आज संध्याकाळी काम संपल्यावर चालता चालता लहर आली, म्हणून सहज काहीतरी चघळायला घ्यायला दुकानात घुसलो. शेंगदाणे, चॉकलेट असे काहीतरी घेणे माझ्याकडून बरेचदा होते. माझ्या नेहमीच्या स्टोरमध्ये गर्दीही फार नसते. आजही नव्हती. उगाच २-३ जण माझ्यासारखीच काहीतरी सटरफटर खरेदी करायला आले असावेत. काही विद्यार्थी, काही कामावरचे लोक ... पूर्वी एकांकिकेत काम करताना पार्श्वभूमीवर काही 'नेहमीची मंडळी' वातावरण निर्मिती करायला इकडून तिकडे जात असायची तसाच सगळा माहौल होता एकंदरीत.
काय ते पटकन घेऊन जरा उगाच इकडे-तिकडे करून काऊंटरपाशी आलो. माझ्यापुढे दोन जण होते, त्यांचे होईपर्यंत मन जरा रिलॅक्स झाले, आणि माझ्या लक्षात आले, की स्टोरमधल्या रेडियोवर 'अडेल'चे ' आय सेट फायर टू द रेन ' लागले आहे. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक असल्याने मनातल्या मनात ते गुणगुणू लागलो, आणि लक्षात आले, की माझ्या मागील एक मुलगी ते मोठ्यानेच म्हणायला लागली.
" बट देअर'ज अ साईड टू यू
दॅट आय नेव्हर न्यू, नेव्हर न्यू
ऑल द थिंग्ज यू वुड से
दे वेअर नेव्हर ट्रू, नेव्हर ट्रू ... "
मला त्याची जरा गंमत वाटली. बर्याच वेळा माझेही असे झालेले आहे, पण भिडस्तपणा बहुधा आड येतो. तीदेखील एवढे गुणगुणून जरा हळू आवाजात पुढे चालू झाली. तोवर माझा दुकानदारबाबूंपुढे उभे राहायचा क्रमांक आला, म्हणून पुढे सरकलो.
हे लक्षात येताच ती मुलगी एकदम मागे झाली, आणि तिच्या मागच्या माणसाला म्हणाली, "तुम्ही पुढे जा."
त्याला जरा आश्चर्य वाटले, आणि तो म्हणाला, "आर यू शुअर?" (हो, अशी माणुसकी मिळणे अशक्यप्रायच!)
"येस, येस. आय अॅम नॉट इन अ हरी."
काय झाले असावे, ते माझ्या लक्षात आले. तिला 'सेट फायर टू द रेन, वॉच्ड इट पोअर अॅज आय टच्ड युवर फेस' करून मगच पुढे जायचे होते! त्यापुढे रांगेतल्या एखाद्या क्रमांकाची काय मातब्बरी! जाता है तो जाने दो. मी तिच्याकडे बघून जरासा जाणत्या नजरेने हसलो. तिलाही ते कळले, आणि तीही प्रसन्न हसली. वास्तविक घरी बसून किंवा मोबाईलवर ती ते गाणे शंभर वेळा, नव्हे हजारो वेळा ऐकत असेल, पण त्या वेळेस तिला त्या क्षणाची किंमत जास्त होती. तीस सेकंद आधी बाहेर पडून पटपट पळण्यापेक्षा तिला ते गाणे गुणगुणत तिथे उभे राहण्यातली गंमत महत्वाची होती. ह्या जाणिवेने मला खूप मजा वाटली आणि तसेच हसू चेहर्यावर ठेवून बाहेर पडलो.
असे माझ्याही बाबतीत झाले आहे. एखाद्या 'स्पेशल' व्यक्तीला टेक्स्टींग करत असताना उगाच बाहेर का जा, म्हणून दुकानातच वेडपटासारखा बराच वेळ उभा राहिलो आहे. स्टेशनवर पक्ष्यांची चिवचिव बघत बसलो असताना घरी जायच्या एक-दोन गाड्या उगाच सोडल्या आहेत. सारख्या धावपळीच्या जगण्यात अशा काही चुकार क्षणांची गंमत मोलाची असते. तुमच्याही आयुष्यात असे अनुभव आले असतीलच. असे अनुभव शेअर करण्यासाठी हा धागा काढावासा वाटला.
मस्त लिहीले आहे! जबरी आवडले.
मस्त लिहीले आहे! जबरी आवडले. मीही अनेकदा केले असेल हे
पूर्वी एकांकिकेत काम करताना पार्श्वभूमीवर काही 'नेहमीची मंडळी' वातावरण निर्मिती करायला इकडून तिकडे जात असायची तसाच सगळा माहौल होता एकंदरीत. >>> हे ही जबरी.
