एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.
बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -
चूक - बरोबर
१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी
आचरट बरोबर आहे.. अचरट हा
आचरट बरोबर आहे.. अचरट हा शब्दच नाहीये.
धन्यवाद मुग्धटली
धन्यवाद मुग्धटली
`स्वादिष्ठ` चुकीचं वाटतंय.
`स्वादिष्ठ` चुकीचं वाटतंय. इष्ट स्वादाचे ते स्वादिष्ट ना? (अरुण गोपाळ फडके यांचा `मराठी लेखन-कोश` स्वादिष्ट असेच योग्य म्हणतो.) कार्यकर्ती असाच शब्द योग्य असावा. (हे निर्मात्री या शब्दालाही लागू पडेल.) नाही तर मग कार्यकर्ताऐवजी कार्यकर्त्रा असं असेल ना? पोलिस इंग्रजी स्पेलिंगप्रमाणे केले जाते. उदाहरणार्थ दैनिक सकाळ, दैनिक महाराष्ट्र टाइम्स यामध्ये `पोलिस` असे प्रसिद्ध होते, तर दैनिक लोकसत्तामध्ये `पोलीस`. खुद्द पोलीस खाते दीर्घ वेलांटीच वापरते.
एखादा परकीय शब्द वापरताना त्याला मराठीचे व्याकरण लावावे, असे कुठे तरी वाचले आहे. त्यामुळे दिव्याला उल्लेखून `लाईट` वापरला असेल, तर `तो लाईट` आणि विजेसाठी असेल तर `ती लाईट` हे योग्य म्हणावे लागेल. (`चॉईस`चंही तसंच. पर्याय असेल, तर तो आणि निवड असेल तर ती) मुंबईत `तो मीटर` असा वृत्तपत्रीय शब्द आल्यावर भांडलो होतो.
बसच्या 'शिटी' बोली भाषेत - सीटचं अनेकवचन सिटा. पण वेलांटी आल्यावर `स`चा अनेकदा `श` होत असल्याने शिटा, शिटी इत्यादी...
भेटणे - कागदपत्रे भेटली नाहीत, माहिती भेटली नाही, असे सर्रास बोलले जाते. ते चुकीचे आहे.
मिक्सर, कूकर असे शब्द आल्यामुळे आठवलं - पाककृती लिहिताना किंवा त्याबद्दल बोलताना बहुतेक जणी `जिरं` असं लिहितात-म्हणतात. जिरे हाच शब्द योग्य आहे. त्याचे बोलीत जिरं असं रूप होत नाही.
मध्यंतरी एका अनुदिनीवरील लेखाचं शीर्षक `शंभर रुपयांची नोट` असं होतं. माझ्या मते `शंभर रुपयाची नोट` असं हवं. त्याबद्दल तज्ज्ञांकडून माहिती मिळवत आहे. म्हणजे `फाइव्ह डे वीक` असतं, `फाइव्ह डेज वीक` नसतं तसं. मराठीत सर्रास `पाच दिवसांचा आठवडा` असं चुकीचं लिहिलं जातं.
पण हा धागा वाचताना मजा आली. बरंच काही नवीन शिकता येईल. `ठरावीक`, `लवचीक` यांच्या वेलांट्या दीर्घ आहेत, हे तर अलीकडच्या 10 वर्षांमध्ये शिकलो.
<स्वादिष्ठ` चुकीचं वाटतंय.
