हा लेख जवळपास सहा महिन्यांपूर्वी पेपरवर लिहून काढला होता. तो लिहितानादेखील सलग नव्हता. सध्या हातात असलेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून मी लेख संगणकावर आणताना त्यात थोडी सुसूत्रता आणली. तरीही हा लेख अपूर्ण आहे कारण माझ्या मनात पडलेला प्रश्न अजून सुटलेला नाही. हा असा अपूर्ण लेख मायबोलीवर प्रसिद्ध करावा की नाही असा विचार बरेच दिवस रेंगाळत होता. पण आज दिवाळीच्या दिवशी असं वाटतंय की शेवटच्या मुक्कामापेक्षा अनेकदा प्रवास अधिक महत्वाचा असतो. ह्या दिवाळीला “तमसो मा ज्योतिर्गमय” असं म्हणत हा प्रवास प्रसिद्ध करत आहे.
___________________________________________________________________________
मध्यंतरी एका TED talk चे मराठीत भाषांतर केले त्यावेळी मनात काही विचार आले होते आणि ते मी लिहून काढले होते. पण बहुतेक कुठेतरी आत हाही विचार आला होता subconsciously. मागे वळून पाहताना ह्या विचाराचा प्रवास तिथून सुरु झाला असावा असे वाटते. I incubated these thoughts for a long time. एकदा एका मित्राशी वाद घालताना पुन्हा ह्या विचारावर येऊन अडले. तेव्हा जाणवलं की हा विषय बराच गुंतागुंतीचा आहे आणि ह्या बाबतीत माझेच विचार खूपच गोंधळलेले आहेत. आपला मेंदू फार हुशार असतो. स्वतःच्या ही नकळत आपण गोष्टी एकमेकांना जोडत जातो आणि एक दिवस अचानक सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडतो – युरेका! आज असंच काहीसं झालं आहे. आणि मी लिहायला मजबूर झाले आहे. ह्या विचाराची (प्रश्नाची) थोडी clarity आल्यासारखी वाटते. विषय/प्रश्न कळल्याशिवाय सोडवता येत नाही त्यामुळे ही पायरी देखील महत्वाची नाही का?
तर विचाराला चालना देणारी गोष्ट अशी की जेव्हा भारतात निवडणुकांची रणधुमाळी चालू होती तेव्हा मी कुंपणावर होते. कॉंग्रेस निवडून येऊ नये ही इच्छा पण म्हणून बीजेपीला पाठींबा द्यावा असेही वाटत नव्हते कारण बीजेपी हा secular पक्ष नाही. त्याचा जन्म हा एका हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या संघटनेतून झाला आहे. माझा मित्र बोलता बोलता म्हणाला, “मग हिंदुत्वाचा अभिमान बाळगला तर काय चूक आहे?” मी माझं लॉजिक काढलं. म्हटलं, ठीक आहे पण तू हिंदू म्हणून जन्मलास ह्यात तुझं कर्तृत्व काय? It just happened to be so. मग त्या गोष्टीचा अभिमान कसा बाळगता येईल ज्यात आपले काहीच कर्तृत्व नाही? शिवाय ह्या हिंदू धर्मात अनेक अनिष्ट चालीरीती, रूढी होत्या आणि आहेत मग त्याचा सरसकट अभिमान कसा बाळगता येईल? हा माझा युक्तिवाद. पण माझ्या मित्राने मला उलट प्रश्न विचारून निरुत्तर केलं – तुला भारतीय असल्याचा अभिमान आहे? आपल्या आई-वडिलांची मुलगी असल्याचा अभिमान आहे? आणि असेल तर त्याचं justification कसं करशील कारण भारतात जन्माला येणं किंवा अमुक एका दाम्पत्याच्या पोटी जन्माला येणं ह्यातदेखील तुझं कर्तृत्व काहीच नाही! खरंच की! मग म्हणजे अभिमान ही नक्की काय चीज आहे? मला शिवाजी महाराजांबद्दल वाटतो तो अभिमानच ना? आपली भारतीय टीम क्रिकेटच्या मैदानात विजयी होते तेव्हा त्यांचा अभिमान वाटतो तर त्यात माझं कर्तृत्व काय असतं?
