"कुटुंब वत्सल उभा फणस हा कटि खांद्यावर घेऊन बाळे" अशा कवितांमधुन किंवा "भटो भटो कुठे गेला होतात" या सारख्या बडबड गीतां मधुनच भेटणारा फणस कोकणात मात्र आपल्याला पावला पावलाला भेटतो. आंबा हा कोकणचा राजा आहे आणि फणस आहे त्या राजाचा सरदार.
From mayboli
From mayboli
फणसाच झाड वाढत खुप उंच पण त्या मानाने त्याचा विस्तार कमी असतो. पानं असतात डार्क हिरवी आणि गळतात ही एकेक करुन, त्यामुळे झाड नेहमी हिरव दिसत. कायम सावली देत. पानांचे मुलाना खेळ म्हणून बैल आणि गाड्या ही करतात. या झाडाला भरपुर आयुष्य असत. आमची काही झाड माझ्या आजे सासर्यानी लावलेली आहेत आणि आजोबानी लावलेल्या झाडांची फळं नातवंडच नाही तर पंतवंड ही चाखत आहेत.
फणसाला फुल असं येतच नाही . साधारण डिसेंबर महिन्यात खोडाला डायरेक्ट छोटे छोटे फणसच लटकलेले दिसतात. साधारण फेव्रुवारी मार्च मध्ये फणस तयार व्हायला सुरवात होते. फणसाचे काटे रुंदावणे ही फणस तयार झाल्याची खुण आहे. फणस झाडावरुन खाली उतरविणे मोठ्या जोखमीचे काम आहे. प्रथम फणस सुंभानी बांधला जातो , नंतर एका हातात सुंभ धरुन दुसर्या हाताने डेख तोडतात आणि मग हळुहळु सुंभ आणि फणस खाली सोडतात. काही अति उंचीवरचे आणि फांदीच्या टोकावरचे फणस तर आम्ही उतरवत ही नाही. फणसांवरुन हात फिरवायला मला फार आवडत. काटे थोडे टोचतात हाताला पण थेट अॅक्युप्रेशरचा फील येतो. खाली उतरवलेल्या फणसाचा पिकुन चार पाच दिवसात घमघमाट सुटतो. तसेच त्यावर हलक्या हाताने थाप मारली तर एक वेगळाच आवाज येतो. आमच्या कडे सीझनचा पहिला फणस अगदी समारंभाने कापला जातो. न्याहारी झाली की सगळे जण गोल बसतात गरे खायला. एवढे मोठे बेंगरुळ आकाराचे जरा ही रंग रुप नसलेले फळ पण कापला की आतले सोनेरी रंगाचे, बोटभर लांबीचे, चारखंडाच्या कोंदणात बसविलेले गरे पाहुनच डोळे आणि मन तृप्त होते . त्या गोड, खुसखुशीत आत अगदी लहानशी आठळी असलेल्या गर्यांवर ताव मारतात सगळे. ज्या गड्याने फणस उतरविण्याचे अतिशय जोखमीचे काम केलेले असते त्याला ही आवर्जुन दिले जातात गरे
हापुसच्या सगळ्या झाडांच्या फळांची चव एक सारखीच असते पण फणसाची चव मात्र झाडागणीक बदलते. आमच्याकडे प्रत्येक फणसाला त्याच्या गर्याच्या रंग, रुप, चवीनुसार नाव दिली गेली आहेत. जसे थोरफळ्या - मोठे गरे असलेला, लोण्या - अगदी मऊ गरी असलेला , अमृत्या- अतिशय गोड गरे असलेला , लसण्या- लसणाच्या आकाराचे बारीक बारीक गरे असलेला , इरसाल.. इ इ..... इरसाल काप्याचे गरे तर गोड, खुसखुशीत सोनेरी रंगाचे असतातच पण याची चारखंड ही गोड असतात. हा फणस सगळ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे थोड विषयांतर आहे पण सांगतेच. माझ्या एका सासर्यांना मराठी साहित्याची खुप आवड होती . त्यावेळचे प्रसिदध साहित्यिक मान. न. चिं केळकर हे त्यांच दैवत होत . त्यांच गाव ही आमच्या पंचक्रोशीतलच . आमच्या इरसाल काप्याचे गरे त्यांना फार आवडत असत . दरवर्षी न चुकता माझे सासरे जिवाचा आटापिटा करुन हा फणस न. चि केळकरांपर्यंत पर्यंत पोचवत असतच.
