गोव्यामधल्या दाबोळीत असलेल्या नौदलाच्या हवाई शाखेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी भा. नौ. पो. हंसा या तळावर ११ मेला सी हॅरियर या लढाऊ विमानांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. १६ डिसेंबर १९८३ पासून ११ मे २०१६ पर्यंत गेली ३३ वर्षे या विमानांनी ‘भा. नौ. पो. विक्रांत’ आणि ‘भा. नौ. पो. विराट’ या विमानवाहू जहाजांवरून या विमानांनी भारताच्या हिंदी महासागरातील सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण शीतयुद्धानंतरच्या कालखंडात बदललेल्या आंतरराष्ट्रीय भू-राजकीय समीकरणांनंतर या सबसॉनिक म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा किंचित कमी वेगाने उडणाऱ्या विमानांमुळे भारतीय नौदलाला हिंदी महासागरातील राष्ट्रहितांच्या सुरक्षेबरोबरच नवनवीन आव्हानांचा सामना करणे अवघड जात होते. त्यामुळे हिंदी महासागरावर आपला दरारा कायम ठेवण्यासाठी नौदलाला नव्या विमानवाहू जहाजांबरोबरच नव्या लढाऊ विमानांचीही आवश्यकता भासू लागली. पण कोणताही संरक्षण व्यवहार वेळेत पूर्ण न करण्याची, सैन्यदलांना आवश्यक असलेली शस्त्रसामग्री मागणीनंतर कित्येक वर्षांनी उपलब्ध करून देण्याची सत्तेत असलेल्या भारतीय राजकीय पक्षांची परंपरा आहे. परिणामी भारतीय सैन्यदलांना मिळणारी शस्त्रास्त्रे आणि त्याची खरी मागणी यामध्ये कायमच जमीन-आस्मानाचे अंतर राहते. गेल्या काही वर्षांपासून संरक्षण सामग्रीच्या खरेदीत वारंवार भ्रष्टाचार उघड होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अधिकच वेळखाऊ बनली आहे.
तरीही उपलब्ध साधनसामग्री आणि मनुष्यबळाच्या मदतीने भारतीय सैन्यदलांनी आपल्या क्षमतेमध्ये बरीच वाढ केलेली आहे. भारतीय नौदलाचे कार्यक्षेत्र आज हिंदी महासागराच्याही पलीकडे विस्तारत आहे. ‘हिंदी महासागरातील सर्वांत मोठे आणि प्रबळ नौदल’ अशी ओळख भारतीय नौदलाला लाभलेली आहे. तसेच त्याला ‘निळ्या पाण्यावरील नौदल’ असेही म्हटले जात आहे. अन्य मागण्यांबरोबरच नव्या विमानवाहू जहाजाची आणि अत्याधुनिक लढाऊ विमानाची नौदलाची गरज पूर्ण करण्यासाठी अखेर भारताने रशियाकडून ‘भा. नौ. पो. विक्रमादित्य’ या विमानवाहू जहाजाच्या खरेदीचा आणि त्याच्याबरोबर ‘मिग-२९ के/केयूबी’ या अत्याधुनिक बहुपयोगी लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला होता. त्यानुसार १९ फेब्रुवारी (शिवजयंतीलाच, हा योगायोगच) २०१० रोजी ‘मिग-२९ के’ आणि ‘मिग-२९ केयूबी’ गोव्यातील नौदलाच्या भा. नौ. पो. हंसा या हवाई तळावर भारतीय नौदलात सामील झाली.
