याधीचे भागः
'संकेत' भाग १ - http://www.maayboli.com/node/56790
'संकेत' भाग २ - http://www.maayboli.com/node/56815
___________________________________________
आर्ट गॅलरीच्या भिंतीवर टांगलेल्या अनेक चित्रांपैकी एका चित्रासमोर मी उभी होते. चित्रातून आरपार मला भलतंच काहीतरी दिसत असल्यासारखी.
चित्रात एक सुंदर रुपयौवना चिंब भिजलेली आणि तिच्या बांध्याचा रेखीव आकार काळजीपुर्वक अधोरेखित करणारी मादक वस्त्र नेसून पाठमोरी उभी होती. कमरेला ठुमका दिल्यासारखा किंचित उभार... आणि बाजूने पातळश्या ओढणीतून लाडीकपणे डोकावणारा गोलाकार छातीचा नक्षीदार फुगवटा... चित्रकाराला मजा आली असणार एवढे बारकावे रेखाटताना. ब्रश बाजुला ठेवून त्याने त्याच्या हातानेच आकारला असणार बरेचदा हा अनेक वळणांचा वळसेदार घाट. आणि कित्येक नजरांनी सारखं कुरवाळलं असेल हिच्या प्रत्येक नक्षीदार गोलांना.
आणि प्रत्येकानं दुर्लक्षच केलं असेल हिनं एका हाताच्या वळश्यात नाजूक कंबरेवर तोलून धरलेल्या आणि दुसर्या हातानं डोक्यावर नजाकतीने तोलून धरलेल्या रंगीत घागरींकडे. आणि चित्राच्या एका कोपर्यात दूर नदीच्या प्रवाहार बेफिकीरपणे एकट्याच तरंगत असणारी काही बेवारस मडकी... ती तर फक्त मलाच दिसली बहुतेक.
मला त्या काचेच्या फ़्रेममध्ये त्या यौवनेच्या पाठमोर्या उघड्या पाठीवर माझ्याच चेहर्याचे प्रतिबिंब दिसत होतं. प्रचंडच विरोधाभास. त्या प्रतिबिंबापेक्षा ती दूर तरंगणारी मडकी जास्त सुरेख दिसत होती.
मागे कसल्यातरी विचित्र खिदळण्याचा आवाज आला म्हणून मी वळले तर काही तरूण पोरं माझ्यासमोरच्या चित्राकडे पहात लोचट घाणेरडं हसत होती. मी त्यांच्याकडे पाहिलं तेंव्हा माझ्या कपाळावर आठ्याही असाव्यात. ती मुलं मला पाहून किंचित दचकली आणि चटकन् बाजुला झाली. ती मुलं गेल्यावर पुन्हा त्या चित्रातल्या मुलीकडे पहात मनातच पुटपुटले... "तुझी अब्रु थोडीतरी वाचवली बाई माझ्या या रुपड्यानं. तुला तुझ्या कर्त्याच्या कलेवर सुड उगवायचा असेल तर ये... हे माझं जगाला विद्रूप वाटणारं रुपडं बिनधास्त चेहर्यावर पांघर."
मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिलं. अजून हायकॉर्टात तासाभराने गेलं तरी चालणार होतं. आणि आर्ट्गॅलरीपासून हायकॉर्ट चालत दहा मिनिटांच्या अंतरावर. निवांत जेवण करून जावं.
हॉलच्या बाहेर येऊन मी कॉर्टात थांबलेल्या माझ्या असिस्टंटला फोन केला. तो म्हणाला अजून १२ नंबर आहेत आपल्या आधी.
"पेडणेकर थांबलेत का कॉर्टात?" मी चौकशी केली. तो म्हणाला, "होते बराच वेळ. आताच काही वेळापुर्वी बाहेर गेलेत. मोगरे सुद्धा होते सोबत." मी म्हटलं तूही जा आणि जेवण करून ये. तो म्हणाला बरं. मी फोन ठेवला.
मग ऑफिसला फोन करून हालहवाल विचारला. सगळं ठीक होतं. मला उगाचच विचित्र वाटलं.