<स्वादिष्ठ` चुकीचं वाटतंय. इष्ट स्वादाचे ते स्वादिष्ट ना? (अरुण गोपाळ फडके यांचा `मराठी लेखन-कोश` स्वादिष्ट असेच योग्य म्हणतो.) कार्यकर्ती असाच शब्द योग्य असावा. (हे निर्मात्री या शब्दालाही लागू पडेल.) नाही तर मग कार्यकर्ताऐवजी कार्यकर्त्रा असं असेल ना? पोलिस इंग्रजी स्पेलिंगप्रमाणे केले जाते. उदाहरणार्थ दैनिक सकाळ, दैनिक महाराष्ट्र टाइम्स यामध्ये `पोलिस` असे प्रसिद्ध होते, तर दैनिक लोकसत्तामध्ये `पोलीस`. खुद्द पोलीस खाते दीर्घ वेलांटीच वापरते.>
१. कार्यकर्तृ + ई = कार्यकर्त्री (अभिनेत्री, धरित्री, सावित्री, सर्वपित्री इत्यादी)
कवयितृ + ई = कवयित्री
निर्मातृ + ई = निर्मात्री
२. स्वादु + इष्ठ (तमभाववाचक) = स्वादिष्ठ
३. इंग्रजी उच्चारानुसार पोलीस असा शब्द लिहावा
अभियंताचे स्त्रीलिंग काय होईल
अभियंताचे स्त्रीलिंग काय होईल - अभियंत्री???!
बे-डर, भेटणे - मिळणे बाबत
बे-डर, भेटणे - मिळणे बाबत +१००.
इथे माबोवर लिहीतानाही हा घोळ घातला जातो.
जिवंत व्यक्ती / प्राणी / पक्षी भेटते. निर्जीव वस्तु मिळते.
ते स्वादिष्ट का नको, स्वादिष्ठ कसे बरोबर हे सांगू शकाल का चिनूक्स?
बे-डर, तसेच रुपये आणि
बे-डर, तसेच रुपये आणि दिवसांच्या अनेक वचनात काय चुकीचे आहे तेही सांगा.
ते, मूळात तो शब्द इष्ठ आहे की
ते, मूळात तो शब्द इष्ठ आहे की इष्ट यावरुन ठरेल.
बेडर , जिर्याच्या बाबतीत
बेडर , जिर्याच्या बाबतीत सहमत पण जिर्याचा एकच दाणा असेल तर?
शंभर रुपयांची नोट बरोबर आहे असे म्मला वाटते. इंग्रजीतलं ' हंड्रेड रुपी नोट "हे इंग्रजी फ्रेजिंग जसंच्या तसं वापरता येणार नाही. नाहीतर मग 'शंभर रुपये नोट'म्हणावे लागेल' रुपयांची असा षष्ठीचा प्रत्यय वापरणार असाल तर शम्भर रुपयांची नोट असेच म्हणावे लागेल. शम्भर रुपयाची नोट हे बरोबर वाटत नाही. तसेच पाच दिवसांचा आठवडा हेच योग्य आहे .(तसाही तो 'आठ' वडा होतच नाही म्हणा !
)
१) बे-डर हे बेडर असे हवे आहे
१) बे-डर हे बेडर असे हवे आहे ना?
२) पण वेलांटी आल्यावर `स`चा अनेकदा `श` होत असल्याने शिटा, शिटी इत्यादी...>> मी तर उलट पाहिले आहे. जसे की तमिळ लोक शिवा से सिवा करतात.
३) शंभर रुपयांची नोट बरोबर आहे असे म्मला वाटते. >> मला तरी चुकीचे वाटते. जर एकापेक्षा अधिक नोटा असतील तर शंभर रुपयांच्या नोटा असे आपण म्हणतो. जर एकच नोट असेल तर शंभर रुपयाची नोट हेच बरोबर आहे. काहीजण रुपयाला रुपल्ळा असेही म्हणतात. उदा: एक पाच पैसा तरी फेकून मारला का आयुष्यात असे बायको नवर्याला म्हणते. तर कधी - पाच रुपल्ळ्यासाठी इतके महाभारत घडवले बायकोनी असा नवरा म्हणतो. (हे एका नाटकातले संवाद आहेत)
४) ठराविक हेच जास्त बरोबर वाटते आहे. तुम्ही 'प्रासादीक ' हे एकच उदा. घेतले का?
5) मराठीत सर्रास `पाच दिवसांचा आठवडा` असं चुकीचं लिहिलं जातं.>> आठवडा तर सात दिवसांचा असतो ना? तेंव्हा चुक दिवसांचा की दिवसाचा ह्यापेक्षा पाच की सात ही जास्त आहे.
६) आणि फाईव्ह डेज अ वीक ह्याचा अनुवाद = पाच दिवसांचा आठवडा असा होत नाही तर = 'आठवड्यातील पाच दिवस' असा होतो.
जिरे घाल फोड णीत पेक्षा
जिरे घाल फोड णीत पेक्षा 'जिरं' च ऐकलय बहुतकरुन असं मला वाटतं. मी तर बोलीभाषेत राई साठी ' थोड्या राया पण घाल फोड णीत' असंही ऐकलयं
थोड्या राया पण घाल फोड णीत'
थोड्या राया पण घाल फोड णीत' असंही ऐकलयं >>>
राया मला फोडणीत घालू नका
अहो राया मला फोडणीत घालू नका...
अशी लावणी पण होती
बी, नम्रपणे काही मुद्दे नमुद
बी, नम्रपणे काही मुद्दे नमुद करु इच्छीतो.
२. विषय मराठी भाषेचा आहे, तामिळ नव्हे. असे तर प्रत्येक भाषेचे स्वत:चे नियम आणि अपवाद आहेत जे ईतर प्रत्येक भाषेपेक्षा वेगळे आहेत.
३. किती नोटा आहेत असे अनेक वचन नसुन, किती रुपये आहेत असे अनेकवचन आहे, आणिइ त्याचे अनेकवचन रुपयाचे की रुपयांचे असा मुद्दा आहे.
३(अ). रुपळ्ले हा प्रमाणित मराठीतला शब्द वाटत नसुन एखाद्या विशिष्ट प्रांतात बोलल्या जाणा-य मराठीतला स्थानीक शब्द वाटतो आहे.
>>> थोड्या वेळाने मला त्याचा
>>> थोड्या वेळाने मला त्याचा फोटो भेटला <<<<

अहो हल्ली तर त्यापुढेही जाऊन, " मला भेटताल " वगैरे सारखे अशुद्ध मराठी सरसहा बोलले/लिहीले जाते व बोलीभाषेच्या /बहुजनांच्या भाषेच्या नावाखाली सरसकटीकरण केले जाते. र्हस्वदीर्घच्या चुका समजु शकतो पण हे असे? बोलताल? करताल? भेटताल?
दुर्दैवाने, परत परत ऐकुन/वाचुन माझ्यावरही असल्या अशुद्ध व बेताल भाषेचे संस्कार होऊ लागले आहेत...
मला माझी मूळची भाषा कशी होती तेच आठवेनासे झाले आहे.
त्यात भर म्हणुन इंग्रजी शब्दांची पेरणी. ती देखिल चुकीची....
आणि वर परत मखलाशी अशी की "भावना पोहोचल्याशी मतलब ना?" भापो? ते देखिल "पोचल्याशी" असे .... कर्म माझे, आता तिरडीवर पोहोचेपर्यंत ही लोक माझ्या मेंदुला कुठे कुठे कसे कसे पोचे काढणार काय की... !
अहो हल्ली तर त्यापुढेही जाऊन,
अहो हल्ली तर त्यापुढेही जाऊन, " मला भेटताल " वगैरे सारखे अशुद्ध मराठी सरसहा बोलले/लिहीले जाते व बोलीभाषेच्या /बहुजनांच्या भाषेच्या नावाखाली सरसकटीकरण केले जाते.
>>
अशी भाषा साधारण ब्रिगेडी लोकांत आढळून येते त्यामुळे ती एकदम निषेधा र्ह आहे ::दिवा:
लिंबुटींबु, +१ अगदी असेच
लिंबुटींबु, +१
अगदी असेच वाटते.
हे भावनाओंको समझो काही भारतीयांकडून प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या सोईने वापरले जाते. प्रत्येक नियमामागे काही कारण असते आणि प्रत्येक गोष्ट प्रमाणित करण्यामागे ही कारण असते ते सर्व गुंडाळून ठेवले जाते.
काही दिसवांपुर्वीची घटना:
हिंदी बोलु शकणारा तेलुगू कलीग ग्राहकाला: आप चिता मत किजीये, काम हो जायेगा...
अहो राया मला फोडणीत घालू
अहो राया मला फोडणीत घालू नका...
अशी लावणी पण होती >>>>>>>>>>>>>>>>>>>मी नाय ब्वा ऐकली कधी.
