झहीर खान निवृत्त!

Submitted by फारएण्ड on 15 October, 2015 - 22:29

क्रिकेट मधे फास्ट बोलर्स च्या करीयर चा एक पॅटर्न असतो. सुरूवातीला प्रचंड वेग पण अंदाधुंद बोलिंग, नंतर काही दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाल्यावर एका र्‍हिदम मधे सेटल होणे, मग प्रचंड फॉर्म चा काळ, बहुतांश प्रतिस्पर्धी टीम्स च्या विरूद्ध मॅचविनिंग परफॉर्मन्सेस, त्यानंतर एखादी दुखापत व नंतर होणारा खेळावरचा परिणाम. त्यामुळे मग कमी वेगाने पण इफेक्टिव्ह बोलिंग करण्याचा एक काळ आणि शेवटी निवृत्ती.

झहीर खान यातून गेला पण एकदम वेगळ्या क्रमाने. फास्ट बोलर करीयरच्या उत्तरार्धात जास्त वेगवान, जास्त आक्रमक व 'लीथल' होत गेला आहे असे क्वचितच पाहिले आहे. २००० साली पदार्पण केलेला झहीर २०११ मधे सर्वात जास्त भारी फॉर्म मधे होता. भारताच्या सुदैवाने वर्ल्ड कप मधे तर प्रचंड प्रभावी! त्यानंतर दुखापत वगैरे अपरिहार्य गोष्टी सुरू झाल्या व शेवटी आज त्याने निवृत्तीची घोषणा केली. भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात व कसोटी क्रिकेट मधे २०१० च्या उत्तरार्धात पहिल्या क्रमांकावर आणण्यात त्याचा प्रचंड वाटा होता.

त्याची सुरूवातीला ओळख झाली ती २००० च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत. कपिल चा अपवाद व झहीर च्या थोडा आधी आलेला आगरकर सोडला तर भारताला आपले बोलर्स यॉर्कर्स टाकून लोकांच्या दांड्या उडवत आहेत हे चित्र फारसे माहीत नव्हते. त्यात लेफ्ट आर्म फास्ट बोलर म्हणजे आपल्या दृष्टीने गल्ली क्रिकेट मधे बोलिंग करणार्‍या व टीव्हीवर अक्रम ला पाहणार्‍या आमच्यासारख्या पब्लिक च्या इमॅजिनेशन मधेच शक्य होता :). त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मॅच मधे अ‍ॅण्ड्र्यू हॉल ची दांडी त्याने उडवलेली पाहिली तेव्हा भारतीय क्रिकेट बदलत असल्याची खात्रीच पटली. २००० म्हणजे 'दादा' च्या काळाची सुरूवात. झहीर, हरभजन, सेहवाग, युवराज हे साधारण याच काळात आले/स्थिरावले.

नंतर झहीर आपला प्रमुख बोलर कधी बनला कळले पण नाही. त्याने पोत्याने विकेट्स काढल्या आहेत असे फारसे झाले नाही पण प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख बॅट्स्मन ना उडवणे, कॅप्टन ने मोक्याच्या वेळी आणल्यावर हमखास विकेट काढून देणे यात तो तरबेज होता. दुसरे म्हणजे भारताच्या बोलिंग ला जरा 'इंटिमेडेटिंग लुक' आला त्याच्या मुळे. फॉलो थ्रू मधे त्याचा आविर्भाव टीपीकल फास्ट बोलर सारखा असे. त्याआधी श्रीनाथ चा वेग जरी जबरी होता, प्रसाद चा स्विंग चांगला होता तरी त्यांची बॉडी लँग्वेज आक्रमक नसे. झहीर मुळे आपले बोलर्स पहिल्यांदा तसे वाटू लागले.

द. आफ्रिकेचा स्मिथ हा त्याचा सर्वात मोठा 'बनी'. अनेकदा त्याने त्याची विकेट काढलेली आहे. या क्लिप मधे त्या विकेट्स बघायला मिळतील.

त्याच्या जबरदस्त रिवर्स स्विंग बोलिंगची काही उदाहरणे: ही एक न्यू झीलंड विरूद्धची मॅच, भारतातली. इथे "भारतातली" ला वेगळा अर्थ आहे. भारतात कुंबळे विकेट्स काढतो यात आश्चर्य नव्हते, झहीर काढतो, ते ही स्विंग वर, यात होते. भारताच्या मोठ्या स्कोअर ला तोंड देताना किवीज ची अवस्था १७/३ करताना झहीर ने बॉल आत येणार आहे की बाहेर जाणार आहे या गोंधळात सतत ठेवले बॅट्स्मेनना. पहिले दोन ही झहीर नेच काढले होते, पण ही तिसरी स्टीफन फ्लेमिंग ची विकेट म्हणजे स्विंग मुळे होणार्‍या गोंधळाचे जबरी उदाहरण आहे. नॉर्मल स्विंग ओळखायची व त्याप्रमाणे खेळायची सवय असलेल्या खेळाडूंना बॉल अचानक "रिवर्स" होउ लागला तर खेळता येत नाही, व लाईन लक्षात न आल्याचे ढोबळ पणे दिसणारी उदाहरणे त्याचीच आहेत. बॅट्समन कधी लाईन च्या आत खेळतात तर कधी बाहेर. कल्पना करा - स्टीफन फ्लेमिंग सारखा अनुभवी खेळाडू १७/२ वर खेळायला येतो, आधीचे दोन झहीरनेच उडवले असले (हीच क्लिप पहिल्यापासून पाहा, त्या दोन्ही विकेट्सही जबरी आहेत) तरी त्याचा बॉल सरळ सोडून द्यायचा प्रयत्न करतो. टोटल पोपट. अक्रम यात मास्टर, पण झहीरही जबरी होता.

