बाकरवडी चाट

Submitted by मंजूडी on 14 February, 2016 - 23:55

चितळ्यांच्या, कोल्हापूरच्या, लांबूळक्या, मोठ्या, गोल, पिवळ्या, चॉकलेटी यापैकी कुठल्याही बाकरवड्या न घेता छोट्या खुसखुशीत बाकरवड्या (ज्या सर्वत्र 'मिनी बाकरवड्या' या नावाने मिळतात) आणि हाताशी असलेले घटक पदार्थ वापरून वेगळ्या चवीचं पटकन होणारं चविष्ट चटकदार असं बाकरवडी चाट कसं करायचं ते आपण आता बघूया, म्हणजे वाचूया!

लागणारे जिन्नस:

२ वाट्या मोड आलेले हिरवे मूग
१ टोमॅटो
प्रत्येकी अर्धी लाल पिवळी हिरवी सिमला मिरची
१ चमचा जिरेपूड
१ हिरवी मिरची
अर्ध्या लिंबाचा रस
चवीनुसार मीठ

अर्धी/ पाऊण वाटी छोट्या बाकरवड्या
दोन/ तीन चमचे चिंचेची आंबटगोड चटणी
बारीक चिरलेली कोथिंबीर
भुजिया शेव किंवा मटकी शेव किंवा साधी शेव आपापल्या आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती:

१. बाकरवड्यावर चिंचेची चटणी घालून नीट कालवून बाजूला ठेवून द्या. चटणी बाकरवड्यांमध्ये मुरेपर्यंत आपण बाकीची तयारी करू.
२. मूग वाफवून घ्या. गिर्र मऊ होऊ देऊ नका. थोडे टसटशीत राहायला हवेत.
३. कांदा, टोमॅटो, सिमला मिरची बाऽरीक चिरून घ्या. हिरवी मिरची बाऽरीक कापून घ्या. मिरची कटरमधून काढल्यास बेस्ट!
४. आता वाफवलेल्या मूगात कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि हिरवी मिरची घालून त्यावर लिंबाचा रस, मीठ आणि जिरेपूड घालून छान एकत्र करून घ्या. त्यात चिंचेच्या चटणीत मुरवलेल्या बाकरवड्या घाला, एकत्र करा आणि वर शेव कोथिंबीर घालून खायला घ्या.

bakarvadi chaat.jpg

हा फोटो शेव घालण्यापुर्वीचा आहे. तसंच फोटोतल्या चाटमधे कांदा घातला होता, पण तो नाही घातला तर आणखीन छान लागेल असं वाटून पुढच्यावेळी वगळला तर खरंच मस्त लागलं चाट.
हा चाट पदार्थ असला तरी यात पुदिन्याची चटणी घालायचा मोह टाळलेला बरा असं माझं मत. बाकरवड्या आणि पुदिन्याची चटणी असा एकत्र स्वाद छान लागत नाही.
मी माझ्या नणंदेने केलेलं बाकरवडी चाट पहिल्यांदा खाल्लं होतं, त्यात तिने पिवळ्या गोडमक्याचे दाणे वाफवून घातले होते, पण आम्ही हिरव्या मुगाच्या चवीवरच सेटल झाले.

आता या चाटची चव अधिक खुलवायची कशी ह्याबद्दल तुमच्या कल्पना येऊ द्या.

माझे दोन आणे:
१. खायला देतेवेळी दोन चमचे अमूल बटर पातळ करून चाटमध्ये मिसळून दिल्यास अहाहा! क्षण येतो.
२. आल्याच्या काचर्या (ज्युलिअन्स) चाटचा स्वाद वाढवतात.
३. भेळेच्या साध्या शेवेपेक्षा हलदीरामची भुजीया शेव किंवा चितळ्यांची मटकी शेव जास्त छान लागते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. हल्दीरामच्या बाकरवड्या हमखास मिळतात. त्याचे क्यालरी कंटेंट फार भयानक असतात, हे असले मूग बिग घातले की मेंदूला हेल्दी खातोय अशी तसल्ली मिळेल. Happy

ओह ही का ती रेसिपी? पाकृच्या धाग्यावर इतक्या लापि वाजवून फक्त एवढाच टिआरपी?? Wink

असो. ही पॉटलकसाठी चांगली वाटते. स्वतःसाठी मी नाही करून खाणार कारण बाकरवडीच खात नाहीये सध्या पण जवळच्या जवळ कुठे घेऊन जायला चांगली आहे. Happy

काल काहीतरी चटपटीत खायच होत. बाकरवड्या होत्या आणि हिरवे मूग पण होते मग झटपट हे बाकारवाडी चाट बनवल यॅम्म्मी झाल होत. थॅंक यू या मस्त रेसिपी साठी

करुन पाहणार ही पाकृ. बाकरवड्या जरा चुरडून (बत्त्याने जरा कुटून ) घातल्या तरी छान चव येईल असे वाटते आहे.

हल्दीराम. एरवी त्या मिनी बाकरवड्या अजिबात खपत नाहीत.
मला एकुणातच हल्दीराम आवडत नाही ते सोड. एक्सपोर्ट क्वालिटी म्हणून जे विकतात (इकडे), ते सगळे जरासे तेलकट आणि जास्त मीठ असलेले असते का कुणास ठाऊक. Uhoh

काल मला इंडियन शॉपीमधे मिनी बाकरवड्या मिळाल्याने मी त्या घेऊन आले पण त्याचं काय करावं ते सुचेना.नुसत्या खाल्या असत्या पण कडक आणि गोड Sad

मग बाकरवडी चाट करायचं ठरवलं आणि झोपले. आत्ता रेसीपी बघायला आले तर लक्षात आलं की माझ्या कडे जिन्नसांपैकी फक्त बाकरवड्या, कांदा, टोमॅटो आणि चिंच गुळाची चटणी आणि वरच्या रेसीपीत स्पष्ट शब्दात घालू नका म्हणुन लिहिलेली पुदिना चटणी आहे. उरलेले जिन्नस विकत आणुन सगळं करण्या इतके पेशन्स नसल्याने मी बाकरवडी चिंच गुळाच्या पाण्यात भिजवली, त्यात कांदा- टोमॅटो टाकला, थोडंस ताक टाकलं. जरा वेळ भिजु दिल्या बाव.
मग त्यात पुदिन्याची चटणी टाकली आणि उडदाचा पापड भाजून टाकला आणि लगेच खायला घेतलं.
अप्रतिम टेस्ट. दिल गार्डन गार्डन हो गया Happy

IMG_20161014_093656.jpg

आमच्या छोट्या शेफने केलेली बाव चाट. त्याने यात मुगासोबत वाफवलेले स्वीटकॉर्न्स पण वापरले होते. गार्निशींग साठी डाळिंबाचे दाणे, बीट, लाल- पिवळ्या मिर्च्यांचे काप वापरले. खाकऱ्याच्या तुकड्यावर सर्व्ह केले. वरून शेव आणि दाणे घालायला विसरला.
हे घरी प्रॅक्टिस साठी केल होतं. आता आज शाळेत काय काय विसरतोय कोण जाणे.

Pages