सेट फायर टू द रेन - क्षणाक्षणाची गंमत!

Submitted by भास्कराचार्य on 5 April, 2016 - 21:25

आज संध्याकाळी काम संपल्यावर चालता चालता लहर आली, म्हणून सहज काहीतरी चघळायला घ्यायला दुकानात घुसलो. शेंगदाणे, चॉकलेट असे काहीतरी घेणे माझ्याकडून बरेचदा होते. माझ्या नेहमीच्या स्टोरमध्ये गर्दीही फार नसते. आजही नव्हती. उगाच २-३ जण माझ्यासारखीच काहीतरी सटरफटर खरेदी करायला आले असावेत. काही विद्यार्थी, काही कामावरचे लोक ... पूर्वी एकांकिकेत काम करताना पार्श्वभूमीवर काही 'नेहमीची मंडळी' वातावरण निर्मिती करायला इकडून तिकडे जात असायची तसाच सगळा माहौल होता एकंदरीत.

काय ते पटकन घेऊन जरा उगाच इकडे-तिकडे करून काऊंटरपाशी आलो. माझ्यापुढे दोन जण होते, त्यांचे होईपर्यंत मन जरा रिलॅक्स झाले, आणि माझ्या लक्षात आले, की स्टोरमधल्या रेडियोवर 'अडेल'चे ' आय सेट फायर टू द रेन ' लागले आहे. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक असल्याने मनातल्या मनात ते गुणगुणू लागलो, आणि लक्षात आले, की माझ्या मागील एक मुलगी ते मोठ्यानेच म्हणायला लागली.

" बट देअर'ज अ साईड टू यू
दॅट आय नेव्हर न्यू, नेव्हर न्यू
ऑल द थिंग्ज यू वुड से
दे वेअर नेव्हर ट्रू, नेव्हर ट्रू ... "

मला त्याची जरा गंमत वाटली. बर्‍याच वेळा माझेही असे झालेले आहे, पण भिडस्तपणा बहुधा आड येतो. तीदेखील एवढे गुणगुणून जरा हळू आवाजात पुढे चालू झाली. तोवर माझा दुकानदारबाबूंपुढे उभे राहायचा क्रमांक आला, म्हणून पुढे सरकलो.

हे लक्षात येताच ती मुलगी एकदम मागे झाली, आणि तिच्या मागच्या माणसाला म्हणाली, "तुम्ही पुढे जा."

त्याला जरा आश्चर्य वाटले, आणि तो म्हणाला, "आर यू शुअर?" (हो, अशी माणुसकी मिळणे अशक्यप्रायच!)

"येस, येस. आय अ‍ॅम नॉट इन अ हरी."

काय झाले असावे, ते माझ्या लक्षात आले. तिला 'सेट फायर टू द रेन, वॉच्ड इट पोअर अ‍ॅज आय टच्ड युवर फेस' करून मगच पुढे जायचे होते! त्यापुढे रांगेतल्या एखाद्या क्रमांकाची काय मातब्बरी! जाता है तो जाने दो. मी तिच्याकडे बघून जरासा जाणत्या नजरेने हसलो. तिलाही ते कळले, आणि तीही प्रसन्न हसली. वास्तविक घरी बसून किंवा मोबाईलवर ती ते गाणे शंभर वेळा, नव्हे हजारो वेळा ऐकत असेल, पण त्या वेळेस तिला त्या क्षणाची किंमत जास्त होती. तीस सेकंद आधी बाहेर पडून पटपट पळण्यापेक्षा तिला ते गाणे गुणगुणत तिथे उभे राहण्यातली गंमत महत्वाची होती. ह्या जाणिवेने मला खूप मजा वाटली आणि तसेच हसू चेहर्‍यावर ठेवून बाहेर पडलो.