मस्त गाणं आहे. मलाही आवडतं
मस्त गाणं आहे. मलाही आवडतं ऐकायला.
मस्त ललित.
छानच ! भावलं हें लिखाण
छानच ! भावलं हें लिखाण !
स्वतःची स्वतःशीं अचानक लय जुळली कीं असं क्षणमश्गुल होतां येत असावं. एखादं गाणं, एखादं दृश्य, एखादं गोड हसणं.... निमित्त कांहींही असूं शकतं !
मस्त लिहिलंय. असे छोटे क्षण
मस्त लिहिलंय. असे छोटे क्षण फार महत्त्वाचे असतात.
क्षणमश्गुल फार छान शब्द
क्षणमश्गुल फार छान शब्द वापरलात भाऊ! मानलं! किती सुंदर असते ती लय. थँक्स ह्या शब्दाबद्दल विशेषकरून.
फा, सायो, नंदिनी, धन्स.
मला हे गाणं इतकं जास्त आवडते
मला हे गाणं इतकं जास्त आवडते की मला ह्यावर कोणी लेख लिहिलाय ह्या कल्पनेनेच छान वाटले!
मी ही नसते गेले काउंटरवर. वॉच्ड इट पोअर अॅज आय टच्ड युअर फेस.. किंवा ' माय हँड्स वेअर स्ट्रॉंग बट माय नीज वेअर फार टू वीक' किंवा 'लेट इट बर्न' सत्रांदा म्हणायचा सोडून हाय हाउव्वार्यु.. कोण म्हणायला जाईल?
मस्त! मस्त! हे तर मी
मस्त! मस्त!
हे तर मी क्षणाक्षणाला करतो. जो क्षण जास्त आनंद देणारा असतो तो आधी जगून घेतो.
हे यात मोडेल की नाही माहीत नाही, पण ट्रेनमध्ये एखादी चांगली मुलगी दिसली, आवडली, पुन्हा दिसेल की नाही कल्पना नाही, पण आज दिसलीय तर किमान समाधान होईस्तोवर बघावे म्हणून कसलीही अपेक्षा न ठेवता, आपले स्टेशन आले तरी न उतरता, दोनचार स्टेशन पुढे जाऊन मागे येणे असे कोणी केले आहे का?
मस्तं लेख. खूप लिहावसं
मस्तं लेख. खूप लिहावसं वाटतय..
भाऊंच्या त्या 'क्षणमश्गुल'च्या हिंदोळ्यावरून उतरले की...
छान.
छान.
मस्त लिहलयं
मस्त लिहलयं
क्षणमश्गुल<<< अहाहा! काय
क्षणमश्गुल<<< अहाहा! काय परफेक्ट शब्द शोधलाय. आमच्यासारख्यांचं परफेक्ट वर्णन.
परफेक्ट लिहिलय... शेवटचा
परफेक्ट लिहिलय...
शेवटचा परिच्छेद मस्त, फक्त ते टेक्स्टिंग म्हणजे काय ते कळले नाही...
पण असे खरेच वागायचे, तर "मन कणखररित्या लिंबुटिंबुच" असावे लागते, बिस्किट असावे लागते.... व्यवहारि जगातल्या चिंता/विवंचना/सक्त्या/जबाबदार्या वगैरे पासुनही अलिप्त... आला क्षण जीवंतपणे अनुभवणारे मन...
आजच सकाळी नातिला कडेवर घेऊन कपाने दुध पाजीत होतो अंगणात बसुन, तेव्हड्यात झप्पकिनी एक कावळा आला अन समोरच्या कठड्यावर बसुन काव काव करु लागला... झाले, नातीचे सर्व लक्ष त्या कावळ्याकडे, कावळा बघितल्यावर ती बोळक्या दोनच दात आलेल्या तोंडाने छानसे ओळखीचे हसली... का कावळ्याला ओळख दाखवली ?... कावळाही मान तिरकी कर करुन इकडे तिकडे अन आमच्याकडे बघत राहिला.... मला घाई दुध पाजुन ऑफिसला निघायची..... ती मात्र मजेत, आला कावळा नीट पाहुन अनुभवुन घेणे तिच्याकरता महत्वाचे, त्यापुढे दुध पिणे दुय्यम.... मग मी देखिल क्षणभराकरता तिच्याच वयाचा /अनुभुतीचा होऊ पाहिले, अन काय सांगू? एका क्षणात मला तो काळा कावळा जीवाभावाचा सखा भासु लागला.... माझ्या परिसराचा एक घटक, म्हणजे माझ्याच परिवारातिल घटक... तो परका काळा कुट्ट/टाकाऊ/दुर्लक्षित करावा/अनुल्लेख करावा /त्याला हाकलुन द्यावे असे वाटणे बंद झाले... कारण एकच, मी नातीच्या नजरेने, तिच्या बुद्धिने तो कावळा बघु पाहिला, तो क्षण जगुन पाहिला.....