जितका विचार करत गेले तितकी ही अभिमान नावाची भावना कठीण वाटायला लागली. ह्या विचारांत एका क्षणी ब्रेने ब्राऊन यांचा TED talk (The power of vulnerability) आठवला. मी जो TED talk भाषांतरीत केला होता त्यात डॉ. ब्राऊन यांनी म्हटलं होतं की मानवी नातेसंबंध (connections) हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. आणि शरम ही भावना नातेसंबंध तुटण्याच्या भीतीतून जन्माला येते. “Shame is fear of disconnection. Is there something about me that if other people know or see, I won’t be worthy of connection?” ही वाक्यं ब्रेने ब्राऊन यांच्या TED talk मधली. ही वाक्यं आठवली आणि अचानक डोक्यात प्रकाश पडला – shame is fear of disconnection! ओह! आणि अभिमान आणि शरम ह्या दोन विरुद्धार्थी भावना आहेत. म्हणजे जर fear of disconnection मधून शरम/लाज ही भावना निर्माण होते तर मग अभिमान ह्या भावनेचं reasoning काय असेल? बराच विचार केल्यावर मला जाणवलं की अभिमान ह्या भावनेचं मूळ देखील fear of disconnection मध्येच आहे. आपली स्वतःची एक ओळख असते. एक व्यक्ती म्हणून, एका कुटुंबाचा, भाषिक समुदायाचा, समाजाचा, जातीचा, धर्माचा, देशाचा, व्यवसायाचा आपण हिस्सा असतो. ह्या सगळ्याशी connected असतो आणि ह्या संबंधांमध्ये एक प्रकारची सुरक्षितता असते. त्यामुळे आपण connected राहू इच्छितो. आणि मग आपण ह्या दोन भावनांचा आधार घेतो. एक म्हणजे शरम – ज्याने हे संबंध तुटतील अशा गोष्टी न करणे, टाळणे अथवा लपवणे. आणि दुसरी म्हणजे अभिमान – माझ्या identity चा, ओळखीचा जी मला माझ्या connections मुळे मिळाली आहे. आणि मग हे संबंध टिकून राहण्यासाठी माझ्या ओळखीशी संबंधीत एखाद्या चांगल्या गोष्टीचा अभिमान बाळगला तर मी माझ्या संबंधांशी अधिक एकनिष्ठ/जोडलेला राहीन ह्या जाणीवेतून अभिमान पोसला जातो. पण ज्या प्रकारे लाज/शरम ही भावना वाईट कृत्ये करण्यापासून परावृत्त करते त्याच प्रकारे ती वाईट कृत्ये लपवायला/दडपायला प्रवृत्त देखील करते. म्हणजे शरम ही भावना चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम घडवू शकते. तसंच काहीसं अभिमानाचं आहे. अभिमान ही एक दुधारी भावना आहे. ज्याच्या एका बाजूला प्रेम, आदर, कौतुक अशा चांगल्या भावना जोडल्या जातात तर दुसऱ्या बाजूला अतिरेक, कट्टरता आणि अंधविश्वास अशा विघातक भावना. पुलंच्या तुम्हाला कोण व्हायचंय – पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर ह्यातलं सुरूवातीचं वाक्य खूप मोलाचं आहे. – महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्तपणाची जाणीव वाढीस लागलेली आहे. म्हणजे माझ्या ओळखीला जेव्हा धोका निर्माण झाल्यासारखा वाटतो किंवा निर्माण होतो तेव्हा मी ते नातेसंबंध अधिक प्राणपणाने जपू पहातो. आज तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जग इतकं जवळ आलं आहे की माणसाच्या प्रादेशिक, भाषिक अस्मितांना, ओळखींना धोका निर्माण झाल्याचे भासते! (बरेचदा “भासते” कारण खरोखरी धोका किती आणि नक्की कुणा आणि कशापासून ह्याचे विश्लेषण केले तर चित्र वेगळे असू शकते). आणि मग संबंध आणि त्या संबंधातून तयार होणारी ओळख टिकून ठेवण्यासाठी अभिमानाच्या काठीचा आधार शोधला जातो. त्यातून मग टिळक पुण्यातिथीच्या दिवशी आगरकरांविषयीचा जाज्वल्य अभिमान (अर्थात पुन्हा पुलं!) असे प्रकार सुरु होतात. ह्या असल्या अभिमानाची भावना बहुदा दुसऱ्या म्हणजे अतिरेकी धारेची असते आणि तिने काही साध्य होत नाही. आपल्या insecurities(भयगंड), न्यूनगंड आदी झाकण्यासाठी जेव्हा अभिमानाला वेठीस धरले जाते तेव्हा तो एक खेळ होतो – आपली रेघ मोठी करण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्याचा.
जितका जास्त विचार होतोय तितका अभिमान ह्या भावनेतला फोलपणा जाणवतो आहे. कारण ह्या भावनेची नकारात्मक बाजू सतत सामोरी येते आहे आणि सकारात्मक बाजू फारशी दिसत नाहीये. जसा नास्तिक आहे, निर्लज्ज आहे तसा अभिमान न बाळगणारा अशा अर्थाचा काही शब्द आहे का? जिथे तिथे ह्या भावनेचा नको असा आविष्कार दिसतो आहे. ह्या भावनेने फायद्यापेक्षा नुकसानच जास्ती झाले आहे का? मला तर आपल्या प्रतिज्ञेमधल्या ‘ह्या देशातील....xxx....चा मला अभिमान आहे’ हे घोकत मोठे होणे ह्यातील conditioning किती चांगले ह्याबद्दल सखोल विचार व्हावा असे वाटायला लागले आहे. ह्या नकारात्मक अभिमानाच्या भावनेने माणुसकीवर मात करू नये ह्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.
अचानक असंही लक्षात येतंय की कदाचित हा सारा विचारांचा प्रवास माझ्या एकटीचा, वैयक्तिक प्रवास आहे. मी- पणाचे वर्तुळ विस्तारण्याचा. जितके वर्तुळ मोठे तितके fear of disconnection कमी अर्थात शरम आणि अभिमान ह्या दोन्ही भावनांची गरज कमी. ह्या प्रवासाच्या वाटेवरचे माझ्या आधीचे थोर पांथस्थ काय सांगण्याचा प्रयत्न करत होते हे माझ्या थोडं थोडं लक्षात येतं आहे. ‘जिकडे तिकडे मजला माझी भावंडे दिसतात’ असं लिहिणारे कुसुमाग्रज, “भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे” असे पसायदान मागणारे ज्ञानेश्वर आणि त्याही पूर्वी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ असं म्हणणारे ऋषीमुनी. मला खात्री आहे की ही जाणीव आपल्यापैकी प्रत्येकाला होतेच कधीतरी. “तुम्ही कोण?” असं विचारल्यावर आपल्याला जी ओळख सांगावीशी वाटते त्या वर्तुळात आपण सुखी (comfortable) असतो. ज्यांना फक्त माणूस किंवा त्याही पलीकडे जाऊन एक प्राणी एवढीच ओळख पुरते त्यांचे वर्तुळ खूप मोठे! मग त्या वर्तुळात सारे विश्वच सामावलेले असते. जर माझी ओळख एक मराठी अशी असावी किंवा भारतीय अशी असावी असं वाटत असेल तर मग माझ्या वर्तुळात काही जण येऊ शकणार नाहीत. आणि मग त्यांच्या आणि माझ्या शरमेच्या आणि अभिमानाच्या जागा जुळणार नाहीत. मग त्यातून कदाचित संघर्ष निर्माण होईल. अर्थात व्यक्तीकडून समष्टीकडे हा जसा एका व्यक्तीचा प्रवास आहे तसा एका समूहाचा देखील आहे. जितकं समूहातील व्यक्तींचं वर्तुळ मोठं तितकं समूहाचं वर्तुळ मोठं आणि तितकाच तो समाज अधिक सहिष्णू.
