आम्ही ट्रेकला नेहमीच महिन्याच्या अंतराने जात असतो.. पण मग घरात कोणी बच्चा कंपनी असेल तर 'मला पण आपल म्हणा' असा हट्ट होतोच .. माझी पुतणी चिऊला किल्ला हे काय रसायन आहे हे जाणून घ्यायचे होते.. आतापर्यंत फोटोत अनेकवेळा पाहिला होता पण प्रत्यक्षात कधी घेऊन जाणार हा प्रश्ण असायचा.. शेवटी उसंतीचा रविवार पकडला नि मुंबईजवळच असणारा शिरगावचा किल्ला दाखवतो म्हटले.. डोंगरावरचा नाही पण भुईकोटने सुरवात करु म्हटले.. आणि आम्ही फॅमिली भटकंतीला निघालो.. मी, बायको नि चिऊ...
शिरगावचा किल्ला हा पालघर जिल्ह्यात.. नाही म्हटले तरी पश्चिम उपनगरात राहणार्यांसाठी पालघर मधील किल्ले जवळचे.. पालघर मधील किल्ल्यांनासुद्धा ऐतिहासिक महत्त्व आहे.. पोर्तुगिज, मराठे, इंग्रज यांच्या लढायांचा इतिहास आहे.. पण दुर्दैवाने इथले किल्लेदेखिल दुर्लक्षितच राहीले.. असाच एक किल्ला म्हणजे शिरगावचा किल्ला..
असे शिरगाव आधी फारसे कोणाला परिचित नव्हते.. पण काही वर्षापासून वर्तमानपत्रात बिल्डरलोकांच्या जाहिराती सुरु झाल्या.. शिरगाव, सातपाटीला चौपाटीजवळ अमुक तमुक दरात निसर्गरम्य परिसराच्या सान्निध्यात १ बिएचके, २ बिएचके !! तेव्हा शिरगाव हे पालघरला समुद्रकिनारी आहे एवढीच काय ती माहिती सर्वांना असते.. पण तिथे समुद्रकिनाऱ्याला लागूनच एक भुईकोट किल्ला आहे हे मोजक्या लोकांनाच माहीत..
सकळीच ७.५७ची बोरीवली-पालघर लोकल पकडून निघालो.. पालघरवरून सातपाटी मार्गे जाणारी एसटी पकडली.. शिरगावला जाणार का विचारुन खात्री करून घेतली.. उतरायचे कधी हे माहीत नसल्यामुळे मास्तरांनाच विचारले.. फ़क्त किल्ला पाहण्यासाठी ख़ास आलोय याचे त्यांना आश्चर्यच वाटले.. वाटणारच कारण ते मास्तर शिरगावचे असुनसुद्धा त्यांनी किल्ला नीटसा पाहीला नव्हता.. पण त्यांनी लगेच किल्ला मस्त आहे.. बघण्यासारखा आहे..वगैरे सांगायला सुरवात केली.. नि आमची किल्ले भेटीची उत्सुकता अधिकच वाढली.. स्टॉपला उतरलो नि पाचेक मिनिटाच्या सरळ रस्त्याने किल्ल्यापाशी येवून पोहोचलो..
किल्ल्याचे रुबाबदार दर्शन होताच खूष झालो.. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे बुरुजावर असणारे टेहळणी मनोरे ! प्रवेशद्वारासमोर उभे राहील्यावर लगेच किल्ल्याची भव्यता लक्षात येते.. अंदाजे ३०-४० फूट उंची लाभलेल्या तटबंदी कड़े बघताना मान वर करावीच लागते.. पूर्वाभीमुख प्रवेशद्वारातून आता गेलो की प्रशस्त जागा असलेल्या देवड्या नजरेस पडतात.. पूर्वी इथे अजून एक मजला असावा हे सहज लक्षात येते.. तश्या खूणा नजरेस पडतात.. दिव्यासाठी कोनाडे केलेल्या नक्षीदार खूणा अजुनही शाबूत आहेत..
