मायबोली गणेशोत्सव २०१५ - पाककृती स्पर्धा - 'अशी ही अदलाबदली' - मुदतवाढ!!

Submitted by संयोजक on 10 September, 2015 - 22:51

FoodCollageWithText&Logo.jpg

नमस्कार!

मायबोलीच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते पाककला स्पर्धा! अनेक चतुर कल्पना लढवत संयोजक मंडळ ही स्पर्धा अधिकाधिक आव्हानात्मक करण्याचा प्रयत्न करत असते आणि पाककलेत पारंगत असलेले खवय्ये मायबोलीकरही भरघोस प्रतिसाद देऊन 'हम भी कुछ कम नहीं' हेच दाखवून देत असतात. गणेशोत्सवाला खर्‍या अर्थाने लज्जत व रंगत चढते ती याच उपक्रमाने! तर यंदाही आम्ही ही परंपरा पुढे नेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आगळीवेगळी पाककला स्पर्धा! 'अशी ही अदलाबदली'!!

अनेकदा असं होतं की एखादी पाककृती वाचल्यावर त्यातले जिन्नस आपल्याला सहजी उपलब्ध नसतात किंवा पथ्याला अनुकूल नसतात किंवा बच्चेकंपनीला आवडणारे नसतात. अर्थातच आपण विचार करू लागतो की, याऐवजी दुसरं काही वापरलं तर चालेल का? तर हो! आम्ही दिलेल्या काही निवडक पाककृतीत जे 'मुख्य घटक' दिले असतील त्या जागी तुम्हाला दुसरे "बदली घटक" वापरून त्या पदार्थाचा नवा प्रकार सादर करायचा आहे. यासाठी खालील नियम काळजीपूर्वक वाचा व काही प्रश्न असतील तर जरूर विचारा!

स्पर्धेचे नियम :

१) स्पर्धेकरिता ठरावीक कालांतराने मूळ पाककृती व त्या पाककृतीमधील बदलायचे घटक प्रसिद्ध करण्यात येतील. (प्रत्येक पाककृतीमध्ये १, २ किंवा जास्तीत जास्त ३ घटक बदलण्यास सांगितले असेल.)

२) बदलण्याकरिता देण्यात आलेला प्रत्येक घटक बदलून त्याजागी नवीन घटक घालणे अनिवार्य आहे. उदा. ३ घटक बदलण्यास सांगितले असतील तर केवळ १ किंवा २ घटक बदलून चालणार नाही. तिन्ही घटक बदलणे अनिवार्य असेल.

३) बदलण्यास सांगितलेल्या घटकांऐवजी तुम्ही कुठले घटक घातले आहेत याची पाककृतीच्या सुरुवातीस ठळक अक्षरांत नोंद असणे आवश्यक आहे.

४) पाककृतीतील इतर कुठलेही घटक वगळता येणार नाहीत.

५) बदललेला घटक मूळ घटकाऐवजी पाककृतीत मुख्य घटक म्हणून आणि सजावटीत वापरू शकता. फक्त सजावटीकरिता वापरता येणार नाही. बदलून कोणता पदार्थ घालावा यावर काहीही बंधन नाही. तसेच बदलून घालायचा पदार्थ कच्चा, चिरून, सोलून, वाळवून, कशाही प्रकारे शिजवून, भाजून, उकडून, गार करून,तळून, बेक करून, क्रश करून, वाटून, लाटून कसाही वापरू शकता.
६) नवीन पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. म्हणजेच मूळ पाककृती गोड असेल व त्यात बदलायचा घटक म्हणूनब गूळ / साखर दिला असेल तर तुम्ही गुळाच्या जागी तिखट घालून तिखट पदार्थ बनवू शकता व मूळ पाकृ तिखट असेल तर तुम्ही तिला गोड करू शकता. चवीसाठी वापरण्यात येणार्या पदार्थांवर उदा.मीठ, तिखट, मसाले, मिरची, लसूण, आलं, साखर, मध, गूळ वगैरे वर आणि पाण्याच्या वापरावर प्रमाणांचं बंधन नाही. हे पदार्थ तुम्ही बदली घटकांव्यतिरक्तही वापरू शकता! तयार पदार्थाचा आकार बदलल्यास हरकत नाही, उदा. वड्यांऐवजी मोदक इ.ब थोडक्यात, तुमची कल्पकता वापरून मूळ घटक बदलून तुम्ही काहीही बनवू शकता!!
७) सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असवी. अंडेही नको. जिलेटिनचा वापर नसावा.

८) तयार पदार्थाचे प्रकाशचित्र अनिवार्य आहे. कृतीची (पायर्‍यांसहीत) प्रकाशचित्रे द्यायला हरकत नाही.