आजही मला हे अभिमानाचं कोडं संपूर्णपणे सुटल्यासारखं वाटत नाही. हां, विचारांत थोडी अधिक स्पष्टता आली आहे हे नक्की. माझा हा शोध असाच चालू राहणार आहे. सध्या तरी अभिमान ह्या भावनेची गरज कमी कमी होत जावी असा प्रयत्न चालू आहे.
अवांतर: (हे खरोखरी post script = उशिरा सुचलेलं) अभिमान म्हणजे जे तुम्ही आहात आणि जे तुम्ही बनू इच्छिता यातलं अंतर. जेव्हा ह्या दोन्ही प्रतिमा एकच असतात तेव्हा अभिमान शून्य होतो. Be yourself हे म्हणणं सोपं आहे पण त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात कारण आधी तुम्ही कोण आहात ह्याचं उत्तर मिळवावं लागतं, जे सोपं नाही. When you know yourself and be yourself you realize that the emotion of pride slowly dissolves.
संदर्भ: TED talk – The power of vulnerability – Brene Brown
जात धर्म काल्पनिक बाबी आहेत.
जात धर्म काल्पनिक बाबी आहेत. नागरिकत्व भौगोलिक आहे. आई वडील जैविक सत्य आहे.
अभिमान ही वैश्विक भावना /
अभिमान ही वैश्विक भावना / सत्य आहे. त्या बद्दल लाज का बाळगावी.
प्रत्येकाला कशाना कशाचा अस्तोच...
आणि
‘जिकडे तिकडे मजला माझी भावंडे दिसतात’ असं लिहिणारे कुसुमाग्रज, “भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे” असे पसायदान मागणारे ज्ञानेश्वर आणि त्याही पूर्वी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ असं म्हणणारे ऋषीमुनी. ही आपली ओळख असेल अशा संरचनेचा मी पाईक असेन तर असा वारसा मिळाल्याबद्दल मी मराठी / भारतीय आहे म्हणून अभिमान असणं चांगलंच की....
कारण तू म्हणते तसे अभिमान म्हणजे जे तुम्ही आहात आणि जे तुम्ही बनू इच्छिता यातलं अंतर. जेव्हा ह्या दोन्ही प्रतिमा एकच असतात तेव्हा अभिमान शून्य होतो.
पण मी जेव्हा असा अभिमान बाळगेन तेव्हाच हे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करेन ना !
प्रत्येकाला कशाना कशाचा
प्रत्येकाला कशाना कशाचा अभिमान असतोच उदा.
गेले काही काळ नियमितपणे मी सकाळी उठून फिरायला जातो.
मला माझ्या लाईफ स्टाईलचा अभिमान वाटतो.
मग मला कळतं अजूनही असे बरेच जण आहेत ते सकाळी उठून घराबाहेर पडतात. माझा अभिमान कमी होतो.
मग कळतं त्यातले काही नुसते चालत नाहीत पळतात देखिल
मग मी देखिल पळायला लागतो. मला त्याचा अभिमान वाटायला लागतो,
मग कळतं माझ्या सारखी अजूनही इतर माणसं पळतात नुसती पळत नाहीत तर मॅरॅथॉन पळतात.
मग मी मॅरॅथॉन पळायला सुरुवात करतो मला त्याचा अभिमान वाटतो.
मग कळतं माझ्यापेक्षा प्रतिकूल परिस्थिती असलेली माणसे अशीच मॅरॅथॉन पळतात. मग माझा अभिमान कमी होतो. पण मग मला माझ्या वेगाचा अभिमान वाटू लागतो.
मी चालण्याच्या स्टेजला असताना पळणारे माझ्याकडे तुच्छ कटाक्ष टाकत असतात आणि मी घरातच झोप काढणार्यांकडे बघून ... असे तु क पण आपापल्या जागी योग्यच आहेत की.
विशेषतः असे तु क टाकणारी माणसं बहुत संख्येने आसपास असताना माझे अभिमान विषय मला जगण्याला माझ्या अस्तीत्वाला कारण पुरवतात.
(मिन्व्हाईल तु क आपल्याला दुखावत असले तरी प्रेरणा म्हणूनही वापरता येतात )
अभिमान गर्वात रुपांतरित होत नाही तोपर्यंत चांगलाच म्हणेन मी...
रच्याकने - लेख विचार प्रवर्तक आहे आणि फारच जास्त विचार करतेस बुवा तू
विषय गुंतागुंतीचा आहे खरेच...
विषय गुंतागुंतीचा आहे खरेच... म्हणजे मला ज्याचा अभिमान वाटतो, त्याच्या गणतीत तरी मी असतो का ? बहुदा नाहीच. ( अगदी ओळखीत वा नात्यात असतील तरच असेल ) मग मला असे वाटते कि अभिमान बाळगून किंवा व्यक्त करून मी त्या व्यक्तीशी, देशाशी किंवा बाबीशी नाते जोडू पाहतोय... केविलवाणा प्रयत्नही असू शकेल हा.
( सध्या सुचले ते एवढेच !! )
खूपच वैचारिक आहे.. असाही
खूपच वैचारिक आहे.. असाही विचार करतात हे हि आहेच ..
पण माझ स्वतःच मत आहे ... कि Waiting for a day when people Will proudly say , "YES I AM A HUMAN BEING "
किती व्यवस्थित लिहलयसं.. मला
किती व्यवस्थित लिहलयसं..
मला अभिमान चांगलाच वाटतो पण त्याचा माज होवु नये नंतर..
हर्पेनला +१... तुमच्या सगळ्याच पोस्टी अगदी नीट मुद्देसुद असतात
लेख आवडला .