पिच च्या एका कडेने येउन बॅट्समनच्या 'ब्लॉकहोल' मधे येणारा बॉल कधी आत येउन, कधी बाहेर जाउन तर कधी लाईन होल्ड करून विकेट घेउन जात असे हे बॅट्स्मन ना अजिबात झेपत नसे. क्रीझच्या उत्तम वापराचे बांगला देश विरूद्धचे हे एक उदाहरण

मग मध्यंतरी दुखापत, फिटनेस चा बोलर्स ना होणारा त्रास त्यालाही झाला. साधारण २००५ च्या आसपास तो ही बराच आत-बाहेर होता असे मला आठवते. मग मात्र पुन्हा फिटनेस सुधारून करीयरच्या दुसर्‍या इनिंग ला आला आणि पहिल्यापेक्षा चांगला बोलिंग करू लागला.

आणि हा २००७ चा इंग्लंड मधला 'जेली बीन्स' चा एपिसोड. पीटरसन वगैरे लोकांनी झहीर ला तो बॅटिंग करत असताना सतावल्यावर मग जेव्हा तो बोलिंग ला आला, तेव्हा पेटलेला होता. ट्रेण्ट ब्रिज ची ही कसोटी त्याने खतरनाक बोलिंग करून जिंकून दिली व आपण इंग्लंड मधे बर्‍याच वर्षांनंतर मालिका जिंकलो.

यानंतर २००८ मधे त्याच्या जोडीला इशांत शर्मा आल्यावर ती २-३ वर्षे झहीर-इशांत ही जोडी जबरी जमली. मग २०११ च्या सुमाराला अनेक मोठ्या संघांविरूद्ध मॅचेस जिंकून टेस्ट मधे पहिले रँकिंग व नंतर २०११ चा वर्ल्ड कप हे त्याचे महत्त्वाचे योगदान. या कप मधे त्याने नवीन बॉल वर फार भेदक बोलिंग केली नसेल, पण काही ओव्हर्स नंतर जवळजवळ प्रत्येक वेळेला जेव्हा धोनीने त्याचा स्पेल आणला तेव्हा त्याने विकेट मिळवून दिली.

सुंदर बॅटिंग प्रमाणेच सुंदर अ‍ॅक्शन असलेल्यांची बोलिंगही बघण्यासारखी असते. त्या दृष्टीने झहीर हा ही इम्रान, होल्डिंग, कपिल, डोनाल्ड च्या रांगेतला. त्याची डिलीव्हरीच्या आधीची उडीसुद्धा आधीच्या अ‍ॅक्शनच्या र्‍हिदम मधेच आलेली असे. तसेच विकेटनंतरचे सेलिब्रेशन सुद्धा एकदम वेगळे होते. दोन्ही हात पसरून पळत बॅट्समनच्या दिशेने येणारा झहीर कायम लक्षात राहील. कारकीर्दीच्या उत्तरार्धात तो इतर बोलर्स ना मार्गदर्शनही खूप करत असे असे वाचलेले आहे. त्याच्यात जर तसे काही कौशल्य असेल तर संघाबरोबर किमान बोलिंग कोच म्हणून त्याचा विचार झाला पाहिजे.

एकूण मागच्या दशकातील टीम्स नी एक पॅशन निर्माण केली होती, त्यात झहीरही होता. २०११ च्या कप मधल्या कायम लक्षात राहिलेल्या २-३ इमेजेस पैकी एक म्हणजे भारताची फिल्डिंग चालू होत आहे. रन अप च्या टोकाला केस रंगवलेला ओल्ड हॉर्स झहीर खाली मान घालून बॉल ग्रिप करून काही सेकंद फोकस करत शांत उभा आहे. सगळे कव्हरेज एक मिनीट पॉज होते, मग रन-अप सुरू, प्रेक्षकांचा आरडाओरडा सुरू, त्यानंतर ती क्लासिक फास्ट बोलर अ‍ॅक्शन. पुढच्या एक दोन ओव्हर मधे पार्टनरशिप तोडण्याची गॅरण्टी!

गुडबाय झहीर, आम्हा फॅन्स तर्फे धन्यवाद व शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असाम्याला अनुमोदन.
त्याने ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यामध्ये घेतलेल्या विकेट्सही भारी होत्या .

सर्वात भारी तर हे होते :

adore.gif

लेख अगदी आवडला. सुंदर झाला आहे.

