अभिमान आणि ओळख

Submitted by जिज्ञासा on 10 November, 2015 - 03:05

हा लेख जवळपास सहा महिन्यांपूर्वी पेपरवर लिहून काढला होता. तो लिहितानादेखील सलग नव्हता. सध्या हातात असलेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून मी लेख संगणकावर आणताना त्यात थोडी सुसूत्रता आणली. तरीही हा लेख अपूर्ण आहे कारण माझ्या मनात पडलेला प्रश्न अजून सुटलेला नाही. हा असा अपूर्ण लेख मायबोलीवर प्रसिद्ध करावा की नाही असा विचार बरेच दिवस रेंगाळत होता. पण आज दिवाळीच्या दिवशी असं वाटतंय की शेवटच्या मुक्कामापेक्षा अनेकदा प्रवास अधिक महत्वाचा असतो. ह्या दिवाळीला “तमसो मा ज्योतिर्गमय” असं म्हणत हा प्रवास प्रसिद्ध करत आहे.
___________________________________________________________________________
मध्यंतरी एका TED talk चे मराठीत भाषांतर केले त्यावेळी मनात काही विचार आले होते आणि ते मी लिहून काढले होते. पण बहुतेक कुठेतरी आत हाही विचार आला होता subconsciously. मागे वळून पाहताना ह्या विचाराचा प्रवास तिथून सुरु झाला असावा असे वाटते. I incubated these thoughts for a long time. एकदा एका मित्राशी वाद घालताना पुन्हा ह्या विचारावर येऊन अडले. तेव्हा जाणवलं की हा विषय बराच गुंतागुंतीचा आहे आणि ह्या बाबतीत माझेच विचार खूपच गोंधळलेले आहेत. आपला मेंदू फार हुशार असतो. स्वतःच्या ही नकळत आपण गोष्टी एकमेकांना जोडत जातो आणि एक दिवस अचानक सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडतो – युरेका! आज असंच काहीसं झालं आहे. आणि मी लिहायला मजबूर झाले आहे. ह्या विचाराची (प्रश्नाची) थोडी clarity आल्यासारखी वाटते. विषय/प्रश्न कळल्याशिवाय सोडवता येत नाही त्यामुळे ही पायरी देखील महत्वाची नाही का?
तर विचाराला चालना देणारी गोष्ट अशी की जेव्हा भारतात निवडणुकांची रणधुमाळी चालू होती तेव्हा मी कुंपणावर होते. कॉंग्रेस निवडून येऊ नये ही इच्छा पण म्हणून बीजेपीला पाठींबा द्यावा असेही वाटत नव्हते कारण बीजेपी हा secular पक्ष नाही. त्याचा जन्म हा एका हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या संघटनेतून झाला आहे. माझा मित्र बोलता बोलता म्हणाला, “मग हिंदुत्वाचा अभिमान बाळगला तर काय चूक आहे?” मी माझं लॉजिक काढलं. म्हटलं, ठीक आहे पण तू हिंदू म्हणून जन्मलास ह्यात तुझं कर्तृत्व काय? It just happened to be so. मग त्या गोष्टीचा अभिमान कसा बाळगता येईल ज्यात आपले काहीच कर्तृत्व नाही? शिवाय ह्या हिंदू धर्मात अनेक अनिष्ट चालीरीती, रूढी होत्या आणि आहेत मग त्याचा सरसकट अभिमान कसा बाळगता येईल? हा माझा युक्तिवाद. पण माझ्या मित्राने मला उलट प्रश्न विचारून निरुत्तर केलं – तुला भारतीय असल्याचा अभिमान आहे? आपल्या आई-वडिलांची मुलगी असल्याचा अभिमान आहे? आणि असेल तर त्याचं justification कसं करशील कारण भारतात जन्माला येणं किंवा अमुक एका दाम्पत्याच्या पोटी जन्माला येणं ह्यातदेखील तुझं कर्तृत्व काहीच नाही! खरंच की! मग म्हणजे अभिमान ही नक्की काय चीज आहे? मला शिवाजी महाराजांबद्दल वाटतो तो अभिमानच ना? आपली भारतीय टीम क्रिकेटच्या मैदानात विजयी होते तेव्हा त्यांचा अभिमान वाटतो तर त्यात माझं कर्तृत्व काय असतं?