[आता काहि अतिबुद्धिमान/विद्वान/उच्चशिक्षित व्यवहारी लोकांच्या दृष्टीने असे जगणे म्हणजे वेळ वाया घालविणे असेल, अनप्रॉडक्टिव्हही असेल, वा "बिनडोकपणा' असेलच असेल .... पण असोच... माझी सकाळ मस्त नातीच्या साथीने कावळ्याच्या साक्षीने रंगली]
मुंग्यांची रांग शेवटची नीट
मुंग्यांची रांग शेवटची नीट निरखुन कधी पाहिली ते आता आठवतही नाहि....
त्या फुलावरुन त्या फुलावर भिरभिरत फिरणारे फुलपाखरु नजरेत पकडायचा प्रयत्न शेवटचा कधी केला, आठवतही नाही. त्यानंतर आयुष्यात अगणित फुलपाखरे येऊन गेली असतिल.... दोन पंखांची वा दोन पायांची, पण कधी लक्षच दिले नाही....
असे असंख्य क्षण/प्रसंग...... पैसा अन व्यावहारिक बुद्धिवादाच्या नादात अनुभवणे गमावले हेच खरे.
खुपच छान वाटलं वाचून. खरंच
खुपच छान वाटलं वाचून. खरंच फार प्रसन्न असतात हे क्षणभंगूर क्षण!
भाऊ, क्षणमश्गुल भारीच, अगदी नेमका शब्द आहे!
एकदा भुरभूर पावसात सिग्नलला उभी असताना पुढच्या गाडीवर मागे बसलेल्या ललनेच्या लांबसडक मोकळ्या लहरणा-या केसांवर दिसणारे 'मोत्ये' बघत माझं वळण आलं तरी न वळता आणखी दोन तीन सिग्नल्स पुढे जाऊन नाइलाजानं वळलेय. तेवढं एक-दोन किमी अंतर शब्दशः पाठलाग केला तिचा!
पुढचा अख्खा दिवस मन तळ्यात डुंबत रहातं मग. असे कितीतरी क्षण आठवले तुमच्यामुळे.
खूप आवडलं. क्षणमश्गुल हा
खूप आवडलं. क्षणमश्गुल हा शब्दही फार आवडला. सारखं 'क्षणभंगूर' वापरून वापरून जी नकारात्मकता येते ती क्षणमश्गुल ने बॅलन्स झाली.
क्षण साधायला जमले तर जग जिंकल्यासारखे वाटते.अशा अनेक आठवणी आहेत.पण तूर्तास त्या लिहीण्यात वेळ न दवडता त्या आठवणीत रमण्यातच क्षणमश्गुल व्हायचे आहे.
सारखं 'क्षणभंगूर' वापरून
सारखं 'क्षणभंगूर' वापरून वापरून जी नकारात्मकता येते ती क्षणमश्गुल ने बॅलन्स झाली>>>> +१
बरेच क्षण आठवले,,सध्या त्या क्षणाच्या आठवणीत क्षणमश्गुल
भारी लिहिलंय! अशी तंद्री रोज
भारी लिहिलंय! अशी तंद्री रोज लागत असते. सध्या कित्येक वर्षांनंतर कोकीळ कुठे दडून बसला आहे हे शोधण्याचा उद्योग सुरू असतो बरेचदा (लहान असताना त्याला शीळ घालून उकसवायची इच्छा मात्र अजून पूर्ण केली नाहीए!)
झक्कास, फारच आवडलं हे
झक्कास, फारच आवडलं हे लेखन.
{क्षणमश्गुल} ढापणार हा शब्द मी आता. बायको तंद्री म्हणते तिला आता सांगतो की मी क्षणमश्गुल असतो
मस्तच! अडेल चं हे गाणं खरंच
मस्तच! अडेल चं हे गाणं खरंच स्पेशल आहे.
भाऊंचा "क्षणमश्गुल" शब्दही खूपच भावला.
Chhan lihilay saglyani ch.
Chhan lihilay saglyani ch. Devnagari keyboard milala ki lihite.
