वरणातला पास्ता
वरणफळं हे माझं सगळ्यात आवडतं 'कम्फर्ट फूड'. दमून भागून संध्याकाळी उशीरा घरी यावं आणि आईने गरम गरम वरणफळं जेवायला वाढावीत यासारखं सूख नसे. आता आईपासून दूर गेल्यावर ते सूख नशीबात कुठलं? पण थकून भागून घरी आल्यावर आपलं आवडीचं खाणं झटपट तयार करून खाता यावं, यासाठी कायम नवनवीन युक्त्या लढवणं चालू असतं. त्यातूनच सुचलेली ही पास्त्याची वरणफळं. त्यातल्या त्यात पोळीसदृश चपटा असणारा 'बो टाय' प्रकारचा पास्ता वापरण्याची कल्पना माझ्या एका मैत्रीणीची. शक्यतो 'होल व्हीट' चा पास्ता वापरावा म्हणजे पोषणाच्या बाबतीत तडजोड होत नाही. होल व्हीटचा बो-टाय पास्ता साधारण असा दिसतो:
लागणारा वेळ:
अर्धा तास
*डाळ शिजून तयार असल्यास १५ मिनीटात होईल
लागणारे जिन्नस:
'बो टाय' प्रकारचा होल व्हीट पास्ता - ३ कप
तुरीची डाळ - अर्धा कप
फोडणीचे साहित्य - तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हळद
लसूण पाकळ्या - ४ ते ५
सुकं किसलेलं किंवा ओलं खोवलेलं खोबरं - २ टेबलस्पून
आमसूलं - ४ ते ५
लाल तिखट - अर्धा टीस्पून
* किंवा चवीनुसार
गोडा मसाला - दीड टीस्पून
गूळ - एक मोठा खडा
मीठ - चवीनुसार
पाणी - गरजेनुसार
वरून घ्यायला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तूप - आवडीनुसार
क्रमवार पाककृती:
१. तुरीची डाळ पुरेसे पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजायला ठेवावी.
२. दुसरीकडे एका मोठ्या पातेल्यात पास्ता पॅकेटवरील सूचनांनुसार शिजायला ठेवावा. शिजवताना थोडे मीठ घालावे. दिलेल्या वेळेच्या ३ ते ४ मिनीट आधीच गॅस बंद करावा आणि पास्ता चाळणीत ड्रेन करावा.
३. हे दोन्ही शिजत असताना एकीकडे लसूण खोबरे एकत्र वाटून/कुटून घ्यावे.
४. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवावे व त्यात मोहरी घालावी. ती तडतडली की जिरे, हिंग, कढीपत्ता घालून किंचीत हलवावे. मग त्यात आमसुले आणि लसूण खोबर्याचं वाटण घालून एखादा-दोन मिनीट परतावे. खोबर्याचा रंग बदलू लागला की मग हळद घालून अजून अर्धा मिनीट परतावे.
५. हे व्यवस्थीत परतल्यावर त्यात शिजवलेली डाळ सारखी करून घालावी. त्यावर लाल तिखट, गोडा मसाला घालून सगळे नीट एकत्र करून घ्यावे.
६. वरण किती पातळ/घट्ट्ट आवडते त्याप्रमाणे गरजेनुसार पाणी घालून उकळू द्यावे. उकळत असतानाच गुळाचा खडा फोडून घालावा.
७. एक उकळी आली की अर्धवट शिजवलेला पास्ता घालून एकदा हलवावे, व पास्ता पूर्ण शिजेपर्यंत म्हणजे साधारण अजून ३-४ मिनीट उकळू द्यावे. उकळत असतानाच चवीनुसार मीठ घालावे.
