जर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दिलेली वेळ पाळेलंच, आणि काही कारणामुळे पाळणं शक्य नसेल तर आधी तुम्हाला फोन करून जरूर कळवेलंच, आणि जर एखादा मनुष्य वरीलप्रमाणे वागू शकत नसेल, आणि त्याला दोन संधी देऊनही सुधारत नसेल तर त्याला खड्याप्रमाणे उचलून अलगद या समाजातून काढून टाकलं जाईल, एकंदर काय, तर उद्यापासून रामराज्य असणार आहे, तर कोणीही असाच समज करून घेईल की बोलणार्याच्या डोक्यावर परिणाम तरी झाला आहे किंवा निवडणुका जवळ आल्या आहेत.
(उफ्फ! आयुष्यात पहिल्यांदाच इतकं लांबलचक वाक्य लिहिलं.)
मात्र मला जर कोणी असं म्हणालं तर माझ्या दृष्टीनी त्याचा अर्थ असा की माझी सुट्टी संपवून मी उद्या बोटीवर परत रुजू होणार आहे.
बोटीवरची जीवनपद्धती इतकी स्वच्छ आणि सरळसोट असते!
मात्र या बोटीवरच्या जीवनाबद्दल इतके गैरसमज आहेत की सॅम्युअल जॉन्सन सारख्या लेखकानी लिहिलं आहे, “बोटीवर राहाणं म्हणजे तुरुंगात राहाण्यासारखंच. वर बुडायची भीती. मात्र बोटीपेक्षा तुरुंगात जागा जास्त, जेवण जास्त चवदार आणि मित्रमंडळी जास्त सभ्य!”
बिचारा सॅम्युअल जॉन्सन!
बोटीवरची जीवनपद्धती इतकी स्वच्छ आणि सरळसोट असते याची मुख्यतः दोन कारणं आहेत.
पहिलं कारण म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक वातावरणात राहायचं तर बेशिस्त राहून चालणारच नाही. जे दूरच्या ट्रेक वा गिर्यारोहणाला गेले आहेत त्यांना याचा चांगला अनुभव असतो. एकदा मनुष्यवस्ती सोडली की काहीही मदत मिळण्याची शक्यता संपते. म्हणजे आपल्याला काय काय लागण्याची शक्यता आहे याची जमवाजमव आधीच व्यवस्थित करायला तर लागतेच, शिवाय असलेली सामुग्री, शिधा, पाणी वगैरे मोहीम संपेपर्यंत पुरवण्याच्या दृष्टीनी रोजच्या वापरावर नियंत्रण ठेवावंच लागतं.
‘ठेवावंच लागतं’ हे म्हणणं सोपं आहे. पण ह्या म्हणण्याला अर्थ केव्हां प्राप्त होतो? जेव्हां आपण ‘न ठेवणार्या’वर कारवाई करू शकतो तेव्हांच. आज जर आपल्या शेजार्यानी कचरा डब्यात टाकण्या ऐवजी खिडकीतून बाहेर टाकला तर आपण त्याला सांगू शकतो, पटवू शकतो, त्यावर सामाजिक दबाव टाकू शकतो. पण तरीही तो बधला नाही तर सहजासहजी आपण फारसं काही करू शकंत नाही. निर्लज्जम् सदा सुखी! त्याला त्या घरातून आपण हाकलू शकंत नाही.
आता दुसरं कारण. बोटीवर आपण त्याला त्या घरातून हाकलू शकतो. आमच्या बोटीवरच्या बोलीभाषेत त्याला “Next port to be airport.” असं म्हटलं जातं. (पुढच्या बंदराला बोट पोहोचली की विमानाचं तिकिट देऊन त्याची रवानगी केली जाते.) मग युनियन काही करंत नाही? इतकी नेभळट आहे की काय ही युनियन? तसं नाही. ही युनियन आंतरराष्ट्रीय स्थरावर आहे आणि तिचे व्यवहार आपल्या नेहमी बघण्यात येणार्या युनियन्सपेक्षा खूपच प्रगत आणि पारदर्शक आहेत. याला देखील कारण आहे. भारतात राहून ही युनियन परदेशात असलेल्या बोटींवर कसा वचक ठेवणार? ते केलं जातं जागतिक युनियन्सशी संलग्न राहून. त्यांच्याशी संलग्न राहायचं तर त्यांचे नियम पाळावेच लागतात. याचा अर्थ एखाद्याने बोटीवर धोकादायक वर्तन केलं आणि कंपनीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्याच्यावर कारवाई केली तर युनियन त्यालाच समज देते. त्याची बाजू घेऊन भांडत बसत नाही.