‘मिग-२९ के’ आणि ‘मिग-२९ केयूबी’ ही विमाने सी हॅरियरची जागा घेण्यासाठी सामील होऊ लागली होती. ब्रिटनकडून भारताने ३० सी हॅरियर विकत घेतली होती. VTOL या तंत्राचा वापर करणारी ही जगातील एकमेव लढाऊ विमाने होती. या तंत्रामुळे या विमानांना विमानवाहू जहाजावच्या मर्यादित लांबीच्या धावपट्टीवरून हेलिकॉप्टर उड्डाण करणे किंवा उतरणे शक्य होते. मात्र ब्रिटन आणि भारताकडेच अशी विमाने होती. अमेरिकेने या तंत्राचा ब्रिटनकडून स्वीकार करून स्वतःची अशी मर्यादित संख्येने विमाने बनवली होती. पण या तंत्रामुळे ही विमाने जास्त शस्त्रास्त्रे स्वतःबरोबर घेऊन जाऊ शकत नव्हती. त्यातच यांचा पल्लाही मर्यादितच होता. त्यामुळे २००६ मध्ये ब्रिटनने आपल्या नौदलाच्या ताफ्यातून या विमानांना निवृत्त केले आणि त्यांचे उत्पादनही बंद झाले. भारतीय नौदलाच्यासुद्धा आवश्यकता बदललेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत या विमानाकडून भागत नव्हत्या. ब्रिटनने ही विमाने निवृत्त केल्यावर अलीकडच्या काळात भारतीय नौदलाला सी हॅरियरच्या देखभालीत अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यांचे सुटे भाग मिळेनासे झाले होते. येत्या दोनेक महिन्यांमध्ये ‘भा. नौ. पो. विराट’ही सेवानिवृत्त होत आहे. अशा परिस्थितीत या विमानांना सेवानिवृत्त करणेच योग्य वाटत होते. मध्यंतरी नौदलाने सी हॅरियरमध्ये काही सुधारणा केल्या होत्या. पण त्यामुळे नौदलाच्या गरजांची पूर्तता होत नव्हती.
अखेर सी हॅरियर आज निवृत्त झाले आहे. त्याद्वारे VTOL वर आधारलेल्या सबसॉनिक लढाऊ विमानांचे युगही आता संपुष्टात आले आहे. अशा तंत्रावर आधारलेल्या एकमेव ‘एफ-३५ सी’ या पाचव्या पिढीच्या अत्याधुनिक विमानाच्या अमेरिकेत चाचण्या तिम टप्प्यात आल्या आहेत. ११ मेला नौदलाच्या आय. एन. ए. एस. ३०० या तुकडीतील (स्क्वाड्रन) सी हॅरियर सेवानिवृत्त झाली असून त्यांच्या जागी येत्या काळात ‘मिग-२९ के’ आणि ‘मिग-२९ केयूबी’ ही ४++ पिढीतील स्वनातीत (सुपरसॉनिक) लढाऊ विमाने सामील करण्यात येणार आहेत. तोपर्यंत सी हॅरियरच्या वैमानिकांना ‘मिग-२९ केयूबी’वर प्रशिक्षण दिले जाणार आहे. कशी आहेत ही अत्याधुनिक ‘मिग-२९ के’?
‘मिग-२९ के/केयूबी’ ही विमाने विमानवाहू जहाजावरून STOBAR (Short Take-Off But Arrested Recovery) या तंत्राद्वारे उड्डाण करतात आणि उतरतात. या तंत्रामुळे आधीच्या सी हॅरियरपेक्षा या विमानाची वहनक्षमता सुमारे दोन टनांनी जास्त आहे. ‘मिग-२९ के’ एक आसनी विमान आहे. या विमानाच्या शस्त्रसामग्रीमध्ये केएच-३१ ए, केएच-३१ पी, केएच-२९ टी आणि रडारनियंत्रित केएच-३५ ई ही क्षेपणास्त्रे समाविष्ट आहेत. ‘मिग-२९ के’वर ‘डागा आणि विसरा’ या तंत्रावर आधारित आर-६६ आरव्हीव्ही आणि आर-७३ ई ही हवेतून हवेतील लक्ष्यांवर मारा करणारी क्षेपणास्त्रेही बसविता येतात. त्याचबरोबर क्लस्टर बॉम्ब्स, रॉकेट्स यांच्यासह साडेपाच टन वजनाची शस्त्रसामग्री हे विमान वाहून नेऊ शकते. यावर जीएसएच-३०१ ही स्वयंचलित मशीनगनही आहे. तसेच उपग्रहावर आधारित दळणवळण यंत्रणाही यावर बसविण्यात आलेली आहे. या सर्वांमुळे आपल्या विमानवाहू जहाजांच्या ताफ्याचे शत्रुच्या पाणबुड्या, युद्धनौका, विमानांपासून प्रभावीपणे संरक्षण करण्याची क्षमता ‘मिग-२९ के’मध्ये आली आहे. याचा पल्ला सुमारे ७०० सागरी मैल (नॉट्स) असला तरी हवेत उडत असतानाच त्यात इंधन भरून तो आणखी वाढवता येतो.