कापा आणि बरका अशा दोन जाती असतात कोकणात फणसाच्या. वरुन दिसायला जरी हे दोन्ही फणस सारखे दिसत असले तरी बाकी सगळ्यात त्यांच्यात खूप फरक आहे. काप्याचे खुसखुशीत असतात , तर बरक्याघे हातातुन निसाटणारे थोडेसे गुळगुळीत पण गोड आणि अतिशय रसाळ. बरका फणस खाण्याच एक तंत्र आहे जे आमच्या मुलांना लहानपणीच शिकवले जाते. बरका फणस हाताने ही कापता येतो, कापा कापायला मात्र विळी किंवा कोयती लागतेच. काप्या फणसातल्या आठळ्या अगदी छोट्या असतात तर बरक्यातल्या असतात खुप मोठ्या
कोवळ्या आणि लहान फणसाला म्हणजे ज्यात अजिबात गरे नसतात अशाला " कुयरी " असं म्हणतात कोकणात. अशा फणसाची वालाचे दाणे आणि भरपुर खोबर घालुन केलेली भाजी आमच्याकडे सर्वांना आवडतेच पण गर्या गोट्याची म्हणजे कोवळे गरे आणि शेंगदाण्यासारख्या कोवळ्या आठळ्या असलेल्या फणसाची भाजी म्हणजे मेजवानीच वाटते. पिकल्या फणसाचे गरे घालुन केलेली गोडसर कढी ही करतो आम्ही उन्हाळ्यात . फणसाच सांदण हा खास कोकणी पदार्थ. फणसाच्या रसात थोडा गुळ आणि तांवुळाच्या कण्या घालुन सरसरीत भिजवायच आणी नंतर ते वाटीत घालुन मोदकपात्रात वाफवायच . खाताना बरोबर दुध किंवा तुप आणि आंब्याच लोणच . मुंबईच्या चाकरमान्यांसाठी आणि खास पाहुण्यांसाठी केली जातातच ही सांदण कोकणची खासीयत म्हणुन. फणसाच्या पानांचे चोया टोचुन सामोसे करायचे ज्याला आम्ही "खोले" म्हणतो, त्यात ही सांदण केली जातात कधी कधी. ह्याना फणसाच्या पानांचा सुरेख स्वाद लागतो. फणसाचा रस आणि साखर याचे उन्हात पाच सहा दिवस थरावर थर घालायचे आणि मग कडकडीत वाळवायचे की झाली फणस पोळी. उन्हाळ्यात आमच अंगण यांनीच भरलेल असत. कच्च्या फणसाचे खोबरेल तेलात तळलेले काप म्हणजेच तळलेले गरे अतिशय टेस्टी लागतात, कितीही खाल्ले तरी कमीच वाटतात. रेसिपी एका ओळीत लिहुन झाली तरी याचा फार उटारेटा आहे. आधी कच्चा फणस फोडायचा त्याच्या मोठ्या फोडी करायच्या , खालची पाठ काढायची मग गरे काढायचे त्यातली आठ ळी काढुन ते उभे लांबट चिरायचे आणि अणि मग खोबरेल तेलात तळायचे .... दुपारच्या वेळी कामवाल्याना हाताशी घेऊनच हे करावे लागतात. तळताना खोबरेल तेलाचा आणि गर्यांचा वास घमगमतो. त्या वासाने खळ्यात खेळणारी मुलं मागीलदारी गोळा होतात. आमची नजर चुकवुन सारखा डल्ला मारत असतात गर्यांवर.
गरे तळताना
From mayboli
तळलेले गरे
From mayboli
फणसाच्या आठळीला कोंब फुटणे हे पाऊस जवळ आल्याचे लक्ष्ण मानले जाते आठळ्या ही खायला मस्त लागतात. . आम्ही त्यातल्या त्यात मोठया आठळ्या धुवुन वाळवुन त्यांना थोडी माती फासुन जमीनीत एक उथळ खड्डा करुन त्यात ठेवुन देतो. अशा आठळ्या चार सहा महीने मस्त टिकतात. कधी अळुच्या भाजीत कधी आमटीत तर कधी उकडुन मीठ लावुन ही खाता येतात. पण आठळ्या खाण्याची खरी मजा पावसाची झड बसुन हवेत गारवा आला की त्या पाणचुलीच्या विस्तवात भाजुन खाण्यात आहे.
