बाकरवडी चाट

Submitted by मंजूडी on 14 February, 2016 - 23:55

चितळ्यांच्या, कोल्हापूरच्या, लांबूळक्या, मोठ्या, गोल, पिवळ्या, चॉकलेटी यापैकी कुठल्याही बाकरवड्या न घेता छोट्या खुसखुशीत बाकरवड्या (ज्या सर्वत्र 'मिनी बाकरवड्या' या नावाने मिळतात) आणि हाताशी असलेले घटक पदार्थ वापरून वेगळ्या चवीचं पटकन होणारं चविष्ट चटकदार असं बाकरवडी चाट कसं करायचं ते आपण आता बघूया, म्हणजे वाचूया!

लागणारे जिन्नस:

२ वाट्या मोड आलेले हिरवे मूग
१ टोमॅटो
प्रत्येकी अर्धी लाल पिवळी हिरवी सिमला मिरची
१ चमचा जिरेपूड
१ हिरवी मिरची
अर्ध्या लिंबाचा रस
चवीनुसार मीठ

अर्धी/ पाऊण वाटी छोट्या बाकरवड्या
दोन/ तीन चमचे चिंचेची आंबटगोड चटणी
बारीक चिरलेली कोथिंबीर
भुजिया शेव किंवा मटकी शेव किंवा साधी शेव आपापल्या आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती:

१. बाकरवड्यावर चिंचेची चटणी घालून नीट कालवून बाजूला ठेवून द्या. चटणी बाकरवड्यांमध्ये मुरेपर्यंत आपण बाकीची तयारी करू.
२. मूग वाफवून घ्या. गिर्र मऊ होऊ देऊ नका. थोडे टसटशीत राहायला हवेत.
३. कांदा, टोमॅटो, सिमला मिरची बाऽरीक चिरून घ्या. हिरवी मिरची बाऽरीक कापून घ्या. मिरची कटरमधून काढल्यास बेस्ट!
४. आता वाफवलेल्या मूगात कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि हिरवी मिरची घालून त्यावर लिंबाचा रस, मीठ आणि जिरेपूड घालून छान एकत्र करून घ्या. त्यात चिंचेच्या चटणीत मुरवलेल्या बाकरवड्या घाला, एकत्र करा आणि वर शेव कोथिंबीर घालून खायला घ्या.

bakarvadi chaat.jpg

हा फोटो शेव घालण्यापुर्वीचा आहे. तसंच फोटोतल्या चाटमधे कांदा घातला होता, पण तो नाही घातला तर आणखीन छान लागेल असं वाटून पुढच्यावेळी वगळला तर खरंच मस्त लागलं चाट.
हा चाट पदार्थ असला तरी यात पुदिन्याची चटणी घालायचा मोह टाळलेला बरा असं माझं मत. बाकरवड्या आणि पुदिन्याची चटणी असा एकत्र स्वाद छान लागत नाही.
मी माझ्या नणंदेने केलेलं बाकरवडी चाट पहिल्यांदा खाल्लं होतं, त्यात तिने पिवळ्या गोडमक्याचे दाणे वाफवून घातले होते, पण आम्ही हिरव्या मुगाच्या चवीवरच सेटल झाले.

आता या चाटची चव अधिक खुलवायची कशी ह्याबद्दल तुमच्या कल्पना येऊ द्या.

माझे दोन आणे:
१. खायला देतेवेळी दोन चमचे अमूल बटर पातळ करून चाटमध्ये मिसळून दिल्यास अहाहा! क्षण येतो.
२. आल्याच्या काचर्या (ज्युलिअन्स) चाटचा स्वाद वाढवतात.
३. भेळेच्या साध्या शेवेपेक्षा हलदीरामची भुजीया शेव किंवा चितळ्यांची मटकी शेव जास्त छान लागते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे प्रकार हा ! थोड्या बाकरवड्या न मुरवताच घातल्या तर आणखी चांगले. हिरव्या मिरचीसोबत लाल मिरचीचे फ्लेक्सही घालावेत.

आम्ही कालच संध्याकाळी मिनी बाकरवडी चाट केली होती दही बटाटा पुरी टाइप.

गार्डन च्या मिनी बाकरवड्या ( दिल्लीत याच मिळतात), दही, आंबट -गोड चटणी, थोडी तिखट चटणी, उकडलेला बटाटा, तिखट, मीठ, जीर्‍याची पुड, चाट मसाला, आलु भुजिया आणि डाळिंबाचे दाणे इ. घालून.

पुढच्या वे़ळी मिनी बाकरवड्या आणल्या की अश्या पद्धतीने करून बघेन.

भारी दिसतंय बा.चा. प्रकरण.

ठाण्यातल्या प्रशांत कॉर्नरमधून २-३ प्रकारच्या बाकरवड्या आणल्या होत्या. त्यातल्या लसूनी का मेथी प्रकाराची चाट केली. (आमच्याकडे 'चाट' हा शब्द स्त्रीलिंगी आहे. Proud ) सवताळलेले चणे, बा. वड्या, आलं-हिरवीमिरची वाटून लावलेलं गोड दही, चटण्या, कांदा आणि प्रशांत कॉर्नरचीच नाचणी शेव असं काँबिनेशन फार मस्तं लागलं.