पुण्यात सध्या तीन नवी गावे
पुण्यात सध्या तीन नवी गावे उदयाला आली आहेत हिंजेवाडी, बावधान,पषाण ( मूळ गावे हिंजवडी,बावधन पाषाण ही उध्वस्त करून तिथे हपिसे, मॉल्स, अपार्ट्मेन्ट्स बांधून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे त्या नव्या गावांची ही नावे). रेडिओ मिर्ची व तत्सम ठेसनांवर हे तुम्हाला कळेल . पुण्यातले अत्याभिजन ही भाषा बोलतात. आता इंग्रजांची जीभ वळत नव्हती म्हणून बायकुला, बँड्रा आपण एक वेळा समजून घेऊ. पण मुम्बैतले बहुजन नसलेले अभिजन देखील बँड्राच किमान बांद्रा तरी म्हणतातच .वांदरे पूर्व हे अजिबात स्टायलिश आणि फोनेटिक वाटत नाही ना !
ईंग्रजी शब्दाची पेरणी वरून आठवले.
बायकोला ह्या माझ्या मिसेस हा ईंग्रजीत नसलेला क्लॉज इथेच वापरला जातो. तसेच पोस्ट पोन च्या उलट प्री पोन हा इंग्रजीच्या द्डिक्शनरीत नसलेला शब्द ही खास भारतीय निर्मिती आहे ::फिदी:
अर्र्रारा काय आठवण करुन दिलीत
अर्र्रारा काय आठवण करुन दिलीत रॉबिनहुड. बँड्रा! भेटणे च्या चुकीच्या वापरा नंतर सगळ्यात जास्त डोक्यात जाणारा शब्द.
बाहेरगावाहुन नविन येणारे मराठीजन ही बँड्रा म्हणण्यात अभिमान बाळगतात असे दिसुन आले आहे.
वांद्रे म्हणजे सो डाऊन मार्केट यु नो.
मी बोलताना कितीही वांद्रे असा उल्लेख केला तरी, उत्तर "हो उद्या बँड्रा ला जाणार आहे" असेच येते.
रॉबिनहुड, हे प्री पोन बद्दल
रॉबिनहुड, हे प्री पोन बद्दल खरे काय आहे? ओक्सफर्ड मधे आजकाल बरेच अस्सल भारतीय शब्द असतात.
गुगलले असता गुगल आणि ऑक्सफर्ड सहीत ईतर ठिकाणी प्री पोन असा शब्द ईंग्रजीत असल्याचे दाखले मिळाले.
बंगळूरातील रेडीओवर लागलेल्या
बंगळूरातील रेडीओवर लागलेल्या कुठल्याशा हिंदी जाहीरातीत, आजही २०१५ मधे "पुना" असा उल्लेख एकायला मिळाला.
बॅन्ड्रा प्रमाणेच
बॅन्ड्रा प्रमाणेच >>>पुण्यातले अत्याभिजन>>> उंद्रीला उंड्री म्हणतात.
सध्या "शरण्या" या नावाची लाट येऊ घातलीये ....(अर्थातच मुलीचं.) पण बर्याच जणांनी हे नाव फेसबुकावर अनाउन्स करताना चक्क "शरंण्या" असं अनाउन्स केलं आहे. र वर अनुस्वाराची काहीच गरज नाही.
गुगलले असता गुगल आणि ऑक्सफर्ड
गुगलले असता गुगल आणि ऑक्सफर्ड सहीत ईतर ठिकाणी प्री पोन असा शब्द ईंग्रजीत असल्याचे दाखले मिळाले.>> हो, बरोबर आहे ते. मी खालील ठिकाणी पाहीले :
http://www.oxforddictionaries.com/definition/learner/prepone
फक्त हेही लक्षात घ्यावे की त्यापुढे Indian english & informal असे म्हटले आहे.
माझा अनुभव असा की मूळ ब्रि टीश माणसाला मात्र हा शब्द अजिबात माहीत नसतो. ते लोक या ऐवजी advance हा शब्द वापरतात.(postpone / advance अशी विरुद्ध् जोडी)
फक्त हेही लक्षात घ्यावे की
फक्त हेही लक्षात घ्यावे की त्यापुढे Indian english & informal असे म्हटले आहे. >> तसेच असेल असे वाटत होते म्हणुनच ,"ओक्सफर्ड मधे आजकाल बरेच अस्सल भारतीय शब्द असतात." असे म्हटले होते.
