सहिष्णु - असहिष्णु

Submitted by धनंजय भोसले on 30 November, 2015 - 04:24

परवा 'टीम लंच' साठी ऑफिस पासून जवळच असलेल्या हॉटेल मध्ये गेलो. शुक्रवार असल्याने आधीच सर्वजण वीकेंड मूड मध्ये आणि त्यात टीम लंच म्हणजे पर्वणीच..! पंधरा जणांची आमची टीम. म्हटले तर छोटी म्हटले तर मोठी. या टीम मध्ये मी नवीनच असल्याने ठराविक जणांशीच ओळख. टीमसोबत चांगल्या हॉटेलमध्ये कंपनीच्याच खर्चाने जेवायला जाणे, मौज-मजा करत वेगवेगळे मेन्यु टेस्ट करणे म्हणजे एक एंजॉयमेंट असते.

१५ जणांच्या टीम मध्ये एक जण दिसायला वेगळा. साधारण सहा फुट उंची, वीतभर वाढवलेली दाढी, सुरमा लावल्याने काळ्या झालेल्या डोळ्यांच्या कडा आणि डोक्यावर सफेद रंगाची गोल टोपी. साधारण बावीस-तेवीस वर्षांचा हा तरुण इतर टीम मेंबर्सपेक्षा दिसायला निश्चितच वेगळा. टीममधे नविनच जॉइन झालेला. थोडसा अबोल, प्रसन्नचित्त, सात्विक आणि हसरा चेहरा असलेला हा तरुण म्हणजे असिफ..!

सर्वजण टेबलावर येणाऱ्या मेन्यूजचा आस्वाद घेत होते. त्या लज्जतदार मेन्युजमुळे खाण्यात एक वेगळीच मजा येत होती आणि प्रत्येकजण हास्य-विनोदात रमला होता. अचानक वीकेंडला कोण-कोण कुठे-कुठे जाणार आणि काय-काय करणार याची चौकशी सुरु झाली. सगळ्यांचे प्लान्स सांगून झाल्यावर असिफने सुद्धा तो आज संध्याकाळच्या एस.टी. ने त्याच्या घरी म्हणजे औरंगाबादला जाणार असल्याचे सांगितले. औरंगाबाद हे नाव ऐकताच एक टीममेट क्षणाचा देखील वेळ न दवडता असिफकडे पाहून म्हणाला, "औरंगाबाद नाही... संभाजीनगर..!"

त्याचे हे बोलणे ऐकून लंच टेबलवर क्षणभर शांतता पसरली. प्लेट्मधील अन्न प्लेट्मधे, चमच्यातले अन्न चमच्यात आणि तोंडातले अन्न तोंडातच ठेऊन सर्वजण एकमेकांकडे आणि नंतर असिफकडे पाहू लागले. मात्र चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि हास्य जराही विचलित न करता असिफ अंदाज घेत सावरून म्हणाला, "संभाजीनगर तो संभाजीनगर... अपनेको क्या फरक पडता है..!!"

मी मात्र असिफ च्या उत्तराने व्यथित झालो. मुळात चार-चौघात असे लंच टेबलवर त्याला अथवा कुणालाही 'औरंगाबाद कि संभाजीनगर' हा प्रश्न विचारणे मला गैर वाटले. औरंगाबाद हा केवळ ५ अक्षरी शब्द नसून त्यामागे जोडलेल्या मानवी भावना असू शकतात याचा आपणाला विसर का पडावा..?

तसा माझा आणि औरंगाबादचा दुरान्वयेही संबंध नाही. माझे गाव पश्चिम महाराष्ट्रात. सगळे पै-पाहुणे देखील पश्चिम महाराष्ट्रात. औरंगाबादला कामानिमित्तही कधी येणे-जाणे नाही. आत्तापर्यंत १-२ वेळा औरंगाबादला जाणे झाले तेही केवळ पर्यटनासाठी. मग असिफला विचारल्या गेलेला 'औरंगाबाद कि संभाजीनगर' हा प्रश्न अप्रस्तुत का वाटवा..?

या प्रश्नाचे कारण शोधता शोधता मन थेट भूतकाळात गेले. हायस्कूलला असताना शैक्षणिक सहलीनिमित्त औरंगाबाद शहर आणि जिल्हा पाहण्याचा योग आला होता. त्याआधी औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्रातील एक जिल्हा आणि ते आपल्या गावाहून फार-फार लांब आहे एवढीच काय ते माहिती. औरंगाबाद म्हणजे काहीतरी हिरवे आणि आपले गाव म्हणजे भगवे असले काही शाळेत शिकवलेले नसल्याने औरंगाबाद हे नाव तेव्हा सुद्धा छानच वाटायचे आणि अजुनही वाटते.

