फार पूर्वी, जेव्हां बोटी फक्त शिडाच्या होत्या तेव्हांचा काळ. इंग्लंडच्या बोटी (Her Majesty’s Ships) जगभर फिरायच्या खर्या, पण त्यांच्यावर काम करायला खलाशी सहजासहजी मिळत नव्हते. खलाशांचं आयुष्य फारच खडतर असे. गोडं पाणी अतिशय मर्यादित. शीतकरण नसल्यामुळे आहारात थोडेच पदार्थ. रोज रोज तेच तेच. वार्यावर अवलंबून असल्यामुळे पुढच्या बंदराला पोहोचायला किती काळ लागेल काही सांगता येत नसे. काम अंगमेहनतीचं आणि जोखमीचं. वादळांचा धोका कायमच डोक्यावर. बोटी बुडण्याचं आणि खडकांवर आपटून फुटण्याचं प्रमाण बर्यापैकी. वर कित्येक सफरींमध्ये तर सत्तर टक्के खलाशी स्कर्वी (scurvy) ने मेल्याची नोंद आहे.
अधिकारी वर्ग स्वतःहून यायचा पण खलाशांना मारून मुटकून जमवायला लागायचं. असे लोक जमवून देणारे एजंट्स असंत. बोट इंग्लंडमधून निघायची वेळ झाली की ते रस्त्यारस्त्यात फिरून दारू पिऊन झिंगून पडलेल्या लोकांना उचलून सरळ बोटीवर आणून टाकत. नशा उतरेपर्यंत बोट बंदरातून निघालेली असे. मग सुटका नसे. सुरवातीला त्यांची स्थिती जवळजवळ कैद्यासारखीच असे. फरक एवढाच की त्यांना रोज दारू दिली जायची. हळुहळु रुळत.
तर आम्हा दर्यावर्दी लोकांचा असा हा उत्तुंग वारसा!
पुढे तांत्रिक प्रगती होत गेली खरी, पण दारू आणि सिगरेट पिणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे हा विचार काही नाहिसा झाला नाही. साधारण साठीच्या दशकात नाविक कंपन्यांनी या सवयींवर अंकुश लावण्याचं धारिष्ट दाखवायला सुरवात केली. याचं कारण असं की अपघातानंतर केलेल्या विश्लेषणातून असं दिसायला लागलं की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ड्रग्स वा अल्कोहोलचा त्यांच्याशी संबंध आहे.
पहिला घाव ड्रग्सवर पडला आणि तो लगेचच यशस्वी झाला कारण या नशावीरांचं प्रमाण अगदी कमी होतं आणि पूर्वीपासूनच बाकीचे यांच्याकडे तुच्छतेनेच बघायचे. लपूनछपून कोणी सेवन करत राहिले असतील का? याचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागेल. याचं कारण असं की बोटीवर गुपित नावाची गोष्ट नसतेच. कॅबिन्स एकमेकाला चिकटून. काम करणं, जेवणखाण, ट्रेनिंग, मौजमस्ती, बाहेर जाणं, पिक्चर बघणं, सगळं एकत्र. एखादा डोस चुपचाप घेता येईल देखील, पण त्यानंतरचे नशीले डोळे सगळ्यांना दिसतीलच.
शिवाय दर आठवड्याला इन्स्पेक्शन असते. सगळ्या खोल्यांमध्ये कॅप्टन, चीफ इंजिनियर, चीफ ऑफिसर आणि बोसन (खलाशांचा म्होरक्या) चक्कर मारतात. बेकायदेशीर वस्तू तर सोडूनच द्या, खोलीत पसारा असला तरी त्याला धारेवर धरलं जातं.