बाहेरच्या कडाडत्या उन्हात जाण्यापेक्षा तिथं आर्टगॅलरीच्या कॅन्टीनमध्येच जेवून घ्यावं असा विचार केला आणि तिथं वळले. मला व्यक्तिशः एकटंच जेवायला आवडतं. जेवता जेवता काय काय विचार डोक्यात येत रहातात... अन्नाच्या बरोबरीने ते पोटात तेंव्हाच गडप होतात. पचतातही. या सगळ्या प्रक्रियेत कुणाचा व्यत्यय नको वाटतो. ऑफिसातही मी स्टाफसोबत जेवत नाही कधी. कॅबिनमध्ये एकटीच जेवते. कधी-कधी क्लायंटसोबत मात्र जेवावं लागतं. पण तेही मी शक्यतो टाळते. म्हणूनच पेडणेकरांना लंचच्या आधी भेटण्याचं टाळलं मी आज.
कॅन्टीनमधे बसले आणि जेवणाची ऑर्डर दिली. जेवण येईपर्य़ंत उगाच इकडेतिकडे रेंगाळणारी नजर अचानक थांबली कॅन्टीनच्या खिडकीवर रांगेत ठेवलेल्या त्या तीन लहानश्या मडक्यांकडे. मी थिजले.
ही तीच मडकी असावीत. ओळखता यावीत एवढी काही वेगळी नसली तरी माझ्या मनाला खात्रीच पटल्यासारखी झाली. हीच ती मडकी!! साधीशी, ना वेगळा आकार ना रंग... तशीच रिकामी. पोकळ. जादूगार आबाच्या दोन हातांनी साकारलेली पोकळी... भरून न निघण्याचा कुणाचातरी अलिखित शाप आयुष्यभर भोगणारी!
सगळ्याच पोकळ्या शेवटी विलीन होतात एका प्रचंड पोकळीत... आकाशाच्या. ढगांच्या प्रचंड चिखलात पाय नाचवित आबा कसा वेगळा करील एकेका त्याच्या मडक्यांना?
नलाक्काच्या नावाचा एक बुडबुडा हळूच त्याच्या पायात येऊन फुटेल... आकाशाच्या चिखलातूनही एक पोकळी रद्द होईल. तिथून नलाक्का कुठं जाईल?
मी भरकटत गेले. सैरभैर म्हणतात तशी... दिशा सापडेना. मग आपसूकच नजर फिरली ’त्या’ माणसाकडे. कॅन्टीनच्या दुसर्या टोकाला बसून त्या मडक्यांकडे तो एकटक पहात होता. जणू मडक्यांपासून निघालेल्या त्याच्या नजरेच्या अदृष्य धाग्यालाच लोंबकळत त्याच्यापर्यंत पोचले असावे मी. हा तोच माणूस. यावेळेस शर्ट पांढरा होता आणि खिशावर शाईचा डाग नव्हता. समोर चुरगाळलेला कागदाचा बोळा.... हे काय विचित्र?
मी जेवले. पुन्हा एकदा त्या माणसाला आणि मडक्यांना तिथंच सोडून बाहेर पडले. पुन्हा एकदा घडे, मडकी, उतरंडी आणि फुटक्या खापरांचे तुकडे चुकवत कॉर्टात पोचले. पेडणेकरांकडे पाहून हसले. केस बॉर्डावर आली तेंव्हा ठरल्याप्रमाणे सर्व युक्तिवाद केले. पेडणेकर भेटले. त्यांच्या शंकांना शांतपणे उत्तरे दिली. ते म्हणाले थॅंक्यू. मी म्हणाले वेल्कम. जाताना मोगरे तसेच नेहमीचे लोचट हसले. पुन्हा पिवळे दात.
पेडणेकर म्हणाले, "तुमच्यासारख्या हुषार वकिलांमुळे न्याय मागायची हिंमत होते...." मी हसले.
न्याय........? पदरात पडलेली दानंच चुकीची होती की खेळ चुकीचा झाला? कुणाच्यातरी रडीच्या डावात फक्त सोंगट्या होऊन उधळल्या गेलेल्यांनी कुणाकडे मागावा....?... न्याय?
आणि मी परतले. यावेळेस जास्तच थकलेल्या मनाला कुशीत घेऊन.
आयुष्यातल्या भयंकर विचित्रपणाला मी प्रत्यक्ष अनुभवलं होतं... अनेकदा. आयुष्याचा लहरीपणा अंगवळणी पडल्यासारखा झाला होता. अनेकदा होरपळले होते. त्या धगीत जळून भाजून निघाल्याच्या भयाण विचित्र खुणा माझ्या चेहराभर पसरलेल्या होत्या. त्याच माझी ओळख झाल्या असत्या.... पण मी माझी जरा वेगळी ओळख घडवली, जपली.... जपू शकले... हे त्यातल्या त्यात बरं झालं.
