आज संध्याकाळी काम संपल्यावर चालता चालता लहर आली, म्हणून सहज काहीतरी चघळायला घ्यायला दुकानात घुसलो. शेंगदाणे, चॉकलेट असे काहीतरी घेणे माझ्याकडून बरेचदा होते. माझ्या नेहमीच्या स्टोरमध्ये गर्दीही फार नसते. आजही नव्हती. उगाच २-३ जण माझ्यासारखीच काहीतरी सटरफटर खरेदी करायला आले असावेत. काही विद्यार्थी, काही कामावरचे लोक ... पूर्वी एकांकिकेत काम करताना पार्श्वभूमीवर काही 'नेहमीची मंडळी' वातावरण निर्मिती करायला इकडून तिकडे जात असायची तसाच सगळा माहौल होता एकंदरीत.
काय ते पटकन घेऊन जरा उगाच इकडे-तिकडे करून काऊंटरपाशी आलो. माझ्यापुढे दोन जण होते, त्यांचे होईपर्यंत मन जरा रिलॅक्स झाले, आणि माझ्या लक्षात आले, की स्टोरमधल्या रेडियोवर 'अडेल'चे ' आय सेट फायर टू द रेन ' लागले आहे. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक असल्याने मनातल्या मनात ते गुणगुणू लागलो, आणि लक्षात आले, की माझ्या मागील एक मुलगी ते मोठ्यानेच म्हणायला लागली.
" बट देअर'ज अ साईड टू यू
दॅट आय नेव्हर न्यू, नेव्हर न्यू
ऑल द थिंग्ज यू वुड से
दे वेअर नेव्हर ट्रू, नेव्हर ट्रू ... "
मला त्याची जरा गंमत वाटली. बर्याच वेळा माझेही असे झालेले आहे, पण भिडस्तपणा बहुधा आड येतो. तीदेखील एवढे गुणगुणून जरा हळू आवाजात पुढे चालू झाली. तोवर माझा दुकानदारबाबूंपुढे उभे राहायचा क्रमांक आला, म्हणून पुढे सरकलो.
हे लक्षात येताच ती मुलगी एकदम मागे झाली, आणि तिच्या मागच्या माणसाला म्हणाली, "तुम्ही पुढे जा."
त्याला जरा आश्चर्य वाटले, आणि तो म्हणाला, "आर यू शुअर?" (हो, अशी माणुसकी मिळणे अशक्यप्रायच!)
"येस, येस. आय अॅम नॉट इन अ हरी."
काय झाले असावे, ते माझ्या लक्षात आले. तिला 'सेट फायर टू द रेन, वॉच्ड इट पोअर अॅज आय टच्ड युवर फेस' करून मगच पुढे जायचे होते! त्यापुढे रांगेतल्या एखाद्या क्रमांकाची काय मातब्बरी! जाता है तो जाने दो. मी तिच्याकडे बघून जरासा जाणत्या नजरेने हसलो. तिलाही ते कळले, आणि तीही प्रसन्न हसली. वास्तविक घरी बसून किंवा मोबाईलवर ती ते गाणे शंभर वेळा, नव्हे हजारो वेळा ऐकत असेल, पण त्या वेळेस तिला त्या क्षणाची किंमत जास्त होती. तीस सेकंद आधी बाहेर पडून पटपट पळण्यापेक्षा तिला ते गाणे गुणगुणत तिथे उभे राहण्यातली गंमत महत्वाची होती. ह्या जाणिवेने मला खूप मजा वाटली आणि तसेच हसू चेहर्यावर ठेवून बाहेर पडलो.
असे माझ्याही बाबतीत झाले आहे. एखाद्या 'स्पेशल' व्यक्तीला टेक्स्टींग करत असताना उगाच बाहेर का जा, म्हणून दुकानातच वेडपटासारखा बराच वेळ उभा राहिलो आहे. स्टेशनवर पक्ष्यांची चिवचिव बघत बसलो असताना घरी जायच्या एक-दोन गाड्या उगाच सोडल्या आहेत. सारख्या धावपळीच्या जगण्यात अशा काही चुकार क्षणांची गंमत मोलाची असते. तुमच्याही आयुष्यात असे अनुभव आले असतीलच. असे अनुभव शेअर करण्यासाठी हा धागा काढावासा वाटला.
