सहिष्णु - असहिष्णु

Submitted by धनंजय भोसले on 30 November, 2015 - 04:24

परवा 'टीम लंच' साठी ऑफिस पासून जवळच असलेल्या हॉटेल मध्ये गेलो. शुक्रवार असल्याने आधीच सर्वजण वीकेंड मूड मध्ये आणि त्यात टीम लंच म्हणजे पर्वणीच..! पंधरा जणांची आमची टीम. म्हटले तर छोटी म्हटले तर मोठी. या टीम मध्ये मी नवीनच असल्याने ठराविक जणांशीच ओळख. टीमसोबत चांगल्या हॉटेलमध्ये कंपनीच्याच खर्चाने जेवायला जाणे, मौज-मजा करत वेगवेगळे मेन्यु टेस्ट करणे म्हणजे एक एंजॉयमेंट असते.

१५ जणांच्या टीम मध्ये एक जण दिसायला वेगळा. साधारण सहा फुट उंची, वीतभर वाढवलेली दाढी, सुरमा लावल्याने काळ्या झालेल्या डोळ्यांच्या कडा आणि डोक्यावर सफेद रंगाची गोल टोपी. साधारण बावीस-तेवीस वर्षांचा हा तरुण इतर टीम मेंबर्सपेक्षा दिसायला निश्चितच वेगळा. टीममधे नविनच जॉइन झालेला. थोडसा अबोल, प्रसन्नचित्त, सात्विक आणि हसरा चेहरा असलेला हा तरुण म्हणजे असिफ..!

सर्वजण टेबलावर येणाऱ्या मेन्यूजचा आस्वाद घेत होते. त्या लज्जतदार मेन्युजमुळे खाण्यात एक वेगळीच मजा येत होती आणि प्रत्येकजण हास्य-विनोदात रमला होता. अचानक वीकेंडला कोण-कोण कुठे-कुठे जाणार आणि काय-काय करणार याची चौकशी सुरु झाली. सगळ्यांचे प्लान्स सांगून झाल्यावर असिफने सुद्धा तो आज संध्याकाळच्या एस.टी. ने त्याच्या घरी म्हणजे औरंगाबादला जाणार असल्याचे सांगितले. औरंगाबाद हे नाव ऐकताच एक टीममेट क्षणाचा देखील वेळ न दवडता असिफकडे पाहून म्हणाला, "औरंगाबाद नाही... संभाजीनगर..!"

त्याचे हे बोलणे ऐकून लंच टेबलवर क्षणभर शांतता पसरली. प्लेट्मधील अन्न प्लेट्मधे, चमच्यातले अन्न चमच्यात आणि तोंडातले अन्न तोंडातच ठेऊन सर्वजण एकमेकांकडे आणि नंतर असिफकडे पाहू लागले. मात्र चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि हास्य जराही विचलित न करता असिफ अंदाज घेत सावरून म्हणाला, "संभाजीनगर तो संभाजीनगर... अपनेको क्या फरक पडता है..!!"

मी मात्र असिफ च्या उत्तराने व्यथित झालो. मुळात चार-चौघात असे लंच टेबलवर त्याला अथवा कुणालाही 'औरंगाबाद कि संभाजीनगर' हा प्रश्न विचारणे मला गैर वाटले. औरंगाबाद हा केवळ ५ अक्षरी शब्द नसून त्यामागे जोडलेल्या मानवी भावना असू शकतात याचा आपणाला विसर का पडावा..?

तसा माझा आणि औरंगाबादचा दुरान्वयेही संबंध नाही. माझे गाव पश्चिम महाराष्ट्रात. सगळे पै-पाहुणे देखील पश्चिम महाराष्ट्रात. औरंगाबादला कामानिमित्तही कधी येणे-जाणे नाही. आत्तापर्यंत १-२ वेळा औरंगाबादला जाणे झाले तेही केवळ पर्यटनासाठी. मग असिफला विचारल्या गेलेला 'औरंगाबाद कि संभाजीनगर' हा प्रश्न अप्रस्तुत का वाटवा..?