बोटीवरचा माल आणि खुद्द बोट ह्यांचा इन्शुरन्स असावाच लागतो. तो असल्याशिवाय बोटीला बंदरातून बाहेर पडायला परवानगीच मिळत नाही. (बाहेर पडायलाच कशाला, आत यायला सुद्धा.) जसजसं प्रत्येकच बिझनेसमधील खर्चांकडे जास्त काटेकोरपणे पाहिलं जाऊ लागलं तसंच इन्शुरन्सदेखील. एखादा अपघात झाला आणि त्यात अल्कोहोलचा काही हात आहे अशी शंका आली की इन्शुरन्स कंपन्या पैसे द्यायला कां कूं करायला लागल्या.
शंकाच का? खात्री का नाही? याचं कारण असं की एखादा अपघात झाला की बोट समुद्रात असल्यामुळे विश्लेषण करण्यासाठी कोणी तज्ञ तिथे लगेच पोहोचण्याचा प्रश्नच नाही. कॅप्टन आणि चीफ इंजिनियरच ती जबाबदारी सांभाळणार! ते स्वतःच मदिराभक्त असले तर त्यांच्या अहवालात ते कशाला अल्कोहोलला दोष देतील? म्हणून शंका.
एकदा पोलंडमध्ये एक किस्सा झाला होता. आमच्या कंपनीच्या एका बोटीवर बोट ग्दांस्क (Gdansk) बंदरात असताना काही अपघात झाला. नशिबानी कोणालाही इजा झालेली नव्हती, पण मशिनरीचं बर्यापैकी नुकसान झालं होतं. बंदरात असताना काहीही अघटित घटना घडली की बंदरातील सेफ्टी ऑफिसरला कळवलं पाहिजे हा सगळीकडेच रिवाज असतो. त्याप्रमाणे कळवलं. लगेचंच त्यांच्या कोस्ट गार्डची (Coast Guard) टीम विश्लेषण करायला आली. ज्या दोन व्यक्तींमुळे तो अपघात झाला होता त्यांची breathalyzer चाचणी केल्यावर त्यांच्या श्वासात मर्यादेच्या दुप्पट अल्कोहोल असल्याचं आढळून आलं. त्या दोघांनी असा दावा केला की breathalyzer मशीन व्यवस्थित काम करीत नाही. Breathalyzer टेस्टला जर ग्राह्य धरायचं असेल तर त्या मशीनला दर वर्षी प्रयोगशाळेत कॅलिब्रेट करून घ्यावं लागतं. तसं कोस्ट गार्डनी केलेलं नव्हतं. मग त्या टेस्टला ग्राह्य धरण्यासाठी कोस्ट गार्डनी असं ठरवलं की बोटीवरच्या सर्वांची टेस्ट करावी म्हणजे हे सिद्ध होईल की जे प्यायलेले नाहीत त्यांचं रीडिंग व्यवस्थित दाखवत आहे. आश्चर्य म्हणजे सगळ्यांचंच अल्कोहोल कमीअधिक प्रमाणात मर्यादेच्या बाहेर! कोस्ट गार्डच्या वरिष्ठ अधिकार्यांना हे कळवल्यावर त्यांनी असा तोडगा काढला की कोस्ट गार्डची जी टीम विश्लेषण करायला आली होती त्यांचीच टेस्ट करावी. त्यांचं रीडिंग तर नक्कीच मर्यादेत असेल. तर ते टाळाटाळ करू लागले. कारण उघडच होतं. बोटीवर काहीही विश्लेषण वा कारवाई न करता टीम परत गेली. परत गेल्यावर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर काय कारवाई केली बोटीवरच्या लोकांना माहीत नाही. पण अंदाज मात्र आला. कारण दुसर्या दिवशीपासून बोटीच्या मागे इन्स्पेक्शन्सचा ससेमिराच लागला. निघेपर्यंत रोज कोणता ना कोणता इन्स्पेक्टर बोटीवर येऊन (कधी हेल्थ, कधी कस्टम्स तर कधी प्रदूषण) त्रास देत असे.