या बक्षीसाचा अर्धा वांटा
या बक्षीसाचा अर्धा वांटा भास्कराचार्याना हक्कानेच जातो. भास्कराचार्यजी शाकाहारी असतील तर हापूसच्या पेट्या त्याना व मासळी मला.>>>>> त्यांच्या वाट्याची काळजी करु नका भाऊ. त्यांना नुकतच फोर्डं गाडी, पुण्याच्या आसपासची १-२ गावं, हापूसाच्या २० एक पेट्या वगैरे मिळाल्यात कुठल्यातरी निश्चयाच्या कार्यक्रमानिमित्त असं एकून आहे.
हापूस कुठे बुवा, वांगं ना ?
हापूस कुठे बुवा, वांगं ना ?
रेटिंग बदलायला नको बाफंचं
रेटिंग बदलायला नको बाफंचं म्हणून हापसावरच थांबलो मै.
वा बरेच चांगले प्रतिसाद आलेत
वा बरेच चांगले प्रतिसाद आलेत इथे. कित्येकांना अगदी अगदी होतेय. अर्थात आवड थोडीफार आपापली भिन्न ..
मस्तं लिहलंय ! क्षणमश्गुल हा
मस्तं लिहलंय ! क्षणमश्गुल हा शब्दही भारी.
जरा उशिरानेच प्रतिसाद देतोय,
जरा उशिरानेच प्रतिसाद देतोय, पण तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद वाचून खूप छान वाटलं. मला तर लेखापेक्षा सगळ्यांचे प्रतिसादच जास्त आवडले. लिंबूटिंबू, सई, कुलू, अतरंगी, वैद्यबुवा ह्यांचे प्रतिसाद विशेष उल्लेखनीय, बाकीच्यांनी म्हटल्याप्रमाणे. सगळ्यांनाच ह्या निमित्ताने एक पॉझ घेऊन आपापल्या आठवणी अनुभवता आल्या, मजा आली.
भाऊ तर गेलसारखे एकापाठोपाठ एक सिक्सरच मारतात. आधी 'क्षणमश्गुल'ने सगळ्यांनाच मश्गुल करून टाकलं. त्यानंतरचा अनुभव तर किती प्रत्ययकारी! असे अनुभव यायला मनाची संवेदनशीलता भूकंपमापकासारखी हवी. प्रत्येकाच्या अंतरंगात एक वीणा असते. ती संवेदना तिथपर्यंत पोहोचली, की त्या तारा चाळवल्या जातात. ही संवेदना आणि कधीकधी सहवेदना जपणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. ते बाहेर वाजणारे भौतिक गाणे आणि ती आत वाजणारी वीणा ह्यांचा खूप मोठा संबंध आहे, आणि त्यासाठी आजूबाजूला लागणारी माणसे हीसुद्धा मोठी बहारीची हवीत! त्यामुळे भाऊ, तुमची हापूसची ऑफर एकदम मान्य, पण त्या सगळ्या पेट्या एकत्र बसून गप्पा छाटत उडवायच्या, ह्या अटीसह!
बाकी फोर्ड गाडी आणि गावे मिळाली, तरी मायबोलीवर मिळालेल्या इनामाची गोडी काही अवीटच मी लिहीलं आणि त्याचं तुम्ही कौतुक केलं ह्याचा तर आनंद आहेच, पण त्यापेक्षा तुम्हीही तुमच्या आठवणी लिहील्या, ह्यामुळे मला फार आनंद झाला.
<< भाऊ तर गेलसारखे एकापाठोपाठ
<< भाऊ तर गेलसारखे एकापाठोपाठ एक सिक्सरच मारतात... >> भास्कराचार्यजी, माझं कुणीं भलतं कौतुक केलेलं माझ्या बायकोला अजिबात आवडत नाहीं; कारण, मीं लाजलों तर 'कोनफळी', 'वांयंगणी' याच्यामधला कुठला तरी भयानक असा माझा वर्ण होतो, असं तिचं म्हणणं आहे !
<< पण त्या सगळ्या पेट्या एकत्र बसून गप्पा छाटत उडवायच्या, ह्या अटीसह!>> मेधाजी, मासळीचं सोडा पण आतां हापूसच्या पेट्यांचं मात्र बघावंच लागणार तुम्हाला !!
<< बाकी फोर्ड गाडी आणि गावे मिळाली, तरी मायबोलीवर मिळालेल्या इनामाची गोडी काही अवीटच >> म्यां पामराला हें सारं जरा उस्कटून सांगेल का कुणी ?