जितका विचार करत गेले तितकी ही अभिमान नावाची भावना कठीण वाटायला लागली. ह्या विचारांत एका क्षणी ब्रेने ब्राऊन यांचा TED talk (The power of vulnerability) आठवला. मी जो TED talk भाषांतरीत केला होता त्यात डॉ. ब्राऊन यांनी म्हटलं होतं की मानवी नातेसंबंध (connections) हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. आणि शरम ही भावना नातेसंबंध तुटण्याच्या भीतीतून जन्माला येते. “Shame is fear of disconnection. Is there something about me that if other people know or see, I won’t be worthy of connection?” ही वाक्यं ब्रेने ब्राऊन यांच्या TED talk मधली. ही वाक्यं आठवली आणि अचानक डोक्यात प्रकाश पडला – shame is fear of disconnection! ओह! आणि अभिमान आणि शरम ह्या दोन विरुद्धार्थी भावना आहेत. म्हणजे जर fear of disconnection मधून शरम/लाज ही भावना निर्माण होते तर मग अभिमान ह्या भावनेचं reasoning काय असेल? बराच विचार केल्यावर मला जाणवलं की अभिमान ह्या भावनेचं मूळ देखील fear of disconnection मध्येच आहे. आपली स्वतःची एक ओळख असते. एक व्यक्ती म्हणून, एका कुटुंबाचा, भाषिक समुदायाचा, समाजाचा, जातीचा, धर्माचा, देशाचा, व्यवसायाचा आपण हिस्सा असतो. ह्या सगळ्याशी connected असतो आणि ह्या संबंधांमध्ये एक प्रकारची सुरक्षितता असते. त्यामुळे आपण connected राहू इच्छितो. आणि मग आपण ह्या दोन भावनांचा आधार घेतो. एक म्हणजे शरम – ज्याने हे संबंध तुटतील अशा गोष्टी न करणे, टाळणे अथवा लपवणे. आणि दुसरी म्हणजे अभिमान – माझ्या identity चा, ओळखीचा जी मला माझ्या connections मुळे मिळाली आहे. आणि मग हे संबंध टिकून राहण्यासाठी माझ्या ओळखीशी संबंधीत एखाद्या चांगल्या गोष्टीचा अभिमान बाळगला तर मी माझ्या संबंधांशी अधिक एकनिष्ठ/जोडलेला राहीन ह्या जाणीवेतून अभिमान पोसला जातो. पण ज्या प्रकारे लाज/शरम ही भावना वाईट कृत्ये करण्यापासून परावृत्त करते त्याच प्रकारे ती वाईट कृत्ये लपवायला/दडपायला प्रवृत्त देखील करते. म्हणजे शरम ही भावना चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम घडवू शकते. तसंच काहीसं अभिमानाचं आहे. अभिमान ही एक दुधारी भावना आहे. ज्याच्या एका बाजूला प्रेम, आदर, कौतुक अशा चांगल्या भावना जोडल्या जातात तर दुसऱ्या बाजूला अतिरेक, कट्टरता आणि अंधविश्वास अशा विघातक भावना. पुलंच्या तुम्हाला कोण व्हायचंय – पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर ह्यातलं सुरूवातीचं वाक्य खूप मोलाचं आहे. – महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्तपणाची जाणीव वाढीस लागलेली आहे. म्हणजे माझ्या ओळखीला जेव्हा धोका निर्माण झाल्यासारखा वाटतो किंवा निर्माण होतो तेव्हा मी ते नातेसंबंध अधिक प्राणपणाने जपू पहातो. आज तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जग इतकं जवळ आलं आहे की माणसाच्या प्रादेशिक, भाषिक अस्मितांना, ओळखींना धोका निर्माण झाल्याचे भासते! (बरेचदा “भासते” कारण खरोखरी धोका किती आणि नक्की कुणा आणि कशापासून ह्याचे विश्लेषण केले तर चित्र वेगळे असू शकते). आणि मग संबंध आणि त्या संबंधातून तयार होणारी ओळख टिकून ठेवण्यासाठी अभिमानाच्या काठीचा आधार शोधला जातो. त्यातून मग टिळक पुण्यातिथीच्या दिवशी आगरकरांविषयीचा जाज्वल्य अभिमान (अर्थात पुन्हा पुलं!) असे प्रकार सुरु होतात. ह्या असल्या अभिमानाची भावना बहुदा दुसऱ्या म्हणजे अतिरेकी धारेची असते आणि तिने काही साध्य होत नाही. आपल्या insecurities(भयगंड), न्यूनगंड आदी झाकण्यासाठी जेव्हा अभिमानाला वेठीस धरले जाते तेव्हा तो एक खेळ होतो – आपली रेघ मोठी करण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्याचा.