लेख आवडला .
उत्तम लेख ! असले विचार करत
उत्तम लेख !
असले विचार करत राहावेत अधूनमधून.
हिंदू असणे वा भारतीय असणे, आपले यात काही कर्तुत्व नसतेच हे खरेय. तरी आपण या गोष्टींचा अभिमान बाळगतो ते त्याच्याशी जोडले राहायला.
जसे मुंबई विरुद्ध पुणे वाद घालताना मी मुंबईकर असल्याचा अभिमान उफाळून येतो. पण पुण्याबद्दल काही आकस मनात नसतो वा राहत नाही कारण आपण सारे मराठी महाराष्ट्रीय आहोत हे देखील आपल्याला माहीत असते. मग मराठी गुजराती करताना मराठीचा अभिमान उफाळून येतो पण गुजरात्यांबद्दल तितकाही आकस नसतो कारण उद्या पाकिस्तानशी युद्ध झाल्यास आपल्या सर्वांना एकजुटीनेच लढायचेय हे ठाऊक असते. भारतीय असल्याचा जितका अभिमान वाटतो तितका पृथ्वीकर असल्याचा वाटत नाही कारण अजून कोण्या एलियनशी लढण्यास आपण सारे एकत्र आलो नाहीत किंवा तुर्तास तशी शक्यता नाहीये.
जातीधर्माचा अभिमान बाळगणे मात्र मी अक्कल आल्यापासूनच सोडून दिलेय. कारण तो अभिमान आपल्या जातीधर्मातील चांगल्या गोष्टींपुरताच न राहता इतरांच्या कश्या वाईट आहेत हे दाखवण्यातही सुखावतो. त्यामुळे जर हा अभिमान एखाद्या समूहाशी आपल्याला जोडताना ईतरांशी तोडत असेल तर तो वृथा आहे.
लेख आवडला. हर्पेनच्या
लेख आवडला.
हर्पेनच्या पोस्टीही छान.
ऋन्मेष, तू कधी कधी कठीण गाठ अलगद सोडवल्यासारखं लिहून जातोस. वरची पोस्ट आवडली.
विचार प्रवर्तक लेख!
विचार प्रवर्तक लेख! आवडला!
...शेवटच्या मुक्कामापेक्षा अनेकदा प्रवास अधिक महत्वाचा असतो.... +१००
कारण या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याचे वेगळे असणार.
हर्पेन--अनुमोदन.
ऋन्मेष--१००% अनुमोदन
टेड टॉक म्हणजे मराठीत काय?
टेड टॉक म्हणजे मराठीत काय?
मयुरी - तुझ्या आशावादाचे
मयुरी - तुझ्या आशावादाचे फलस्वरूप दिसायला ऋन्मेष म्हणतो तसे एलियन्स सारखे काही कारण मिळाल्याशिवाय शक्य होईल असे वाटत नाही.
चनस, कसचं कस्चं पण धन्यवाद
ऋन्मेष - मस्त प्रतिसाद.
हा शब्दछल नाही पण इतरांच्या कश्या वाईट आहेत हे दाखवण्यातही सुखावतो तो दुराभिमान
स्वगत - आपल्या मराठीत देखिल वेगवेगळ्या छटा दर्शवणारे कितीतरी शब्द आहेत पण वापरले जातच नाहीत. दुराभिमान शब्द किती दिवसांनी वापरला मी
साती +१
मराठीत टेड टॉक कुठे आहे मलाही आवडेल ऐका / बघायला
चांगला विचार करते आहेस आणि
चांगला विचार करते आहेस आणि चांगलं मांडलंही आहेस.
मी देखील अनेक वर्ष ह्या विचारात होते. असेच प्रश्न पडायचे. माझ्या 'अमुक असण्याचा, तमुक असण्याचा' अभिमान माझ्या आयुष्यात फार लवकर गळून पडला. घरातलं वातावरण, वाचन आणि आजूबाजूच्या लोकांचे विचार ह्यामुळे. पुढे अमेरीकेत शिक्षण घेताना खूप मोठं मोठं काम केलेली खूप डाऊन टू अर्थ लोकं पाहिली. त्यामुळे अभिमान कशाचा आणि का बाळगायचा? हा प्रश्न खूपदा पडायला लागला, तू लिहिलं आहेस तसाच. त्यावर खूप डिसक्शनस व्हायला लागली, वाचन, चिंतन व्हायला लागलं.
२-३ वर्षांपूर्वी विपश्यना करताना जाणवलं की आपण नकळत इमेजच्या चौकटीत अडकत आहोत. मग हळूहळू जाणीवपूर्वक, लक्ष त्याही चौकटी मोडायचा प्रयत्न चालू आहे.
आता हर्पेन ने नमूद केल्या आहेत त्या इतरही गोष्टीतला अभिमान कमी करत आणतीये. हर्पेन म्हणला तसं आता रनिंग केलं , सायकलींग राईड पूर्ण केली, किंवा अजून काही तर आता मी ते एंजॉय करतीये का ह्याकडे जास्त लक्ष देते, रादर दॅन ते केल्याने मला अभिमान वाटतोय का ह्यापेक्षा ! अगदी फेसबुक किंवा कुठे लिहिताना सुद्धा 'फीलींग प्राऊड' असं लिहिलं जात नाही... हॅपी किंवा थ्रील्ड असंच वाटतं आणी तसंच लिहिलं जातं.
अजून खूप गोष्टींवर काम करायचं अर्थातच बाकी आहे.. पण निदान विचाराची प्रोसेस आणि आचारात आणणं नक्कीच चालू आहे ह्याबद्दल समाधान आहे
शिवाय अभिमान न बाळगणं म्हणजे लाचार असणं किंवा सबमीसीव्ह असणं असं डायरेक्ट उलट समीकरण फार इझीली समजलं जातं. हा देखील विचार करण्याचा मुद्दा आहे.