या प्रश्नाचे कारण शोधता शोधता मन थेट भूतकाळात गेले. हायस्कूलला असताना शैक्षणिक सहलीनिमित्त औरंगाबाद शहर आणि जिल्हा पाहण्याचा योग आला होता. त्याआधी औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्रातील एक जिल्हा आणि ते आपल्या गावाहून फार-फार लांब आहे एवढीच काय ते माहिती. औरंगाबाद म्हणजे काहीतरी हिरवे आणि आपले गाव म्हणजे भगवे असले काही शाळेत शिकवलेले नसल्याने औरंगाबाद हे नाव तेव्हा सुद्धा छानच वाटायचे आणि अजुनही वाटते.

औरंगाबाद हे नाव कुठून आले आणि का आले असले प्रश्न न पडता आम्ही विद्यार्थ्यांनी तेव्हा औरंगाबाद, पैठण, वेरूळ,खुलताबाद, अजिंठा, दौलताबाद यांसारख्या ऐतिहासिक स्थळांना दिलेली भेट अजुनहि आठवते. दौलताबादचा देवगिरी किल्ला पाहताना विस्फारलेले डोळे, विस्मयचकित होउन पाहिलेल्या वेरुळच्या लेण्या व घृष्णेश्वर मंदिर. अजिंठ्याचे जगप्रसिद्ध लेणे आणि त्यातील चित्रांची मोहमय दुनिया पहताना मिळालेली मन:शांती. लेण्यांशेजारून वाहणारी निर्मळ नदी आणि तीवर असलेला पांढराशुभ्र धबधबा पाहताना झालेला अवर्णनीय आनंद. पैठणचे नाथमंदिर, गोदावरी नदीवर बांधलेले धरण आणि त्याच्या पुढे पसरलेला अवाढव्य नाथसागर जलाशय पाहून प्रसन्न झालेले मन. धरणाच्या पायथ्याशी असलेले उद्यान आणि त्यात असलेले म्युझिक फाउंटन पाहून डोळ्याचे फिटलेले पारणे. औरंगाबाद शहरातील बीबी-का-मकबरा आणि पाण्यावर चालवली जाणारी आटे कि चक्की पाहताना इतिहासात डोकावण्याची मिळालेली संधी. औरंगाबादच्या रस्त्यांवर मिळणारे चविष्ट रोट खाऊन भागवलेली भूक. कधीही न पाहिलेले परदेशी लोक आम्ही औरंगाबादच्या सहलीत मात्र मोठ्या प्रमाणात पाहिले. काहीतरी प्रेक्षणीय असल्याशिवाय जगभरातील पर्यटक नक्कीच औरंगाबादला येत नसणार. हे सगळे अनुभव आठवल्यावर 'औरंगाबाद' या नावामुळे तिथल्या प्रेक्षणीय स्थळात काही बदल होणे दुरापास्त वाटते.

असे असताना एखद्याच्या जात-धर्म-पंथावरुन त्याची टिंगल-टवाळी करणे किंवा टोचुन बोलणे मला बरोबर वाटले नाही. आपण जिथे जन्मलो त्या गावाशी आपली नाळ आपोआप जोडली जाते. त्या गावाचे-शहराचे नाव बदलले जाणे हे कुणालाही क्लेशकारकच वाटत असणार. मग तो कोणत्याही धर्माचा-जातीचा किंवा पंथाचा असो. आपण ज्या शहरात राहतो अथवा ज्या पेठेत राहतो त्या पेठेचे नाव बदलण्याचा विचार मनात आणून पहिला तरी या विषयाची दाहकता मनाला स्पर्शून जाते आणि मग असिफला असा प्रश्न विचारणे हे सहिष्णु कि असहिष्णु याचे उत्तरही आपोआप मिळते...!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही बाजुवाल्यानीं असल्या गोष्टींसाठी फरक पाडुन घेणे सोडावे व अच्छे दिन दाखवा म्हणुन काठी हातात घावी.
तुरीच्या डाळीसाठी,महागाईसाठी आंदोलने करावित हिंदु-मुस्लिम दोघे यात भरडले जात आहेत.