सांगायचा मुद्दा काय, तर तेव्हां नुसते बोटीवरचे खलाशीच नव्हे, तर बोटीशी संबंध असलेल्या सगळ्यांमध्येच दारूला राजमान्यता होती. शिवाय ‘Fools of the family go to sea.’ असा वाक्प्रचार रूढ होता आणि काही प्रमाणात खरा देखील. या दोन वस्तुस्थितींचं साटंलोटं छान चाले. एखादा मनुष्य बोटीवर काम करतो म्हटल्यावर तो सिगरेट ओढत असणार आणि दारू पीत असणार असं आपण म्हणू शकंत होतो.
ही परिस्थिती बदलण्याचं कारण पूर्णपणे कमर्शिअल होतं.
जी कंपनी बोट भाड्याने घेते तिला चार्टरर (charterer) म्हणतात. त्यांनी जगभरच्या कित्येक कंपन्यांचा ‘इतका इतका माल या तारखेपर्यंत या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत पोहोचवून देवू’ असं कंत्राट घेतलेलं असतं. ही कंपनी बोटी कधी एका सफरीकरता किंवा अमुक काळासाठी भाड्यानी घेतात. भाड्यानी घेण्याआधी ती बोट, त्यावरील लोक, बोटीचा मालक, त्याची कार्यपद्धती, बोटीची परिस्थिती, या सगळ्या गोष्टींचा शहानिशा केल्याशिवाय ते कसा आपला मौल्यवान माल त्या बोटीवर लादणार? त्यातून तेलवाहू बोटींवर आगीचा धोका जास्त आणि जर काही कारणानी हे तेल पाण्यात सांडलं तर प्रचंड प्रदूषण! त्यामुळे ते कित्येक बोटींचं इन्स्पेक्शन करतात. त्यांना मार्क देतात. त्या मार्कांच्या आधारावरच ती बोट घ्यायची की नाही, घेतली तर त्याला किती भाडं द्यावं वगैरे अवलंबून असतं. त्यांनी अशी पद्धत सुरू केली की ज्या बोटीवर दारुबंदी असेल त्यांना बोनस मार्क द्यावेत. आमदनीवर थेट परिणाम होणार म्हटल्यावर लगेचच बोटीच्या मालकांनी कल्पना उचलून धरली. पूर्वी बोटीच्या Tax Free स्टोअरमध्ये स्कॉच व्हिस्की वगैरे शेकड्यांनी असायच्या ज्या आम्ही विकत घ्यायचो. आणि रिचवायचो.
गेले ऽऽऽ तेऽ दिन गेऽऽलेऽऽ.
दारू बंद झाल्यावर कित्येक लोकांनी नोकर्या सोडल्या. कित्येकांच्या गेल्या. याचं कारण बोटींवर Unannounced Drug and Alcohol Tests नियमितपणे घेतल्या जातात. तो आता क्वॉलिटीचा अविभाज्य भाग बनलेला आहे.
सिगारेटींची कमी जास्त प्रमाणात तीच अवस्था झाली. पूर्वी कोणीही कुठेही कितीही फुंकू शकत असे. त्यावर निर्बंध आले. तेलवाहू जहाजांवर तर बंदरात असताना सबंद बोटीवर एक किंवा दोन खोल्या निर्धारित केलेल्या असतात (त्यांना स्मोक रूम म्हणतात) जिथे सिगारेट ओढायला परवानगी असते. आपापल्या केबिनमध्ये देखील ओढलेली चालत नाही.
मारून मुटकुन का होई ना, लोकांच्या सवयी सुधारल्या. आता मात्र तराजू दुसर्या बाजूला कलला आहे. म्हणजे काय?
जमिनीवर राहाणारा कोणताही मनुष्य आपल्या खाजगी वेळेत काय करतो ह्याबद्दल आपण ग्वाही देऊ शकत नाही. रात्री दारूच्या गुत्त्यावर गेलेला असो किंवा सट्टा खेळलेला असो. सकाळी कामावर वेळेवर आला म्हणजे झालं. मात्र बोटीवरचा खाजगी वेळ खर्या दृष्टीनी खाजगीच नसल्यामुळे त्या खलाशाच्या सवयींबद्दल मात्र आज आपण ग्वाही देऊ शकतो.