जिज्ञासा, छान लिहीलं आहेस. या
जिज्ञासा, छान लिहीलं आहेस. या विषयावर काहीच दिवसांपूर्वी रारशी चर्चा झाली होती. मी अजूनही मधेच कुठेतरी फसलेली आहे हे नक्की. तुझा लेख (आणि त्यावरची चर्चा ) होपफुली विचारांत अजून स्पष्टता आणायला मदत करेल.
मस्त लिहिलेस जिज्ञासा. रारने
मस्त लिहिलेस जिज्ञासा.
रारने वर लिहिले तसे अभिमान हळुहळू गायब झाले आहेत. मुख्य प्रभाव देशांतराचा. साधे सातार्याहून सांगलीला शिकायला जाणे, महाराष्ट्रातून कर्नाटकात नोकरी करायला जाणे अश्या प्रवासातही विस्तारलेल्या क्षितिजाचा महत्वाचा परिणाम म्हणजे अभिमान वाटण्यासारख्या गोष्टी कमी होत जातात असे मला वाटते. एकंदरित सगळीकडची माणसे, संस्कृती, पद्धती, खेळ, खाणे पुष्कळसे सारखे आणि पुष्कळसे वेगळे (एव्ह्रीवन युनीक) असतात.
हल्ली प्राउड/ अभिमानी अशी भावना एकंदर तांत्रिक प्रगती संदर्भात (ए आय) येते किंवा चिरंजिवांची मुक्ताफळे ऐकून.
जिज्ञासा चांगलं लिहिलं
जिज्ञासा चांगलं लिहिलं आहेस.
उशीरा सुचलेलं देखील अगदी पूरक आहे आणि व्यवस्थित मांडलं आहेस. सहसा अपूर्ण विषय्/विचार मांडताना ते विस्कळीत वाटायचा धोका असतो. ते या लेखात अजिबात जाणवत नाही.
अवांतर - खूप विचार करतेस ब्वा तू
<समूहातील व्यक्तींचं वर्तुळ
<समूहातील व्यक्तींचं वर्तुळ मोठं तितकं समूहाचं वर्तुळ मोठं आणि तितकाच तो समाज अधिक सहिष्णू<> स्वामी विवेकानंदाच्या शिकागोतील भाषणाची आठवण झाली.
हर्पेनचे < अभिमान गर्वात रुपांतरित होत नाही तोपर्यंत चांगलाच म्हणेन मी> हे मत पटले.
'माझं कर्तृत्व' ह्याचा अभिमान योग्य असेल तर ते कर्तृत्व करण्यासाठी लागणारी परिस्थिती, शारीरिक क्षमता, हुषारी, इच्छा शक्ती इत्यादी हेही केवळ 'माझ्यामुळे' होत नाही. त्यामुळे त्याचाही अभिमान असायची गरज नाही.
साती... टेड टॉक..
साती... टेड टॉक.. https://www.ted.com/about/our-organization
जिज्ञासा, अतिशय विचार करायला
जिज्ञासा, अतिशय विचार करायला लावणारा लेख लिहिलाय तुम्ही. त्याबद्दल आधी आभार.
मध्यंतरी एका रिबेका पोलॉक नावाच्या एका विदुषिचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. त्यांनी लोणावळ्याच्या कैवल्यधाम संस्थेचे संस्थापक स्वामी कुवलयानंद यांच्यावर पी एचडी केली आहे. त्या व्याख्यानात एक मुद्दा योग संशोधनातुन सुरुवात केल्यावर स्वामीजींचा "वसुधैव कुटुंबकम" पर्यंत कसा प्रवास झाला हा होता. भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार केल्यास कदाचित काही जण असे म्हणतील कि मोक्षाच्या वाटेवर साधना करत असताना षडरिपुंपासुन मुक्त होत, मनाच्या गाठी सुटत सुटत हळु हळु विश्वमानवाला कवळण्याची क्षमता माणसात येते आणि मग त्याला कुणी परका असा वाटतच नाही. भारतीय तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातुन यावर विचार केला तर खुप काही लिहिण्यासारखं आहे. मात्र या प्रश्नाचा विचार मला वैयक्तिक दृष्टीकोनातुन करायचा आहे.
सुरुवातीलाच हे मान्य करतो कि मला स्वतःला भविष्यात कधी काळी वसुधैव कुटुम्बकम ही वृत्ती बाळगुन काही गोष्टींबद्दलचा बाळगलेला कडवा अभिमान सोडता येईल अशी शक्यता आज तरी वाटत नाही.
वसुधैव कुटुम्बकम या वृत्तीची सुरुवात उदारमतवादातुन होते अशी माझी समजुत आहे. उदारमतवाद, सहिष्णुता अनेकतेत एकत्व पाहण्याची वृत्ती त्यातुन जोपासली जाते. या प्रश्नाचा समाजशास्त्राच्या दृष्टीकोनातुन जर विचार केला तर असे आढळुन येते कि जेव्हा एखाद्या धर्माचे अनुयायी कडवेपणाने वागु लागतात, जेते म्हणुन वागु लागतात, कधीकाळी जिंकलेली भुमी आमचीच अशा तर्हेचे त्यांचे वर्तन आधुनिक जगातसुद्धा दिसायला लागते तेव्हा इतर धर्मातल्या सहिष्णुतेच्या परंपरा क्रमाक्रमाने दुबळ्या होऊ लागतात. गुरुवर्य नरहर कुरुंदकरांनी अनेक ठिकाणी याची चर्चा केली आहे. जी गोष्ट समाजाच्या बाबतीत लागु होते तीच व्यक्तीच्याही बाबतीत लागु होते असे मला वाटते. समोरचा माणुस कडवेपणाने वागु लागल्यावर, त्याच्या कडवेपणाचे त्याच्या पोथीत समर्थन केले गेल्यावर, मतांसाठी राजकारणात अशा प्रवृत्तीकडे डोळेझाक केली जात आहे हे लक्षात आल्यावर मला माझा उदारमतवाद सोडावा लागतो. किंवा उदरमतवाद बाळगा असे इतरांना सांगण्यासाठी माझ्याकडे बळ राहात नाही. अशावेळी अभिमानाचा प्रश्न उफाळुन येतो. कारण इतरांसमोर माझी आयडेंटीटी सिद्ध करण्यासाठी हा अभिमान उपयोगी पडतो. त्यामुळे अभिमान सोडणे हे कधीही "वन वे" असेल असे वाटत नाही.