कधी झाड जीर्ण झालयं म्हणून किंवा कधी वार्या वादळामुळे एखादा फणस पडल्याचा गावाहुन फोन येतो . खूप वाईट वाटत . त्यानंतर जेव्हा गावाला जाण होत तेव्हा ती उजाड ओसाड जागा प्रत्यक्ष बघताना तर मनात कालवत अक्षरशः . एवढी जुनी झाडं बघता बघता नजरेआड होताना बघणं अतिशय क्लेशदायक असत. पण इलाज नसतो. जागा भरुन काढण्यासाठी तिथे एखाद नवीन झाड ही लावलेले असत तरी ही ती जागा उजाडच भासते... गप्पा मारता मारता जाऊबाई त्या फणसापासून तयार केलेला एखादा नवीन पोळ्पाट अथवा एखाद स्टुल किंवा फडताळ दाखवतात त्या पोळपाटावरुन जरा जास्तच मायेने हात फिरवला जातो मग थोडासा तरी दिलासा मिळतो.... फणसाचं ला़कूड चांगल मजबूत समजल जातं आणि आमच्या घराचा मुख्य वासा असाच आमच्याच एका फणसाचा आहे..... अशा तर्हेने फणस आमच्या घराचा कायमस्वरुपी आधार बनला आहे.....
मस्त मनीमोहोर, कोकणची मनसोक्त
मस्त मनीमोहोर, कोकणची मनसोक्त सैर घडवलीस... लेकुरवाळा हा शब्द फणसासाठी एकदम परफेक्ट! अंगाखांद्यावर विविध आकारांचे फणस घेऊन काहीसा वाकलेला, जडावलेला फणस किती लोभस दिसतो... बरका अतिशय मधूर असला तरी मला करकरीत रसाळ कापाच आवडतो विशेष. बरका खास फणसपोळीसाठी राखीव. खोबरेल तेलाचा वास फारसा आवडत नसल्याने फणसाच्या तळलेल्या कापांना तोंडी लावण्यापुरतं बाकी कुयरीची भाजी, गरे, फणसपोळी, उकडलेल्या आठळ्या (या सुक्या मच्छीच्या / कोलंबीच्या बरबट कालवणात किंवा लसणीच्या फोडणीच्या आमटीतही मस्त लागतात.) माझ्या माहेरीही फणसाची झाडे होती. पहीला फणस कापायचे खरंच जंगी सेलिब्रेशन असे... सुर्या, कोयता व विळीच्या पात्याला खोबरेल तेल लावले जाई चिक लागू नये म्हणून. सगळेच हाताला तेल लावून पिवळेधम्मक सोनेरी रसाळ गरे काढायला सज्ज होत. मग अगदी वटपौर्णिमेपर्यंत मनसोक्त फणसाचा आस्वाद घायला मिळे.
तुझ्याइकडच्या फणसांची नावे विशेष आवडली. उन्हाळ्यात हटकून गावी येण्याचे कारण कोकणातली उन्हाळी फळे हे ही आहेच.
मस्त लेख. लेखाने फार रडवलं
मस्त लेख. लेखाने फार रडवलं पण. आता जिथं बसून मी हे लिहितेय त्याच्या बरोबर समोर आमचा फणस होता. गेल्या वर्षी काही कारणांमुळे तो काढावा लागला. आता अंगण फारच ओकंबोकं वाटतं. दुसरा फणस मागच्या बाजूला आम्ही लावला आहे, पण तो मोठा व्हायला आवकाश आहे.
http://www.maayboli.com/node/25996
कोकणची माणसं साधी
कोकणची माणसं साधी भोळी
बोलण्यात त्यांच्या फणसाची गोडी>>>>>>>>>>...व्वा! धन्यवाद!
मनीमोहोर, मस्त
मनीमोहोर, मस्त लिहिलंत.
फुलेप्रगती ही तीन महिन्यांत पिक देणारी आणि भरपूर तेल देणारी एक शेंगदाण्याची सुधारीत जात आहे.
(महात्मा फुले कृषी विद्यापिठात विकसित केली गेलेली.)
साधना , आंबोली कोकणातच असुन
साधना , आंबोली कोकणातच असुन फणस नाही होत तिकडे ?
