दम लगाके हैशा... ( चित्रपट )

Submitted by दिनेश. on 10 September, 2015 - 07:20

उत्तम कथा हाताशी असेल, उत्तम दिग्दर्शक असेल आणि अभिनयनिपुण कलाकार ( भले मग ते नाववाले का
नसोत ) असतील तर कशी एक उत्तम कलाकृती तयार होते, याचे हे उदाहरण आहे.

मी हा चित्रपट सिडीवर बघितला आणि सोबत मेकिंग ऑफ ची सिडी पण होती. ती बघितल्यानंतर तर हा
चित्रपट जास्तच आवडता झालाय, म्हणून इथे लिहितोय.

लग्नाचा अर्थ समजलेला नसणे हि काही नवी थीम नाही.. उपहार, बालिका वधु, अनुभव ( पद्मिनी कोल्हापुरेचा.. तनुजाचा नाही ) वगैरे अनेक चित्रपट येऊन गेले. ते वाईटही नव्हते पण ते टिपीकल गुडी गुडी चित्रपट होते.
इथे केवळ हिच थीम नाही. पुर्वीच्या कथेत एक जोडीदार ( बहुदा नवरी ) अल्लड असे आणि नवरा समजूतदार असे.
इथे दोघेही न्यूनगंडाने ग्रासलेले. ( आयुषमानच्या शब्दात अंडरडॉग्ज ) तिला आपल्या स्थूलपणाचा तर त्याला आपल्या निकम्मेपणाचा गंड. त्यांच्या समंजस होण्याचा हा प्रवास.

यातल्या दोघांचे लग्न लागणे एरवी आपल्याला अशक्य वाटू शकले असते, पण इथे त्याची कारणमीमांसाही
व्यवस्थित दाखवलीय. त्याची नाखुषी पण तिचा उत्साह अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून खुलवलाय. प्रत्येक प्रसंग अगदी वास्तव, कुणाच्याही घरी घडू शकेल असा. फक्त हरद्वारला अशी स्पर्धा ( पत्नीला पाठीवर उचलून धावायची ) होत असेल अशी शंका वाटू शकेल. पण या कथेच्या ओघात तिही वाटत नाही. आणि ते प्रेम ( आयूषमान ) साठी अशक्य असणार नाही, असे सूचनही कथेत आहे ( शाखेत जाऊन काय झक मारली का ? असा संवादही आहे चित्रपटात. ) कथेचा शेवटही एका योग्य प्रसंगावर केलाय. काही प्रश्न अनुत्तरीतच ठेवलेत ( उदा. त्याचा हरलेला मित्र आपले वचन पाळतो का ? दुकान विकल्यावर त्यांचे कसे चालणार ? त्याला सरकारी नोकरी मिळते का ? ती नोकरी स्वीकारते का ? ) पण त्या प्रश्नांना ते दोघे समर्थपणे सामोरे जातील, असा आपल्यालाच विश्वास वाटू लागतो.

मेकिंग मधे आयुषमान आणि भूमी जे बोललेत तेही महत्वाचे आहे. त्याने वजन कमी करून ६९ किलो केले होते, तर तिने वाढवून ८६ किलो. तरीही त्याने प्रत्यक्षात तिला उचलून घेतले होते, त्यासाठी कुठलीही ट्रीक वापरलेली नाही. उलट जो बॉडी डबल आणला होता, त्यालाच ते जमले नव्हते. दुसरे म्हणजे भूमीने मुद्दामहून सांगितलेय कि त्याने प्रत्येकवेळी तिला पाठीवरून उतरवताना अगदी हळूवारपणेच उतरवले.

तरीही तिचा स्थूलपणा हा चित्रपटाचा मुख्य विषय नाहीच. तिचा स्थूलपणा अधोरेखीत होईल असा कुठलाही अपमानास्पद कॅमेरा अँगल चित्रपटात नाही ( संवादात अपमानास्पद उल्लेख आहेत, पण ते कथेच्या दृष्टीने आवश्यक आहेत. ) एरवी स्थूल पात्र असेल तर त्याने चित्रपटात बकाबक खाण्याचा, पाय घसरुन पडण्याचा, किंवा त्याच्या वजनाने टायर पंक्चर होण्याचा प्रसंग विनोदनिर्मितीसाठी केलेला असतो, इथे तसे काहीच नाही.