दुसरा मुद्दा हा जिवनातल्या संघर्षाचा आहे. या संघर्षाची धार जितकी तीव्र तितका कडवेपणादेखिल तीव्र असतो अशी माझी समजुत आहे. जुन्या काळात (आणि काही प्रमाणात आताही) माणसे जेव्हा पूर, दुष्काळ किंवा इतर काही कारणांमुळे रोजगारासाठी गावाकडुन शहरात स्थलांतरीत होत त्यावेळी त्यांच्या जातीच्या संस्था त्यांना शहरात आसरा देत. या ज्ञातीसंस्थांची उभारणी पुढे त्या त्या जातीच्या अभिमानाला कारणीभूत झाली किंबहुना व्यवहाराबरोबरच हा अभिमान देखिल या संस्थांच्या उभारणीला कारणीभुत झाला असे माझे मत आहे. आजतर यातल्या काही संस्था अतिशय ताकदवान आहेत. शिक्षण, वित्त, राजकारण, समाजकारण अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असतो. इतर कुठलाही समाज आपल्याला दारात उभा करणार नाही या खात्रीतुनच या संस्थांची निर्मिती झाली असणार. आजदेखिल या संस्था मोडण्याची सुतराम शक्यता नाही. जिवनातील संघर्ष जितका तीव्र तितक्या या संस्थांचे अस्तित्व आणि त्यांचे अभिमान तीव्र असतील असे मला वाटते. जिज्ञासा यांनी सांगीतलेला "कनेक्टेडनेस" चा मुद्दा येथे व्यवहाराच्या पातळीवर असा लागु होतो.
तिसरा मुद्दा हा ज्याला समाजशास्त्रात "कल्चरल कॅपिटल" म्हटले जाते हा आहे. हे देखिल समाज आणि व्यक्ती दोन्हीला लागु आहे. आपल्याकडे जातसंस्थेचा विषय निघाला कि ब्राह्मणांना झोडपण्याचा प्रघात आहे. मात्र अस्पृश्य म्हणवल्या जाणार्या समाजात देखिल जातीची कडवी उतरंड असुन त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाहीत. त्यांच्यात देखिल अत्यंत कडवेपणाने एकमेकांना तुच्छ लेखले जाते ही वस्तुस्थिती आहे. वैयक्तिक बाबतीत समजा मला शेक्सपियर आवडतो. पण कुणीतरी शेक्सपियर हा त्याचा सांस्कृतिक वारसा आहे असे म्हणुन मला तुच्छ लेखायला लागतो. माझ्यावर सांस्कृतिक वर्चस्व गाजवु पाहतो. अशावेळी या संघर्षात टिकण्यासाठी मला कालिदासाचा अभिमान बाळगणे आवश्यक ठरते. हा अभिमानाचा प्रश्न वाटतो तेवढा साधा सोपा नाहीच. हा जगण्याशी निगडीत आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
चौथ्या मुद्द्यात मला आणखि वैयक्तिक पातळीवर उतरण्याची इच्छा आहे. माझ्यासारखा माणुस जो काही काळ ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकला आहे. ज्याने पुढे वर्षभर म्युनिसिपाल्टीच्या शाळेतदेखिल काढले आहे. त्याच्यासमोर मोठमोठ्या संस्थांमध्ये शिकलेली आणि त्यां संस्थात शिकलो म्हणुन अभिमान बाळगणारी मंडळी मानाने मिरवत असतात. समाजात त्यांना मान मिळत असतो हे मी पाहतो. मग माझ्याही मनात कुठलातरी कडवा बाळगता येईल अशी गोष्ट शोधण्याच्या बीजाचे रोपण होते. मी कसलातरी अभिमान बाळगायला हवा किंवा अशा अभिमान बाळगणार्या माणसांसमोर नेहेमी तिरस्कृत राहायला हवं एवढे दोनच पर्याय माझ्यासमोर असतात. त्यामुळे मी पहिला पर्याय निवडतो.
शेवटचा मुद्दा हा दुसर्यावर वर्चस्व गाजवण्याच्या मानवी प्रवृत्तीचा आहे. माझ्याकडे शंभर रुपये असतील तर बरेचदा ज्याच्याकडे नव्याण्णव रुपये आहेत त्याच्यासमोर ती नोट नाचवुन त्यास खजिल करेपर्यंत ते शंभर रुपये माझ्याकडे असण्याचा आनंदच मला होत नाही. अभिमान हा फक्त परंपरेचा आणि संस्कृतीचाच असतो असं थोडंच आहे? तो संपत्तीचा आणि ज्ञानाचा देखिल असतोच. शिक्षणक्षेत्रात स्वत:ला असलेल्या ज्ञानाचा अभिमान असलेली अनेक विद्वान मंडळी पाहिलीत. आणि या ज्ञानाचा उपयोग हि मंडळी इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी सर्रास करतात. त्यामुळे ही वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत अभिमान बाळगण्याची वृत्ती जाणार कशी? अभिमान बाळगणे आणि वर्चस्व गाजवणे या मला एकाच नाण्याच्या दोन बाजु वाटतात. श्रेष्ठतेचा अभिमान असल्याशिवाय इतरांना तुच्छ लेखता कसे येईल?
त्यामुळे जोवर जीवनात तीव्र संघर्ष आहे आणि जोवर कुणीतरी मला श्रेष्ठतेच्या अभिमानातुन सतत खाली पाहायला लावीत आहे तोपर्यंत "वसुधैव कुटुम्बकम" ही वृत्ती मला तरी बाळगणे कठीण वाटते आहे.