याच व्यसनांच्या भीतीनी पूर्वी मुलीचा बाप दर्यावर्द्याला जावई करून घ्यायला तयार नसे. आज ती परिस्थिती राहिली नाही पण आता मुलीच बोटीवर भटकू इच्छित नाहीत. त्या कारणांबद्दल पुन्हा कधीतरी बोलू.
तात्पर्य काय, तर सवयी सुधारून सुद्धा बिचार्या खलाशांची वैवाहिक आबाळ चालूच आहे.
बोटीवरच्या आधीच्या लेखांच्या लिंक्स
http://www.maayboli.com/node/52087
http://www.maayboli.com/node/56300
http://www.maayboli.com/node/56385
http://www.maayboli.com/node/56993
http://www.maayboli.com/node/58138
मस्त लेख .
मस्त लेख .
तुमचे सर्व लेख जबरदस्तच
तुमचे सर्व लेख जबरदस्तच असतात.
मला मागचा फायर ब्रिगेड चा पण खूप आवडला होता.
माझ्या मैत्रिणीने इंजिनीयर स्थळे नाकारुन मर्चंट नेव्ही वाल्याशी लग्न केले आहे.नवरा चार महिने घरी बाकी वेळ बोटीवर.आणी दोन मुले आण वृद्ध सासू सासरे एकटीने सांभाळणे.तिला मागच्या वेळी विचारलं की कुटुंबाची आर्मी नेव्ही बॅकग्राऊंड नसताना पण हा निर्णय का घेतलास? ती एकदम आनंदी आहे.आर्मी नेव्ही वाल्यांबद्दल सिव्हीलीयन्स ला एक गूढ आकर्षण आणि ग्लॅमर असतं.त्यामुळे एखादा उमदा नेव्हीवाला युनिफॉर्म मध्ये लग्नाचा प्रस्ताव घेऊण आल्यास त्यातले खडतर आयुष्य माहित असून पण त्याला होकार मिळण्याची शक्यता अधिक.
छान आणि माहितीयुक्त लेख!!!
छान आणि माहितीयुक्त लेख!!!
छान लेख
छान लेख
वैवाहिक आबाळ?! असे काही होत
वैवाहिक आबाळ?! असे काही होत नाही. अ सेलर हॅज अ गर्ल्फ्रेंड अॅट एवरी पोर्ट हा वाक्प्रचार रूढच आहे. दीज आर ग्रोन अॅडल्ट मेल्स. गेट रीअल. नेव्ही प्रॉपर मध्ये पण जी वागणूक चालते ते कायम लिहून येत असते. माझा आक्षेप किंवा पूर्वग्रह आजिबात नाही. नन ऑफ माय बिझनेस. वस्तुस्थिती सांगितली.
चाकोरीबाहेरच्या जीवनाबद्दल
चाकोरीबाहेरच्या जीवनाबद्दल कुटूहल असतंच पण तें सहज शमवताही येत नाही. म्हणून असल्या लिखाणाचं अप्रूप व लेखकाचं कौतुक !! धन्यवाद.
आणखी एक कुतूहल ,<< तर सवयी सुधारून सुद्धा बिचार्या खलाशांची वैवाहिक आबाळ चालूच आहे.>> च्या संदर्भात; वैवाहिक जीवनाच्या बंधनाचा कंटाळा म्हणा, धास्ती म्हणा, म्हणूनही दर्यावर्दी करिअर निवडणारेही बरेच असतात का ? तसं असेल तर त्याना तर ही आबाळ वाटण्याचा प्रश्नच नसावा !!
छानच लेख... खरं तर
छानच लेख... खरं तर पीनेवालोंको बहाना चाहिये, असेच आहे. काच कारखान्याशी काही काळ संबंधित होतो.. तिथे म्हणे सर्वांनाच हे व्यसन असते ( असावेच लागते ! )
सुंदर खरोखर अतिशय सुंदर लेख
सुंदर खरोखर अतिशय सुंदर लेख आहे स्वीटटॉकर सर!