तरीही अगदी दोन सूचक प्रसंग आहेत. ते जेव्हा सरकारी पुस्तकालयात रिक्षातून जातात, त्यावेळी तिच्या आड बसलेला तो अजिबात दिसत नाही ( पण असाच शॉट ती मुलाखतीला जाते त्यावेळी मात्र टाळला आहे ) आणि मोह मोह के धागे च्या वेळी त्याला स्कूटर, स्पीड ब्रेकरवरुन न्यायला त्रास होतो तो प्रसंग.

कथेसाठी जो काळ निवडलाय तो पण अनोखा आहे. कॅसेटचा जमाना संपून सिडीचा जमाना सुरु झालाय त्यामूळे आधीच निक्कम्मा ठरलेल्या प्रेमपुढच्या समस्याही वाढणार आहेत. तो काळ, त्या काळातल्या काही कॉमन पद्धतीवरून ( कॅसेटवर गाणी भरून घेणे ) आणि अर्थातच त्या काळातल्या गाण्यातून मस्त दाखवलाय.

अलिकडच्या काही चित्रपटातून भारतातली शहरे महत्वाची पात्रे बनून समोर येताहेत ( कहानी मधले कोलकाता, शूद्ध देसी रोमान्स मधले जयपूर, एन एच टेन मधले गुडगावाँ, फुकरे मधली दिल्ली ) तसेच इथे हरद्वार येते. प्रत्येक शॉट मग तो घरातला असो, गल्लीबोळातला असो कि शाखेतला असो, हरद्वार जाणवतेच. हे गाव नुसते दृष्यातूनच नाही तर भाषेतूनही जाणवते. काही शब्द तर खासच. ( तू जरुर भागोगो, साखाबाबू, सरकारी पुस्तकालय )

संवाद तर खासच आहेत. खास करून दोघांच्या आया, आत्याच्या तोंडचे तर.. कहर आहेत. भाषा, संवादा बरोबरच छोट्या गावातले जे व्यवहार असतात, ते पण नेमके दाखवलेत. ( तिला शेजारणीने वाटेत थांबवणे, पेपरमधे सुईसाईड नोट लिहिली म्हणून पोलिसाने घरी येणे, पेढे वाटताना अर्धाच पेढा घे असे सांगणे.. )

पुर्वी चित्रपटात एखादे घर दाखवायचे असेल तर एक सेट तयार केला जायचा ( तेरे मेरे सपने चित्रपटात तर असा सेटच दाखवलाय ) पण इथे ते घर पण एक पात्र बनून समोर येते. त्या घराच्या गिलावा उडालेल्या भिंती, नदीच्या दिशेचा तुटलेला कठडा, त्या दिशेने असणारे दोन वापरात नसलेले सज्जे, खडाखड वाजणारे दरवाजे... सगळे त्यांची आर्थिक परिस्थिती दाखवतात. पण तरीही ते गरीब बिचारे नाहीत. सुहागरातीला झेंडूच्या माळा लावणे, वाढदिवसाला क्रीम पेस्ट्री वाटणे सारख्या छोट्या छोट्या प्रसंगातून ते आनंद साजरा करतात. त्या घरातील सर्वांचाच वावर अगदी नैसर्गिक वाटतो. त्यांचा एकमेकातील जिव्हाळा पण अगदी सहज दिसतो ( त्याला उलटी झाल्यावर वडील त्याचे तोंड आपल्या कुडत्याने पुसतात, आत्या शोक करताना, जीजी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवते.. )

मेकिंग ऑफ मधे भूमी म्हणालीय कि चित्रपटातले काही प्रसंग, सुचलेच कसे असे आम्हाला वाटले. त्या दृष्टीने मला काही प्रसंग खासच वाटले. उदा. आत्या आणि संध्या मिळून फळीवरचे डबे लावतात, संध्याचा भाऊ तिला माघारी न्यायला येतो, नव्या बहूचा कौतूकाचा सैपाक जेवून पोट न भरल्याने आई, बाबा आणि आत्या चोरून जेवतात.. )

तिन्ही गाणी आपापल्या जागी फिट्ट. सुंदर सुशील मधले शब्द, त्या कलाकारांचे आवाज आणि पडद्यावरचा सामुदायिक विवाह, त्यातले वधू वर, गायक कलाकार भन्नाट. मोह मोह के धागे ची चाल सुंदर. शर्यतीच्या वेळचे गाणे प्रेरणादायी... आणि शेवटी येणारे गाणे चित्रपटापासून फटकून असले तरी त्या काळाशी सुसंगत.