मी प्रतिसाद आत्ताच वाचले.
मी प्रतिसाद आत्ताच वाचले. मागच्या पानावरचा भाऊंचा प्लॅटफॉर्मचा किस्सा लिहिलेला प्रतिसाद मस्त आहे.
मानव पृथ्वीकर यांनी म्हटल्याप्रमाणेही बर्याचदा केलं जातं. गाडीत रेडिओवर वगैरे आवडतं गाणं लागलं असल्यास कितीही उशीर होत असला तरी गाडीतून बाहेर पडवत नाही. अगदी ते गाणं आयपॉडवर असलं तरीही.
विशिष्ट सुवास (वा नुसते वास
विशिष्ट सुवास (वा नुसते वास किंवा दुर्गंधही) लहानपणीच्या स्मृति जागवितात असा अनुभव आहे.
आदर्शविद्यालयात जाताना एका पानपट्टीवर उदबत्ती लावलेली असायची, तोच वास परवा परत अनुभवल्यावर शाळेचे ते दिवस आठवले.
तर कधी नव्हे ते भाजी मार्केटपासच्या कचराकुंडीपासुन जाताना एक विशिष्ट वास आला, ज्यामुळे १९७० सालची नांदेडमधिल ओसाड रानातिल शेवाळलेली विहिर आठवली, तिथेही तोच तसाच वास यायचा.. त्या वासांना नाव नाही देता येत.
आजही, मोगर्याचा गजरेवाला , त्याच्या हातातील गजर्यांचा सुगंध, किंवा खारे/भाजके शेंगदाणे , ते भाजण्याकरता वर मडक्यात निखारे, गोवरी/लाकडाचा मिश्रवासांचा धूर, त्यातच शेंगदाण्यांचा भाजका वास, हे कुठेही अनुभवले तर हमखास सारसबागेचीच आठवण होतेच होते.
तसेच काहीसे स्पिरीटच्या वासाचे. इंजेक्शन देताना कापसाच्या बोळ्याने लावायचे ते, मला आजही तो वास फार आवडतो. अन मग तिस चाळीस वर्षांपूर्वीचे आमचे फॅमिली डॉक्टर आठवतात. त्यांचा दवाखाना आठवतो.
पण हे असे का होते?
तर याचे उत्तरच मुळी धाग्याच्या विषयात दडलेले आहे, की त्या त्या वयात, तेव्हा नव्या नवलाईने ते ते अनुभव घेत असताना भान विसरुन अनुभवले होते..... त्यामुळे ते चुकार क्षण वेळेस आजही निमित्त मिळाले की आठवणींच्या रुपाने जसेच्या तसे समोर उभे रहातात....
मन मात्र चूकार असते.... केरसुणीने केर्/झुरळ झटकुन टाकावे तसे आलेल्या त्या आठवणी झटकुन टाकुन वर्तमानात घुसायची घाई करते, अन वर्तमान तरी कसले? तर तेच्च ते हो... दोन वेळची पोटाची खळगी भरण्याकरता केलेली यातायात.... तोच भूतकाळ, तोच वर्तमान, अन तेच भविष्यही... अन त्यालाच"जगणे" समजायचे..
पण खरे जगलेलो मात्र कधीमधिच मनाच्या खोल बुडापासुन आठवणींच्या बुडबुड्याने आपले अस्तित्व दाखवित जागे करीत असते, की बाबारे तुझी यातायात, पैसा/प्रसिद्धीमागे धावत रहाणे म्हणजे जगणे नव्हे, तू खरा जगलास, तो या या वेळी....
सहसा हे तथ्य उतार वयातच जास्त प्रकर्षाने जाणवते, अन मन अधिकच कातर बनते...
तोच तो भाउमहाराज बोळ, बोळाच्या तोंडाशी उभे असलेले फुलवाले/गजरेवाले...
तोच तो फडके हौद, तिथुन जाताना येणारा उदबत्तीच्या कारखान्यांमधिल सुगंध...
तोच तो रामेश्वर चौक, तिथे असलेली भडबुंजांची चणे/फुटाण्याचि दुकाने... खरपुस भाजका वास...
परवाच माळ्यावरुन मातीचा माठा काढला, धुवायला घेतला, तर तोच तो चिरपरिचित सुगंध आला, पहिल्या पावसाने भिजलेल्या मातिचा सुगंध... आता हल्ली शहरात तो देखिल दुर्मिळच झालाय, माती ची जमिन शिल्लकच कुठे असते?