सेलर्सच्या आयुष्या बद्दल आधीच असलेला आदर अन कुतूहल तुमच्या लेखाने दुप्पट होते कायम, विक्टोरियन काळात तर सेलिंग म्हणजे खरेच मानवी क्षमतांचा यथोचित कस घेणारे काम होते! ह्या संबंधी काही काही माहीती आहे अन काही आपण द्याल अशी अपेक्षा
बरीच आधी वाचलेली एक माहीती खरी का खोटी ते आपण सांगू शकलात तर बरे होईल ती म्हणजे पोर्तुगीज दर्यावर्दी जेव्हा सफरीवर निघाले की भरपुर साठा रेड रम/वाइन अन हार्ड बिस्किट्सचा घेऊन निघत, भारताच्या किनाऱ्याजवळ हे लोक आले तेव्हा आपल्या एतद्देशीय लोकांनी म्हणे ही फिरंगी मंडळी "हाडे" फोडून खाल्ल्यावर "रक्त" प्राशन करतात असे निरिक्षण काढले होते.
स्कर्वीचं कारण तुम्ही सांगितले तसे चौफेर आहाराची कमी पुढे हे प्रमाण कमी व्हायला निकोलस एपर्ट ह्या फ्रेंच सदगृहस्थाने लावलेल्या अन्न कॅनिंग करायच्या प्रक्रियेमुळे कमी झाले व त्यांना बऱ्यापैकी आहार मिळायला सुरुवात झाली असावी असे वाटते.
बाकी आमचं एक मित्र फ़क्त दारूसाठी मर्चंट नेवी मधे जाणार होते ते आठवले! सध्या गड़ी स्टेट बँक मधे क्लर्क आहे पण ड्रिंकचा राबता सुरु आहे शिस्तीत ! त्याला मला नाही वाटत कामाचं बंधन असावं! वैयक्तिक मी पाहिलेली पट्टीची पेताडं बहुतांशी बँकर आहेत! कारण म्हणजे वर्षात काही महीने असलेली आराम अन काही महीने (ऑडिट) विलक्षण स्ट्रेसची नोकरी, असा माझा अंदाज आहे, आम्हीही फ़ोर्स मधे जेव्हा डिप्लॉयमेंट वर असतो तेव्हा मेसला जवळपास रोज एखाद ड्रिंक होते पण ते स्ट्रिक्टली कंट्रोल्ड असते (असावेच लागते)
पुन्हा एकदा लेख खुप आवडला अन पुढील भागाची वाट पाहतो आहे! तुम्ही होम पोर्टला येऊन सुट्टीवर जायची वाट बघत असाल तशी
-बाप्या
"वैवाहिक जीवनाची आबाळ" हे
"वैवाहिक जीवनाची आबाळ" हे मात्र नक्कीच खर."अ सेलर हॅज अ गर्ल्फ्रेंड अॅट एवरी पोर्ट" हा वाक्प्रचार सगळ्यांसाठी लागू होत नाही. तस बघायला गेल तर जमिनीवर राहणार्यांना सुद्धा गर्ल्फ्रेंड प्रत्येक महिन्याला नवीन नवीन असू शकतेच कि
तुमचे लेख खुपच भारी
तुमचे लेख खुपच भारी आहेत...एका वे ग ळ्याच दुनियेमध्ये घेउन जातात आम्हाला..!
मस्त आहे लेख
मस्त आहे लेख
सर्वजण, धन्यवाद. मी_अनु -
सर्वजण,
धन्यवाद.
मी_अनु - 'मर्चंट नेव्ही ऑफिसरची बायको होणे' यावर स्वीटर टॉकर लिहिणार आहे.
अमा - 'खलाशांची वैवाहिक आबाळ' आणि 'वूमन इन एव्हरी पोर्ट' याबद्दलही स्वीटर टॉकरलाच लिहायला मी सुचवलं आहे. ('मी सांगितलं आहे' ही वाक्यरचना स्त्रीहक्कांच्या आड येते!)