चित्रपटातले विनोदी प्रसंगही ओढून ताणून आणलेले नाहीत. ( उदा कोर्टात दोन विहिणी भेटातात तो प्रसंग, तिची वकील संध्याच्या घरी येऊन इंग्रजीमधे बोलते त्यावरच्या तिच्या आईच्या प्रतिक्रिया. ) ते अगदी त्या त्या पात्राच्या नैसर्गिक स्वभावाला अनुसरूनच.

आयूषमान सोडला तर बाकी कुणी कलाकार फार परिचित असा नाही. तरी पण त्यांची निवड अगदी चपखल आहे.
संजय मिश्रा ( प्रेमचे बाबा ) अलका अमीन ( प्रेमची आई ) शीबा चढ्ढा ( प्रेमची आत्या ) सीमा पाहवा ( संध्याची आई ) सर्वच कलाकारांचा अभिनय अव्वल आहे.

भूमीचा पहिला चित्रपट असूनही ती कुठेही नवखी वाटत नाही. तिची तयारी सीमा पाहवानी करून घेतली, असे तिच म्हणालीय, त्यामूळे ती पुर्णपणे संध्याच वाटते.

आयुषमान तर माझा खुप आवडता कलाकार आहे. त्याचा चेहरा विलक्षण बोलका आहे. विकी डोनर, नौटंकी साला आणि ही भुमिकाही अवघडच होती. कुठलीही हिरोगिरी करायला वाव नसणारी हि भुमिका त्याने ताकदीने पेललीय. खास करून त्याचा मित्र त्याला शाखेतून दुकानात नेतो त्यावेळचा त्याचा अभिनय, अंगावर रॉकेल ओतून माचिससाठी आरडाओरडा करण्याचा प्रसंग आणि मुझे वापस नही जाना है, उसे रोक लो असे संध्याने म्हणताच त्याच्या डोळ्यात आलेली चमक... दाद देण्यासारखे आहे.

हा चित्रपट मी सिडीवर बघितल्याने आवडते प्रसंग परत परत बघितले. शक्य असल्यास हि सिडी संग्रही ठेवाच, असे सुचवेन.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय. आवडला लेख Happy

तिला आपल्या स्थूलपणाचा तर त्याला आपल्या निकम्मेपणाचा गंड >>
मला नाही वाटलं असं की तिला स्थूलपणाचा गंड आहे. उलट त्याने तिला सन्मानाने वागवावे अशी तिची अपेक्षा आहे. आणि तो नाही वागवत तर जग काय म्हणेल याची पर्वा न करता (तो काळ बघता ) निघून येते सरळ. मला आवडले तिचे पात्र; कुठेही हतबल नाही. एकदम कॉन्फिडंट.

हो चैत्रगंधा, तसे चित्रपटात थेट जाणवत नाहीं, पण चर्चेत तसा उल्लेख आहे. शिवाय चित्रपटात तिचा भाऊही तिला तसे बोलतो. आणि ती पण शेवटच्या प्रसंगात, माझ्याशी कोण लग्न करेल, असे म्हणते. पण तरीही तो मुख्य विषय नाहीच.

काही तरी सेन्सिबल वाचायला मिळेल, ही गेल्या काही दिवसांतली प्रतीक्षा संपवल्याबद्दल धन्यवाद !

सुंदर लिहिलं आहे. माझा पाहायचा राहिला आहे. टीव्हीवर येण्याची वाट पाहतो !

काही तरी सेन्सिबल वाचायला मिळेल, ही गेल्या काही दिवसांतली प्रतीक्षा संपवल्याबद्दल धन्यवाद ! +१

तुमच्या मतांशी सहमत आहे. छान लिहिले.

दिग्दर्शक समर्थ असेल तर चित्रपटाचे माध्यम कसे ताकदवान असते, हे दाखवून देणारा चित्रपट आहे.
हे कथा साधी कुणाच्याही आयुष्यात घडेल अशी आहे. पण प्रेक्षकांना जिंकणारे सादरीकरण आहे.