‘मिग-२९ के’वरील झुक-एमई या रडारच्या सहाय्याने विमानाच्या भोवतीच्या १२० कि.मी. परिघाच्या प्रदेशातील १० लक्ष्यांचा एकाचवेळी शोध घेता येतो आणि त्यातील सर्वाधिक धोकादायक ४ लक्ष्यांवर एकाचवेळी हल्लाही चढवता येतो. कॉकपीटमधील बहुआयामी कलर डिस्प्ले अँड कंट्रोल सिस्टीमच्या मदतीने वैमानिकाला युद्धप्रसंगी हल्ल्यांचे नियोजन करणे सोपे जाते. वैमानिकाला हेल्मेट माऊंटेड साईटच्या मदतीने लक्ष्य निश्चित करून त्या दिशेने क्षेपणास्त्र डागून त्वरित शत्रुपासून दूर जाता येते. कारण त्यानंतर संबंधित क्षेपणास्त्र लक्ष्य स्वतःहून भेदते.
‘मिग-२९ के/केयूबी’ जरी रशियन विमान असले तरी त्याच्या विकासात भारतानेही काही प्रमाणात योगदान दिलेले आहे. यावरील वॉर्नंग सिस्टीम, रडार आणि मिशन संगणक आणि काही संवेदकही भारतीय बनावटीचे आहेत. त्याबरोबरच रशियन, फ्रेंच, इस्रायली यंत्रणाही यात बसविलेल्या आहेत. उंचावरून उडत असताना याचा वेग ताशी २४०० कि.मी./तास असतो. सी हॅरियरपेक्षा हा वेग दुपटीपेक्षा जास्त आहे. हिंदी महासागरावरील उष्ण, खाऱ्या आणि दमट हवामानाबरोबर शत्रुच्या रडारच्या नजरेपासून विमानाचे संरक्षण करण्यासाठी ‘मिग-२९ के/केयूबी’वर रासायनिक लेप लावण्यात आलेला आहे.
या विमानावर ९ शस्त्रास्त्रे ठेवण्याच्या जागा (हार्ड पॉईंट्स) आहेत. त्यातल्या एकावर (मध्य भागी असलेल्या) हार्ड पॉईंटवर अतिरिक्त इंधनटाकी (ड्रॉप टँक) बसवला जातो, तर अन्य हार्ड पॉईट्सवर माहिमेच्या स्वरुपानुसार आणखी ड्रॉप टँक आणि शस्त्रास्त्रे कमी-जास्त प्रमाणात बसवली जातात. हे हार्ड पॉईट्स आवश्यकतेनुसार १३ पर्यंत वाढवता येतात. काही वेळा एकाचवेळी चार ड्रॉप टँक बसवून टँकर विमानाप्रमाणेही याचा उपयोग करता येतो. सी हॅरियरसारखे हेलिकॉप्टरप्रमाणे हे विमान विमानवाहू जहाजावर उतरणार नाही, तर सामान्य विमानाप्रमाणेच ते उतरेल. पण विमानवाहू जहाजावरील जेमजेम २०० मी. लांबीच्या धावपट्टीवर या स्वनातीत विमानाला उतरणे शक्य व्हावे यासाठी त्याच्या मागे एक हूक बसविलेले आहे. विमानवाहू जहाजाच्या धावपट्टीवरील अरेस्टेड वायरमध्ये हे हूक अडकले की तात्काळ विमानाचा वेग शून्यावर येतो.
