत्येक प्रवासाच्या नोंदी त्यात असतात.
मला मी प्रवास करत असलेल्या
मला मी प्रवास करत असलेल्या गाडीचा क्रमांक पण आरक्षण करून झाल्यावर लक्षात राहण्याची मारामार असते. तुम्हाला तर कोणती गाडी कधी पास होणार आहे हे पण नाव-नंबरासहीत माहिती होते __/\__
रेल्वेचा प्रवास इतर वाहतुक साधनांपेक्षा आरामशीर असतो हे मान्यच, पण तो इतका उत्साहवर्धक पण असू शकतो याचेच खूप कौतुक वाटले.
रेल्वेचा प्रवास उत्साहवर्धक
रेल्वेचा प्रवास उत्साहवर्धक असतोच कायम
पराग माफ करा मला रेल्वेचा
पराग माफ करा मला रेल्वेचा प्रवास अजिबात आवडत नाही कारण रेल्वे प्रवासाचा बकालपणा ! रेल्वे परिसर, प्लॅट्फॉर्म , गाड्या , सर्वाना गलिच्छ भिकार्यांचा पडलेला वेढा. मुळात रेल्वेच्या परिसरात पोचले की एक प्रकारचा दर्प नाकात शिरतो तो प्रवासाची मजा तर घालवतोच पण प्रवासावरून आले तरी नाकातून जाता जात नाही. ह प्रवास असुरक्षितही वाटतो मला. एक तर सर्वत्र चोरट्याभामट्यांचे राज्य. काही झाले तर नेमके कोणाला भेटावे ते समजत नाही पोलीस , स्टेशन स्टाफ जागेवर सापडत नाही , दखल घेत नाही. मुख्य म्हणजे गाडी तुमच्यासाठी तुमचा प्रश्न सुटेपर्यन्त थांबतही नाही. पुढचे स्टेशन येईपर्यन्त तुम्हाला कोणी त्राता असत नाही. सामान गहाळ झाले तर त्याचा तपास लागणे मुश्किल. तातडीच्या वेळेला निघणार्या प्रवाशांसाठी तर काहीच सोय नसते. खाद्यपदार्थांचा सुमार दर्जा , बाटलीबंद पाणी डुप्लिकेट, रिझर्व डब्यातही रात्री घुसणारे अनधिकृत प्रवासी आणि गायब कंडक्टर.जिथे रेल्वेला पर्याय आहे तिथे मी अवश्य बसने जातो अगदी नगपूर हैद्राबाद बंगलोरसारख्या ठिकाणीही. निदान ऑन्लाईन तिक्र्टे काढण्याची सोय झाली अन्यथा रेल्वे प्रवास म्हणजे शिक्षाच असे...
अहमदनगरकर जी, मला तुमच्या
अहमदनगरकर जी, मला तुमच्या मताचा राग येण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही सत्य परिस्थितीच मांडली आहे. पण प्रत्येकाचा स्वतःचा एक दृष्टिकोन असतो. त्यामुळे या गोष्टी मलाही प्रकर्,ाने दिसत असल्या तरी त्यासाठी केवळ रेल्वेलाच दोष देऊन उपयोग नाही. त्या मागच्या बाबीही लक्षात घेतल्या पाहिजेत.
नेहेमीप्रमाणेच मस्त लेख.
नेहेमीप्रमाणेच मस्त लेख. कर्णावतीने अनेको वेळा प्रवास केलाय... मामाच्या गावाला जाउया म्हणत.
अजय - तुम्ही सत्य परिस्थितीचे
अजय - तुम्ही सत्य परिस्थितीचे वर्णन केले आहे... तुम्ही लिहीले आहे ते सर्व मी पण अनुभवले आहे. वाईट अनुभव मलाही आलेले आहेत, तुम्ही वर कथन केले आहेतच. पण त्याच बरोबर अनेक वेळा चान्गले अनुभवही आलेले आहेत.