जितका जास्त विचार होतोय तितका अभिमान ह्या भावनेतला फोलपणा जाणवतो आहे. कारण ह्या भावनेची नकारात्मक बाजू सतत सामोरी येते आहे आणि सकारात्मक बाजू फारशी दिसत नाहीये. जसा नास्तिक आहे, निर्लज्ज आहे तसा अभिमान न बाळगणारा अशा अर्थाचा काही शब्द आहे का? जिथे तिथे ह्या भावनेचा नको असा आविष्कार दिसतो आहे. ह्या भावनेने फायद्यापेक्षा नुकसानच जास्ती झाले आहे का? मला तर आपल्या प्रतिज्ञेमधल्या ‘ह्या देशातील....xxx....चा मला अभिमान आहे’ हे घोकत मोठे होणे ह्यातील conditioning किती चांगले ह्याबद्दल सखोल विचार व्हावा असे वाटायला लागले आहे. ह्या नकारात्मक अभिमानाच्या भावनेने माणुसकीवर मात करू नये ह्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.
अचानक असंही लक्षात येतंय की कदाचित हा सारा विचारांचा प्रवास माझ्या एकटीचा, वैयक्तिक प्रवास आहे. मी- पणाचे वर्तुळ विस्तारण्याचा. जितके वर्तुळ मोठे तितके fear of disconnection कमी अर्थात शरम आणि अभिमान ह्या दोन्ही भावनांची गरज कमी. ह्या प्रवासाच्या वाटेवरचे माझ्या आधीचे थोर पांथस्थ काय सांगण्याचा प्रयत्न करत होते हे माझ्या थोडं थोडं लक्षात येतं आहे. ‘जिकडे तिकडे मजला माझी भावंडे दिसतात’ असं लिहिणारे कुसुमाग्रज, “भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे” असे पसायदान मागणारे ज्ञानेश्वर आणि त्याही पूर्वी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ असं म्हणणारे ऋषीमुनी. मला खात्री आहे की ही जाणीव आपल्यापैकी प्रत्येकाला होतेच कधीतरी. “तुम्ही कोण?” असं विचारल्यावर आपल्याला जी ओळख सांगावीशी वाटते त्या वर्तुळात आपण सुखी (comfortable) असतो. ज्यांना फक्त माणूस किंवा त्याही पलीकडे जाऊन एक प्राणी एवढीच ओळख पुरते त्यांचे वर्तुळ खूप मोठे! मग त्या वर्तुळात सारे विश्वच सामावलेले असते. जर माझी ओळख एक मराठी अशी असावी किंवा भारतीय अशी असावी असं वाटत असेल तर मग माझ्या वर्तुळात काही जण येऊ शकणार नाहीत. आणि मग त्यांच्या आणि माझ्या शरमेच्या आणि अभिमानाच्या जागा जुळणार नाहीत. मग त्यातून कदाचित संघर्ष निर्माण होईल. अर्थात व्यक्तीकडून समष्टीकडे हा जसा एका व्यक्तीचा प्रवास आहे तसा एका समूहाचा देखील आहे. जितकं समूहातील व्यक्तींचं वर्तुळ मोठं तितकं समूहाचं वर्तुळ मोठं आणि तितकाच तो समाज अधिक सहिष्णू.
आजही मला हे अभिमानाचं कोडं संपूर्णपणे सुटल्यासारखं वाटत नाही. हां, विचारांत थोडी अधिक स्पष्टता आली आहे हे नक्की. माझा हा शोध असाच चालू राहणार आहे. सध्या तरी अभिमान ह्या भावनेची गरज कमी कमी होत जावी असा प्रयत्न चालू आहे.
अवांतर: (हे खरोखरी post script = उशिरा सुचलेलं) अभिमान म्हणजे जे तुम्ही आहात आणि जे तुम्ही बनू इच्छिता यातलं अंतर. जेव्हा ह्या दोन्ही प्रतिमा एकच असतात तेव्हा अभिमान शून्य होतो. Be yourself हे म्हणणं सोपं आहे पण त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात कारण आधी तुम्ही कोण आहात ह्याचं उत्तर मिळवावं लागतं, जे सोपं नाही. When you know yourself and be yourself you realize that the emotion of pride slowly dissolves.