ड्रीमगर्ल मस्त प्रतिसाद. मच्छीमधे पण घालतात आठल्या हे महित नव्हते.
नंदिनी मी समजु शकते ती ओकी बोकी जागा बघताना काय वाटत ते. तुला लेख आवडला त्याबद्दल विशेष आभार. तुझा वरच्या लिन्क मधला " लेकुरवाळे " हा लेख वाचला. खूपच सुंदर लिहीतेस तु ! खूप आवडला.
शोभा, कोकणची माणसं साधी भोळी
बोलण्यात त्यांच्या फणसाची गोडी >>>> छान वाटल ना चाचुन !!!
गजानन, धन्यवाद. माहितीबद्दल. कितीही ताण दिला तरी फुलेप्रगती म्हणजे काय असेल त्याची कल्पना येत नव्हती.
खूप मस्त लेख. लहानपणी केलेली
खूप मस्त लेख.
लहानपणी केलेली मजा आणि तळलेल्या ग-यांवर मारलेला डल्ला आठवला
तुमचं सगळं लिखाण फार आवडतं. लिहित रहा
हेमा ताई, कीत्ती गोड लिहलाय
हेमा ताई, कीत्ती गोड लिहलाय लेख... पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतोय....:)
प्रथम फणस सुंभानी बांधला जातो ,+++ सुंभ म्हणजे काय ग?
फणसाच्या आठळीला कोंब फुटणे हे पाऊस जवळ आल्याचे लक्ष्ण मानले जाते आठळ्या ही खायला मस्त लागतात. . आम्ही त्यातल्या त्यात मोठया आठळ्या धुवुन वाळवुन त्यांना थोडी माती फासुन जमीनीत एक उथळ खड्डा करुन त्यात ठेवुन देतो. अशा आठळ्या चार सहा महीने मस्त टिकतात.++++ हे काही काही माहिती नव्हते... तुझ्यामुळे कोकणातली खुप माहिती मिळते आहे...
अजुन लेख येऊ देत.. तुझे लेख खुप आवडतात..
सुंभ जळला पण पीळ जळला नाही,
सुंभ जळला पण पीळ जळला नाही, यातला सुंभ.
कित्ती सुंदर आठवणी ममो! वाचत
कित्ती सुंदर आठवणी ममो!
वाचत रहावसं वाटतं. वाचता वाचता कधी कधी रहाटाचा भास होतो, कधी पाटातन पळत जायचा
छान. आमच्या हस्पिटलच्या दारात
छान.
आमच्या हस्पिटलच्या दारात दांडगा फणस आहे.
मांजर मस्त आहे.
मांजर मस्त आहे.
वाह, काय सुंदर लिहतेस गं तू
वाह,
काय सुंदर लिहतेस गं तू ममो..
मस्त अंगणात बसुन गोष्टी ऐकत असल्यासारखं वाटतं
वाह मस्त लेख! मस्त अंगणात
वाह मस्त लेख!
मस्त अंगणात बसुन गोष्टी ऐकत असल्यासारखं वाटतं>>>>> +१
मस्त वाटलं सगळे पतिसाद वाचुन.
मस्त वाटलं सगळे पतिसाद वाचुन.
सायली सुंभ म्हणजे नारळाच्या काथ्यापासुन पिळ देऊन वळलेली दोरी. ही चांगली मजबूत असते. आंणि नारळ कोकणात भरपूर असल्याने फुकट ही मिळते. दोरी वळण्याचेच काय ते श्र्म !
सुंभ जळला पण पीळ जळला नाही, यातला सुंभ. स्मित >> गजानन मस्त.
मुग्धा, मांजरं गर्याना फार चटावलेली असतात अगदी आपल्या सारख कुडुम कुडुम करत खातात मांजरं गरे. आमच्याकडे चर पाच मांजर घरातच असल्याने फार जपाव लागत गर्याना. पिशवीत पॅक केलेले गरे ही पिशवी फाडुन खातात मांजरं
<<फुकत ही मिळते जणू.... दोरी
<<फुकत ही मिळते जणू.... दोरी वळण्याचेच काय ते श्र्म ! >> काथ्या बनवायला आधीं मात्र मेहनत खूप असते. नारळाचीं सोडणं [ कठीण सालं] चिखलांत पुरून सहा-सहा महिने कुजवावी लागतात, मग उन्हात खडखडीत वाळवून, झोडून सुकलेला चिखल साफ निघाला कीं मगच स्वच्छ, सोनेरी काथ्या मिळतो.