आता मला आडनावाची गरज नव्हती. पण तरी मी अजुनही लावत होते आबाचंच आडनाव. आणि बाप म्हणूनही त्याचंच नाव. "अॅड. इंद्रायणी श्रीहरी लांजेकर."
पण हा पुन्हा पुन्हा येणारा अनुभव त्याहूनही विचित्र. विचित्र हुरहूर... कसलेसे संकेत मिळत असल्याप्रमाणे... काहीतरी कानावर पडत असूनही ऐकू येत नसल्याप्रमाणे. काचेपलिकडे पाण्याचे ओघळ... पण अलिकडच्या काचेवर फिरणारा हात लख्ख कोरडा रहावा.... थोडी ओल मिळावी म्हणून भुकेला असावा... तसं काहीसं... विचित्र!
मी त्या माणसाला गाठून विचारायला हवं होतं का.... ’बाबारे तू नक्की कोण आहेस? गोदाला आणि कावूला पण असाच दिसतोस? भेटतोस? ओळखतोस?’
__________________________________________________
गावातल्या जवळ जवळ सगळ्याच कुंटूंबांना आम्हा तिळ्या बहिणींचं आप्रूप वाटायचं. हळू हळू सार्या पंचक्रोशीला आमचा लळा लागला होता. आम्ही कुणाच्याही घरी हक्कानं जायचो. अगदी ब्राम्हणवस्तीतल्या गोखल्यांपासून मांगाच्या नथुरामापर्यंत मुक्त विहार असायचा आम्हाला.
आमच्या शेजारी राहणार्या शामराव सुताराची बायको गंगा म्हणजे आमच्या आबाची मानलेली बहिण. आम्ही तिला गंगात्तू म्हणायचो. ती म्हातारी झाली तरी तिला मुलबाळ नव्हतं. तिची दोन मुलं कधीतरी मेली म्हणे... कधी, कशी... आम्ही कधीच विचारलं नाही. शामराव सुतार वेडा होता. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. गंगात्तू लहान मुलासारखं सांभाळायची त्याला. त्याला आंघूळ घालायची... जेवण भरवायची... त्याच्या तोंडातून अखंड गळत राहणारी चिकट ओंगळ लाळ सारखी पुसत रहायची. त्याचं हगणं मुतणं पण काढायची. त्याचा मारही खायची. कशाला एवढं करायची कोण जाणे... आम्हाला मात्र ती त्याच्या आजूबाजूलाही फिरकू द्यायची नाही. तो दिवसभर दाराच्या उंबर्यावर बसून रहायचा येणार्या जाणार्याकडे बघत दात विचकून हसत रहायचा. आम्हाला अश्यावेळी गंगात्तूला भेटायची जाम पंचाईत यायची. तिच्या घराच्या मागच्या पडवीतून आम्ही मोठमोठ्याने ओरडून मग तिला निरोप देत असू. संध्याकाळी वेडा शाम्या गावभर हिंडायला जायचा. तेंव्हा मात्र आम्हाला गंगात्तूशी भरपूर गप्पा मारता यायच्या. वेड लागणं एकूण तसं भयंकरच! काहीही झालं तरी डोकं ताळ्यावर राहील एवढं पाहिलं पाहीजे...
गंगात्तूनं आम्हाला फार लळा लावला.
नलाक्का म्हणजे यमीची आणि सुधाची आई. जामदारांचा वाडा गावातला सगळ्यात मोठा आणि प्रतिष्ठीत वाडा. नलाक्का घरातली सगळ्यात धाकटी सून. तीला यमी धरून चार मुली (बहुतेक). आणि तीच्या जावांची मुलं वगैरे धरून त्या एकट्या वाड्यातच २०-२२ मुलांचं भरलं गोकूळ नांदायचं. नलाक्काची सासू चंद्राबाई म्हणजे फार खाष्ट बाई. ती तिच्या सगळ्या सुनांना अस्सल सासूरवास करायची. का कोण जाणे... पण या चंद्राक्कानं आम्हा तिघीही बहिणींचा कायम राग रागच केला. आम्हाला पाहिलं की ती धुमसत रहायची. आम्ही आमच्या आईला खाल्लं... बापानं टाकलेल्या... वगैरे कायकाय बोलत रहायची. घाणेरड्या शिव्या पण द्यायची.