@स्पॉक. : याला विषय भरकटवणे म्हणतात...!! मी त्यादिवशीचा ऑफिस मधिल किस्सा सांगितला.. ऑफिस पुण्यात.. औरंगाबाद महराष्ट्रात... मी लिहिलेय काय आणि तुम्ही सांगताय काय तर डुकराच्या चित्रावर काहीतरी लिहिले तर फरक का पडतो, वंदे मातरम म्हणताना फरक का पडतो, राष्ट्रगीतासाठी उभे राहताना फरक का पडतो, बांग्लादेश मधे तसे म्हणुन आम्ही असे... अहो मी साधे-सरळ लिहिलेय हो.. उगिच भरकटवु नका..!

धनंजय,
त्या व्यक्तीला त्याच्या कृरकर्मा राजाचे नाव बदलणा-या मोहिमेबद्दल सांगीतले तर ऑकवर्ड वाटले / भावना दुखावल्या असा मुद्दा आहे असे मला वाटते.
त्याला "काहीही विशेष नाही" असे का नाही वाटले? त्याच्या भावना न दुखावता तुमचे लंच पार का नाही पडले? असा माझा मुद्दा आहे.

जर खरेच काहीच घडलेच नव्हते, काही मुद्दच नव्हता तर तुम्ही हा धागा का काढला?

स्पॉक तुमच्या वरच्या प्रतिसादाला संपुर्ण अनुमोदन.
आजकाल या लोकांच्या भावना दुखाण्याचे प्रमाण फारच वाढले आहे, आणि यांच्या भावना दुखल्या म्हणुन गळे काढण्यार्‍यांचे देखिल.

@ स्पॉक., प्रसाद. : माबो वर प्रासंगीक लिहायची सुद्धा सोय नाही राहिली असे वाटु लागलेय आता... ही असहिष्णुता नव्हे तर काय..?? Wink

जुनी नावे विसरणे अशक्य असते आणि गावाच्या वगैरे नावांचा एखाद्या धर्माशी संबंध लावलेला मला स्वतःला पटत नाही. मुंबईत आलो कि अजूनही माझ्या तोंडात व्ही.टी. च येतं आणि समोरच्यालाही त्यात काही वावगे वाटत नाही.

आणि गावांचीच का अनेक देशांची नावे, आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलतात. बर्माचे ऑफिशीयली म्यॅनमार झाल्याचे सोडा पण बकिच्या देशांची दोन्ही नावे अगदी सहज वापरली जातात.

भारताला गल्फ मधे अल हिंद म्हणतात. ( जपान = याबान = निप्पॉन , चायना = चीना = सिना , जर्मनी = अलमान = ड्यूशलँड , अमेरिका = अम्रिका, नायजेरिया = नायजा = निजेरिया , इजिप्त = मिस्र, लेबनॉन = लुबनान .. अशी अनेक उदाहरणे आहेत. )

धनंजय,
तुम्ही परत एकदा ही गोष्ट नाकारत आहात की हे निव्वळ प्रासंगीक नसुन यात सामाजीक आणि धार्मीक पैलू आहेत. जर ते तसे नसते तर - तुमच्या एका मित्राने तुमच्या दुस-या एका मित्राला दुसरे काहीतरी सुचवले असते कंपनी लंच मधे - यावर तुम्ही धागा काढला असता का? ते तुम्हाला माबोवर धागा काढन्याएवढे महत्वाचे वाटले असते का?

@दिनेश,
हा धर्माशी संबध त्या लोकांनी लावला आहे ज्यांनी अफजलखानाच्या पोस्टरचा संबंध धर्माशी लावला आहे.
तेव्हा हे जाउन त्यांना सांगितलेत तर बरे होईल.

धनंजयजी,

स्पॉक आणि प्रसाद जे म्हणत आहेत त्यातील एक मुद्दा मलाही पटत आहे. Happy

येथे विशिष्ट जातीधर्माचा प्रश्न अजिबातच नाही. पण आजकाल भावना दुखावल्या जाणे हेही खूप सहज घडत आहे आणि मुद्दाम भावना दुखावणे हेही! एकुणच माणूस शीघ्रकोपी आणि सहज वाहवत जाणारा होऊ लागला आहे.

आला व्हॉट्स अ‍ॅपवर एक आपल्या (?) बाजूचा मेसेज की कर पटापटा फॉर्वर्ड! साधारण चारशे मित्र आहेत फेसबूकवर, मग टाक एक जळजळीत पोस्ट वगैरे!

आजकाल भावना दुखावल्या जाणे हेही खूप सहज घडत आहे आणि मुद्दाम भावना दुखावणे हेही!
>> हेच म्हणायचे होते.

भोसले साहेब,

स्पॉक व प्रसाद. या दोघांच्या पिंग्याकडे दुर्लक्ष करणे अत्यंत उत्तम मार्ग आहे. (थोड्या वेळात अजून २-३ यायची शक्यता आहे.) यांनी इथले प्रतिसाद केवळ काड्या करण्याच्या उद्देशाने दिलेले आहेत, हे यांच्या निमंत्रित कट्ट्यावरील चर्चेत तात्काळ दिसून येईल.

अमुक शहराचे देवळाचे, रस्त्याचे, किंवा अमक्याचे नांव असेच आहे, म्हणून आमच्या अस्मिता दुखावतात, श्रद्धेला ठेच पोहोचते, हा हिंदुत्ववादी कांगावा केवळ भांडणे उकरुन काढण्यासाठी आहे. तसले कांगावे करणारे कोणत्याही जातीधर्माचे असले तरी मूर्खच आहेत.

आधी "त्यांना" सुधरवा, असे सांगत आपल्यावर दरडावणे हा यांचा आवडता उद्योग. जर या सर्व हिंदुत्ववाद्यांना इतकीच त्यांना सुधरवायची काळजी आहे, तर आम्हाला दरडावण्यापेक्षा, स्वतः हा उद्योग ते का करीत नाहीत? आम्ही का जावे त्यांना सुधारायला?

मशीदीवर १० मिंटं बेसूर बांग देण्याचा भोंगा लावला, की हे तथाकथित रिअ‍ॅक्शनरी हिंदुत्ववादी भोंगा बंद करायला जाणार नाहीत, तर शेजारी देऊळ बांधून त्यावर २ तास भसाड्या आवाजात आरत्या लावतील. टोटल भागुबाई, अन नथिंग कन्स्ट्रक्टिव्ह.

आयसिस तिकडे गोंधळ घालते आहे, म्हणून हे इथल्या शांतताप्रीय लोकांना भडकावणार. दरडावणार. त्यापेक्षा आपले दंड-खाकी चड्ड्या घेऊन स्वतःच तिथे जा की! म्हणजे मग ते तालिबानी अन हे हिंदुत्ववादी यांची जी काय हाणामारी व्हायची ती होऊन जाईल अन आमच्या डोक्याचा ताण मिटेल.

@ स्पॉक. : कोण शेंबडा टीम मेम्बर आणि कोणी शेंबुड पुसायला लावलं त्याला..? तुम्ही उगीच सर्दी वाढवत आहात... लिहिलय काय आणि तुम्ही ओढुनताणुन सांगताय काय...!!
@ दीड मायबोलीकर : चांगले झणझणीत अंजन घातलेत...... वाचता वाचता हसुन मेलो... Happy :))

स्पॉक आणि प्रसाद जे म्हणत आहेत त्यातील एक मुद्दा मलाही पटत आहे. स्मित
<<
हो.
ते शेंबडे मित्र वगैरे शब्द भलतेच आवडलेले दिसताहेत तुम्हाला.

या विषयाएवजी दर दुसरा विषय असता तर , असा मुद्दा मांडायचा होता म्हणुन तो शब्द वापरला होत. दुस-या कशाचे तरी उदाहरण म्हणून.

संपादीत केले आहे.

हे अजुन एक दिडशहाण शेंबड आले इथे, अल्पसंख्यांकाचा कैवार घ्यायला. दुसर्‍यांना व्ययक्तिक बोलल्याशिवाय याला जेवण गोड लागत नाही बहुतेक. Proud

@ प्रसाद. : कशाला कोण कुणाचा कैवार घेईल..? काहिहि काय लिहिता.... माबो वर अशाही कॉमेंट्स येतात हे पाहुन आश्चर्य वाटले.... पक्के असहिष्णु आहात की राव..!! Wink

मला इथे एक प्रश्न पडला आहे. जर औरंगाबाद ह्या महानगराला आधीच दोन जुनी नाव होती तर त्यात परत तिसरे नवीन नाव द्यायची/घ्यायची गरज काय होती?

इथे विकीवर बघा - ह्या महानगराला - खडकी, फतेहपुर आणि नंतर औरंगाबाद हे नाव देण्यात आले आणि आता हे संभाजीनगर चौथे.

Khadki was the original name of the village which was made a capital city by Malik Ambar, the Prime Minister of Murtaza Nizam, Shah of Ahmadnagar. Within a decade, Khadki grew into a populous and imposing city. Malik Ambar died in 1626.[5] He was succeeded by his son Fateh Khan, who changed the name of Khadki to Fatehnagar. With the capture of Daulatabad by the imperial troops in 1633, the Nizam Shahi dominions, including Fatehnagar, came under the possession of the Moghals.

In 1653 when Mughal prince Aurangzeb was appointed the viceroy of the Deccan for the second time, he made Fatehnagar his capital and renamed it Aurangabad. Aurangabad is sometimes referred to as Khujista Bunyad by the Chroniclers of Aurangzeb's reign.

औरंगजेबाची कबर असलेल्या गावाला औरंगाबाद म्हणुन जतन केले.

जिथे संभाजी महाराजांची समाधी आहे तिथे संभाजीनगर शह्र वसवावे.

अफजलखानाची कबर , आअमगीर औरंगजेब यांची कबर याना मुसुलमानानी प्रेमाने संभाळले.

शिबाजी , संभाजी यांच्या समाध्या हिंदुना व्यवस्थीत संभाळता आल्या नाहीत , हाही मुसलमानांचाच गुन्हा का ?

>> माबो वर प्रासंगीक लिहायची सुद्धा सोय नाही राहिली असे वाटु लागलेय आता... ही असहिष्णुता नव्हे तर काय..?? <<

भोसले - बरोबर, हि तुमची असहिष्णुताच आहे. आसिफ प्रत्यक्शरीत्या सहिष्णु, मॅचुर्ड आणि वेल राउंडेड आहे, हे त्याच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट झालं. पण तुमच्या बाबतीत दुर्दैवाने तसं म्हणु शकत नाहि. त्या संभाषणात अभिप्रेत नसलेला अर्थ तुम्हि काढुन राईचा पर्वत केलात; यालाच असहिष्णु म्हणतात ना?

बी,

त्यात राजकारण आहे. राजकारण करायला कोणताही विषय चालू शकतो असे वाटते.

व्हीटीला अजूनही सी एस टी कितीजण म्हणतात माहीत नाही.

शिवाजी महाराजांचे नांव देण्यात कसलीही अडचण येत नसताना संभाजी महाराजांचे नांव अधिकृतरीत्या देण्यात अडचण का येते? तर आज त्या ठिकाणी संभाजी महाराजांना धर्म बदलायला लावणार्‍यांचे अनुयायी संख्येने पुष्कळ आहेत. (बळी तो कान पिळी)

मात्र कोणाच्याही भावना दुखावू नयेत. पण असे मुद्दाम करणारे सर्व धर्मांत असतात.

आपल्याकडे त्याबाबत एक्स्ट्रीम भूमिका आहेत. एक तर ज्यांच्या भावना अश्या येताजाता दुखावल्या जाऊ शकतात त्यांच्याबाजूने बोलणारे किंवा जे भावना दुखावतात त्यांच्या बाजूने बोलणारे! अधलेमधले कोणीच नाहीत. असले तर त्यांना कोणी विचारत नाही आणि त्यांचे कोणी ऐकत नाही.

>>>>> अच्छे दिन वरचे ध्यान हटवन्यासाठी लोकांच्या डोक्यात घातलेले फंडे आहेत हे. <<<< म्हणजे?
अहो औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे हा प्युअरली शिवसेनेचा फंडा आहे. बॉम्बेचे मुंबई व्हावे हा देखिल त्यांचाच फंडा होता. व्हिक्तोरिया टर्मिनस चे नाव बदलणे, आंतरराष्ट्रीय विमानतळास छत्रपती शिवाजी राजांचे नाव देणे हे सर्व फण्डे शिवसेनेचेच होते.
बॉम्बेचे मुम्बई झाल्यानंतर तोवर वाळूत तोन्ड खुपसुन बसलेली साऊथकडील मंडळी जागी झाली अन साऊथकडील शहरांची नावे बदलली गेली. तोवर कॉन्गीन्च्या राज्यात फक्त गांधी एके गांधी हेच्च होते. Proud

आता या सगळ्याचा मोदींच्या अच्छे दिनशी काय संबंध? तुम्हाला काय मुघलांच्या घोडेस्वारांच्या घोड्यांना जसे पाण्यातही संताजी धनाजी दिसत तसे सकाळच्या चहाच्या पहिल्या कपापासुन चहाच्या कपातही अच्छेदिनवाले मोदी दिस्तात का? Wink

जरा वाढीव जास्तीचा अभ्यास करा लिवायच्या आधी. Happy

आँ ! या सगळ्यात भाजपाही हाताला हात लावून मम म्हणत होतीच ना ?

लिंब्या , हिंदुधर्मपूजका !

तुला वाल्या कोळीची गोष्ट आठवते का रे ?

वाल्याच्या खळ्ळ फट्यकवरच बायकोचेही पोट भरत होते. पण पापाची वाटणी तिला नाही !

सेनेच्या खळ्ळ फट्याकात भाजपाही सामील असते कधीकधी... पण पापाची वाटणी मात्र सेनेला ढकलून भाजपा साळसूद रहाते !

मोग्या, विश्लेषण बरोबर, पण नि:ष्कर्ष चूकाचा आहे तुझा .....
हिंदुत्ववादाचे "खायचे दात अन दाखवायचे दात" इतकाच काय तो फरक आहे दोन्हींमधे Proud असे माझे मत.

जर नामांतर करणे ह्यामागे राजकारण असेल तर मग अशा राजकारणी विषयांना आपण सामान्य लोकांनी पाठिंबा देणे म्हणजे आपण एकप्रकारे फार मोठी चुक करत आहोत.

शेक्सपीअरने म्हंटले आहे की नावात काय आहे ह्याची इथे आठवण व्हावी.

टिंगल-टवाळी करणे किंवा टोचुन बोलणे हा माणसाचा स्वभाव आहे. सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या प्रांता भाषेच्या माणसांमधे (स्त्री-पुरुष) तो दिसतो. (कधी ना कधी, कुठे ना कुठे, केव्हा ना केव्हा)

बरेचदा असे करत असताना दुसर्‍याच्या जात-धर्म-पंथावरुनही टिंगल टवाळी होतेच.

सरदारजींवरचे जोक्स, ज्यु, मारवाडी आणि कोकणस्थांवरचे कंजूषीचे किस्से आवडीने चघळले जातातच...

इतकेच काय शारिरिक आकार (जाडी) /व्यंगांवरून (तोतरेपणा) केले गेलेले विनोदही सर्वमान्य आहेत. अगदी चित्रपटांमधूनही (सेन्सॉर बोर्डाने पास केलेल्या) दाखवले जातात.

माणसाच्या भाषेवरून - कोणी गावरान तर गावरान पण टिपिकल शहरी 'अशणार-नशणार-बशणार-घाशणार-पुशणार' असल्या सानुनासिक शब्दांनी युक्त अशा भाषेवरूनही करमणूक करून घेतो आपण Wink दिवा: (नथिंग पर्सनल)

मग खरे तर आपण सगळे (च) असहिष्णु (च) आहोत.

एकासाठी सहनिय गोष्ट दुसर्‍यासाठी असेलच असे नाही (सहिष्णुता व्यक्तीसापेक्ष आहे) पण तरीही असहिष्णु हा शब्द कुठेही कधीही / अस्थानी वापरून गुळगुळीत करू नये असे मात्र वाटते.

लिंबू - व्हीटी चे सीएसटी काँग्रेसने केले आहे. सेनेने नाही (हे मला तुला सांगायला हवे? Happy )

नामांतराबद्दलः
१. माझे (जवळपास सर्वच) तमिळ मित्र "मॅड्रास" असा उच्चार करतात जेव्हा की आम्ही ईतर सर्व नॉन तमिळ लोक चेन्नई म्हणतो.
२. नामांतर झाल्यानंतर हळूहळू जुनी नावे विसरली जातात. उदा. एकनाथराव खडसेंचे गाव कोणते? मुक्ताईनगर. जुने नाव एदलाबाद.

---
कानडा

Pages