बहिणाईची गाणी … एक रसग्रहण

Submitted by कविता क्षीरसागर on 24 October, 2015 - 05:29

बहिणाईची गाणी …

आमच्या लायब्ररीत मी एका वेगळ्याच पुस्तकाच्या शोधात गेले होते. पण तिथे अचानक प्र. के. अत्रे संपादित "बहिणाईची गाणी" हे पुस्तक हाताला लागले . अलीबाबाच्या गुहेतला सारा खजिना मिळाल्यासारखा आनंद मला त्यादिवशी झाला
.
मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येत पिकावर

या त्यांच्या कवितेतल्या ओळी तर अगदी शाळेत असल्यापासूनच मनावर कोरल्या गेल्या होत्या . मनाच्या विविध रूपांचे अविष्कार इतक्या साध्या शब्दातून फक्त त्याच उलगडू शकतात . शाळेत क्रमिक पुस्तकातल्या त्यांच्या कविता - " लपे करमाची रेखा , मन वढाय वढाय , कशाले काय म्हनू नही , माहेरची वाट " या कविता आम्हाला अभ्यासाला होत्या .तेव्हापासूनच त्यांच्या कवितेबद्दल एक आकर्षण निर्माण झाले होते . थोडं कुतूहलही होतं की एक अशिक्षित , अडाणी शेतकरीण बाई -

"आला सास गेला सास
जीवा तुझं रे तंतर
अरे जगणं मरण
एका श्वासाचं अंतर "

अशा ओळीतून महान सत्य किती सोप्या शब्दातून कसे काय दाखवत असेल ? ना शिक्षण , ना कुणाचे मार्गदर्शन , ना कुणाची कौतुकाची थाप - असे असताना इतकं जिवंत आणि सच्च काव्य त्यांना कसे काय स्फुरले असेल ? अशी कोणती पुण्याई त्यांच्याकडे असेल ? असे राहून राहून मनात यायचे . पण याचं उत्तर त्यांनी आपल्या कवितेतूनच दिलंय . त्या म्हणतात -

माझी मे सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपितं पेरली

सरस्वती माताच जर प्रत्यक्ष त्यांना ही बोली शिकवते अशी त्यांची धारणा असेल तर मग त्यांच्या काव्याला झालेला हा दैवी स्पर्श आपल्याला आढळणे हे अगदी स्वाभाविकच आहे . त्याचमुळे त्यांना कधीही शब्दांची व कल्पनांची उणीव भासली नाही . त्यांच्या कितीतरी कवितांतून कल्पनांची भरारी आपल्याला थक्क करून सोडते . उदाहरणार्थ -

सांग सांग धर्तीमाता - अशी कशी जादू झाली
झाड गेलं निन्घिसनी - मांघे सावली उरली --- किंवा

पयसाचे लाल फुल - हिर्वे पान गेले झडी
इसरले लाल चोची - मिठू गेले कुठे उडी ?

वा वा . क्या बात है ! काय अद्भुत कल्पनाशक्ती आहे ही !

त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्यांचं निसर्गप्रेम , भावनाशील मन पाझरत आहे असे जाणवते . त्यांची प्रत्येक कविता ही एक स्वतंत्र गीतरचनाच आहे . त्यात शब्दांची ओढाताण नाही कि रचनेची मोडतोड नाही . सर्व कसे साधे, सोपे तरीही केवढे अर्थप्रवाही ! म्हणूनच बहुधा प्र . के . अत्र्यांनी पुस्तकाला नाव देताना ""बहिणाईच्या कविता " ऐवजी "बहिणाईची गाणी" असे सार्थ नाव दिले असेल .

त्यांचा प्रत्येक शब्द कवितेला नानविध भावभावनांचे देणे देतो . अन ते रसाळ गीत बनते . सर्वात महत्वाचे म्हणजे त्या भावना बहुधा अनुभवांनी समृद्ध झाल्यावरच अगदी आतून ओठी येतात आणि म्हणूनच

अरे संसार संसार - जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके - मग मिळते भाकर

या कवितेतून होणारा साक्षात्कार प्रत्येक स्त्रीला आपलासा वाटतो .