- - -
मुख्य दरवाज्यातून आत गेले की लगेच डावीकडे दुसरा दरवाजा.. या दरवाज्यातून आत गेले की उजवीकडच्या भिंतीवर काही कोरीवकाम नजरेस पडते.. किल्ल्यात प्रवेश केला की समोरच रावणमाडचे झाड लक्ष वेधून घेते.. वैशिष्टयपूर्ण अश्या या ताड माडला वरती टोकाला दोन दोन फांद्या फुटल्या आहेत त्यामुळे अगदी रावणासारखी अनेक डोकी असल्यासारखे दिसते..
- -
आम्ही गेलो तेव्हा किल्ल्यात कोणी नव्हते.. चिऊला इथे जाऊ की तिथे जाऊ वाटत होते.. त्यात उजवीकड़े चार पाच खोल्या असलेल्या वास्तूचे अवशेष आहेत.. एकातून दुसरीकडे जायला दरवाजे आहेत.. पूर्वी नक्की काय असेल याची माहिती मिळाली नाही.. चिऊला मात्र हे सगळे भलतेच आवडले होते.. इथेच तटबंदी व बुरुजावर जाण्यास पायऱ्या बांधलेल्या आहेत.. त्या चढून बुरुजावर गेलो.. हा बुरुज थोडा अडगळीत आहे पण याच बुरुजावर एक तोफ दिसते.. इथून समुद्रकिनारा छान नजरेस पडतो..
- - -
- - -
- - -
आम्ही बुरुजावरुन उतरुन आता दक्षिणेकडे असलेल्या तटबंदीकडे वळालो.. अतिशय भक्कम अशा या तटबंदीवर जाण्यास तीसेक पायऱ्यांची उत्तम सोय आहे.. तटबंदीच्या तळाशी पूर्वेकडे नि पश्चिमेच्या बाजूस कोठारे आहेत.. पायऱ्यांच्या सुरवातीला एका बाजूस किल्ल्यातून बाहेर पडणारा चोरमार्ग आहे..
- - -
पायऱ्या चढताना लागून असलेल्या तटबंदीलाच एक छोटे भोक दिसले नि काहीतरी गूढ असल्याचे जाणवले.. पण भोकातून काही दिसत नसल्याने आम्ही वरती बुरुजावर गेलो.. या बुरुजात प्रवेश करायला दोन दरवाजे केलेले दिसतात.. एक पायऱ्या चढून आल्यावर प्रवेश करण्यासाठी व एक दुसऱ्या बाजूने प्रवेश करण्यासाठी.. पण इथे अजुन एक दरवाजा दिसला ज्याला आतून खाली उतरण्यासाठी चक्क पायऱ्या आहेत..
बुरुजाच्या बाहेरुन
- - -
बुरुजाच्या आतून, बाजूलाच खाली नेणारा मार्ग
- - -
- - -
आत उजव्या बाजुस एक छोटी खोली तर डावीकडे अंधारात एका भगदाडातून खाली उतरायाला जागा.. !!! असल काही कमाल बांधकाम पाहिले की आपण खुष होतो.. नक्कीच खालून वरती वा वरतून खाली उतरायला तटबंदीमधूनच काढलेला गुप्तमार्ग होता.. कुतूहलापोटी आम्ही पुन्हा आल्या मार्गे पायऱ्यांनी बुरुजावरून खाली उतरुन आलो नि तळाला असलेल्या कोठारात प्रवेश केला.. या कोठारात एका भिंतीला लागूनच असणाऱ्या खिड़की सदृश भगदाडाकडे वरती जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या.. तेव्हा लगेच सौ. ला बाहेरच्या पायऱ्यांवर जाण्यास सांगून मी व चिऊ त्या आतल्या मार्गाने अंधारात शिरलो.. आमच्या उत्साही चिऊला हा मार्ग जास्तच आवडला.. तशीही धडपड करायची आवडच म्हणा..
त्या पायऱ्या चढून अंधारात गेलो नि त्या भोकातून प्रकाश दिसला.. आमच्या सौ. डोकावून पाहतच होत्या.. !
