वरणातला पास्ता

Submitted by सप्रि on 1 September, 2009 - 01:26

वरणातला पास्ता

IMG_0049_copy_1.jpg

वरणफळं हे माझं सगळ्यात आवडतं 'कम्फर्ट फूड'. दमून भागून संध्याकाळी उशीरा घरी यावं आणि आईने गरम गरम वरणफळं जेवायला वाढावीत यासारखं सूख नसे. आता आईपासून दूर गेल्यावर ते सूख नशीबात कुठलं? पण थकून भागून घरी आल्यावर आपलं आवडीचं खाणं झटपट तयार करून खाता यावं, यासाठी कायम नवनवीन युक्त्या लढवणं चालू असतं. त्यातूनच सुचलेली ही पास्त्याची वरणफळं. त्यातल्या त्यात पोळीसदृश चपटा असणारा 'बो टाय' प्रकारचा पास्ता वापरण्याची कल्पना माझ्या एका मैत्रीणीची. शक्यतो 'होल व्हीट' चा पास्ता वापरावा म्हणजे पोषणाच्या बाबतीत तडजोड होत नाही. होल व्हीटचा बो-टाय पास्ता साधारण असा दिसतो:

IMG_0046_copy_1_0.jpgलागणारा वेळ:
अर्धा तास
*डाळ शिजून तयार असल्यास १५ मिनीटात होईल

लागणारे जिन्नस:

'बो टाय' प्रकारचा होल व्हीट पास्ता - ३ कप

तुरीची डाळ - अर्धा कप

फोडणीचे साहित्य - तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हळद

लसूण पाकळ्या - ४ ते ५

सुकं किसलेलं किंवा ओलं खोवलेलं खोबरं - २ टेबलस्पून

आमसूलं - ४ ते ५

लाल तिखट - अर्धा टीस्पून
* किंवा चवीनुसार

गोडा मसाला - दीड टीस्पून

गूळ - एक मोठा खडा

मीठ - चवीनुसार

पाणी - गरजेनुसार

वरून घ्यायला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तूप - आवडीनुसार


क्रमवार पाककृती:

१. तुरीची डाळ पुरेसे पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजायला ठेवावी.

२. दुसरीकडे एका मोठ्या पातेल्यात पास्ता पॅकेटवरील सूचनांनुसार शिजायला ठेवावा. शिजवताना थोडे मीठ घालावे. दिलेल्या वेळेच्या ३ ते ४ मिनीट आधीच गॅस बंद करावा आणि पास्ता चाळणीत ड्रेन करावा.

३. हे दोन्ही शिजत असताना एकीकडे लसूण खोबरे एकत्र वाटून/कुटून घ्यावे.

४. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवावे व त्यात मोहरी घालावी. ती तडतडली की जिरे, हिंग, कढीपत्ता घालून किंचीत हलवावे. मग त्यात आमसुले आणि लसूण खोबर्‍याचं वाटण घालून एखादा-दोन मिनीट परतावे. खोबर्‍याचा रंग बदलू लागला की मग हळद घालून अजून अर्धा मिनीट परतावे.

५. हे व्यवस्थीत परतल्यावर त्यात शिजवलेली डाळ सारखी करून घालावी. त्यावर लाल तिखट, गोडा मसाला घालून सगळे नीट एकत्र करून घ्यावे.

६. वरण किती पातळ/घट्ट्ट आवडते त्याप्रमाणे गरजेनुसार पाणी घालून उकळू द्यावे. उकळत असतानाच गुळाचा खडा फोडून घालावा.

७. एक उकळी आली की अर्धवट शिजवलेला पास्ता घालून एकदा हलवावे, व पास्ता पूर्ण शिजेपर्यंत म्हणजे साधारण अजून ३-४ मिनीट उकळू द्यावे. उकळत असतानाच चवीनुसार मीठ घालावे.

८. पसरट बोलमध्ये गरम गरमच वाढावे. वाढताना वरून चमचाभर साजूक तूप आणि कोथिंबीर भुरभुरणे अगदी 'मस्ट' Happy

IMG_0055_copy.jpgवाढणी/प्रमाण:
दोन जणांना पोटभर होईल

अधिक टिपा:
१. दोन इंच बाय दोन इंच अशा लझान्या स्ट्रिप नूडल्स मिळतात असे मी अलिकडेच ऐकले. त्या वापरूनही हे चांगले होईल असे वाटते. मात्र त्यात होल व्हीट प्रकार मिळतो का ते बघायला हवे. शंखाच्या आकाराचा 'शेल' नावाचा पास्ता मिळतो, तोही बरा लागेल असे वाटते.
२. वेगवेगळ्या ब्रँडच्या पास्त्याची साईज आणि जाडी वेगवेगळी असू शकते. त्याचा अंदाज घेऊन पास्ता, डाळ याचं प्रमाण कमी जास्त करावे.
३. आमसूल, गूळ, तिखट, गोडा मसाला यांचे प्रमाणही आवडीनुसार कमी जास्त करावे.
४. सोबत गाजर, काकडी, बीट, मुळा यांपैकी एखाद-दुसरे सॅलड किंवा एखादे फळ असल्यास हा एका वेळेचा पूर्ण, सकस आहार होतो. माझ्या पास्त्याबरोबर होते वाफावलेले गाजर आणि ब्रॉकोली Happy

IMG_0063_copy_1.jpgमाहितीचा स्रोत :
आमसुल-गुळाचं वरण: आई. ती वरणफळाला असंच वरण करते. अशा पद्धतीची आमटी भाताबरोबरही छान लागते.
बो-टाय पास्त्याची कल्पना: मैत्रीण
यशस्वी प्रयोग करणारी: मी! :p

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages