मायबोली प्रशासकांना खुले पत्र

Submitted by कॉपरमाईन on 3 November, 2015 - 11:58

मान्यवर मायबोली प्रशासक,

सप्रेम नमस्कार,

गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.

एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्‍या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.

मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.

वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....

ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?

ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!

मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्‍या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्‍या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्‍या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.

राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!

मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!

या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.

मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"

अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.

मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.

आपली नम्र
वैष्णवी धारप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३००+ झाल्याबद्दल कॉपरमाईन ह्यांचे अभिनंदन! धाग्यास अशीच प्रगती उत्तरोत्तर लाभो ह्या शुभेच्छा Happy
मायबोली सात्विक तात्विक वैचारिक औपचारिक आखाडा समिती Proud

असे धागे आलेत की लोक किती प्रचंड उत्साहाने रस घेऊन लिहितात. बापरे! असे धागे म्हणजे वाचकांना एक मेजवानी मिळालेली असते. ज्यांना सुधारण्याची खरी गरज आहे तिच लोक इथे येऊन जास्त लिहित आहेत, काही अपवाद वगळता.

डीजे, रार - खूप छान विचार. खूप छान मते. लक्षात ठेवीन. हॅपी दिवाळी.

असामि, तू इथे "टोळधाड" हा शब्दप्रयोग केला. तू ज्या वाहत्या धाग्यावर नेहमी जातो ना ती टोळी सर्वात जास्त भयाणक आहे. त्या टोळीचा तू भाग असल्यामुळे तुला आता तू आपले ते हे कर असे म्हणायची मला गरज नाही.. तू आता ते हे समजून घे. आपले ते हे.. ह्यांना ह्याचा राग येईल.. हरकत नाही.

दिपांजलीजी: छान पोस्ट आहे.
सोशल मिडियावर वावरताना इग्नोअरास्त्रात प्रवीण होणं ही काळाची गरज आहे.
जमेल तसा प्रयत्न सुरु आहे.

जे आवडत नाही ते इग्नॉअर करा , इथे प्रत्येकासाठी काहीतरी नक्कीच आहे, ज्या विषायावर चर्चा झेपते, ज्या कंपुंमधे आपलं पटतं त्या बीबीज वर जा एवढाच काय तो उपाय आहे>>
डीजे समस्या वेगळी आहे. होते काय की गांधींच्या प्रचारसभेत मोदी माईक हिसकावुन घेतात, धोनीच्या बॅटीगच्यावेळी सचिन बॅट घेऊन खेळु लागतो, पेशवे गीता वाचत असताना अचानक औरंगजेब येऊन कुराण वाचु लागतो, साऊथच्या रस्समभाताच्या केळीच्या पानावर अचानक बीफ वाढले जाते, शाखेच्या संचालनात अचानक मोहरमची छाती बडवणे चालु होते. Lol

दीपांजलींच्या प्रतिसादाबाबत सगळे सकारात्मक बोलत आहेत म्हणून माझी ही लुडबुड म्हणा हवे तरः

तो प्रतिसाद पटलाच आहे. पण दोन गोची आहेत ज्या तो प्रतिसाद लिहिताना ध्यानात घेतल्या गेल्या आहेत की नाहीत असा प्रश्न पडला आहे.

ह्या अश्या विषयांवर हे असे असे वाद होणारच व आजवर नेहमीच होत आले हे ठीक आहे. पण विशेषतः गेल्या काही काळात ह्या वादांची पातळी का घसरली ही एक गोची आहे. दुसरी गोची अशी की इतरत्र कोणत्याही व्यासपीठावर जी काही शिवीगाळ होत असते त्यातील बहुतांशी शिवीगाळ ही पूर्णपणे अपरिचित माणसाशी, किंबहुना त्याच्या आभासी सदस्यनामाशी होत असते. मायबोलीचे तसे म्हणता येणार नाही. वर्षानुवर्षे येथे गुण्यागोविंदाने नांदणारे, एकमेकांना व्यवस्थित ओळखणारे लोक जमा झालेले आहेत. त्यांच्यापैकी काहींमध्ये होऊ लागलेली शिवीगाळ ही विखार किती तीव्र झाला आहे हे दर्शवते. उदाहरणार्थ कोणत्या तरी इतर व्यासपीठावर कोणी 'एबीके११९' ह्या नावाने कोणा 'कूलड्यूड' नावाच्या माणसाला अश्लाघ्य शिव्या देऊ शकतो व त्या बदल्यात त्याच परत मिळवूही शकतो. त्याचे त्या दोघांसकट कोणालाच काही वाटत नाही. ते एकमेकांना व इतर लोक त्यांना अजिबात ओळखत नसतात. मात्र येथील आय डी जेव्हा तसे करू लागतात तेव्हा खूप काही मुळातच बिनसलेले असते ह्याचे ते चिन्ह असते.

<<गेल्या काही काळात ह्या वादांची पातळी का घसरली ही एक गोची आहे.>>
------ मायबोली सर्व समावेशक होत आहे. सभासद विविध थरातुन (शिक्षण, भैगोलिक स्थान, व्यावसाय...) येत आहेत आणि डायव्हरसिटी वाढते आहे....

होय उपखंडात शांतता नांदली पाहिजे याबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमी एकमत असते:
Proud

Lol

रॉबीन,
हल्ली बरेच दिवस आहे माबोवर. पण जिथे विसंवाद दिसतो तिथे राहवत नाही.
आपला फंडा एकच.. इथे यावं, सर्वांशी जिव्हाळ्याने बोलावं, काही वाचनिय वाचावं, भावलं तर तितक्याच उत्कटतेने प्रतिक्रिया द्यावी. पुन्हा आपल्या दिनक्रमात रमावं. Happy
तुझी कॉमेंट फार पटली म्हणून म्हणून प्रकट झालो रे.. Happy

होय उपखंडात शांतता नांदली पाहिजे याबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमी एकमत असते: >> Lol रॉहू, यह सही है!

रॉबीनहूड Lol

डीजे समस्या वेगळी आहे. होते काय की गांधींच्या प्रचारसभेत मोदी माईक हिसकावुन घेतात, धोनीच्या बॅटीगच्यावेळी सचिन बॅट घेऊन खेळु लागतो, पेशवे गीता वाचत असताना अचानक औरंगजेब येऊन कुराण वाचु लागतो, साऊथच्या रस्समभाताच्या केळीच्या पानावर अचानक बीफ वाढले जाते, शाखेच्या संचालनात अचानक मोहरमची छाती बडवणे चालु होते.

<< केपी :).
हेच क्लासिक उदाहरण झालं , थोडक्यात सेन्सिटीव बीबीज लिस्ट वाढत चालली आहे ( व्हेजि वर्सेस नॉन व्हेज हे विसरलेच )
ऑनलाइन शॉपिंग प्रमाण कसं वाढतय तसं अनेक सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स वर व्यक्त होण्याचं प्रमाण वाढलय, ऑनलाइन दंगे , तीव्र मतभेद इ. दिवसेंदिवस वाढतच जाणार, प्रत्यक्षात कुठे कोणाला वेळ आहे :).
प्रत्येकाच्या दृष्टीने स्वतः बरोबर दुसरा प्रचंड चूक आणि सगळेच एक्स्ट्रिम मतवादी ऑनलाइन पडीक , 'Haters are going to hate no matter what ' हे लक्षात ठेवायचं कायम कुठल्याही सेन्सिटीव बीबीवर शिरण्या आधी !
प्रत्यक्षात कदाचित काही मोजके , गुण्यागोविंदाने वगैरे वावरणारे अ‍ॅक्टीव्ह युझर्स दिसतात, आपलेच नेहेमीच्या ओळखीतले म्हणून सौजन्याची वगैरे आपेक्षा केली जाते पण सगळ्यांनाच माहिते कि हा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे, भरपूर इनअ‍ॅक्टीव युझर्स देखील असतात , you never know who's watching you, you never know who's who , who's real person behind which ID and who's getting offended by what , who really supports you and who hates you !
इन जनरल एवढ्या मोठ्या व्हर्च्युअल जगात (जाळ्यात) वावरताना अजिबात माहित नसलेल्या लोकांकडून न्युट्रल अ‍ॅटीट्युड , कन्स्ट्रक्टिव क्रिटीसिझम - क्लिन चर्चा करून मार्ग काढणे आपेक्षा करणं हे स्वप्नरंजन आहे .
Special media is huge and every social media platform is targeting more and more users every single second , sooner we accept better it is !
असो, बाकी चर्चा चालु द्या :).

ओ दिपाजंली बाई,
आपेक्षा, आपेक्षा , आपेक्षा वाचूनच पुढचे वाचायची " अपेक्षा " सोडली. Proud

झंपी | 6 November, 2015 - 00:25
दिपांजली
<< लो कल्लो बात ,दिपांजली वाचून पुढचं सगळं इग्नोअर Wink

हेमाशेपो आयडी ? म्हणजे प्रत्येक धाग्यावर त्यांना एकच प्रतिसाद लिहिता येणार. Lol

अरे एवढं काय झालंय? त्रास करुन घ्यायला. वाचायचं तर वाचा. नैतर दुसरीकडे जा. जे वाचुन त्रास होणार आहे ते वाचु नका. ह्यामुळेच जुने माबोकर लिहित नाहीत? माबोवर येत नाहीत? एवढा त्रास करुन घेण्यसारखं खरंच आहे का हे? आणि असेल तर असेल हु केअर्स? कुणाला इथे पडलीये कुणाची? मुद्दाम खुसपट काढणारे लोक असतात. त्यांना कशानेही काहीही फरक पडत नाही. काड्या टाका आणी मजा बघा एवढंच त्यांना आवडत असेल तर?
आणि ह्या सगळ्या साठी उपाय वै. म्हणजे जरा जास्तच वाटतंय.

किरू Rofl

भुंगा Proud

Pages