झहीर आला त्यावेळेस अगदी आमच्या मॅच खेळण्याचा सुवर्णकाळ होता त्यामुळे सगळे बॉलर दोस्त झहीर ची अ‍ॅक्शन कॉपी करण्याचा प्रयत्न करायचे. मित्र मित्र कॉमेंट्री ऐकत असतना सतत ती यॉर्कर साठीची ग्रीप पकडून "झाहीर खान" जेफ्री बॉयकॉटच्या आवाजात किती तरी वेळा म्हटले आहे.

धन्यवाद लोकहो. असामी - हो कालच्या काल टाकायचा म्हणून जरा घाईत लिहीला. आणि मला ठळक आठवणार्‍या, मी पाहिलेल्या गोष्टी याच जास्त लिहायच्या होत्या. कोणता एखादा मेजर भाग राहिला आहे का?

मेजर भाग असे नाही पण त्याच्या कारकिर्दीतला सगळ्यात मह्त्वाचा भाग "यानंतर २००८ मधे त्याच्या जोडीला इशांत शर्मा आल्यावर ती २-३ वर्षे झहीर-इशांत ही जोडी जबरी जमली. मग २०११ च्या सुमाराला अनेक मोठ्या संघांविरूद्ध मॅचेस जिंकून टेस्ट मधे पहिले रँकिंग व नंतर २०११ चा वर्ल्ड कप हे त्याचे महत्त्वाचे योगदान. या कप मधे त्याने नवीन बॉल वर फार भेदक बोलिंग केली नसेल, पण काही ओव्हर्स नंतर जवळजवळ प्रत्येक वेळेला जेव्हा धोनीने त्याचा स्पेल आणला तेव्हा त्याने विकेट मिळवून दिली." ह्या पॅरामधे गुंडाळलास असे वाटले.

असामी शी सहमत. फारएण्ड, तुम्ही स्वतःबद्दलच्या अपेक्षा वाढवून ठेवल्याचा हा परिणाम आहे Wink

लेख छान जमलाय. २००३ च्या वर्ल्ड कप च्या वेळी आपली फास्ट बॉलिंग अफाट होती (ती टीमच अफाट होती). श्रीनाथ च्या मेंटॉरिंग मधे झहीर आणी नेहरा छान खेळले. झहीर ची २००३ च्या फायनल ची पहिली ओव्हर सुद्धा (१५ रन्स वाली) विसरता येत नाही आणी त्यानी आधी केलेली चांगली बॉलिंग सुद्धा.

२०११ ला तर तो बॉलिंग मधला स्टार होता.

फिटनेस, बॅटींग, फिल्डींग (आणी थोडा अ‍ॅटीट्यूड) कडे त्यानी अधिक लक्ष दिलं असतं तर! ... असं एक वाटून जातं.

झहीर क्रिकेटपटू बनला तो त्याच्या वडिलांमुळे. इंजिनीअरिंग करायचं की एकदा मुंबईत जाऊन क्रिकेट कौशल्याचा अदमास घ्यायचा, या पेचात त्याच्या वडिलांनी इंजिनीअरिंगला एक वर्ष बाय करायचं ठरवलं. सुदैवाने त्यांना सुधीर नाईक यांच्यासारखा चांगला वाटाड्या भेटला... आणि तिथनं पुढची कथा आपल्याला माहीतच आहे.

झहीर अठराव्या-एकोणिसाव्या वर्षापर्यंत श्रीरामपुरातच वाढला. त्याची आई तिथं हिंद सेवा मंडळाच्या शाळेत (बहुदा) मराठीचीच शिक्षिका होती. त्यामुळं तो चांगलं मराठी बोलणारच!

लेख मस्तच आहे. कालच वाचला होता पण प्रतिसाद आता देतेय. नेहमीच्या यशस्वी स्थळांवर शेयर केला, झहीरचं फेबुपान सापडलं कालच तिथे पण दिला Wink

मराठी नाही, इंग्रजी शिकवायच्या त्या.

तुम्ही स्वतःबद्दलच्या अपेक्षा वाढवून ठेवल्याचा हा परिणाम आहे +१

चित्रपट व क्रिकेट चा इतका व्यासंग करून पोटापाण्याच्या नोकरीवर परिणाम होत नसेल का? क्लायंट ने बजेट चा विषय काढताच फारेंड अमिताभच्या आवाजात म्हणत असेल "काम, जो तुम चाहो ! पैसा, जो हम चाहे !"

देअर इज समथिंग एस्थेटीकली ब्युटिफुल अबाऊट लेफ्ट हँड फास्ट बॉलिंग!
श्रीरामपूरचा मुलगा या ओळखीमुळे जहीरबद्दल कायमच आपुलकी वाटत आली आहे.
काही म्हणा ती टीमच भारी होती! (वय झालं, वय झालं!!!)

फारएण्ड, आता विरू वर लिहायचं हं (आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हं च्या चालीवर)! Happy

गमतीचा भाग अलाहिदा. पण लिहा तुम्ही. वाचायला आवडेल.

मी परवापासूनच तयारी करणार होतो कारण हा कधीतरी रिटायर होणार याची कल्पना होती. बघू जमते का. इतर कोणीतरी लिहीले तर चांगलेच Happy

Pages