असे कितीतरी इंग्रजी शब्द
असे कितीतरी इंग्रजी शब्द इमेल्स मध्ये / टेलिफोनिक संभाषणांत वापरलेले आढळतात.
- रिव्हर्ट बॅक
- ट्रेल मेल
- प्रीपोन
- ... ऑर नॉट
- युअर साईड
- कम अगेन
- डिड + पास्ट टेन्स
हे फक्त वानगीदाखल
मात्र मला सँडहर्स्ट रोडचे
मात्र मला सँडहर्स्ट रोडचे 'संडास रोड ' हे देशी नामकरण जे मुम्बईच्या बहुजनांच्या वापरात आहे बेहद्द आवडते. त्याचे इरसाल देशीकरण करून सायबाची एकदम उतरवून टाकलीये. मस्त सूड !! ::फिदी:
बी, 'ठराविक' हेच बरोबर, असं
बी,
'ठराविक' हेच बरोबर, असं का वाटतं?
'ठराववाईक' असा मूळ शब्द आहे. नातेवाईक, तर्हेवाईक यांप्रमाणे ठराववाईक. म्हणजे ठरवल्याप्रमाणे असणारे / वागणारे. नातेवाईक = नात्याप्रमाणे असणारे / वागणारे. तर्हेवाईक = तर्हेने वागणारे.
ठराववाईक या शब्दाचं रूप ठरावीक. 'ठराववाईक'मधला 'ई' र्हस्व हा होईल? तो दीर्घच राहील. त्यामुळे 'ठरावीक' हेच योग्य रूप आहे.
वरची गावांच्या नावाची चर्चा
वरची गावांच्या नावाची चर्चा वाचून आठवलं. इथे तसं अस्थानी आहे.
मूळ मुंबईकर इंग्लिश / हिंदीत बोलतानाही मुंबईचा उल्लेख कायम मुंबई असा करतात तर बाहेरचे लोक अजूनही सर्रास बॉम्बे असं म्हणतात.
सगळे असंच करत असतील असं नक्कीच नाही पण बहुतांशी असंच आहे असे निरीक्षण. ( हा शब्द असाच लिहितात का ? )
आंतरजालावर ईतरत्र वाचनाच्या
आंतरजालावर ईतरत्र वाचनाच्या अनुभवावरुन यातला बराचसा भाग मराठी द्वेषातुन आणि मुंबईचे मराठी मुळ नाकारण्यातुन आलेले आहे. ब्रिटीशांनी हे शहर बांधले आणि त्याचे नाव बाँबे ठेवले, त्याची मुंबई करुन कब्जा करणारे तुम्ही कोण? मुळ कोळ्यांचा मराठी संस्कॄतीशी "काहीच" संबंध नाही. ते मराठी नव्हेतच ई. ई.
अनेक फोरम वरच्या पोस्ट मधे मुद्दामहुन बाँबे असाच उल्लेख होतो या द्वेषामुळे.
पण आपला गाव मात्र "कोलकाता" आणी "चेन्नई". कलकत्ता आणि मद्रास म्हणाल तर तुम्ही आमचा आदर करत नाही, तुम्ही देशद्रोही. ही शहरं मात्र स्थानीक अस्मितेचे ज्वलंत प्रतीक!
बघीरा, बाहेरचे म्हणजे
बघीरा, बाहेरचे म्हणजे मुंबईबाहेर राहणारी मराठी लोकं सुद्धा बॉम्बेच म्हणताना ऐकले आहे.
मुंबईतली अमराठी लोकं काय म्हणतात हे मात्र अजिबात आठवत नाहीये आत्ता.
माझ्या तोंडात मद्रास असं कधीच येत नाही. चेन्नईच. मात्र कोलकाता म्हणायची इच्छा असूनही कॅलकटा / कोलकाटाच जास्त येतं हे खरं.
Pages