पण नलाक्का बिचारी साधी होती. कायम कामाच्या रगाड्यात पिचून गेलेली असायची. पण तरिही फार फार माया तिच्या सावळ्याश्या सोज्वळ चेहर्यावरून ओसंडत रहायची. डोळ्यांत अपार गूढ काहितरी तरंगताना दिसायचं. अजूनही ओथंबून भरलेल्या पावसाच्या कडेवर गुदमरणारं आभाळ पाहिलं की मला नलाक्काचे डोळे आठवतात. काठोकाठ दुःखानं भरलेले... गुदमरलेले... कधीकधी एकांतात बरसणारे.
हसताना मात्र तिच्या गालांना खोल खळ्या पडायच्या. आम्हा तिघींनाही फार म्हणजे फारच अप्रूप होतं त्या खळ्यांचं. नलाक्काच फारच आवडायची आम्हाला. यमीइतक्याच हक्कानं आम्ही तिच्या पदराशी झोंबायचो आणि तिच्या पोटाशी खेळत रहायचो. नलाक्काचा नवरा कुठेतरी दूरच्या शहरात असायचा म्हणे. त्याला कधीच पाहिलं नाही आम्ही. पहायचं तरी कशाला? ती मात्र संध्याकाळी कधी कधी मागच्या दाराच्या अंधार्या खिडकीकडे बसून शुन्यात नजर लावून बसलेली दिसायची.... कावू म्हणायची ’तिला तिचा नवरा आठवतूया...’. मग आम्ही तिला हाक न मारताच निघून जात असू...
आबा बाजाराला मडकी विकायला जायचा. शाळेतनं आल्यावर आम्ही जामदारांच्या घरीच असायचो. एवढ्या भरमसाठ चिल्ल्यापिल्ल्यांत आम्ही तिघी सहज खपून जात असू.
दुपारची जेवणं आणि सगळी झाकपाक झाली की नलाक्काची सासू वामकुक्षी घ्यायची. तिच्या जावाही इथं-तिथं व्हायच्या. मग बरेचदा यमी, बाळी, सुधा आणि आम्ही तिघीजणी नलाक्काला दुपारभर पिडायचो. वाड्याच्या मागच्या बाजूला पडवीत चोरून चोरून सागरगोट्यांचा, सारिपाटाचा, कधी कधी सापशिडीचाही डाव रंगायचा. कधी कधी नलाक्का आम्हाला गोष्टी सांगायची. कधी गाणी म्हणायची. कधी कधी तिच्या आंबूस वासाच्या पदरात गुरफटून आम्ही निजून जायचो. आमच्या निजल्या डोळ्यांच्या मधोमध कपाळावर हलकेच ओठ टेकून आम्हाला तिथंच सोडून नलाक्का निघून जायची. हलक्या पावलांनी.
नलाक्काच्या जावा कधीकधी तिच्या चहाड्या सांगत तिच्या सासूला. ही त्या दळभद्री कार्ट्यांसोबत दुपारभर खेळते काय... नाचते काय... घराण्याच्या इभ्रतीची काही पर्वा नसल्यासारखी वागते. ही घराची अब्रू वेशीवर टांगणार... नलाक्काची सासू मग तिला बदड बदड बदडायची. अगदी बुकलून काढायची. तांबट डोळ्यांची काळीनिळी पडलेली नलाक्का मग कधीमधी पडवी झाडताना दिसायची. यमी सांगायची आम्हाला सारं. मग आम्ही तिच्याजवळ जायचो नाही. तिला मार बसेल म्हणून. पण कधीतरी पडवीतून खाणाखुणा करून नलाक्काच आम्हाला परत बोलवायची. पुन्हा आमचा खेळ सुरू व्हायचा. पुन्हा एकदा तिला मार पडेपर्यंत. शेवटी ती मरूनच गेली... खेळ संपला आणि प्रश्न मिटला!
________________________________
क्रमशः
________________________________
पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/56884
संकेत भाग २ पेच या कवितेची
संकेत भाग २ पेच या कवितेची लिंक आहे. खरी लिंक द्याल का ?
लक्षात आणून दिल्याबद्दल
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद अनघा. दुरुस्ती केली आहे.
छान चाल्लिये कथा.
छान चाल्लिये कथा.
धन्यवाद. तुमच्या लेखनात जाऊन
धन्यवाद. तुमच्या लेखनात जाऊन दुसरा भाग वाचला मग तिसराही वाचला. मस्त चाललीये कथा. शक्य तितक्या लवकर पुरी कराल ही आशा.
उत्तम कथा!
उत्तम कथा!
धन्यवाद.
धन्यवाद.