पुढे एका अडगळीतून त्या वरच्या भगदाडात कसरत करून चढून गेलो नि वरच्या बुरुजावर जाऊन पोहोचलो.. चिऊला साहाजिकच मोठी मोहीम फत्ते केल्याचा मोठा आनंद झालेला... किल्ला म्हणजे काय काय असू शकते याचा अंदाज आला होता... या बुरुजाच्या तटबंदी वरूनच आम्ही मनोरे उभारलेल्या तटबंदीकड़े निघालो.. या किल्ल्याची तटबंदी जशी भक्कम नि ऊंच तशी बरीच रुंद पण.. या तटबंदी पलीकडे भरगच्च वृक्षांच्या छायेत गावकऱ्यांची वस्तीे दिसते..
आम्ही आता मुख्य दरवाज्याला लागून असलेल्या तटबंदीवर आलो जिथे दोन टेहळणी मनोरे आहेत.. एक अगदीच प्रवेशद्वाराला लागून तर दुसरा पूर्वेकडे असलेल्या बुरुजावर..
आम्ही पहीले पूर्वेकडच्या बुरुजावर गेलो.. अर्थात आमच्यापुढे जाण्यास चिऊ पहिली होती.. मनोऱ्यावर जाण्यास अरुंद जीना वर्तुळाकार फिरवला आहे.. सगळ अप्रतिम फ़क्त मनोऱ्याला दिलेला सफेद रंग खटकतो ! या मनोऱ्यावरून पूर्ण किल्ल्यावर देखरेख ठेवता येतेच शिवाय भवतालच्या परिसरावर नजर ठेवता येते..
एकमजली मनोरा
- - -
मुख्य प्रवेशद्वार नि बुरुज
- - -
इथूनच आम्ही मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेल्या मनोऱ्यावर गेलो.. ही जागा थोडी पडझड अवस्थेत तेव्हा थोड जपूनच..
- - -
- - -
एकंदर अर्ध्या-एक तासातच संपूर्ण किल्ला पाहून झाला.. उन वाढायला लागल होत तेव्हा बाजूचा समुद्र देखील लवकर पाहून घेऊया म्हणत किल्ल्याचा निरोप घेतला... अगदी काहीच बघण्यासारखे शिल्लक नाही म्हणण्यापेक्षा बरच काही पहायला मिळाल्याच समाधान मिळाल नि आमच्या चिऊला किल्ला बघितल्याच समाधान.. इथे पण शिवाजी आले होते का हा प्रश्न तिने विचारलाच.. म्हटले त्यासाठी केव्हातरी रायगडावर जाऊ..! स्वारी लगेच खूष !
किल्ल्याला लागून असलेला समुद्रकिनारा हा साधा नि शांत किनारा आहे..किनाऱ्यावरूनसुद्धा किल्ला नि भवती असलेले आणखी दोन- तीन रावणमाड नजरेस पडतात.. उनाचा तडाखा वाढला होता त्यामुळे लवकर आवरते घेतले.. मुख्य रस्त्यावरून पालघरला जाणारी शेअरिंग टमटम पकडून रवाना झालो.. आता पुढे छोटीला केळवे किल्ला व केळवे जंजिरा जे दाखवायचे होते.. ! हो पालघर गाठले की केळवा किनारा नि शीतला देवीचे मंदीर फार दूर नाही. एसटी वा टमटम असतातच.. तेव्हा इकडे यायचे तर जरा लवकरच म्हणजे सगळ काही एका दिवसात पाहू शकतो.. निदान भुईकोट किल्ले तरी सहपरिवार पाहू शकतो.. वसईचा किल्ला पण आहेच दाखवायला.
मज्जानी लाईफ! मस्त आलेत फोटो
मज्जानी लाईफ! मस्त आलेत फोटो आणी चिऊ पण आवडली. मुलाना अशी उत्सुकता असलेल बघीतल की बरे वाटत.
छान फोटो आणि वर्णन.
छान फोटो आणि वर्णन.