जर का केस लढण्याची वेळ आली तर ती बाहेरच्या कोर्टात होते. त्यामुळे धाकधपटशा, लाचलुचपत, राजकारण वगैरे देखील वापरता येत नाही.
तात्पर्य, नाकासमोर कार्यपद्धती. भरपूर काम करा, शुद्ध मोकळ्या हवेत रहा, दुसर्याच्या खर्चानी जग बघा, बायकामुलांनाही जग दाखवा, सलग पाच पाच महिने सुट्टी एन्जॉय करा, वर चांगल्यापैकी पैसेही कमवा! त्यावर आयकर भरू नका ! (परदेशी चलन कमावणारे हे सरकारचे जावई असल्यामुळे त्यांना आयकरही माफ आहे!)
बोटीवरची करियर जर इतकी स्वप्नवत् आहे तर प्रत्येक मुलगाच ही घेत का नाही? गेली चाळीस वर्षं हाच प्रश्न माझ्या डोक्यात घोंघावतोय. (जस्ट जोकिंग.)
फार वर्षांपूर्वी ‘मार्मिक’ मध्ये ‘मराठी तरुणांसाठी करियर’ या सदरात एक लेख होता. त्यात एक ओळ होती - “मराठी पालकांच्या दृष्टीने प्रत्येक सैनिक हा रणांगणावर मरतोच, प्रत्येक बोट ही बुडतेच आणि प्रत्येक विमान हे कोसळतंच.”
दुसरं कारण म्हणजे तिकडचं काम. जेव्हां एखादा मुलगा बी.ई. (मेकॅनिकल) होतो तेव्हां त्याची अपेक्षा असते की आपण ज्या फॅक्टरीत काम करू तिथे आपलं वेगळं ऑफिस नसलं तर निदान टेबल असावं, आपल्या हाताखाली खूपसे कामगार आणि दोन चार फोरमन असावेत. दिवसभर काम केल्यानंतर आपल्या कपड्यांची इस्त्री टिकली नाही तरी चालेल, पण ते निदान स्वच्छ तरी रहावेत. (आणि ती बहुतांशी पूर्ण देखील होते).
बोटीवरचा माहोल वेगळा असतो. इंजिन रूममध्ये साधारणपणे नऊ जण असतात. पाच इंजिनियर्स आणि चार खलाशी. खलाशांचं काम इंजिनियरांना मदत, साफसफाई आणि रंगरंगोटी वगैरे. प्रत्यक्ष काम इंजिनियरनीच करायचं. मुख्य काम काय? तर मशिनरी चालवणं आणि त्याचा मेंटेनन्स करणं. बोटीवर एकंदर मशिनरी भरपूर आणि मोठी थोरली असते. आपल्या इथल्या गाडीच्या मेकॅनिकला हेल्मेट, हातमोजे आणि स्टीलच्या चवड्यांचे सेफ्टी शूज् घातले तर तो जसा दिसेल तसा एखादा टिपिकल मरीन इंजिनिअर दिसतो. बोटीवरची नव्वद टक्के मशिनरी इंजिनरूममध्ये ठासून भरलेली असते. त्यामुळे तिथे तापमान गरमागरम आणि आर्द्रता भरपूर. त्यामुळे बदाबदा घाम येत असतो. विषुववृत्तीय प्रदेशात अर्ध्या दिवसात ओव्हरऑल (याला ‘बॉयलरसूट’ असंही म्हणतात) ओलाचिंब झाल्यामुळे बदलायला लागतो. इंजिनरूम वातानुकूलित कधीही नसते. ती अशक्यप्राय गोष्ट आहे.
बंदिस्त जागेत इतकी मशिनरी चालल्यामुळे प्रचंड आवाज होत असतो त्यामुळे कानावर ear muffs लावावे लागतात. साधं संभाषण म्हणजे उंच स्वरातच. वातावरण वादळी असलं तर बोट हलते. त्याचा देखील सुरवातीला त्रास होतो. इंजिनरुमची उंची साधारणपणे सहा मजल्यांएवढी असते त्यामुळे चढणं उतरणं खूपच होतं. पोट सुटलेला मरीन इंजिनिअर क्वचितच.
एकंदर काय, तर शारिरिक मेहनत भरपूर. कामाच्या कपड्यांना डाग असणं आणि नखं काळी असणं नॉर्मल. सुशिक्षित मुलांना ते जमतंच असं नाही. काही मुलं सोडूनही जातात.