असे माझ्याही बाबतीत झाले आहे. एखाद्या 'स्पेशल' व्यक्तीला टेक्स्टींग करत असताना उगाच बाहेर का जा, म्हणून दुकानातच वेडपटासारखा बराच वेळ उभा राहिलो आहे. स्टेशनवर पक्ष्यांची चिवचिव बघत बसलो असताना घरी जायच्या एक-दोन गाड्या उगाच सोडल्या आहेत. सारख्या धावपळीच्या जगण्यात अशा काही चुकार क्षणांची गंमत मोलाची असते. तुमच्याही आयुष्यात असे अनुभव आले असतीलच. असे अनुभव शेअर करण्यासाठी हा धागा काढावासा वाटला. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> हाईट म्हणजे, imaginary number चं एक गणित सुटेपर्यंत मी आणि मित्राने लिफ्ट मधुन ६ वेळा वर खाली चकरा मारल्या! <<<< खरेच... फारच हाईट हं ही...

अनेकदा कार मध्ये असे आवडीचे गाणे लागते, आणि संपायच्या आत घरी / ऑफिसमध्ये पोचतो. जरी पेन ड्राइव्हवर असले तरी, बरेच वेळा, पार्क करुन गाणे संपे पर्यंत ऐकत बसतो किंवा पुढे जाऊन चक्कर मारुन येतो.>>>>>>+१

आवडीचं गाणं, गझल चालू असेल तर संपेपर्यंत गाडीतून उतरायला खरेच नको वाटतं.
मी चक्कर मारायला जात नाही, कशाला उगाच पेट्रोल वाया घालावा आणि प्रदूषण करा Happy

माझं कित्येकदा मायबोलीवरचं लिखाण वाचताना पण असं होतं. एखादं सुंदर ललित, लिखाण वाचलं कि त्याचा फिल बराच वेळ राहतो. थोडा वेळ तसाच बसून मी ते पूर्ण आतपर्यंत उतरू देतो.
संघमित्रा, विद्या भूतकर, जव्हेरगंज यांचे काही काही ललित बराच वेळ मनात रेंगाळत राहतात. ये कुछ आधे अधुरे पन्ने पण अशीच आत्ता लगेच आठवलेली मस्त लेखमाला.

भास्कराचार्य छान लिहिलेत. आवडले. लिहित रहा.

'महालक्ष्मी' रेल्वे स्टेशन. संध्याकाळीं ऑफिसं सुटायची वेळ. चाकमान्यांची तुफान गर्दी, मला तर अजिबात न पेलवणारी. म्हणून माझ्या 'वांद्रे गाडी'ची वाट पहात मीं गर्दी न्याहाळत बसलेला. बाजूलाच एक भिकारीण एक बोचकं व तरतरीतसं चार-पांच वर्षाचं पोर कवटाळून निर्विकारपणे बसलेली. मधेच झटका आल्यासारखा तिनं बोचकं उघडलं, आंतून एक जुनाट डबा काढून पोराच्या हातांत खुपसला व काही तरी खेंकसली. आपल्यावर आईन जबाबदारीचं काम सोपवलं या आनंदात तें पोरगं बाजूच्या स्टॉलकडे झेपावलं व तिथल्या नळाचं पाणी डब्यात घेवून परतलं. तितक्यांत, प्लॅटफॉर्मवर गाडीची चाहूल लागल्याने मागे सरकलेल्या गर्दीतल्या कुणाचा तरी पाय लागून नेमकं तें पोर डब्यासकट आईच्या अंगावर कोसळलं. काय होतंय कळायच्या आंत त्या भिकारणीनं पोराच्या थोबाडीत सणकावली व पाठीवर रपाटे ओढले. सगळ्या गर्दीने मागें वळून पाहिलं, त्यांत २५-२६ वर्षांचा फर्स्ट क्लासच्या डब्यासमोर उभा असलेला एक एक्झिक्युटिव्हही होता. तें पोर केविलवाणं झालं होतं पण किंचाळलं मात्र नव्हतं. इतक्यांत गाडी आलीच व गर्दी तात्पुरती ओसरली व सगळं 'ऑलवेल'ही झालं. पण तो तरुण मात्र गाडीत चढतां चढतां अचानक थांबला होता. गाडी गेल्यावर तो फलाटावरच्या स्टॉलकडे जाताना दिसला. पुढची गाडी स्टेशनात शिरतां शिरतां तो तरूण एक्झिक्यूटीव्ह लगबगीने आला , कांहींही न बोलतां त्या भिकारणीसमोर त्याने पाण्याची एक लिटरची बाटली व बिस्कीटांचा एक पुडा ठेवला व धांवत जावून गाडी पकडली !