औरंगाबाद हे नाव कुठून आले आणि का आले असले प्रश्न न पडता आम्ही विद्यार्थ्यांनी तेव्हा औरंगाबाद, पैठण, वेरूळ,खुलताबाद, अजिंठा, दौलताबाद यांसारख्या ऐतिहासिक स्थळांना दिलेली भेट अजुनहि आठवते. दौलताबादचा देवगिरी किल्ला पाहताना विस्फारलेले डोळे, विस्मयचकित होउन पाहिलेल्या वेरुळच्या लेण्या व घृष्णेश्वर मंदिर. अजिंठ्याचे जगप्रसिद्ध लेणे आणि त्यातील चित्रांची मोहमय दुनिया पहताना मिळालेली मन:शांती. लेण्यांशेजारून वाहणारी निर्मळ नदी आणि तीवर असलेला पांढराशुभ्र धबधबा पाहताना झालेला अवर्णनीय आनंद. पैठणचे नाथमंदिर, गोदावरी नदीवर बांधलेले धरण आणि त्याच्या पुढे पसरलेला अवाढव्य नाथसागर जलाशय पाहून प्रसन्न झालेले मन. धरणाच्या पायथ्याशी असलेले उद्यान आणि त्यात असलेले म्युझिक फाउंटन पाहून डोळ्याचे फिटलेले पारणे. औरंगाबाद शहरातील बीबी-का-मकबरा आणि पाण्यावर चालवली जाणारी आटे कि चक्की पाहताना इतिहासात डोकावण्याची मिळालेली संधी. औरंगाबादच्या रस्त्यांवर मिळणारे चविष्ट रोट खाऊन भागवलेली भूक. कधीही न पाहिलेले परदेशी लोक आम्ही औरंगाबादच्या सहलीत मात्र मोठ्या प्रमाणात पाहिले. काहीतरी प्रेक्षणीय असल्याशिवाय जगभरातील पर्यटक नक्कीच औरंगाबादला येत नसणार. हे सगळे अनुभव आठवल्यावर 'औरंगाबाद' या नावामुळे तिथल्या प्रेक्षणीय स्थळात काही बदल होणे दुरापास्त वाटते.

असे असताना एखद्याच्या जात-धर्म-पंथावरुन त्याची टिंगल-टवाळी करणे किंवा टोचुन बोलणे मला बरोबर वाटले नाही. आपण जिथे जन्मलो त्या गावाशी आपली नाळ आपोआप जोडली जाते. त्या गावाचे-शहराचे नाव बदलले जाणे हे कुणालाही क्लेशकारकच वाटत असणार. मग तो कोणत्याही धर्माचा-जातीचा किंवा पंथाचा असो. आपण ज्या शहरात राहतो अथवा ज्या पेठेत राहतो त्या पेठेचे नाव बदलण्याचा विचार मनात आणून पहिला तरी या विषयाची दाहकता मनाला स्पर्शून जाते आणि मग असिफला असा प्रश्न विचारणे हे सहिष्णु कि असहिष्णु याचे उत्तरही आपोआप मिळते...!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रच्याकने.
चंद्रूभौ, तुमच्या बंगल्याला "संताजी-धनाजी निवास" असे सहिष्णू नांव कधी देताहात? औरंगजेब किती नीच होता, त्यासोबत ते दोघे किती मोठे होते तेही जनतेला कळू देत की!

भोसले साहेब लेख पटला.असहिष्णुपणा हा पुर्वापार चालत आलेला आहे.सध्याच्या काळात तर तो अधिकच वाढलेला दिसतो. एखाद्याला अधिक्रुत नाव घेतोय म्हणुन टोकुन दुसरे अनधिक्रुत नाव घ्यायला सांगणे चुकिचे आहे.आसिफने दिलेले उत्तर मला चुकिचे वाटले त्याने अधिक्रुत नाव घेतले होते त्याने त्याच नावावर ठाम रहायला हवे.

@ सचिन पगारे : प्रसंग घडत असतना माझ्याही मनात हीच भावना होती. इतर टीम मेंबर्स सुद्धा या घटनेमुळे संकोचलेले दिसत होते. म्हणजे १५ टीम मेंबर्स मधील एखादाच असा विचित्र वागतो पण त्याच्यामुळे संपुर्ण टीम मधील वातावरण कलुशीत होते. हे मला जाणवले म्हणुन मी तो अनुभव येथे सांगितला. शेवटी टीम मधे जसा एखादा असे वागतो त्याच पर्सेंट (%) मधे देशातील 'काही' लोक असे वागुन समाजिक वातावरण कलुशीत करत असतात व त्याचा सर्वांनाच त्रास होतो. हेच मला सांगावयाचे होते आणि 'काही' आयडींनी ते सिद्धही केले. Happy

औरंगजेब हा योध्दा होता त्याने भारतावर आक्रमण काही सत्यनारायणाची पुजा घालायला केले नव्हते. त्याने स्वताच्या भावांना ठार केले होते, बापाला कैदेत टाकले होते तो संभाजि राजांसारख्या प्रतिस्पर्धी योध्दा ताब्यात आला तर त्याला सहिष्णुता दाखवेल असा विचार करणेच चुकीचे वाटते. बळी तो कान पिळी हा राजेशाहिचा खाक्या होता त्याला तो जागला. परंतु त्याच्या कारनाम्याहुन सध्याच्या मुस्लिमांना हिणवणे चुकीचे आहे.

सचिन पगारे : 'औरंगजेब त्यावेळी तसा वागला' हा विचार सुद्धा मनात न येता मी लेख लिहिला आहे किंबहुना तो मुद्दाच गैरलागु आहे..! सर्वसामान्य माणुस दिवसभर राबुन दोन वेळचे जेवण मिळवतो आणि पैसे शिल्लक रहिले तर मौजमजा करतो. त्याला शांततेत रहाणे पसंत असते. समाजात अत्यल्प प्रमाणात तोगडिया, महराज, औवेसी, भिंद्रनवाला असे काही लोक असतात जे स्वार्थासाठी समाजभावना भडकावुन समाजात अशांतता निर्माण करतात. समाजातील 'काही'जण त्यांच्या बोलण्याला बळी पडुन समाजस्वास्थ्य बिघडवायला मदतच करतात. तेव्हा अशा 'काही'जणांचा विरोध करणे एवढे एक काम केले तरी भारतीय नागरिकाचे एक कर्त्यव्य पार पाडल्याचे समाधान नक्की मिळेल.

खरय तुमच जनतेच्या मनात असहिष्णुपणा असण हेच काहिंच्या हिताच आहे.

इतिहासच काय पुराणही असहिष्णु प्रसंगाने भरलेले आहे.

>>परंतु त्याच्या कारनाम्याहुन सध्याच्या मुस्लिमांना हिणवणे चुकीचे आहे.
मग याच न्यायाने जर अजुन कोणाच्या पुर्वजांनी काही केले असेल तर त्यांच्या वंशजांना हिणवणे चुकीचे असावे.

धनंजय कुणि कुणाच्या वंशजांना का हिणवावे? माझ्यापुरते बोलाल तर मी सरळ पुर्वजांनाच हिणवतो.आता वंशजांना त्याबद्दल वाईट वाटत असेल तर नाईलाज आहे.

कदाचित माझ्या बेसिकमध्ये लोच्या असेल : पण मग त्याने ज्यांवर आक्रमण केल, त्यांनी आत्ता सोडून द्यायचं का सगळ, झाल गेल गंगेस म्हणून? किमान त्याच्या स्मृती ... वाईट आठवणी मिटवायला नको?

@ सचिन पगारे आणि _तात्या_ (अनिरुद्ध_वैद्य) : तुम्ही या पुर्वज-वंशज या विषयावर स्वतंत्र धागा का काढत नाही..? इथे हा विषय नको हि नम्र विनंती..!

वंशजांना कोण टोकत नाहीये ... Wink त्यात ते पात्र आसिफ आहे. धनंजय रावांनी आधीच सांगितलाय की त्याऐवजी आशिष असता तरी त्यांनी असाच लेख लिहला असता Happy

त्यामुळे, वंशज हा मुद्दा निकाली निघतो.
हे माझे मत.

@ सचिन पगारे - मग असं करा तुम्ही इतिहासातील पाळे-मुळे खोदुन ती नविन धाग्यातुन सर्वांसमोर मांडा... आणि तुम्ही पण कस्ट्मर रिलेशनशीप मॅनेजमेंट चा अनुभव घ्या...!! Happy Wink

Pages