मस्त माहिती आणि
मस्त माहिती आणि फोटो.
रावणमाड पाहून सिंधुदुर्गातल्या जुळ्या माडाची आठवण झाली..
मस्त माहीती!
मस्त माहीती! (19.6963945,72.7128835)
पालघर च्या जवळ वीसेक वर्षे
पालघर च्या जवळ वीसेक वर्षे असून हा किल्ला मी पाहिलेला नव्हता आणि नाही.
आता पुढच्या पालघर रियुनियन मध्ये पाहायला हवा. हा स्वच्छ आहे का?
असाच रा ही सावे विद्यालय तारापूर ला लागून बुलंद बाका किल्ला आहे समुद्र किनार्यावर. आम्ही त्याच्या भिंतींवर कधीकधी खेळायचो.
मस्त. रावणमाड पहिल्यांदाच
मस्त.
रावणमाड पहिल्यांदाच पाहिला.
खूपच बोलके फोटो, एका
खूपच बोलके फोटो, एका वैभवशाली इतिहासाची दालनं डोळ्यासमोर उघडत जाणारे . तत्कालीन प्राचीन वेशभूषेतली पायरयानवरून येजा करणारी माणसे, किल्ला गजबजलेला असताना हे सगळ कसं दिसत असेल या कल्पनेतच मी रमून गेलेय आणि हो मी पण रावण माड पहिल्यांदाच पाहिला तसेच एक आगाऊ सुचना चिउला घेऊन अंधारया भूयारमार्गातून जाण्याची साहसे करू नयेत… वाटेत सरपटते जीव असू शकतात.
मस्त वर्णन !!
मस्त वर्णन !!
योग्या, मस्त माहिती आणि फोटो.
योग्या, मस्त माहिती आणि फोटो.
छान वर्णन, कधी ऐकलेही नव्हते,
छान वर्णन, कधी ऐकलेही नव्हते, या किल्ल्याबद्दल. बुरुजाला पांढरा रंग तो दुरूनही दिसावा म्हणून दिला असणार.
हा किल्ला पोर्तुगिझांनी वसई
हा किल्ला पोर्तुगिझांनी वसई ते दमण मध्ये बांधलेल्या २७ किल्ल्यांपैकी एक आहे. ह्या किल्ल्याने सर्वात मोठी लढाई १७३८-३९ मध्ये अनुभवली जेंव्हा मराठ्यांनी ह्यावर कब्जा केला. मी चूकत नसेन तर संभाजी राजांनी देखील तारापुर - पालघर भागात १६८३ सली मोठे हल्ले चढवले होते.
धन्यवाद किल्ला बऱ्यापैंकी
धन्यवाद किल्ला बऱ्यापैंकी स्वच्छ आहे..
भुईकमळ.. काळजीबद्दल धन्यवाद.. ते सरपट जीव आहेत की नाही ते बघुनच पुढे गेलेलो..
सेन्या .. माहितीबद्दल _/\_
मी ईतक्या जवळ राहत असुन कधी
मी ईतक्या जवळ राहत असुन कधी गेले नाहीये, जायला हवं, रच्याकने बोरीवली - पालघर अशी कुठलीच लोकल नाहीये , सगळ्या ट्रेन्स डहाणुरोड पर्यन्त असतात , ७.५७ चीही बोरीवली - डहाणुरोड आहे. किल्ला फीरुन पालघर हुन ट्रेन पकडुन डहाणुरोडला गेला असता तर तिथे खुपच सुंदर आणि शांत समुद्र किनारा आहे, अगदी केळवे रोड च्या शितलादेवी मंदीराच्या बाजुच्या समुद्र किनार्यापेक्षा सुंदर. ट्रेन ने विरार नंतर वैतरणा हे स्टेशन गेलं की सफाळे स्टेशन लागते तिथे ही थोड्या आत तांदुळ्वाडी येथे किल्ला आहे या सर्व ठीकाणी मी जवळ राहत असुनही गेले नाहीये पण आता जाईनच
मी_ अनू रा.ही.सावे विद्दालयला
मी_ अनू
रा.ही.सावे विद्दालयला लागुन जो कील्ला आहे त्यात आत मधे शेती केली जाते , कील्ल्याच्या नावाने फक्त बाहेरची पडकी भिन्त शाबुत आहे , ज्या बाजुला भिंत शाबुत आहे त्या किल्ल्याला लागुन अगदी छोटी पायवाट आहे आणि समुद्र आहे, तिथेच स्मशान भुमीही आहे त्यामुळे अगदी दिवसा ढवळ्याही त्या पायवाटेने जाताना चिटपाखरु ही दिसत नाही आणि अगदीच भकास वाटते.