कृतज्ञतेने त्या भिकारणीने एव्हाना प्लॅटफॉर्मच्या बाहेर गेलेल्या गाडीकडे फक्त एक निर्विकार कटाक्ष टाकला. आईकडे व समोरच्या बिस्कीटांच्या पुड्याकडे भेदरलेल्या नजरेने बघत असलेल्या त्या पोराला मग त्या माऊलीने आवेगाने कवटाळले, त्याच्या गालाचे मुके घेतले, त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवला आणि ती ढसाढसा रडायला लागली ! माझी 'वांद्रे गाडी' आली तेंव्हां तें ४-५ वर्षाचं पोर आईनं पुड्यातलं दिलेलं बिस्कीट न खातां त्या आईची समजूत काढत होतं !!!

दिव्यत्वाची प्रचिती देणारे असेही क्षण आयुष्याचा खरा अर्थ समजावून जातात.

भास्कराचार्य, धन्यवाद अचूक क्षण पकडलेत. भाऊ काय लिहायचे आम्ही आता? नन्दिनीचे उद्गार बरेच काही सान्गुन गेले आणी आतुन हेलावुन गेल्यासारखे वाटले.

मस्त लेख भा! असा अनुभव बर्याचदा येतो खरा, पण तुला ते छान शब्दात पकडता आलं.
लिंबूची आणि भाऊंची वरची पोस्ट पण आवडली.
विषयांतर - आगाऊच्या कमेन्ट चं फार हसू आलं . अग्गदी अग्गदी ! असं फीलिंग Wink

भाऊ _/\_

भाऊ, तुमचे लक्ष बरीक होते .... Happy नैतर प्रत्येकजण आपापल्याच तंद्रीत असतो जगत.
धक्का एकाचा लागतो, कळवळा दुसर्‍याच कुणाला तरी येतो अन पाण्याची बाटली बिस्किट देतो
पण शेवट मात्र एक असहाय्य आई अन अपत्य यातिल नात्यातच शोधावा लागतो.
"जगाची सुरुवात कशाने झाली माहित नाही, जगाचा शेवट कशाने होईल तेही माहित नाही, पण जग चालत रहाते, ते केवळ अन केवळ या "आई नि अपत्याच्या" नात्यावरच"
(असे माझे मत व ते आता "आजोबा" झाल्यावर तर जास्तच जाणवते)

सुंदर ललित.. वाचत असतानाच क्षणमश्गुल व्हायला झालं.. तेंव्हा वाजत असलेला मोबाईल ही उचलावासा वाटला नाही..
भाऊ.. हा प्रसंग तेथील कितीतरी जणां नी विटनेस केला असेल.. तुमच्यासारखं संवेदनशील मन खूप कमी लोकांजवळ उरलंय ना.. किंवा असलं तरी नित्याच्या धावपळीत ते हरवून बसलेत !!

खुपच छान लिहीले आहे तुम्ही.
आज आमच्या इथे पाऊस पडत आहे. ख़िडकीतुन बाहेर पहात होते महित नहि कित्ती वेळ.....
पण त्या वेळात मन मात्र पोहोचले होते college life मध्ये.......
त्या टपरी वर जिथे आपन जायचो पावसात भिजल्यावर चहा प्यायला .......

वा!! लेख तर लेख़..प्रतिसाद एकसे एक!
क्षणमश्गुल!
भाउकाका...:(
उत्तम निरिक्षण- अप्रतिम गुंफ़ले आहे.