बघाव्या अशा आणि बघू नये अशा कित्येक गोष्टी तिने बोटीवर याचि देही याचि डोळा पाहिल्या आहेत.
भाऊ - ज्याला लग्नाची धास्ती वाटते (हल्ली हा आकडा फारच वाढला आहे. तो का हा एका स्वतंत्र्य धाग्याचा विषय होवू शकेल) त्याला 'मला लग्न करण्याची इच्छा नाही.' असं म्हणणं जास्त सोपं. त्याकरता करियर बदलायची म्हणजे आगीतून फुफाट्यात!
दिनेश - काच कारखान्याबद्दल मी देखील ऐकलेलं आहे पण कारण मला माहीत नाही. बहुदा भयानक उष्णता हे असावं.
सोन्याबापू - पोर्तुगीझ खलाशांबद्दल तुम्ही लिहिलं आहे ते खरं असण्याची शक्यता खूपच आहे. बिस्किटं आणि वाइन, शिवाय खारवलेलं आणि वाळवलेलं मांस हे खूप सहज टिकणारे पदार्थ असल्यामुळे तेव्हां त्यांचा वापर रोजच्या आहारात असण्याची शक्यता दाट आहे.
भारतीय लोक चालताचालता रक्त थुंकतात (पानाची पिंक) असं बाहेरचे लोक म्हणतातच ना!
मस्त लेख बरंय, मी बोटीवर
मस्त लेख बरंय, मी बोटीवर कामाला नाही ते
नेहमी प्रमाणेच छान
नेहमी प्रमाणेच छान लेख.
तुम्ही माझ्या काही खास आवडीच्या लेखकांमधे आहात.
मी नताशा, माझं लेखन म्हणजे
मी नताशा,
माझं लेखन म्हणजे फक्त अनुभवकथन असतं. त्यामुळे त्याला प्रगल्भ विचार, शब्दसम्पत्ती वगैरे काहीही लागत नाही. ते तुम्हाला आवडतय म्हणजे छानच आहे. धन्यवाद!
छान्,माहितीपूर्ण आहे हा लेख
छान्,माहितीपूर्ण आहे हा लेख ही. सेलर्स च्या बोटीवरल्या लाईफ भवती नेहमीच गूढतेचं वर्तुळ असतं.. तुमच्या लेखांमुळे या वर्तुळात डोकावण्याची संधी मिळते. खूप मजा वाटते वाचायला!!
<< माझं लेखन म्हणजे फक्त
<< माझं लेखन म्हणजे फक्त अनुभवकथन असतं. >> 'रिडर्स डायजेस्ट'मधे पूर्वीं वाचलेलं एक बोलकं अनुभवकथन -
बंदराला लागूनच असलेल्या एका इमारतीत एक कुटूंब रहात असतं. त्यांतल्या छोट्या मुलाला लहानपणापासूनच बंदरांत उभ्या असलेल्या दिमाखदार बोटी पाहून नेव्हीत भरती होण्याचीच महत्वाकांक्षा. शालेय शिक्षण संपतांच त्याच्या हट्टापायीं पालक त्याला नेव्हीत दाखल करतात. पहिले आठ-दहा दिवस त्याची उत्साहात घरीं पत्र येतात. नंतर तीन आठवड्यानंतर त्याचं एक छोटंसं पत्र येतं - ' आई, बंदरांतल्या त्या चकचकीत बोटी पाहून मीं मोहीत झालो होतों. गेले १५ दिवस त्या बोटी कोण व कशा चकचकीत ठेवतात याचा मीं प्रत्यक्ष अनुभव घेतोय ! डेक घासून घासून अंग दुखतंय, जातों '
स्वीट टॉकर, एखाद्या वेगळ्या क्षेत्रातला समृद्ध अनुभव हा इतरांसाठी विचारप्रवर्तकच असतो व आपण तर तो छानच मांडून इतरांकडे पोचवतां. धन्यवाद.