८. पसरट बोलमध्ये गरम गरमच वाढावे. वाढताना वरून चमचाभर साजूक तूप आणि कोथिंबीर भुरभुरणे अगदी 'मस्ट'
वाढणी/प्रमाण:
दोन जणांना पोटभर होईल
अधिक टिपा:
१. दोन इंच बाय दोन इंच अशा लझान्या स्ट्रिप नूडल्स मिळतात असे मी अलिकडेच ऐकले. त्या वापरूनही हे चांगले होईल असे वाटते. मात्र त्यात होल व्हीट प्रकार मिळतो का ते बघायला हवे. शंखाच्या आकाराचा 'शेल' नावाचा पास्ता मिळतो, तोही बरा लागेल असे वाटते.
२. वेगवेगळ्या ब्रँडच्या पास्त्याची साईज आणि जाडी वेगवेगळी असू शकते. त्याचा अंदाज घेऊन पास्ता, डाळ याचं प्रमाण कमी जास्त करावे.
३. आमसूल, गूळ, तिखट, गोडा मसाला यांचे प्रमाणही आवडीनुसार कमी जास्त करावे.
४. सोबत गाजर, काकडी, बीट, मुळा यांपैकी एखाद-दुसरे सॅलड किंवा एखादे फळ असल्यास हा एका वेळेचा पूर्ण, सकस आहार होतो. माझ्या पास्त्याबरोबर होते वाफावलेले गाजर आणि ब्रॉकोली
माहितीचा स्रोत :
आमसुल-गुळाचं वरण: आई. ती वरणफळाला असंच वरण करते. अशा पद्धतीची आमटी भाताबरोबरही छान लागते.
बो-टाय पास्त्याची कल्पना: मैत्रीण
यशस्वी प्रयोग करणारी: मी! :p
वा! मस्त फ्युजन आहे! फोटो
वा! मस्त फ्युजन आहे! फोटो बोले तो एकदम डीलीशीयस! छान, सोपी कृती. करणार
(अवांतर- आमच्याकडे 'वरणफळ' म्हणत असलो, तरी त्यात वरण नसतंच अजिबात रस्सा पाण्याचा आणि वाटणाचा असतो फक्त.)
एकदम मस्त !!! माउथवॉटरींग
एकदम मस्त !!! माउथवॉटरींग वाटतोय फोटु नक्कीच करुन बघणार
(आम्ही वरणफळला चकोल्या पण म्हणतो. आणी त्यात भरपुर तुप सोडुन वर लसणीच तिखट !!! अहाहाहाहाहाहा................... )
भारी आहे शक्कल!
भारी आहे शक्कल!
वा! लै भारी. फोटू पण
वा! लै भारी. फोटू पण झक्कास.
फोटो पाहून काळजात कळ उठली. आज करणार.
सॉल्लिड आहे आयडिया...
सॉल्लिड आहे आयडिया...
भारीच आयडिया हे की! एकदा
भारीच आयडिया हे की! एकदा करुन बघितल पाहिजे
इकडे ते बोगाठ वगैरे मिळेल की नाही माहित नाही, पण पास्ता नक्की मिळेल, अन तो जो जशा आकारात मिळेल, करायला हरकत नाही असा प्रकारे!
चान्गल लिहीलय मुद्देसुद फोटोसहीत गुड वन!
मस्त.
मस्त.
लिंबु, भारतात शेल, पेने,
लिंबु, भारतात शेल, पेने, एल्बो हे सर्व प्रकार मिळतात. पुण्यातल्या कुठल्याही मोर, बिग बझार टाइप दुकानात. पेने असा वरणफळात चांगला नाही लागणार. शेल आणि एल्बो करुन बघा.
धन्यवाद सगळ्यांना! पूनम - तू
धन्यवाद सगळ्यांना!
पूनम - तू कसलं वाटण लावतेस वरणफळांना?
लिंबू - करून बघा वेगळा पास्ता आणि मला पण सांगा कसा होतो ते!
मस्तच! फोटोही छान आलाय.
मस्तच! फोटोही छान आलाय.
छान कल्पना.. लहान असताना मला
छान कल्पना.. लहान असताना मला वरणफळ हा प्रकार काही फार आवडायचा नाही. आमटी पोळीत आणि ह्याच फरक काय हेच कळायच नाही.
पण लहानपणी न आवडणार्या बर्याच गोष्टी आता आवडतात त्यामुळे हे नक्कि करुन बघेन.