क्षणमश्गुल आणि वरचा प्लॅटफॉर्मवरचा प्रसंग दोन्ही प्रतिसादांसाठी भाऊ __/\__

अगदी अगदी भाचा. बरोबर पकडलय तुम्ही! असे कित्येक मोमेंट्स येतात पण तुम्ही उल्लेख केलाय त्या भिडस्थपणामुळे ते मोमेंट्स अगदी शॉर्ट लिव्ड झाले. परत जरा अनुभव घेऊ म्हंटलं तर परत "माहौल" काही जमून येत नाही.
ह्या लेखानिमित्त जुनी आठवण आली. ९७-९८ सालची असावी. इंजिनियरिंगच्या दुसर्या वर्षाला होतो. एका शनिवारी संध्याकाळी जिम मधून परत घरी आलो तर आईनी तसच ताबडतोब किराणावाल्या कडे धाडलं काहीतरी सामान आणायला. जरा चरफडतच मी परत गाडी काढली आणि गेलो दुकानात.
तिथे त्याला काय सामान हवय ते सांगितलं अणि तो ते बांधून द्यायला लागला तो पर्यंत मी उभा होतो नुसता. त्याच्या काऊंटरपाशी एकदम लो वॉल्युम मध्ये नील कमल मधलं "तुझको पुकारे मेरा प्यार .." गाणं लागलं. वास्तविक ते गाणं पुर्वी ओझरतं बर्याच वेळा एकलं असेल पण का काय माहित ह्या वेळी जरा वेग्ळं वाटलं म्हणून जरा आणखिन लक्ष देऊन एकायला लागलो. रफी "आखरी पल है, आखरी आहें तुझे ढुंढ रही है, डूबती साँसे बुझती निगाहें तुझे ढुंढ रही है" म्हणायला लागला आणि मला त्याचा आवाज मॅजिकल आणि हेवन्ली म्हणतात तसा एकायला येऊ लागला. त्या गाण्यात बहुतेक राजकुमारला भिंतीत चिणत असतात. त्या सीन मध्ये त्यानी अ‍ॅक्टिंग कशी केलीये ते लक्षात नाही पण रफीच्या आवाजातली आर्तता अगदी भीडतेच मनाला लक्ष देऊन एकलं तर!
पुढे तो "अपने बदन की खाक मिला दी मैने राह मे तेरी.." म्हणायला लागला तेव्हा ती लोकं राजकुमारला नाही तर मला भिंतीत चिणत होती! Lol
टोटली गंडलो, हरवलो होतो मी! Happy
These songs sometimes have a crazy knack of very accurately depicting the condition of your mind, circumstances or even life at the very right moment!
तेव्हाच माणूस क्षणमश्गुल होतो. Happy

भौ, लिंबू, पोस्टी आवडल्या. Happy

आगाऊ Lol

काही काही वेळा आपल्याला गाण्यांपेक्षा ती गाणी आपल्याला ज्या काळात घेऊन जातात तो काळ जास्त प्रिय असतो. त्या गाण्यांच्या निमित्ताने ते जुने दिवस आठवतात.

मला आजपण नुसरत चं आफरीन, रंगीला, बरसात (नवीन) हि गाणी आठवली कि नववी दहावी चे दिवस आठवतात.
स्वदेस, पेज थ्री, रंग दे बसंती ची गाणी लागली कि मुंबई तले नवीन जॉब चे दिवस, रात्र रात्र त्या गाण्यांची केलेली पारायणे, ते मित्र डोळ्या समोर उभे राहतात.

माझा लेटेस्ट क्षणमश्गुल किस्सा,

मागच्या वेळेस नेहमीचे केशकर्तनालय बंद होतं म्हणून दुसर्या एका ठिकाणी गेलो होतो. सकाळी सकाळी विविध भारती वर गाणी लागली होती आणि एक वयस्कर गृहस्थ केस कापत होते. असला हरवून गेलो त्या वातावरणा मधे. लहानपणी आज्जी महिन्यातून एखाद्या रविवारी आम्हा सगळ्या भावंडाना घेऊन एका न्हाव्या कडे नेऊन बसवायची. सगळे ते दिवस डोळ्यासमोर आले. त्यांनी केस कापून झाल्यावर माझी तंद्री मोडली. मी पैसे देऊन घरी आलो आणि हेअरस्टाइल वरून आठवडाभर बायकोचे टोमणे ऐकत बसलो Happy

मस्त लिहिलय.
क्षणमश्गुल काय छान शब्द आहे. क्षणभंगुर म्हणताना काहीतरी सुटल्यासारखं वाटतं, क्षणमश्गुल ने तेच पकडल्यासारखं वाटतं.