मस्त फोटो. रावण माड म्हणजे
मस्त फोटो. रावण माड म्हणजे निसर्गातले
एक आश्चर्यच आहे.
अरे वा, भुईकिल्ला मस्तं आहे..
अरे वा, भुईकिल्ला मस्तं आहे.. इतिहासाच्या किती खुणा विखुरल्यात इकडे तिकडे..
एकांत मधे दाखवतात तसा वाटला..
सेन्या ने छान माहिती दिली!!
चिऊताई उत्साही दिस्ताहेत
रावण माड, वॉव ,पहिल्यांदाच पाहिला आणी ऐकला!!!
मस्त माहिती आणि सुंदर फोटो
मस्त माहिती आणि सुंदर फोटो ....
मस्त फोटो. मला माझी सफर आठवली
मस्त फोटो.
मला माझी सफर आठवली
यो खुपच छान. मला पण माझी सफर
यो खुपच छान. मला पण माझी सफर आठवली. तूच सविस्तर माहिती दिली होती. धन्यवाद
किल्ला सुंदर आहे. माहिती
किल्ला सुंदर आहे. माहिती आवडली.
छान माहीती आणि फोटो.
छान माहीती आणि फोटो.
मस्त वर्णन, झकास फोटो
मस्त वर्णन, झकास फोटो
धन्यवाद
खूपच छान…yo rocks। मी तुमचे
खूपच छान…yo rocks। मी तुमचे सगळे दुर्ग भ्रमणाचे अनुभव वाचले आहेत. छान लिहिता तुम्हि. मला हि गड किल्ले फिरायची हौस आणि आवड आहे. मी आज पर्यंत प्रतापगड, रायगड आणि वसईचा किल्ला पहिला आहे… कधीतरी तुमच्या group बरोबरकिल्ले फिरायला आवडेल.
छानच वर्णन आणी फोटोज, डहाणू
छानच वर्णन आणी फोटोज, डहाणू ला जातो मी बर्याचदा आता हा किल्ला पण करावा लागेल पुढच्या वेळी!
क्या बात है !! खूप दिवसांनी
क्या बात है !! खूप दिवसांनी अनुभवायला मिळालेला यो धमाका !! इतकं सुंदर डिटेलींग केलं आहेस की हा लेख जरी घेऊन फिरलो तरी संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघता येईल. फोटोज पण कमाल !!
बायदवे…यावेळी सौ बरोबर असल्याने यो उडी नाहीये की काय !!!
धन्यवाद ओंकार.. स्वरा..
धन्यवाद
ओंकार..
स्वरा.. वेलकम
झक्कास
झक्कास
आता पुढे छोटीला केळवे किल्ला
आता पुढे छोटीला केळवे किल्ला व केळवे जंजिरा जे दाखवायचे होते.. ! हो पालघर गाठले की केळवा किनारा नि शीतला देवीचे मंदीर फार दूर नाही. एसटी वा टमटम असतातच.. तेव्हा इकडे यायचे तर जरा लवकरच म्हणजे सगळ काही एका दिवसात पाहू शकतो.. निदान भुईकोट किल्ले तरी सहपरिवार पाहू शकतो.. स्मित वसईचा किल्ला पण आहेच दाखवायला. >> कळव रे. जमलं तर येईन म्हणतो आमच्या चिऊला घेऊन.
व्वा.. मस्तच यो..
व्वा.. मस्तच यो..