नेहमीप्रमाणे मस्तच लिहिलय
नेहमीप्रमाणे मस्तच लिहिलय
हा पण लेख आवडला.
हा पण लेख आवडला.
स्वीट टॉकर, तुमच्या लेखांतुन
स्वीट टॉकर, तुमच्या लेखांतुन एका वेगळ्या विश्वाचं दर्शन नेहेमीच होतं. तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
एम टी आयवा मारु या कादंबरीने
एम टी आयवा मारु या कादंबरीने केलेल्या नाटकीय वर्णनामुळे मला वाटते अनेक मराठी वाचकांच्या डोक्यात बोटींबद्दल एक वेगळीच कल्पना निर्माण झाली होती. स्वीट टॉकर यांच्या लेखांमुळे त्याला रिआलिस्टिक (आणी दु:खद कारण ही कादंब्री तेव्हा फार आवडली होती) तडे जात आहेत.
मस्त लेख.
मस्त लेख.
लेख आवडला.
लेख आवडला.
लेख आवडला
लेख आवडला
छान्,माहितीपूर्ण आहे हा लेख
छान्,माहितीपूर्ण आहे हा लेख ही. सेलर्स च्या बोटीवरल्या लाईफ भवती नेहमीच गूढतेचं वर्तुळ असतं.. तुमच्या लेखांमुळे या वर्तुळात डोकावण्याची संधी मिळते. खूप मजा वाटते वाचायला!! >>>>>> +१११११
हा लेख कसा काय मिसला होता मी ????
एक विनोद : एका जहाजाचा
एक विनोद :
एका जहाजाचा कप्तान भयंकर दारुड्या असतो. तसेच त्याची भयंकर द्दादागिरीही असते जहाजावर. कंपनीला त्याला काढून टाकण्यासाठी पुरावा म्हणून कोणा प्रत्यक्श दर्शीचा अहवाल पाहिजे असतो म्हणून एका मोहीमेवर कंपनी एक निरीक्षक नेमून त्याला हा कप्तान दारू प्यालेला असला की त्याची नोंद डायरीत करून ठ्वायला सांगते.
प्रवास सुरू होतो. कप्तानाला माहीत असते की आपल्यावर नजर ठवायला याला नेमलेला आहे . तो त्या निरीक्षकाला बोलावून सज्जड दम भरतो 'खबरदार तुझ्या डायरीमध्ये मी दारू प्यालेलो होतो अशी नोंद आली तर. तुला समुद्रात फेकून देईन '
निरीक्शक घावरून जातो. दौरा संपतो निरीक्शक कंपनीला त्याची डायरी सुपूर्त करतो. संपूर्ण अहवालात एकाच दिवशी त्याने नोंद केलेली असते
.
.
.
.
.
" आज कॅप्टन शुद्धीवर होता ! "
सर्वजण, पुन्हा धन्यवाद! टण्या
सर्वजण,
पुन्हा धन्यवाद!
टण्या - मी एम् टी आयवा मारू वाचलेली नाही याचं कारण स्वीट टॉकरीणबाईंनी ती वाचलेली आहे आणि त्यात आणि प्रत्यक्ष तिने जे काय बोटीवर अनुभवलं त्यात फार तफावत आहे असं तिचं म्हणणं.
अ अ अ
टण्या +1 एमटी आयवा मारू
टण्या +1
एमटी आयवा मारू वाचून थोडीशी ग्रे शेड आली होती मनात या व्यवसायाबद्दल . पण स्वीट टॉकरांच्या लेखनामुळे वेगळंच चित्र समोर आलेय
बोटीवरच्या आयुष्याची ही
बोटीवरच्या आयुष्याची ही लेखमाला अतिशय सुंदर चालू आहे खरंच ...
हा लेखही खूप आवडला.
स्वीटर टॉकरच्या लेखांची वाट बघते
अर्थात, आवडला लेख.
अर्थात, आवडला लेख.
Pages