चित्रपट संयत आणि सुरेख आहे.
अगदी पाहावा असा आहे!

सध्याच्या उठवळ फालतू आयटम साँग वाल्या जमान्यात अगदी निराळा!
गाणी अप्रतिम आहेत.
मोह मोह के धागे हे चपखल बसलेले आहे. योग्य चित्रण, शब्द आणि संगीत सर्व अगदी नेमके आहे.
ते शेवटचे गाणे 'दर्द करारा' पण मस्त आहे. आयुशमान चे निवेदन शेवटी चक्क आठवण करून देते की... 'तुम्ही चित्रपट पाहता आहात' Happy

सगळ्यांचा अभिनय अगदी हवा तसा आहे. वाढदिवसाच्या दिवसाचे भांडण कसले मस्त जमले आहे. Wink

ते गंगेकाठचे घर खुप सुंदर आहे...
अगदी तिथे जाउन रहावेसे वाटते असे आहे..

हा धागा काढल्या बद्दल धन्यवाद.
या निमित्ताने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.

सुंदर लिहिलेय
माझाही थेटरात बघायचा राहिलेला, मग फ्लाईटमधे मिळाला

छान जमलाय, कास्टिंग परफेक्ट आहे.
तुम्ही लिहिलेत ते छोटे छोटे प्रसंग एकदम धमाल झालेत. तो चोरून खाण्याचा वाचून तर आताही हसू उमटले.
शाखेतलेही असेच भन्नाट आहेत.
संजय मिश्रा, सीमा पाहवा फार सहज अभिनय करतात कुठल्याही भूमिकेत.

दिनेश,

फार अप्रतिम लिहिलंत. एक आणि एक शब्द पटला, उलट मी पाहिला असूनही मी इतकं सखोल परिक्षण (अगदी मनातल्या मनात सुद्धा) केलं नव्हतं. पण तुम्ही लिहिलेलं वाचल्यावर मात्र प्रत्येक वाक्याला अगदी अगदी असं झालं.
चित्रपट पाहून बरेच दिवस झाल्याने (मी ही टिव्हिवरच पाहिला) प्रत्येक प्रसंग लक्षात नाही पण एकूण हळूवार आणि साधी सरळ कथा, काळानुसार वापरलेले आजूबाजुचे प्रसंग, वस्तू, घरं.... सगळंच अप्रतिम आहे सिनेमात. अगदी कुठे खोट काढायला जागा नाही अजिबात.
गाणी ही फार अप्रतिम आहेत.
सीडी संग्रही ठेवावी हे नक्कीच.
वेलकम टू सज्जनपुर नंतर हाच सिनेमा Happy

अतिशय सुंदर सहज शैली मधे निर्माण केलेला हा चित्रपट.खूपच आवडला होता. असे लहान आर्टिस्ट असलेले ( पण कलाकारीने मोठे असलेले) चित्रपट आम्ही एक सुद्धा चुकवत नाही..

काही मला अतिशय आवडलेले आणी आवर्जून पाहण्या सारखे चित्रपट..

१- रोड टू संगम

२- फिल्मिस्तान

३- ऐसा भी होता है

४- झेड प्लस

५- भिंडी बाजार इन्क( आय एन सी= इन्क)

६.- आँखों देखी

७- प्यार का पंचनामा

८- गुलाल

९- आय अ‍ॅम कलाम

१०- बारा आने

११- संकट सिटी

१२- रात गई बात गई

१३- आमरस

दिनेश, मस्त लिहिलं आहेत परिक्षण.. अगदी प्रत्येक मुद्दा पटला. मी सुद्धा हा चित्रपट सीडी वर बघितला आणि खुप आवडला. सद्ध्याच्या गल्लाभरू चित्रपट करणार्‍या नायकांमधे अशा भुमिका करून आयुषमान त्याचे वेगळेपण टिकवून आहे. ह्या चित्रपटात "नावाजलेले" असे अभिनेते नसले तरी जे आहेत त्या सर्वांनी उत्तम काम केलय आणि सर्वच छान अभिनेते आहेत हे विषेश. सर्व पात्रे अगदी साधी व येता जाता कोपर्‍यावर भेटतील अशी वाटतात. स्थूलपणावर कुठेही पाणचट किंवा अंगविक्षेपी विनोद नसल्यामुळे फारच बरं वाटलं बघताना. बघितला नसेल त्यांनी जरूर बघावा.. माझे ह्या चित्रपटाला ५ तारे Happy