आता या चाटची चव अधिक खुलवायची कशी ह्याबद्दल तुमच्या कल्पना येऊ द्या.
<<
आता केलीच आहे इतकी हायउपस तर ठीकै. चालून जाईल.

पण,

नुसत्या बाकरवड्यांसोबत रंगीत पेयाचा ग्लास ठेवला, तर ही इतर झिगझिग करावी लागणार नाही Wink

पाकृ लिही लिही म्हणून नको जीव करून सोडला, आणि आता पाकृ लिहिली, फोटो बिटो डकवला तरी दिवसभरात फक्त १२ प्रतिसाद? शो.ना.हो. मंजूडी!

अहो सोन्याबापू, तुम्हाला आवडत असेल तर दही घालू शकता तुम्ही. दहीबुंदी सारखं दही मिनी बाकरवडीसुद्धा मस्त लागतं (म्हणे!) आधी करून ठेवलं तर बुंदी मऊ पडतात तश्या बा.व. मऊ पडत नाहीत (म्हणे!), मी अजून करून नाही पाहिलं आहे .

ताई, आम्ही पहिलाच प्रतिसाद दिलेला आहे. आमच्याकडे मुदलात मिनि बाकरवड्याच आसपास उपलब्ध नाहीत. आज चेन्नईफेरी झाली आहे, तिथून मिनि बाव आणल्या आहेत. आता चाट करून पाहण्यात येईल.

दहीबुंदी सारखं दही मिनी बाकरवडीसुद्धा मस्त लागतं (म्हणे!<<< लगेहाथो हेही करून पाहतोच.

येणार येणार म्हणून आली एकदाची Happy रेसिपी टाकल्याबद्दल सर्व संबंधितांना धन्यवाद Happy अशा बारक्या बाकरवड्या दुकानात दिसल्या की आणल्याच समजा.

बरं यात खमंग तळलेले दाणे चांगले लागतील का?

दोन दोन रेसिप्या का आल्यात ते कळले नाही.

रेसिपी मस्त आहे. हे करून बघायला बाकरवड्या मिळतात का हे बघावे लागेल आधी.

मस्त पाकृ!

आमच्या इथे दिसल्या होत्या मिनी बाकरवड्या. मी गेल्या वेळी घेणार होते पण तेवढ्यात नवर्‍याला चितळेच्या बाकरवड्या दिसल्या म्हणून यांच्याकडे तु. क. टाकला. पुढील महिन्यात जाऊ तेव्हा आणेन.

दोन रेस्प्या आल्या कारण मी रेस्पी लिहिताना आधी कुणी लिहिली आहे का ते बघितलंच नाही. जरा वेळ मिळाला तेव्हा लगेच इथे लॉगिन करून आधी नवीन रेस्पी टाकली नि मग "नवीन लेखन" बघितलं. तोवर मंजूडीने रेस्पी लिहिल्याचं तिने स्वतःच सांगितलं Wink

असो. मी तिच्याच रेस्पीत माझे किरकोळ बदल केलेत.

मला इथे मिळणार्‍या कोणत्याही ब्रँडच्या मिनी बाकरवड्या चवीला अजिबातच आवडत नाहीत. काही अगदीच ब्लँड तर काही अगदी अती स्पायसी. त्यामुळे आणवत नाहीत अजिबातच. त्यामुळे हे चाट करण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.

इथे बर्‍याच वेगवेगळ्या ब्रँडच्या मिनी बा व दिसतात . पण बा व आणि गु जा मिक्स यात आम्ही चि बा सं ठेवत नसल्याने कधी आणल्या नाहीत. आता एकदा ही कृती ट्राय करायला तरी मिनी बा व आणायला लागतील ,

दही घालायची आयडिया मस्त वाटतेय.

मिनी बावच्याच साधारण चवीचे मिनि सामोसे, मिनी कचोरी वगैरे पण मिळतात त्या कानात कुड्या घातलेल्या राजस्थानी मिठाईच्या दुकानात. ते पण चालू शकतील ना ह्यात?

पण बा व आणि गु जा मिक्स यात आम्ही चि बा सं ठेवत नसल्याने कधी आणल्या नाहीत.

+१

माझीही तीच अडचण आहे. हे चाट मस्त वाटतंय पण घरी चितळे सोडून इतरांची बाकरवडी आणणं म्हणजे अगदी धर्म भ्रष्ट करण्यासारखा ऑफेन्स होईल ! आता कोणी घरी मिनी बाव आणून द्यायची वाट बघायला हवी!

आज अखेर बाकरवडी चाट करण्यात आले आहे. मस्त झाले आहे. झटपट करता येण्यासारखे असल्याने अधिकच आवडलं आहे. चटपटीत खम्ग चव आली आहे.

Pages