फोटो मस्त आलाय.
सहीच आयडिया...मस्त पाककृती.
सहीच आयडिया...मस्त पाककृती.
पाकृ मस्त!
पाकृ मस्त!
छान आहे पाककृती ! फोटूही
छान आहे पाककृती ! फोटूही मस्त.
एकदम झक्कास आहे पाककृती ...
एकदम झक्कास आहे पाककृती ... फोटो पण कसला टेम्प्टिंग आला आहे. मस्तच एकदम.
कोणीतरी ऑथेंटीक 'वरणफळ' आणि 'चकोल्यांची' पा कृ यो जा टा. आमच्याकडे कधीच करत नाहीत. मी मैत्रिणींच्या डब्यातलं खाल्लेलं आहे पण कधी करून नाही बघितलंय.
एकदम भारी पदार्थ.. खरच फोटो
एकदम भारी पदार्थ.. खरच फोटो बघुनच तोंडाला पाणी सुटले आहे..
करुन बघायला पाहिजे एकदा.. पोळ्या लाटण्याचे कष्ट वाचतील ह्या प्रकारात..
व्वा काय जबरी फ्युजन आहे !
व्वा काय जबरी फ्युजन आहे ! बायको माहेरी आहे तोवर हा एक्परिमेंट करावा म्हणतोय एकदा.
छान कृती, वरणफळं माझं आवडती
छान कृती, वरणफळं माझं आवडती डिश. त्यात परत पोळ्या लाटण्याअचे कष्ट नाहीत. करून बघतेच !!!!
थँक्स, लोकहो! मंजूडी,
थँक्स, लोकहो!
मंजूडी, वरणफळांची मूळ कृती अशीच, फक्त वरणात पास्ता घालण्याऐवजी पोळी लाटून, तिचे शंकरपाळीसारखे मोठे मोठे चौकोनी काप करून वरणात सोडायचे.
मस्त आहे पाकृ, नक्की करुन
मस्त आहे पाकृ, नक्की करुन बघेन!
मस्त आहे क्रुती. काय पण
मस्त आहे क्रुती. काय पण आयडिया.
सखी, फ्यूजन खरचं छान आहे आणि
सखी, फ्यूजन खरचं छान आहे आणि तू ही कृती लिहिलीस पण छान! क्रमवार आणि नीट नेटकी..
(No subject)
शाबास! हा विचार काही वेळा
शाबास! हा विचार काही वेळा मनात आला होता पण धाडस झालं नव्हतं. आत प्रयत्न करुन बघायला हरकत नाही.
धन्यवाद, संयोजक! पीके, कर कर
धन्यवाद, संयोजक!
पीके, कर कर नक्की! हा पदार्थ बिघडणे अशक्य आहे. मी फक्त डमी-प्रूफ स्वयंपाकच करते :p
कसलि भन्नाट आहे ही पाकक्रुती.
कसलि भन्नाट आहे ही पाकक्रुती. केलीच पाहिजे. धन्यवाद सखीप्रिया.
सखीप्रिया तुम्हाला अजुन एकदा
सखीप्रिया तुम्हाला अजुन एकदा धन्यवाद. पास्ता फ़ारस न आवडणार्या मझ्या आई ला हा प्रकार मात्र खूप आवडला
आज हा वरण पास्ता ट्राय केला.
आज हा वरण पास्ता ट्राय केला. मस्त झाला होता! ! नवर्याने फुल्ल्टू ओरपलाय!
सखिप्रिया, खास धन्यवाद!
सखीप्रिया धन्यवाद. बर्याचदा
सखीप्रिया धन्यवाद. बर्याचदा पास्ता आणि वरणाचे काहीतरी करण्याचा विचार येत होता पण केले नव्हते. आता नक्की करते. वरणफळे हा माझाही आवडता पदार्थ आहे.
सहीच आता मी पण करते हे
सहीच आता मी पण करते हे आमच्याकडे वरणफळं एकंदरीतच फार आवडतात.
Pages