मलाही खुप आवडला सिनेमा! खुप मजा आली बघायला. आजकाल कित्येक सो कॉल्ड विनोदी पिकच्रांच्या विनोदांवर हसायला येत नाही पण ह्या पिकचर मध्ये अगदी नकळत खुदकन हसायला येतं. संजय मिश्रा तर अप्रतिम काम करतो! त्यानी बर्‍याच सीन्स मध्ये प्रचंड धमाल आणलीये. आयुषमान ला चप्पल फेकून मारतो अन ती बुआला लागते तो सीन आणि अजून बरेच. जीप मधून समझौता करायला निघतात तेव्हा आयुषमानच्या आईचा डायलॉग जबरी आहे! भुमी पेडनेकरनी पण अतिशय सुंदर काम केलय.

छान लिहिलंय दिनेशदा. पहावा लागणार मुद्दाम.
वर्षू नील>> रेडीमेड लिस्ट साठी धन्यवाद.. त्यात 'मसान' पण अ‍ॅड करा Happy

सगळ्यांना आवडला हे वाचून खुप छान वाटले. अशा चित्रपटांना प्रसिद्धी मिळालीच पाहिजे.

वर्षू... छान लिस्ट आहे, पुढच्या वेळी सिडीज घेईन. यापैकी फक्त रोड टु संगम बघितलाय.

वैद्यबुवा.. तो त्या शेजार्‍याला उद्देशून म्हणते तो ना ... कसला तिखट आहे तो. ( इथे द्यायचा मोह आवरतोय. )

अगदी छोटे छोटे संवाद, पण नेमके आहेत. संध्या जेवण बनवते त्यावेळी एका वाटीत पनीर असते. बाबा ते प्रेम ला देतात. आई म्हणते संध्याला दे, त्यावेळी ती म्हणते, हमारे घरमे तो बनता रहता है... किती तीर मारलेत यातून !!

आणि मुख्य म्हणजे या गोष्टी अगदी सामान्य प्रेक्षकालाही कळतील अश्याच आहेत. कुठेही फार प्रतीके, छुपे क्लूज वगैरे नाही.

लेख आवडला . छान लिहिले आहे. सर्वाची कामे मस्त झालियेत् . मोह मोह के धागे गाणही छान झालेय. विशेष लक्षात राहतो तो संजय मिश्रा. सहजतेने काम केलेय.

पण मलाही भूमी पेडणेकरच्या भूमिकेत न्यूनगंड जाणवला नाही. जाड़ेपणा हा तिच्यासाठी इश्यू आहे असे चित्रपट बघताना जाणवलेल नव्हतं. उलट तिने सहजतेने त्याचा स्वीकार केलाय. मला आवडल तिच पात्र

मुळात या चित्रपटाचा शेवट उल्लेखनीय आहे. मुंबईच्या फौजदारसारख भूमीच्या पात्राने स्वतःमध्ये बदल घडवून वगैरे आणल असत तर ते नेहमीचच झाल असत. आहे त्या गोष्टीला समजंसपणे स्विकारून नात पुढे न्यायचा शेवट केला आहे ते अधिक आवडल. तो शेवट अधिक खऱ्या अर्थाने पोचला.

हो जाई, दोघांचाही समंजसपणाकडे प्रवास मस्त अधोरेखीत होतो. ती तर पहिल्यापासून अगदी लग्नाला बसल्यावर त्याला औषधाच्या गोळ्या देण्यापासून खुप केअरींग वाटते आणि तो उतावळा. तिचा अपमान झाल्यावर मात्र चवताळून उठते.