मी ज्युनिअर इंजिनिअर म्हणून दीड वर्ष काम करून सुट्टीवर आलो तेव्हां माझ्या वडिलांनी (आप्पा – आता स्वीटर टॉकरच्या लेखातून तुम्ही त्यांना ओळखता) मला ओळखलंच नाही ! इतका बारीक झालो होतो. पण अशक्त बारीक नव्हे.
मला कोणीतरी विचारलं, “काय रे तुला तिथे काय काम असतं?”
मी विनोद करण्याच्या दृष्टीनी उत्तर दिलं पण ते सत्यापासून फारसं दूर नव्हतं. “इंजिनिअरिंग रामा गडी. दोन वेळ जेवण. राहायला जागा. पडेल ते काम!”
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
त.टी.
कार्यबाहुल्यामुळे खूपच महिन्यात कीबोर्ड हातात घेतला नव्हता. आता लिहायला सुरवात केल्यावर असं लक्षात आलं की बाकी सर्वांप्रमाणेच बोटीवरच्या जीवनाला देखील इतके कंगोरे आहेत की एका लेखात ते कोंबता येणार नाहीत.
प्रत्येक कंगोर्यासाठी एक एक लेख लिहीन. मात्र ही लेखमालिका असणार नाही. प्रत्येक लेख स्वतंत्र. पुढचा लेख कळण्यासाठी आधीचा वाचायची अजिबात जरूर नाही.
खूप छान. अजून
खूप छान.
अजून येऊदे.(बुडण्याची भीती आणि सी सिकनेस हे दोन मुद्दे वगळता चांगले जीवन असावे असे वाटते.)
अनुभव कथन आवडले. अजुन
अनुभव कथन आवडले. अजुन लेखाच्या प्रतिक्षेत...
मस्त..
मस्त..
मस्त लेख. विषय खूप खूप जवळचा.
मस्त लेख. विषय खूप खूप जवळचा. घरामध्ये चांगले साताठ खलाशी आहेत. त्यांच्याकडून या बोटीवरच्या जीवनाच्या बर्याच सुरेख कहाण्या ऐकल्या आहेत. तुमची लेखनशैली अफाट असल्यानं लेख मस्तच असतील. वाट पहात आहे.
खुप दिवसांनी लिहिले.. पण
खुप दिवसांनी लिहिले.. पण नेहमीप्रमाणेच छान.
छान. पुढच्या लेखांची वाट
छान. पुढच्या लेखांची वाट बघणार
छान लेख मी ही मालिका म्हणूनच
छान लेख मी ही मालिका म्हणूनच वाचणार. मर्चंट नेव्ही का फोर्सेस मध्ये सर्विस तुमची?
मिपावर खरे साहेब छान मालिका लिहून राह्यलेत.
मस्त माहिती! पुढील लेखाच्या
मस्त माहिती! पुढील लेखाच्या प्रतिक्षेत..........................
पुढच्या लेखांची वाट बघतोय
पुढच्या लेखांची वाट बघतोय
मस्तच.. अजून येऊ देत.
मस्तच.. अजून येऊ देत.
अनुभव कथन आवडले. अजुन
अनुभव कथन आवडले. अजुन लेखाच्या प्रतिक्षेत... >>>> +११११
नेहेमीप्रमाणे मस्त ! 'दैव
नेहेमीप्रमाणे मस्त ! 'दैव जाणिले कुणी' हा बोटीवरचा थरारक अनुभव अजून आठवतो.
पुढील लेखांची वाट बघत आहे.
मात्र या बोटीवरच्या जीवनाबद्दल इतके गैरसमज आहेत >>> लिहू की नको ह्या संभ्रमात आहे पण लिहितेच. मराठी मध्यमवर्गीयांत 'बोटीवरच्या माणसाची प्रत्येक बंदरात बायको असते.' असे एक वाक्य फार ऐकले आहे ( विशेषतः लग्नासाठी स्थळे बघताना हमखास ). सरसकटीकरण केलेल्या ह्या विधानाची गंमत वाटली होती
मस्त लिहिलंय. खरंच सामान्य
मस्त लिहिलंय. खरंच सामान्य माणसांमधे या पेशाबद्दल उत्सुकता असते. हो.. फक्त उत्सुकताच कारण, तुम्ही लिहिलंच आहे.. “मराठी पालकांच्या दृष्टीने प्रत्येक सैनिक हा रणांगणावर मरतोच, प्रत्येक बोट ही बुडतेच आणि प्रत्येक विमान हे कोसळतंच.”