सारख्या धावपळीच्या जगण्यात अशा काही चुकार क्षणांची गंमत मोलाची असते >>>> अगदी अगदी.

भाउ आणि लिंबुच्या पोस्टी आवडल्या. क्षणमश्गुल Happy

सुंदर लिहिलं आहे. असे काही क्षण अगदी कोरल्यासारखे आठवणीत रहातात तर काही विरून जातात रुइच्या म्हातार्‍यांसारखे. पण मला असे शब्दांत बांधता यायचे नाहीत कधी. तुम्ही अगदी पर्फेक्ट मांडलं आहे.

मस्त लिहिले आहे .

गॅस स्टेशन मधे गाडीचं इंजिन बंद करुन रेडिओ ऑन ठेवून गॅस भरावा लागतो बरेच्दा बार्क्याच्या आवडीचं गाणं असलं की .

क्षण मश्गूल शब्द एकदम भारी - दहा पेट्या हापूस, अन वर्षभर ताजी मासळी बक्षिस भाऊ काका Happy

These songs sometimes have a crazy knack of very accurately depicting the condition of your mind, circumstances or even life at the very right moment! >> क्या बात है बुवा !

भास्कराचार्य, आपले उगाच अ‍ॅडेलचे गाणे म्हणण्यापेक्षा तुम्ही 'बे एक्के बे' म्हणण्यात जास्त मश्गूल होत असाल असे वाटलेले Happy

'क्षणमश्गुल' शब्द मला सुचला कीं पूर्वीं कुठं तरी वाचलेला आठवला खरंच माहित नाहीं पण भास्कराचार्यांचं वरचं लिखाण वाचल्यावर थाडकन तोच माझ्या डोक्यांत आदळला , हें नक्की. तो चपखल बसला, हें खरं व तितकंच त्याचं श्रेय भास्कराचार्यांच्या लिखाणालाही जातं , हेंही खरं ! त्यामुळें, आगाऊनी << इनाम दिलेलीं दहा गांवं>> व मेधाजींच्या दिलेल्या << दहा पेट्या हापूस, अन वर्षभर ताजी मासळी >> या बक्षीसाचा अर्धा वांटा भास्कराचार्याना हक्कानेच जातो. भास्कराचार्यजी शाकाहारी असतील तर हापूसच्या पेट्या त्याना व मासळी मला. Fair isn't it !!! Wink

मस्त लेख, भास्कराचार्य! टोटली रिलेट झाला.
कित्येकदा पार्किंग मधे गाडी लावल्यानंतरही रेडिओवर आवडतं गाणं चालू असेल तर ते ऐकत रेंगाळले आहे. कधी कधी प्रवासात अशीच भन्नाट गाणी लागत राहातात एकामागोमाग एक आणि मग तो प्रवास केवळ त्या गाण्यांसाठी अजून थोडा वेळ चालू राहावा असंही वाटून गेलं आहे. अश्या बर्‍याच क्रेझी क्षणांची आठवण झाली या निमित्ताने.

मस्त झालाय लेख भास्कराचार्य!

वरती अनेकांनी लिहील्याप्रमाणे कारमधे आवडतं गाणं लागल्यावर वेळकाढूपणा अनेकदा केलाय. घर जवळ आलं पण गाणं बरच आहे अशा परिस्थितीत पिवळया सिग्नलला थांबून मागच्याला वैतागपण दिलाय त्यामुळे Happy

खुप सुंदर.. खरं तर या क्षणांची मजा आपल्यापुरतीच आणि त्या क्षणापुरतीच !!

Pages