ध्यानीमनी नसताना असे अचानकच
ध्यानीमनी नसताना असे अचानकच काहीतरी अनपेक्षित आणि म्हणून तितकेच सुंदर जणू वाचायला मिळाले म्हणजे दिवसाची तार मधुरतेने छेडली जाते....अगदी तसेच. मन वेडावून जाणे म्हणजे काय ? असे कुणी विचारले तर असल्या अनुभवाची शिदोरी अशा सहजशब्दात समोर आली म्हणजे मनी जे तरंग उमटतात त्यालाच बहुधा वेडावणे म्हणत असावे.
"....आय टच्ड युवर फेस..." ~ जस्ट फन्टॅस्टिक !
भाचा, छान लिहिलंय. भाऊंचा
भाचा, छान लिहिलंय.
भाऊंचा 'क्षणमश्गुल' शब्द एकदम भारी आहे!
भाऊ, या शब्दासाठी तुम्हाला
भाऊ, या शब्दासाठी तुम्हाला दहा गावे इनाम!
लिंबूजी, तुमची पोस्टही फार आवडली! (तुम्ही आता कावळा,पूर्वज वगैरे लाईन पकडता काय अशी धास्ती वाटत होती!)
मस्तच ! आवडलं लिखाण भाऊंचा
मस्तच ! आवडलं लिखाण
भाऊंचा 'क्षणमश्गुल' शब्द एकदम भारी आहे!
लिंबूजी, तुमची पोस्टही फार आवडली! (तुम्ही आता कावळा,पूर्वज वगैरे लाईन पकडता काय अशी धास्ती वाटत होती!) >>> +१
व्वाह!! सुंदर अनुभव
व्वाह!! सुंदर अनुभव
सगळ्यांचेच प्रतिसादसुद्धा मस्त...
मस्त लिहिलंय. ते गाणं शोधून
मस्त लिहिलंय.
ते गाणं शोधून ऐकेन, नक्की!
छान लिहिलंय. अनेकदा कार मध्ये
छान लिहिलंय.
अनेकदा कार मध्ये असे आवडीचे गाणे लागते, आणि संपायच्या आत घरी / ऑफिसमध्ये पोचतो. जरी पेन ड्राइव्हवर असले तरी, बरेच वेळा, पार्क करुन गाणे संपे पर्यंत ऐकत बसतो किंवा पुढे जाऊन चक्कर मारुन येतो.
वाचतानाही असंच होतं. विमानात / गाडीत असताना, आपले स्थान आले की अगदी जीवावर येते, पुस्तक बंद करायला, पण नाइलाज असतो. लोकल ट्रेन मध्ये असतो तर, न उतरता शेवट पर्यंत जाउन उलट आलो असतो.
भाउंचा क्षणमश्गुल शब्द, मस्त भावला!
खुप आवडला हा लेख! बर्याचदा
खुप आवडला हा लेख! बर्याचदा असं होतं! रुपालीत बसलेलो असताना मागच्या टेबलवर चित्र समजाऊन द्यायचं चाल्लेलं होतं. ते ऐकता यावं म्हणुन आमची आख्खि गँग नुसत्या कॉफी वर कॉफी मागवत तिथे थांबलेली होती! पावसात भिजता यावं म्हणुन मुद्दाम बस चुकवणे, एखाद्या रागाचं रेकॉर्ड ऐकताना ते पुर्ण व्हायच्या आधीच आपला स्टॉप आला तरी ते पुर्ण व्हावं म्हणुन मुद्दम पुढच्या स्टॉप ला उतरणे!
आणि हाईट म्हणजे, imaginary number चं एक गणित सुटेपर्यंत मी आणि मित्राने लिफ्ट मधुन ६ वेळा वर खाली चकरा मारल्या!
मुंग्यांची रांग शेवटची नीट निरखुन कधी पाहिली ते आता आठवतही नाहि.>>> खरंय!
भाऊंचा "क्षणमश्गुल" शब्दही खूपच भावला.>>>> +१००००
आज सकाळी कामावर येताना FM वर
आज सकाळी कामावर येताना FM वर "छु कर मेरे मनको' लागले आणि मी पार्किंगच्या जागी पोचलो. मग काय गाण संपेपर्यंत कार मधे बसलो
आगाऊ, हर्पेन, धन्यवाद. (अहो
आगाऊ, हर्पेन, धन्यवाद. (अहो कावळा/पूर्वज वगैरे लाइन पकडली असती तर "विषयांतर" झाले असते जे मि कधीच करीत नाही )
विषय मात्र भारी आहे धाग्याचा...
Pages