प्रतिसाद थोडा लांबला आहे. माझ्या या दीर्घ प्रतिसादाबद्दल जिज्ञासा मला क्षमा करतील अशी आशा आहे.
जिज्ञासा यांचा लेख आणि त्यावर
जिज्ञासा यांचा लेख आणि त्यावर एका मागोमाग एक अशा रितीने आलेले अतिशय प्रभावी प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचावेत इतक्या सक्षमतेने सर्वांनी आपल्या विचारांची अत्यंत समर्थपणे मांडणी केली आहे.
दिवाळी अशा वाचन आनंदाने बहरून जात आहे, यापेक्षा दुसरे मानसिक समाधान कोणतेच नाही.
इतरांना कदाचित माहीत नसेल पण श्री.अतुल ठाकुर हे समाजशास्त्राचे अभ्यासक आणि संशोधक आहेत. राज्याच्या (आणि राज्याबाहेरच्याही) विविध प्रांतात घडत असलेल्या सामाजिक स्थित्यंतरांचा ते सखोल असा अभ्यास करत असल्यामुळेच त्यानी वरील प्रतिसादात अखेरीस "...त्यामुळे जोवर जीवनात तीव्र संघर्ष आहे आणि जोवर कुणीतरी मला श्रेष्ठतेच्या अभिमानातुन सतत खाली पाहायला लावीत आहे तोपर्यंत "वसुधैव कुटुम्बकम" ही वृत्ती मला तरी बाळगणे कठीण वाटते आहे...." ~ हा जो निष्कर्ष काढले आहे त्यामागे निश्चित्तच त्यांचा समाजाचा गाढ असा अभ्यास आहे...म्हणून कल्पनेबाबत विचार करायला प्रवृत्त करणारा आहे.
खूप सुंदर लेख. ती एक
खूप सुंदर लेख. ती एक बोरकरांची कविता आहे ना..
"जीवन त्यांना कळले हो
मी पण ज्यांचे
पक्व फळापरी सहजपणाने
गळले हो,
जीवन त्यांना कळले हो".
रार खूप छान अभिप्राय नोंदवला
रार खूप छान अभिप्राय नोंदवला आहे.
अभिमान आणि अस्मिता ह्यात
अभिमान आणि अस्मिता ह्यात गल्लत झालेली दिसत आहे.
अभिमान स्वकर्तृत्त्वातून येतो. अस्मिता आपण स्वतः काहीही केलेले नसतानाही निर्माण झालेली असू शकते. जन्मदाते, जात, धर्म, गाव, राज्य, राष्ट्र, भाषा, आर्थिक स्तर, घराण्याचा पूर्वेतिहास ह्यातून जे निर्माण होते ती अस्मिता असते, अभिमान नव्हे. अस्मिता दुखावली जाऊ न देणे हे आपल्याला शक्य असते. मात्र तसे प्रयत्न करताना बहुतेक कोणी दिसत नाही. तसे प्रयत्न करणारे संतपदाकडे प्रवास सुरू करतात. पण संतपदाकडे जाण्यासाठी अभिमानही त्यागावा लागतो, फक्त अस्मिता नव्हे.
आज सर्वत्र जे काही सामाजिक / राजकीय वाद चाललेले आहेत त्यातील बहुतेकांचे स्वरुप 'अस्मिता दुखावण्यातून निपजलेले वाद' असेच आहे.
मी व्यवस्थित अभ्यास करून चांगले गुण मिळवले, सातत्याने व्यायाम करून सुदृढ शरीर कमावले, मेहनत करून उच्चपदस्थ झालो, एखाद्या स्त्रीने सर्वांदेखत गल्लीतल्या गुंडाला चपराक हाणली वगैरे गोष्टी ह्या त्या त्या व्यक्तीसाठी 'अभिमानास्पद' गोष्टी ठरतात कारण त्यात स्वकर्तृत्त्व आहे. (आता तितपत कर्तृत्त्ववान होण्यासाठीही जेनेटिक्स, सभोवताल, संस्कार, इतिहास वगैरे कारणीभूत असतो हा मुद्दा ही ह्या चर्चेची पुढची पायरी ठरेल, ह्याच पातळीला ती चर्चा करणे बरोबर ठरणार नाही).
पणजोबा सरदार होते, आमच्या राज्यात पूर्वी महाराजांचे स्वराज्य होते, मी मराठी भाषिक आहे, मी हिंदू आहे, मी साडे शहाण्णव कुळी आहे, ह्या सगळ्या अस्मितेशी निगडीत बाबी आहेत. अस्मिता समाज आपल्याला देऊ करतो, ती घ्यायची की नाही, किती प्रमाणात घ्यायची ह्यावर आपण आपले विचार बदलत राहू शकतो. अधिकाधिक सुजाण होऊ शकतो. म्हणजे, तसे करण्याचा चॉईस माणसाकडे असतो, तो त्याने घ्यावा की नाही हे ज्याचे तो ठरवतो.
बेफि.. अस्मिता हा शब्द हल्ली
बेफि.. अस्मिता हा शब्द हल्ली कुणी फारसा वापरताना दिसत नाही. आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेतही अभिमान असाच शब्द आला. माझे वरचे पोस्ट मग, अस्मिता या भावनेसाठी आहे.
मग अभिमानाचे म्हणाल तर मला तो फारसा वाटत नाही कारण लहानपणापासून आपली तूलना आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींशी कर, असे संस्कार झालेत आणि तशी माणसं कायम आजूबाजूला होती.. आणि मुख्य म्हणजे त्यांना स्वतःचा अजिबात अभिमान नव्हता.