मला कळत नव्हतं मूळ लेखाची
मला कळत नव्हतं मूळ लेखाची तारीफ करण्याव्यतिरीक्त मी इकडे काही लिहू शकते का.
काहितरी सुचलंय पण ह्या लेखाची व्हेन पकडली आहे की नाही कल्पना नाही.
मी माझ्याकडची गाणी आयफोन वरून ऐकते मोस्टली रोजच्या कम्युट मध्ये आणि ऑल्मोस्ट ऑल द टाईम्स् फोन वरचा शफल मोड चालू असतो. फोनवर प्लेलिस्ट मध्ये मला आवडणारी गाणीच आहेत पण तरिही त्यात डावं उजवं आहेच; काही ऑल टाईम फेव्हरिट तर काही क्व्हचितच ऐकायला छान अशा रेन्ज मधली. तर बरेच वेळा शफल मोड असा सिक्वेन्स जनरेट करतं की एका मागोमाग एक फारशी न आवडणारी गाणीच लागतात. पण मग मध्येच कधीतरी मात्र एकामागोमाग एक ऑल टाईम फेव्हरिट गाणीच लागायला सुरूवात होते. तेव्हा त्या शफल ला कुठे ठेवू आणि कुठे नको एव्हढा आनंद होतो. मग वाटतं की आता ह्या टेक कंपन्यांनीं इन्टेलिजन्ट शफल शोधून काढावा कसातरी. म्हणजे माझा मूड ओळखून बरोबर त्या मूड ला साजेशी गाणी आपोआप लावावीत. कदाचित ह्यावर बरीच प्रगती झाली असेल ऑल्रेडी
लिंबुटींबूजी, अगदीं
लिंबुटींबूजी, अगदीं खरंय.
एखादी साधी घरगुती चव, एखादा नेहमीचा वास, एखादी कधींतरी कानावर पडलेली गाण्याची ओळ... पण केवढी ताकद असते त्यांत; तुम्हाला भावलेला एखादा छोटासा कां होईना कालखंड तुमच्या स्मृतिपटलावरून नेमका उचलून अगदीं त्यावेळच्या थरारासहीत पुनःप्रत्ययासाठी खाडकन तुमच्यासमोर साकार करण्याची !!!
भाऊ, पुलंच्या अंतू
भाऊ, पुलंच्या अंतू बर्व्यामध्ये 'मागा सासर्याकडे फोर्ड गाडी!' आहे, त्याचा संदर्भ आहे तो.
सायो, माझेही तसे होते. मी तर ट्रेनच्या लास्ट स्टॉपला डब्यातच बसून गाणे संपले की उठतो. एकदा ओरडासुद्धा खाल्लाय.
लिंबूटिंबू, मस्त लिहीताय. तुमच्याकडे तर अशा आठवणींचा खजिना असेल. येऊ द्या अजून. मलाही भाड्याच्या सायकलच्या दुकानातल्या रबराच्या वासाची आठवण आली ह्यानिमित्ताने.
सशल, अगदी अगदी. गूगल प्ले म्युझिकला खूप जमतं हे आता. खूप आवडीची गाणी एकामागोमाग एक रेडियोवर येतात, आणि तुमच्या लाईक करण्याने त्याला फीडबॅक मिळतो.
आता हा धागा वरचेवर उघडून
आता हा धागा वरचेवर उघडून डोकावत रहायला हवं. तेवढ्या तेवढ्यापुरतं तरी हमखास क्षणमश्गुल होता येईल
स्ट्रेसबस्टर क्षण, आपले आणि इतरांचेही. धागा हजारी मनसबदार होऊ देत
भाऊ _/\_ सध्या घरात बिरबलाची डोळस कोण गोष्ट जिकडेतिकडे अॅप्लाय करणं चालू आहे, तुमचा प्लॅटफॉर्मचा किस्सा ताबडतोब सांगितला पाहिजे आता लेकाला. जगण्यासाठी हाच डोळसपणा हवा की, नाहीतर उरतं ते एलटी म्हणतात तसं फक्त पोट भरणंच!
भास्कराचार्य, भूकंपमापक, वीणेसाठी आणि मुख्य म्हणजे धाग्यासाठीही तुम्हालासुद्धा _/\_
मस्त धागा. या पानावरच्या
मस्त धागा. या पानावरच्या प्रतिक्रिया वाचल्या. आधीच्या आता वाचतो.