भारतात असताना (२००० पर्यन्त आताही) माझी पहिली पसन्ती रेल्वे, दुसरी पसन्ती रेल्वे, सर्वात शेवटची पसन्ती बस.
(अ) ३ वर्षान्पुर्वी भुसावळला रेल्वे स्टेशनवर गाडीसाठी थाम्बलो होतो. २-३ तासाच्या वेळात किमान २० लाम्ब पल्ल्याच्या गाड्या जा-ये करतात. पण रेल्वे स्टेशनवर कचरा नव्हता... दर १५ मि. कचरा साफ करण्यासाठी कर्मचारी यायचे. आता ते गेल्यावर ३-४ मि. त्या स्वच्छ केलेल्या ठिकणी लोक केळाचे साल, कागद असा कचरा करणार. ते कचर्याच्या डब्यापर्यन्तही जाणार नाहीत.
(ब) डब्यामधे जेवण केल्यावर, किव्वा शेन्गा खाल्ल्यावर कचरा अगदी तिथेच ठेवणार/ टाकणार... सिगरेटचे थोटुक तिथेच, माणिकचन्दचे रिकामे झालेले पाकिट, पाण्याची रिकामी बाटली, वाचुन झालेला पेपर या सर्व गोष्टी तिथेच ठेवणारे प्रवासी बघितले आहेत. जबाबदारी कुणाची आहे ? या विषयावर अनेक पाने लिहीणे शक्य आहे.
हजारो प्रवासी ये-जा करणारे स्टेशन.... आपल्याला (सामुहिक जबाबदारी आहे) १५ मिनटे पण स्वच्छ ठेवता येत नाही तर मग रेल्वे करणार काय ?
रेल्वे सार्वजनिक मालमत्ता आहे, आपण सर्व तिचे मालक आहोत हे प्रत्येक भारतियाला मनापासुन वाटल्यावर रेल्वे प्रवास अजुनच सुखकारक होण्यास मदत ठरेल.
उदय, पूर्णपणे सहमत! मला काय
उदय, पूर्णपणे सहमत! मला काय करता येईल? हा विचार करुन मी एक पिशवी घेऊन जाते व ८ लोकांना त्यात कचरा टाकायला सांगते ... दुसरी व अत्यंत महत्वाची गोष्ट स्टेशनवर गाडी थांबल्यावर टॉयलेटचा वापर ... दरवाज्यावर लिहीलेला असताना... त्यासाठी प्रबोधनही करत असते... उतनार नाही मातऩार नाही म्हणत ...हा वसा टाकणार नाहीये...
..
स्वतःची जबाबदारी ह्याचे महत्व
स्वतःची जबाबदारी ह्याचे महत्व ओळखलेल्या सर्व बंधू भगिनींस मानाचा मुजरा आमचा.
होय, मीही प्रवासात माझ्यामुळे
होय, मीही प्रवासात माझ्यामुळे कचरा, अस्वच्छता पसरणार नाही याची काळजी घेतोच. सामाजिक भानही राखतो. स्वतःपासून सुरुवात केल्यामुळे इतरांना सांगण्याचा अधिकारही आपोआप मिळतोच. त्यातही कायम राष्ट्रीयत्वाचा विचार मनात जागृत ठेवला तर चुकाही आपोआप टळतात.
तसंही इतक्या कमी पैशात , इतका
तसंही इतक्या कमी पैशात , इतका जास्त माल, प्रवासी वाहतूक, इतक्या दूर अंतरावर , करण्याच्या बाबतीत आम्ही कायम तथाकथित स्वच्छ रेल्वे सुंदर रेल्वे दिसायला आकर्षक रेल्वे चालक पाश्चात्य देशांना कायम चॅलेंज करावे म्हणतो.
सविस्तर वर्णन वाचायला मजाच
सविस्तर वर्णन वाचायला मजाच येते तुमचं!
तुमचं रेल्वेवरचं प्रेम ओळीओळीत दिसतं!
पुलेशु.
Pages