मग तूम्ही म्हणता तसे, अस्मिता ही "देण्यात" येते. म्हणजे पुरस्कार वगैरे देतात तसे. मला नेमके कोण म्हणाले ते आठवत नाही, पण एका पुरस्कार सोहळ्यात एक व्यक्ती म्हणाली होती, कि या स्पर्धेत, या वेळी भाग घेतलेल्या स्पर्धकांमधेच आणि तेही केवळ याच वेळी मी प्रथम आलो आहे... मग तो "सर्व"श्रेष्ठ पुरस्कार कसा ?
सगळ्या प्रतिसाद देणाऱ्यांचे
सगळ्या प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार! तुमच्या सर्वांच्या प्रतिसादातून माझ्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता येते आहे.
हर्पेन, रार, आणि अतुल ठाकूर तुमचे प्रतिसाद वाचून लक्षात आलं की अभिमान दोन प्रकारचा असू शकतो - एक म्हणजे व्यक्तिगत - अशा गोष्टी मिळवल्याने ज्यातून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध होते (कौशल्य/क्षमता उदा. सायकलिंग, किंवा उच्च शिक्षण, उच्च पद, पैसा/संपत्ती वगैरे) आणि सामूहिक - आपल्या ओळखीशी निगडीत असलेल्या गोष्टींचा अभिमान.
व्यक्तिगत अभिमान - हा बाळगताना एकीकडे तो गर्वात रुपांतरीत होत नाहीये ना अशी शक्यता असू शकते किंवा प्रत्येक कर्तृत्वाच्या क्षेत्रात आपल्यापेक्षा अधिक पुढे गेलेली लोकं पाहून आपल्याला व्यक्तिगत अभिमान गळून पडू शकतो. त्याची गरज वाटेनाशी होते.
सामूहिक अभिमान - आपल्या ओळखीमुळे बाळगला जाणारा अभिमान. अतुलजी, तुमच्या प्रतिसादातून मला खूप काही नवीन मिळाले! हा असा अभिमान बाळगण्याची गरज आणि फायदे जे तुम्ही तुमच्या प्रतिसादात स्पष्ट केलेत ते फार महत्वाचे आहेत. मी त्यावर नक्की विचार करेन!
साती, मनीष यांनी वर TED website ची लिंक दिली आहेच. मी ज्या TED talk चा उल्लेख केला आहे त्याची लिंक ही https://www.ted.com/talks/brene_brown_on_vulnerability?language=en आणि मी त्यावर लिहिलेल्या लेखाची लिंक (माझी रिक्षा!) http://www.maayboli.com/node/48591
तू फार विचार करतेस बुवा - काय करणार! आदतसे मजबूर
दिनेश, >>>मग तूम्ही म्हणता
दिनेश,
>>>मग तूम्ही म्हणता तसे, अस्मिता ही "देण्यात" येते. म्हणजे पुरस्कार वगैरे देतात तसे<<<
मला असे म्हणायचे नाही की अस्मिता पुरस्कारांप्रमाणे देण्यात येते. अस्मिता समाज देतो ह्यातून असे म्हणायचे आहे की तो बाह्य घटक आहे. जो माणसाच्या मनात आपोआप निर्माण झालेला नसतो तर बाह्य फोर्सेसकडून निर्माण करवला जातो व माणसाला ती स्वतःची ओळख किंवा ओळखीचा एक भाग वाटू लागते. पुरस्कार हे माणसाच्या कर्तृत्त्वासाठी दिले जातात. त्यांचा अभिमानच वाटायला हवा, जर ते योग्यतेनुसार दिले गेले असतील तर!
डॉ. कलाम ह्यांनी एक मुसलमान म्हणून अस्मिता न बाळगता स्वतःच्या महान कार्याचा रास्त अभिमान बाळगून पुढील पिढ्यांना मार्गदर्शन केले. महाराजांनी मराठा असण्याची अस्मिता न बाळगता अत्याचार पीडितांना हक्क मिळवून दिल्याबद्दल अभिमान बाळगून राज्याभिषेक स्वीकारला. त्या अत्याचार पीडितांमध्ये मराठाबाह्य असलेले तसेच हिंदू नसलेलेही घटक होतेच. तेंडुलकरवरून वाद होतात तेव्हा दोन्ही बाजूंच्या अस्मिता दुखावतात. प्रत्यक्षात त्या विषयात कोणीच कर्तृत्त्व गाजवलेले नसल्याने एकमेकांशी वाद घालणारे स्वतःच्या अस्मितेसाठी वाद घालत असतात.
मुसलमान म्हणुन अस्मिता
मुसलमान म्हणुन अस्मिता बाळगली तर प्रगती होत नही का ?
पंढरपुरात भंगी अजुनही मानवी
पंढरपुरात भंगी अजुनही मानवी विष्ठा डोक्यावरुन वाहतात त्यांनी कशाचा अभिमान्,अस्मिता बाळगावी?
देशाची,धर्माची,जातीची की व्यवसायाची?
नॉर्थ कडे माणसाने माणसाला ओढायचे रीक्षे आहेत त्यांनी कशाचा अभिमान्,अस्मिता बाळगावी?
लेखिकेचे चिंतन-मनन चांगले आहे याला योग्य मार्ग मिळाला तर नक्किच काही तरी चांगले प्राप्त होईल.
कुठलेही पुर्वग्रह, पुर्वसंस्कार बाजुला ठेउन आत्मशोध घेतल्यास निसर्ग नक्किच मदत करतो.
उत्तम लेख जिज्ञासा. आवडला.
उत्तम लेख जिज्ञासा. आवडला.
जिज्ञासा, लेख आवडला आणि
जिज्ञासा, लेख आवडला आणि प्रतिसादही वाचनीय!
अतुल ठाकुर,
जिज्ञासाचा लेख वाचल्यापासून मनात विचारांचा बराच गोंधळ झाला होता त्यामुळे इथे काहीच लिहिले नाही. तुमच्या प्रतिसादाने मनातला गोंधळ दूर होण्यास फार मदत झाली. धन्यवाद.
Pages