रात्री मुलं खेळता खेळता झोपेला येऊन अगदीच झोप अनावर झाल्यावर जागा मिळेल तिथे झोपून जातात. आपले आवरल्यावर त्यांच्या जागेवर व्यवस्थित झोपवण्यासाठी त्यांना उचलून घेतल्यावर नकळत झोपेतच ती हळूच छातीशी बिलगतात. त्या क्षणी आणखी थोडे क्षण तसेच काढावेत असे वाटते.
सई, गजानन, थँक्स. गजानन,
सई, गजानन, थँक्स. गजानन, खूपच सुंदर लिहीलेत.
खूप आपलसं वाटलेलं लिखाण
खूप आपलसं वाटलेलं लिखाण असे क्षण नेहमीच येत असतात आयुष्यात … पुढ खूप काही बोलावसं वाटतंय पण सध्या तरी ते म्युट करुन टाकतेय .…
खूप आपलसं वाटलेलं लिखाण
खूप आपलसं वाटलेलं लिखाण असे क्षण नेहमीच येत असतात आयुष्यात … पुढ खूप काही बोलावसं वाटतंय पण सध्या तरी ते म्युट करुन टाकतेय .…
अगदी गजानन
अगदी गजानन
भास्कराचार्य, व्वा! खूप छान
भास्कराचार्य, व्वा! खूप छान लिहलंय. आणि भाऊ किती मस्त "क्षणमश्गुल" शब्द वापरलात तुम्ही !!
अताशा एक नवीन चाळा लागलाय. वाचताना एखाद्या भाषेतला नवीन शब्द कळला की लगेच हातातलं काम बाजूला ठेवून त्या शब्दाबद्दल अधिक माहिती मिळवायची. गुगलमुळे ते खूप सोपंही झालंय. जसं गाणं संपेपर्यंत बाकी सगळं बाजूला ठेवायचं तसं तो शब्द मनात भिडेपर्यंत त्याचा शोध घ्यायचा. त्या शब्दामधेच "क्षणमश्गुल" व्हायचं ! त्या एका शब्दाचंच गाणं होतं कधी कधी आणि आपल्या मनात दिवसभर रुंजी घालत राहतं.
सुरवात झाली ती "Dolce far niente" ही इटालियन शब्दसंपत्ती सापडून श्रीमंत झालो तेंव्हा.
http://bemorewithless.com/how-to-cultivate-dolce-far-niente/
https://www.google.com/webhp?hl=en#hl=en&q=dolce+far+niente
लेख आणि सर्व प्रतिक्रिया मस्त
लेख आणि सर्व प्रतिक्रिया मस्त मस्त मस्त!!
असे अनुभव आले आहेत. १०-१२ वर्षांपुर्वी मुंबईत पश्चिम द्रुतगती मार्गावरुन जाताना मालाड पुष्पा पार्क जवळ एकत्र ५-६ अमलताश/बहावा ची झाडे होती. एप्रिल मधे सगळी पिवळ्या मोत्यांनी लगडुन जायची. पश्चिम द्रुतगती मार्ग नेहेमीच वर्दळीचा असतो. बोरिवली ते गोरेगाव जाणे म्हणजे एक तासाची निश्चिती!! पण माझे मन निवांत असायचे. थोड्याच वेळात आपण मालाडला पोहोचू आणि पिवळे मोती डोळेभरुन पाहु!! सकाळच्या कोवळ्या उन्हात धम्मक पिवळा बहावा अगदी स्वर्गसुख होता.
रस्त्याने जाताना जर वाहन चालवत नसले तर माझे झाडांचे निरीक्षण चालू असते. नेहेमीच्या प्रवासातले ठराविक ऋतूतले ठराविक टप्पे डोक्यात बसले आहेत. पुढल्या टप्प्याच्या प्रतिक्षेत मस्त वेळ जातो. टप्पा आला की नजर आपोआप झाड किवा फुले शोधते आणि टप्पा गेल्यावर नजर वळवून वळवून शेवटचे दर्शन (आजच्या दिवसापुरते) घेते. मग पुढल्या टप्प्याची वाट बघणे.
लेख सुंदर आणि प्रतिक्रियाही
लेख सुंदर आणि प्रतिक्रियाही छान असा दुग्धशर्करा योग इथे जुळून आलेला दिसतोय (जे माबोवर क्वचितच होतं..)...मस्तच!!!
Pages