संदर्भ: TED talk – The power of vulnerability – Brene Brown

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल ठाकुर, उत्तम विश्लेषण. एकदम पटले. शिवाय सगळे 'मी' असे संबोधून लिहिल्याने वादाची शक्यता कमी. Happy

अभिमानापेक्षा अस्मिता हा शब्द जास्त सूटेबल आहे हे पटले.

अस्मितेचा पॉझिटिव फीडबॅक लूप असल्याने वाढू लागली की जोमाने तशीच कमी झाली (उदारमतवाद आला) तर तेही जोमानेच होते. ट्रिगर काय ते महत्त्वाचे. असे मला वाटते. शिवाय जगण्याचे मूलभूत प्रश्न सोडवताना ती मधे येत नाही असेही.

जिज्ञासा, लेख छानच आहे.
अतुल ठाकुर, तुमचा प्रतिसादही उत्तम.
माझ्या मते आयडेंटीटी ही मुळातच आपली उत्क्रांतीमधून आलेली नैसर्गिक गरज आहे. त्यात आपल्या बुद्धीला अ‍ॅब्स्ट्रॅक्शन ची देणगी आहे. त्यामुळेच हे सामुहिक (ऑर्गनाईज्ड) अभिमान, अस्मिता ई. गोष्टी ही अतिशय हुकुमी राजकीय अस्त्र आहेत. पोस्ट-मॉडर्निस्ट तत्वज्ञानामध्ये या आयडेंटीटीच्या प्रश्नावर (आणि त्या अनुषंगाने अस्मिता अभिमान - वैयक्तिक आणि सामाजिक) बराच विचार झाला आहे. याचा एक उत्तम रिव्ह्यू इथे वाचता येईल: https://web.stanford.edu/~pmoya/DiasporaMediatore.pdf

माझ्या मते हे अभिमान, अस्मिता, कट्टरता वगैरे गोष्टी एकाच स्पेक्ट्रमचे वेगवेगळे भाग आहेत. त्यामुळे मला त्यांच्यात गुणात्मक दृष्ट्या काहीच फरक वाटत नाही. मुळात कोणत्याही गोष्टीचा मला वाटणारा अभिमान (किंवा अस्मिता वगैरे) हा त्या गोष्टिवरील माझा (किंवा माझ्या समूहाचा) एक्स्लूझिव्ह अधिकार इतरांना सांगण्याच्या गरजेतून निर्माण होतो. अशी सांगण्याची गरज मुळात स्वतःबद्दलच्या काँप्लेक्स मधून निर्माण होते. ऑर्गनाईज्ड स्वरूपात याचे रुपांतर आयडेंटीटी पॉलिटीक्स मध्ये होते. उदा. मराठी आयडेंटीटी - जी एक्स्लूझिव्हली फक्त महाराष्ट्रात राहणार्‍या आणि मराठी भाषा बोलणार्‍यालाच प्राप्त होते - चे ऑर्गनाईज्ड स्वरूप म्हणजे त्यावर आधारित राजकीय चळवळ.
असो. आत्ता तरी ही फक्त पोच. विस्तृत प्रतिसाद लवकरच.

अतुल मस्त पोस्ट !

निकित,
माझ्या मते हे अभिमान, अस्मिता, कट्टरता वगैरे गोष्टी एकाच स्पेक्ट्रमचे वेगवेगळे भाग आहेत. त्यामुळे मला त्यांच्यात गुणात्मक दृष्ट्या काहीच फरक वाटत नाही. >>>>>
ह्यातले पहिले वाक्य मान्य आहे त्या स्पेक्ट्रम मधे अहंकार गर्व ह्या गोष्टीपण अ‍ॅड करता येतील. पण दुसरे वाक्य खटकतंय...
माझ्या मते एकाच स्पेक्ट्रममधे असले तरी अभिमान हा सकारात्मक छटा दर्शवतो तर कट्टरता / गर्व नकारात्मक

अशी सांगण्याची गरज मुळात स्वतःबद्दलच्या काँप्लेक्स मधून निर्माण होते >>>>
ही गरज बाह्य कारणांमुळे निर्माण होते. कॉम्प्लेक्स / न्युनगंड ही भावना माझ्यामते निसर्ग दत्त नाही. ती बाह्य जगतातील निगेटीव्ह गोष्टींमुळे आपल्यात निर्माण होते आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीला तोंड देण्याकरता अभिमान ही भावना कामास येते.

एका फाईव्हस्टार हॉटेल बाहेर 'डॉग्ज अँड इंडियन्स आर नॉट अलॉड' अशी पाटी वाचून टाटांनी हॉटेल ताजमहाल ची उभारणी केली असं म्हणतात. हे जर खरं असेल तर त्यांच्या मधे असलेल्या भारतीयत्वाच्या अभिमाना पोटीच ना !

असो
तुझ्या विस्तृत प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....

अस्मितेमूळे ढोबळ चुकांकडेही दुर्लक्ष होते का ?

सध्या एका नेत्याच्या पेहरावावरून जे चाललेय त्यावरून वाटले असे !

Pages