खेद्यामाधली अडाणी बाई असूनही त्यांनी वेगवेगळ्या विषयांना हात घातलेला दिसतो . त्यात स्त्रियांचे प्रश्न , व्यक्तिचित्रण , निसर्गचित्रण , समाजचित्रण , दैनंदिन कामे या विषयांबरोबरच लोककथाही त्यांनी काव्यबद्ध केल्या आहेत . त्यातली "खोक्लीमाय " ही कविता तर वाचाण्यासाराखीच आहे . "ज्योतिषी , महारीण ,रंगराय " या व्याक्तीनाही त्यांनी आपल्या काव्याद्वारे अमरपद बहाल केले आहे .

काही काही कवितांमधून तर त्यांच्या बुद्धिमत्तेची , निरीक्षणशक्तीची विशेषच चुणूक दिसून येते . उदा . –

तिची उलूशीच चोच - तेच हात तेच ओठ
तुले दिले देवाने रे - दोन हात दहा बोटं
किंवा
लेकीच्या माहेरासाठी - माय सासरी नांदते
किंवा
धर्तीमधल्या रसाने - जीभ माझी सवादते
तव्हा तोंडातली चव - पिंडामधी ठाव होते

या अशा ओळी वाचल्या की त्यांना अडाणी , अशिक्षित कसे म्हणावे असे वाटते . ज्या बाईचे अनुभवविश्व , कल्पनाविश्व आणि भावनाविश्व इतके अफाट आहे तिला अडाणी म्हणणारे आपण कोण ? चार पुस्तके वाचली आणि कॉलेज मध्ये जाऊन डिग्री मिळवली म्हणजे खरंच का कोणी खर्या अर्थाने सुशिक्षित , बुद्धिमान बनते ? मग तरीही काही सुशिक्षित माणसे खोटं बोलतात , मारामारी करतात, माणुसकीला काळिमा फासणारी कृत्ये करतात अशांना काय म्हणावे ? त्यांना आपल्या बहिणाईच विचारतात -

अरे माणसा माणसा - कधी व्हशिल माणूस !

त्यांच्यातल्या माणुसकीला जाग यावी अशी बहिणाइंची मनोमन इच्छा आहे आणि म्हणूनच त्या आपल्या साध्या साध्या शब्दातून पोटतीडीकेने माणुसकीचे धडे द्यायचा प्रयत्न करतात . त्या समजावतात –

नको लागू जीवा - सदा मतलबापाठी
हिरीताच देणं घेणं - नही पोटासाठी

आणि त्या म्हणतात -

दीस आला कामामधी - रात निजेमधी गेली
जलमाची आता जाग - मरनाची नीज झाली

जगण्या मरण्याची किती सुटसुटीत व्याख्या त्यांनी केली आहे ना !

अशा कित्येक विचारांचे धन त्यांच्या कवितांमधे दडले आहे . ते धन जर आपल्याला लुटायचे असेल , तो खजिना पहायचा असेल तर फक्त रसिक मन हवे . मग त्यांच्या गाण्यात आपण गुंगून जातो . कधी माहेराच्या वाटेतल्या वार्याचा सुखद झोका अनुभवतो , कधी शेतात कापणी करतो , कधी जात्यावरच्या ओव्यांमध्ये हरवून जातो , तर कधी देवाच्या अजब करणीने भारावून जातो . मग त्यांच्या बद्दल आपल्या तोंडी नकळत उदगार येतात -

अशी थोर बहिणाई - अशी नाही दुनियेत
अडाणीच्या मुखी गीता - झाली कशी करामत

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

aprateem !!

"ज्या बाईचे अनुभवविश्व , कल्पनाविश्व आणि भावनाविश्व इतके अफाट आहे तिला अडाणी म्हणणारे आपण कोण ? " >>>>> + १००

खरं तर अशी अफलातून संपत्ती आपल्यापाशी असूनही संध्याकाळ सासू सुनांच्या सीरियल्समध्ये घालवणारे आपणच खरे अडाणी !

ज्या बाईचे अनुभवविश्व , कल्पनाविश्व आणि भावनाविश्व इतके अफाट आहे तिला अडाणी म्हणणारे आपण कोण ? >> १००% खर आहे...

रसग्रहण पुढचा भाग येऊ दे

खूप खूप धन्यवाद पद्मावती ,सत्यजित , मानव पृथ्वीकर , Sweet talker

रसग्रहण पुढचा भाग येऊ दे ...... सत्यजित,

आपण केलेल्या सूचनेचा मी नक्की विचार करेन … धन्यवाद ..