हो खरं आहे भाऊ .
हो खरं आहे भाऊ .
मस्त लेख. प्रतिसादातील
मस्त लेख.
प्रतिसादातील माहितीहि छान.
फारच मस्त लिहिलंय ....खूप छान
फारच मस्त लिहिलंय ....खूप छान वाटल वाचून
खुप सुंदर लेख....
खुप सुंदर लेख....
ममो, किती मस्त लिहिलंंय!!
ममो, किती मस्त लिहिलंंय!! वाचणारा कधीत्या माहोलमधे जातो आणि ते अनुभवतो हे कळत सुद्धा नाही!!
चित्रदर्शी वर्णन!!
आणि हो...मनीमाऊ मस्त..
फणस.... किती सुंदर लिहिलंय...
फणस.... किती सुंदर लिहिलंय... तुमच्या भाषेतून सतत कोकण डोकावतच राहतं... काही शब्द वाचून फार आनंद झाला... डेख, कोयती, चोया, उटारेटा... बाकी फणसाची माहिती तर मस्तच...
पाण्यात भिजत घातलेली सोडणे,
पाण्यात भिजत घातलेली सोडणे, खुप कुटून घ्यावी लागतात.. त्यावरूनच तर काथ्याकूट शब्द आलाय.
त्यावरूनच तर काथ्याकूट शब्द
त्यावरूनच तर काथ्याकूट शब्द आलाय.>>>>>>>> दिनेशदा, हे लक्षातच आलं नव्हतं
त्या पोळपाटावरुन जरा जास्तच
त्या पोळपाटावरुन जरा जास्तच मायेने हात फिरवला जातो मग थोडासा तरी दिलासा मिळतो....>>> अप्रतीम लेख थेट काळजाला भिड्णारा , मस्त
माझ्या दिरांनी गावाहून थोडे
माझ्या दिरांनी गावाहून थोडे तळलेले गरे पाठवलेत.
अंजू, आम्हाला हि द्या जरा ते
अंजू,
आम्हाला हि द्या जरा ते गरे.
ममो, फणस बघूनच खावासा वाटतो. इथे पुण्यात भय्ये विकत्तत एकेक लहान चारखंड. ते केरळी फणस असतात, बरके तर मिळत सुद्धा नाही.
मला दोन्ही आवडतात.
झंपी वेलकम टू डोंबिवली. बाय द
झंपी वेलकम टू डोंबिवली.
बाय द वे नवरा पुण्याला गेला होता नणंदेकडे, तिकडेच पाठवला होता खाऊ दिरांनी आमच्यासाठीपण. तो कोकण ते डोंबिवली व्हाया पुणे आलाय .
अरेरे मिसलं. पण
अरेरे मिसलं.
पण आमंत्रणाबद्दल धन्यवाद.
मी केरळी दुकानातून तळलेले गरे आणते पण त्याला कधी कधी वास मारतो तेलाचा. तरी पण खाते कुडूम कुडूम .......
हे असलेच इधयम चे मिळते त्या केरळी दुकानात पण,
http://wholesale.khanapakana.com/snacks-sweets/nimko-spicy-snacks/3-pack...
सगळ्यांचे प्रतिसाद किती छान
सगळ्यांचे प्रतिसाद किती छान !!! सर्वांचे आभार
शांकली, तुला बरोब्बर मांजरच दिसली ( स्मित)
दिनेश, काथ्याकूट शब्दाची व्युत्पत्ती ..... कमाल आहे तुमची !!!
नितीन, इतक्या छान प्रतिसादाबद्दल विशेष आभार
तो कोकण ते डोंबिवली व्हाया पुणे आलाय हाहा . >>> अंजू अगदी बरोबर !!! कोकणी माणुस गावहुन आलेली दोन रुपयाची वस्तु आणण्यासाठी १०० रुपये आणि चार तास सुद्धा खर्च करेल कारण त्याच्या साठी ती वस्तू अमुल्य असते
वास लगलेले गरे अगदी नाही खाववत झंपी, त्यांना खोबरेल तेलाचा सुरेख स्वाद्च यायला हवा
अगदी खरं हेमाताई .
अगदी खरं हेमाताई .
Pages