९) एक सदस्य जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो. एकाच पाककृतीत वेगवेगळे बदली घटक वापरून दोन वेगळ्या पाककृती बनवल्यास त्या दोन प्रवेशिका म्हणून धरण्यात येतील. विजेतेनिवड मतदान पद्धतीने होणार असल्याने एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास हरकत घेता येणार नाही.

१०) एका प्रवेशिकेत एकच पाककृती असावी.

११) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रुपचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (ह्यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रूप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच १७ सप्टेंबर २०१५, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.

१२) आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१५' ह्या ग्रूपमध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच १७ सप्टेंबर २०१५, भारतीय प्रमाण वेळ) २९ सप्टेंबर २०१५, अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ पर्यंत प्रकाशित करावी.

१३) मायबोलीवर वा इतरत्र पूर्व प्रकाशित पाककृती येथे देता येणार नाही.

१४) धाग्याचे शीर्षक <अशी ही अदलाबदली>-<मूळ पाककृतीचे नांव>असे असावे. नवीन पाककृतीचे नाव मजकुरात सुरुवातीस लिहावे.

१५) नियम क्रमांक ९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे विजेत्यांची निवड मतदानपद्धतीने केली जाईल. मतदान करण्याकरता मायबोली सदस्यत्व आवश्यक आहे

पाककृती क्रमांक १ : 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.१ : गाजर आणि चणा डाळ वडी

पाककॄती क्रमांक २ : 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.२ : ब्रह्मघोटाळ्याचे पराठे

पाककॄती क्रमांक ३ : 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.३ : मद्रासी सांबार कांद्यांची कलेजी

पाककॄती क्रमांक ४ : 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.४ : स्पायसी सॅलड स्टॅक

पाककॄती क्रमांक ५ 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.५ - ओटसचे मोदक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कल्पना! सोपी पाककृती वाटली तर भाग घेणार नक्कीच.

चित्रातले गुलाबजाम आणि खालच्या ओळीतली कुल्फी ओळखीची वाटली. Proud

चिकन ऐवजी बटाटा घालू का? पनीर कसं लागेल यात? काकडीऐवजी गाजर घातलं तर?- या प्रश्नांना खुलं चॅलेन्जच दिलंय! Lol

अभिनव स्पर्धा! शुभेच्छा!

हैला! भारी आहे.
पहिलाच नियम कळला नाही. ठराविक कालाने म्हणजे काय? आज साखर बदलायला सांगितली तर उद्या गूळ बदलायला सांगणार असं का? म्हणजे आदमी एक, आज पँट बदलेगा तो कल शरट असं का?
बदला लूंगी! Wink

सोल्लीड कल्पना आहे. खुपच आवडली. पण आम्ही पिटातले प्रेक्षक. असले फक्त दुरुन बघणार. त्यामुळे इथली सुगरण मंडळी काय काय करणार हे बघाय्ची उत्सुकता शिगेला पोचतेय आता.

@ मंजूडी, ठरावीक कालावधीने एकेक वेगवेगळी पाककृती प्रसिध्द करण्यात येईल. त्यातच बदलायचे सर्व घटक लिहिलेले असतीलं.

मस्त कल्पकता वापरुन स्पर्धा योजलेय.

चित्रातले गुलाबजाम आणि खालच्या ओळीतली कुल्फी ओळखीची वाटली. >>>> हो हो, मला तर ओळख पटली सुद्धा !

मंजुडी- मला असं वाटतं की ठराविक काळाने म्हणजे, काही दिवसांचं अंतर राखून आणखी १-२ मूळ पाककृती देण्यात येतील व त्यांतील घटक बदलण्यास सांगण्यात येईल. म्हणजे स्पर्धकांना वेगवेगळ्या मूळ पा. कृ. मिळतील.

शुभेच्छा !

संयोजक, उत्तम कल्पना व उपक्रम. एक शंका - एखाद्या ठिकाणी पाकृमधील 'बदलता न येणारा' एखादा घटक पदार्थ सहजी उपलब्ध होत नसेल तिथे स्पर्धकांनी कोणता पर्याय वापरायचा? उदा. ओला नारळ उपलब्ध नसेल (बाजारात सहज मिळत नसेल) तिथे डेसिकेटेड कोकोनट किंवा कोकोनट क्रीम इत्यादी रूपांत तो वापरता येईल का?

ग्रेट आयडिया आहे, उत्सुकता वाढवणारी स्पर्धा आहे !! मस्त!!!

सर्व मास्टर शेफ्स ना हार्दिक शुभेच्छा!!!!

धन्यवाद लोकहो.
@मामी,तुमच्या प्रश्नाचे उत्तर वर नियम ६मध्ये ठळक केले आहे.
@अरूंधती, न बदलायचे घटक कोणत्याही स्वरूपात बदलता येणार नाहीत. अशी प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.

Pages