‘मिग-२९ केयूबी’ दोन आसनी विमान आहे. ‘मिग-२९ के’च्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची प्रमुख भूमिका हे विमान बजावत असले तरी ते प्रत्यक्ष युद्धासाठीही वापरता येते. हे इंटरसेप्टर विमान असल्याने युद्धाच्या काळात शत्रुच्या संदेशवहनात अडथळे आणण्यासाठी आणि जॅमर म्हणूनही हे विमान वापरता येते.
असे ‘मिग-२९ के’ आणि ‘मिग-२९ केयूबी’ सी हॅरियरपेक्षा अधिक सक्षम आहे. सी हॅरियर भारतीय नौदलात सामील झाले होते, त्या काळात अलिप्ततावाद हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य सूत्र होते. त्यामुळे इतर देशांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करण्याची भारताची भूमिका होती. परिणामी भारताच्या नौदलाचे कार्यक्षेत्रही भारताच्या सागरी सीमांच्या आतच होते. म्हणून सी हॅरियरच्या मदतीने भारताच्या सागरी प्रदेशांचे संरक्षण करणे शक्य होत होते. पण आर्थिक उदारीकरणानंतर भारताच्या राष्ट्रहितांचा विस्तार जगाच्या विविध क्षेत्रांमध्ये झाला आहे. त्यामुळे भारतीय नौदलालाही अधिक सक्षम, अत्याधुनिक लढाऊ विमानांची आवश्यकता भासत होती. ती गरज ‘मिग-२९ के’ पूर्ण करत आहे.
तरीही सी हॅरियरच्या योगदानाला कमी मानता येणार नाही. सी हॅरियरने देशाच्या सागरी सीमांच्या सुरक्षेत बजावलेल्या आजपर्यंतच्या कामगिरीला सलाम.
---०००---
चौरा. एफ़ १६ सुखोई ३० मिग २९
चौरा. एफ़ १६ सुखोई ३० मिग २९ ही सगळी मल्टि रोल फ़ायटर विमाने आहेत. ती ग्राउंड अटॅक आणि एअर डीफ़ेन्स साठी सुध्दा वापरता येतात. सुखोई चे एअर टु ग्राउंड रडार अतिशय कार्यक्षम आहे. तुम्हाला आठवत असेल तर आंध्र च्या मुख्य मंत्र्यांचे हेलिकॉप्टर जंगलात पडले होते तेव्हा रात्रीच्यावेळी पडलेले हेलिकॉप्टर शोधण्यासाठी सुखोईचा वापर केला होता.
एफ़ १६ वर हाय स्पीड अॅंटी रेडीएशन मिसाईल बसवता येते जे जमिनीवरील रडार ची इलेक्ट्रोमॅगनेटीक एनर्जी शोधुन त्या रडारचा नाश करते. हर्पून मिसाईल हे खास युद्धनौकांचा वेध घेण्यासाठी बनवलेले आहे. बाकी हवेतल्या हवेत माराकरणारी लांब आणि कमी पल्याची मिसाईल, लेसर गाईडेड बॉंब, जी पी एस गाईडेड बॉंब हे सगळे एकाच विमानावरुन वाहुन नेतायेतात व वापरता येतात.
कुठल्या रोल साठी विमान वापरायचे त्या प्रमाणे शस्त्र लावायची.
आता कोणताही देश अशी वेगवेगळी कामगिरी करणारी बाळगत नाहीत.
भारत सुद्धा
एफ-१६ च्या २८ देशांमध्ये
एफ-१६ च्या २८ देशांमध्ये वेगवेगळ्या, अनेक आवृत्त्या आहेत. त्यानुसार हे विमान कधी ४थ्या, कधी ४+, तर कधी ४++ पिढीत मोडते.
Pages