( त्या थोबाडीत मारण्याच्या प्रसंगाचे ३२ रिटेक झाले. आयुषमानचे गाल लाल झाले होते ते पण सिडीमधे दाखवलेय. )

वाचताना परत एकदा चित्रपट आठवला..
खुदकन हसु येणारे बरेच प्रसंग आहेत यात..
बापलेकाच रिलेशन भारीच दाखवलय..संजय मिश्रा अप्रतिम्च आहे म्हणा..
मला सुद्धा सगळेच कलाकार आवडलेत यातले त्यामुळे मज्जाच आली...मी मुद्दाम चित्रपटगृहात जाऊन पाहिला..मी राहिली होती शिल्लक म्हणुन माझ्या मित्रानं परत एकदा पाहिला Proud
सुरुवातीच आयुष्यमान खुराणा चं नॅरेशन पन आवडल मला Happy त्यानं भाषेचा लहेजा मस्त सांभाळलाय..
संजय मिश्रा कसला मस्त सासरा दाखवलाय..भारीच.

छान परीक्षण लिहिले आहे

हा चित्रपट बरेच दिवस माझ्याकडे होता, पण चांगला असल्याची कल्पना नसल्याने बघणे झाले नाही. अर्थात त्यातील एक क्लायमॅक्सचे द्रुश्य ज्यात तो तिला आपल्या पाठीवर उचलत धावतो हे माहीत असल्याने चित्रपट काहीतरी वेगळाच असावा असे वाटलेले.. आणि आता तो माझ्याकडे नाहीये Sad
असो, पण आता पुन्हा शोधणे आले

यामध्ये छोटे छोटे प्रसंग सही घेतलेत आणि ते घेताना "बघा, आम्ही काहीतरी ग्रेट दाखवतोय" अस आव आणलेला नाही ते जास्त आवडलंय.

खासकरून दोन तीन प्रसंग फार मस्त घेतलेत. कोर्टामध्ये ती सासूच्या हातातली सलाईनची बाटली धरते तेव्हा सासूचा डायलॉग खतरा आहे. दुसरा डायलॉग - भूमी सकाळी उठून आवरत असते तेव्हा "पूरी पिक्चर देखने की आदत है, आधे मे ना सो जाऊ" खतरनाक कंटेक्स्ट आहे त्याला. त्यावर आयुष्मानचे एक्स्प्रेशन तितकेच खतरनाक.

मला भूमीचं कॅरेक्टर फार आवडलं. जाडेपणाचा न्यूनगंड वगैरे अजिबात नाही. उलट स्वतःवर अतिशय विश्वास असलेली पॉझीटीव्ह व्यक्ती आहे, नवर्‍याचं मन जिंकण्यासाठी ती स्वतःहून काही प्रयत्न करते. चांगली सून बनायच्या नादात स्वतःचं अस्तित्व विसरत नाही. अपमान झाल्यावर चिडून उठते, आणि राग शांत झाल्यावर समजूतदारपणाही दाखवते. भूमीनं हा रोल अस्सलरीत्या साकारलाय.

मला भूमीचं कॅरेक्टर फार आवडलं. जाडेपणाचा न्यूनगंड वगैरे अजिबात नाही. उलट स्वतःवर अतिशय विश्वास असलेली पॉझीटीव्ह व्यक्ती आहे, नवर्‍याचं मन जिंकण्यासाठी ती स्वतःहून काही प्रयत्न करते. चांगली सून बनायच्या नादात स्वतःचं अस्तित्व विसरत नाही. अपमान झाल्यावर चिडून उठते, आणि राग शांत झाल्यावर समजूतदारपणाही दाखवते. भूमीनं हा रोल अस्सलरीत्या साकारलाय>>>

यु सेड इट!

हा लेख वाचून बघायला घेतला. दोनच भाग बघितले आणी राहिलेले पुरवून पुरवून बघेन. दिनेश, धन्यवाद, इतका छान सिनेमा हुकला असता.,सर्वांचीच कामे मस्त. १९९० चे वातावरण मस्त पकडले आहे.

१९९० + शतकातला काळ असल्याने खुपच nostalgic वाटले सिनेमा बघताना(यावरून माझ्या वयाचा अंदाज बांधू नका लगेच Wink ). त्यात ते गंगाकाठचे घर तर एकदम आमच्या जुन्या नाशकात घेऊन गेले!

भुमी मुळातच लठ्ठ असावी असे मला वाटत होते. एव्हध्या चांगल्या अभिनेत्रीला (जाड़असल्यामुळे) यानंतर काय काम मिळेल असेही वाटून गेले.

सिंनेमा खुपच छान जमुन आलाय एकुणात.

Pages