एक बालमित्र या क्षेत्रातच असल्याने बरंच ऐकून आहे.
पुलेशु.
मस्तच.. अजून येऊ देत.
मस्तच.. अजून येऊ देत.
लौकर लौकर...
लौकर लौकर...
खरं आहे.सर्वांनाच बोटीवरचं
खरं आहे.सर्वांनाच बोटीवरचं काम आवडणार नाही.एक भाऊ कॅप्टन असल्याने तिकडचे जीवन माहित आहे.
छान लेख !!
छान लेख !!
वा मस्त ! लिहा पुढे पटापट..
वा मस्त ! लिहा पुढे पटापट..
मस्त
मस्त उत्कंठावर्धक.
Impressionable वयात एम् टी आयवा मारू वाचली होती, कॉनराडही. एक काका मर्चन्ट नेव्हीत, त्यांच्याकडूनही कथा ऐकलेल्या. सीडीसी काढायचे नक्की झालेले पण मग दुसऱ्याच एका equally fascinating यंत्राकडे मोर्चा वळला, पण अजूनही आकर्षण आहे दर्यावर्दी जीवनाचे.
सर्वजण, धन्यवाद. जमेल तितक्या
सर्वजण,
धन्यवाद. जमेल तितक्या भरभर लिहितो.
नंदिनी - 'तुमची लेखनशैली अफाट असल्यानं लेख मस्तच असतील.' असं लिहल्यामुळे मला टेन्शन आलं आहे.
अमा - मी मर्चंट नेव्हीमध्ये होतो. 'मिपा' म्हणजे काय?
अगो - 'दैव जाणिले कुणी' चा अनुभवच इतका जबरदस्त होता की कोणीही लिहिला असता तरी प्रभावशाली झालाच असता.
'बोटीवरच्या माणसाची प्रत्येक बंदरात बायको असते.' - याबद्दलही येईलच लिखाणात.
अमेय - एखादी क्रूझ घेतलीत तर थोड्या प्रमाणात का होई ना, मजेदार अनुभव घेता येईल.
टेन्शन घेऊ नका. एक रिक्षा
टेन्शन घेऊ नका. एक रिक्षा फिरवू का?
मस्त. पुढचे भाग लवकर येऊ द्या
मस्त. पुढचे भाग लवकर येऊ द्या
'बोटीवरच्या माणसाची प्रत्येक बंदरात बायको असते.' - याबद्दलही येईलच लिखाणात. >>>> मायबोलीवर 'स्वीटेस्ट टॉकर' आयडी आला की आम्ही काय ते ओळखून घेऊ

मस्त वाट बघतोय पुढच्या
मस्त वाट बघतोय पुढच्या लेखांची.

सिंडरेला
मस्त लिहीलंय
मस्त लिहीलंय
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय.
मस्त ! बोटीवरील जीवनाविषयी
मस्त !
बोटीवरील जीवनाविषयी उत्सुकता आहे. तुमचे लेख नक्क्की वाचणार
अरे मस्त , अजून लिहा या
अरे मस्त , अजून लिहा या जीवनाबद्दल.. काही मित्र होते मर्चंट नेवीत्,त्यांना आम्हीही हाच प्रश्न विचारलेलाय

त्यांना पाहून त्यांचं लाईफ एक्दम हॅपनिंग्,स्टायलिश वाटायचे.. खरंखुरं कळेल आता तुमच्या लेखांतून
छान लिहिलंय... भाऊ मर्चंट
छान लिहिलंय... भाऊ मर्चंट नेव्हीमध्ये असल्याने कित्येक वाक्यांसाठी अगदी अगदी म्हणावेसे वाटले.
पु. भा. प्र.
ए. मू. प्र.: ईंजिन रुम ला
ए. मू. प्र.:
ईंजिन रुम ला जायला लिफ्ट नाही का बनवता येणार? इतकी वर खाली करुन आणि घाम येऊन तिथे चढता उतरता चक्कर आली तर?
मस्त लिखाण नेहमीप्रमाणेच.
मस्त लिखाण नेहमीप्रमाणेच. बोटीवरचे आयुष्य एकदमच वेगळे असते.
नंदिनीने देखील खुप छान लिखाण मागे केले होते. मला देखील माझ्या कामाच्या अनुशंगाने काही लिहायचे मनात आहे बघु कधी योग येतो ते.
Pages